
आस्तिक्यसूक्तमय अस्तिसूत्र – लेखक सुरेंद्र दरेकर
‘’बुड़ता आवरी मज ‘’ या कादंबरीनंतर अल्पावधीत सुरेंद्र दरेकर यांचं दुसरं पुस्तक ‘’अस्तिसूत्र ‘’ संवेदना प्रकाशनाकडून आलं आहे. यातही दोन दीर्घकथा किंवा लघुकादंब-यांचा समावेश आहे.पहिली अस्तिसूत्र आणि दुसरी आरण्यक.
अस्तिसूत्र हे मध्यवर्ती आणि अन्य विपुल स्त्रीस्वरांनी गजबजलेलं कथासूत्र. .हे कथेचं पहिलं वैशिष्ट्य.
कथावस्तु एका गतकालाकड़े निर्देश करणारी , तीमधील नायिका गार्गी आणि अन्यही कथौघातील स्त्रिया आपापल्या परीने व्युत्पन्नआहेत. स्थलकालावकाशात घटना आणि पात्रांची, त्यांच्या नातेसंबंध आणि स्नेहसंबंध यांची जी संपृक्तता आहे, ती सुरुवातीला काहीशी बिचकवणारी पण संथपणे वाचकाच्या मनात सामावत जाणारी आहे.द्वितीय वाचनात तर तिची गोडी लागते.
कथानकाला व्यापून राहिलेला अर्थव्यवहार त्यातील दुर्व्यवहारांसहित जाणीवपूर्वक तपशीलवार पण लालित्याला बाधा येऊ न देता संहितेत उतरवला आहे. हे मराठी कथा-कादंबरीत कमी घडतं.वास्तवाचं हे महत्वपूर्ण अंग अजिबात न उपेक्षिता अधोरेखित करणं यामागे लेखकाचं बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे.
सुरेंद्र दरेकरांच्या दीर्घकथा वेगवेगळ्या आयुष्य-नेपथ्यांमधून आयुष्याच्या अर्थमयतेचा चिंतनशील शोध घेतात.इथे मध्यवर्ती व्यक्तिरेखा एका गृहसीमाबद्ध पण स्वच्या शोधात निरंतर व्याकुळ अशा मनस्वी स्त्रीची आहे.संहिता नायिकेच्या आत्मिक विकासाची लय पकडून तत्त्वज्ञान आणि अध्यात्माचा सांधा यथावकाश पकड़ते हे नैसर्गिक वाटतं. सामान्य वाचकाच्या पचनशक्तीसाठीही ही घडण अनुकूल आहे.
अनेक भाषा,संस्कृती, गावं, निमशहरं , पर्यटनप्रसंग असा मोठा पैस असलेली ही लघुकादंबरी आस्तिक्यपूर्ण अंत:सूत्र वागवते. हेच अस्तिसूत्र.यात वरवर निरर्थक, संदेहग्रस्त आयुष्याचं जिगसॉ पझल आतआत सुटत जातं.काहीही फुकट जात नाही.संगती लागते आणि शांती अवतरते. पण हे सहजासहजी घडत नाही .जाणीवपूर्वक घटनांचा शोध घेण्याची मोठी साधना करावी लागते.तेव्हा मिथकातील हंसाने गिळलेले वास्तवातील मोतीहार मानवी संज्ञेला पुन्हा सापडत जातात.
दुस-या दीर्घकथेचा ’आरण्यक’चा नायक अनंत पौगंडअवस्थेपासून ते तारुण्य-परिपक्वतेपर्यंत परिस्थितीशी संघर्ष करत जात आहे. ही मूलतः दोन भिन्नधर्मीय जीवांची एक तरल प्रेमकथा आहे पण जणू प्रेमालाही उसंत नसलेल्या जीवनक्रमात वेगवेगळ्या त-हांनी अडकून पडलेल्या दोन भिन्नधर्मीय जीवांची ही प्रेमकहाणी आहे..हे प्रेम वास्तवाच्या ओंजळीतून निसटून जातं पण त्याचं पवित्र अर्घ्य झाल्याचा अनुभव देतं. ख्रिस्ती धर्माची, त्यातील पापकल्पनेची चर्चा कथानकाच्या आंशिक शोकात्मतेला एक शांतीचं परिमाण देते. असा शांतरसाचा परिपोष , आदिम प्रेरणांचं उन्नयन ही दरेकरांची परिभाषा आहे.दरेकरांचा किशोरवयीन नायक एकाच वेळी निरागस आणि अकालपरिपक्व आहे.त्याच्या वनखात्यात नोकरी करणा-या वडिलांचा अपघाती मृत्यू , आईचं दुखरं भावविश्व , सुस्थितीतील मावशीचं त्या दोघांच्या मना-जीवनातलं स्थान , इतर अनेक नातेसंबंध असं हे निबिड़ आरण्यक आहे. कथानकाला त्याही अनुषंगाने अरण्याचे विविध संदर्भ आहेत. शेवटी एखाद्या उपनिषदीय सूक्तासारख्या काव्यमय समेवर ही कथा संपन्न होते.
