आनंदाचे डोही.... आनंद तरंग...!!

Submitted by रूपाली विशे - पाटील on 18 December, 2021 - 05:47

आनंदाचे डोही.. आनंद तरंग...!!
__________________________________________

" तू इस तरह से मेरी जिंदगी मे शामिल है.....!!
जहाँ भी जाऊँ ये लगता है , तेरी महफिल है....!!

घराच्या बाल्कनीत तन्मयतेने गाणं ऐकत बसलेल्या उन्नतीचे लक्ष रस्त्यावरून चालणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या मांजरीकडे गेलं. जडावलेल्या शरीराने चालणाऱ्या त्या मांजरीकडे उन्नती एकटक पाहत राहिली. लवकरच हिची सुटका होईल असं दिसतयं , मांजरीकडे पाहत असताना तिच्या मनात विचार आला.

अचानक त्या मांजरीने आपल्या जडावलेल्या अंगाने रस्त्याच्या कडेला असलेल्या लहान भिंतीवरुन पलीकडे झेप घेतली आणि मघासपासून तिच्यावर नजर रोखून असलेल्या उन्नतीच्या पोटात भला मोठा खळगा पडला.

___ आणि मग विलक्षण सुखाच्या अन् दुःखाच्या अनंत लाटा परस्परांवर आदळल्या. उन्नतीचे तन - मन अनेकविध भावनांनी रोमांचित झाले. स्तब्धपणे समोर नजर लावून , उन्नती घटकाभर बाल्कनीत बसून राहिली... आपल्याच विचारांच्या तंद्रीत..!!

तो प्रसंग घडून दोन - तीन दिवसच उलटले असावेत, एके संध्याकाळी घरासमोरच्या आवारातून येत असताना उन्नतीची नजर कोपऱ्यावर असलेल्या बदामाच्या झाडाखाली गेली. त्या दिवशी पाहिलेल्या त्या पांढुरक्या मांजरीच्या थानाला इवली - इवलीशी दोन पिल्ले चिटकून चुरूचुरू दूध पिताना पाहून उन्नतीची पावले क्षणभर जागीच थबकली.

ते दृश्य पाहून तिच्या सर्वांगातून विलक्षण गोड संवेदनांच्या लहरी निघू लागल्या. नुकत्याच प्रसूत झालेल्या त्या मांजरीला आणि तिच्या नाजूक पिल्लांना पाहून तिला त्यांना स्पर्श करण्याची अनिवार इच्छा झाली. ती लुसलुशीत , कोवळी पांढुरकी पिल्ले उचलावीत आणि आपल्या छातीशी त्या पिल्लांना घट्ट कवटाळून धरावीत; पिल्लांचा होणारा नाजूक स्पर्श आपण अनुभवावा असं तिला मनापासून वाटलं. परंतु मांजरांची तिला वाटणारी भीती तिच्या मोहापुढे आड आली आणि मग उन्नतीने आपल्या अनिवार झालेल्या इच्छेला मुरड घातली.

_________________ XXX______________

"चला ना राहुल, जरा बाहेर जाऊया.. बघा, कित्ती छान रिमझिम पाऊस पडतोयं बाहेर..!" उन्नती राहुलला आग्रह करीत म्हणाली.

" अगं , पावसात भिजून आजारी पडशील तू..!" राहुलने तिच्याप्रती काळजी व्यक्त करत म्हटले.

" काही नाही आजारी - बिजारी पडणार एवढयाशा पावसात भिजल्याने..! पावसाच्या हलक्या सरी अंगावर झेलताना ना खूप छान वाटतं.. असं वाटतं की, ते गार थेंब आपल्याला स्पर्श करताहेत आणि मग त्या थेंबांच्या स्पर्शाने आपलं तन - मन कसं रोमांचित होऊन जातं... !! असं जाणवत राहत की, ते थेंब जणू आपल्याला गुदगुल्या करताहेत... जसं की, आपल्या गालावरून कुणीतरी मोरपीस फिरवतेयं ...!" हातातले मोरपीस राहुलच्या चेहर्‍यावरून अलगद फिरवत उन्नती खट्याळ हसली.

