पुस्तक परिचय : Before the Coffee Gets Cold (Toshikazu Kawaguchi)

Submitted by ललिता-प्रीति on 26 January, 2022 - 00:57
Before the Coffee Gets Cold

टोक्योच्या एका गल्लीतल्या बेसमेंटमधल्या लहानशा जुनाट कॅफेत घडणारी गोष्ट आहे. कॅफेत येणार्‍यांना टाइम ट्रॅव्हलची सोय असते. मात्र त्यासाठी चार अटी असतात :
- टाइम ट्रॅव्हल करून कॅफेच्या बाहेर जाता येणार नाही.
- त्यामुळे अर्थातच भूतकाळात किंवा भविष्यकाळात त्या कॅफेत आलेल्या/येणार्‍या व्यक्तींनाच भेटता येईल.
- भूतकाळात जाऊन वर्तमानकाळ बदलता येणार नाही.
- हे सगळं करण्यासाठी कॅफेतल्या एका विशिष्ट जागी बसावं लागेल, समोर कपात वाफाळती कॉफी ओतली जाईल, ती कॉफी थंड होण्याच्या आत पिऊन संपवायची आणि वर्तमानकाळात परत यायचं.

कॅफेत येणारी नेहमीची मोजकी गिर्‍हाइकं आणि कॅफेतले चार कर्मचारी एवढी पात्रं. त्या सर्वांना टाइम ट्रॅव्हलच्या सोयीबद्दल माहिती आहे.
हा सेट-अप पाहून ज्या अपेक्षा निर्माण होऊ शकतात त्याहून पुस्तक खूप वेगळं आणि सुंदर आहे.

कथानकात चार टाइम ट्रॅव्हल्स आहेत. त्यातले तीन भूतकाळात आणि एक भविष्यकाळात आहे. एक गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड, एक मध्यमवयीन जोडपं, दोन सख्ख्या बहिणी, आई-मुलगीची जोडी अशा चार कथा त्यात येतात. यातल्या प्रत्येक जोडीत आपांपसांत काही समज-गैरसमज झालेले असतात. ते फार काही मोठे नसतात. पण जवळच्या नात्यात कधीकधी अशा छोट्या गोष्टीच मनाला कुरतडू शकतात, राहून राहून त्याचं वाईट वाटू शकतं. त्यामुळे पुढचं सगळं बिनसत गेलं, ही टोचणी राहते.

यातल्या प्रत्येकाच्या कथेची पार्श्वभूमी वाचत असताना आपल्याला वाटायला लागतं, की यात टाइम ट्रॅव्हल करून काय होणारे? या व्यक्ती नेमकं काय साधणारेत? शिवाय त्यासाठीच्या अटी अशा किचकट असताना हे कशाला त्याच्या नादी लागतील? पण प्रत्यक्षात ते घडतं तेव्हा तो एक विशिष्ट क्षण इतक्या तरलपणे आपल्यासमोर येतो की नकळत आपल्याकडून दाद दिली जाते. किचकट अटी पाळण्यामागची त्यांची अपरिहार्यता लक्षात येते ती तिथे. हे अक्षरशः चारही कथांबाबत होतं.
त्यांतल्या भूतकाळातल्या तीन ट्रॅव्हलबाबत आपल्याला बॅक-स्टोरी आधी निदान कळलेली तरी असते. चौथ्या कथेत भविष्यकाळात जाण्याचं कारण आपल्याला समजतं तोच तरल क्षण ठरतो.

त्या एका सरप्राइज एलिमेंटसाठीच की काय, निवेदन काही ठिकाणी clumsy आहे. पात्रांच्या हालचाली (बंदिस्त कॅफेतच सगळं घडत असल्याने), त्यांच्या क्रिया-प्रतिक्रिया, याची संगती लावताना काही ठिकाणी वाचणार्‍याला प्रयास पडू शकतात.

मला जाणवलेली आणखी एक अडचण, म्हणजे पात्रांची जपानी नावं. जपानी स्त्रियांची नावं कोणती असतात, पुरुषांची कोणती असतात, याबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे कोणत्याही पात्राचं एरवी वाचकाच्या मनात एक चित्र उभं राहतं, ते इथे झालं नाही. सुरुवातीची काही पानं वाचताना तर मी दरवेळी त्या-त्या पात्राचा उल्लेख आला की मागे जाऊन स्त्री-की-पुरूष हे refer करत होते. मग ते सोडून दिलं. (जपानी लेखकाचं मी वाचलेलं हे पहिलंच पुस्तक.)

