हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ६: गूंजीचा हँगओव्हर

Submitted by मार्गी on 27 December, 2021 - 06:09

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) २: सत्गड परिसरातील भ्रमंती
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ३: अग्न्या व बुंगाछीना गावामधील ट्रेक
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ४: गूंजीच्या दिशेने...
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ५: है ये जमीं गूंजी गूंजी!

२९ ऑक्टोबरची रात्र गुंजीमध्ये तशी सगळ्यांनाच कठीण गेली! एक तर अतिशय जास्त थंडी होती. शिवाय उंची साधारण ३३०० मीटर्स असल्यामुळे श्वास घेण्यामध्येही काहीसा त्रास होता. त्यामुळे झोपताना पांघरूण डोक्यावरून घेणं शक्य नव्हतं, त्यात धोका होता. सगळे एकाच खोलीत जमेल तितकी पांघरूणं आणि जाड गाद्या वगैरे घेऊन झोपलो. किती अनपेक्षित जागी आहोत! आणि अगदीच अनप्लॅन्ड प्रकारे! पण हेही‌ तितकंच खरं की, प्लॅन केला असता तर कदाचित आलोच नसतो. कारण सगळे लोक काही त्या अर्थाने भटके किंवा ट्रेकर नाहीट. टूरिस्टच आहेत. त्यामुळे प्लॅन केलं नाही म्हणूनच येऊ शकलो. सगळे जण एकाच खोलीत असल्यामुळे थोडी ऊब मिळाली आणि खोली लाकडी असल्यामुळेही किंचित कमी थंडी जाणवली. अर्थात् व्यवस्थित अशी झोप कोणाचीच झाली नाही. पहाटेपासून सगळे जागे होते. इथलं पहाटेचं आकाश चुकायला नको म्हणून मी बाहेर आलो! पहाटे चंद्र उगवला होता आणि चंद्र प्रकाशात अगदी जवळचे शिखर मस्त चमकत होते! ढग आहेत, त्यामुळे तारे तितके चांगले दिसले नाहीत. आणि थंडी मात्र बोटं सुन्न करणारी आहे! आणि त्याही‌ पेक्षा गमतीची गोष्ट म्हणजे हॉटेलच्या दरवाजापाशी ठेवलेल्या बादलीतलं पाणी गोठलं आहे!! रात्री हॉटेलवाल्याने जरा लांब असलेली बाथरूम दाखवली होती. तिथलं आतल्या प्लास्टीकच्या ड्रमातलं पाणी मात्र गोठलं नाहीय. त्या थंडीमध्ये ब्रश करणं हे एक भीषण दिव्य होतं. कसे बसे अनिवार्य आन्हिकं आवरले. अक्षरश: काही मिनिटांपर्यंत बोटं आखडली होती. आणि श्वास सोडणं म्हणजे निव्वळ धुम्रपान झालं होतं.


.

.

हळु हळु सगळेच उठले. बाहेर आवरून आले पण परत येऊन पांघरुणात बसले सगळे. कारण असह्य थंडी! चहाची तीव्र गरज होती (हातांना, चेह-याला आणि जीभेलाही), पण हॉटेलवाले उठले नसल्यामुळे चहासाठी थांबावं लागलं. हळु हळु आजूबाजूचे पर्यटक, गाड्यांचे ड्रायव्हर्स व जत्रेसाठी आलेली मंडळीसुद्धा हॉटेलकडे आली आणि मग वर्दळ सुरू झाली. काल रात्री जेवताना हॉटेलमधले काही अन्य प्रवासी म्हणाले होते की, आदि कैलास व ॐ पर्वत व्ह्यू पॉईंटला जाण्यासाठी धारचुलावरूनच इनर लाईन परमिट घ्यावं लागतं. ते इथे मिळू शकत नाही. त्यामुळे आदि कैलास व ॐ पर्वताकडे जाणं कठीण आहे. त्यातच आदि कैलासच्या वाटेवर बर्फवृष्टी झाल्यामुळे तिकडे गाड्या जात नाही आहेत. त्यामुळे फक्त ॐ पर्वत व्ह्यू पॉईंटला जाण्याचा पर्याय आहे. पण तिथेही पुढे लगेचच परमिट विचारतील व तो आम्हांला मिळू शकत नाही आहे. हॉटेलवरून निघण्याच्या सुमारास जितूजी सुद्धा येऊन भेटले. त्यांनी सांगितलं की, त्यांची ती गाडी तिकडेच बंद पडली व पुढे आणताच आली नाही. त्यांच्या ग्रूपमधले काही जण लिफ्ट घेऊन आले तर काही २५ किमी चालत रात्री उशीरा आले. ते बोलले की, ते बाकी ग्रूप्ससोबतच थांबणार आहेत. पण आम्ही थोडा वेळ थांबलो तर आम्हांला ॐ पर्वत व्ह्यू पॉईंटला बाकी गाड्यांसोबत नेतील. पण कोणालाच ते पटलं नाही. थोड्या चर्चेने असं ठरवलं की, जिथपर्यंत जाऊ देतील तिथपर्यंत ॐ पर्वतच्या रोडवर जायचं आणि परमिट विचारून रोखलं की, तिथूनच परत यायचं. म्हणजे थोडक्यात आम्ही काला पानीपर्यंत जायला निघालो!


