प्रतिशोध.!! (भाग ३) अंतिम भाग

Submitted by रूपाली विशे - पाटील on 5 February, 2022 - 07:34

प्रतिशोध..! भाग-३ (अंतिम भाग)...!
_________________________________________

https://www.maayboli.com/node/81018

जेव्हा मला जाग आली, तेव्हा मी आतल्या खोलीत गादीवर होते. कुणीतरी माझ्या नाकाला कांदा धरलेला. मी हळूहळू डोळे उघडले. रडण्याचा, आक्रोशाचा अस्पष्ट आवाज माझ्या कानावर येऊ लागला.

मी पार्वती मावशींच्या आधाराने ओसरीत आले. घरात माणसांची गर्दी जमलेली...!!

समोर ठेवलेला वैशूचा अचेतन देह पाहून मला काल काय घडलं असावं त्याची कल्पना आली. जे अघटित घडलं होतं, त्याचा मला जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. माझ्या हाता- पायांना कंप सुटलेला. मी थरथरत्या अंगाने आत्याजवळ गेले. मला पाहून तिने हंबरडा फोडला. एकमेकींना मिठी मारून कितीतरी वेळ आम्ही दोघी रडत राहिलो.

ज्या डोळ्यांत मी नेहमीच तिरसटपणाचे, अहंकाराचे, तसेच चमत्कारीक भाव पाहिले होते, ज्या डोळ्यांची मला नेहमीच दहशत वाटत असे; ते मोठे, करड्या रंगाचे डोळे आज कायमचे शांत झोपले होते. मला वैशूच्या शांत, अचेतन देहाकडे पाहवत नव्हते.

' नदीच्या डोहा शेजारून चालताना अचानक निसरड्या जागेवर पाय घसरल्यामुळे तोल जाऊन वैशू नदीच्या डोहात कोसळली आणि ते पाहून धक्का बसल्याने मला चक्कर आली. बस्स..! यापुढे काय घडलं ते मला काहीच आठवत नाही..!!"

मी पोलिसांना जबाब लिहून दिला.

" तुमचा कुणावर संशय..??" पोलिसांनी आत्याला विचारलं.

पोलिसांच्या ह्या प्रश्नावर मघासपासून माझ्यावर रोखून असलेली आत्याची नजर अधिकच धारदार झाली. त्या नजरेने मी व्यथित झाले. आत्याला माझा संशय येतोय् का बरं..??

मला खरंच गरगरल्यासारखं झालं. कधी नव्हे ते आत्याची आणि तिच्या नजरेची विलक्षण भीती मला वाटू लागली.

आत्याने पोलिसांना मानेनेच् नकार दिला.

वैशू गेली त्या दिवसापासून आत्याने घरात मौनव्रत धारण केलं होतं. वैशूच्या विरहात ती रात्रंदिवस झुरू लागली. मी तिच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न करत असे, पण सांत्वनाचे शब्द किती पोकळ असतात ; ते मला आत्याच्या आभाळाएवढ्या दुःखाकडे पाहून जाणवू लागे.

घरातले सुतक संपले. वैशूचे दिवसकार्य यांत्रिकपणे पार पडले. त्याच संध्याकाळी घरामागच्या पारावर पिंपळाच्या बुंध्याला टेकून, डोळे मिटून आत्या बसली होती. श्रांत... क्लांत...!! एखाद्या प्रवासाला निघालेल्या पांथस्थाने थकल्या तन-मनाने घडीभर बसून विसावा घ्यावा अगदी तशीच..!

ओघळलेल्या, सुकलेल्या अश्रूंच्या रेषा तिच्या खोल गेलेल्या गालांवर स्पष्ट उठून दिसत होत्या.

मी धडधडत्या उराने जवळ जाऊन तिच्या खांद्याला हलकेच स्पर्श केला__

__ आणि तिच्या बंद पापण्यांआडून अश्रुधारा बरसू लागल्या.

" मधू, खोटं सांगितलंस् ना तू पोलिसांना ..??" अचानक डोळे उघडून तिने असं म्हटल्याबरोबर मी चरकले.

माझ्या हृदयातल्या ठोक्यांची गती वाढली.

आत्याच्या आवाजाला विलक्षण धार आलेली.. ! तिची चर्या एकदम बदलली. तिच्या नजरेतल्या संशयाचे भाले मला टोचू लागले.