" हो.. हो... पूरे झाल्या तुझ्या ह्या कवी - कल्पना.... पोकळ शब्दांना उगीच सोनेरी मुलामा ... !" उन्नतीची थट्टा करायची संधी राहुलने काही सोडली नाही.

____आणि मग त्याच्या थट्टेला प्रत्युत्तर न देता भरून आलेल्या डोळ्यांनी उन्नती हसली मात्र...!!

" चल... जाऊया .!" तिचा हात हलकेच आपल्या हातात घेत राहुल तिच्यासोबत निघाला.

घराच्या गच्चीवर लहान मुलांसारखे अंगावर पावसाचे तुषार मनमुरादपणे झेलणाऱ्या उन्नतीकडे राहुल वेड्यागत पाहत राहिला.

" काय पाहतायं....?"

" तुला .. आणखी कुणाला ...?" राहुलच्या उत्तरावर ती विलक्षण लाजली.

ऊन - पावसाचा खेळ सुरु झाला.

उन्नती क्षणभर राहुलकडे एकटक पाहू लागली. राहुलच्या काळ्याभोर केसांवर पडलेले पावसाचे तुषार उन्हाच्या तिरपीने चमकू लागले होते.. त्या थेंबांमध्ये इंद्रधनुष्याच्या रंगाचे भास तिला होऊ लागले.. ते इंद्रधनुषी थेंब आपल्या बोटांनी .. अहं... आपल्या ओठांनी टिपून घ्यावेत ... त्या थेंबांचा स्पर्श आणि ... मग त्या थेंबांना टिपताना आपसूकपणे ओठांना होणारा राहुलचा स्पर्श...!!

त्या विलक्षण कल्पनेने आणि कल्पनेनेचं जाणवणाऱ्या स्पर्शाने, त्यातून येणाऱ्या गोड संवेदनांनी तिचे शरीर शहारले. चित्तातल्या साऱ्या वृत्ती फुलारून आल्या.

‌तेवढ्यात अचानक ढगांचा गडगडाट झाला आणि ती लहान मुलासारखी राहुलला बिलगली.

‌ लग्न झाल्यावर राहुलशी वागताना - बोलताना तिच्यात एक प्रकारचा संकोच होता ; तो आता पूर्णपणे गळून गेला होता. राहुल कायम आपल्यासोबत , आपल्या नजरेसमोर असावा ह्या इच्छेने ती जणू वेडावली होती.

‌त्याच्यावर फक्त आपलाच अधिकार असावा असं तिला आता वाटू लागलं होतं. कसली तरी अनामिक भीती तिच्या मनात ठाण मांडून बसलेली...! कुठल्यातरी अधीरतेने, अस्वस्थतेने तिचे हृदय सतत थरारून उठू लागले होते.

‌त्या दिवशी गॅस पेटवत असताना पेटणाऱ्या गॅसच्या ज्वालांकडे पाहताना उन्नतीला अचानक तंद्री लागली. आजकाल हे नेहमीच घडू लागलेले...!

‌ त्या पेटत्या ज्वालांकडे पाहताना, बागेतल्या मोगर्‍याच्या टपोर्‍या कळ्या खुडताना, गरम पाण्याचा शॉवर अंगावर घेताना, देव्हाऱ्यातल्या तेवणाऱ्या निरंजनाच्या मंद ज्योतीकडे पाहताना..... निर्माण होणाऱ्या उत्कट संवेदना तिचं तन- मन भारून टाकीत असत... आणि मग तिचं मन नकळत भरून येई. इतकं की __ वाटे आपल्या धमन्यांतून वाहणाऱ्या रक्तातून काहीतरी वेगाने दौडतयं... त्या वाहणाऱ्या रक्ताच्या प्रत्येक लालबुंद थेंबाला नाजूक कोंब फुटताहेत ... आणि ते कोंब पुढे - पुढे लांब वाढतच जाताहेत.