.

.

रस्त्यावरचा बर्फ

काला पानीचा रस्ता तसा ठीक आहे कळालं होतं. साधारण सकाळचे ८.३० पर्यंत निघालो. इथून काला पानी ८ किलोमीटर तरी असेल. काली गंगा नदीचं उगम स्थान! आणि तिथून ॐ पर्वताचा व्ह्यू पॉईंट म्हणजे नाभी ढांग हे आणखी ८ किलोमीटर पुढे आहे! एके काळी इथे यायचं निव्वळ स्वप्नच बघितलं होतं असा हा भाग! अद्भुत! निघताना ड्रायव्हर अनीलजींनी सांगितलं की, सकाळी त्यांनी गाडी धुताना वायपर्स सुरू केले तर वायपर्समधलं पाणी गोठलं होतं! गूंजीमध्ये रस्त्यावर काल जो चिखल होता तो आत्ता सगळा बर्फ झालेला दिसला! कमालीची थंडी वाजतेय. गाडीत सगळे बसल्यावर खूप वेळ हात एकमेकांवर चोळल्यावर बोटं थोडे मोकळे झाले! इथे सगळ्या बाजूंनी डोंगर आहेत, त्यामुळे ऊन मिळायला अजून खूप वेळ लागेल! अगदी कोई मिल गया पिक्चरमधल्या जादूसारखी अवस्था झालीय! ऊन हवंय भरपूर! काला पानीचा रस्ता साधारण खडी रस्ता आहे. चिखल नसल्यामुळे तितकं कठीण गेलं नाही. काल अनीलजी खूप घाबरले होते आणि अजूनही धारचुलाला पोहचेपर्यंत त्यांना चैन नसणार आहे. धबधब्यासारख्या काली गंगेच्या जवळून रस्ता चढत वर गेला. अर्ध्या तासामध्येच काला पानीला पोहचलो! तिथेही रस्त्यावर बर्फ दिसला. बर्फाचा तुकडा हातात घेतला! इथे मात्र सशस्त्र सीमा बलाच्या जवानांनी अडवलं आणि आम्ही काही न बोलता थोडा वेळ तिथे थांबून परत फिरलो. इथली उंची गूंजीहून आणखी जास्त म्हणजे ३७०० मीटर आहे. इथे समोर असलेल्या डोंगरांच्या मागे असल्यामुळे ॐ पर्वत जवळून दिसला नाही. इथून पुढे तीव्र चढाचा घाट आहे असं कळालं.


.

.

