पुन्हा त्याच वळणावर

Submitted by वीरु on 2 October, 2021 - 15:35

गावाबाहेरचा हा पिंपळाचा‌ पार म्हणजे गावातल्यांची हक्काची जागाच होती म्हणा ना. इथे बसलं‌ की गावात येणाऱ्या जाणाऱ्यावर नजर ठेवता यायची. तसा हा पार सदासर्वदा गजबजलेलाच असायचा. सकाळच्या पारी फिरायला गेलेले जरा वेळ‌ म्हणुन टेकायचे, तर संध्याकाळी रिटायर मंडळी जागा अडवुन बसायचे आणि अपचनापासुन अमरिकेपर्यंत सगळ्या विषयावर बोलत रहायचे. चुकुन आमच्यासारखा एखादा तरणा बकरा त्यांच्या हाताला सापडला तर मग विचारुच नका..तुझ्या‌ वयाचा होतो तेव्हा आमचे कसे‌‌ दोनाचे चार हात झाले होते, लग्नासाठी पोरीवाले कसे मागे लागले होते. एकजण‌ कसा सायकल, रेडीओ द्यायला‌ तयार होता..घासलेटच्या दिव्यावर कसा आभ्यास केला होता. बापाने शाळेतुन‌ काढलं म्हणुन नायतर बॅरीस्टरच झालो असतो..वगैरे वगैरे..सुटका झाल्यावर तो बिचारा खांदे पाडुन पाय ओढतच परतायचा. त्यामुळे आम्ही संध्याकाळी पाराकडे फिरकायचोच नाही. मात्र दुपारच्या टायमाला पारावर न चुकता आमच्यासारखे लग्नाळु, प्रेमाळु, बेकार सगळेच जमायचे. हाताला काम नाही, ढेकळात हात घालायची इच्छा नाही मग भर दुपारी करायचं तरी काय? घरात मायबापाची वटवट ऐकण्यापेक्षा जो तो पाराची वाट धरायचा. दोन-अडीचच्या दरम्यान तालुक्याच्या गावाहुन येणारी यष्टीबस हेही एक कारण होतंच म्हणा. कॉलेजला जाणाऱ्या पोरी परतायच्या त्या बसने. यष्टी गावाबाहेरच्या फाट्यावर थांबायची. तिथुन गाव होतं दहा मिनिटांच्या अंतरावर. फाट्यावरुन गावापर्यंत त्यांचा रंगबिरंगी घोळका हसत खिदळत चिवचिवाट करत यायचा तेव्हा दुपारच्या टळटळीत उन्हाच्या झळाही जीवाला गोड वाटायच्या, पारावरचे अतृप्त आत्मे भान हरपल्यागत डोळेभरुन नयनसुख घेत रहायचे. कधीतरी एखाद्या नशीबवानाला पलीकडुन प्रतिसाद मिळाल्याचा भास झाला आणि ही गोष्ट पारावर पसरली तर बाकीच्यांची फाट्यावरल्या हाटेलात चार दिवस भजी पावची सोय व्हायची..

