(पूर्वाध जाणून घेण्य़ासाठी खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी मारावी
https://www.maayboli.com/node/80659 )
नीलम ला कदाचित जाणिव नव्हती.
भय म्हणजे काय हे नेमकं तिला समजलेलं नसावं. अज्ञात शक्तींची भीती हेच भय असतं का ?
आणि ते जे आतमधे ठाण मांडून बसतं ते ?
अपमान, राग, तिरस्कार, द्वेष, चीड, संताप, निराशा यातून जे जन्माला येतं ते ते काहीतरी. ज्याला उसळी मारून वर येऊ नये म्हणून प्रयत्न करावा लागतो, त्याचे भय नसते ?
सूडाची भावना ही भयकारी नसते ?
मनात एखादा विचार डोकावावा आणि नाहीसा होण्याऐवजी तो त्या पातळ पापुद्यावर रंगासारखा पसरत जावा, त्या पापुद्र्याचा मूळ रंगच नाहीसा व्हावा आणि मग ते झटकून टाकताना आणखीच गडद होत जावं तसे हल्ली काही विचार तिच्या मनात येत. असे विचार ताबा घेतील ही भीतीही तिच्या नकळत जन्म घेत होती. दृश्य पातळीवर तिने ते कधीच मान्य केलं नसतं. जणू मनाचा हा कप्पा कधीच तिचा नव्हता.
पण असं नाकारून चालतं का ?
यातून येणारी अस्वस्थता, चीडचीड याने फक्त नकारात्मकता तिच्या वाट्याला येत होती.
आपली काहीही चूक नसताना आपल्याचा वाट्याला हे सर्व का यावं ? आणि त्यातून बाहेर पडायचा मार्ग सापडत नसल्याने ती आतल्या आतल्या कुढत राहत होती. त्या चक्रव्यूहातच फिरताना बाहेरच्या जगातल्या घटना तिला डिस्टर्ब करत होत्या.
बाह्य जगातल्या व्यक्ती तिला डीस्टर्ब करत होत्या. त्यांच्याशी कुठलाही संवाद साधताना या आतल्या जगातून लक्ष काढून घेऊन संवाद साधण्यासाठी लक्ष पुरवणे नकोसे वाटत होते. म्हणून तिला कुणीही नको होतं.
लोक म्हणतात एकटे मन सैतानाचे घर.
पण या मनाचे व्यापार तरी किती. त्याचा पत्ता लागला तर मग वेळ पुरत नाही.
मनाने जर एखादी सृष्टी उभारली असेल.
ते आपल्याला काही दाखवत असेल तर ?
ते काय दाखवेल ?
ते सुद्धा आपल्याच मनाची उपज असेल ना ?
आपल्याला हवे तेच दाखवेल ना ?
आणि मग पुन्हा पुन्हा अपमानाची जाणिव व्हायची. पुन्हा संताप.
त्या आगीत ती जळत होती.
ही आग शांत करायचा ती खूप प्रयत्न करत होती.
विसरून जा म्हणणे किती सोपे. सगळे तेच तर म्हणत होते. त्यातून गेल्याशिवाय समजत नाही.
त्याने किमान स्पष्टीकरण द्यायला तरी यायला हवे होते. तिलाच त्याचा पिच्छा करावा लागला होता.
तो म्हणाला कि " आपल्याकडून चूक होतेय. जुने लोक, इतरांचेही ऐकायला हवे. आपला जोडा शोभणार नसेल तर आयुष्यभर लोक बोलणार. त्याचा आपल्यावर परिणाम होणार नाही असे खरेच वाटते का तुला ? "
" लोकांशी आपल्याला संसार करायचाय कि तुला माझ्याशी आणि मला तुझ्याशी संसार करायचाय ? लोक काय म्हणतात याच्याशी आपल्याआ काय घेणं देणं ?"
तिच्या प्रश्नांवर त्याच्याकडे उत्तरं नव्हती. पण तो मान हलवत राहिला. त्याला पटवूनच घ्यायचं नसेल. लोकांच्या आडून त्याला आता सांगायचं होतं.
