ज्यांना लेख वाचायला बोअर होईल त्यांनी थेट विडिओ बघितला तरी चालेल.
National Hair Day - 1 October - ऋन्मेष Runmesh
लिंक - https://www.youtube.com/watch?v=T5lkycN3k18
------------------------------------
ऐंशीचे दशक असावे. एका प्रसूतिगृहात ऑपरेशन थिएटरबाहेर शशी कपूरसारखा दिसणारा कुरळ्या कुरळ्या केसांचा एक युवक येरझार्या घालत होता. येणारा बालक अमिताभसारखा जन्माला यावा अशी त्याची ईच्छा होती. बालकाला स्वतःला कदाचित शाहरूखसारखे निपजावे असे वाटत असावे. पण डॅम ईट, तेव्हा मुलांच्या ईच्छेला विचारतेय कोण?
बालक जन्माला आले तेच तब्बल ४.५ किलो वजनाचे. जयच्या जागी वीरू आला.. कि गब्बर झाला?? तेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये कोणाला आत शिरायची परवानगी नसायची. त्यामुळे बालक ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येण्याआधी दोन वार्ता आतून बाहेर आल्या. पहिली म्हणजे पेढे वाटा, मुलगा झाला आणि दुसरी म्हणजे ४.५ किलोचा वरवंटा झाला, आता त्यानेच पेढे वाटा.
घरच्यांना मात्र सुदृढ बालक जन्माला आले याचा कोण आनंद झाला. पण ऑपरेशन थिएटरात मात्र वेगळीच धांदल उडाली होती. डोक्यावरचे घनदाट केसांचे जंगल पाहून कोण हे जंगली बालक निपजले असे सर्व नर्स आपापसात कुजबूजू लागल्या. ईथे मातोश्री सिझरींग झाल्याने मुर्च्छितावस्थेतच होत्या. त्यांनी डोळे उघडून बघावे आणि पुन्हा मुर्च्छितावस्थेत जावे अशी कोणाचीही ईच्छा नव्हती. त्यामुळे आतल्या आतच एक कट रचला गेला. नवजात शिशुचा कोणाच्याही परवानगीशिवाय हेअर कट केला गेला. आता बालकाचे सुधारीत वजन भरले तब्बल ३.२५ किलो. लावा हिशोब!
या जगात आलो ते पहिल्याच दिवशी मी माझ्या आयुष्यातील पहिली केसांची कुर्बानी दिली. ते देखील अगदी तासाभराच्या आत. पण पुढे एका मराठमोळ्या मध्यमवर्गीय घरातील कर्ता पुरुष म्हणून जगताना आयुष्यभर मला हा त्याग करायचाच आहे याची तेव्हा मला कल्पना नव्हती.
एकवेळ कुत्र्याचे शेपूट सरळ होईल, पण या ऋन्मेषचे केस नाही. असे टोमणे ऐकण्यातच माझे बालपण गेले. कितीही कापले तरी दाटीवाटीने पुन्हा वाढायचे. पुर्ण टक्कल मी करू द्यायचो नाही. आणि दर महिन्याला केस कापावे असे तेव्हा घरच्या परिस्थितीमुळे बजेट नसायचे. त्यामुळे शाळेत गेले की वॉचमनपासून बाईंपर्यंत आणि मॉनिटरपासून वर्गमित्रांपर्यंत, सारे जण माझे केस मुठीत पकडून गदागदा हलवायचे. आणि मला शाळेचे शिस्तीचे नियम सांगायचे.
केसांची वाढ जास्त होती ही खरे तर समस्या नव्हती, पण ते दाट होते ही खरी अडचण होती. त्यामुळे न्हावी सुद्धा नेहमी माझ्यावर डाफरायचा. तुझ्यामुळे माझ्या कात्रीची धार जाते म्हणून ओरडायचा. तुझ्या केसांत माझे कंगवे हरवतात म्हणून चिडायचा. त्यामुळे केसांचा कुठला स्टायलिश कट मारणे दूरची गोष्ट, जे पहिला हाताला वा कात्रीला लागतील ते सटासट कापत सुटायचा.
