माया नावाची संकल्पना

Submitted by धनश्री- on 22 July, 2020 - 14:09

मध्यंतरी सॅम जेप्पी (https://www.youtube.com/c/sadasiva108/featured) या माझ्या आवडत्या ज्योतिषाचा एक व्हिडीओ यु ट्युबवरती पहात होते. चंद्राचे कुंडलीतील कारकत्व या विषयावरचा तो व्हिडीओ होता. आत्ता सापडत नाहीये. सापडला की देते. हा व्हिडीओ ऐकताना, मला एक विलक्षण माहीती सहज सापडुन गेली. इट वॉज अ युरेका मोमेंट फॉर मी. ज्योतिषात चंद्राला मायेचे कारकत्व दिलेले आहे. म्हणजे हा ग्रह मायेचा कारक आहे. जसे सूर्य आत्म्याचा कारक तसा चंद्र मायेचा कारक. दर वेळेला मी हे वाचत आलेले आहे. त्यावरती क्वचित चिंतन केलेले आहे. मायेचा कारक म्हणजे काय ते नक्की कधीच उलगडलेले नव्हते. तसेही माया म्हणजे नक्की काय हेदेखील कोणी कधी उलगडून सांगीतलेले माझ्या मर्यादित वाचनात आलेले नव्हते. वेदांतामधील ही एक फार महत्वाची संकल्पना आहे = 'माया' एवढेच, नीट वाचून वाचून माहीत होते. म्हणजे पुरुष-प्रकृती मधील पुरुष हे ब्रह्म तर प्रकृती ही माया. जीवाच्या अस्तित्वाला मायेच्या पटलाने वेढलेले असते. ज्यामुळे जीव, ब्रह्म जाणू शकत नाही. भल्या भल्या थोरामोठ्यांना मायेचे हे आवरण दूर करता आलेले नाही. अरे पण म्हणजे काय? कुठलं पटल, कुठलं धुकं, काहीही माझ्या पचनी पडलेले नव्हते. आता रामविजय ग्रंथातीलच मायेचे वर्णन घ्या ना. या ग्रंथात मूळमायेचे सुरस वर्णन आहे. पुरुष आणि प्रकृती यांमधील पुरुष निद्रीस्त असतेवेळी मूळमायेने, त्याच्या नकळत सत्व-रज-तम गुणांचा पसारा मांडला आणि त्या धूर्त प्रकृतीने असे काही विश्व उत्पन्न केले की पुरुषापर्यंत जीवास पोचताच येउ नये. अफाट वर्णन आहे.
_________

जैसा कोणी पुरुष निद्रीस्त| पहुडला असे चिंतारहीत|तो स्वेच्छे होउन जागृत| कार्य काही आठवी||
की समुद्री उठे लहरी|तैसी ध्वनी उठे चिदंबरी|मी म्हणोनी निर्धारी| हाक थोर जाहली||
एक असता ब्रह्मानंद| नि:शब्दी उठीला शब्द|ते ध्वनी मायानाम प्रसिद्ध| वेदांतशास्त्र गर्जतसे||
जिचे नाव मूळप्रकृती| जी आदिपुरुषाची चित्शक्ती| तिने शेजे निजवोनी पती| सृष्टीकार्य आरंभिले||
एवढे ब्रह्मांड निर्माण केले| परंतु पतीस कळो नेदि वर्तमान ते परम कवटाळीण| नसतीच दैवते उभी केली||
विधी-विष्णू-उमाकांत| ही तीन्ही बाळे जिच्या आद्न्येत| नेत्र उघडोनी निश्चित| पाहो नेदी स्वरुपाकडे||
ब्रह्मसुखाच्या समुद्रात्| बुडाले हे जीव समस्त|परंतु तेथीची गोडी किंचित्|चाखो नेदी कोणाते||
चैतन्य इनेच झाकीले|इने अरुप रुपासी आणिले|अनंत ब्रह्मांडाचे पुतळे| एकेच सूत्रे नाचवी||
इने निर्गुणास गुण लाविले जाण|अनामासी ठेविले नामकारण|निराकारासी आकारुन्| जीवीत्वासी आणिले||
हे परम पतीव्रता साचार|पतीस न कळता जाहली गरोदर| ब्रह्मांड रचिले समग्र|नानाविकारे करोनिया||
नानायोनी विकारभाव|इने फासा पाडीले अवघे जीव|गाधीस* कैसे दाविले लाघव|मिथ्या कर्तूत्व नसतेची||
कोणी मुरडे स्वरुपाकडे| त्यासी नसतेची घाले साकडे|अथवा स्वर्गसुख रोकडे|पुढे दावुनी भलवी की||

