ट्रेक
“आबा ए आबा उठ बाबा फाट झाली. आत्ता तांबडं फुटल एवढ्यात. लवकर जायाला हवं सरपाण आण्हाया तरच उन्हाच्या आत परत येऊ डोंगरातनं.”
आबाचे कान दर रविवारी पहाटे ही हाक कधी येते या प्रतिक्षेत असायचे. तो आधीच अर्धवट जागा असायचा. त्याला डोंगराचा लळा लागला होता.
रविवार म्हणजे शाळेला सुट्टी. आज तरी थोडं आरामात उठावं असंही त्याला कधीच वाटायचं नाही. शाळा असेल त्या दिवशी उशिरा ६ वाजता तो उठायचा.
पण रविवारी ही चैन परवडायची न्हाय. डोंगरातून उन्हाच्या आधी सरपणाची मोळी डोक्यावरून आणली म्हणजे एवढा थकवा जाणवत नसे आणि दुसरं म्हणजे डोंगराच्या पल्याड राहणा-या लोकांचा फुकटचा त्रास होत नसे. सरपणाला जायचं तर खिंड ओलांडून पल्याड जायला लागायचं. उशिरा गेलं तर आपण गोळा केललं सुकलेल्या टनटनी, करवंद, निवडूंगाचं सरपण पलिकडची माणसं आयतं घेऊन जात त्यांच्या घरी जाळायला. वर अंगाशी झटापट वेगळी. कधी मोळी बांधून झाल्यानंतर दरीतून आवाज यायचा.
“कोण हाय रं”.
आवाज ऐकल्या बरोबर मोळी डोक्यावर घेऊन दूरवर मैदानात येई पर्यंत झाडाच्या आडून लपतछपत आवाज न करता चिंचोळ्या जंगल वाटेनं लगबग करायची म्हणजे कोण कसरत. पावसाळ्यात वाट ओली असायची. मधेच घसरड्या कातळावरून जायला लागायचं. मोळीच्या ओझ्याने डोक्यात वेदना व्हायच्या पण थांबण्याची फुरसत नसायची.
एकदाची दारात मोळी आली की सगळा शीण निवायचा. आठवड्याभराच्या जळणाची चिंता मिटायची.
या सगळ्या कष्टाचा निचरा करणारी आणखी एक गोष्ट होती. ती आबाला खूप आवडायची. ती म्हणजे डोंगरातली भटकंती.
पहाटं लवकर उठायचं. आंघोळ न करता नुसतं तोंड धुवून घरातून निघायचं. बरोबर सरपण बांधायला एक दोरी घ्यायची. चुंबळीचा कपडा घ्यायचा. पायात चप्पल नसायचीच. शाळेतल्या पोरांना तेव्हा गावाकडं चपलाच नसत. पायाचे तळवे राठ होत…जंगलात घसरून पडणं कमी व्हायचं. पटापट चालता यायचं.
पहाटेच्या अंधूक प्रकाशात कान बांधून जंगलवाट चालायची. थंडीत अनवाणी पाय बधीर व्हायचे. जंगलात गेल्यावर गवतावरच्या दहीवराने ते अजून गारठत. हातही गारठत. मग हाताचे तळवे तोंडासमोर धरायचे आणि तोडांतली वाफ त्यावर फुंकरायची किंवा तळवे एकमेकांना चोळायचे तेव्हा कुठं थोडी ऊब यायची.
डोंगरात पोहोचेपर्यंत पूर्वेला लाल गुलालाची उधळण व्हायची. पहाटेच्या शांत वातावरणात हळूहळू सुर्यदेवाचा रथ डोंगराआडून वर निघायचा. डोंगरमाथ्यावर, गवतावर, झाडांवर, फुलं वेलींवर सोनेरी झळाळी यायची. हळूहळू डोंगर तोंडावरची धुक्याची चादर किलकिली करून बघायचा. पाखरांची, किटकांची, फुलपाखरांची लगबग सुरू व्हायची.
हळूहळू थंडी पाय काढता घ्यायची.. चालताना गुडघ्याएवढं वाढलेलं गवत पायावरून मोरपीस फिरवायचं.
आता चांगलं उजाडलेलं असायचं. सोनेरी उन्हात न्हाऊन निघालेला हिरवापिवळा डोंगरकडा पाहणाराचे पाय खिळवून ठेवायचा. आबाला आनंदवनभुवनी आल्या सारखं वाटायचं. पण पुढच्या जाणीवेने तो पाय काढता घ्यायचा.
