नक्षत्रांची शांती - १
लहानपणी मी सुद्धा चारचौंघासारखा आस्तिक होतो. सकाळी उठल्यावर आंघोळ केल्यावर पहिले देवाच्या पाया पडायचो. त्याशिवाय चहा पिणे म्हणजे पाप! घोर पाप!
पाया पडतानाही सर्वात पहिले गणपतीच्या पाया, मग दत्ताच्या, मग साईबाबांच्या, आणि मग सर्वात शेवटी स्वर्गवासी झालेले आजी आजोबा आणि पूर्वजांच्या फोटोंच्या पाया पडायच्या. हा सिक्वेन्स रोज न चुकता पाळला जायचा. मंगळवार गणपतीचा म्हणून त्या दिवशी संध्याकाळी अंजीरवाडीच्या गणपती मंदिरात जाणे कंपलसरी. भले मग दुसर्या दिवशी परीक्षा का असेना. किंबहुना तेव्हा जाणे तर जास्त गरजेचे. नाहीतर देवाचाच शाप!
परीक्षाकाळात गर्दी असल्याने उशीरही व्हायचा. पण तरीही तिथे भिंतीवर लिहिलेली प्रार्थना, बहुधा गणपतीचे स्तोत्र असावे, आता नेमके आठवत नाही. पण ते पुर्ण वाचल्याशिवाय परतायचे नाही हे देखील कटाक्षाने पाळले जायचे. देवाच्या पाया पडतानाही हळदी-कुंकू-तांदूळ-फुले हा क्रम चुकवायचा नाही. तीर्थ घेतल्यावर तो ओला हात केसांवरून मागे फिरवला गेलाच पाहिजे. पेटीत पैसे टाकायचेच. कितीही गर्दी असली आणि मागचे लोकं कितीही ढकलत असली तरी घंटा वाजवल्याशिवाय हलायचे नाही. अन्यथा आपले मागणे देवापर्यंत पोहोचत नाही...
थोडक्यात देवाच्या नावावर जे काही नियम माझ्या माहितीत होते ते कटाक्षाने पाळले जायचे. आपण कितीही हुशार असलो तरी पेपर चांगला जायला त्याआधी कुलदैवतेचे नाव घेणे गरजेचे यावर ठाम विश्वास होता. पाकिटात एका कप्यात अंगारा कायम असायचा. ईतकेच नाही तर मांजर आडवे गेल्यावर क्षणभर थांबून वा मागे वळून बघून मगच पुढे जायचे अश्या अंधश्रद्धाही श्रद्धेसोबत पाळल्या जायच्या.
पण पुढे जसजसे मोठा होऊ लागलो तसे स्वत:लाच प्रश्न पडायला लागले. उत्तरेही मिळत होती. पण ती स्विकारावी ईतके मन कणखर झाले नव्हते. आणि अश्यातच मग एके दिवशी त्र्यंबकेश्वरचा बुलावा आला.
नागबली नारायण! हा विधी त्र्यंबकेश्वरला जाऊनच करायचा होता. तो देखील पुर्ण घराण्याने. म्हणजे केवळ आमचे कुटुंब नाही तर वडिलांच्या पिढीतील सर्व भावंडांनी मिळून. त्यामुळे चार कुटुंबे तीन गाड्या करून त्र्यंबकेश्वरला निघाली. आहाहा, काय धमाल ट्रिप होती ती. ईतका लहान होतो की केवळ हायलाईटसच आठवत आहेत.
सुमो, ट्रॅक्स, क्वालिस वगैरे भाड्याने मिळणार्या गाड्या. आम्ही थांबलेलो ती लॉज. त्यासमोरच्या टपरीवजा हॉटेलवर मिळणारे स्पेशल घरगुती तडका असलेले जेवण. भाकरी आणि तांबाट्याची चटणी हा हिट मेनू आजही लक्षात. संध्याकाळी आपणच बाजारातून भाज्या आणून द्यायच्या आणि ते नवराबायको मस्त जेवण बनवून द्यायचे. चहा आणि कॉफीची टक्कर हा प्रकार पहिल्यांदा तिथेच पाहिलेला आणि चाखलेला. एके ठिकाणी तिखट शेव ईतकी मस्त झणझणीत मिळालेली की मी आणि माझ्या एका बहिणीने बेक्कार हादडलेली. आणि त्यावर सर्वांसाठी घेतलेली दोघांनीच संपवली म्हणून मजबूत ओरडाही खाल्लेला. तिथे खाल्लेले बटाटेवडे आणि तिथल्या मुक्कामाच्या शेवटच्या दिवशी गुरुजींकडे सांग्रसंगीत जेवलेलो टॉपक्लास ब्राह्मणी जेवण. अमृततुल्य!
