सुगर कोटेड क्विनाइन--स्फुट  --( वीक एंड लिखाण. )

Submitted by निशिकांत on 29 January, 2022 - 22:10

कांही प्रसंग उगाचच आठवतात. खूप  दिवसापूर्वी पाहिलेले एक चित्र आठवले. ते एका मासिकात पाहिले होते. त्या चित्रात एक आई आपल्या मुलाला कडेवर घेऊन शाळेत सोडायला जात होती. सोबत मुलगी, जी मुलापेक्षा लहान आहे, चालत जात असते. तिच्या हातात मुलाच्या दप्तराची पिशवी (बॅग) आहे.  हे चित्र बघून मी विसरूनही गेलो होतो. हेच चित्र आज आठवले आणि वेगळेच संदर्भ ध्यानी येऊ लागले. चित्रकाराला या चित्राद्वारे काय सांगायचे आहे यावर विचार सुरू झाला. या विचार मंथनातून खालील बाबी ध्यानात आल्या.
१) मुलगा मोठा असूनही त्याला आईने कडेवर घेतले होते लाडाने.
२) मुलगी लहान असूनही ती नुसतीच चालत नव्हती तर भावाच्या दप्तराचे ओझे पण पेलत चालली होती.
३) भावाचे एकच दप्तर चित्रात असल्यामुळे मुलगी फक्त ओझे उचलण्यासाठीच होती आणि ती शाळेत जाण्याचा प्रश्नच नव्हता.
४) भावाला शाळेत सोडून माय लेकी घरी परतणार होत्या.  छोटी बहीण घरकामात राबणार होती.
एकूणच या चित्राचा हेतू मुलीला दुय्यम दर्जा देण्याच्या प्रवृत्तीवर प्रकाश टाकण्याचा होता. मला हे आधी नाही ध्यानात आले. विचाराच्या घुसमटीत हे सारे मला जाणवले. आणि मग ध्यानात असे बरेच प्रसंग येऊ लागले.

मी अगदी लहान असताना (मी चौथी किंवा पाचवीत असेन तेंव्हा) आमची आर्थिक स्थिती खराब होती. म्हणून दरवर्षी वार्षिक परिक्षा झाली की आम्हा सर्व भावंडांची रवानगी मामाकडे किंवा मावशीकडे व्हायची. मामा आणि मावशीचे यजमान आपापल्या गावात बडे प्रस्थ होते. दोघेही गावाचे पोलिस पाटील. गावात रुतबा होता. दोघांचेही प्रशस्त गडीचे वाडे होते. भरपूर शेतीवाडी, गाई, म्हशी,बैल दावणीला असत. उन्हाळ्याची सुट्टी संपेपर्यंत तेथे राहून आपल्या गावी परतत असू. येतांना मामा किंवा मावशी आम्हा सर्व भावांना एकेक हाफ पँट आणि हाफ शर्ट्स शिवून देत असत. ही आम्हाला फार अप्रूपीची बाब होती.
घरी खुप दुभती जनावरे होती. रोज दहा एक लिटर तरी दूध निघत असे. हा काळ साठ सत्तर वर्षापूर्वीचा आहे. एवढ्या दुधाचे काय करायचे? त्या वेळेस मोठ्या घराने घरचे दूध विकणे कमीपणा समजत असत. रोज होणारे ताक मोलकरिणींना द्यायचे आणि उरलेल्या ताकात भरड धान्य भिजवून बैलांना आणि दुभत्या म्हशींना खुराक म्हणून खायला द्यायचे. दूध तापवण्याची या वेळी एक वेगळी पद्धत होती. एका मोठ्या मातीच्या डेर्‍यात दूध ओतले जाई. घरात एका खोलीत एक खड्डा असायचा. त्यात गोवर्‍या टाकून पेटवल्या जात. त्या मंद आचेवर तो दुधाचा डेरा ठेवला जाई. मंद आचेवर दुपारी चार वाजेपर्यंत दूध छान तापायचे. दुधाला गुलाबी रंग यायचा. साईचे वेगळे विर्जन लावले जाई तूप बनवण्यासाठी. त्या दुधाला एक खास फ्लेवर असायचा. आम्ही सर्व मुले खूप आवडीने प्यायचो, खायचो ते दूध.
 त्या डेर्‍याला दूध तापल्यानंतर तळाला दूध घट्ट होवून चिकटून बसायचे. ते एका मोठ्या शिंपल्याने खरडून काढत असत. त्याला आमच्या भागात खरवड असे म्हणतात. खरवडीचा वरचा भाग पांढरा आणि खालचा भाग दूध बुडाला लागल्यामुळे तपकिरी (brown) असायचा. ही खरवड चवीला अप्रतीम असते. घरातील वयस्क बाई सर्व मुलांना बोलावून हा मेवा प्रत्येकाच्या हातावर द्यायची. आम्ही खूप आवडीने सारे जण खायचो. वर लिहिलेले सर्व लोकांना नवे असेल पण आजचे साठीतले आणि ज्यांचे बालपण मराठवाड्यातील खेड्यात गेलेले आहे त्यांच्या डोळ्यासमोर ते चित्र उभे राहील.

हे सर्व रामायण सांगायचा हेतू हा की ही खरवड मुलींना खायला देत नसत. सर्व वयस्क मंडळी सांगायची की खरवड खाल्ल्याने मुलींना मसरूड फुटतात. म्हणून मुलीही खात नसत भितीने. माझी खात्री आहे की मुलांचे लाड करण्यासाठी असा घाणेरडा समज पसरवलेला असावा. आणि पालन पोषण करताना दुजा भाव असायचाच. हा प्रकार शहरातून आणि शिक्षित लोकातून खूप कमी झाला आहे ही आनंदाची गोष्ट आहे. पण खेड्यातून दुय्यम वागणूक अजून सर्रास बघावयास मिळते.
जुन्या काळी क्विनाईन हे कडू औषध सुगरकोटेड असायचे कडू चव लागू नये म्हणून. हे अंध गैरसमज पण या सदरात मोडणारेच होते. मुलींचे भले व्हावे म्हणून सुगरकोटेड गैरसमज पसरवले जात होते. पण हेतू दुसराच असायचा.

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेरी म्हणजे लोण्यापासून तूप बनवताना कढईच्या तळाशी तांबूस थर जमा होतो तो पदार्थ आणि दूध तापवून भांड्याच्या तळाशी चिकटलेल्या तांबूस साईला खरवड म्हणतात.

छानच लिहिले आहे हे स्फुट. गैरसमज/अंधश्रद्धा असे तुमच्या भल्यासाठी चे शुगरकोटिंग करूनच सहज गळी उतरवले जातात.