"आत्या, जे घडलं , जे सत्य आहे तेच सांगितलं मी सगळ्यांना...!!" मी कापऱ्या आवाजात म्हणाले.

" ज्याची आयुष्यभर भीती बाळगली होती तेच घडलं..!" आत्या हुंदके देऊ लागली.

" हा अपघात होता की आत्महत्या..??... मधू, मला खरं सांग..!"

" कसली भीती ..?? काय म्हणतेय् तू आत्या..?? वैशूने आत्महत्या नाही केली.. जे घडलं तो एक अपघातच् होता... खरं घडलं तेच सांगत्येय् मी तुला...! माझ्यावर विश्वास ठेव गं... आणि एक सांग, वैशू आत्महत्या का आणि कश्यासाठी करेल ..?" मी आत्याला समजावताना काकुळतीला आले.

"अनुवांशिक वेडाची लहर.. !!" असं म्हणत आत्या शून्यात पाहू लागली.

" म्हणजे..??" तिचं असं कोड्यात बोलणं मला काही उमगत नव्हतं.

" शाप आहे शाप... !! निसर्गाचा शाप आहे ह्या जहागीरदारांच्या घराण्याला..!" हंबरडा फोडत आत्या कपाळ बडवू लागली.

"माणसाचे मनोविकार एवढे प्रबळ असू शकतात का गं... की, ते माणसाचे शहाणपण, त्याची विवेकबुद्धी यावर ताबा मिळवू लागतात...??" आत्या रडत - रडत म्हणू लागली.

तिच्या ह्या प्रश्नावर काय उत्तर द्यावे हे मला सुचेना. मी तिचे माझ्यापरीने सांत्वन करू लागले.

आत्याच्या आयुष्यात एखादे दाहक दुःख लपलेले असावे, हे हळूहळू माझ्या ध्यानात येऊ लागले. तिने सांगितलेली कहाणी माझ्या डोळ्यांसमोर चित्रपटासारखी सरकू लागली. कल्पनेनेही हा चित्रपट पाहताना माझ्या अंगावर काटा उभा राहू लागला. एखाद्या नयनरम्य बागेत फुलांचे ताटवे असलेल्या जमिनीखाली विनाशक असा धगधगता ज्वालामुखी असावा अगदी तसेच् आत्याचे आयुष्य होते.

वयात पदार्पण केल्या - केल्या आत्याला स्थळं येऊ लागली होती. घरची परिस्थिती तशी बेताचीच.. मीठ आहे तर पीठ नाही आणि पीठ आहे तर मीठ नाही अशी...!!

अश्यातच कुणीतरी जहागीरदारांच्या एकुलत्या एक मुलाचे स्थळ आत्यासाठी सुचवले. जहागीरदारांच्या घराला आत्या सून म्हणून पसंत पडली. गरीबाघरची रजनी जहागीरदारीण होणार म्हणून सगळं घर आनंदून गेलं.

देश स्वतंत्र झाल्यावर जहागीरदारीला पूर्वीसारखी किंमत उरली नसली , तरी एका निर्धन आई-बापाची लेक एका गर्भश्रीमंत घराण्याची अधिष्ठात्री देवता बनणार हे सगळं स्वप्नवत नव्हतं का...??

भाग्य... भाग्य म्हणतात ते हेच ... नाहीतर दुसरे काही निराळे असते का..??

सगळं घर आनंदाच्या लहरींवर झुलत होते आणि अचानक आजीच्या कानावर कुठून तरी उडत - उडत आलं की, जहागीरदारांच्या घराला अनुवांशिक वेड्याचा वारसा आहे.
आजीच्या मनाला हुरहुर लागली.. !!

पण मनात असूनही ती आत्याचे लग्न मोडू शकली नाही. आपली लेक आता श्रीमंताघरची सून होणार , ह्या कल्पनेनेच् आनंदाच्या शिखरावर उभ्या असलेल्या संपूर्ण घराला ही बातमी देऊन त्यांच्या आनंदाचा कडेलोट करण्याचे तिने टाळले.

__पण आपण केवढ्या मोठ्या ज्वालामुखीच्या तोंडावर आपल्या मुलीचे आयुष्य उभे करत आहोत , हे दरिद्री जीवनाने पोळलेल्या आजीने लक्षात घेतलेच् नाही.

आत्या आणि शेखररावांचे लग्न झाले. आत्याचे सासरे हयात नव्हते. शेखरराव लहान असतानाच ते स्वर्गवासी झालेले...!!