* या काव्याआधी, गाधी ऋषींची कथा येते.
____________
असो तर एवढे वाचूनही माया म्हणजे काय? हे कळलेच नव्हते.सॅम हा माता अमृतानंदमयी (द हगिंग सेंट) यांचा शिष्य आहे. सॅमने वरती उल्लेख केलेल्या 'चंद्र' विषयक व्हिडीओमध्ये फार सोप्या शब्दात हे मायेचे स्वरुप सांगीतलेले आहे.
तर थोडक्यात, माया म्हणजे 'लिमिटेड कॉन्शसनेस' आपला या जन्मी जे मर्यादित अस्तित्व आहे ते म्हणजे माया. माया = लिमिटेड एग्झिस्टनस, ब्रह्म = युनिफाईड, अखंड, अविरत अनादि, अनंत एग्झिस्टन्स.
आपले अनेकानेक जन्म झालेले आहेत त्यामध्ये आपण कित्येकदा कोणाचे भाऊ-बहीण-नवरा-बायको या भूमिका निभावलेल्या आहेत. आपल्याला अपत्ये झालेली आहेत पण आपल्याला ते आठवते का? तर नाही. या जन्मी मला, पूर्वजन्माची संपूर्ण विस्मृती झालेली असते. आणि हे जे विस्मृतीचे पटल आहे ते म्हणजे माया. चंद्राची, ज्योतिषातील भूमिका आपल्याला सुखात, आनंदात, भ्रमात व sane ठेवण्याची. उदा - मला या जन्मी कोणी उगीचच दुखावले तर मला आवडत नाही, विनाकारण कोणी माझी खोडी काढली आहे, त्रास दिला आहे असा भाव होतो. पण असे कशावरुन नाही की पूर्वीच्या एखाद्या जन्मी मीच काही दगाफटका केलेला असेल व त्याचे फळ मला आता मिळत असेल? काही व्यक्ती नको असतानाही आपल्या आयुष्यात येतात, रेंगाळतात याचे कारण कदाचित पूर्वजन्मातील आपल्याच वासना-आशांशी निगडीत असू शकते. तर ही आठवण न येणे , व आपण या जन्मी त्या अद्न्यानामध्ये सुखात असणे, ही आहे माया. आणि चंद्र त्याचा कारक आहे.

उदाहरणार्थ - गुरुचरित्रात एकदा नृसिंह सरस्वतींनी एकदा एका लाकूडतोड्याच्या तोंडून वेदांताची चर्चा घडवुन आणली व २ मदोन्मत्त ब्राह्मणांचा गर्व हरण केला ही कथा येते. या कथेत त्यांनी शिष्यांना सांगीतले की ७ रेघा वाळूत आखा व त्या लाकूडतोड्याला प्रत्येक रेघ ओलांडण्यास सांगीतली. प्रत्येक रेष ओलांडली की त्याला एकेक जन्म आठवत गेला. कधी तो वैश्य होता, कधी शूद्र तर कधी विप्र अथवा क्षत्रिय. ही जी युनिफाईड मेमरी आहे ते म्हणजे ब्रह्म. व त्या लाकूडतोड्याला आताच्या (करंट) जन्मी जी लिमीटेड मेमरी आहे ते मायेचे पटल.