आजही असेच सगळे जमले होते. नेहमीप्रमाणे रव्या लहान पोरासारखा दातओठ खात मोबाईल गेममध्ये तुफान गोळीबार करत होता. "याला बॉर्डरवर नेऊन सोडला पाहिजे नाहीतर एक दिवस सगळ्या गावाला गोळ्या घालेल हा." मावा चघळत बसकडे डोळे लावुन बसलेला प्रकाश पुटपुटला.
पलीकडे एका कोपऱ्यात सुऱ्या आणि लल्या गुपचुप मोबाईलमध्ये डोकं खुपसुन बसले होते. कोणी त्यांच्याकडे फिरकलं तरी घाईगडबडीत ते मोबाईल लपवायचे. त्यांचे उद्योग सगळ्यांना माहित झाल्याने आजकाल त्यांच्याकडे कोणी फारसे लक्ष द्यायचे नाही. दुपारचा टाइम असल्याने गॅरेजवाला जमीरही येऊन बसला होता.
अचानक बुंगाट आवाज करत धुरळा उडवत कोणीतरी येताना दिसले.
"बघ रे जम्या कोण बोंबलत येऊन राहिलं." मी मोबाईलवरची नजर न हटवता जमीरला विचारले.
"अरण्याकी गाडी लगती विशुदादा. काटा अस्सी के उप्पर होगा. तुच समजाव त्याला."
हा जमीर म्हणजे एक नमुनाच होता. दहावी नापास पण मोटरसायकलच्या‌ आवाजावरून कोणाची गाडी आहे, कोणत्या स्पीडला आहे, तिच्यामध्ये काय फॉल्ट आहे हे सांगायचा.
आमचं बोलणं संपत नाही तोवर फुफाटा उडवत अरण्या समोर येऊन थांबला.
"काय वाघ मागं लागला व्हय रं तुझ्या? कशाला पळवतो इतकी गाडी? घरच्यांनी विमा काढला वाटतं तुझा?" प्रकाशच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला. अरण्या काही बोलायच्या आत गाडीवर मागे बसलेला बंटी टुणकन उडी मारत उतरुन तोंडातला ऐवज सांभाळत धापा टाकत काहीतरी सांगायचा प्रयत्न करु पहात होता.
"तु काय धावत आलास होय रे याच्या मागं? आधी काय ते चघळुन घे, जरा दम खा आणि मग बोल माझ्याशी. उगाच शर्ट खराब करशील माझा." मी बंटीला सुनावलं.
"तेच सांगतोय मी. पावण्याला सोडायला फाट्यावर गेलो तर हे बेणं मागेच लागलं ताबडतोब पारावर सोड म्हणुन." अरण्या घाम पुसत म्हणाला.
"बंट्या तुला कोण काय बोललं का? तु फक्त नाव सांग." रव्याला चेव चढला.
"तु गप रे. आज तो जिंदगी आबाद हो गयी विशु़भाय. मै भोत खुष हुँ." बंट्याने डायलॉगबाजी सुरु केली.
"ए नौटंकी, आता सरळ सांगतो की देऊ दोन फटके." प्रकाश वैतागला.
"आज यष्टीत ती भेटली ना राव. चारपाच वेळा बघुन हासली यार. आणि मी उतरलो तेव्हा बाय पण केलं. तुच कायतरी कर आता. वाटल्यास वैनीला सांग" बंट्याने आता हात जोडले.

पारावरच्या सगळ्या मेम्बरांना माझं आणि केतकीचं प्रेमप्रकरण ठाऊक होतं..
केतकी..लाईफमध्ये‌ आली आणि आपली जिंदगीच बदलुन गेली.. तिच्यासाठी म्हणुनच मी दुपारच्या टायमाला पारावर यायचो, तिला शब्द दिला होता म्हणुन स्वत:ला दारु-सिग्रेटपासुन दुर ठेवलं होतं..

..नवरात्रीत देवीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा व्हायचा. भान हरपुन गरबा खेळायची ती..आणि मी, मला कुठे येतं तिच्यासारखं नाचता. गर्दीत एका कोपऱ्यात पुतळ्यासारखा उभा राहुन नजरेत साठवत रहायचो तिला आणि तिची नजरही मलाच शोधत रहायची.. काहीही झालं तरी देवीच्या दर्शनाला तिच्यासोबत जायचोच मी. एकमेकांना ओळख न दाखवता जोडीने देवीसमोर हात जोडायचो आम्ही. असं शेजारी हात जोडुन उभे राहिलो की दोघं एका अतुट बंधनात बांधलो गेल्यासारखं वाटायचं.. एका नवरात्रीत तर मंदिराबाहेरच्या रस्त्यावर मोटरसायकल लावुन तिची वाट पहात होतो अन् अचानक काठी टेकत दर्शनाला आलेल्या शेजारच्या आजीने गाठलं.
"बरं झालं बाबा तु इथंच भेटलास. चल आता दर्शनाला. आणि नंतर मला घरी सोडुन दे" माझा हात पकडत आजी म्हणाली. आता नाही पण म्हणता येईना. गुपचुप आजीसोबत गेलो. दर्शन घेऊन बाहेर आलो तर मैत्रिणींसोबत केतकी येतांना दिसली. माझे तर पायच थिजल्यासारखे झाले. "आता का थांबलास? घरी सोडतोस ना मला. आणि हळु चालव गाडी. मला मेलीला घाबरायला होतं" हात घट्ट पकडत आजी‌ म्हणाली. न सांगताही माझी अडचण केतकीने ओळखली अन्‌ गालात हसत हलकेच मानेला नाजुक झटका देत गालावर येणारी केसांची लट कानामागे सरकवली. मी काय ते समजलो आणि आजीला‌ घरी सोडुन सुसाट परतलो तर तिची एका दुकानात कुठल्याशा वस्तुच्या‌ किंमतीवरुन घासाघीस सुरु होती..
"काय घाई होती? मी थांबली होती तुझ्यासाठी." मंदिराबाहेर चप्पल काढताना आपले काळेभोर, पाणीदार टपोरे डोळे माझ्यावर रोखत ती लटक्या रागाने पुटपुटली.. ती अशी रोखुन पहायची तेव्हा निशब्द व्हायचो मी.. आत गेलो तर, "काय रे, तु आत्ताच आला होतास ना? किती वेळा येतोस दर्शनाला? फारंच‌ मोठं मागणं दिसतं बाबा तुझं." असं म्हणत हसतच पुजारीकाकांनी स्वागत केलं. त्यांना काय माहित की जी गोष्ट मागायची होती ती शेजारीच तर उभी होती गालातल्या गालात हसत..
..या सगळ्या गोष्टी पारावरच्या मेम्बरांना माहित होत्या. आणि आपली छोटीमोठी प्रकरणं केतकीच्या मदतीने मार्गी लागावीत ही त्यांची इच्छा. पण मी शक्य तोवर तिला यापासुन दुरच ठेवायचो.

