नर्मदाबाईनी तितक्यात बाहेर चौकातून स्टेशनाकडे निघालेल्या वाड्याच्या धमणीचा आवाज ऐकला.
... संजूबाबाला आणायला गेली असेल धमणी स्टेशनाकडे.....
नर्मदाबाईना जुन्या नको असलेल्या आठवणींची उबळ आली.
ह्या धमणीच्या अशाच एका धावेत काय मिळवलं, काय गमावलं......
संजूबाबा सताठ वर्षांचा असेल नसेल आणि आपल्याकडे नवीन बाळाची चाहुल लागली. आतुन-बाहेरुन मोहरून गेले होत्ये. आतिबाईनी आतल्या आत गुपचुप कौतुकं सुरू केली होती. दुसराच महिना... काय हवं, काय नको, काय खावसं वाटतं... ल्यावसं वाटतं....
आपल्याला शप्पथ घालून बजावलं होतं की, बाहेर कुठ्ठे अगदी माहेरीही कळवू नकोस... हे नव्हतेच इथे. तरीही इतक्या मोठ्या धबेलग्यात का होईना पण अशी गोष्टं लपून रहाणं शक्यच नव्हतं.
कधी कधी नुस्तंच पडून रहावसं वाटायचं. तशीच त्या दिवशी, सकाळच्या नाश्त्याचं वगैरे बघून थोडी आडवारल्ये होत्ये.... तेव्हढ्यात न सांगता सवरता, मोठ्या नणंदबाई आल्या. आतिबाईना न जुमानता, माझ्याकडे येऊन त्यांनी जे जहर ओकलं..... त्यानं आतून उमळले.
’हे होऊच कसं दिलं म्हणते मी? दादाने मोठ्यावैनीपाठी ऑपरेशन करून घ्यायला हवं होतं. हिला स्वत:चं आल्यावर संजूकडे बघेल ती? कशाला बघेल? माझ्या सोन्यासारख्या भाच्याला सावत्रभावंड! देवा रे, त्याच्या आयुष्याचा वनवास करणार ही.... आत्ये तू तरी कसं बघू शकतेस हे?....’ असलं बोलत जे तारांगण घातलं.....
शेवटी कवळ घालून आतिबाईंनी नेलं त्यांना दुसर्या खोलीत..... सुन्नं होऊन बसून राहिले.... बरं तरी.... संजूबाबा नेहमीसारखा, शेतावरल्यांची न्याहारी घेऊन जाणार्या घरच्या गड्याबरोबर, शेतावर गेला होता.
तशात धावत, ओरडत शेतावरून संपा आला... संजूबाबाला साप चावला होता... कुठुन शक्ती आली माहीत नाही. तश्शी धावत निघाले. आत्तिबाई आरडत ओरडत चौकात आल्याचं कानांना कळलं पण तो पर्यंत संपानं धमणी रस्त्याला लावली होती.
मळ्यावर धोंडबा होता. जाणता माणूस. त्यानं किरडू पकडून मारलंही, पण विखारी होतं मेलं. लांबून आंब्याच्या तळी सगळे जमलेले दिसत होते. बांधावरून तोल सावरत धावत सुटले. सावलीला चौकडीवर संजूबाबा निपचित पडला होता. घोट्याच्या वर धोंडबानं आवळपट्टी बांधलेली दिसत होती. घामेजला होता.
"वैनी तालुक्याला...." धोंडबाने वाक्य पूर्ण करायच्या आत मी संजूच्या मानेखाली हात घालून उचलला त्याला. संपाने काय ते ओळखून माझ्या हातातून काढून स्वत:च्या दणकट दो हातांवर घेतला त्याला अन दौडत निघालाही धमणीकडे.
मी, अन मला सावरत शांता तिथवर पोचेस्तोवर धमणी वळवून घेतली होती.... संजूबाबाला गच्च छातीशी धरून मी बसल्ये अन म्हटलं, "धावडव, संपा...."
डोळे घट्ट मिटून, देवाचा धावा करीत संजूबाबाला कवळून बसून राहिल्ये.... संपाने शर्थं केलिन, उभ्यानं हाकली धमणी... बैलांच्या पाठीतून रक्तं अन तोंडातून फेस येईस्तोवर उडवला आसुड.... बैलही बेभान होऊन पळाले....
संजूबाबाला वेळेवारी टोचणी मिळाली. डॉक्टर म्हणालेही अजून काही अवकाश होता तर....