पाण्याचा स्प्रे नाही तर तांब्यातांब्याने पाणी ओतायचा. केस कापून झाल्यावर तो केसपाण्याचा चिखल झाडू घेऊन मलाच साफ करायला लावायचा. माझ्या केसांचे कापण्याआधी सलूनवाला फोटो काढायचा. तो Before Cut म्हणून लाऊन सोबत After Cut म्हणून दुसर्या एखाद्याचे डोके दाखवायचा. पण त्याच्यावर कोणी विश्वास नाही ठेवायचा. कारण त्यातले पहिले डोके म्हणजे माझे केस त्या सलूनच्या पंचक्रोशीत कुप्रसिद्ध होते. मी केस कापायच्या खुर्चीमध्ये वा रांगेत बसलो आहे हे पाहून मागाहून आलेले गिर्हाईक तिथेच थबकायचे. एक छोटीशी झोप काढून येऊया म्हणून आल्यापावली परत फिरायचे. ते बघून न्हावी अजून चरफडायचा. कारण त्यामुळे त्याचा धंदा जायचा. तुझ्यापेक्षा रावणाची हजामत करणे परवडेल असे बोलायचा. कारण केस कितीही आणि कसेही असले तरी हेअरकटचा रेट दरडोई ठरलेला असायचा.
न्हावी तरी परका होता. मित्रांमध्येही माझे केस टिंगलटवाळीचाच विषय होते. झिपर्या हे माझे टोपणनाव होते. माझ्या केसांची तुलना भांडी घासायच्या किशीपासून आपल्या काखेतल्या केसांपर्यंत करणे हा त्यांचा छंद होता. मारामारी झाली की सर्वात पहिले माझे केस धरले जायचे. ते खेचले की माझी मानगूट आयतीच हातात यायची. पण वयात येऊ लागलो तसे भलतेच प्रेमळ अनुभव येऊ लागले. ज्या मित्रांना गर्लफ्रेंड नव्हती ते बसल्याबसल्या माझ्या केसांतून हात फिरवत राहायचे. पण माझे दुर्दैवही असे की जोपर्यंत त्यांचा हात मनगटापर्यंत आत जाऊन अडकायचा नाही तोपर्यंत मला ते कळायचेही नाही.
मित्र तरी बाहेरचे होते. घरातही फार काही चांगली वागणूक मिळायची नाही. दुसर्या घरांमध्ये पोरगा पावसात भिजून आला की त्याला पहिले टॉवेल देत असावेत. मला दाराबाहेरच थांबवून भांडे हातात द्यायचे. आणि त्यात केस पिळून घ्यायला लावायचे. तुझ्या केसांच्या तेलपाण्यावर खर्च करतोय म्हणून बोलून दाखवायचे. आणि परीक्षा नसतानाही अभ्यास करायला लावायचे. टक्कल कर, टक्कल कर, म्हणून मागे लागायचे. त्या केसांच्या टोपल्यामुळे डोक्यात काही शिरत नाही म्हणून शिमगा करायचे.
कधी त्यांच्या पहिल्या हाकेला ओ न दिल्यास त्याला जबाबदार माझे कानावर आलेले केसच असायचे. तर कधी घरातली एखादी वस्तू मला न सापडल्यास त्यालाही कारणीभूत माझी डोळ्यांवर आलेली जुल्फेच असायची. घरी कोणाला आपला कंगवा सापडला नाही तर उगाच माझ्या केसांत हात आणि डोके खुपसून शोधून जायचे. ऊठसूठ तुझे लग्न शमशूद्दीन न्हाव्याच्या पोरीशीच लावायला हवे अशी धमकी द्यायचे. आणि त्याच्या कधीही न पाहिलेल्या मुलीच्या जागी त्याचाच चेहरा डोळ्यासमोर येऊन माझ्या पोटात गोळे यायचे.