‌कधी - कधी तर भिंतीवर टांगलेल्या चित्रातली गुलाबी पंखांची सुंदर परी जिवंत होऊन तिच्याकडे पाहून स्मितहास्य करू लागे.. आणि मग तिचे शरीर आणि मन दोन्ही एकाच वेळी शहारून येई.

‌आजकाल रात्री गादीवर पडल्या - पडल्या उन्नतीला झोप येत असे. समोरच्या भिंतीवर असलेल्या चित्रातली परी जिवंत होऊन तिच्या पापण्यांवरून जणू हात फिरवू लागे. एक विलक्षण सुखद धुंदी तिच्या डोळ्यावर येई आणि मग ती निद्रादेवीच्या स्वाधीन होऊन जाई.

‌आभाळाला भेदणारा उंचच - उंच डोंगरकडा.... फक्त एक मनुष्यच जाऊ शकेल एवढीच त्यावर असणारी नागमोडी वाट... आणि कड्याच्या दुसऱ्या बाजूला खोल - खोल दरी....!!

‌ उन्नती एकटीच अनवाणी त्या वाटेने निघालेली... तिने खाली पाहिलं आणि तिला चक्कर आल्यासारखं झालं. ती क्षणभर जागेवरच थांबली. थोडावेळ थांबून ती पायाखालची वाट तुडवू लागली. तिला कळतच नव्हतं की, आपण कुठे जात आहोत, आपल्याला नक्की कुठे पोहोचायचे आहे ते...!

‌ती आपल्याच तंद्रीत चालतच राहिली. चालता - चालता ती एका गुहेच्या तोंडाजवळ येऊन थांबली. त्या गुहेच्या तोंडाजवळ मांजरीचे एक पांढुरके, लुसलुशीत , हिरव्या डोळ्यांचे पिल्लू शांत बसले होते. ते पिल्लू उचलून घेत त्याला तिने आपल्या छातीशी घट्ट कवटाळले. मोठ्या मायेने ती त्या पिल्लाच्या अंगावरुन हात फिरवू लागली.

___ तत्क्षणी अचानक कानठळ्या बसवणारा कडकडाट झाला अन् त्या गुहेतून एक काळीभिन्न सावली तिच्यासमोर प्रकट झाली. कसल्यातरी भयप्रद उन्मादांनी त्या सावलीचे डोळे चमकत होते. त्या सावलीच्या हातात पाजळलेली तलवार होती. ती भयप्रद सावली आणि तिच्या हातातली तलवार पाहून उन्नती प्रचंड घाबरली. तिच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले. तिला जोराने ओरडावेसे वाटत होते, पण तिच्या कंठातून आवाजच फुटत नव्हता.

आता सावली पुढे - पुढे येऊ लागली, तसं तशी उन्नती मागे- मागे सरकू लागली. ती भयप्रद सावली तिच्या हातातले मांजरीचे पिल्लू खेचून घेऊ लागली. पिल्लाला वाचविण्यासाठी उन्नती जिवाच्या आकांताने सावलीचा प्रतिकार करू लागली; पण सावलीचा प्रतिकार करत असतानाच अचानक उंच, निसरड्या कड्यावरून उन्नतीचा पाय घसरला आणि मांजरीच्या पिल्लासमवेत ती खोल दरीत कोसळू लागली.

चारही बाजूला गर्द काळोख होता. तिने घाबरून जोरात किंकाळी फोडली;. पण तिच्या कंठातून आवाजच निघाला नाही. तिने अतीव भितीने डोळे गच्च मिटले.