"तू बेढब आहेस. मी किती स्मार्ट आहे. मला तू शोभत नाहीस". लोकांच्या आडून हेच सुचवायचं होतं का ?
मग इतकी वर्षे समजलं नाही ?
त्याला नकार द्यायचा होता तर किती तरी मार्ग होते.
नकाराचं वाईट वाटलं असतंच. राग आलाच असता. पण अपमान ?
गावाने केलेल्या मदतीने नीलम दबावाखाली आली होती. दीड महिना होत आला होता एव्हाना.
पावसाचे दिवस सुरू झाले होते.
आता हळू हळू दिवस लहान होत जाणार होता.
तिकडे जाऊन येणे नंतर जमणारे नव्हते.
एक अनामिक हुरहूर तिच्या मनात जन्म घेत होती.
जिज्ञासा !
त्या घराबद्दलचे कुतूहल ?
कि ओढ ?
कि अन्य काही ?
ती त्या घराशी बांधली गेली होती बहुतेक. असं काहीतरी अनामिक तिथे होतं जे तिच्या मनाच्या अस्वस्थतेला खुणावत होतं.
कदाचित तिला तिथे शांतता मिळणार असेल.
कदाचित अनेक उत्तरं मिळणार असतील.
आपल्याला जायला हवं ही जाणिव प्रबळ होत चालली होती.
*****************************************************
आज कमी वेळ लागला डोंगरापलिकडे यायला. आता झरा ओलांडायचा.
चिंचा, बोरं, बाभळीचं रान आहे. दुसरी रांग पाठीमागून तिरकी येते. या त्रिकोणात पुढे पुढे जात रहायचं. एक छोटी टेकडी या तिरक्या डोंगररांगेला एक कोन करते. पण दोन्हीमधे अंतर असल्याने खिंड तयार झाली आहे.
खिंडीतून पुढे आलं की..
रानमाळ लागतं.
रानमाळावरचं हे आंब्याचं झाडं नजरेत भरतं. नजरबांधी होऊन जाते.
पावलं आपोआपच झाडाकडे वळतात.
तिथेच तर आहे हे घर.
आपण जसं वाचलं तसंच तर आहे सगळं. तपशीलात किंचितसा फरक असेल.
ते घर मातकट रंगाचं, मातीचंच की, असणार आहे.
नीलम आता संमोहित झाल्याप्रमाणे चालत होती.
नकारात्मक वागण्यातून नकारात्मक गोष्टी जन्म घेत असतात.
संदीपच्या गावीही नसेल.
त्याला भय जाणवलं नसावं.
नाहीतर त्याने नंतर तिला फोन केले नसते. ती सगळं विसरली असं समजूने लग्न झाल्याचे कॉल्स. घरी निमंत्रणासाठीचे कॉल्स.
त्याच्या जराही तिच्या मनाचा अंदाज नव्हता.
नाहीतर अनेक गोष्टी टळल्या असत्या.
चांगले वागणे हे एरव्ही चांगले ठरते. पण जेव्हां सर्व आयाम बदललेले असते तेव्हांचे चांगले वागणे अनाठायी ठरते. ते जीवघेणे ठरू शकते.
काही ठिकाणी फिरून न जाणे चांगले असते. तेच सर्वांसाठी चांगले असते.
ते ओळखता यायला हवं.
पण तेच तर होत नाही ना ?
अंतर झपाट्याने कापलं जात होतं आज.
आता झाडं झुडपं नाहिशी होऊन फक्त माती होती. हवेने माती उडत होती.
तिचं अंग मातीने माखत चाललं होतं.
ओठ कोरडे पडले म्हणून तिने त्यावर जीभ फिरवली.
मातीची चव.
चेहरा हाताने पुसताना लक्षात आलं. केसात, चेह-यावर, पापण्यांवर, कपड्यात सर्वत्र माती होती.
तिला स्वच्छ व्हायला पाणी हवं होतं.