कदाचित केस दाट असणे ईतकीही मोठी समस्या नसावी. ते कित्येकांचे असावेत. पण त्यांची वाढ सरळ न होता एकमेकांच्या वाकड्यात शिरून होत असल्याने, ते व्यवस्थित विंचरता न येणे ही खरी माझी समस्या होती. आंघोळ करून बाहेर आल्याआल्या पहिल्या दोनेक मिनिटात केस न पुसता ओलेओले असतानाच मी जे काही विंचरून घ्यायचो ती माझी त्या दिवसभराची हेअरस्टाईल असायची. जी संध्याकाळ होता होता आणखी गुंतागुंतीची आणि घट्ट होऊन जायची, जिला मग धक्का लावणे अशक्य व्हायचे.
मी शाळा कॉलेजात असताना बरीच मुले मागच्या पाकिटात एक छोटासा कंगवा ठेवायचे. वॉशरूममध्ये तो मागच्या खिशातून स्टाईलमधून काढून केसातून हलकासा फिरवून केसांचा कोंबडा सेट करणे ही तेव्हा उच्चकोटीची स्टाईल समजली जायची. माझ्या केसांसाठी तो कंगवा वापरणे म्हणजे करकोच्याने बशीतून चहा पिण्याचा प्रकार होता. पण तरीही एकदा त्या स्टाईलची अॅक्टींग करायचा मोह न आवरल्याने मी मधल्या सुट्टीत एका मित्राचा कंगवा हळूच चोरला होता. मग काय. तो घेतला, तो फिरवला, तो अडकला!
बरे, तो अडकलाही अगदी सुरुवातीलाच की निघतही नव्हता आणि लपवावे तर फार आतही जात नव्हता. तसाच तो कपाळावर केसांच्या बटेसह झुलत होता. एखाद्याच्या केसांमध्ये चिकटलेले च्युईंगम प्रयत्न करता निघावे पण माझ्या केसातला कंगवा निघत नव्हता. अखेर त्या कंगव्याच्या लांबी एवढ्या जागेतील केस कापूनच तो काढावा लागला. त्यानंतर पुढचा केस कापायचा दिवस उजाडेपर्यंत तोच माझा कट होता. कारण आम्हा मध्यमवर्गीय घरांमध्ये महिन्याचे बजेट फिक्स असायचे.
पुढे मी जॉबला लागलो तेव्हा आमची आर्थिक परीस्थिती सुधारली. वेळच्यावेळी वा हवे तेव्हा केस कापायची कुवत आली. पण हवे तसे कापू शकत नव्हतो. कारण केसांचे जे जंजाळ होते त्यातून कुठलीही हेअरस्टाईल उगवणे अशक्यच होते. आणि अश्यातच crohn's disease नावाचा सवंगडी माझ्या आयुष्यात आला. आणि तुम्हाला तर माहीतच असेल,
Evidence shows a link between Crohn's and the autoimmune disorder known as Alopecia Areata, which causes sudden hair loss when your immune system attacks your hair follicles leading to coinsized patches of hair falling out....
मातृभाषेत सांगायचे झाल्यास या आजारामुळे माझे बरेपैकी केस गळून गेले. पण होत्याचे नव्हते नाही झाले. तर जे अतिरीक्त मला नकोच होते ते गेले. मी माणसात आलो. शिल्लक केसांना आता जास्त चटईक्षेत्र उपलब्ध झाले. केसांच्या शेंड्यांना मोकळा श्वास घेता येऊ लागला. वार्यासोबत ते फडफडू लागले. त्यावर हलकेच सोडलेले तेलाचे ओघळ आता मूळापर्यंत जाऊ लागले. आधी जरा वाढताच एकमेकांचे गळा धरणारे केस आता स्वतंत्रपणे वाढण्यास सज्ज होते. पण हाय रे दैवा........
दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत...
केस आहेत तर कंगवा नाही, कंगवा आहे तर केस नाहीत...
पण आज माझ्याकडे केस, कंगवा आणि माँ .. सारे काही होते.
नव्हती ती केस वाढवायची परवानगी.
मी एका एमेनसीत कामाला लागलो होतो. सोफेस्टीकेटेड वातावरण आणि देशी परदेशी क्लायंटसोबत उठबस. त्यामुळे नीटनेटकेपणा बाबत पुरेसे शिस्तीचे असलेले एचआर पॉलिसीचे नियम. ज्यात लांब वाढलेल्या केसांना कुठलेही स्थान नव्हते. जिथे C फॉर Cool नाही तर C फॉर Concrete होते. S फॉर Style नाही तर S फॉर Steel होते.