पण एकूणात पुस्तक कुठेही कंटाळवाणं होत नाही. मी अगदी गुंतून जाऊन वाचलं. संपलं तेव्हा काहीतरी वेगळं आणि भारी वाचायला मिळाल्याचं feeling आलं. पात्रांची परिचित नावं असती तर वाचायला आणखी मजा आली असती हे नक्की.

पुस्तकाचं cover त्यामानाने अगदीच साधं आहे. ते कदाचित जाणीवपूर्वक तसं केलं असावं.

माझ्या नेहमीच्या शिरस्त्यानुसार, पुस्तक पूर्ण वाचून झाल्यावर मग मी नेटवरचे त्याबद्दलचे ब्लॉग्ज, सविस्तर reviews, एक्सपर्ट समीक्षण वगैरे वाचलं. त्यात समजलं, की हा जपानी लेखक तिथला यशस्वी नाटककार आहे. पुस्तकाचं बंदिस्त कॅफेत घडणारं कथानक त्यामुळे आहे.

हे पुस्तक magic realism प्रकारात मोडतं, असंही वाचण्यात आलं. हे समजल्यावर मला ‘हैला!’ झालं. Lol (काहीतरी वेगळं आणि भारी वाटलं ते यामुळेच असावं बहुतेक) या प्रकाराची पुस्तकं आपल्याला झेपतील का, समजतील का, आवडतील का, अशी मला कायम शंका वाटते. अज्ञानातल्या सुखापोटी हे पुस्तक वाचलं गेलं आणि आवडलं, त्यामुळे आता या प्रकारातली बाकीची पुस्तकं वाचली जाण्याची शक्यता किंचित वाढली आहे.

आणि शेवटी माझं सध्याचं पालुपद - Kindle नसतं तर हे पुस्तक माझ्यासमोर कधी आलं असतं का? नाहीच बहुधा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डोकेबाज कन्सेप्ट वाटतोय. नक्की वाचणार. ओळखीसाठी धन्यवाद.

रच्याकने: नविन पुस्तकं वाचल्यावर इथे ओळख नक्की लिहित रहा. मला ते ऑटो ड्राईव्ह कार कंट्रोल जातो वालं पुस्तक ही आवडलेलं, ते तिकडे लिहिलं गेलं नाही ते आत्ता आठवलं.

मस्त परिचय, ललिता. Happy

(सुरुवातीची काही पानं वाचताना तर मी दरवेळी त्या-त्या पात्राचा उल्लेख आला की मागे जाऊन स्त्री-की-पुरूष हे refer करत होते. <<< माझ्या बाबतीतही काही रहस्यकथा वाचताना माझ्या छोट्याश्या मेंदूत फारच गोंधळ उडायला लागला तेंव्हा मी चक्क वहीच्या पानावर पात्रे कैद करून ठेवली होती. हां, आता तुम्ही इथून हलायचं नाही! Lol )

पण जवळच्या नात्यात कधीकधी अशा छोट्या गोष्टीच मनाला कुरतडू शकतात, राहून राहून त्याचं वाईट वाटू शकतं. त्यामुळे पुढचं सगळं बिनसत गेलं, ही टोचणी राहते. >>
हे इंटरेस्टिंग वाटलं. पुस्तक वाचन यादीत टाकतोय.

जपानी लेखकाचं मी वाचलेलं हे पहिलंच पुस्तक. >> Happy
हारूकी मुराकामी ? जरूर पहा ! जामच आवडतात मला त्याच्या कादंबऱ्या.. विशेषतः 'काफ्का ऑन द शोअर' ! आणि '1Q84' !

हे पुस्तक magic realism प्रकारात मोडतं, असंही वाचण्यात आलं>>
जादुई वास्तववाद..! यासंदर्भात गॅब्रिअल गार्सिया मार्केझ बाप माणूस आहे..! त्याची 'वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड'!

छान परीचय..
ईंटरेस्टींग कन्सेप्ट आहे

इंटरेस्टिंग! वेगळंच कथानक आहे. मॅजिक रिएलिझम हा प्रकार मस्त. कथानक वाचून मग कव्हर बघितल्यावर कपांत काॅफी आहे पण पिणारे गायब आहेत असं वाटलं. मांजर म्हणजे Schrodinger ची मांजर की काय असं उगीच वाटून गेलं.

छान ओळख करून दिली आहेस. धन्यवाद.

प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

पाचपाटील,
मुराकामी, मार्केझ ही theory सगळी तोंडपाठ आहे, हो Proud ... पण पुस्तकवाचनाचं प्रॅक्टिकल झेपेल का अशी शंका वाटते. Lol

गजा Biggrin मी सुद्धा हे पुस्तक वाचताना एकदा हा विचार केला होता. पण सोडून दिला.