घर जवळ आलं.
इथे कुठेच झरा नव्हता.
घरात जाळ दिसत होता.
तिला ठाऊक होतं.
दार वाजवलं पण ते उघडं असणार होतं.
तिने ते लोटून दिलं.
सताड उघड्या दारातून तिने आत पाहिलं.
मावळतीचा तांबूस उजेड आत येत होता.
संपूर्ण घर आतूनही मातीचं होतं.
जमीन मातीचीच. फडताळं मातीची.
एक मातीची चूल होती. त्या चुलीत सरपण जळत होतं.
आणि चुलीच्या पुढ्यात फतकल मांडून एक लठ्ठ बाई बसलेली होती.
तिने नववारी नेसली असावी बहुतेक. खेड्यातल्या बायकांसारखा काष्टा बांधला होता.
इथल्या आदिवासी बायका ज्या पद्धतीचा काष्टा बांधतात तसाच.
तो मातकट रंगाचा होता.
कधी काळी रंगीत असावा. माती बसून बहुतेक सर्वत्र हाच रंग दिसत असणार.
ती भाक-या थापत होती. भलं मोठं कुंकू लावलेलं होतं.
आणि वेडेवाकडे दात विचकत हसून ती स्वागत करत होती.
ती कुठल्यातरी अगम्य भाषेत आणि विचित्र आवाजात बोलत होती. ही भाषा तिने कधीच ऐकली नव्हती.
पण काहीच वेळात ही भाषा आपल्याला समजतेय असे तिला वाटले.
कुठलीतरी आदिम भाषा असावी.
घरात नावालाही फर्निचर नव्हतं.
दगडविटा आणि मातीचा ओटा होता. त्यावरच बसायचं आणि बहुतेक झोपायचं असणार.
आत एक खोली असेल ना ?
तिने तिला बोटाने आत जायला सांगितलं.
ती असं करणारच होती. नाही का ? हे सगळं याच क्रमाने तर घडलेलं आहे.
आताही असंच घडतंय.
आत दगडविटांचा बेड होता. भिंतीत फडताळं होती. त्या फडताळात मातीची भांडी होती.
आणि
मातीची खेळणी !
खेळणी ? इथे लहान मुलं कुठे आहेत ?
या प्रश्नाबरोबर तिला मुलांच्या हसण्याचा आवाज आला.
एक थंड भीतीची लहर सर्वांगातून खेळत गेली.
आपण दचकायला नको होतं.
हे सगळं असंच होणार.
ती बाहेर आली.
ती बाई आता तिला खाली बसायचा इशारा करत होती.
इशारा कसला ?
आज्ञाच होती.
ती आता मातीच्या भांड्यात जेवायला वाढेल. तिचा अंदाज अगदीच चुकला नाही.
त्या बाईने भाकरी आणि कसलीतरी मातकट भाजी वाढली.
तिला मातीचीच चव असणार.
तिची अगम्य भाषा तिला समजत होती.
जणू काही एक भाषांतर करणारं यंत्र त्यांच्यात काम करत होतं.
एक आधुनिक युगाची भाषा आणि एक अगम्य अशी आदीम भाषा.
मानवी विकासातली कदाचित बोलली गेलेली पहिली भाषा असावी.
तिच्यातूनच तिची आजची भाषा आलीय.
तिने विचार झटकून टाकले.
आपल्याला हे खायचं नाहीय.
तिने पाहीलं. खोलीला खिडक्या नव्हत्या.
वर झरोके होते.
त्यामुळे अंधार पडत होता.
तिने ते जेवण पाटाखाली सारलं.
पाण्याचा ग्लास घेऊन ती बाहेर गेली.
ते पाणी न पिता तिने चेहरा धुवून काढला.
"आपण सारी धरणीमातेची लेकरं, नाही का " कुणीतरी तिच्या कानात कुजबुजलं.
केव्ह्ढ्यांतरी दचकली ती.
ती बाई तिच्याकडे नजर रोखून बघत होती.
