नक्षत्रांची शांती - १

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 December, 2021 - 16:23

नक्षत्रांची शांती - १

लहानपणी मी सुद्धा चारचौंघासारखा आस्तिक होतो. सकाळी उठल्यावर आंघोळ केल्यावर पहिले देवाच्या पाया पडायचो. त्याशिवाय चहा पिणे म्हणजे पाप! घोर पाप!

पाया पडतानाही सर्वात पहिले गणपतीच्या पाया, मग दत्ताच्या, मग साईबाबांच्या, आणि मग सर्वात शेवटी स्वर्गवासी झालेले आजी आजोबा आणि पूर्वजांच्या फोटोंच्या पाया पडायच्या. हा सिक्वेन्स रोज न चुकता पाळला जायचा. मंगळवार गणपतीचा म्हणून त्या दिवशी संध्याकाळी अंजीरवाडीच्या गणपती मंदिरात जाणे कंपलसरी. भले मग दुसर्‍या दिवशी परीक्षा का असेना. किंबहुना तेव्हा जाणे तर जास्त गरजेचे. नाहीतर देवाचाच शाप!

परीक्षाकाळात गर्दी असल्याने उशीरही व्हायचा. पण तरीही तिथे भिंतीवर लिहिलेली प्रार्थना, बहुधा गणपतीचे स्तोत्र असावे, आता नेमके आठवत नाही. पण ते पुर्ण वाचल्याशिवाय परतायचे नाही हे देखील कटाक्षाने पाळले जायचे. देवाच्या पाया पडतानाही हळदी-कुंकू-तांदूळ-फुले हा क्रम चुकवायचा नाही. तीर्थ घेतल्यावर तो ओला हात केसांवरून मागे फिरवला गेलाच पाहिजे. पेटीत पैसे टाकायचेच. कितीही गर्दी असली आणि मागचे लोकं कितीही ढकलत असली तरी घंटा वाजवल्याशिवाय हलायचे नाही. अन्यथा आपले मागणे देवापर्यंत पोहोचत नाही...

थोडक्यात देवाच्या नावावर जे काही नियम माझ्या माहितीत होते ते कटाक्षाने पाळले जायचे. आपण कितीही हुशार असलो तरी पेपर चांगला जायला त्याआधी कुलदैवतेचे नाव घेणे गरजेचे यावर ठाम विश्वास होता. पाकिटात एका कप्यात अंगारा कायम असायचा. ईतकेच नाही तर मांजर आडवे गेल्यावर क्षणभर थांबून वा मागे वळून बघून मगच पुढे जायचे अश्या अंधश्रद्धाही श्रद्धेसोबत पाळल्या जायच्या.

पण पुढे जसजसे मोठा होऊ लागलो तसे स्वत:लाच प्रश्न पडायला लागले. उत्तरेही मिळत होती. पण ती स्विकारावी ईतके मन कणखर झाले नव्हते. आणि अश्यातच मग एके दिवशी त्र्यंबकेश्वरचा बुलावा आला.

नागबली नारायण! हा विधी त्र्यंबकेश्वरला जाऊनच करायचा होता. तो देखील पुर्ण घराण्याने. म्हणजे केवळ आमचे कुटुंब नाही तर वडिलांच्या पिढीतील सर्व भावंडांनी मिळून. त्यामुळे चार कुटुंबे तीन गाड्या करून त्र्यंबकेश्वरला निघाली. आहाहा, काय धमाल ट्रिप होती ती. ईतका लहान होतो की केवळ हायलाईटसच आठवत आहेत.

सुमो, ट्रॅक्स, क्वालिस वगैरे भाड्याने मिळणार्‍या गाड्या. आम्ही थांबलेलो ती लॉज. त्यासमोरच्या टपरीवजा हॉटेलवर मिळणारे स्पेशल घरगुती तडका असलेले जेवण. भाकरी आणि तांबाट्याची चटणी हा हिट मेनू आजही लक्षात. संध्याकाळी आपणच बाजारातून भाज्या आणून द्यायच्या आणि ते नवराबायको मस्त जेवण बनवून द्यायचे. चहा आणि कॉफीची टक्कर हा प्रकार पहिल्यांदा तिथेच पाहिलेला आणि चाखलेला. एके ठिकाणी तिखट शेव ईतकी मस्त झणझणीत मिळालेली की मी आणि माझ्या एका बहिणीने बेक्कार हादडलेली. आणि त्यावर सर्वांसाठी घेतलेली दोघांनीच संपवली म्हणून मजबूत ओरडाही खाल्लेला. तिथे खाल्लेले बटाटेवडे आणि तिथल्या मुक्कामाच्या शेवटच्या दिवशी गुरुजींकडे सांग्रसंगीत जेवलेलो टॉपक्लास ब्राह्मणी जेवण. अमृततुल्य!