.... चार दिवसांनी परतलो.... बरा झालेला संजूबाबा, आमच्या सोबतीला येऊन राहिलेल्या आतिबाई अन दुवेतली मी.... रिकामी.... जळून कोळून गेल्या केळीसारखी....
संजूबाबाचं कळल्यावर हे धावत आले परगावाहून.... अन माझं कळल्यावर....
त्या दिवशी, ह्यांच्यापास माझं काय स्थान ते कळून चुकल्ये. त्या रात्री, झोपलेल्या संजूबाबाला अन मलाही मिठीत घेऊन कितीवेळ बसून राहिले.... त्यांच्या गदगदत्या खांद्यांनी कितीएक सांगितलं मला.... मी ही मग... रोखलं नाही स्वत:ला... सापडला आधार धरून मनाच्या जखमेची भळभळ थांबेस्तोवर रडले.
मोठ्या नणंदबाई मावळून ’चुकल्ये’ म्हणून गेल्या.... आतिबाईंनी लेकीच्याही पलिकडे संभाळली. कावर्या-बावर्या संजूबाबाला ह्यांनी दादा-पुता केला. सावरले त्यातूनही.
पुन्हा कूस उजवलीच नाही ती नाहीच..... काही हरकत नाही.. आपलं एकच मूल म्हणून जुळतं करून घेतलं....
असं मनात म्हणता म्हणता नर्मदाबाईंना आवंढा आला..... दु:खाने नाही... तर घालवलेल्या समृद्ध कौटुंबिक आयुष्याची वाटचाल कितीही नागमोडी असली तरी समाधान, सौख्य देणारे होती....
मनापासून प्रेम करणारा पती, कर्तूत्ववान मुलगा, खातं-पितं गोकुळासारखं नांदतं घर आणि हे सगळं जतन करून भरून पावलेलं आपलं आयुष्यं अजून काय हवं? ह्या विचाराने.
************
सुखाने, शेवटली आठा दिसांची सेवा करून घेत आधी मामंजी अन मागे आतिबाई.... अवघ्या सहा महिन्यांच्या अंतराने... दोघे गेले. मामंजींचं वार्धक्य तरी म्हणायचं, पण आतिबाईचं आजारपण असं काहीच नाही.... ह्यांच्यावर भारी जीव... दादाचा दुखावला संसार मार्गी लावायचं जणू हाती घेतलं काम पूर्ण झाल्यासारख्या वेगळ्या झाल्या....
त्यांचं डोकं मांडीवर घेऊन रड रड रडल्ये.... तर माझीच समजूत काढली त्यांनी.... ’रडू नकोस....आपलं काम झालं की आपण बाजूला सरावं.... म्हणजे आपल्या सावलीतली रोपं आपोआप मोठी होतात.... एव्हढी मोठी झालीस पण अजून लहानपण गेलं नाही तुझं.... जाणती झालीस, हा डोलारा तूच तर बघतेयस.... वयाच्या मानाने खूप अवजड गाडा ओढावा लागला तुला.... पण निभावत्येस... मी बघतेय ना... माझ्या दादाचा संसार सावरलास, त्या अश्राप लेकराला आई झालीस.... भरून पावलं.... असेच सुखाने नांदा यापरतं देवाकडे काही मागणं नाही....’
मामंजींच्या अन आतिबाईच्याहीवेळी शेवटलं गंगाजळी घालायला हे जवळ होते..... दोघा भावांनी केलं सगळं....
अन....कधीतरी अकस्मात आपणही निघून गेले....
जणू हा संसार त्यांचा नव्हे, माझाच होता आणि मीच तडीला न्यायचा....
*******
पुन्हा एकदा नर्मदाबाईंच्या डोळ्यातून धार ओघळली...
..... त्यांचा सहवास नसला तरी, त्यांच्या योगे एका भरल्या घरची सून म्हणून वावरणं, घर रितं होत जाताना पहाणं अन एक दिवस मानलेला आधार गळून पडणं यातलं दु:ख सगळ्यांनाच नाही कळायचं.....
किती वर्षं झाली त्याला.... हे गेले तेव्हा धाय मोकलून रडणार्या मला सावरणारा संजूबाबा, शेवटच्या नमस्काराला मला संभाळून नेणारा माझा संजूबाबा,... तिथे मी कोसळतेय म्हणताना, ’तूच असं केलस तर मी कुणाच्या कुशीत तोंड लपवू, छोटी आई?’ असं म्हणून फुटणारा बांध सावरण्याचा प्रयत्नं करणारा संजूबाबा....