ओठावर हसू असलं तरी नजर खूप बोलकी होती.
तिला जायचं होतं.
पण त्या नजरेने बांधून टाकलं होतं.
"तू स्वत:हून आली आहेस. " ती एक शब्दही न उच्चारता बोलता होती.
"कशाला घाबरतेस ? तू पहिल्यापासून भीतीच्या सावटाखालीच तर आहेस. त्याचा अंत इथे आहे. तुला इथेच यायचं होतं "
ती त्राण गेल्यासारखी त्या ओट्यावर बसली.
खूप दिवसांपासून तिच्य़ा आत साचलेलं भय उसळी मारून वर आलं.
अपमान, द्वेष, संताप आणि स्वत:चा धिक्कार.
तिने कदाचित सगळं सगळं सांगितलेलं असावं.
"आपण सारी धरणीमातेची लेकरं, नाही का ?"
तिने चमकून पुन्हा पाहीलं. हे तिने इतक्यात तिसरे वेळी ऐकलं होतं वाक्य.
"धरणीमाता लेकरात फरक करत नाही. फरक करायला शिकवत नाही. ती न्याय करते."
बाई अजूनही एकही शब्द उच्चारायला तयार नव्हती.
" तू ते नको होतंस करायला"
ती धावत सुटली.
सूर्य मावळतीकडे जाण्याच्या बेतात होता.
त्या घरात अंधार होता तरी बाहेर अजून चांगलाच प्रकाश होता.
खिंडीपर्यंत ती वेगाने धावली. मातीतून पावलं भराभर उचलली जात नसतानाही तिने जिवाच्या आकांताने धावण्याचा प्रयत्न केला.
******************************************************************
सूडाच्या भावनेने मनात केलेलं घर.
ते घर आत ठाण मांडून बसली होती कि त्या घरात ती ?
संदीपला काहीही वाटलेलं नव्हतं.
लग्न झालं. बायकोचे फोटो पाठवले.
आणि आता त्याचं कसलंस काम होतं नीलमकडे.
त्यासाठी फोन लावत होता.
ती करेल असं त्याला वाटत होतं. तिचा अपमान झालाय हे त्याच्या गावीही नव्हतं.
जणू काही तिला भावनाच नाहीत.
त्याला धडा शिकवणे गरजेचे होते.
त्याला समजणे आवश्यक झाले होते.
****************************************************************
अतिशय गलिच्छ आवाजात ती बाई कानात कुजबुजत होती.
ती शुद्धीवर येतानाही मातीत कुजलेल्या कशाची तरी दुर्गंधी तिला जाणवली.
तिच्या त्या चमत्कारिक दातांचे दर्शन नकोसे वाटत होते.
ते सगळे पण लवकरच येणार आहेत असं ती सांगत होती.
ते कोण ?
तिची शुद्ध हळूहळू आली.
सूर्य मावळतीला जायच्या आत तिला पोह्चायचं होतं.
ती धावत सुटली
*************************************************************
किती दिवस ती पडून होती तिलाच माहिती नव्हतं.
डोळे उघडले तेव्हां ती तिच्या घरात होती.
नर्मदाक्काने ताट ठेवलं होतं. गावात कुणाचीही चाहूल लागली नाही.
तिने बाहेर येऊन पाहिलं.
संपूर्ण ओस पडलं होतं गाव.
काल शेजारच्या गावात काही कार्यक्रम होता का ?
तिने आपल्या घराकडे पाहिलं.
खंडहर होता.
शंभर एक वर्षांपूर्वी हे घर रिकामे झाले होते.
आजवर तिने कधी निरखून पाहिले नव्हते.
आज सगळंच चमत्कारिक वाटत होतं.
गावात कुणाचाही मागमूस नव्हता.
जणू इथे कुणीच राहत नसावं.
असं कसं होईल ?
दोन महिन्यांपासून आपण राहतोय की,
वन खात्याची एक वीजेची तार या खंडहराला आलेली होती आणि रस्त्यावरचा मोबाईल टॉवर फुल्ल रेंज दाखवत होता.