अजुन एका कथेत एक स्त्री आपला मुलगा गेल्याने अतिशय शोकाकुल आहे, तेव्हा गुरु तिला म्हणतात यापूर्वी अनेक जन्म तू आई झालेली आहेस मग तेव्हाच्या अपत्यांकरता तूशोक करत नाहीस आताच का शोक करतेस? याचे कारण तिला पूर्वजन्म आठवत नाहीत व ते न आठवल्याने, तेव्हाचा शोक तिला होत नाही. हे मायेचे पटल.

हे माझ्याकरता तरी नवीन होते. मला कळल्यानंतर खूप अचंबा वाटला व वाटले अरे कोणी इतक्या सोप्या शब्दात का नाही सांगीतले की -
माया = लिमिटेड एग्झिस्टनस (आत्ताचा जन्म), ब्रह्म = युनिफाईड, अखंड, अविरत अनादि, अनंत एग्झिस्टन्स (अनेकानेक जन्म). सर्व पुस्तकांमध्ये
सामुद्रो हि तरंगः क्वचन समुद्रो न तारंगः|| .वाक्यहा दृष्टांत तसेच दागिना व सोने हा दृष्टांत अनेकदा वाचलेला होता. की लाट म्हणजे समुद्र नाही पण समुद्र हाही लाटेहून वेगळा नाही. सोन्यापासून जसे विविध दागिने घडतात त्या सर्वांमध्ये, सोने हे अविचल, कायमस्वरुपी असते. वगैरे दृष्टांत परत परत वाचलेले होते. पण कधीही कळलेले नव्हते. ते सॅमच्या एका व्हिडीओने कळले ब्वॉ.

आय होप धिस इज मेकिंग सम सेन्स Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<एकदा एका बुद्ध साधू ला मारायला एक ताकदवान आणि बलाढ्य माणुस येतो पण तो त्या साधूच्या प्रभावाखाली इतका मवाळ बनतो, नमतो, इतका हळुवार होतो, त्या साधूच्या मांडीवर डोके ठेउन तो शांत झोपी जातो.<<
अशी अंगुलीमाल राक्षसाची गोष्ट आहे.
भगवान बुद्ध जिथे जंगलात तपश्चर्या करत होते, त्याच्या १६ किमी पर्यंतच्या परिसरात त्यांच्या तपस्येचे प्रभावक्षेत्र होते. अंगुलीमाल राक्षस जेव्हा त्यांना मारायला आला, तेव्हा टप्याटप्प्यावर त्याच्या मानसिकतेत बदल होत गेला आणि सर्वात शेवटी बुद्धापर्यंत पोहोचता पोहोचता त्याला उपरती झाली आणि तो भगवान बुद्धाना शरण गेला. (या वर आम्ही स्कीट सादर केले होते).हा उल्लेख मी इथे केलेला आहे. https://www.maayboli.com/node/59445

<<गोंदवलेकर महाराजांनी नक्की म्हटले आहे की कोणाचे इन्टर्प्रिटेशन म्हणुन विटाळ हा शब्द आलेला आहे माहीत नाही परंतु जे जे काही म्हणुन नामस्मरणाच्या आड येते तो म्हणजे मायेचा विटाळ - अशा अर्थाचे सुभाषित वाचनात आलेले आहे.<< हे बरोबर. श्रीमहाराजांचेच वाक्य आहे हे. तु नंतर दिलेला ट्रेनचा दृष्टांतही त्यांचाच.

<<अर्थात ही ट्रेन म्हणजे आयुष्य आहे आणि टिकिट बाबू म्हणजे मृत्यु/यम. पण ज्याने नामाची कास आयुष्यभर सोडली नाही तो आता या परलोक प्रवासात फर्स्ट क्लास डब्यात प्रवास करणार.<< कविता फारच उद्बोधक! आवडली. Happy

साभार - https://www.scribd.com/document/243057260/Shri-Samarth-Avatar
.
श्रीसमर्थ आंबेजोगाईहून तडक निघाले ते जांबेसच गेले. जीवाला हळूवार करुन सोडणारा तो प्रसंग आहे. वयाच्या बाराव्या वर्षी घर सोडले होते, ते आता सरासरी बत्तीसाव्या वर्षी येउन,घरात एकदम न शिरता दारापुढे उभे राहून, खड्या आवाजात
सदा सेवी आरण्य तारुण्यकाळी| मिळेना कदा कल्पनेचेनी मेळी|
चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा|जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा||
जय जय रघुवीर समर्थ