या सर्व बहुतांश खाण्यापिण्याच्या आठवणींव्यतीरीक्त आठवतेय तर ती त्र्यंबकेश्वरची गोठवून टाकणारी थंडी आणि त्यात एक विधी म्हणून थंड पाण्याच्या कुंडात कुडकुडत करावी लागलेली आंघोळ. नाही म्हणायला मी तिथे थंडीपासून बचाव करायला वापरायचो ती भगवी शाल आठवतेय. जी अंगावर लपेटली की भावंडे मला कौतुकाने स्वामी विवेकानंद म्हणायचे. कदाचित तितका रुबाबदार मी आयुष्यात पुन्हा दिसलो नसेन. कारण दिसण्यावरून मला मिळालेली यापेक्षा बेस्ट कॉम्प्लीमेंट दुसरी आठवत नाही.
गणपतीत पाच दिवसांसाठी सारी भावंडे आमच्या घरी जमायचो ती एक धमाल दरवर्षी असायचीच. पण असे एकत्र फिरणे एक वेगळीच अनुभुती होती. घरच्यांना मात्र ती अनुभुती सुरळीत पार पडलेल्या नागबली नारायणाने दिली होती. त्र्यंबकेश्वरला गेलोय तर शिर्डीलाही जावे हे शास्त्र असते तसे आम्ही तेही पाळले. तिथेच साईबाबांच्या मंदिरात माझा वाढदिवसही साजरा झाला होता. अरे हो की, म्हणजे आम्ही ऑगस्टला गेलो होतो तिथे. त्या वाढदिवसाचाही एक महान किस्सा आहे. पुन्हा कधीतरी माझ्या एखाद्या वाढदिवसालाच सांगेन. पण अश्या या आठवणीतील शिर्डी-त्र्यंबकेश्वर ट्रिपनेच माझ्या मनात उठणार्या काही प्रश्नांना उत्तरे दिली होती.
तर झाले असे होते की आम्ही त्र्यंबकेश्वरहून शेवटच्या दिवशी शेवटचा विधी करून लॉजवर परतत होतो. मी माझ्या आईवडिलांसोबत जरा मागे थांबल्याने आम्ही रिक्षाने येत होतो. विषय हाच चालू होता की सारे विधी कसे सुरळीत पार पडले. त्यात रिक्षावाल्यानेही आपले अनुभव सांगायला सुरुवात केली. कसे आधी ईथे रिक्षाला एक गिर्हाईक मिळायचे वांधे होते. आणि आता कसे भाविकांमुळे त्याचाही धंदा तेजीत आहे. एकापाठोपाठ एक लॉज उघडत आहेत.
मग त्याने आम्हाला विचारले, नेमका कुठला विधी करायला आला होता?. आम्ही म्हटले, नागबली नारायण. त्यावर उत्तर आले, एक नंबर विधी आहे. एकेकाळी ईथले भटजी, जे छोट्याश्या कच्च्या पक्क्या घरात राहायचे त्या सर्वांनी बंगले बांधले हा विधी सुरू झाल्यापासून..
आजही लक्षात आहे त्याचे हे वाक्य जसेच्या तसे. ऐकताक्षणीच दिवा पेटलेला. त्या विधीने आम्हाला काय फायदा झाला कल्पना नाही. कदाचित घरच्यांना मानसिक समाधान मिळालेही असेल. त्यांचे विचार, त्यांची श्रद्धा. अनादर करायचा हेतू नाही. पण त्या विधीनंतर काही वर्षातच आमचे एकत्र कुटुंब प्रॉपर्टीच्या वादावरून दुभंगले हे देखील एक सत्य आहे. ते एक असो, पण त्या दिवशी एक मात्र ठरवले, की आपण उगाच निव्वळ समाधान मिळवायच्या नादात कुठल्याही श्रद्धेच्या आहारी जाऊन दुसर्याचा धंदा वाढवायचा नाही कि दुसर्याचा बंगला बांधायला हातभार लावायचा नाही.
पण शेवटी आपल्या ठरवण्याने काही होते का... काही गोष्टी आपल्या हातात नसतात हेच खरे..