एव्हढीच ती आधुनिक जगाची लक्षणं दिसत होती.
तिने पुन्हा एकदा लॅपटॉप उघडला.
इथे आली त्याला तीन महिने उलटून गेल्याचं दिसत होतं.
बाकीचे सगळे शूटींग डोंगराकडचे होते.
गावात तिने कधीच काही शूट केले नव्हते ? का ?
****************************************************
ठरलेल्या वेळी ठरलेल्या गोष्टी करत गेलं की शरीराला त्याची सवय होते.
आपण बॉडी क्लॉक असं नाव देतो त्याला. आपण निसर्गाशी तादात्म्य पावतो.
पहाटे उठून फिरायला जाणा-यांचं असंच असतं.
तिची संध्याकाळची चारच्या दरम्यानची वेळ अशीच होती.
आज तिला कसलीतरी जाणिव होत होती.
रात्री कधीतरी संदीपचे विचार डोक्यात घट्ट होते.
आणि मग मनोज.
तिला हवा असणारा मदतनीस.
त्याच्याशी प्रेमाचं नाटक करावं लागलं होतं.
**********************************************************
डॉक्टर इथे थांबले.
"तिच्या लॅपटॉप मधे या सगळ्या अगम्य नोंदी आहेत.
रात्री झोपल्यावर लॅपटॉप चालू ठेवायच्या सवयीने बरीचशी बडबड पण रेकॉर्ड झाली आहे. तिचे अर्थ लावताना क्रम लावताना खूप वेळ गेला."
डॉक्टरांनी इन्स्पेक्टर शिंदेंकडे तिचा मोबाईल आणि फोन दिला. तुमच्यासाठी विशेष काम शिल्लक आहे असे वाटत नाही.
इन्स्पेक्टर शिंदे सगळा मुद्देमाल गाडीत ठेवून आले.
बॉडी पुढच्या गाडीत टाकली होती.
रात्री पोलीस विश्रामगृहात झोपायच्या आधी त्यांनी डॉक्टरांनी क्रमवार तयार केलेली क्लिप आणि नोंदी वाचायला सुरूवात केली. हा क्रम लावला नसता तर खरंच वेड लागलं असतं.
*********************************************************
संध्याकाळी ती झपाझप पावलं टाकत निघाली.
डोंगर उतरून झरा पार केला. आता त्रिकोणी प्रदेशातून खिंडीत.
खिंडीतून मग मातीच्या माळरानात.
आंब्याचे झाड.
आणि ते घर !
ती मंत्रमुग्ध होऊन चालली होती.
यांत्रिक हालचाली होत असल्याप्रमाणे तिने दारावर टकटक करायला बोटं उचलली.
दार नेहमीप्रमाणे उघडं होतं.
ते सताड लोटून ती आत शिरली.
ती बाई चुलीशी भाक-या थापत बसली होती.
केव्हढी लठ्ठ होती ती.
तिला पाहून त्या विचित्र दंतपक्तीतून ती फस्सकन हसली.
केव्हढं मोठं लालभडक कुंकू लावलेलं होतं.
संपूर्ण मातकट रंगसंगतीत तोच काय एकमेव रंग बंड करत होता.
तिने नीलमला आतल्या खोलीकडे निर्देश केला.
ती आतल्या खोलीत आज्ञाधारकपणे गेली.
तिला गुंगी येणार होती. ठाऊक होतं तिला.
तशीच ती आली.
मातीच्या आणि दगडविटांच्या बेडवर कापूस अंथरला होता. तिला झोप लागली.
पण ती सावध होती.
आता खोलीत अंधार होता.
फडताळातली खेळणी हलत होती.
आणि तिला जाणिव झाली.
अंधाराला आकार आले होते. ते हलत होते.
त्या खोलीत ती एकटी नव्हती.
बरेचसे आकार हलत होते. आवाज न करता.
