स्त्रियांचे आरोग्य हवामानाशी निगडीत आहे ही बाब हल्ली प्रकर्षाने जाणवत आहे कारण पर्यावरणाचा समतोल ढासळला तशा स्त्रीच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या. हवामान बदलांचा परिणाम पुरुषांच्या आणि बालकांच्या आरोग्यावरही होतोच; पण त्याबद्दल चर्चा नंतर कधी करू.
स्त्रियांच्या आरोग्य समस्या पुरुष व बालकांपेक्षा वेगळ्या कशा किंवा त्याच्या वेगळा गट म्हणून का अभ्यास करायचा?
स्त्रीला, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरात, घरातील काम व अर्थार्जन दोन्हीचा बोजा पडत असल्याने आरोग्यासाठी आवश्यक वेळ, पैसा इ मिळत नाही. तसेच बरे वाटल्यावर पुन्हा त्याच पद्धतीचे काम करावे लागते. उदा: दुष्काळात विहिरी आटल्यावर लांबून पाणी भरावे लागणे त्यामुळे उष्माघाताचा त्रास होणे. पण बरे वाटल्यावर पुन्हा पाणी भरावेच लागते. अनेकवेळा उपचारांसाठी आवश्यक संसाधने व वेळ स्त्रियांना उपलब्ध नसतात. जीवनशैलीत बदल करण्याची मुभा तिला अनेक वेळा नसते. म्हणून सध्या हवामान बदल व स्त्री आरोग्य ह्या विषयावर अधिक संशोधन चालू आहे. हे संशोधन ‘इंटरडिसीप्लिनरी’ म्हणता येईल असे आहे - जीवशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, व पर्यावरणशास्त्रज्ञ एकत्र येऊन समस्येचा अभ्यास करत आहेत.
हवामानातील बदल याचे दोन विभागात परिणाम अभ्यासावे लागतात - १) ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीवरचे तापमान वाढणे. या नेहमीच वाढलेल्या तापमानामुळे शरीरात घडून येणारे बदल अभ्यासावे लागतात. २) तसेच या वाढलेल्या तापमानामुळे हवामानात तीव्र बदलाच्या घटना घडतात जसे - दुष्काळ, ओला दुष्काळ, उष्म्याची लहर, वादळे इ.- या घटनांमुळे आरोग्यावर तात्पुरते आणि दूरगामी परिणाम होतात. अशा तीव्र बदलाच्या घटना घडतात तेव्हा महिला अधिक भरडल्या जातात कारण या काळात ‘इन्डायरेकट’ परिणाम ही होतात. बरेच वेळा कौटुंबिक हिंसाचार किंवा घराबाहेर गुन्ह्यांना बळी पडतात उदा: पाणी भरण्यासाठी जाताना बलात्कार होणे, त्यातून शारिरीक-मानसिक आजार होणे किंवा दुष्काळ पडला की खाणारे तोंड कमी व्हावे म्हणून मुलींची लग्ने लवकर होतात. लवकर लग्न व त्यामुळे लवकर मातृत्त्व, अधिक अपत्ये इ चक्रात अडकतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (W.H.O.) गेल्या दोन दशकांपासून ह्या प्रश्नावर सातत्याने काम करत आहे त्यात मानवी क्रियांमुळे बदललेले हवामान यावर भर आहे. (मानवी क्रियांमध्ये खनिज तेलांचा अमर्याद वापर, जंगलतोड इ पर्यावरणाची हानी करणाऱ्या क्रिया समाविष्ट आहेत.)
सुरुवातीला वाढलेल्या तापमानाचे परिणाम बघू. १९८४ मध्ये न्यूयॉर्क मध्ये आणि नंतर २००३ मध्ये फ्रांस मध्ये तीव्र उष्म्याची लाट आली. स्त्रियांमध्ये, विशेषतः ७५+ वयोगटात, उष्णतेमुळे पुरुषांच्या तुलनेत जवळपास २०-४०% अधिक मृत्यू घडले. याचे कारण शोधता स्रियांमध्ये मेटॅबॉलिक रेट (चयापचयाचा दर) जास्त असतो, घाम येण्याचे प्रमाण कमी असते. नैसर्गिकतः पुरुषांपेक्षा त्वचेखाली मेदसंचिती अधिक असल्याने शरिराचे तापमान लवकर खाली येत नाही. त्यात भर म्हणजे व्यायामाचा अभाव किंवा अन्य कारणांमुळे हृदयाचा ‘फिटनेस’ कमी असतो. अनेकवेळा स्त्रिया जिथे नोकरी करतात, उदा: शाळा, कारखाने, तिथे वातानुकूलनाची सोय नसते तर अनेक पुरुषांना वातानुकूलित जागा उपलब्ध असतात उदा: ऑफिस इ. त्यामुळे स्त्रियांमध्ये उष्ण जागी स्थलांतर किंवा स्थानिक तापमान वाढणे ह्याचा फार प्रतिकूल परिणाम होतो.