असा श्लोक त्यांनी म्हटला. रघुवीराचा जयजयकार केला, तरी आतून उत्तर आले नाही म्हणुन
नसे अंतरी कामकारी विकारी|उदासीन जो तापसी ब्रह्मचारी|
निवाला मनी लेश नाही तमाचा| जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा||
जय जय रघुवीर समर्थ

असा दुसरा श्लोक म्हणुन जयजयकार केला. तरी जबाब आला नाही म्हणून
नसे मानसी नष्ट आशा दुराशा|वसे अंतरी प्रेमपाशा पिपासा|
ऋणी देव हा भक्तीभावे जयाचा| जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा||
जय जय रघुवीर समर्थ

असा तीसरा श्लोक म्हटला जयजयकार केला. घरात मातुश्री खंगलेल्या, पायात डोके घालून बसल्या होत्या, त्यांनी तीन्ही श्लोक आणि तीन वेळा केलेला रघुवीराचा जयजयकार ऐकला, पण त्यांच्या काही लक्षात आले नाही.त्या उलट सूनबाईस म्हणजे श्रेष्ठांच्या पत्नीस म्हणाल्या "बाहेर कोणी गोसावी आला आहे. त्यास मूठभर भिक्षा नेउन घाल." ते ऐकून श्रीसमर्थ बाहेरूनच म्हणतात "हा गोसावी भिक्षा घेउन जाणारा नाही.", हे शब्द मातुश्रींनी ऐकले मात्र त्यांचा चेहरा प्रफुल्लित झाला, हृदयात परमानंदाच्या उर्मी उठल्या आणि ब्रह्मानंद वाटून त्या एकदम म्हणाल्या, "कोण, माझा नारायण आला की काय?" हे शब्द मातुश्रींच्या तोंडुन निघताहेत तोच "हो, मी नारायण आलो आहे", असे म्हणत नारायणाने जाउन मातुश्रींच्या चरणांवर मस्तक ठेवले!!!
नारायण खरच नारायण आला आणि आईच्या हृदयाला कंप सुटला आणि नेत्र भरुन आले. आईचे डोळे गेलेले. आई चाचपून हात फिरवुन पाहु लागली. मस्तकावरुन, तोंडावरुन, हातापायावरुन हात फिरवित असता काय हो आईची दशा झाली असेल. आई म्हणाली "नारायणा, अरे तुझे हे रुप पाहण्यास मला डोळे उरले नाहीत!" नारायणाने आईच्या डोळ्यावरुन हात फिरवला मात्र तावत् श्रीसमर्थांचे नखशिखांत स्वरुप मातुश्रीस दृगोचर झाले आणि त्या म्हणाल्या "नारायणा, अरे तू ही भूतचेष्टा कुठुन शिकुन आलास?"
"आई ही भूतचेष्टा नाही. ही प्रभु रामचंद्राची कृपा होय! सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात वास करणारा जो परमेश्वर
सर्वा भूतांचे हृदय| नाम त्याचे रामराय|
रामदास नित्य गाय| ते चि भूत गे माय||

