सुटका

Submitted by वीरु on 13 February, 2022 - 13:57

गाडीने वेग पकडला आणि एकामागुन एक‌ उपनगरं मागे पडत गेले. थंडगार बोचरा वारा अंगाला झोंबायला लागला तेव्हा आतापर्यंत खिदळणारे आम्ही सारेच‌ गप्प झालो.. मागे पडलेलं घर, कावऱ्याबावऱ्या रडवेल्या चेहऱ्याने निरोप देणारे दोन्ही बच्चु, डोळ्यातलं पाणी लपवत कातरत्या आवाजात 'सांभाळुन रहा' सांगणारी अर्धांगिनी डोळ्यासमोर तरळुन गेली.. मागे एकदाही वळुन न पहाता निघालो होतो मी. माहित होतं की, तिघांचेही डोळे आपल्या पाठीवर खिळलेत, वाट बघताहेत की एकदातरी निरोपाचा हात दाखवेल. पण मी कटाक्षाने मोह टाळला.. वळुन पाहिलं तर पायात मणामणाच्या बेड्या पडतील म्हणुन..
"फारच इमोशनल बुवा तुम्ही. इतका विचार नाही करायचा. आता दोन महिने मस्त एन्जॉय." माझ्या चेहऱ्यावरचे भाव वाचत राजेशसर हळुच कोपरखळी मारत म्हणाले.
मळलेली वहिवाट असली की गाडीवानाला कासरा ओढावा लागत नाही, बैल आपल्या लयीत चालत राहतात. माझे आयुष्यही असेच एका चाकोरीतुन चालले होते. शिक्षण, नोकरी, लग्न, दोन खोल्यांचा टीचभर फ्लॅट, मुलंबाळं, पुढे त्यांचे शिक्षण, लग्न. बास, संपलं आयुष्य.. ना कुठली आवड, ना छंद.. अशा या सरळसोट आयुष्याला जराही कलाटणी नको वाटते. आणि आता तर मला दोन महिने परगावी रहायचं होतं. त्यामुळे जरा गांगरुन गेलो होतो.
आमच्या कंपनीच्या एका शाखेचा मॅनेजर तडकाफडकी नोकरी सोडुन गेल्याने तिथे फारच गोंधळ उडाला होता. तिथली घडी पुन्हा नव्याने बसवण्यासाठी हेड ऑफिसमधुन आम्हा चौघांची रवानगी झाली होती. राजेशसर, मी, आप्पा फुलमोडे आणि सदानंद. चौघे चार प्रकारचे. दोन महिने मस्त मनमोकळे जगायला मिळणार म्हणुन राजेशसर खुष, तर जिथे जातो आहे तिकडे नीट व्यवस्था होईल की‌ नाही या विवंचनेत आप्पा आणि कायम 'माझा काय संबंध' या थाटात वावरणाऱ्या सदाला कंपनी आपल्याला का पाठवते आहे हेच समजत नव्हते. दोन दिवसापासून सुरु असलेली त्याची किरकिर अजुनही थांबली नव्हती..
‌ पहाटे साडेपाच सहाच्या सुमारास आमचे नियोजीत स्टेशन आले तेव्हा सगळेच आळस झटकत स्टेशनवर उतरलो. आधी सांगुन ठेवल्याप्रमाणे कंपनीचा ड्रायव्हर गाडी घेऊन आला होता. रस्त्याने जातांना शहर अजुन सुस्तावलेले वाटत होते. मुंबईत रात्रीचे काही तास सोडले तर रस्ते सारखे धावतच असतात. तुम्ही मुंबैकर असाल तर असा निवांतपणा नक्कीच तुम्हाला आवडु शकतो. पण मला तर लवकरात लवकर घरी परतायचे होते. असो..
आमची रहाण्याची सोय कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये केलेली होती. शहराबाहेरच्या एका कॉलनीतला हा छोटासा बंगला गेस्ट हाऊस म्हणुन वापरात होता. बंगला तसा कॉलनीपासुन दुर एकांतातच होता. ड्रायव्हरने कुलुप उघडुन कंपाउंडचं लोखंडी फाटक आत ढकलताच कानाला चरे पाडणारा कर्कश आवाज झाला, जणुकाही बऱ्याच वर्षांपासुन कोणी फाटक उघडलेच नव्हते. आवारात पाऊल टाकले तर बख्खळ माजलेल्या गवताने आमचं स्वागत केले. अंगणातला परिजातक तर असा वाढला होता की सगळ्याच फांद्या घराच्या विरुध्द दिशेला झुकलेल्या, जणुकाही त्यालाही माझ्यासारखी इथुन सुटकाच हवी होती.