नर्मदाबाई ..आत्याच्या सासूबाई ...!! आत्या आणि नर्मदाबाई ह्या दोघी सासू - सुनेची जीवनकहाणी एकमेकींना समांतर अशीच होती.

नर्मदाबाईसुद्धा एका गरीब घरातून जहागीरदारांच्या वाड्यात लक्ष्मी बनून आल्या होत्या. त्यांना लग्नाआधी जहागीरदारांच्या घराण्याला असणारा अनुवांशिक वेडाचा वारसा माहित होता. सारं काही माहीत असूनही वेड्याचा वारसा असलेल्या जहागीरदारांच्या घराण्याची सून होण्याचे शिवधनुष्य त्यांनी पेलण्याचे ठरविले.

गजाननराव हे आत्याचे सासरे. सारं गाव त्यांना ' खुळा' म्हणून ओळखत असे. नर्मदाबाईंनी खुळ्या नवऱ्यासोबत संसाररथ ओढण्यास सुरुवात केली.

नर्मदाबाई जरी खुळ्या नवऱ्यासोबत संसार करीत असल्या, तरी त्यांचं नैसर्गिक अंगभूत शहाणपण जहागीरदारांच्या घरची लक्ष्मी झाल्यावर अजूनच जोमाने वाढू लागलं. मुळात बाई करारी वृत्तीच्या होत्या.

जहागीरदारांच्या सगळ्या मालमत्तेचे व्यवहार आपल्या हाती घेत त्यांनी आपल्या खुळ्या नवऱ्याला दुनियेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

आपल्या खुळचट नवऱ्याला संसारसुख, स्त्रीसुख काय असतं ते त्यांनी नेटाने शिकवलं. त्यांना संसारात रमवून घेत , आपल्या पोटी शेखररावांना जन्माला घालून जहागीरदारांच्या घराण्याला वारसही दिला. पतीच्या वेडगळपणाला आपल्या मायेच्या , प्रेमाच्या बंधनात बांधण्यात त्या काही प्रमाणात यशस्वीही झाल्या.

गजाननराव जरी संसारात रमू लागले असले तरी, मध्येच येणार्‍या वेडाच्या लहरींवर स्वार होत कुणालाही काहीही न सांगता घरातून निघून जात आणि काही महिन्यांनी मानसिक स्थिती ठीक झाल्यावर पुन्हा ते घरी परतत असत.

एकदा असेच कोणीतरी त्यांच्या खुळ्या डोक्यात उत्तर भारतातल्या हरिद्वारच्या गंगाकिनारी कुणीतरी संन्यासी जमिनीत दडलेला सोन्याचा खजिना शोधण्याची मंत्रविद्या शिकवतो असं खूळ घातलं.

झालं...! आता कुबेरापेक्षाही आपण धनवान होऊ ह्या वेडाने गजाननरावांना झपाटलं.

घर सोडून ते उत्तर भारतात संन्यासी होऊन भटकू लागले. खुळ्या डोक्यात मंत्र-तंत्र , जादूटोणा, ज्योतिष - बुवा, बैरागी यांच्यावर अंधश्रद्धा वाढू लागली. नर्मदाबाईंनी त्यांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. पण ' रोज मरे त्याला कोण रडे ' असं मानून त्या नेहमीप्रमाणे त्यांची वाट पाहू लागल्या.

__ अचानक एके दिवशी भगवी वस्त्र परिधान केलेला, अंगाला भस्म फासलेला बैरागी वाड्याच्या दारात आला. तो बैरागी दुसरा - तिसरा कुणीही नसून खुद्द गजाननराव होते.

दारात आलेला बैरागी आपला पती आहे, ह्यावर विश्वास ठेवणे नर्मदाबाईंना जड जाऊ लागले. पहिल्यांदा तर त्यांनी गजाननरावांना ओळखलेच् नाही.

घरात येताच त्यांनी बैराग्याचा वेष जरी उतरवला असला, तरी आपल्या खुळ्या डोक्यावर परिधान केलेला अंधश्रद्धेचा मुकूट मात्र त्यांना उतरवता आला नाही.

आपल्या जमिनीत जागोजागी खड्डे खणून ठेवत ते गुप्तधनाचा शोध घेऊ लागले.

यावेळेस नर्मदाबाईंना आपल्या पतीच्या वेडाचाराला आळा घालता आला नाही.