त्या भूताचे साद्यंत चरित्र श्रीसमर्थांनी एका पदात त्यावेळी आईला ऐकवले -
होते वैकुंठीचे कोनी| शिरले अयोध्याभुवनी|
लागे कौसल्येचे स्तनी|ते चि भूत गे माय||१||
.
जाता कौशिकराऊळी|अवलोकिली तये काळी|
ताटिका ते छळूनी मेली|ते चि भूत गे माय||२||
.
मार्गी जाता वनांतरी|पाय पडला दगडावरी|
पाषाणाची जाली नारी|ते चि भूत गे माय||३||
.
जनकाचे अंगणी गेले|शिवाचे धनु भंगिले|
वैदेहीअंगी संचरीले|ते चि भूत गे माय||४||
.
जेणे सहस्रार्जुन वधिला|तो ही तात्काळची भ्याला|
धनु देउनी देह रक्षीला|ते चि भूत गे माय||५||
.
पितयाच्या भाकेशी|कैकेयीचे वचनासी|
मानुनी गेले अरण्यासी|ते चि भूत गे माय||६||
.
चवदा संवत्सर तापसी|अखंड हिंडे वनवासी|
सांगाते भुजंग पोसी|ते चि भूत गे माय||७||
.
सुग्रीवाचे पालन|वालीचे निर्दालन|
तारी पाण्यावरी पाषाण्|ते चि भूत गे माय||८||
.
रक्षी भक्त विभीषण|मारी रावण कुंभकर्ण्|
तोडी अमरांचे बंधन|ते चि भूत गे माय||९||
.
वामांगी स्रियेला धरीले|धावुनी शरयुतीरी आले|
तेथे भरतासी भेटले|ते चि भूत गे माय||१०||
.
सर्वा भूतांचे हृदय| नाम त्याचे रामराय|
रामदास नित्य गाय| ते चि भूत गे माय||११||

<<सर्वा भूतांचे हृदय| नाम त्याचे रामराय|
रामदास नित्य गाय| ते चि भूत गे माय||<<

अहाहा... सुंदरच! हे कधी वाचनात आले नव्हते. अलवार काव्य आहे हे! Happy खुपच भावलं!

धन्यवाद आर्या. हे असे भूत रामदासस्वामींनी वश करुन घेतले होते. काय सुंदर कथा आहे ना. प्रत्येक श्लोक प्रासादिक आहे. मलाही मनाचे श्लोक, करुणाष्टके फार फार आवडतात. त्यात आता वरील श्लोकांची भर पडली Happy

मायेने मोह उत्पती होते तर मोहाने आसक्ती. ही आसक्ती मायावीच.
त्यामुळे मायाजाली न फसणे हे उमजायला हवे. सामान्यांना हेच जमत नाही. त्यामुळे मायेच्या पुरात ते वाहत जातात.
मला आठवते पुर्वी कपडे घेताना किंवा शिवताना त्याला किती माया आहे हे पाहायले जायचे म्हणजे कपडा जास्तीजास्त दिवस वापरला जावा. वाढत्या अंगाचा कपडा.
आपला देहही असा आत्म्या भोवती लपेटलेला मायेचा कपडा. त्याला माया आहे म्हणून मोह आहे आणि आसक्ती आहे.