*******
नर्मदाबाईंनी झटकन सावरून पदराने डोळे, तोंड पुसलं. आधीच एकतर आपल्याला असं बघून तो बावचळल्यासारखा होणारय, त्यात आणि रडवेला चेहरा बघून....
ते काही नाही.... आपणच उभारी दाखवायची.... काय व्हायचय ते होणारच आहे... त्यासाठी डोळ्यातून टिपं काढायची नाहीत....
जरा अपंगत्वं आलं आहे, अगदी परस्वाधीन झालय जिणं, सगळं अंथरूणावरच... त्याला इलाज नाही... कुणावर भार नाही... अगदी मोजके दिवस उरलेत. आपण कितीही मोडता घातला तरी, शेवटी साठे वकिलांनी कळवलच त्याला.....
परवा फोनवरही किती रागावला....
अनेका दिवसांनी त्याचं ते ’मी बोलत नाही तुझ्याशी अशानं.... ’ ऐकलं आणि तेव्हढ्यापुरती तरी उभारी आली.
पुरोहित बुवा त्यांना परत आलेले दिसले. दाराबाहेरूनच म्हणाले, ’बाईसाहेब, नर्सबाई आज येत नाहीत असं दिसतय, त्यांनाच बरं नाहीये. डॉक्टरसाहेब, हॉस्पिटलात चौकशी करतायत.... पण जत्रेच्या दिवसात बदलीची नर्स मिळणं कठिण आहे... ’, त्यांनी खालमानेने सांगितलं आणि नर्मदाबाईंना क्षणार्धात परिस्थितिची जाणीव झाली.
घरात कुणी बाई माणूस नाही! भूतकाळात रमलेल्या त्यांना आधी कळलं नव्हतं पण, आत्ता याक्षणी पुरोहीतबुवा खोलीत का येऊ धजत नाहीत ते त्यांच्या लक्षात आलं. बुवा नाकावर उपरणं घेऊन तिथेच उभे राहिले.
*************
क्रमशः
मस्त!!
दाद, एकदम झक्कास चालू आहे कथा. बर्याच दिवसांनी तुझी 'कथा' वाचायला मिळत्ये. फक्त दोन्ही भागात थोsssड्या टायपो झाल्यात, ज्याने रसभंग होतोय, तेवढ्या बघशील का प्लिज?
नेहमी
नेहमी प्रमाणे मस्त....
खुप दिवसांनि
दाद खुप दिवसांनि तुझ लिखाण वाचायला मिळतेय..दोन्हि भाग खुप छान जमलेत..
मंजू - टायपो कुठेत ..
पटकन सांगशील? अगदी चटकन दिसण्यासारखे?
उदा: 'रडणाया' --- मी बरहा वापरते टायपायला... पण ते इथे पोस्टलं की असं होतं.... जमेल तितकं सुधारते पण माझंच मला "बरोबरच" दिसत रहातं.
सांग गं..
Ekadam Avadesh.........
Daad, farach chhan lihita tumhi..............
दाद सॉरी,
दाद सॉरी, पण खरंच वाचताना अडखळायला होतंय. जोडाक्षरापैकी अर्धा र ' र् ' कुठेच उमटला नाही आहे. बरं हे बघ,
भाग - १
मध्यस्ताने, ऐक्लं का?
भाग २,
नर्मदाबईंनी, कर्तुत्ववान
btw, 'मोठ्या नणंदबाईंच्या तोंडात सदैव मिरी भिजत घातलेली' हे वाक्य जाम आवडलं. एका ओळीत खलनयिका साकारलीयेस..
मंजूबई, ऐक्लं का?
ए, गंमत नाही.... पण थँक्स गं.
आता इथे पेस्टताना त्या अर्ध्या 'र' वर जरा बारीक नजर ठेवेन...
छान! अगदी
छान!
अगदी आपण त्या घरात वावरत असल्यासारखं वाटतय.
शरद
"नको 'शरद' शब्दांचे वैभव, हवी भावना सच्ची,
ह्रदयावरल्या अनंत लहरी स्वीकारतेच कविता!"
दाद , खरच.किती सुरेख लिहितेस
दाद ,
खरच.किती सुरेख लिहितेस ग तू.