जमिनीतले धन हाती न लागल्याने नैराश्याच्या भरात,
वेडाच्या लहरीमध्ये " थांब कुबेरा, आता तुझ्यावरच मी स्वारी करतो .!." असं म्हणत शेतातल्या पाण्याने भरलेल्या विऱ्यात त्यांनी उडी मारली. वेडाच्या लहरींवर स्वार होत त्यांनी आपले जीवन संपवले.

नर्मदाबाईसाठी हा मोठा धक्का होता. ह्या अनुवांशिक वेडाचा परिणाम आपल्या एकुलत्या एक मुलावर होऊ नये म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. आपल्या शहरातल्या भावाकडे त्यांनी शेखररावांना पाठवले आणि शेतातला तो विरा कायमचा बुजवून घेतला आणि त्यावर खजुरीची झाडे लावली. तिथे घडलेल्या त्या दुर्दैवी घटनेच्या सगळ्या स्मृती कायमच्या मिटल्या जाव्यात म्हणून...!!

काळ भरभर पुढे निघालेला. लग्नाच्या वयाच्या शेखररावांसाठी मुलगी शोधण्याचे काम नर्मदाबाईंनी हाती घेतले. गर्भश्रीमंत घराणे असूनही शेखररावांना लग्नासाठी मुलगी देण्यास कुठलाही बाप तयार होईना. अनुवांशिक वेडाचा वारसा असलेल्या जहागीरदारांच्या घरात आपली मुलगी देऊन तिच्या आयुष्याची राखरांगोळी करुन घेण्यास कुठल्याही बापाला धाडस होईना.

शेवटी आत्याचा विवाह शेखररावांसोबत झाला. हां... हां... म्हणता माझी आत्या जहागिरदारांच्या घरची सून झाली.

शेखरराव शांत, सौम्य स्वभावाचे होते. पण निसर्गाने वेडाचा वारसा त्यांनाही बहाल केला होता. त्यांनाही कधीतरी मध्येच वेडाचा झटका येई.

त्याच दरम्यान वैशूचा जन्म झाला. तिच्या जन्माने जहागीरदारांच्या घराला लक्ष्मी मिळाली.

वर्षे पुढे - पुढे सरू लागली.

एके दिवशी गावात आलेल्या एका मांत्रिकाने शेखररावांच्या डोक्यात, तुमच्या शेतात पोर्तुगीजकालीन खजिना दडलेला असल्याचे भरविले . पोर्तुगीजांच्या भीतीने जुन्या काळी लोकांनी सोन्याच्या नाण्यांनी भरलेले हंडे जमिनीत पुरले आहेत , असे मांत्रिकाने सांगितल्यावर शेखररावांना रोज रात्री झोपेत अफाट संपत्तीची स्वप्नं पडू लागली.

__ आणि दुसऱ्या दिवसांपासून शेतातल्या जमिनीत खड्डे खणले जाऊ लागले. ज्या दिवशी खजुरीच्या झाडांची कत्तल होऊ लागली आणि तिथे खड्डे खणले जाऊ लागले , त्या दिवसांपासून नर्मदाबाईंनी खाट धरली.

बापाच्या वेडाचा वारसा चालवणार्‍या मुलाच्या वेडाचाराला बंधन घालण्यात त्या असमर्थ ठरू लागल्या. अनामिक भीतीने नर्मदाबाईंचे चित्त थरारून उठले.

त्यांनी शेखररावांना खजुरींच्या झाडांखाली खोदण्यास मज्जाव केला , पण शेखररावांनी त्यांचे काही एक ऐकले नाही.

कधी काळी बुजवलेल्या विऱ्याच्या जागी खणताना शेखररावांना सोन्याचा खजिना तर सापडला नाही, पण
अमृतासारख्या पाण्याचा गोड झरा मात्र तिथे लागला. त्यांनी बुझवलेल्या विऱ्याच्या जागी विहीर बांधून घेतली.

त्यानंतर मात्र आतापर्यंत लपवून ठेवलेला आपला सगळा भूतकाळ नर्मदाबाईंनी आपल्या सुनेला म्हणजे आत्याला जवळ बोलावून ऐकवला. सासूच्या तोंडून सगळी कहाणी ऐकून आत्याला जबरदस्त धक्का बसला. तिने आपल्या परीने शेखररावांच्या मधूनच उफाळणाऱ्या वेडाचाराला ताब्यात ठेवण्याचे खूप प्रयत्न केले, पण दुर्दैवाने तिचे प्रयत्न तोकडे पडले आणि जे घडायची भीती होती ती खरी ठरली.