..बंट्याची ष्टोरी ऐकुन जमीरने माझी अडचण ओळखली, "अरे तिचं नाव,गाव,पत्ता कायतरी माहित आहे का? आणि तुला तरी ती ओळखते का? भाभी क्या पुछेगी उसको?"
आमची नैया तीराला लागावी अशी जमीर, प्रकाश, रव्या यांची मनापासुन इच्छा.

"विशुभाय, तुमच्या लग्नात मी जी भरके नाचणार बघ" -जमीर.
"मी कान पिळणार याचा. आणि नंतर नीट संसार केला नाही तर याचा‌ गळाच पकडेल बघाच तुम्ही." -रव्या.
"अरे त्याच्या लग्नात नंतर नाचा, पण आधी‌ माझ्यासाठी पण कायतरी करा ना राव." बंटी काकुळतीला आला.
"हे बघ बंट्या, तुझं तु बघ. तुला‌ काय करायचे ते कर पण वैनी काही मदत करणार नाही." प्रकाश बंटीच्या पाठीवर थाप‌ मारत म्हणाला. बंटी जरा धुसफुसतच गेला. मला काही हे ठीक वाटले नाही..
"आलं लक्षात, तीच आसंल. कानाला हेडफोन लावुन हातवारे करत बोलत असते ती. समोरच्याला वाटतं आपल्यालाच खाणाखुणा करते. मागं आम्हीपण फसलो व्हतो." बंट्या गेल्यावर आमचं बोलणं ऐकत असलेला सुऱ्याने हळुच तोंड उघडले.
"अरे पण सांगायचं ना आधी. उगाच अडचणीत येईल तो." मी काळजीपोटी म्हणालो.
"येऊ दे ना अडचणीत. चार फटके बसले तर सुधरेल तरी तो.म्हणे वैनीला सांग." रव्याच्या हे बोलणं सगळ्यांनाच पटलं मग मी पण गप्प बसलो.