__अचानक एक प्रकाशाची तिरीप त्या गर्द काळोखाला छेदू लागली. उन्नतीने डोळे उघडले. काळोखातून एक तेजस्वी प्रकाश झिरपू लागला होता.

कुणीतरी आपल्याला अलगद ओंजळीत झेलले आहे असे तिला जाणवू लागले. ओंजळीत धरून कुणीतरी तिला उंच - उंच घेऊन जाऊ लागले. तिने डोळे विस्फारून पाहिलं... तर घरातल्या भिंतीवरच्या चित्रात असणारी, हुबेहुब त्या चित्रासारखीच दिसणारी गुलाबी पंखाची, सुंदर परी तिच्याकडे पाहून तेजस्वी स्मित करत होती.

__ आणि उन्नती झोपेतून दचकून जागी झाली. तिची छाती भीतीने धडधडू लागली. शेजारी राहुल शांत झोपलेला होता.

कसले हे भयप्रद आणि चमत्कारिक स्वप्न पडलं होते आपल्याला...??

ती क्षणभर स्तब्ध झाली. थोड्या वेळाने जरा शांत वाटल्यावर बाजूच्या टिपॉय वरील बाटलीतले पाणी पित, शांत झोपलेल्या राहुलच्या अंगावर हात टाकत उन्नती निद्रादेवीची आराधना करू लागली.

__________________XXX_______________

" राहुल, आज संध्याकाळी सर्कस पाहायला जायचे आहे ना आपल्याला ...??"

" कधी ठरवलंस तू सर्कस पाहायला जायचे..??"

"" म्हणजे..?? प्रत्येक वेळी तुम्हांला सांगून ठरवायचं का मी..??.."

" तसं नाही गं, पण आज संध्याकाळी तुझ्या मैत्रिणी तुला भेटायला येणार होत्या ना आपल्या घरी....??"

" मग चोरी आहे का मला कुणाची, माझ्या मैत्रिणींना घरी बोलवायला ..?"

" अगं, पण मी कुठे असं म्हणालो..??"

" म्हणायलाचं कश्याला हवं ..?? आजकाल तुम्हांला माझी जराही काळजी वाटत नाही ...!!" उन्नती चिडून म्हणाली.

तिच्या ह्या अतार्किक वादावर आणि अजब प्रश्नांवर राहुलला उत्तर देणं शक्यच नव्हते. तो स्वतःशीच हसला मात्र...!!

" का एवढा त्रागा करतेस..?? त्यात एवढं रागावण्यासारखं काय आहे..?? संध्याकाळी जाऊया आपण सर्कस पाहायला .. .!" तिची समजूत काढत राहुल म्हणाला..

संध्याकाळी सर्कस पाहताना उंच झोक्यावर स्वार होऊन, आपल्या लवचिक अंगाने विविध करामती करणाऱ्या तरुणी आणि त्यांच्या करामती पाहताना उन्नतीच्या पोटात खळगे पडू लागले. तिचं शरीर थरारून उठू लागले.

विदूषकाच्या विनोदी करामतीने तर ती इतकी खळखळून हसली की, हसून- हसून तिचे गाल आणि तोंड दुखू लागले. खळखळून हसणाऱ्या उन्नतीचा हात राहुलने बराच वेळ आपल्या हातात घट्ट धरून ठेवला.

सर्कशीचा शो संपल्यावर दोघेही जवळच्या समुद्र - किनाऱ्यावर फिरायला निघाले.

समुद्राच्या लयबद्ध लाटा आणि त्यांचे गुंजन ऐकून उन्नतीच्या साऱ्या वृत्ती फुलारल्या.

लाटांमधून अनवाणी पायांनी चालताना पायाखालची सरकत जाणारी वाळू आणि पायांना होणारा वाळूचा सुखद स्पर्श, दूर क्षितिजावर मावळतीला जाणारा सूर्यनारायण , त्या संध्या समयी क्षितिजावर पसरलेले अनेकविध रंग, सूर्याची सोनेरी किरणे पाहून उन्नतीच्या मनात अनेक आनंद तरंग उठू लागले.