अफाट संपत्तीची स्वप्नं पाहणाऱ्या आणि ती संपत्ती प्राप्त करण्यासाठी दैवी प्रयत्न करणाऱ्या शेखररावांनी ते धन हाती न लागल्याने वेडाच्या लहरीत, शेतातल्या कधीकाळी बुजवलेल्या विर्‍याच्या जागी स्वतः बांधलेल्या विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

__ आणि अनुवांशिक वेडाच्या वारश्यासोबत आपल्या
वडिलांच्या दुर्दैवी मृत्यूचा वारसाही अगदी त्याच समान पद्धतीने मुलाने पुढे चालवला... यापेक्षा अजून मोठे दुर्भाग्य काय असू शकते...??

आता जहागीरदारांचा वाडा पोरका झाला होता... कुणीही पुरुष माणूस उरला नसल्याने...!!

लहानपणी वैशूला फिट येत असत. आत्याने त्याचा संबंध जहागीरदारांच्या घराण्याला असणाऱ्या अनुवांशिक वेडाशी लावायला सुरुवात केली. आत्याने तिला चांगले दवाखाने केले. पुढे औषधपचाराने वैशूला फिट येणे कमी झाले.

__तरीही निसर्गावर आत्याचा विश्वास नव्हता म्हणून बिचारी आताही वैशूच्या अश्या अनैसर्गिक मृत्यूचा संबंध जहागीरदारांच्या अनुवांशिक वेडाच्या वारश्यासोबत जोडत होती...!!

" मनुष्याला जेव्हा आपला मृत्यू जवळचा वाटू लागतो ना मधू, तेव्हा त्याच्या जवळच्या माणसांनी आपल्या मायेने त्याला मागे ओढायले हवे... मी कमी पडले गं... वैशूच्या वडिलांना माया करण्यात...शेवटी मृत्यूला त्यांनी जवळ केले आणि आता वैशू अशी अवचित साथ सोडून गेली बघ.. माझं नशिबच फुटकं...!!" आत्याला हुंदका आवरेना.

" दैवगती पुढे कुणाचे काय चालणार आत्या...??" मी आत्याचे सांत्वन करत म्हणाले.

दिवस भराभर उलटत होते. वैशूच्या विरहाने आत्या दुःखी-कष्टी, गलितगात्र झाली होती. शेवटी वर्ष - दिड वर्षाच्या आत झुऱ्या रोगाने तीसुद्धा हे जग सोडून गेली.

__पण मरण्याआधी जहागीरदारांची सारी संपत्ती माझ्या नावे करून गेली.

जहागीरदारांच्या संपत्तीतला काही वाटा मी आत्याला दान करायला लावला... वैशूच्या स्मरणार्थ...! माझ्या मनाच्या समाधानासाठी .... वैशूच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून..!!

__ तर आज मी जहागीरदारांच्या अफाट संपत्तीची एकटी मालकीण आहे यावर मला स्वतःला विश्वासच् बसत
नाहीये. हे सारं खरं आहे की खोटं ...?? सारं कसं स्वप्नवत घडलंय्...!!

जहागीरदारांच्या संपत्तीची एकटी वारस असलेल्या वैशूचं हे असं अकस्मात मृत्यूमुखी पडणं, जहागीदारांच्या संपूर्ण संपत्तीची, एका दरिद्री घरातली मुलगी मालकीण होणं किती आश्चर्यजनक आहे नाही का बरं..??

आता गावात नेहमीच अफवा उठत असतात... त्या अश्या की, जहागीरदारांची मालमत्ता माझ्या एकटीच्या नावे व्हावी, म्हणून त्यांच्या संपत्तीची एकुलती एक वारस असलेल्या वैशूला नदीच्या डोहात ढकलून तिचा काटा मी कायमचा दूर केला..!!

__ पण ते खरं नाही. ' कुछ तो लोग कहेंगे... लोगों का काम है कहना...' असं समजून मी त्या अफवा कानावर घेतही नाही. मला त्या अफवांनी काडीचाही फरक पडत नाही आणि तुम्हीसुद्धा अजिबात विश्वास ठेवू नका त्या अफवांवर....!!