पण सुप्त मनाने त्या अदृश्य हालचाली टिपल्या होत्या.
वरच्या देवळीत एक तुंभा होता. त्याचा मिणमिणता प्रकाश वातावरण अजूनच गूढ करत होता.
त्यातच तिला दिसलं.
तोच होता !
मनोज ?
इथे ?
ती किंकाळी मारून बाहेर पळाली.
दरवाजातून तिला बाहेर जायचे होते. पण तिच्यात बळ नव्हते.
कशीबशी ती बाहेर पडली.
*******************************************
संदीपचे काम करून द्यायला ती तयार झाली होती.
पुढचं किती सोप्पं होतं.
त्याला खोटं सांगून नेरळच्या निर्जण डोंगरात बोलावणं.
त्याला लोकेशन ऐकून आश्चर्य वाटलं खरं.
पण तिच्यावर विश्वास होता.
नकारात्मक उर्जेचा मागमूसही त्याला लागलेला नव्हता.
आणि मग गप्पा मारताना तिथे मनोज आला,
त्याला पाहताच तिच्या चेह-यावरचे भाव बदलत गेलेले त्याने पाहिले.
त्याच्या प्रश्नांना उत्तर देताना मनात साठलेले सर्व बाहेर पडत गेले.
पुढचे काम धिप्पाड मनोजने केले.
संदीपच्या शेवटच्या जाणिवा अविश्वासाच्या, पश्चात्तापाच्या आणि अशाच काहीशा होत्या.
ती नकारात्मक उर्जा त्याच्या शेवटाबरोबर त्याच्या कडे खेचली गेली होती.
ती शांतावली होती.
आणि मग आपण काय करून बसलो हे समजल्यावर कायद्याची भीती जाणवू लागली.
तेव्हांपासून ती स्वत:पासून जगापासून धावत होती.
तिला आता शांतता हवी होती.
*************************************************
मनोज जेव्हां मित्रांबरोबर कामासाठी इकडे आला तेव्हांच त्याला ती दिसली होती.
तिचा पाठलाग करताना ते घर दिसले होते.
ती नेहमी जाते हे लक्षात आल्यावर तो आज लवकर येऊन बसला होता.
भलं मोठं कुंकू लावलेल्या त्या बाईने भाक-या थापायला घेतल्या.
खूणेनेच त्याला जेवायला बसायला सांगितलं.
तिला धक्का देण्यापेक्षा बरंच काही विचारायचं होतं त्याला.
जर नीलम आधीच भेटली असती तर ..
मग या बाईच्या हातचं जेवायचं नाही हे त्याला कळलं असतं. त्याला कुठून माहिती असणार ?
********************************************************************
ती येऊन झोपल्यावर अंगातले काळे कपडे आणि कोळशाची पावडर फासून केलेल्या हालचालींना पाहून ती प्रचंड घाबरली होती.
काळ्या रंगाने अंधारात तिला काही दिसले नव्हते.
ती जीव खाऊन किंचाळत बाहेर पडली तेव्हांच आता पुरे झालं म्हणून ते सगळे बाहेर पडले.
बाहेर संधीप्रकाश होता. त्या प्रकाशात दूरवर ती कुठेच नव्हती.
अजिबातच दिसत नव्हती.
त्यांनी आजूबाजूला पहाय़ला सुरूवात केली.
घरात पाहिलं तर ती मातीची बाई तेच हसू खेळवत ओठ न हलवता काहीतरी बोलत होती.
"आपण सारी धरणीमातेची लेकरं "
काय अर्थ याचा ?
ते घराच्या मागे निघाले. आंब्याच्या झाडाजवळ ती खाली पालथी पडलेली दिसली.
त्यांनी तिचं शरीर पलटलं.
चार पाच दिवसांपासून ती इथेच पडून असावी.
गेल्या वेळीच तिचा जीव गेलेला असावा,
आता या सर्वांची पाळी होती.
त्याच्या डोळ्यापुढं संदीपचा चेहरा होता.