अजून काही वर्षे अशीच गेली. केस वाढवायला मिळावेत केवळ ईतक्यासाठीच जॉब सोडावा अशी स्थिती नव्हती. अन्यथा बायका पोरे आणि केसांसह रस्त्यावर आलो असतो. आज न उद्या, हा आजार आपले शिल्लक केसही संपवणार आणि मनसोक्त केस वाढवणे हे आपले स्वप्नच राहणार, हे टकले सत्य मी हळूहळू स्विकारले होते.
पुढे दोन मुले झाली. एक मुलगी आणि एक मुलगा झाला. मुलाचे लांबसडक सिल्की केस पाहून मनोमन ठरवले. आपण याच्या केसांचा कंगवा बनायचे. त्यांना आधार द्यायचा, त्यांना वळण द्यायचे. आपले केस वाढवायचे अधुरे स्वप्न आता याच्या डोक्यावर पुरे होताना बघायचे. पण कसले काय. पोरांचे दोन्ही आज्जी आजोबा त्यांच्यावर आपला पहिला मालकी हक्क राखून होते. लहान मुलांचे केस वाढवायचे नाहीत हे संस्कार अजूनही आमच्या घरात शाबूत होते. ना मला वाढवता येत होते ना त्यांचे वाढवू शकत होतो.
आणि मग एक दिवस कोरोना आला आणि लॉकडाऊन लागला...
वर्क फ्रॉम होम आले. सलून बंद झाले. घरबसल्या केसांचे छप्पर रपारप वाढू लागले. आधी चापून चोपून तेल लावणे, मग हेअरबॅंड घालणे, मग वेणी बांधणे.. बघता बघता केसांची केस डोक्याबाहेर गेली.
कधी स्वप्नातही असा विचार केला नव्हता की जो काळ जगासाठी वा मनुष्यजातीसाठी एखाद्या दु:स्वप्नासारखे विसरून जावे असा असेल तो माझ्यासाठी काही स्वप्नपुर्तीचे क्षण घेऊन येणारा असेल.
थोडे केस माझे वाढवले, थोडेसे आपसूक मुलाचेही वाढले. उद्या पुन्हा जनजीवन सुरळीत होता, ऑफिस पुन्हा पहिल्यासारखे चालू होता आपल्याला पुन्हा केसांवर कात्री चालवावी लागणार याची कल्पना होती. त्यामुळे या दिवसांची आठवण म्हणून या काळात बरेच काही फोटो काढले. एक विडिओ मुलासोबतही काढला. क्या पता..! फिर दोनों के ये बाल, कल हो ना हो..
बस्स तोच विडिओ येत्या नॅशनल हेअर डे (१ ऑक्टोबर) च्या निमित्ताने शेअर करतोय
केसांची रोज काळजी घ्या. केस कसेही का असेनात, केसांना लाजू नका. माझे केस माझा अभिमान ही भावना मनात कायम बाळगा. देवाने त्यांना आपल्या शरीरात सर्वोच्च स्थान दिले आहे त्याचा आदर ठेवा. वगैरे वगैरे संदेश मी या निमित्ताने देऊ ईच्छितो
विडिओ खालील लिंकवर बघू शकता.
National Hair Day - 1 October - ऋन्मेष Runmesh
लिंक - https://www.youtube.com/watch?v=T5lkycN3k18
धन्यवाद,
ऋन्मेऽऽष
मस्त!
मस्त!
माझ्या एका भावाचे केस कुरळे होते. त्याची सख्खी बहीण आणि आई याही कुरळ्या केसवाल्या. त्यामुळे या भावाची लग्नासाठी मुलगी बघताना पहिली अट होती की बायकोचे केस सरळ हवेत. निदान मुलांचे केस कुरळे होणार नाहीत अशी आशा. तरी आता त्यांच्या मुलीचे केस कुरळेच आहेत आणि ह्याला चकाचक टक्कल आहे.