या सर्व बहुतांश खाण्यापिण्याच्या आठवणींव्यतीरीक्त आठवतेय तर ती त्र्यंबकेश्वरची गोठवून टाकणारी थंडी आणि त्यात एक विधी म्हणून थंड पाण्याच्या कुंडात कुडकुडत करावी लागलेली आंघोळ. नाही म्हणायला मी तिथे थंडीपासून बचाव करायला वापरायचो ती भगवी शाल आठवतेय. जी अंगावर लपेटली की भावंडे मला कौतुकाने स्वामी विवेकानंद म्हणायचे. कदाचित तितका रुबाबदार मी आयुष्यात पुन्हा दिसलो नसेन. कारण दिसण्यावरून मला मिळालेली यापेक्षा बेस्ट कॉम्प्लीमेंट दुसरी आठवत नाही.

गणपतीत पाच दिवसांसाठी सारी भावंडे आमच्या घरी जमायचो ती एक धमाल दरवर्षी असायचीच. पण असे एकत्र फिरणे एक वेगळीच अनुभुती होती. घरच्यांना मात्र ती अनुभुती सुरळीत पार पडलेल्या नागबली नारायणाने दिली होती. त्र्यंबकेश्वरला गेलोय तर शिर्डीलाही जावे हे शास्त्र असते तसे आम्ही तेही पाळले. तिथेच साईबाबांच्या मंदिरात माझा वाढदिवसही साजरा झाला होता. अरे हो की, म्हणजे आम्ही ऑगस्टला गेलो होतो तिथे. त्या वाढदिवसाचाही एक महान किस्सा आहे. पुन्हा कधीतरी माझ्या एखाद्या वाढदिवसालाच सांगेन. पण अश्या या आठवणीतील शिर्डी-त्र्यंबकेश्वर ट्रिपनेच माझ्या मनात उठणार्‍या काही प्रश्नांना उत्तरे दिली होती.

तर झाले असे होते की आम्ही त्र्यंबकेश्वरहून शेवटच्या दिवशी शेवटचा विधी करून लॉजवर परतत होतो. मी माझ्या आईवडिलांसोबत जरा मागे थांबल्याने आम्ही रिक्षाने येत होतो. विषय हाच चालू होता की सारे विधी कसे सुरळीत पार पडले. त्यात रिक्षावाल्यानेही आपले अनुभव सांगायला सुरुवात केली. कसे आधी ईथे रिक्षाला एक गिर्‍हाईक मिळायचे वांधे होते. आणि आता कसे भाविकांमुळे त्याचाही धंदा तेजीत आहे. एकापाठोपाठ एक लॉज उघडत आहेत.

मग त्याने आम्हाला विचारले, नेमका कुठला विधी करायला आला होता?. आम्ही म्हटले, नागबली नारायण. त्यावर उत्तर आले, एक नंबर विधी आहे. एकेकाळी ईथले भटजी, जे छोट्याश्या कच्च्या पक्क्या घरात राहायचे त्या सर्वांनी बंगले बांधले हा विधी सुरू झाल्यापासून..

आजही लक्षात आहे त्याचे हे वाक्य जसेच्या तसे. ऐकताक्षणीच दिवा पेटलेला. त्या विधीने आम्हाला काय फायदा झाला कल्पना नाही. कदाचित घरच्यांना मानसिक समाधान मिळालेही असेल. त्यांचे विचार, त्यांची श्रद्धा. अनादर करायचा हेतू नाही. पण त्या विधीनंतर काही वर्षातच आमचे एकत्र कुटुंब प्रॉपर्टीच्या वादावरून दुभंगले हे देखील एक सत्य आहे. ते एक असो, पण त्या दिवशी एक मात्र ठरवले, की आपण उगाच निव्वळ समाधान मिळवायच्या नादात कुठल्याही श्रद्धेच्या आहारी जाऊन दुसर्‍याचा धंदा वाढवायचा नाही कि दुसर्‍याचा बंगला बांधायला हातभार लावायचा नाही.