"कसला विचार करताय सुरजराव? आवडली ना जागा, इथेच स्थायिक होण्याचा तर विचार नाही ना?" राजेशसरांना नको तेव्हा जोक सुचतात.
"ए हॅलो, बबन नाव ना तुझं? आम्ही येणार हे माहित होतं ना? मग जरा सफाई तर करुन घ्यायची घराची." आप्पानी बॅगा आत नेऊन ठेवणाऱ्या ड्रायव्हरला टोकलं.
"तोच विचार करतोय बघा साहेब. चार दिवसांपुर्वीच सगळी सफाई केली होती. फारच चेंगट दिसतंय हे गवत. आज पुन्हा साफ करुन घेतो." बबन हसत म्हणाला तसा आप्पांच्या कपाळावरच्या आठ्या आणखी वाढल्या..
पुढचे काही दिवस फारच धावपळीचे होते. राजेशसरांचा कामाचा झपाटा नेहमी बघण्यासारखा असतो. आप्पाही कामाला लागले तसा मीही घरच्या आठवणी बाजुला सारुन कामाला जुंपुन घेतले. सदा मात्र नेहमीसारखाच हात खिशात घालुन ऑफिसमध्ये गप्पा मारत फिरायचा.
पुढे जोडुन येणाऱ्या सुट्यांमध्ये आम्ही दोन दिवस घरी जाणार होतो. मी येतोय म्हटल्यावर मुलांनी तर आतापासूनच वाट बघायला सुरुवात केली होती. शेवटी तो दिवस उजाडला. आज परत जायचे होते म्हणुन आम्ही ऑफिसमधुन जरा लवकरच निघालो. रात्रीची ट्रेन होती, कंपनीचा ड्रायव्हर स्टेशनवर सोडायला गाडी घेऊन येणार होता. आम्ही तयारी करुन त्याचीच वाट बघत होतो आणि अचानक आप्पांना सडकुन ताप भरला. त्यांची अवस्था पाहुन त्यांना तातडीने जवळच्या दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी औषधे लिहुन देत काही दिवस पेशंटने आराम करावा असे सांगितले. या सगळ्या गडबडीत आमची ट्रेन चुकली. तसेही आप्पांना एकटे टाकुन आम्ही जाणार नव्हतोच.
"माझ्यामु़ळे सगळ्यांचा विरस झाला रे." आप्पा ओशाळल्या चेहऱ्याने म्हणाले.
"असं का बोलता आप्पा. तुम्ही मस्त आराम करा. आम्ही आहोत, काळजी करु नका." आप्पांच्या खांद्यावर थोपटत मी सांगितले.
सुट्टीचे ते दिवस कंटाळवाणे चालले होते. मी येत नाही समजल्यावर मुलं फारच हिरमुसली. सौ.ने तर अबोलाच धरला. त्या सगळ्यांची समजुत काढत नाकीनऊ झाले मला.
..आज सुट्टी संपत होती. नकोसे झाले होते हे दिवस. उद्यापासुन ऑफिस म्हणुन रात्री सगळे गप्पागोष्टी करत बसलो होतो. आप्पाही आजारातून सावरले होते. टेबलावर सगळा सरंजाम मांडुन राजेशसरांचे दारुकाम सुरु होते. सदा होता त्यांना साथ द्यायला. गप्पा अगदी रंगात आल्या होत्या.
"सदा पुरे आता. हावरटपणा करु नको" एकदोन ग्लासात तो आकाशात विहार करतो हे माहित असल्याने सदाने तिसरा पेग भरताच आप्पांनी त्याला टोकले.
"गप बसा वो आप्पा. ही मजा तुम्हाला काय माहित." सदा ओठावरुन जीभ फिरवत म्हणाला.
"सांभाळ बाबा, नाहीतर जरावेळात कंपनीचा मालक होशील तु आणि आम्हाला उठबशा काढायला लावशील. काय सुरज." आप्पा हसत म्हणाले.