अमितव, 'the passengers' आवडलं ना... व्हेरी गुड!
आणि हो, वाचलेल्या पुस्तकाबद्दल थोडंसं काहीतरी लिहायचं याची आता सवय लावून घेतली आहे. (पुस्तक आवडो वा न आवडो)
त्याचा उलट परिणाम, म्हणजे ते लिहिल्याशिवाय चैन पडेनासं झालंय. Proud हे पुस्तक वाचून महिना होऊन गेला. पण लिहायला वेळ होत नव्हता. (नंतर आणखी एक पुस्तकही वाचून झालं. त्याबद्दल लिहिल्याशिवायही आता चैन पडणार नाही.)

ललिता-प्रीती , कन्व्हिनिअन्स स्टोअर वुमन पण आवडेल तुम्हाला. किंडल वर आहे.
पाचपाटील तुम्ही लिहिलत म्हणुन ''वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड' घेतल काल ऐकायला.
वाचायचा कंटाळा येतो. कंटाळा म्हणण्यापेक्षा , इन्स्टाग्राम बघ, ऑफिसचे मेल बघ अस होत. फोन/आयपॅड वाचताना. हे ऑडीबल असल्यामुळ लगेच आणल गेल.

मी क्लेम ठेवलाय ग्रंथालयात. आज उद्यात आणेन. पण एकंदर मोटिव्हेशनची लेव्हल सो सो च आहे. म्हणजे आपोआप पुस्तक वाचून मेंदुत जावे असे. पुस्तंकं वाचण्याची सवयच गेलीये.

खूप छान पुस्तक परिचय. खरंच पुस्तकाचा परिचय असाच आणि इतकाच असावा. अतिपरिचयात् अवज्ञा होऊ शकते.
आता शोधते लायब्ररीत. *मिळाले hoopla वर.
( मिडनाइट लायब्ररी इतक्यात वाचले, टाइम ट्रॅव्हल नाही पण मल्टिव्हर्स सारखे )

कन्व्हिनिअन्स स्टोअर वुमन पण आवडेल तुम्हाला. किंडल वर आहे. >>>
नक्की शोधते.

इन्स्टाग्राम बघ, ऑफिसचे मेल बघ अस होत. फोन/आयपॅड वाचताना. >>> केवळ याच कारणासाठी टॅब न घेता किंडल रीडर घेतलं.

आज घेउन आले. मस्त वाटतय. म्हणजे ओळखीवरुन. कधी एकदा ऑफिस संपतय असं झालय. बाहेर बर्फ पडत असताना, पाय ताणून देउन मस्त वाचत बसणार आहे.

https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLU__rZ8ZIQ_dhCm8VzKBc2gCSeZf4p4yEzqrmyQK41DZyLZvQ6ZlzwU1k1acT6ftNTGVEwf3mkvDypmoTPciyUWvchtivlWc0oapYkzBc2mTRkM7SVEkwF_qh_EogM8LQ_GAwCJr1Pe7cHII60rM_4QdQ=w470-h625-no?authuser=0
-------------------------
तिकडे लोक्स, वर्डलच्या धाग्यावरती आपण वर्डल सोडवल्याचे प्रुफ्स (रांगोळ्या) टाकत बसलेत. आपण का पुस्तक आणल्याचे, प्रुफ टाकू नये. Wink म्हणोनात का कोणी आट्टेंन्शन 'सिक'र Wink

पहील्या २ गोष्टी झाल्या. दुसरी नवरा-बायकोची काय वेगळीच आहे. माझ्या खरच पाणी आलं डोळ्यात. खूपच टचिंग.

२ बहीणीं नावाचे प्रकरण आज वाचले. काय इमोशनल रोलर कोस्टर आहे यार. नवीन शब्द कळले काही पण मुख्य म्हणजे त्या त्या पात्राचा दृष्टीकोन कळला. घरचा बिझनेस असेल तर मुलांना करीअर निवडण्याचं स्वातंत्र्य खरच रहात नसेल. हे कधी लक्षातच आले नाही. नेहमी असूयामिश्रीत अद्भुतच वाटत आलेले की अमका/अमकीचा काय घरचा बिझनेस आहे , ऑल सेट लाईफ.
अरे पण त्यात निवडीचे स्वातंत्र्य नाही ना. Happy
ललीता इथे नेहमी नवीन पुस्तकं सांगत जा. आय अ‍ॅम फॉलोविंग यु Happy

ललीता इथे नेहमी नवीन पुस्तकं सांगत जा. >>>
हो, अर्थात! 'मिवापु' धागा वाचत जा Wink (कारण दरवेळी नव्या वाचलेल्या पुस्तकासाठी वेगळा धागा काढला जातोच असं नाही.)

Pages