किनाऱ्यावर विकायला असलेली पाणीपुरी पाहून तिला पाणीपुरी खाण्याची प्रचंड इच्छा झाली. राहुल आणि उन्नती दोघे पाणीपुरी खातच होते तेवढ्यात ___

" हाय राहुल..!!" मागून स्कूटीवरून आलेल्या एका
तरुणीने राहुलला लांबूनच आवाज दिला.

"हाय भाविका...!" असे म्हणत राहुल उठून त्या तरुणीजवळ गेला.

राहुल त्या तरुणीशी बोलत असताना उन्नतीचे पूर्ण लक्ष त्या दोघांकडे होते. हसत गप्पा मारणाऱ्या त्या दोघांकडे ती डोळ्याच्या कोपऱ्यातून अधून-मधून दृष्टीक्षेप टाकत होती.

एक-दोन मिनिटे त्या तरुणीशी बोलून राहुल परतला.

" कितनी तीखी पानीपुरी बनायी है.... भैय्या..!!" अचानक उन्नती पाणीपुरीवाल्या भैयावर उखडली.

'' वड्याचं तेल वांग्यावर निघतेयं वाटतं ..!" गालातल्या गालात हसत राहुल स्वतःशीच पुटपुटला.

" काही म्हणालात का..?" उन्नतीने डोळे मोठे करत विचारले.

" कुठे काय म्हणालो..? हे घे पाणी पी..!"

" कोण होती ती मुलगी.....??"

" कॉलेजची मैत्रीण होती..!"

"कधी सांगितलं नाही तुम्ही मला तुमच्या ह्या मैत्रिणीबद्दल...!"

"माझ्या एवढ्या मैत्रिणी आहेत की, कितीजणीं बद्दल तुला सांगू बरं ..?" खट्याळ हसत राहुल असं म्हणताच उन्नतीचे डोळे पाणावले. तिने आपला खालचा ओठ किंचित दाताखाली दाबून धरत एक आवंढा गिळला. ती शांत बसली.

" ए, अगं, शांत का झालीस तू ...?? मस्करी करतोय तुझी. तू तर अगदी सिरियसली घेतलंस माझं बोलणं...!" तिच्या समोर चुटकी वाजवत राहुल म्हणाला.

" तरी म्हणत होतो, सर्कस पाहताना एवढं हसू नकोस... मनुष्य प्रमाणाबाहेर आनंदी झाला ना की, मग असे अचानक दुःखाचे अश्रू त्याची सोबत करायला येतात...!"

" मला नका पाजू तुमचे ते मानसशास्त्राचे डोस... तुम्ही पुरुष ना खूप लब्बाड असतात..!" असे म्हणत जागेवरून उठून उन्नती किनाऱ्यावरून चालू लागली.

थोड्या अंतरावर जाऊन वाळूत बसून ती लाटांचा खेळ पाहू लागली. तिच्या पाठोपाठ आलेला राहुल तिच्या शेजारी बसला.

" नाव नाही सांगितलं तुम्ही अजून तुमच्या मैत्रिणीचे..??"

" वाटलंच मला; तुझ्या डोक्यातून तो विषय अजून गेलेला नाहीये ते ..! तुम्ही बायका म्हणजे कमालीच्या संशयी असतात बाबा..!"

तिचे डोळे पुन्हा एकदा आसवांनी भरून आले. मग बराच वेळ दोघे काहीही न बोलता शांत बसून किनार्‍याला मिठीत घेणाऱ्या लाटांचा खेळ पाहत राहिले.

" राहुल, आज काल मी खूप वेड्यासारखी वागतेयं ना..??"

" हो.... म्हणजे थोडीशी...!" पुन्हा तिची थट्टा करण्याची हुक्की राहुलला आली.