<<हे असे भूत रामदासस्वामींनी वश करुन घेतले होते<< किती छान बोलतेस. हे असे भुत सर्वांना वश होवो. Happy
कृष्णाजी, खुप छान प्रतिसाद. !
मागच्या प्रतिसादात, मी एक वाक्य ठळक केले होते. *विषयाची ऊर्मी हे मायेचे स्मरण होय*
ही उर्मी कशी काम करते ते पाहू! हे एका प्रवचनात ऐकले होते. आवडते मुद्दे मी ही लिहुन ठेवते. Happy
मनुष्य देह स्थूल आणि सूक्ष्म असा दोन प्रकारांनी बनलेला असतो ना! स्थूलात आपले पंचेंद्रिये, कर्मेंद्रिये येतात! तर सूक्ष्मात, अंतःकरण चतुष्टय हे येत! म्हणजे मन(वायू), बुद्धी(तेज), चित्त(द्रव), अहंकार(भु) हे मिळून अंतःकरण बनतं. मनाचं कार्य, संकल्प विकल्प , इच्छा आकांक्षा करणे, बुद्धीचे कार्य विचारपूर्वक निर्णय घेणे तर चित्ताचे कार्य स्वभाव, सवयी, अभ्यास, संस्कार! अनेक वेळा एकच गोष्ट बिंबवली की सवय होते, सवयीतून स्वभाव बनत जातो. आपली पंचेंद्रिये सतत बाहेरून विषय आत खेचत असतात. आपलं मन म्हणजे पूर्वसंस्कारांचे गाठोडे. त्यातून त्या त्या संस्कारानुसार दृष्याचा, व्यक्तीचा, पदार्थाचा, घटनेचा अन्वयार्थ लावला जात असतो. अन आत उर्मी किंवा वृत्ती आपण म्हणतो , त्या एकसारख्या बुडबुड्यासारख्या उफाळत असतात. वृत्ती अव्यक्त आहे. मग ती व्यक्त कशी होते तर इच्छेच्या रूपात होते. म्हणजे ती शब्दबद्ध होऊन विचारांच्या माध्यमाने मनात उमटते, तेव्हा ती इच्छेच्या रूपाने व्यक्त होते. उर्मी अनॉरगनाइज तर विचार थोडे ऑर्गनाईज स्वरुपात असतात. या पुढची स्टेप कृती. वृत्ती अनावर झाली की कृती घडते.
उदा. भूक लागणे. भूक लागण्याची उर्मी आतमध्ये असते. जेव्हा भूक लागते तेव्हा ती शब्दबद्ध होऊन इच्छेच्या रूपाने आपल्याकडे येते. भूक लागणे असे झाल्यावर जी इच्छा असते ती इच्छा बुद्धीकडे पाठवली जाते, कि आता भूक लागली आहे. मग बुद्धी तिथे सारासार विचार करून सांगते कि हि वेळ कोणती आहे, जेवणाची वेळ आहे का? कि चहा घ्यायची वेळ आहे? कि नाश्त्याची वेळ आहे? असं बुद्धी जेव्हा सांगत असते, त्याचवेळी चित्तातले जे संस्कार झालेले असतात ते अनुरूप असतील ते दिले जातात. त्याच वेळी मन हि गडबड करते. म्हणजे असं कि बुद्धीने सांगितले कि जेवणाची वेळ आहे, तू जेवलेलं चांगलं. तर मन गडबड करते कि जेवणाची वेळ आहे, पण भाजीपोळी कुठं खात बसायची? इतर काही मिळाले तर बरे होईल. श्रीखंड असले तर बरे होईल . म्हणजे ती इच्छा मनाकडून पुढे जाते आणि कृतीकडे जाते. हि इच्छा मनाच्या ठिकाणी जरी राहिली ना तरी पुष्कळ साधले असं म्हणता येईल. पण तिची उर्मी झाली कि तुम्ही घसरलात तिथून.
म्हणजे नुसते श्रीखंड मिळाले तर बरे होईल असे वाटणे हे ठीक आहे. मिळाले तर मिळाले, नाही तर नाही. यात तुमचे समाधान काही ढळणार नाही. पण त्याची उर्मी ,'मला श्रीखंडच हवं ' अशी झाली म्हणजे तुम्ही घसरले. म्हणजे मग ते नाही मिळाले कि आकांत. उर्मी आवरणे फार गरजेचे आहे. कारण हि उर्मीच आपल्याला फरफटत नेते, पुष्कळदा वाईट गोष्टी कडे. उर्मी सांभाळणे कठीण आहे. उर्मी न होता नुसते इच्छेच्या लेव्हलवर राहिले तरी पुष्कळ आहे. मग ती इच्छा जाते कृतीकडे. मग आपल्या हातून कृती होते. अन आपण जेवणाची कृती करतो. स्वभावानुरूप आपली कृती होते. आणि त्या कृतीतून जे संस्कार उठतात म्हणजे ज्या गुणांमुळे ते संस्कार उठलेले असतात ते परत याच वाटेनं आत जातात. आणि ते परत वासनेपर्यंत जातात आणि तिथून ते अव्यक्तात ठेवले जातात म्हणजे स्टोअर केले जातात. नंतर त्याच्यातुनच वृत्ती यायला सुरुवात होते. त्यामुळे या वृत्तीवर आपला ताबा नाही.