अशा गप्पा रंगात आल्या होत्या आणि अचानक स्वयंपाकघराकडे बघत सदा ओरडला "ए, कोण आहे तिकडे?"
दचकलो सगळेच.. सदा पहात होता तिकडे बघायला लागलो. तिथे काहीच नव्हते. सदा मात्र थरथर कापत होता. चेहरा भीतीने पांढराफटक झाला होता त्याचा.
"सदा काय झालं? काय बघीतलंस तु?" आप्पा सदाला हलवुन विचारत होते पण त्याच्या तोंडातुन शब्द फुटत नव्हता.
"त् ती..ती उभी होती.. किचन ओट्याला टेकुन.." सदा कसाबसा म्हणाला तोवर राजेशसर तरातरा स्वयपाकघरात फिरुनही आले. "कोणी नाही तिथे. इतकी चढते तर पितोस कशाला. सगळा रंगाचा बेरंग झाला." राजेशसर वैतागले.
"तरी मी सांगत होतो. पुरे कर म्हणुन." आप्पा पुटपुटले.
"विश्वास ठेवा हो माझ्यावर. सुरज तु तरी सांग यांना" सदा केविलवाणेपणे माझ्याकडे बघत म्हणाला.
"काय सांगु सदा? मागे एका पार्टीत तु स्वत:ला राजा समजायला लागला होता. अकाउंटच्या प्रकाशसरांना 'सेवक पाणी लाव' म्हणुन हुकुम केला होता. ते बिचारे साधे. पटकन पाणी घेऊन आले. दुसरा असता तर कायमची घरी रवानगी केली असती तुझी. तुला खरोखर इतकी चढते का रे?" त्या परिस्थितीतही मला तो किस्सा आठवुन हसु फुटले.
"हसा तुम्ही,‌ नका विश्वास ठेऊ माझ्यावर. तुम्हाला अनुभव येईल तेव्हा समजेल. आधीचे मॅनेजर याच घरात राहत होते हे विसरु नका."
"सदा, बास आता. पुरे झाला फाजीलपणा. त्या गुप्ताचा फॅमिली प्रॉब्लेम होता म्हणुन तो डिस्टर्ब होता. मी केला होता फोन त्याला. डोक्यावर परिणाम झालाय त्याच्या. बाई बोलत होती की बाप्या तेच समजत नव्हते."
राजेशसर चांगलेच संतापले.
त्या घटनेनंतर नाही म्हटलं तरी माझ्या मनावर चांगलंच दडपण आलेलं होतं (म्हणजे कोणी विचारले असते तर मी तरी नक्कीच मान्य केले असते. आप्पा, राजेशसरांचे माहित नाही.) कुठे खट्ट झालं तरी पोटात भीतीने गोळा यायचा. सदाची अवस्था तर फारच वाईट झाली होती. पण राजेशसरांच्या धाकाने त्याला धड सांगताही येत नव्हते. पण 'दुसरीकडे जागा बघायची का?' या माझ्या सूचनेला त्याने कडाडुन का विरोध केला ही गोष्ट मात्र मला काही समजत नव्हती.
अशाच एका रात्री कोणीतरी कपडे धुवत असावे अशा आवाजाने जाग आली. सुरुवातीला मला भास झाला असावा असेच वाटले, पण नाही, तो भास नव्हताच मुळी. हळुच घड्याळात बघितले तर दोन वाजले होते. मी गपचुप अंथरुणात पडुन आवाजाचा कानोसा घेत होतो. आजुबाजुला तर घरेही नव्हती आणि असते तरी इतक्या रात्री कोण कपडे धुणार? बंगल्याच्या स्नानगृहवगैरेची व्यवस्था पाठीमागच्या वाड्यात होती. लक्ष देऊन ऐकले तर आवाज नेमका तिकडूनच येत होता. डोक्यातले विचारचक्र जोरात सुरु होते. आता या परिस्थितीत तरी सकाळ होण्याची वाट बघत गपचुप पडुन रहावे असा (पळपुटा म्हणता येईल) मार्ग मी निवडला. नंतर केव्हातरी झोप लागली. जाग आली तेव्हा दुर कुठुनतरी काकडआरतीचे सुर कानावर पडत होते.