पण शेवटी आपल्या ठरवण्याने काही होते का... काही गोष्टी आपल्या हातात नसतात हेच खरे..
अकलेवर अक्षरशः पडदा पडायची वेळ लवकरच माझ्या आयुष्यात येणार होती..

क्रमश:
---------------------------

पुढचा भाग ईथे
नक्षत्रांची शांती २ - बैल गेला आणि झोपा केला https://www.maayboli.com/node/80784

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो फिरणे हा एक अनुभव आहे. तो अनुभव घेताना मिळालेली अनुभुती असे काहीसे म्हणायचे होते. पण झोप आल्याने शॉर्टकट मारला. तुर्तास शुभरात्री. तुमचा प्रतिसाद आला म्हणजे झोपायला जाऊ शकतो. सकाळी जाणकारांचे शब्द सर आंखो पे Happy

मस्त.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत

धन्यवाद प्रतिसादांचे..

@ हीरा,
ओघवान असा शब्द आहे का? की तुम्हीच ओघवते आणि वेगवान जोडून बनवला आहे. कॉपी पेस्ट करून गूगल केले तर सर्चमध्ये सारे राघवन आले Happy

छान लिहिलयं....
पुढील भागाच्या प्रतिक्षेत..!

वत् हा संस्कृत प्रत्यय अकारांत शब्दांसाठी वान बनतो. गुणवान, चारित्र्यवान, धनवान ऐश्वर्यवान भाग्यवान वगैरे. तसेच ओघवान. ओघ असलेले, प्रवाही, चांगला flow असलेले. स्त्रीलिंगीरूप ओघवती असे होते. जसे, ओघवती वाणी. (ओघवत्या वाणीने लोकांना आकर्षित केले, ओघवत्या भाषेत लिहिलेले वगैरे).

ओघ ह्या नामापासून वत् लागून विशेषणे बनतात. हे बंबई हिंदीतल्या ' वाला ' सारखे आहे. उदा. रद्दीवाला, भांडीवाली, इस्त्रीवाला, दूधवाला कुल्फीवाला वगैरे.

माझ्या पत्रिकेत काळसर्प योग लिहीलेला त्यामुळे हे मलाही माझ्या आज्जीमुळे करायला लावलेलं..
आम्ही एका मठात थांबलेलो..मठ नविनच होता, जेवण साधं व छान होतं त्यामुळे तीथे रहायला मजा आलेली पण सकाळी ५ वाजता त्या पाण्याच्या कुंडापाशी जायला जीवावर आलेलं.. आईने पाणी डोक्यावर घ्यायला पूर्ण मनाई केलेली त्यामुळे वाचले..
आणि हो, आम्ही ३ सप्टेंबरला गेलेलो. इतकं आठवतंय कारण एकाच आठवड्यात मी चेन्नईला शिफ्ट झाले आणि कधी नव्हे ते सुरूवातीच्या पहिल्या तीन महिन्यांतच स्कुटीवरून दोन अपघातही झाले.. हे बहुतेक त्र्यंबकेश्वरला पाणी डोक्यावरून न घेतल्यामुळे झालं असावं Proud

जातकाच्या पत्रिकेतील कालसर्पयोग हा ज्योतिषी व पुरोहितांच्या पत्रिकेत धनलक्ष्मी योग असतो. अनेक लोक त्यावर विश्वास नसला तरी विषाची परिक्षा कशाला घ्या म्हणून नारायण नागबली करतात. उगा डोक्यात किडा नको. नै का!

छान

धन्यवाद नवीन प्रतिसादांचे

@ हिरा, कहासे लाते हो ईतना व्याकरण.. Happy माहितीबद्दल धन्यवाद

डिपी काय खल्लास आहे! >> धन्यवाद.. विचार करतोय आता लगेच बदलून माझा फोटो लावावा Wink

हे बहुतेक त्र्यंबकेश्वरला पाणी डोक्यावरून न घेतल्यामुळे झालं असावं Proud
>>>>

शक्य आहे. या नोंदी झाल्या पाहिजेत. येणाऱ्या पिढीला फायदा होऊ शकतो. ज्यांचा यावर विश्वास आहे त्यांना उपयोगाचे ठरेल.