आणखी उदाहरण बघू! समजा आज नवरा म्हणाला, कि अग ए, माझे दुरचे काका येत आहे काही दिवस आपल्याकडे राहायला. काय होईल? तत्क्षणी मनात विचारांचे प्रवाह सुरु होतील. मग भूतकाळात घडलेल्या बऱ्या वाईट घटना, त्यातून पूर्वग्रहदूषित मन, किंवा आता पुढे काय होणार ही भविष्यकाळाची चिंता. मन ढवळून उठेल. मग काहीतरी खडसुन बोलावे, प्रतिक्रिया द्यावी ही उर्मी .. ती त्याच लेव्हलला राहीली तरी ठीक पण ही अनावर होते, अन सन्धी मिळताच कृती होते.हेच ते मायेत गुरफटणे.

मला जे.कृष्णमूर्तीचें एक फार आवडते. चॉईसलेस अवेअरनेस. समजा एखादे झाड तुम्ही पाहिले. तर काय मनात विचार येतात? जे काही ज्ञान आपण पूर्वी मिळवले आहे. त्यानुसार लगेच मन विचार करू लागते. कि हे झाड आंब्याचे आहे का? मोहर आलेला दिसतोय. कदाचित आंबेच. केशर असावा की नीलम? मग आंब्याचा मौसम...मग मागच्या आठवणी. तर असे काही न करता, नुसते साक्षीभावाने यांच्याकडे पाहिले तर? विचारांना तिथेच फुल्स्टोप मिळेल.
अजून एक उदाहरण दिलेले त्यांनी. समजा आपण समुद्रकिनारी आहोत अन काल एक सूर्यास्ताचे सुंदर दृश्य पाहिले होते. आज पुन्हा तेच पाहावे म्हणून त्याच पॉईंटला आलॊ पण कालच्या इतके ते भावले नाही. मनात काय विचार येतात? कालचे दृश्य छान होते. हे कम्पेरिझन केलं म्हणजे द्वैतात मन सापडले. मनाचे समाधान भंगले. मनाच्या शांत पडद्यावर लगेच लहरीची खळबळ झाली.
अगदी असेच उदाहरण, सौ प्रतिभा चितळे यांनी केलेल्या नर्मदापरिक्रमेचे वर्णन करताना दिले होते. कि परिक्रमेत कधी कधी एखाद्या आश्रमात पंचपक्वांन्न खायला मिळतात. तर अगदी लगेच पुढच्या आश्रमात नुसत्या भाकरीवर कांदा मिळतो. तेव्हा मनात असा विचार येऊ द्यायचा नाही कि "श्या, मागच्या आश्रमात किती छान छान पक्वान्न मिळाले. " गुरफटलो आपण मायेत.
थोडक्यात काय, विषय आणि त्यांची ऊर्मी ही केवळ आमच्या मनात आहे पण 'मन हे केवळ एक इंद्रिय आहे' व 'मी' म्हण्जे मन नाही या साक्षीभावात रहावे अन घटनांमध्ये, व्यक्तींमध्ये न अडकता, न गुंतता, आपले कर्म आचरावे.

काल मला एका खोल प्रश्नाचे उत्तर माझ्यापुरते, जवळ जवळ सापडले. माझे मला नाही सापडलेले. सेकंड हँड ज्ञान आहे. - https://www.youtube.com/watch?v=3M9MOKotHW8
या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये ऐकले.

जगात 'इव्हिल' (evil) का आहे? सुष्ट जसे आहे तसेच दुष्ट का आहे?
- मला सापडलेले उत्तर हे आहे की निसर्ग म्हणा किंवा जीवन म्हणा हे जे काही अतिविशाल, बलाढ्य, अज, अमर आणि अविनाशी असे आहे. दृष्य-अदृष्य प्रत्येक त्याचे स्वतःचे एक्स्प्रेशन आहे.
लाईफ एक्सप्रेसेस इटसेल्फ थ्रु यु.
थ्रु एव्ह्रीथिंग व्हिजिबल/अनव्हिजिबल.