सकाळची वेळ मला नेहमीच आवडते. प्रकाशाच्या आगमनाने सगळ्या अमांगल्याची छाया पुसली जाते अशी भाबडी समजुत. उठुन पहातो तर आप्पा जागेच होते. मी काही बोलणार तितक्यात त्यांनी डोळ्यांनीच खुणावत गप्प केलं.
दुपारी जेवणानंतर आप्पा पान खायला जायचे. आज त्यांनी मलाही बोलावले.
"रात्रीचा प्रकार तुलाही जाणवला. तु घाबरटासारखा डोक्यावरुन पांघरुन घेऊन‌ पडला होता. माहित आहे मला." तोंडात पानाचा तोबरा कोंबत आप्पा म्हणाले. मी त्यांची नजर चुकवत मान खाली घातली.
"जसा आवाज कानावर पडला तसा मी ताडकन उठुन बसलो आणि आवाजाच्या दिशेने मागच्या वाड्यात गेलो. काय पाहिले सांगु? आपले राजेशसर एका वेगळ्याच तंद्रीत कपडे धुवत होते. हाक मारली तरी लक्ष नव्हते त्यांचे. जवळ जावून त्यांच्या खांद्याला हात लावुन हाक मारली तर 'इश्श! काय करता' म्हणुन चक्क लाजले ते. त्यांचा तो अवतार पाहुन मी आल्यापावली माघारी परतलो." आप्पांनी एका दमात सगळी हकीकत सांगितली.
डोक्यात जोरात विचारचक्र सुरु झाले. आधीचा मॅनेजर गुप्ता, सदा आणि मग आता राजेशसर? पुढचा नंबर माझा किंवा आप्पांचा? कसे तोंड‌ देणार या सगळ्याला? पलीकडे कोण आहे तेही माहित नाही. काय कुवत आहे आपली? बायकोपोरांमध्ये जीव असलेला मी सर्वसाधारण मनुष्य.
"मला काहीच समजत नाहीये. सदा आणि राजेशसरच का? आपण का नाही?"
"हे बघ, मी काही या क्षेत्रातला जाणकार नाही. पण इतके माहित आहे की, कमकुवत, चंचल मनाची व्यक्ती अशा नकारात्मक शक्तींच्या प्रभावाखाली येऊ शकते. आधीचा मॅनेजर, सदाकडे पाहुन हे सांगु शकतो. कोणत्याही गोष्टीची सवयही मनाला कमकुवत बनवत असेल. राजेशसरांना रात्री ड्रींक केल्याशिवाय झोप येत नाही. अशा सवयींमुळेही मन कमकुवत होत असावे." आप्पा त्यांच्या परीने माझे समाधान करु पहात होते.
"आता पुढे काय?"
"पुढे? आजच घरी परतायचे. मी सकाळीच तिकीट काढुन आलोय. तासाभराने गाडी आहे. कोणाला काही सांगायचे नाही. बॅग घ्यायलाही जायचे नाही. तु नोकरी सोडणार होताच. इकडे येण्याआधी तु दिली तशी मी पण नोकरी सोडण्याची नोटीस देऊनच आलोय. नोटीस पीरियड पण संपला आहे." आप्पांनी जणु सगळं ठरवुन ठेवले होते.
"आणि सदा, राजेशसरांचे काय?"
"तुला वाटते ते येतील? उलट विरोधच करतील. 'दुसरी जागा शोधु' सांगितल्यावर कसा विरोध करत होते आठवते ना तुला." आप्पा माझ्या प्रत्येक शंकेचे निरसन करत होते.
काय करावे ते समजत नव्हते. शेवटी घरी फोन केला. धाडस करुन सौ.ला सगळं सांगुन टाकलं.
"परत या. काही होणार नाही तुम्हाला. आम्ही आहोत तुमच्या पाठीशी." सौ.ने धीर दिला.
ट्रेनमध्ये बसलो तरी मनात धाकधूक होतीच की काही विघ्न तर येणार नाही ना.
आप्पा मात्र डोळे मिटुन शांतपणे बसले होते. मात्र ट्रेन सुटताच "अय्या! चावी माझ्याकडेच राहीली" म्हणत आप्पा वेगाने गाडीतुन उतरुन गेले.
लगबगीने कुठल्याशा ओढीने परत जाणाऱ्या आप्पांकडे मी पहातच राहिलो..