खोल दरीतल्या वाडीवस्तीत जाग आलेली असायची. जात्यावरच्या ओवीला कोंबडा आरवून दाद द्यायचा. पेटलेल्या चुलीचा धुर आभाळात वळणं घेत तरंगत जायचा. गोठ्यात गाय हंबरायची.कुठेतरी भातातलं गवत उपटताना कोणतरी दिसायचं. त्याची नजर चुकवून वाटचाल व्हायची.
पावसाळी पायवाट, मधे पानथळ, दोन्ही बाजूला कमरेएवढी झाडं वेली गवत यांची मांदियाळी चालायचा थकवा कुठल्या कुठं निघून जायचा.
मधेच वेलींची कमान लागायची. तीवर फुलं फुललेली असत. फुलपाकळीशी दहीवर सलगी करायचं. क्वचित त्या वेली अती खाली झुकायच्या आणि पाहणा-याला त्या मांडवाखालून जाताना खूप आल्हाददायक वाटायचं. वाटेच्या दोन्ही बाजूला असलेल्या रंगीबिरंगी रानफुलात निरागस आबा हरवून जायचा. थोडावेळ फुलपाखरू होऊन फुलांवर अलगद विसवांव असंही त्याला वाटायचं. मधेच मऊ गवतावर लोळन घ्यायचा. मुंग्या रांगेत जाताना काय बोलतात ते ऐकायला कान टवकारायचा. एवढा मोठा पिसारा घेऊन मोर फांदीवर कसा बसला याचे नवल करायचा.
आता दुरून येणारा पाण्याचा अनाहत नाद कायमचा कानात साठवुन ठेवावासा त्याला वाटतो. थोडं पुढं गेलं की एक ओहोळ आडवा येतो. एरवी कोण आडवं गेलं काही कामाला निघाल्यावर तर आबा नाराज व्हायचा पण खळाळता ओहोळ पाहिल्यावर आबाची कळी खुलायची. तो त्या स्पटीका सारख्या स्वच्छ पाण्यात आपलं प्रतिबिंब न्याहाळत बसायचा . तासनतास त्या शुभ्र जळात पाय सोडून बसावं असं वाटायचं. कुठेतरी असलेला निळा डोह मन प्रशांत करायचा. त्यात पडलेलं आभाळाचं प्रतिबिंब त्याला वेड लावायचं. ओल्याचिंब खडकातून झिरपणारं पाणी कुठेतरी आपल्या आत खोलवर झिरपतय असं त्याला वाटायचं.
आबाचा मोठा भाऊ अन्ना त्याला हाक मारायचा ए पोरा चल लवकर दीस वर आला. मग आबा लगबगीने त्याच्यामागे धावायचा.
दोघेही जरा दाट जंगलात गेल्यावर वेगवेगळ्या दिशांना वाळलं सरपन गोळा करायला जायचे. पाऊस पडून गेलेला असेल तर सुकलेल्या टणटण्या, करवंदाच्या जाळ्या पटकन ऊपटल्या जायच्या. नाहीतर खूप त्रास व्हायचा हाताला फोड यायचे. अगदी काहीच नाही जमले तर बांबू सारखे सुकलेले निवडुंग जमा करायचे. मोळी होईपर्यंत विसावा नसायचा. कुठे करवंदाच्या जाळीने खरचटले जायचे. कुठे काटे पायात भरायचे ते काढून काम पुढे चालू ठेवायचे. रात्री घरी आल्यावर काटा मोडलेल्या ठिकाणी गरम गुळाचा चटका दिला जायचा.
मोळीची लाकडे गोळा झाल्यावर एखाद्या ओहळाच्या काठावर फडक्यात बांधून आणलेल्या भाकऱ्या सोडल्या जायच्या आणि झणझणीत ठेच्याबरोबर किंवा लोणच्याच्या फोडीबरोबर, गुळाच्या खड्या बरोबर खाल्ल्या जायच्या. कष्ट केल्यावर साधं खाणं देखील पक्वांनासारख वाटायचं. जेवल्यावर ओंजळीने अथवा एखाद्या रुंद पानाचे द्रोण करून ओहळाचं नैसर्गिक थंड आणि शुध्द पाणी प्यायचं आणि तृप्त ढेकर द्यायचा.