सगळीच तर या धरणीमातेची लेकरं. कुणी कुणाला वाईट का वागवावं ?
*****************************************************************
इन्पेक्स्टर शिंदेंनी दुस-या दिवशी संपूर्ण परीसर फिरून पाहिला.
अनहोनी गावाला लागून ही वस्ती होती. त्यातला हा खंडहर झालेला वाडा.
इथे ती कशी काय राहिली ?
जेवण खाण ? पाणी ?
कारण गावात आणि वस्तीत गेल्या साठ सत्तर वर्षात कुणीच रहायला नव्हतं.
वन खात्याचं काम करणारी एक नर्मदाक्का ग्रामदेवतेला दिवा लावायला यायची तेव्हढीच काय ती मानवी हालचाल.
आणि त्या माळरानावर..
एक जीर्ण आंब्याचं झाड होतं
आणि
बुंध्याला एक मंदीर.
खूप जुनं .
आदीम
बहुतेक धरणीमातेचं !
[समाप्त]
वाचली.नीट कळायला परत वाचावी
वाचली.नीट कळायला परत सावकाश वाचावी लागेल.
मी अनु, थोडा बदल केला
मी अनु, थोडा बदल केला शेवटच्या पॅरात. आधी नव्हता त्याबद्दल क्षमस्व !
वाचते गं
वाचते गं
एकदम इनसेप्शन टाईप कथा आहे.
आवडली.
आवडली.
धारपांच्या सर्व कथा वाचल्या आहेत.
धरणीमातेची लेकरं ही कथा आपुले मरण या संग्रहात असल्याचे इतक्यात समजले. ते उपलब्ध नाही मात्र.
जबरदस्त. आणखी थोडी तपशीलवार
जबरदस्त. आणखी थोडी तपशीलवार लिहली तर चित्रपटाची पटकथा होईल.
आवडली पु ले शु
आवडली
पु ले शु
छान गूढ कथा..!!
छान गूढ कथा..!!
लेखनशैली आवडली..!!
काय झालं, मिनी फिल्म वगैरे
काय झालं, मिनी फिल्म वगैरे बनणार आहे म्हणून कथा काढलीय का
कुठे गेली कथा?
कुठे गेली कथा?
अरे,मी पण नाही वाचली अजून.
अरे,मी पण नाही वाचली अजून.
निवांत वाचणार होते ना.
कथा पोस्ट केल्यावर समाधान
कथा पोस्ट केल्यावर समाधान होईना. सारखे एडीट करण्याऐवजी दोन्ही भाग काढून टाकले.
कथा संदिग्ध झाली असे वाटले. कोणता शेवट ठेवावा हे मला समजले नाही. आता मला आवडलेलाच शेवट ठेवून पुन्हा पोस्ट करणार आहे.
गैरसोयीबद्दल क्षमा असावी.
डिलीट केली होती का? तरीच.
डिलीट केली होती का? तरीच.
काय बदलले?
एकदा वाचलीए..लेखन शैली,
एकदा वाचलीए..लेखन शैली, वर्णने भारीच जमलीएत
परत एकदा वाचणार.
भयकथा इतकी complecate
भयकथा इतकी complecate केल्यामुळे सगळाच रसभंग झाला
Abstract मांडणी ललित लेखनात चालून जाते, इथे भयकथा बेस असल्याने, तो रस दिसलाच नाही, नुसतेच तुकडे तुकडे वाचल्यागत झाले
पण चांगला प्रयत्न, शुभेच्छा
मी 'आपण सारी धरणीमातेची लेकरं
मी 'आपण सारी धरणीमातेची लेकरं' अनेक वेळा वाचली आहे. (कथेचं नाव हेच आहे का आठवत नाहीये.)
त्यामुळे याच्याशी रिलेट झाले. पण नीट फ्लो कळत नाहीये. गोंधळ होतोय.
मूळ कथा परफेक्ट आहे. जय
मूळ कथा परफेक्ट आहे. जय धारप.