संवेदना प्रकाशनाने ही निर्मिती देखण्या स्वरूपात समोर आणली आहे,संदीप ससे यांचं मुखपृष्ठ आणि आतली रेखाटने वातावरणनिर्मितीला पोषक आहेत.
अभिव्यक्तीच्या अंगाने दरेकरांचे निवेदक अधिक आशयाची भूक असलेले आहेत . वाक्यरचना अनेकदा खूपच जास्त पल्लेदार होते.गौरी देशपांडेयांच्या शैलीशी साधर्म्य सुरुवातीला वाटले तरी त्यामागे कथनाची घटनाबहुल निकड आहे.यातील जीवने गावातून शहरे ,महानगरे अशी सरकत जाणारी आहेत, ती संस्कारांची, खानपानाची, धारणांची मोठी परंपरा सोबत आणतात.तिला नवतेची परिमाणं बहाल करतात.यापरंपरेचं मूळचं वैश्विक भान आत्ताच्या ग्लोबल रंगतरंगाचा पेहराव चढवतं.
ऐहिक गरिबीत आणि श्रीमंतीत सारखेपणाने समृद्ध असलेला हा देशीवादाचा एक वेगळा वाण आहे.
तत्त्वकविता असा एक कवितेच्या प्रांतातील निर्मितीप्रयोग हायडेग्गरसारख्या तत्त्वज्ञाने केला होता तशा या वेगळ्या बाजाच्या कथा मराठी साहित्यात नक्कीच मोलाची भर घालतील असा विश्वास निर्माण करण्यात लेखकाला यश आलं आहे.
भारती बिर्जे-डिग्गीकर
भारतीताई, काय शब्दसंपदा आहे
भारतीताई, काय शब्दसंपदा आहे तुमच्याकडे. वाचून जीव नादावलाय.
लालीत्य आणि पांडीत्य हातात हात घालून फार कमी वेळा दिसते ते इथे अगदी छान प्रकारे दृगोचर होतंय.
पुस्तक आणि लेखक अजीबात माहीत नसलेले होते, नोंद करून घेतली आहे.
खूप छान.
खूप छान.
आवडले.
हर्पेन, कुमार, आभार्स! लेखक
हर्पेन, कुमार, आभार्स! लेखक दीर्घ काळानंतर पुन्हा लिहिता झाला आहे म्हणून अल्पपरिचित, पण साहित्यिक वर्तुळात नवा नाही. दीर्घकथा हा साहित्यप्रकार अधिक वाचकप्रिय असल्याने या कथा अनेकांपर्यंत पोचवाव्या म्हणून हा लेखनप्रपंच.
हर्पेनशी पूर्ण सहमत....
हर्पेनशी पूर्ण सहमत....
फारच सुंदर परिचय करुन दिलात. लेखकाचे कौशल्य जसे सुंदर पद्धतीने मांडलेत तसेच पुस्तकाविषयी उत्कंठाही निर्माण करण्याचे जबरदस्त सामर्थ्य आहे या तुमच्या लेखनात.... मस्तच...
____/\___
किती भारी लिहिता तुम्ही
किती भारी लिहिता तुम्ही भारतीताई. मस्त ओळख.
धन्यवाद शशांकजी, मामी, छान
धन्यवाद शशांकजी, मामी, छान वाटलं तुम्हाला इथे पाहून
वा नवीन पुस्तक! खूप
वा नवीन पुस्तक! खूप उत्कंठावर्धक लिहिलय। आता शोधून वाचायला हवं। हर्पेन अगदी अचूक लिहिलस। भारतीची शब्दसंपदा, विचार करण्याची पद्धत आणि ते मांडण्याचे कौशल्य नेहमीच चकित करतं!
पहिल्या कथेबद्दल वाचतना काही व्यक्ती पटकन डोळ्यासमोर येऊन गेल्या।
थांकु भारती
अवल, धन्यवाद ! तुझा हा
अवल, धन्यवाद ! तुझा हा प्रतिसादही उत्कंठावर्धक आहे
कोण बरं व्यक्ती असतील त्या !
भारतीताई, काय शब्दसंपदा आहे
भारतीताई, काय शब्दसंपदा आहे तुमच्याकडे. वाचून जीव नादावलाय.
लालीत्य आणि पांडीत्य हातात हात घालून फार कमी वेळा दिसते ते इथे अगदी छान प्रकारे दृगोचर होतंय.
पुस्तक आणि लेखक अजीबात माहीत नसलेले होते, नोंद करून घेतली आहे.>>>>> अनंत +++++++
पुस्तकांबद्दल उत्सुकता तर वाढलीच पण अग इतका चांगला पुस्तक परिचय करुन दिलायस तू की हेच वाचत रहावं असं वाटतय. शब्दसंपदा personified म्हणजे तू!
पुस्तक नक्की वाच,धन्यवाद कुलू
पुस्तक नक्की वाच,धन्यवाद कुलू!