आता त्यांच्या मुलीचे केस
आता त्यांच्या मुलीचे केस कुरळेच आहेत आणि ह्याला चकाचक टक्कल आहे >>>>> केस हे लक्ष्मीपेक्षाही चंचल असतात
वावे
वावे
पण वयात येऊ लागलो तसे भलतेच प्रेमळ अनुभव येऊ लागले. ज्या मित्रांना गर्लफ्रेंड नव्हती ते बसल्याबसल्या माझ्या केसांतून हात फिरवत राहायचे. पण माझे दुर्दैवही असे की जोपर्यंत त्यांचा हात मनगटापर्यंत आत जाऊन अडकायचा नाही तोपर्यंत मला ते कळायचेही नाही. >> "......."
भारी लेख आणि व्हिडिओ
भारी लेख आणि व्हिडिओ
भन्नाट लिहीलयस
भन्नाट लिहीलयस , हो व्हिडिओ पण स्टाईल मध्ये
भारीच लिहिलं कि..मज्जा आली
भारीच लिहिलं कि..मज्जा आली वाचायला.
धीवरा पण मस्तैय
परीक्षा नसतानाही अभ्यास करायला लावायचे. >>>>> हे पण भारीए.
ॠ , तुझ्या झिपर्या आहेत ,
ॠ , तुझ्या झिपर्या आहेत , खर्या ॠ चे केस मात्र मस्तच आहेत
धीवरा मस्तैय .
एकंदरीतच , या लॉकडाउन मध्ये अनेक मुलांनी आपली केस वाढवायची हौस भागवून घेतली .
भारीच लिहिलं कि..मज्जा आली
भारीच लिहिलं कि..मज्जा आली वाचायला.>>+१
माझ्या भावानेही दहावीची परिक्षा झाल्यावर केस वाढवले होते. काही मित्रमैत्रिणी त्याला मोगली म्हणायचे पण माझ्यामते त्याला कूल दिसायचे वाढवलेले केस. बिचारा अनुवंशिकतेचा बळी झाला आणि त्याच्या लग्नापर्यंत "चंद्र्माशी सलगी" वाढली. अर्थात माझ्यामते त्याला बाल्ड लूक पण कूलच दिसतो
ॠ , तुझ्या झिपर्या आहेत ,
ॠ , तुझ्या झिपर्या आहेत , खर्या ॠ चे केस मात्र मस्तच आहेत Wink
>>>
खरा खोटा नको ओ.. सिनिअर ज्युनिअर बोला
पण येस्स त्याचे छानच आहेत सध्यातरी. आणि चेहरा नाजूक असल्याने शोभतातही. लहानपणी माझे केस माझ्यासाठी एक समस्याच असल्याने मला सिल्की केस असलेल्यांचा फार हेवा वाटायचा. पण तरीही माझ्या बायकोला वाटते की ज्यु. ऋ ला माझ्यासारखे दाट केस हवे होते. कदाचित तिने माझे आताचेच रूप पाहिलेय. पण बालपणी या केसांमुळे मी किती भोगलेय याची तिला कल्पना नाही. वर जरी विनोदी ढंगात लिहिले असले तरी तेव्हा केसांची थट्टामस्करी, अवहेलनाच व्हायची हे तितकेच खरे आहे.
अर्थात माझ्यामते त्याला बाल्ड लूक पण कूलच दिसतो >>>> हो, तशीच पर्सनॅलिटी असेल, डोक्याचा शेप आणि स्किन चांगली असेल तर नक्कीच दिसतो. किंबहुना शोभतेय म्हणून मुद्दाम पुर्ण टक्कल करणारेही असतात.
भारी केस आहे तुमची !!!
भारी केस आहे तुमची !!!
केश कथन मस्तच जमलय.
केश कथन मस्तच जमलय.
bdw, त्या व्हिडीओ च्या खाली suggestions madhe हेअर स्टाईल व्हिडिओज बरोबरच महेश काळे चा फोटो पण आला त्याची पण हीच केस असू शकते.