<<<वाचली.नीट कळायला परत
<<<वाचली.नीट कळायला परत सावकाश वाचावी लागेल.
Submitted by mi_anu >>>
सहमत..
थोडं कळलं, थोडं निसटलं कथा समजून घेताना.
थोडं कळलं, थोडं निसटलं कथा
थोडं कळलं, थोडं निसटलं कथा समजून घेताना >>> + 10000
थोडं कळलं, थोडं निसटलं कथा
थोडं कळलं, थोडं निसटलं कथा समजून घेताना. >>> +१
गोंधळ होतोय खरा वाचताना.
गोंधळ होतोय खरा वाचताना.
पूर्ण कळली नाही की माहिती
पूर्ण कळली की नाही माहिती नाही पण आवडली, जे लेखकाला अभिप्रेत आहे ते सर्वच मला कळलं पाहिजे अशी माझी काही अपेक्षा नसते, काही गोष्टी कल्पनेवर सोडून द्यायला आवडते. मला तुझी शैली आवडते.
पुलेशु.
समजली नाही असे खूप जणांचे
समजली नाही असे खूप जणांचे म्हणणे आहे. याचा दोष माझ्याकडे घेईन.
अस्मिता - खूप आवडला हा दृष्टीकोण.
ही भयकथा नाही. मनाचे खेळ आणि धारपांच्या कथांचे अतर्क्य विश्व यांचे काहीसे फ्युजन आहे. नायिकेच्या जीवनात काय घडले आहे याचा एक कोलाज आहे. या घटनांच्या तिच्यावर झालेला परिणाम, तिने उभारलेले विश्व या सर्व शक्यता ओपन एंडेड आहेत. ज्याला हवं तसं तो ही कथा पाहू शकेल या कल्पनेतून लिहीले होते. जी घटना यात खरे तर मुख्य आहे ती तुकड तुकड्यात येते. ती विशिष्ट परिस्थितीत उफाळून येते. यात मला यश आलं नसेल.
याच विचाराने दोन्ही भाग आधी डिलीट केले होते. पण पहिला भाग दिल्यानंतर हिरमोड करणे योग्य नसल्याने ते पुन्हा ठेवले. या प्रकारच्या काही
बंगाली शॉर्ट फिल्म्स पाहण्यात आल्या. यात कथा एकदम न उलगडता तिचे पदर विस्कटून उलगडत जातात. कदाचित माझा प्रयत्न फसला असेल कदाचित नंतर आवडेल.
सर्वांचे मनापासून आभार.
( स्पष्टीकरण देणे योग्य आहे कि नाही याची कल्पना नाही).
मनोज पण मेला का? आणि नीलम
मनोज पण मेला का? आणि नीलम आधीच मेली होती का? हे नीटसं कळलं नाही.
परत एकदा वाचली. कथा एकाच
परत एकदा वाचली. कथा एकाच पातळीवर नसून अनेक पातळ्यांवर पुढे / मागे सरकते असे मला वाटतेय. एक वेगळा प्रयोग...
Sucker punch movie मधे पण असा प्रयोग आहे असे वाटतेय...
कळली की नाही सांगता येत नाही.
कळली की नाही सांगता येत नाही. पण आवडली. वाचताना काय चाललंय हे कळत होतं हे नक्की. लेखनशैली भारी आहे.
निलमच्मया मनाचे खेळ विभ्रम समजले. फक्त ओसाड गावात एकटी कशी राहिली, नर्मदा मनोज खरे की खोटे हे कळलं नाही.
सर्वांचे मनापासून आभार.
सर्वांचे मनापासून आभार.
कथा आवडली नाही तरी कळवा. का नाही आवडली हे कळवले तर मला विचार करायला मदत होईल. समजली नाही असे सर्व म्हणत आहेत.
अशा पद्धतीचे लिखाण पुन्हा आवडेल का हे जाणून घ्यायला आवडेल.
या वेळी एक किंवा दोन भागच असावेत हा हेतू होता.
पुढच्या वेळी नक्की विचार करीन.