जांभळं, करवंद, बोरं, आवळे गोळा करायचे, थोडे खायचे, उरलेलं फडक्यात बांधून घरी आणायचं. गोड गुंजेचा पाला खायचा. अन्ना म्हणायचा गुंजेचा पाला खाल्ल्यावर आवाज चांगला होतो. आबा लाजाळूच्या झाडाला हात लावायचा. रानकेळींच त्याला कुतुहल वाटायचं. एवढ्या जंगलात त्या कुणी लावल्या. खैराच्या झाडापासून कात कसा तयार होतो याचंही त्याला नवल वाटायचं. सागाची मोठ्या पानाची सरळसोट उंच झाड आणि त्यावरचे सोनेरी तुरे पाहतच राहावे असे त्याला वाटे.
मधेच गवतात दिसलेला पांढराशुभ्र ससा कुरवाळावासा वाटायचा. कधीतरी टूनटून उड्या मारणारी हरणं दिसायची.
श्रावणात उनपावसाचा खेळ चालायचा. डोंगर अशावेळी अधिक मोहक वाटायचा. आबा पाऊस आला की झाडाच्या आडोशाला थांबून गाणं म्हणायचा
उन्हात पाऊस पडतो
डोंगरी कोल्हा रडतो.
हे सगळं करत असताना कुठे खूट्ट झालं तरी भितीने काळीज लकलकायचं. कारण एक दोन दिवसापूर्वी ऐकलेलं असायचं जंगलात कोणीतरी वाघ पाहिला.
जंगलातली दाट झाडी त्यातून नागमोडी वळणे घेत वळवळणा-या पाय वाटा त्यांच्या बाजूला असलेले गवत, रानफुलं, पाण्याचे ओहळ न्याहळत कधी गिर्यारोहक दिसायचे. त्यांचा रुबाबदार पोषाख , पाठीवरच्या बॅगा आबाला भूरळ घालत. त्यांच्याबरोबर कधी फोटो काढायला मिळायचा तर कधी शहरी पदार्थ, चाॅकलेट , बिस्किट खायला मिळायचं.
आबाला वाटायचं हे तर हे लोक कधीतरी करतात आम्ही दर ८-१५ दिवसाला ट्रेक करतो कुठल्याही तयारी शिवाय. तोही अनवाणी.
पायाला गवत,माती,पाणी,काटे लागल्याशिवाय जंगल कळत नाही असं त्याला वाटायचं.
कितीतरी वेळ आबा आराम खुर्चीत डोळे मिटून पडला होता. भानावर आला तो नातू शि-याच्या आवाजाने.
“आबा माझे ट्रेकिंगचे बूट पाहिले का? मी उद्या कळसूबाईचा ट्रेक करतोय”
“शि-या हे तर तू मला कालच सांगितले आणि मी आता बसल्या बसल्या गावच्या डोंगराचा ट्रेक करून आलो. अरे हा फोटो हाताला लागला अन सरकन भुतकाळ आठवला.”
शि-या हा बघ ट्रेकचा लहान वयातला फोटो
“आबा लय भारी ट्रेकर होता तुम्ही…पण तुम्ही ही ट्रेकची कथा यापूर्वीही मला अनेकदा ऐकवलीत.
“ऐकवली असेल हल्ली विसरायला होतं बघ…पण ही गोष्ट मला सारखी आठवते.”
“आबा माझे ट्रेकिंगचे बूट कुठं आहेत”
“अरे गधड्या मी घालून फिरतो का?”
“आबा तसं नाही हो चुकून इकडं आलेत का एवढंच ?”
“अरे म्हणजे तुझे बूट पायात नसतानाही चालतात की काय?”
“आबा तुम्ही पण ना”
“पाहून झालेत ना?”
बूट दुसरीकडे शोधण्यासाठी शि-या निघून जातो. तो गेल्यावर आबा पुन्हा विचारात हरवतात
पुन्हा तो फोटो पाहतात.
त्यांना खोल आतवर झिरपलेला पाण्याचा ओलावा जाणवला, पानांची थरथर जाणवली. धबधब्याचा अनाहत नाद ऐकू आला. वळसे घेत डोंगरवाट म्हणाली
वाटूली मी वनवेडी
मज हिंडायाची गोडी
पुन्हा डोळ्यासमोरुन हरणं, ससे टुणटुणत गेले. झाडावरच्या मोराची केकावली ऐकू आली. पुन्हा जांभळानं जीभ रंगली.