..यांचं हे असं होतं. मागे केतकीला स्कुटर शिकायची होती. ही गोष्ट समजताच या लोकांनी रव्याच्या काकाची धुळ खात पडलेली स्कुटर ढकलत जम्याच्या गॅरेजला आणली. चार दिवस मेहनत घेऊन जम्याने ती दुरुस्तही केली.पण आता तिला आम्ही लोकांनी गाडी शिकवायची म्हटलं तर साऱ्या गावात चर्चा झाली असती. मग पमीच्या हातापाया पडणं आलंच. पमी..प्रमिला, प्रकाशची बहिण, तिच्यामुळेच केतकीशी ओळख झाली होती. ही पमी भन्नाट मोटरसायकल चालवायची. पण प्रकाश काही घरच्या गाडीला‌ हात लावु द्यायचा नाही. मग तिचा माझ्याकडे हट्ट "जरा बाइकची चावी दे रे विशुदादा."
"विश्या‌ तिला चावी देऊ नको. ती कशी चालवते तुला माहित नाही. भंगारात पण घेणार नाही तुझी गाडी‌."
"पमे, गाडी भंगारात गेली तर चालेल पण तु सांभाळ स्वत:ला." पमीकडे चावी फेकत मी म्हणायचो.
या पमीचं प्रकाशहुन अधिक रव्या-जम्याशीच भांडण सुरु‌ असायचं आणि मला त्यांच्या भांडण्यात न्यायनिवाडा करावा लागायचा.. निकाल अर्थातच पमीच्या बाजुने..
"पमुदीदी थोडा काम था." भलीमोठी कॅटबरी पमीच्या हातात ठेवत जमीर म्हणाला.
"अय्या..पमीवरुन डायरेक पमुदीदी, वो भी कॅटबरी के साथ. नक्कीच मोठं काम दिसतं. आणि‌ तु काय आणलंस रवीभैया? हे बघा एखाद्या मुलीची माहिती काढायची असेल तर मला सांगुपण नका. सांगा तुमच्या वैनीला." पमी फणकाऱ्यात म्हणाली.
"वैनीला स्कुटर शिकवायचीये."
"नको बाबा तुमची स्कुटर भंगारात निघायची." प्रकाशकडे पहात पमीचा टोमणा.
"अगं, तु शिकवशील म्हणुन खटारा गाडीच शोधलीये आम्ही. तुला फक्त थोडाफार धक्का मारावा लागेल बंद पडल्यावर." रव्या खिदळत म्हणाला.
"तु का नव्या नवरीसारखा लाजतोहेस रे विशुदादा. त्या केतकीने काय पाहिलं तुझ्यात तिलाच माहित. तुमच्याकडे पाहुन नाही तर ती माझी मैत्रीण आहे म्हणुन शिकवेल तिला. घ्या ही‌ कॅटबरी परत. नाहीतरी राखीपोर्णीमेला सकाळी ओवाळणी टाकता आणि संध्याकाळी परत मागता तुम्हीलोक."
"हमेशा रुलाती है ये पगली." असं म्हणत जम्याने चटकन हात पुढे केला.
"जा रे शाण्या. मोठा आला कॅटबरी परत घेणारा. त्या खटाऱ्याची चावी द्या आधी. ट्रायल घ्यायचीये मला. तुमची वैनी पडली बिडली तर मलाच बोलाल सगळे."

...असे दिवस मजेत चालले होते. केतकीचे बाबा नुकतेच नोकरीतुन रिटायर झाले होते. तर आजोबांपासुन आमचं घर राजकारणात. दोन्ही काका, वडील, चुलत भाऊ सगळेच राजकारणी. पण मी मात्र स्वत:ला दुर ठेवलं होतं या सगळ्यांपासुन.. गावातलं राजकारण, भांडणं यापासुन कितीतरी दुर होतो मी.. घरची मदत न घेता मला स्वत:च्या पायावर उभं राहायचं होतं म्हणुन माझे नोकरीसाठी जोरात प्रयत्न सुरु होते.. यावरुन घरातले सगळे हसायचे मला.. नोकरी लागताच केतकीच्या घरी हात मागायला जायचं असं ठरवल होतं मी..

शेवटी व्हायचं तेच झालं.. बंट्याला चांगलाच चोप बसल्याची बातमी साऱ्या गावाला कळली. त्या दिवशी आम्ही मदत करायचं नाकारलं ही गोष्ट डोक्यात ठेऊन तो जास्तच चेकाळल्यासारखा वागायला लागला. माझ्याशी तर जणु‌ सातजन्माची दुश्मनी होती त्याची. अरण्या, रव्या यांनी त्याला समजावलंही होतं, पण गडी ऐकेच ना.‌.