अनेक लोक त्यावर विश्वास नसला तरी विषाची परिक्षा कशाला घ्या म्हणून नारायण नागबली करतात. उगा डोक्यात किडा नको. नै का!
>>>>

खरंय. म्हणजे सर्दी खोकला आहे तर कोरोनाही असू शकतो. टेस्ट करून घ्या. उगाच डोक्यात किडा कशाला Happy

छान.

हिरा मस्त शब्द ओघवान, आवडला मला.

मानव यांचं बरोबर आहे. ओघवणे ह्यापासून धातूसाधित विशेषण ओघवता ओघवते ओघवती झाले आहेत.

लिखाण नपुंसकलिंगी शब्द असल्यामुळे ते ओघवते/ओघवतं होईल.

वत् ह्या संस्कृत प्रत्ययापासून जे शब्द बनतात, त्यात संस्कृतप्रमाणे वान्/वती/वत् असा लिंगभेद मराठीत वापरतीलच असं काही सांगता येत नाही. उदाहरणार्थ एखादी स्त्री 'मी स्वतःला भाग्यवान समजते' असं म्हणू शकेल. ती 'भाग्यवती' म्हणण्याची शक्यता कमी. महान/महती/महत् हा भेदही मराठीत नाही.

तरी ओघवान हा नवीन शब्द (नवीन असल्यास) असायला हरकत नाही. छान आहे. ओघवती वाणी ह्या प्रयोगात मात्र तो वत् प्रत्यय नाहीये.

बाकी पटलं पण - ती 'भाग्यवती' म्हणण्याची शक्यता कमी. >> हेचि फळ काय मम तपाला झालं ना ओ ... आयुष्यभर नावापुढे सौ. लावतात बाया ते काय सौ सुनार की एक लुहार की मधलं सौ असतयं होय....

सी Lol

हा हा, सी! सौभाग्यवती आहे, पण नुसतं भाग्यवती नाही ऐकलं कधी. हिंदीत पण (चाचा चौधरी वाचून आलेलं हे माझं अगाध ज्ञान) बायकोला 'अरी भागवान' वगैरे म्हणतात.

छान लिहिले आहे. आमच्याकडेही चुलत सासरी सुचवले होते नारायण नागबळी, पण जगभर विखुरलेल्या भावकीला एकत्र आणून करणे अशक्य होते. त्यात विश्वास नसलेले मेम्बर अधिक आहेत. मी स्वतः सुद्धा हालअपेष्टा/धक्काबुक्की सहन करून दर्शनाला जात नाही. निरर्थक वाटतं..!!

सी Lol
ओघवते प्रतिसाद आलेत. Wink

नारायण नागबळी आणि नक्षत्रांची शांती यांचा काय संबंध आहे ?
ललित असले तरी फिल्मी आहे. थोडा व्यत्यय आला तरी येऊ द्या. पण याच्यावर चित्रपट किंवा मालिका बनेल.

(लॅपटॉप दुरूस्तीला गेल्याने उशिरा आलो. क्षमस्व )

खूप अवांतर होतेय इथे, पण हरचंद, भरत म्हणतात ओघवणे (क्रियापद) असा शब्द मराठीत नाही. त्यामुळे "ओघवती" हा शब्दच चूकीचा ठरतो. लोक वापरत असतील असे क्रियापद पण तसा मूळ शब्द नसेल. तुमच्याकडे हा शब्द कुठल्या शब्दकोशात असल्याचा दुवा आहे का?
इतरत्र कुठे यावर पुढे चर्चा करता येईल, किंवा ऋन्मेषची हरकत नसल्यास इथेच.

मराठीत ओघळणे क्रियापद आहे उदा: मोत्याचा सर ओघळला. त्यावरून आहे का?
https://youtu.be/eseceTRMzcU
चितेकी चाल, बाझ की नजर और ऋन्मेष के धागे पर संदेह नही करते... कभीभी शतक पार कर सकते है...

ओघवती शैली म्हणतात , ओघवान हे विशेषण असावे का वेगवान सारखे, क्रियापद नसावे कदाचित... संभ्रम आहे खरं पण शब्द आवडलायं !

Pages