बाप्पा आले

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 10 September, 2021 - 00:22

फिरता फिरता आले बाप्पा थेट आमुच्या दारात
उंदिर मामा वरी बसोनी बाप्पा होते ऐटीत
"बाप्पा आले... बाप्पा आले" ओरडलो मी जोरात
जल्लोषाने स्वागत केले बाप्पाचे आनंदात

चपळाईने उंदिरमामा शिरले शेपुट हलवीत
हळूच बाप्पा मला म्हणाले तुझ्या जाउया खोलीत
मला कडेवर उचलुन घेउन बाप्पा आले खोलीत
तूच लाडका म्हणून आलो हळुच म्हणाले कानात

माझी सारी नवी खेळणी दाखवली मी जोशात
'हवी तेवढी तुम्हीच खेळा' दिलीत त्यांच्या हातात
खुशीत येउन बाप्पा हसले सोंड हलवुनी जोरात
सांगितली मी सारी गुपिते सुपाएवढ्या कानात

खूप खेळलो आम्ही दोघे भूक लागली जोरात
वेळ केवढा पुढे पळाला अमुच्या खेळा खेळात
बाप्पांनी मग टिफिन उघडला हळूच हसले गालात
टिफीन अख्खा भरून होते मोदक सुंदर रंगीत

बाप्पांनी मग हळुच बुडवली सोंड तुपाच्या वाटीत
मला भरवुनी गट्टम केले मोदक जिभल्या चाटीत
वॉटर बॉटल मात्र विसरले बाप्पा होते घाईत
मीच दिली मग वॉटर बॉटल बाप्पांच्या त्या सोंडेत

पोटोबा मग भरल्यानंतर झोप उतरली डोळ्यात
हात आपुला डोक्यावरुनी बाप्पा होते फिरवीत
झोप लागली खूप गाढ अन आई आली स्वप्नात
’किती वेळ ही झोप तुझी रे..ऊठ’ म्हणाली लाडात

दचकुन उठलो वळुन बघितले इकडे तिकडे खोलीत
बाप्पा नव्हते तिथे कुठेही पाणी आले डोळ्यात
बाप्पांनी पण केले होते प्रॉमिस माझ्या कानात
असा नेहमी भेटत राहिन पुन्हा पुन्हा मी स्वप्नात

आले होते बाप्पा माझ्या गोड गोडशा स्वप्नात
किती खेळलो, दंगा केला पहिल्या अमुच्या भेटीत
एक चिमुकला उरला होता मोदक माझ्या हातात
हळूच आईला सांगितले गोड गुपित मी कानात

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

किती गोड. एकदम झक्कास. तुपाच्या वाटीत सोंड बुडवणारे, मोदक गट्ट्म करणारे आणि नंतर "वॉटर बॉटल" ने पाणी पिणारे बाप्पा एकदम डोळ्यासमोर उभे राहिले.

छान.

अग्गं, काय गोड आहे हे! मला ते आई आली स्वप्नात फारच आवडले, स्वप्नात बाप्पा किती खराखुरा वाटला आणि खेळला असणार.