अकलेवर अक्षरशः पडदा पडायची वेळ लवकरच माझ्या आयुष्यात येणार होती..
क्रमश:
---------------------------
पुढचा भाग ईथे
नक्षत्रांची शांती २ - बैल गेला आणि झोपा केला https://www.maayboli.com/node/80784
ओघवणे शब्दनिर्मिती आवडली.
ओघवणे शब्दनिर्मिती आवडली. अशीच भर घालत रहा.
इंग्रजीत pneumonoultramicroscopicsilicovolcanoconiosis असा एक शद्ब आहे. तो तीन चार शब्दांचे एकत्रिकरण करून बनलेला आहे. मराठीत ही सूट असायला हरकत नाही. शब्द आवडला आहे. हा शब्द फुफुसांच्या आजारांशी संबंधित असल्याने मेडीकल टर्म मधे सूट घेता येते असे म्हणता येईल.
Antidisestablishmentarianism हा शब्द १९ व्या शतकातल्या ब्रिटन मधल्या राजकीय चळवळींशी संबंधित आहे. हा अवैद्यकीय शब्द आहे. पण बनवला गेलेला आहे.
( ही कमेण्ट वडे तेलात सोडताना येणार्या आवाजाप्रमाणे ऐकू येणारे शब्द याप्रमाणे लिहीली आहे. असे शब्द अस्तित्वात असतीलच याची खात्री हुषार मायबोलीकर करून घेतीलच म्हणा. वडेवाल्याचे भाषेचे ज्ञान हे फारतर मिर्ची किती तिखट होती, बॅटर घट्ट की पातळ यापलिकडे नसते हे सांगून खाली बसतो).
वावे, मला ओघवते हा शब्द
वावे, मला ओघवते हा शब्द चुकीचा ठरतो असे म्हणायचे होते, चुकून ओघवती झालंय तिथे. वत् प्रत्ययापासून वते असे होणार नाही असे वाटते, तेव्हा ओघवते विशेषण ओघवणे क्रियापद समजून बनवल्या सारखा वाटतो.
पाककृती विभागात हलवायची वेळ
पाककृती विभागात धागा हलवायची वेळ आलेली आहे...
모로걸기 या कोरियन शद्बाचा अर्थ
모로걸기 या कोरियन शद्बाचा अर्थ ओघवणे असा दिला आहे.
모로걸기
(मार्शल आर्टमधे) प्रतिस्पर्ध्याला अचानक समोरच्या बाजूला आणल्यानंतर, प्रतिस्पर्ध्याच्या फुलाच्या बाजुच्या बाहेरील बाजुला जोरदारपणे त्याच पायाने झाकून आणि शरीर गालाकडे वळून जाते. कॉर्नफिल्डमध्ये बाजूला पडणे, बेस ड्रॉप करणे, कमर सोडणे, कमर विरघळणे, बाहेर ओघवणे, फेरी मारणे, कडेकडेने बिछाना, घेर फेकणे, कमर वळवणे .
ओबिंडु या एका भाषेत ओघवणे चा अर्थ पाण्याचा प्रवाह वळवणे असा होतो. ही भाषा कुठे बोलली जाते हे मायबोलीकरांना सांगण्याची (शिकवण्याची) गरज नाही.
च्रप्स
च्रप्स
पैशाचा ओघ वळवणे याला एक जर्मन
पैशाचा ओघ वळवणे याला एक जर्मन शब्द वापरला आहे. त्याचा अर्थ एका शैक्षणिक संस्थळावर ओघवणे असा दिला आहे. हा शब्द कुठेही कसाही ओघवता येतो.
https://educalingo.com/mr/dic-de/einschleifen
उदा. :
Auch das schrittweise Einschleifen von Direktzahlungen an die Landwirte in den Beitrittsländern - vor allem Polens - macht Sinn.
इंग्रजी भाषांतर
The progressive introduction of direct payments to farmers in the candidate countries - primarily Poland - also makes sense.
चांगला आहे लेख पण धाग्याचे
चांगला आहे लेख पण धाग्याचे नाव आणि आतला मजकूर यांचा संबंध काही उमगला नाही. क्रमशः आहे म्हणजे पुढच्या भागात नक्षत्र शांतीच्या गमती आहेत का ?
चांगलाय लेख. फोटो झक्कास.
चांगलाय लेख. फोटो झक्कास. परीला एक गोड पापा दे माझ्या कडून
चांगली चर्चा चालू आहे.