परत जाताना गूंजीमध्ये काल संध्याकाळी चहा घेतला त्या हॉटेलमध्ये आलू पराठा व चहा असा मस्त नाश्ता केला. इथे चक्क काही सायकलिस्ट दिसले! पण चौकशी केल्यावर कळालं की, ते गूंजीमध्येच फिरत आहेत व गाडीवर सायकली टाकून आले आहेत. इथे सायकल किंवा कोणत्याही अन्य वाहनापेक्षाही पायी जाणंच सेफ आहे! हाथी ना घोडा, यहाँ बस पैदल ही जाना है! आत्ता ऊन चांगलं पडलंय, त्यामुळे थंडीचा त्रास आता कमी झाला. जास्त वेळ न दवडता आता निघायचं आहे म्हणजे दिवस मावळताना तरी धारचुलाला पोहचता येईल! पण हा प्रवास खडतर असेल. ड्रायव्हर अनीलजींच्या चेह-यावर तणाव स्पष्ट दिसतोय. कालचे मोठे चढ आता उतार होतील. पण तरीही काही ठिकाणी तीव्र चढ आहेतच. आणि चिखलाचे काही पॅचेसही आहेत. आणि पहिल्याच अशा पॅचवर गाडी रुतली! चिखलामध्ये टायर्स जाऊन एक खड्ड्यासारखा भाग झाला होता. त्यामध्ये टायर फसलं. आणि कितीही जोर लावला तरी‌ ते ग्रिप घेत नाहीय. नुसतं आवाज करतंय आणि गरम होतंय. शेवटी सगळे खाली उतरलो आणि गाडी ढकलून बघितली. रस्त्यावरचे इतरही लोक आले. पण तरीही ती ढकलली जात नाहीय. मागून एक मिलिटरीचं वाहन आलं. त्यांनी त्यांच्याकडे दोरखंड होता, त्याने आमची जीप मागे ओढून मोकळी केली. परत जीप नेताना ते अनीलजींना बोलले की, थोडी हलवत- वळवत न्या, म्हणजे पूर्ण चाक खड्ड्य़ात अडकणार नाही व ग्रिप मिळत राहील. त्यांनी प्रयत्न करून बघितले, पण जमलं नाही. मग शेवटी मिलिटरीच्या वाहनातल्या एका ड्रायव्हरने जोर लावून बरोबर जीप त्या पॅचमधून बाहेर काढली! त्यामधून सावरून पुढे जातोय तर आणखी एक असाच पॅच लागला. ह्यावेळी मात्र सगळे आधीच उतरले. अनीलजीही सावध झाले. इथे त्यांनी वेगळ्या प्रकारे जीप नेण्याचा प्रयत्न केला. पण तरीही जीप मध्येच जाऊन फसली. इथला चिखल अक्षरश: मऊ कणीकासारखा किंवा स्पंजसारखा झालाय. त्यामध्ये चाक आत जातं पण ग्रिप मिळत नाही. इथेही परत खूप खटपट केली. मघासारखीच दुसरी गाडी मागून आली. तेव्हा ते बोलले की, आता जीप टो करूनच न्यावी लागेल आणि जीप टो करणं त्यांच्या गाडीला शक्य नाहीय! आता मात्र सगळेच चिंतीत झाले. अनीलजी तर अक्षरश:‌ घाबरले होते. थोडा वेळ तसाच प्रयत्न झाला. कधी गाडी मागे ढकलून मोकळी केली, परत जोर लावून आणली. तरी ती फसत होती. काहीच जमत नसताना मागून एक मोठा पिक अप आला. त्या पिक अपच्या चालकाने सफाईने गाडी अक्षरश: नाचत नाचत त्या पॅचवरून उडवली. आम्ही त्या गाडीला थांबवलं व मदत मागितली. तो माणूसही तयार झाला! त्याला फक्त छोट्या गाडीची सवय नव्हती. म्हणून त्याने फक्त अनीलजींची परमिशन मागितली की, गाडी खूप जोराने न्यावी लागेल. इतकी जोराने की, मूळ मालक तितकी रिस्क घेत नाही. उपाय नव्हता, तेव्हा अनीलजींनी रुकार दिला. आणि त्या माणसाने अक्षरश: आडवी- तिडवी उडवत गाडी चिखलातून बाहेर काढली! अक्षरश: उडत उडत! गाडीतलं सगळं सामान आतमध्ये फेकलं गेलं! क्षणभर वाटलं जणू दूसरी गाडीच मागच्या बाजूने वेगात आलीय की काय! इतक्या वेगाने गाडी नेल्यामुळेच ती न अडकता पार झाली! पण इतक्या वेगाने नेण्यामध्ये धोकाही होताच. आम्हांला पुढे रस्त्याच्या पलीकडे उलटलेली एक जीपही दिसली! तो पॅच पार केल्यानंतरही ते अनुभवी ड्रायव्हर आमच्या जीपमध्येच थांबले. अनीलजींनी त्यांना विनंती केली, कारण पुढेही असे पॅचेस होते व त्यांच्याकडे अजून एक ड्रायव्हर त्यांच्या गाडीमध्ये होता!