मला वैशूचा जीव घेणं कधीच शक्‍य झालं नसतं .. माझ्या गहिर्‍या मनतळात वैशूचा प्रतिशोध घेण्याची भावना अगदी बालपणापासून कितीही उफाळत असली तरीही ..!!

पण आजकाल माझी रात्रीची झोप पूर्ण उडालीय्. रोज मध्यरात्री मी स्वप्नातून दचकून उठते आणि मग धडधडत्या छातीने, घामेजलेल्या अंगाने रात्रभर जागीच राहते...!!

कारण रोज रात्री नित्यनेमाने एकच् स्वप्नं पडतेय् मला..!!

__तावातावाने माझ्याशी नदीच्या डोहाकिनारी भांडणारी वैशू .... भांडता - भांडता अचानक निसरड्या काठावरुन पाय घसरून डोहात पडणारी वैशू.... जीवाच्या आकांताने मदतीसाठी 'म ssधु' म्हणून मला हाक मारणारी केविलवाणी वैशू...!!

__. आणि तिला बुडताना , मृत्यूच्या दारात पाहून मदत करता येत असूनही, तिला वाचवण्याचा कुठलाही प्रयत्न न करता तिच्याकडे प्रतिशोधाच्या भावनेने पाहणाऱ्या, तिच्या मृत्यूचे तांडव पाहत ; चेहर्‍यावर सूडाचे हसू खेळवणाऱ्या माझ्याकडे.... अतिशय दुःखाने, तिरस्काराने पाहणारी मोठ्या, करड्या , मला कायमच् दहशत घालणाऱ्या डोळ्यांची ...पाण्यात बुडत जाणारी वैशू...!!

हे .. 'स्वप्नं ' नाही, हेच सत्य आहे आणि हे सत्य माझा झोपेतसुद्धा पाठलाग करतेय्.

माझ्यावर जीवापाड माया करणाऱ्या आत्यालासुद्धा मी दगा दिलाय्... माझ्यावर असलेल्या तिच्या भाबड्या, आंधळ्या विश्वासाला मी सुरुंग लावलाय् कारण___

मनुष्याच्या मनोविकारांपेक्षाही त्याच्या वासना अधिक प्रबळ असतात , ज्या त्याची सद्सद्‌विवेकबुद्धी गिळंकृत करतात.

क्षणभराच्या वासनेच्या भोवर्‍यात सापडूनच जो जीव पृथ्वीतलावर जन्म घेतो.. तो मनुष्यजीव आयुष्यभर स्वार्थी, मतलबी , सुखलोलुप, ऐश्वर्यलोलुप, सत्तालोलुप अश्या अनेक वासनांनी कायमच् बरबटलेला राहतो, हे मी माझ्यापुरतं सिद्ध केलंय्...!!

रजूआत्यासमोर , समाजासमोर सज्जनपणाचा, चांगुलपणाचा नेहमीच मुखवटा घालून जरी मी वावरत होते, तरी दुर्योधनाने चढविलेला धर्मराजाचा मुखवटा होता तो...!!

समाप्त..!

धन्यवाद...!

( विरा - शब्दाचा अर्थ - शेतात खोदलेला विहिरीसारखा पण कठडे नसलेला खोल खड्डा)

©रूपाली विशे - पाटील
rupalivishepatil@gmail.com
__________________________________________
( टिप - सदर कथा काल्पनिक असून कथेचा वास्तविक जीवनाशी कुणाचा काहीही संबंध नाही. कथेत साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. )

_________________ XXX________________

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

शेवट अपेक्षित होता. पण वाचताना उत्तम वातावरणनिमिर्तीमुळे अंगावर काटा आला. शेवटपर्यंत खिळवून ठेवले.धन्यवाद.

मोहिनी, माझी कथा वाचून छान प्रतिसाद दिल्याबद्दल मीच तुला धन्यवाद द्यायला पाहीजेत..!
मामी धन्यवाद, तुम्हांला कथा आवडल्याबद्दल..!

छान होती कथा.
तीन भाग सुद्धा लिहीताना वेळ द्यावा लागला असेल. मी एकच लेख गेले पंधरा दिवस लिहीतोय. चार ओळीच्या वर प्रगती नाही. त्याच्या आधीचा लिहीता लिहीता विषय सुद्धा विसरून गेलो.
वाचकांसाठी कथामालिका लिहीण्यासाठी मेहनत घेणार्‍यांचे कौतुक !!