चांगली चर्चा चालू आहे.
ओघळणे वेगळं क्रियापद आहे. त्यावरून विशेषण ओघळता असं होईल. त्या ळ चा व होणार नाही.
मानव दादांनी चांगला मुद्दा काढला. असा शब्द शब्दकोशात आहे का माहीत नाही. ओघवणे हे कर्मणि क्रियापद भासते. जसं चालणे आणि चालवणे तसं ओघणे आणि ओघवणे. मुळात ओघणे असं काही नाही, त्यामुळे ओघवणे असेल का? ओघवती वाणी असा शब्दप्रयोग ऐकला आहे, पण तो कसा तयार झाला हे पाहायला हवं. वत् प्रत्यय ह्यात नक्की नाही, एवढं सांगू शकतो.
अवांतरात अवांतर (पराग अवांतर):
सरस्वती - हा शब्द वत् प्रत्ययापासून बनला आहे. अनेक तलावांनी (सरस्) युक्त अशी सरस्-वती नदी होती. तिच्या पाण्याच्या प्रचंड ओघामुळे आणि नादामुळे ती (ओघवत्या?) वाणीची देवता झाली.
हपा - तुमच्या पोस्ट्स वाचून
हपा - तुमच्या पोस्ट्स वाचून मला एका सदस्याची आठवण होते. पण काही केल्या नाव आठवेना.
मराठी भाषा ही संस्कृतोद्भव
मराठी भाषा ही संस्कृतोद्भव मराठी पेक्षा जुनी आहे. त्यामुळे शब्दांची उत्पत्ती संस्कृत भाषेच्या चौकटीतच बसवायची झाली तर बरेचसे शब्द टाकून द्यावे लागतील. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी कमी पडणाया शब्दांसाठी शौरसेनी, पाली यातून आलेल्या शब्दांचा आधार घ्यावा लागला होता.
ओघ वळवणे या शब्दाचे ओघवणे असे सुटसुटीकरण होण्यास हरकत नसावी. शेवटी भाषा काळानुरूप आणि मैलागणिक बदलतेच. नियम सुद्धा बदलतील.
किंवा ऋन्मेषची हरकत नसल्यास
किंवा ऋन्मेषची हरकत नसल्यास इथेच...
>>>
छे हो. माझी कसली हरकत. माझे त्या थ्री ईडियटसमधील रांचोसारखे आहे. सब जगह ज्ञान बटता है. जहासे मिलता है ले लो. मीच तर सर्वप्रथम त्या ओघवान शब्दातील पोटेंशिअल ओळखले होते
@ धाग्याचे शीर्षक आणि क्रमश:
@ धाग्याचे शीर्षक आणि क्रमश:
तर येत्या भागांमध्ये शीर्षकाचा उलगडा होईलच. विश्वास ठेवा.
क्रमश:ची कल्पना शीर्षकात दिली नसली तरी या भागात एक अनुभव / किस्सा पुर्ण झाला आहे.
गलन म्हणजे ठिबकणे, गळणे.
गलन म्हणजे ठिबकणे, गळणे. अवगलन म्हणजे खाली गळणे, ओघळणे, पाझरणे.
वह वहति = वाहाणे. To flow.
आताशी फ्लो चार्ट साठी ओघतक्ता असा शब्द वापरतात.
ता. क. भाग्यवती मी भाग्यवती असे एक मराठी चित्रपट गीत होते.
आणखी ता. क. : ओघवणे हा शब्द जरी आज अस्तित्वात नसला तरी तो वापरात आणता येईल. तेव्हढीच आपली भाषा समृद्ध होईल. फक्त ह्या शब्दाची ओढवणे ह्या शब्दाशी गल्लत होऊ नये.
आपण मराठीत असे नवीन शब्द
आपण मराठीत असे नवीन शब्द चालवून घेतो. उदाहरणार्थ, 'गरजवंताला अक्कल नसते' ह्यात गरजवंत - हा गरज + वतुप् (वत्) पासून बनला आहे. संस्कृत मूळ नसलेल्या गरज ह्या शब्दाला प्रत्यय मात्र संस्कृत वापरला गेला आहे. हे मजेशीर आहे. त्यातही गरजवान असं न म्हणता वंत म्हणजे संस्कृतात तो बहुवचनी प्रत्यय होतो, तो एकवचनी म्हणून वापरला आहे. आपण भगवंत हा शब्दसुद्धा एकवचनी वापरतो, जो खरं तर भगवानचं बहुवचन आहे. अशा मजा मजा होत असतात. भाषा प्रवाही आहे, म्हणून तर टिकून आहे.