" आजकाल माझा ना स्वतःवर ताबाच राहत नाही. मन असंच कुठेतरी भटकत राहते...!"

" हं..!"

"शेजारच्या काकू सांगत होत्या की____.!"

" काय सांगत होत्या काकू....??"

" सांगत होत्या की, पहिलटकरणींना की नाही असंच होतं असतं ..!"

___आणि हे सांगताना उन्नतीच्या गालावर क्षितिजावर पसरलेले संध्या समयीचे सारे रंग उतरले.

" असं म्हणजे कसं...?""

"तुम्हा पुरुषांना ना, बायकांच्या मनातले ओळखताच येत नाही. एकजात सगळे माठ आणि दीड शहाणे कुठले..!" राहुलच्या डोक्यात टपली मारत उन्नती म्हणाली.

" कुणीही यावे आणि टपली मारून जावे बिचाऱ्या गरीब बापड्या पुरुषांना ... !! त्यात जर का तो नवरा असेल तर मग त्याला कुणी वालीच नाही ...!" नाटकी उद्वेगाने हावभाव करणाऱ्या राहुलला पाहून उन्नती खळखळून हसू लागली.

" हो... हो ... पूरे झाला तुमचा नाटकी कांगावा..!!" मनापासून हसत उन्नती उद्‌गारली.

मनमुरादपणे हसणाऱ्या उन्नतीकडे वेड्यागत पाहत बसलेल्या राहुलला तिने आपल्या जवळ ओढले आणि मग त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवत त्याच्या कपाळाचे एक दीर्घ चुंबन घेतले.

___आणि मग आभाळभर पसरलेल्या संधिप्रकाशाने आणि लाटांचे लयबद्ध मंद संगीताने उन्नतीच्या सार्‍या भावना उचंबळून आल्या. तिच्या सर्वांगभर रोमांचाच्या लाटाच लाटा उसळल्या.. सुखावलेल्या शरीराचा कण न् कण बेहोष झाला. काळ ही काही क्षण तिथेच घोटाळला... राहुलच्या अजूनच जवळ जात त्याला बिलगत तिने आपली मान त्याच्या खांद्यावर टेकवली.

__ अन् तत्क्षणी तिथे दूर क्षितिजावर द्वितियेची चंद्रकोर अलगद प्रकट झाली. स्वतःशीच हसत...!!

समाप्त..!

धन्यवाद...!

©रूपाली विशे - पाटील
rupalivishepatil@gmail.com

_______________ XXX___________________

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

रानभुली छान वाटलं तुझा पहिला प्रतिसाद पाहून... धन्यवाद..!

धन्यवाद बिपिनजी... शुभेच्छांसाठी आणि प्रतिसादासाठी..!

लावण्या - खूप धन्यवाद..!. ...

ये आसमान ये बादल ये रास्ते ये हवा
हर एक चीज़ है अपनी जगह ठिकाने से
कई दिनों से शिकायत नहीं ज़माने से
ये ज़िंदगी है सफ़र तू सफ़र कि मंज़िल है
जहाँ भी जाऊँ ये लगता है, तेरी महफ़िल है

रूपाली, अभिनंदन! उन्नती डोळ्यासमोर उभी केलीस, तिचे इतके वेगवेगळे mood swings.. पण कुठेही असंबद्ध होत नाही.. संध्याकाळचं वर्णन सुरेखच! पुलेशु

गोड

अज्ञातवासी धन्यवाद.,. थोडासा प्रयत्न करून पाहिला romantic कथा लिहिण्याचा..!

च्रप्स धन्यवाद.. हे गाणं ऐकायला छानच वाटतं.

गौरी, शुभेच्छांसाठी धन्यवाद..!

स्वस्ति, धन्यवाद...!

धन्यवाद किशोरजी..!

पुढील कथा लवकरात लवकर येऊद्या.>>> हो,नक्कीच प्रयत्न करेन... !