पुन्हा श्रावणसर मनात उनपावसाचा खेळ खेळली.
आयुष्याचा ट्रेक करत असताना कितीतरी चढउतार,नागमोडी वळणं,चिंचोळ्या वाटा, रानफुलांसारखे रंगबावरे सुखाचे क्षण फुलपाखरू होऊन क्षणैक आले, कुठुनतरी झिरपणारा मायेचा ओलावा, आंबटगोड अनुभवाची करवंद,बोरं, अक्राळविक्राळ डोंगरद-या अनुभवायला मिळाल्या. किती अप्रतिम ट्रेक झाला.
© दत्तात्रय साळुंके
25-09-2021
* वाटूली मी वनवेडी
* वाटूली मी वनवेडी
मज हिंडायाची गोडी
>>>
वा छानच !
आवडले लेखन
छान रमलो.
छान रमलो.
खूपच सुंदर वर्णन!
खूपच सुंदर वर्णन!
सुंदर स्मरणरंजन
सुंदर स्मरणरंजन
सुंदर लेखन!
सुंदर लेखन!
सुंदर लेखन!
सुंदर लेखन!
मजा आली
मजा आली
छान रमलो.
छान रमलो.
छान रमलो.
छान रमलो.
व्वा ! काय नैसर्गिक वर्णन
व्वा ! काय नैसर्गिक वर्णन केलत. अधाश्यासारखे वाचले. अप्रतीम लिहीलेय.
मोळीची लाकडे गोळा झाल्यावर एखाद्या ओहळाच्या काठावर फडक्यात बांधून आणलेल्या भाकऱ्या सोडल्या जायच्या आणि खरपूस ठेच्याबरोबर किंवा लोणच्याच्या फोडीबरोबर, गुळाच्या खड्या बरोबर खाल्ल्या जायच्या. कष्ट केल्यावर साधं खाणं देखील पक्वांनासारख वाटायचं. जेवल्यावर ओंजळीने अथवा एखाद्या रुंद पानाचे द्रोण करून ओहळाचं नैसर्गिक थंड आणि शुध्द पाणी प्यायचं आणि तृप्त ढेकर द्यायचा.>>>>>> हे खरे जीवन !!
सुंदर वर्णन..!
सुंदर वर्णन..!
मस्त लिहिलंय... मधेच
मस्त लिहिलंय... मधेच वास्तवाची जाणीव करुन दिली अन नंतर पुन्हा अलगद फ्लॅशबॅक मधे नेलंत.
मोळीची लाकडे गोळा झाल्यावर एखाद्या ओहळाच्या काठावर फडक्यात बांधून आणलेल्या भाकऱ्या सोडल्या जायच्या आणि खरपूस ठेच्याबरोबर>> झणझणीत ठेचा हे विशेषण हवं होतं असं वाटलं.
DJ खूप धन्यवाद...अगदी योग्य
DJ खूप धन्यवाद...अगदी योग्य सुचवले...
बदलतो...
कुमार १( १ लिहू का ? )
कुमार १( १ लिहू का ? )
srd, वावे, हर्पेन, अनन्त_यात्री, बन्या, साद, रश्मी, रुपाली विशे-पाटील....
खूप धन्यवाद....
वाह! सुंदर.
वाह! सुंदर.
खुप खुप छान लिहीलय दादा .
खुप खुप छान लिहीलय दादा .
आवडलं अगदी !
डोंगराच्या पल्याड राहणा-या लोकांचा फुकटचा त्रास होत नसे>>>> हे असे का पण. डोंगरावर मालकी नसेल ना कुणाची
@मामी, आसा खूप धन्यवाद
@मामी, आसा खूप धन्यवाद
@आसा
१) डोंगराच्या पलीकडचे लोक स्वयंघोषित जंगल रक्षक असल्याचे भासवतात कारण ते डोंगरातच राहणारे आहेत...वास्तव वेगळं असतं...ते सागाची तोड करुन घराला, शेतीची अवजारे बनवायला वापरतात. कुठे खाजगी मालकी असली तरी त्याला कुंपण हा प्रकार नव्हता.
२) डोंगर खाजगी मालकीचाही असतो... आमच्या ३० भाऊबंदात एक खाजगी मालकीचा डोंगर आहे.