छानच लिहिलयं....
छानच लिहिलयं....
शीर्षक बदलून नक्षत्रांची
शीर्षक बदलून नक्षत्रांची शांती - १ केले आहे. जेणेकरून वाचणार्यांना क्रमशः आहे हे कळेल. बाकी काही बदल नाही. पुढचा भाग लवकरच...
पण त्या विधीनंतर काही वर्षातच
पण त्या विधीनंतर काही वर्षातच आमचे एकत्र कुटुंब प्रॉपर्टीच्या वादावरून दुभंगले हे देखील एक सत्य आहे.>>>
अरे! असेच झाले आमच्या कुटुंबात . 2 वर्षात. फक्त प्रॉपर्टीचा वाद न होता दुसरे काही कारण होते. माझ्या मावशीच्या घरचा देखील असाच अनुभव. अर्थात हा योगायोग असणार.
कोणाला घाबरवायचा हेतू नाही पण
कोणाला घाबरवायचा हेतू नाही पण नारायण नागबळीचा विधी करून आल्यावर काही महिन्यांतच घरात एखादा मृत्यु झाल्याची चार उदाहरणे (त्यातले एक आमचे स्वतःचे आहे) बघितली आहेत. योगायोगही असेल.
अर्थात हा योगायोग असणार.
अर्थात हा योगायोग असणार.
>>>>
हो नक्कीच. अन्यथा ती देखील एक अंधश्रद्धाच झाली की नागबली नारायणामुळे काहीतरी वाईट घडते.
पण यावरून असे तरी म्हणू शकतो की या विधीमुळे कुटुंबाचे कल्याण होते हे चुकीचे आहे.
यावर समर्थन करणार्यांचे एक
यावर समर्थन करणार्यांचे एक टिपिकल उत्तर असते. याहूनही वाईट घडू शकले असते. जीवावर बेतलेले ते शेपटीवर निभावले. किंवा मग आपण आपले प्रयत्न केले. पण जे नियतीच्या मनात होते तेच झाले.
मला वाटतं विधी केला तर करून
मला वाटतं विधी केला तर करून मनातून सोडून द्यावा.करायचा नसेल तर कोणाला विचारूच नये(म्हणजे पत्रिका दाखवून.)उगीच मनात ती निगेटिव्ह भीती नको.
सर्व व्यवसायांचा मूळ पाया कोणाची तरी भीती आणि आपण त्यावर योग्य तोडगा देत असल्याचे आश्वासन हा असतो.गॅस तपासायला येणारा चार ठिकाणी काड्या पेटवून बटन किंवा सुरक्षा नळी बदलायला लावतो.आम्ही गिऱ्हाईकांना 'प्रायव्हेट क्लाऊड घ्या साहेब, महाग पडेल पण झकास सिक्युरिटी' सांगतो.गाडी सर्व्हिसिंग ला दिल्यावर एका छोट्या भागा ऐवजी पूर्ण ब्रेक वायर असेंम्बली बदलायला लावतात.तसेच हे अभिषेक, महापूजा,नागबळीचे, अमकया क्रिस्टल, तमका पिरॅमिड, अमका जेमस्टोन विकायचे बिझनेस.प्रत्येकाला पोट आहेच.1 खोली कडून बंगला ही वाटचाल,भरभराटीची महत्वाकांक्षा प्रत्येकाच्याच मनात आहे.ही करताना लोकांच्या अंगावर पाय ठेवून, गळे कापून पुढे जाणे किंवा न जाणे हे प्रत्येकाच्या स्वभावानुसार.
करायचा नसेल तर कोणाला विचारूच
करायचा नसेल तर कोणाला विचारूच नये(म्हणजे पत्रिका दाखवून.)उगीच मनात ती निगेटिव्ह भीती नको.
>>>>>
+७८६
या मालिकेतील तिसर्या वा चौथ्या भागात हा मुद्दा येणारच आहे.
त्या निषेध धाग्यावरही मी प्रेमविवाहात पत्रिका बघणार्यांचा निषेध केला आहे ते याचसाठी.
ह्या असल्या पत्रिका
ह्या असल्या पत्रिका प्रकारावरून मी घरी भांडणे केलीत आजीबरोबर. आणि तिच्या ईच्छेनुसारच असायचे , त्यामुळे आई बाबा काहीच करु शकत न्हवते.