महेश काळे चा फोटो पण आला
महेश काळे चा फोटो पण आला Happy
>>>>>>>>>
कदाचित महेश काळे यांचे केस रावनच्या पैल्या शाहरूख खान सारखे असल्याने ते माझ्या विडिओसोबत सजेस्ट झाले असावे
केससांभारावरचा लेख आणि विडियो
केससांभारावरचा लेख आणि विडियो दोन्ही मस्त ..!
विडियो पाहून एखाद्या shampoo ची जाहिरात पाहिली असंच वाटलं..
(No subject)
काल मला फोन आला... हे दोघं म्हणाले ऋ...ला कुठे भेटू शकतो...मी म्हणालो मा. बो. वर असतात...
मस्त इस्टोरी तुमच्या केसांची...
केसपुराण आवडले. असे केस वाढवा
केसपुराण आवडले.
छान लिहिलंय. मजा आली वाचायला.
छान लिहिलंय. मजा आली वाचायला.
चरची क्लिप बघुन मला वाटलं आता
वरची क्लिप बघुन मला वाटलं आता ऋन्म्या म्हणेल - आयॅम ऋन्म्या फ्रॉम बदक चाळ, माझगांव.. टणाणा टणाणा...
राज
राज
@ दत्तात्रय, तो वरचा कोण आहे?
@ सामो, तो लांब केस वाल्या पुरुषाचा फोटो का अपडेटला? कोण होता तो? बायकोला तो फोटो दाखवून ते चॅलेंज घ्यायचे होते मला
ऋन्मेष तो बाउंटी हंटर डॉग
ऋन्मेष तो बाउंटी हंटर डॉग होता
सामो ओके
सामो ओके
Duane Lee Chapman, also known as Dog the Bounty Hunter, is an American television personality
हे मुद्दामून गूगाळून कॉपी पेस्ट केले. अन्यथा ज्यांना हि व्यक्ती माहीत नाही त्यांना वाटेल की आपण एखाद्या केसाळ डॉगचा फोटो टाकून मला तसे केस वाढवायचे चॅलेंज दिलेले
लोल आई ग्ग!!!! ऋ-न्मे-ष!!! =)
लोल आई ग्ग!!!! ऋ-न्मे-ष!!! =))
इतके केस वाढवणे कसे जमते ?
इतके केस वाढवणे कसे जमते ? डोक्यावरचे किंवा दाढीचे केस वाढले की अस्वस्थ वाटू लागतं. दाढी वाढली कि आजारी असल्याचं फीलिंग येतं. एखादे दिवशी जर दाढी करायला वेळ नाही मिळाला तर दिवसभर वेगळे वाटते. केसांच्या बाबतीत एखादा आठवडा इकडे तिकडे. पण जर थोडे जास्त वाढले तर डोळ्यात जाणे, कपाळाला किंवा मानेला टोचत राहणे हे अजिबात सुखद नसते. वा-याने केस कपाळावर आपटून सूक्ष्म जखमा होत आहेत असं वाटत राहतं. कानावरून वाढलेल्या केसाचे दर्शन तर आरशात नको वाटते.
एकदा का सलून मधे गेलो आणि कात्रीचा स्पर्श झाला कि कात्रीचा तो करकर आवाज, कंगव्यातून केसांची होत असलेली कत्तल , अधून मद्धून हाताने डोक्यावर मारलेल्या थापट्या याने कधी समाधी लागते ते कळतच नाही. नंतर नवरत्न तेल लावून मालीश. स्वर्गसुख त्यालाच म्हणत असतील. पूर्वी ती हाताने चालवायची झिरोची मशीन असायची. शाळेत असताना ती मस्ट होती. आता इलेक्ट्रीकची असते. पण त्या मशीनच्या आवाजाची सर इलेक्ट्रीक मशीनला नाही. कुट्कुट करून मानेवरून गुदगुल्या करत ती मशीन फिरत रहायची. एकदा न्हाव्याला ती मशीन आणून ठेवायला सांगितले तर त्या दिवशी सर्वांनी तीच मशीन वापरली.
लॉकडाऊन मधे घरीच केस कापले पण ती मजा नाही आली. तो एक भयानकच कट होता पण न्हाव्याकडे अशाच केसेस येत असल्याने त्याने सर्वांना शेप मधे आणले.