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कडक !! एक नंबर जमली आहे ... सगळे प्रसंग व्यवस्थित रंगवले आहेत आणि शेवटचा ट्विस्ट तर लय भारी!!!

Hyaa कथांचा त स म्हटलं तर पॅटर्न असतो. पण मस्त जमलीये ही कथा. खुलवलीये मस्त.
ट्वी स्ट पण जमलाय

च्रप्स, Sharadg, वावेजी, नानबा, रश्मीजी, योगी९००, जे.बॉण्ड, रुपालीजी, शर्मिलाजी
आपणा सगळ्यांना मनापासुन धन्यवाद.

छान कथा.
आप्पा , घट्ट मनाचे असूनही आप्पावर परिणाम झाला. डेंजर. कथानायक सुटला फक्त

मस्त!
पार्ट 2 येऊ शकतो.
कोणास ठाऊक का पण विशालदादा(विशाल कुलकर्णी) ची आठवण आली कथा वाचताना.

मस्त ....
पार्ट 2 असावा पन......

धनुडीजी, दिपकजी, आबासाहेब धन्यवाद.
<कोणास ठाऊक का पण विशालदादा (विशाल कुलकर्णी) ची आठवण आली कथा वाचताना.>> रीयाजी, हा तर मी सन्मान समजतो. धन्यवाद.
<पार्ट 2 असावा पन.....> प्रियाजी नक्की प्रयत्न करतो. धन्यवाद.
हर्पेनसर, भरतसर मनापासुन धन्यवाद.

लगबगीने कुठल्याशा ओढीने परत जाणाऱ्या आप्पांकडे मी पहातच राहिलो..
या ऐवजी असा शेवट केला तर?
लगबगीने कुठल्याशा ओढीने परत जाणाऱ्या आप्पांकडे मी पहातच राहिले...

लगबगीने कुठल्याशा ओढीने परत जाणाऱ्या आप्पांकडे मी पहातच राहिलो..
या ऐवजी असा शेवट केला तर?
लगबगीने कुठल्याशा ओढीने परत जाणाऱ्या आप्पांकडे मी पहातच राहिले...>> जबरदस्त योगीसर!
मग कुणाचीही सुटका नाही.

Pages