"दुपारी काय करता रे तुम्ही पारावर गोळा होऊन?" नेहमीप्रमाणे चप्पल पायात घालुन घराबाहेर पाय ठेवणार तोच आईसाहेबांनी टोकलं. "जरा पोटापाण्याचं बघ आता. नोकरी मिळत नाही तर घरच्या कामधंद्याकडे तरी लक्ष दे. अशाने कोण पोरगी देईल तुला? आवो ऐकलं का, तुम्हीच लाडावुन ठेवलाये याला." नेहमीप्रमाणे कारण नसताना आईसाहेबांनी आबांना संभाषणात ओढलं.
"आरं तिच्या..! आम्हाला माहीतच नव्हतं याला आम्ही लाडावलं म्हणुन. आणि याला कोण पोरगी देईल आसं म्हणु नका. तुम्हाला साजेशीच सुन मिळेल बघा." आबा हसत म्हणाले अन् माझ्या डोळ्यासमोर केतकीचा चेहरा तरळुन गेला.

...बंट्याच्या प्रकारामुळे दुपारची पारावरची फेरी जवळपास बंदच झाली होती. जमीरला गॅरेजमधुन वेळ भेटत नव्हता. प्रकाश- रव्याही आपापल्या उद्योगात व्यस्त होत चालले होते. "आपण जास्त नको भेटायला." एका भेटीत केतकी नजर चुकवत म्हणाली. 'भेटायचं नाही..!' अंगावर एकदम काटाच आला, पण तिचही सांगणं बरोबरच होतं. काही दिवस नकोच भेटायला..
....तो दिवस, अजुनही डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा रहातो. माझ्या खोलीत मी कुठल्याशा परीक्षेचा अभ्यास करत बसलो होतो. "आबासाहेब आहेत का घरात." बाहेरुन कोणाचातरी.. नाही नक्की केतकीच्या बाबांचाच आवाज होता तो. मी कान देऊन ऐकु लागलो.
"अहो या, या! आपण आज गरीबाघरीे आलात, धन्य झालो बघा." आबांनी मधाळ आवाजात स्वागत केलं.
"आबासाहेब, औपचारिकता राहु द्या बाजुला आणि हे पत्र वाचा." केतकीच्या बाबांचा आवाज जरा वाढला होता. माझे तर प्राणच कंठाशी आले.
"आवो बसातरी घटकाभर. उभ्यानेच बोलणार की काय तुम्ही. काय वाटते तुम्हाला, सगळ्या गावची खबर ठेवतो आम्ही आणि एकुलत्या एक पोरावर लक्ष नसणार? तुमच्या लेकीमुळे शिस्त लागलीये पोराला. गरज नसतानाही नोकरी करायची म्हणतो तो. आम्हीच येणार होतो बघा, पण सवड भेटेना. आवो ऐकलं का, जरा चहा‌ टाका." आबा साखरेहुन गोड झाले होते.
"तुमच्याकडुन ही अपेक्षा नव्हती आबासाहेब. वाटले होते तुम्ही समजवाल तुमच्या मुलाला. आम्ही लहान माणसं, आपल्यासारख्या मोठ्या लोकांसमोर अंग चोरुन जगावं हेच खरं. येतो मी." असं म्हणत केतकीचे बाबा गेलेसुध्दा.
मला तर सुन्न झाल्यासारखे वाटत होते. काहीच सुचेना. कितीतरी वेळ तसाच बसून होतो. केतकीच्या मोबाईलवर फोन लावला तर फोन बंद. खोलीत तरी असा थिजल्यासारखा किती वेळ बसुन रहाणार? शेवटी मनाचा हिय्या करुन बाहेर आलो तर आबा शांतपणे टॉम्याच्या डोक्यावरुन हात फिरवत होते. मला बघताच काही घडलंच नाही असं दाखवत जवळ बसवुन गप्पा मारायला सुरुवात केली. किती तरी वेळ ते बोलत होते. "हे बघ बेटा, तुला जे पायजे ते आम्ही द्यायचा प्रयत्न केला. पण आमच्याही काही इच्छा आहेत. तु आता मला मदत करावी असं वाटतं. या मुक्या जनावराला आमचं मन समजतं पण तु मुलगा असुनही.." टॉम्याकडे बोट दाखवत आबा कातरत्या आवाजात म्हणाले..

..त्या दिवसानंतर केतकी कधी दिसलीच नाही. ती पमीलाही काही सांगुन गेली नाही ना काही निरोप ठेवला. तिच्या घराला सतत कुलुपच दिसायचे. शेजारी विचारले तर ते अचानक गाव सोडुन गेले, कुठे गेले माहित नाही इतकंच समजले..