.

.

.

पुढे रस्त्यावर अनेकदा "शट्ट" असा भाव मनात येत होता, पण गाडी अडकण्याची वेळ कुठे आली नाही. एकदा सगळे खाली उतरलो व त्या ड्रायव्हरने परत एकदा उडत गाडी नेली. त्याव्यतिरिक्त गाडीला अडचण अशी आली नाही. सुदैवाने तिचे सगळे भाग शाबूत राहिले. फक्त खालचा भाग किरकोळ घासला गेला होता. बाकी रस्ता तितकाच रोहमर्षक होता. फक्त हळु हळु हायसं‌ वाटत गेलं की, चला आता हा रस्ता संपणार आहे. परत एकदा रस्त्यावरचे धबधबे लागले, त्यातलं इंद्रधनुष्यही परत अनुभवलं! हळु हळु उंची कमी होत गेली व सूर्य चढत गेला तसा थंडीचा त्रास कमी झाला व सगळ्यांच्या जीवात जीव आला. काली गंगा परत मोठी होत चालली! ह्या नदीची बाल अवस्था ते यौवनावस्था आम्हांला बघायला मिळाली! आसपासचा निसर्गही परत करडेपणाकडून हिरवाईकडे वळाला. तवा घाटच्या साधारण सहा- आठ किलोमीटर अलीकडे नेपाळच्या बाजूला काली गंगेला समांतर पाय-यांची पायवाट दिसत होती! निश्चित पूर्वीच्या काळी हा एक मुख्य पायी वाटेचा रूट असला पाहिजे! अजूनही पाय-या शाबूत असल्याचं ह्या बाजूने दिसतंय. अनेकदा नदीच्या अगदी जवळ येऊन ती पायवाट परत वर चढते व समांतर जाते आहे! तवाघाटमध्येसुद्धा ती पायवाट दिसली!


गूंजीचे स्थान!


.

खाली नदी व नदीच्या पलीकडे समांतर पायवाट

पुढचा प्रवास आरामात झाला. नशीबाने गाडीही फार मोठं नुकसान होण्यापासून वाचली! अनीलजींच्या जीवात जीव आला! नंतर त्यांनी सांगितलं की, आम्हांला मदत करणारे दुसरे जे ड्रायव्हर सोबत आले होते, त्यांनी दारू घेतली होती. आणि नंतर सत्गडला पोहचल्यावर ते बोलले की, त्यांनीही दारू घेतली होती! अन्यथा त्यांना चालवण्याची हिंमतच होत नव्हती. अगदी स्वाभाविक आहे हे. कारण अशा भयावह रस्त्यावर ड्रायव्हिंग हे अगदीच खडतर काम आहे. आणि अशी इतरही भयानक व थँकलेस कामं ही दारूच्या मदतीनेच तर केली जातात- पोस्ट मॉर्टम असेल किंवा गटर साफ करणं असेल. असो! धारचुलाला पोहचल्यावर जेव्हा नेटवर्क मिळालं आणि फोन सुरू झाला तेव्हा आधी गूंजीबद्दल व्यवस्थित माहिती घेतली! निघण्याच्या आधी जाऊ असं वाटलंच नव्हतं, त्यामुळे ती माहिती बघितली नव्हती! ती बघितली तेव्हा नीट कळालं. की गूंजी अगदी भारत- तिबेट- नेपाळ सीमेलगत आहे आणि ३२०० मीटर उंचीवर आहे! आणि काला पानी तर आता डिस्प्युटेड एरियामध्ये आहे. अगदीच सीमेलगत. आणि नेपाळने काही काळापूर्वीच काला पानीवर दावाही केला आहे. त्यामुळेच कदाचित भारत सरकारने थोडी धावाधाव करून हा ट्रेक रूट बांधला व तिथे यात्रा वगैरेही सुरू केल्या. एका बाजूला वाटतं की, चीनची आपल्यावर खरं तर कृपा आहे. चीनचा शह आहे म्हणूनच आपण इतक्या दुर्गम व कोप-यातल्या भागामध्येही रस्ते व अन्य व्यवस्था निर्माण करतोय. नाही तर अंदमान- निकोबारसारख्या दुर्लक्षित भागांसारखाच हा भाग दुर्लक्षित तर राहिला नसता असा प्रश्न पडतो. इंटरनेटवर गूंजीचं तपमान बघितलं‌ तर पहाटेचं -५ दिसलं! खरंच हा परिसर तर इतका दुर्गम की, तिथे गावसदृश वस्ती आहे, हेच आश्चर्य आहे. तिथे हॉटेल व होम स्टे मिळालं, माणसं मिळाली, हेच आश्चर्य! आणि आता नोव्हेंबरमध्ये गूंजीतले लोक खाली उतरतात. हिवाळ्यात तिथे मिलिटरी वगळता कोणी राहात नाही असं कळालं!