मनिम्याऊ , शान्त माणूस, लावण्या, अदिती, साधा माणूस ... धन्यवाद..!!

तीन भाग सुद्धा लिहीताना वेळ द्यावा लागला असेल>>> हो शान्त माणूस, डोक्यातली कथा कागदावर पटकन् उतरते पण तीचं कथा टाइप करायची म्हणजे खूप वेळखाऊ काम वाटते .. आणि एकदा कथा लिहायली घेतली की, पूर्ण केल्याशिवाय चैन पडत नाही मला..!

वाचकांसाठी कथामालिका लिहीण्यासाठी मेहनत घेणार्‍यांचे कौतुक !!>>> पुनश्च एकदा आभार तुमचे..!

कथा आणि ट्विस्ट आवडला.
पण आत्याने जर वैशूच्या आणि अनुवांशिक वेडाबद्दल मधूला आधीच (मधू समजत्या वयात आल्या वर तरी ) कल्पना दिली असती तर कदाचित मधूला वैशूबद्दल आपुलकी वाटली असती निदान इतक्या टोकाची सूड भावना तरी निर्माण झाली नसती.
तीन पिढ्या वेडाच्या (? कि मानसिक आजाराच्या?) शिकार होत असतानाही कुणालाही त्यांच्या मानसिक आजारावर योग्य उपचार व्हावेत असे वाटले नाही यातच समाजात मानसिक आजारांबद्दल असलेले गैरसमज स्पष्ट होतात. घराण्याला असलेला शाप या गोंडस नावाखाली समाजाने घेतलेले हे तीन बळीच आहेत. असे कित्येक बळी आजही सर्रास घेतले जात आहेत.

अज्ञान बालक, तुमच्या भावना, तळमळ पोहचली. कथा आवडल्याबद्दल धन्यवाद..!

पण आत्याने जर वैशूच्या आणि अनुवांशिक वेडाबद्दल मधूला आधीच (मधू समजत्या वयात आल्या वर तरी ) कल्पना दिली असती तर कदाचित मधूला वैशूबद्दल आपुलकी वाटली असती निदान इतक्या टोकाची सूड भावना तरी निर्माण झाली नसती.>>> हो, कदाचित असं घडू ही शकले असते,पण लोकं जिथे शारीरिक आजार लपवतात तिथे मानसिक आजारबद्दल तर बोलायलाचं नको.. !

तीन पिढ्या वेडाच्या (? कि मानसिक आजाराच्या?) शिकार होत असतानाही कुणालाही त्यांच्या मानसिक आजारावर योग्य उपचार व्हावेत असे वाटले नाही यातच समाजात मानसिक आजारांबद्दल असलेले गैरसमज स्पष्ट होतात. >>>> मी नऊ वर्षापूर्वी मानसिक आजारांवर असलेले एक पुस्तक वाचले होते. लेखक मानसोपचारतज्ञ होते बहुतेक...! त्यांनी पुस्तकात मानसिक आजाराचे बरेच प्रकार लिहिलेत. सदर पुस्तकात मानसिक आजारासंदर्भात बरीच जनजागृती केलीय्. रुग्णांवर उपचार करताना त्यांना आलेले विविध अनुभव त्यांनी पुस्तकात मांडलेत. वाचनीय असं पुस्तक आहे ते..!.

आता मला त्या पुस्तकाचे नाव आणि लेखकांचे नावच आठवत नाहीये.

इथे अवांतर होईल पण त्या पुस्तका संदर्भातील एक किस्सा आठवतो आणि तो इथे लिहिण्याचा मोह मला आवरत नाहीये.

आम्ही त्यावेळी आसाम फिरायला गेलो होतो. प्रवासात विमानतळावर बराच वेळ जाणार होता म्हणून, हाताशी मी ते पुस्तक घेतले होते. जेव्हा मी हे पुस्तक वाचत होते, तेव्हा आमच्यासोबत असलेल्या कुटुंबातल्या स्त्रीने माझ्या हातातल्या पुस्तकाचे नाव पाहून ज्या प्रकारे चेहऱ्यावर भाव दर्शवले होते .. ते भाव आजही माझ्या डोळ्यांसमोर उभे राहतात.