या केसमधे डोंगरातील माणसांची डोंगरावर कुठे खाजगी मालकिही असावी...बाहेरच्या गावचे लोक त्यांच्या जनावरांना पावसाळ्यात जंगलात कमरेइतके उंच गवत खायला मिळावं म्हणून जंगलात राहणा-या लोकांना ठराविक रक्कम देऊन जनावर सांभाळायला देत. त्याला राखूळ म्हणत. त्यासाठी करवंदाच्या कुंपणाचा मोठा कोंडवाडा ( मोकळा, उघडा गोठा ) असायचा...सकाळी त्याचे झाप उघडून जनावरं चरण्यासाठी डोंगरात सोडत. संध्याकाळी ती चरुण आपोआप कोंडवाड्यात येत. रात्री झाप बंद करत.
सुंदर वर्णन, छान लेख
सुंदर वर्णन, छान लेख
खुप सुंदर वर्णन केले आहे.
खुप सुंदर वर्णन केले आहे.
खूप सुंदर वर्णन.सर्व अगदी
खूप सुंदर वर्णन.सर्व अगदी डोळ्यासमोर उभं केलंत.
mi_anu,शवीरु, ऋतुराज
mi_anu,शवीरु, ऋतुराज
खूप धन्यवाद...
खूपच सुंदर.
खूपच सुंदर.
दहिवर म्हणजे दव का?
विषयांतर , आबा आणि शिऱ्या वाचून टिपरे आठवले
@ ए_श्रध्दा
@ ए_श्रध्दा
दहिवर म्हणजे दवच...
आबा आणि शि-या ही नावं मुद्दाम दोन वेगळ्या पिढ्या दाखवायला घेतलीत....आबा एक वेगळ्या पिढीचं प्रतिनिधित्व करतो ...शि-या वेगळ्या.... पीढी बदलली तरी सौंदर्यदृष्टी तीच... आयुष्याचा ट्रेकही तसाच...वळणाचा, द-यांचा, सुखद फुलांचा, फुलपाखरांचा, आंबट गोड अनुभवांचा... कधीतरी कुठेतरी भेटलेल्या आपुलकीच्या ओलाव्याचा.... श्रमपरिहार करणा-या सुंदर गोष्टींचा...
अतिशय सुंदर लिखाण.. आपणही
अतिशय सुंदर लिखाण.. आपणही फिरून आल्यावाणी वाटले.
गावातली पहाट आणि डोंगरावरचा
गावातली पहाट आणि डोंगरावरचा फेरफटका अनुभवल्या सारखं वाटतं होतं वाचताना. मला सुरवातीला आबा हा लहान आहे कि मोठा ते कळलंच नाही.
अनघा... धन्यवाद
अनघा... धन्यवाद
धनुडी... धन्यवाद
आबाचे स्मरणरंजन आहे...सुरवातीचा आबा १०-१२ वर्षाचा शाळकरी पोर आहे...
वाह.... अतिशय सुरेख....
वाह.... अतिशय सुरेख....
उत्तम शब्द शिल्प! अवघा माहोल
उत्तम शब्द शिल्प! अवघा माहोल डोळ्या समोर तरळून गेला. शेवटच्या परिच्छेदाने तर फारच मझा आणला. कोणत्याही चांगल्या साहित्य-कृतीची, तपशीलातून सर्वत्रिकतेकडे आणि व्यक्तीकडून समष्टीकडे जाणे ही लक्षणे मानली जातात. त्या कसोटीवर तुमचे लिखाण उतरते.
@करंदीकरजी
@करंदीकर सर
तुमच्या सारख्या जेष्ठ, अनुभवी लेखकाचा प्रतिसाद माझ्या साठी आशिर्वादच...कारण तीच चांगल्या लिखाणासाठी खूप मोठी ऊर्जा असते. असेच प्रतिसादातून मार्गदर्शन व्हावे.
खूप आभार...
खूप छान लिहिलंय.
खूप छान लिहिलंय.
गावी डोंगर नसला तरी रानात बोरं, करवंद, चिंचा, आवळे, जांभळं गोळा करायला असं रानात अनवाणी भटकणं व्हायचं.
शाळेच्या युनिफॉर्म मध्ये कॅनव्हासचे बूट होते पण ते शाळेपुरतेच. बाकी अनवाणी फिरणे, खेळणे. मग कॉलेजला असताना चिखलदऱ्यात ट्रेक व्हायचे. चप्पल घालुन.
Pages