.." बंट्यानेच वैनीच्या बापाला लेटर पाठवलं होतं. काल रात्री विश्याचा कसा गेम केला म्हणुन त्याच्या दोस्तांमध्ये फुशारक्या मारत सांगत होता." सुऱ्याने आम्हाला बातमी दिली. हे ऐकुन जम्या-रव्या तर पेटुनच उठले. पण मीच अडवलं त्यांना. त्याला मारुन केतकी परत थोडीच येणार होती.

केतकी गेली अन् आयुष्याचं सगळं गणितच बदलुन गेलं. नोकरीचं स्वप्न तर पाचोळ्यासारखं उडुन गेलं. अभ्यासाची पुस्तकं पडली आहेत माळ्यावर धुळ खात. तशी सगळ्याच आठवणींवर धुळ साचतेय म्हणा. सगळे मित्र आपापल्या उद्योगाला लागलेत, संसारात रमलेत. पमीही तिच्या संसारात रमलीये. गावातच घर आहे तिचं. राखी बांधायला अजुनही जातो सगळे तिच्या घरी. पण आता पुर्वीसारखी भांडण होत नाही, 'चावी दे रे विशुदादा' म्हणुन ती हट्टही करत नाही. केतकीचा विषय तर कुणीही काढत नाही. पण तो एकच तर विषय आहे जो माझ्या मनातुन जात नाही. आजकाल आबांना व्यवसायात मदत करतोय, कामात मन रमवतोय. पोरगा उद्योगाला लागला म्हणुन आईसाहेबांनाही लग्नाची घाई लागलीये पोराच्या. मी मात्र सफाईने टाळतो हा विषय. सगळे पुढे निघालेत आणि आपण मात्र होतो तिथेच रेंगाळलो आहोत असं वाटतं कधी कधी.