छान लेख आणि माहिती. प्रतिसादही माहितीपूर्ण.
बोकलत तुमचाही प्रतिसाद मस्त "एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स "या ऑस्कर विनिंग चित्रपटाची आठवण झाली.

सिमरन धन्यवाद.
फाविदडि तुम्हाला कळलं तर इथे लिहा.

मी या सगळ्या माहितीपटांचा एक एकत्रित परिचय लिहिला आहे संप्रति. Happy प्रत्येक व्हिडिओ दोन- तीन वेळा पाहिला आहे. अतिशय उत्तम आणि सर्व जगातील अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाची संग्रहित माहिती आहे.

"Can you hear the music !" https://www.maayboli.com/node/84428
तू वाचला आहेस गं. Happy ह्या लेखात सर्व माहितीपटाचा तपशीलवार परिचय नाही पण लिंक्स आहेत. लेखापेक्षा या डोक्युमेंटरी पहा म्हणेन.

PhD लेव्हलचे आहे हे सामो, नक्की बघ. बारा व्हिडिओ आणि तीन फिल्म्स आहेत. अक्षरशः सगळाच अभ्यास होऊन जातो. नंतर काहीही पाहिले तरी उच्छिष्ट वाटत राहते. अतिशय क्लिष्ट आहे पण उच्च आणि दर्जेदार वाटते. आणि इंग्रजीतूनच पहा. इतकं प्रखर आणि स्पष्ट अध्यात्म याआधी पाहिले नव्हते. खासकरून त्यांची माया आणि pathless path डॉक्युमेंटरी.

इनर वर्ल्डस' मालिका दिलीयेस तू. आज झोपताना ऐकते. संप्रति तुम्ही दिलेला १ तासाचा व्हिडिओसुद्धा मस्त वाटतोय. दोघांचे आभार.

अस्मिता,
मागच्या महिन्यात Rupert Spira यांचे, आणि non-duality वरील काही जाणकारांचे व्हिडिओज् शोधताना एकदा यूट्यूब अल्गोरिदमनं नकळत तो वरचा व्हिडिओ डोळ्यापुढे आणला. मग त्यातल्या काही डॉक्युमेंटरीज बघितल्या गेल्या. जे कुणी लोक त्या डॉक् सिरीज बनवत आहेत, ते मोठं पुण्ण्याचं काम करत आहेत. Happy

<<अतिशय उत्तम आणि सर्व जगातील अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाची संग्रहित माहिती आहे.>>
खरं आहे. सगळा सार/निचोड काढून व्यवस्थित आणि साध्या सरळ भाषेत प्रेझेंट केला आहे.
"सार सार को गहि रहे, थोथा देई उड़ाय" वगैरे Happy

बाकी, तुमचा तो लेख मागे वाचला होता पण एकदा वाचून नंतर विस्मरणात गेला होता. आता यानिमित्ताने पुन्हा आठवला. ज्या त्या गोष्टीची वेळ यावी लागते, हे बरोबरचंय म्हणजे.

Happy संप्रति, रूपर्ट स्पिरा आणि अद्वैतवाद- नोंद घेतली. "बुद्धा ॲट द गॅस पंप" नावाच्या चॅनल वर यात पुढे गेलेल्या लोकांच्या मुलाखती असतात त्यात मी रूपर्ट स्पिराची पाहिली होती बहुतेक.

जे कुणी लोक त्या डॉक् सिरीज बनवत आहेत, ते मोठं पुण्ण्याचं काम करत आहेत.>>>> अगदी. माझे आशीर्वाद लागले असतील त्यांना. मी पुन्हा, पुन्हा पाहिले आहेत सगळेच व्हिडिओ. डॅनियल स्श्मिड्टचा आवाज आणि त्यातली चित्रं, क्लिप्स पण संमोहित करणारी आहेत. मी मॉन्ट्रियलला जाऊन त्यांच्या रिट्रीटला भेट देणार आहे एकदा. आभार मानायला. Happy

निसर्गदत्त महाराज, रमण महर्षी आणि आता अवेकनिंग, या pathless path वर भेटत राहू. Happy

Pages