जर नुसते पुस्तकाचे नाव वाचून लोकांच्या अशा प्रतिक्रिया येत असतील तर प्रत्यक्ष मानसिक आजार असलेल्या व्यक्तीशी वागताना त्यांच्या प्रतिक्रिया कश्या प्रकारच्या असतील..?? विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का..?? त्यात त्या स्त्रीला मी दोषी मानत नाही कारण मानसिक आजारांबाबत समाजात असलेले अज्ञान, गैरसमज हेचं त्याला कारणीभूत आहेत.

आणि मला त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरचे भाव आताही आठवतात पण पुस्तकाचं नाव आणि लेखक मात्र आठवत नाहीयेतं..!! मनुष्य स्वभाव कसा असतो बघा, नको ते लक्षात ठेवतो... पण महत्त्वाचं ते विसरून जातो.

पण लायब्ररीत जाऊन त्या पुस्तकाचा पुन्हा एकदा शोध घेईन.

घराण्याला असलेला शाप या गोंडस नावाखाली समाजाने घेतलेले हे तीन बळीच आहेत. असे कित्येक बळी आजही सर्रास घेतले जात आहेत.>>> कटू असलं तरी वास्तव आहे. अश्या बऱ्याचश्या अनसैर्गिक मृत्यूबाबत दुर्लक्ष होते खरं..!!

माझ्या 'शल्य ' ह्या कथेवर मानवजी, अॅमी, स्वाती२, सामो ह्यांनी मानसिक आजारावर चांगली चर्चा केलीय्.
https://www.maayboli.com/node/77302

लोकसत्ताच्या चतुरंगमध्ये दर पंधरवड्यांनी डॉ. शुभांगी पारकर ह्यांचे 'मागे राहिलेल्यांच्या कथा- व्यथा' नावाचे सदर सध्या प्रकाशित होतेयं... खूपच वाचनीय आहे सदर..!!

धन्यवाद..!!
.

धन्यवाद रुपाली ताई,
वरील चर्चा मी वाचली आहे, लोकसत्ता मधील सदर नक्की वाचेन. आजही मनोरुग्ण व त्याचे कुटुंब हे सामाजिक बहिष्कृतांचेंच जीवन जगतात, खूप कमी लोक त्यांचे दुःख समजून घेऊन साहाय्य करतात.

छान लिहीली आहे. कथा आवडली. शेवट थोडा फार वेगळा होता. अपेक्षीत होते की मधूनेच तिला ढकलले असावे..

आजही मनोरुग्ण व त्याचे कुटुंब हे सामाजिक बहिष्कृतांचेंच जीवन जगतात,>>> दुर्दैवाने असं घडणं खरंच् असंवेदनशीलतेचे लक्षण आहे.

शर्मिलाजी धन्यवाद..!!

योगी धन्यवाद..! तुम्हांला अपेक्षित होता तसाही कथेचा शेवट करता आला असता पण थोडासा वेगळा twist दिला कथेला..!

छान कथा आणि शेवट

शीर्षकावरून अंदाज होताच की शेवटी असा काहीसा ट्विस्ट असेल

जाई धन्यवाद... ! कथेच्या शेवटाने चुटपूट लागते खरी..
आबा धन्यवाद..... दिपक धन्यवाद..!!

उत्तम जमून आलेली कथा !
पात्ररचना , त्यांचे व्यक्तिविशेष सुरेख रेखाटले आहेत .
शेवटचा धक्का मस्त .
आणि आधी मी म्हणलं होतं की कथा मोठी हवी म्हणून . पण ही तीन भागात अचूक झाली .
पुलेशु !

बिपिनजी धन्यवाद...
छान .. प्रोत्साहित करणारा प्रतिसाद..!
आणि आधी मी म्हणलं होतं की कथा मोठी हवी म्हणून .>>> कदाचित अजून फुलवता आली असती ही कथा.. असो.. पुढच्या कथेच्या वेळी प्रयत्न करेन..!
भाग्यश्री धन्यवाद , तुला कथा आवडल्याबद्दल..!

मस्त कथा. तिन्ही भाग एकदम वाचले . मलाही अनपेक्षित शेवट होता, वाटलं होतं वैशू ने ढकललं आणि त्या गडब्डीत स्वतः घसरून पडली .
रेल्वे स्टेशन वरचा किस्सा ही कटू पण वास्तव .

तिनही भाग वाचले.
खिळवून ठेवणारी कथा.वातावरण निर्मिती छान केली आहे.शेवटी ट्वीस्ट पण भारीच.
आवडली.

Pages