मला कुठलीतरी पूजा करायला सांगितलेली. आजीशी बरेच वाद केले आणि नाशिकला गेले. आणि पूजा चालू असतानाच मध्येच पाळी आली. आजीने, अक्ख्या प्रवासात इतकं एकवलं की नकोसे करून रस्त्याभर आमच्या वादाने बाबा कंटाळलेले इतकच आठवतं.
आजीचे म्हणणं असे की , ईच्छा नसताना गेलीस , म्हणून पाळी आली अचानक. खरे तर मलाही तारखेच्या आतच पाळी आली म्हणून कमाल वाटलेली. पण मी इतकाच विचार केला, अर्धवट झोप, नको तेवढे वाद, वगैरे स्ट्रेसने झालं असेल.
बाकी, तिकडच्या भटजी लोकांची ती घरं आणि सर्वांच्या भावना लुबाडून गोळा केलेले, साहित्य इतके होते खोलीभर एका भटजीकडे की अचंबित झाले. ते खच्चून खोलीत भरलेले नारळ, साड्या, ओटी पीस, फळं, तांदूळाच्या पोती, डाळी, सुका मेवा पाकिटं, तीळाच्या पिशव्या. ज्या भटजींकडे उतरलेलो त्यांच्या त्या खोलीत चूकून गेले तश्या भटजीण बाई पळत पळत मागे आल्या.
त्याच त्र्यंबकेश्वराच्या भटजीने काय काय सांगितले, मुलगी लग्न करणार नाही, साध्वी बनेल. तुमचे एकणार नाही.(आजीच्या आठ्य पाहूनच अंदाज काढला असेल भटाने). काय नी काय..
लग्न वगैरे झालं तेव्हा भटजीला चोपायला जायला हवे होते. सोडला तो विचार... भरपूर लुबाडलेले आम्हाला. साडी, खण वगैरे, भरपूर पैसे, वगैरे. आजीने त्यानंतर पण कैक पुजा केल्या माझ्या लग्नासाठी. त्या काळात, २०००० वगैरे दिलेत. तिचे म्हणन्र होतं कि पूजा केल्याने माझं लग्न झालं. मला काही असं वाटत नाही. प्रेमविवाह केला उलट.
भटजीने सांगितलेले की, बिन्लग्नाची मुलगी गेलीय तुमच्या घराण्यात. म्हणून आजीचा खटाटोप होता.
इतकं खोटं
आजीचे म्हणणं असे की , ईच्छा
आजीचे म्हणणं असे की , ईच्छा नसताना गेलीस , म्हणून पाळी आली अचानक.
>>>>
या प्रकारचे संवाद म्हणा वा टोमणे म्हणा, लहानपणी सुरुवातीला मी सुद्धा ऐकले आहेत. पण जेव्हा घरच्यांनी स्विकारले की आपल्या मुलाने आता आपल्या विचारांनी आता कश्यावर श्रद्धा ठेवावी कश्यावर नाही हे ठरवलेय तर त्यांचेही संवाद बदलले. विश्वास नसेल/ईच्छा नसेल तर नाही केलेस तरी चालेल, किंवा विश्वास असेल तरच कर अन्यथा फळ मिळणार नाही वगैरे म्हणू लागले.
पाळीबाबतचे नियम लहानपणीही पटले नव्हते. जेव्हा माझी आई अडचण आहे म्हणत एखाद्या कार्यात वेगळी राहायची तेव्हा तिच्याबद्दल फार वाईट वाटायचे.
यंदा सोसायटीच्या गणपतीला लेकीच्या एका मैत्रीणीची आई याच कारणास्तव तिचा डान्स बघायला खाली आली नाही. नाचायची जागा गणपतीच्या शेजारीच होती. तर आम्ही सांगितले की बाजूला उभे राहा, दुरून बघा. पण आपल्यामुळे ईतरांच्या श्रद्धा/भावना दुखावायला नको म्हणून त्या खालीच आल्या नाहीत. यावर आता आम्ही काय बोलणार होतो. कोण काय विचार करते आणि काय रिॲक्ट करेल याची ग्यारंटी आम्ही तरी कशी देणार होतो. त्यांची मुलगी बिचारी रडत होती. आठवडाभर घरी प्रॅक्टीस करत होती पण फायनल शो बघायला आईच नाही.
Pages