.

असा हा गूंजीचा थरारक प्रवास! अगदीच अनप्लॅन्ड. आणि म्हणूनच प्रत्यक्षात आला. जर पुरेशी माहिती असती जाता आलं नसतं. अगदी अनीलजीसुद्धा त्यांना रस्ता माहिती नव्हता म्हणूनच तयार झाले होते. नाही तर इतर अनेकांनी आम्हांला नाहीच म्हंटलं होतं. आणि धारचुलावरून फोर बाय फोर जीपवालेच लोक जातात व तेही ४० हजार भाडं घेतात असं कळालं. अनीलजींनी त्यांना हे काहीच माहिती नसल्याने त्यांनी भाडं कमी घेतलं होतं. पण अर्थातच नंतर आम्ही त्यांनाही जास्त पैसे दिले व गाडीला झालेल्या किरकोळ नुकसानाचीही भरपाई दिली. ह्या प्रवासातली आणखी एक आठवण म्हणजे जेव्हा धारचुलामध्ये आम्ही काही लोकांना भेटत होतो, तेव्हा त्यातल्या एकाने आश्चर्य वाटून आम्हांला प्रश्न केला होता की, गूंजीला गेला होता? आणि परतही आलात!!!


.

पुढील भाग: हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ७: सत्गड- कनालीछीना ट्रेक

माझे ध्यान, हिमालय भ्रमंती, सायकलिंग, ट्रेकिंग, रनिंग व इतर विषयांवरचे लेख इथे उपलब्ध: www.niranjan-vichar.blogspot.com

Group content visibility: 
Use group defaults

थरारक!
वाचनीयसुद्धा. फोटो मस्तच. वाचता वाचता तुमच्या जीपबरोबर आम्हीही प्रवास करीत होतो.

थरारक >+१
अनुभव नसणाऱ्या/ रस्त्याची माहिती नसणाऱ्या चालकाने खरं म्हणजे असं साहस करू नये असं वाटलं.

रस्ते वाइट प्लस दारु प्यायलेला चालक. हवा खराब. किती ते एक्साइट मेंट.

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! प्रतिक्रियांमध्ये आलेल्या मतांशी मी सहमत नाही. @ वावे जी, ते पहाड़ी चालकच होते, पिथौरागढ़चे असल्यामुळे पहाड़ी रस्त्यांचा अनुभव होताच. पण हा कच्चा रस्ता व अतिभीषण स्वरूप त्यांना माहिती नव्हतं, अपेक्षित नव्हतं. कारण तो रस्ता मागच्या वर्षीच बनला आहे. आणि दारू त्यांनी घेतली असली तरी ती फक्त हिंमत होण्यापुरती होती, आम्हांला तर ती जाणवलीही नव्हती. आणि ड्रायव्हिंगमध्ये काहीच कमतरता नव्हती. किंबहुना त्यांनी खूप मोठी हिंमत दाखवली, संयम ठेवला असंच मी म्हणेन.