एक ऑक्टोबरला केशदिन आहे याची आठवण केल्याबद्दल आभार. उशिरा लक्षात आले असते तर दुस-या दिवशी गांधी जयंती आहे.
इतके केस वाढवणे कसे जमते ?
इतके केस वाढवणे कसे जमते ? डोक्यावरचे किंवा दाढीचे केस वाढले की अस्वस्थ वाटू लागतं. दाढी वाढली कि आजारी असल्याचं फीलिंग येतं. एखादे दिवशी जर दाढी करायला वेळ नाही मिळाला तर दिवसभर वेगळे वाटते. केसांच्या बाबतीत एखादा आठवडा इकडे तिकडे. पण जर थोडे जास्त वाढले तर डोळ्यात जाणे, कपाळाला किंवा मानेला टोचत राहणे हे अजिबात सुखद नसते. वा-याने केस कपाळावर आपटून सूक्ष्म जखमा होत आहेत असं वाटत राहतं. कानावरून वाढलेल्या केसाचे दर्शन तर आरशात नको वाटते.>>> +१११११११११११११११
@ऋ
@ऋ
@ दत्तात्रय, तो वरचा कोण आहे?
गौरव मोरे...पवई, फिल्टरपाड्याचा अमिताभ बच्चन...
स्टार मराठी वाहिनीवर एक निखळ हसवणारा कार्यक्रम असतो महाराष्ट्राची हास्य जत्रा . गेली ४-५ वर्ष चालू आहे. हा अवलिया त्यात काम करतो . एन्ट्रीला काहीसे तुमच्या व्हिडिओतल्या सारखे केस हलवून बोॅलतो...मी गौरव मोरे, फ्राॅम पवई फिल्टरपाडा ...टयांडांssडाsssटयांडां....
https://youtu.be/MMqK9GDTSn0
https://youtu.be/HSba1kj-4Rc
एका प्रसूतिगृहात ऑपरेशन
एका प्रसूतिगृहात ऑपरेशन थिएटरबाहेर शशी कपूरसारखा दिसणारा कुरळ्या कुरळ्या केसांचा एक युवक येरझार्या घालत होता. येणारा बालक अमिताभसारखा जन्माला यावा अशी त्याची ईच्छा होती. बालकाला स्वतःला कदाचित शाहरूखसारखे निपजावे असे वाटत असावे. पण डॅम ईट, तेव्हा मुलांच्या ईच्छेला विचारतेय कोण?
बालक जन्माला आले तेच >>>>> त्या बालकाला गौरव मोरे माहीत असणे शक्य नाही.
@ शांत माणूस, छान पोस्ट
@ शांत माणूस, छान पोस्ट
आपली आपली आवड. थोड्यावेळाने सविस्तर लिहितो. जरा कामात आहे.
गौरव मोरे...पवई, फिल्टरपाड्याचा अमिताभ बच्चन...
>>>>
दत्तात्रय, ओके.
आमच्याकडे टीव्ही बघत नसल्याने कल्पना नाही. युट्यूबवर सर्च करून बघतो जरूर आता.
एका प्रसूतिगृहात ऑपरेशन
एका प्रसूतिगृहात ऑपरेशन थिएटरबाहेर शशी कपूरसारखा दिसणारा कुरळ्या कुरळ्या केसांचा एक युवक येरझार्या घालत होता.>>>> घोर गैर समजुतीत आहात हो.. कुठे शशी कपूर आणि कुठे तुम्ही.. असो
त्याने स्वतःच्या वडिलांबद्दल
त्याने स्वतःच्या वडिलांबद्दल लिहिलंय ते आशु29
शशी कपूर अभिषेकचे बाबा,
शशी कपूर अभिषेकचे बाबा, ऋन्मेषचे नव्हे.
ओह ! म्हणजे तो करण / कुणाल
ओह ! म्हणजे तो करण / कुणाल कपूर आहे का ? शक्यता आहे. मायबोलीवर उघड होऊ नये म्हणून अभिषेक आयडी घेतला असेल. नाहीतर फॅन्स ने पिच्छ पुरवला असता.
Pages