..दरवर्षी देवीच्या उत्सवाची तयारी महिनाभर‌ आधीच सुरु होते. लांबलांबुन भाविक येतात दर्शनाला. यावेळच्या उत्सवाचे नियोजन करण्यासाठी आम्ही काहीजण मंदिरासमोर जमलो होतो. तावातावाने आमची चर्चा सुरु होती. अचानक एक आलिशान कार मंदिरासमोर येऊन थांबली. 'कोण आलंय दर्शनाला' असा विचार मनात येतो न येतो तोच कारमधुन केतकी उतरली, सोबत एकजण.. बहुदा तिचा पती असावा आणि एक लहान मुलगा. मला तर काळच थांबल्यासारखा वाटला. आमच्याकडे जराही लक्ष न देता ती त्यांना गावाची, मंदिराची माहिती देत दर्शनाला गेली.. सगळेच स्तब्ध.. जरावेळाने त्यांना परत येतांना पाहुन प्रकाश पुढे झाला, त्यांची विचारपुस केली. तीही ओळख दाखवत मनमोकळी बोलली प्रकाशबरोबर, नवऱ्याची, मुलाची ओळख करुन दिली. पमीबद्दल विचारलं, जम्या-रव्याची चौकशी केली. पमी इथेच रहाते म्हटल्यावर तिला भेटायलाही निघाली. पण.. माझ्याबद्दल काही विचारलंही नाही, चौकशी तर सोडाच साधा कटाक्षही टाकला नाही. जणु काही मी अस्तित्वातच नव्हतो..
प्रकाश गेला त्यांच्याबरोबर पमीचं घर दाखवायला.. आणि इथे माझा जीव टांगणीला.. साधं विचारलंही नाही! इतका परका‌ होतो? की नवऱ्याला मी काही बोलेल ही भीती? असं असेल तर तिने ओळखलंच नाही मला..
संध्याकाळी प्रकाशला घेऊन पमीच्या घरी गेलो.. माझ्याबद्दल काही तरी विषय निघाला असेल, विचारले असेल ही वेडी आशा.. मला पाहुन पमी काय ते समजली आणि "नाही. तुझ्याबद्दल काहीच विचारलं नाही. ती खुष आहे तिच्या संसारात. आता तरी सावर रे विशुदादा" असे म्हणत तोंड फिरवुन घेतलं.
..सगळेच आपआपल्या वाटेने पुढे गेलेत आणि मी मात्र तिथेच थांबलो.. नाही, आता निदान आबा-आईसाहेबांसाठी तरी नवी सुरुवात करावीच लागेल.. कोण आहे त्यांना माझ्याशिवाय? कसलंस ओझं दुर होत होतं.. मनात निर्धार पक्का होत होता..
----
केतकी: त्या दिवशी अचानक पमी दिसली. सुरुवातीला ओळखलंच नाही तिला. किती बदलली ती.. आग्रहाने आमच्या बंगल्यावर घेऊन गेली तिला. भलामोठा बंगला, नोकरचाकर बघुन थोडी बावरलीच होती ती. पण नंतर खुपच गप्पा रंगल्या. शाळा-कॉलेजमधल्या गमतीजमती, सगळ्या मैत्रीणींनी मिळुन केलेली धमाल..एकामागोमाग एक आठवणी निघत होत्या आणि विशालची आठवण निघाली.. जाणीवपुर्वक खुप खोल दडवुन ठेवलेली, सगळ्यांपासुन लपवुन ठेवलेली वेदना बाहेर पडली..
"किती वेडे होतो नाही आम्ही, तो सगळा वेडेपणा आठवुन हसायला येते आता." मी हसत म्हणाली. पमी मात्र कुठेतरी हरवली होती.
"तुझ्यासाठी तो वेडेपणा असेलही कदाचित, पण विशुदादा खरोखरच वेडा आहे गं! आजही तो तुझ्या आठवणीत जगतोय. कुणाला काहीच सांगत नसला तरी समजतं सगळ्यांना" पमीचे शब्द कानात शिसं ओतावं तसे शिरत होते.. तो माझ्या आठवणीत जगतोय? इथे आदित्यला, माझ्या नवऱ्याला कामाच्या व्यापात माझी आठवणही नसते आणि हा.. विश्वासच बसत नाही. हा बंगला, गाड्या, नोकरचाकर, दागिने याच्यातच मी सुख शोधत होती. इतरांना तर हेवा वाटत होता माझा..
"केतकी माझं ऐकशील? एकदा येशील गावात? तुला तुझ्या संसारात सुखी झालेलं पाहुन कदाचित तो भानावर येईल. कदाचित पुन्हा नव्याने जगायला सुरुवातही करेल." पमी हात जोडुन विनवत होती. तिच्याच सांगण्यावरुन मी गावात आली होती..
पमे काय केलंस हे तु. अज्ञानात सुख असते असं म्हणतात, मला सुखी पाहुन तो कदाचित सावरेलही. तुम्ही सारे आहातच त्याच्या आधाराला. पण मला वास्तवाची जाणीव करुन पुन्हा त्याच वळणावर नेऊन ठेवलं त्याचं काय..मला कोण सावरणार..?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अतिशय सुंदर आणि खिळवून ठेवणारी कथा..!!
गावातलं वातावरण आणि घडणाऱ्या गंमती जमती कथेत उत्तम साकारल्या आहेत..
अजून एक म्हणजे कथेला विनोदाची आणि गांभिर्याची जोड देण्याची कला तुम्हांला छान जमू लागलीयं..!

हाआ, अनुजी, रुपालीजी, सामोजी, वावेजी, धनुडीजी, जे.बॉण्ड, मानवजी, अनघाजी आपल्या सर्वांना मनापासुन धन्यवाद.

गावातलं वातावरण, मित्रांची आपसांतली बोलण्याची स्टाइल - हे छान. छोट्या-छोट्या सिच्युएशन्सही आवडल्या.
संवाद, निवेदन मात्र ७०-८०च्या दशकांतले वाटतात.
केतकीचा पार्ट आणखी थोडा वाढवून, रंगवून लिहिला तर वाचायला आणखी मजा येईल.

उर्मिलाजी, अंजलीजी, ललिता-प्रितीजी मनापासून धन्यवाद.
ललिता-प्रितीजी आपल्या सूचनांचे स्वागत. नक्की विचार करतो.

अरे मस्त.. अश्या शैलीतले लिखाण छानच जमू लागलेय तुम्हाला. पण यातली कथाही भन्नाट जमली आहे. शेवट रेंगाळला मनात !

शेवट मस्त झालाय. अगदी ७०-८० नाही पण ९० - २००० च्या दशकातला काळ वाटतो आहे. मोबाईलवाले पोट्टे फार बदलले आहेत असे वाटते आता.

Pages