उष्णतेचे गर्भिणीवर ही विपरीत परिणाम होतात. उष्णतेमुळे रक्त अधिक घन होते (व्हिस्कस), रक्तवाहिन्यांचा आकार बदलतो, बहुतेक वेळा हा आकार कमी होतो व त्यामुळे रक्तदाब वाढतो. वारेला (प्लॅसेंटा) रक्तपुरवठा पुरेसा न झाल्याने अपत्य मृत जन्माला येणे घडू शकते. तसेच उष्णता जनुकांवर विपरीत परिणाम घडवते. त्यामुळे गर्भातील अवयवांची वाढ नीट न होणे व विकलांग अपत्य जन्मास येणे असे परिणाम घडू शकतात. ह्यात भर म्हणजे वाढलेल्या तापमानाची माहिती महिलांपर्यंत पोहोचत नाही, पोहोचल्यास त्याचे आरोग्यावरील परिणाम माहिती नसतात, माहिती असले तरी त्याबद्दल काही करता येत नाही कारण परंपरेनुसार वेशभूषा करावी लागते, पंखा/कूलर साठी पैसे नसतात. अनेक वेळा पारंपरिक वस्त्रे अंगभर असतात व त्याने शरिराचे तापमान कमी होत नाही तर वाढते.
स्त्रीला पाळी कधी सुरु झाली ह्यावर तिचे मानसिक आरोग्य, हृदयाची-हाडांची सुदृढता, व पुनरुत्पादनाची जबाबदारी अवलंबून असते. सामान्यपणे मुलीला १२-१६ वयात पाळी सुरु होते. पण गेल्या ५० वर्षात प्रगत देशात हे वय अकरा पेक्षा कमी येताना दिसते तर विकसनशील देशात हे वय वाढताना दिसते. ब्रिटन, अमेरिका इ देशात मुलींचे वजन वाढते, उंची वाढते व पाळीचे वय खाली येते ह्यात भाज्या कमी, अतिप्रथिनंयुक्त आहार हे एक कारण दिसते. दुसरे कारण थॅलेटसारखी हॉर्मोन्स वर परिणाम करणारी नित्य वापरातील रसायने किंवा दूषित जमीन-पाणी द्वारे रसायनांचा संपर्क. तर विकसनशील देशात पाळी येण्याचे वय वाढताना दिसते आणि वजन-उंची खुंटते. विशेषतः तापमान वाढले, पाऊस नसला, दुष्काळ असता कुपोषण झाल्यावर अधिक प्रकर्षाने दिसून येते. तसेच रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉजच्या काळात जितके हवामान विषम तितका हॉट फ्लॅशेसचा त्रास अधिक. विषम हवामान म्हणजे हिवाळा खूप थंड तर उन्हाळा खूप उष्ण असे टोकाचे हेलकावे घेणारे हवामान.
भारतीय उपखंडाचा ‘हवामान व स्त्री आरोग्य’ ह्या दृष्टीने विशेष अभ्यास केला आहे. ह्या अभ्यासात काही विचार करायला भाग पडणारे निष्कर्ष समोर आले. बांगलादेशातील पूर इ घटनांमध्ये स्त्रिया मरण्याचे प्रमाण जवळजवळ तिप्पट होते. खरं तर पुरुषांकडून त्यांनी सुटका कार्य करावे अशी अपेक्षा असते. त्यामुळे मरणाची शक्यताही अधिक पण तरी महिला अधिक दगावल्या. ह्याला कारण बहुतेक महिलांना पोहणे शिकवले जात नाही, त्यामुळे पुरात बचाव पथक येईपर्यंत जराही तग धरू शकत नाहीत. साडी सारखे पोशाख पोहण्यास अडसर करतात किंवा तसे त्या मानतात. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे - सैन्य/पोलिस वा अन्य बचाव कार्य करणाऱ्या संस्थांनी घर रिकामे करा असा इशारा दिला तरी महिला घरातच राहतात. इशाऱ्यांचे महत्त्व न समजणे हा एक भाग झाला. पण दुसरा भाग म्हणजे बाहेर गेलेली घरची सर्व मंडळी घरी येईपर्यँत कुणीतरी घरी हवे अशा समजूतीने घरीच राहतात (उदा: मुलांना मदतगटाबरोबर पाठवले तरी पती घरी येईपर्यंत मदत गटाबरोबर जाणार नाही ). पूर, वादळं, दुष्काळ इ नंतर माता-बालक सेवा कोलमडतात व बाळंतपणात अधिक महिलांचा मृत्यू होतो.
स्त्री आरोग्य हे पाण्याची समस्या व पर्यायाने हवामानाशी निगडीत आहे. पिण्याचे पाणी उपलब्ध नसणे ह्यामुळे स्त्रिया बराच वेळ पाणी भरण्यात घालवतात व त्यामुळे मानेचे, पाठीचे विकार जडतात. वापरण्याचे पाणी उपलब्ध नसले की महिलांना शारिरीक स्वच्छता ठेवणे कठीण होते. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात किंवा बाळंतपणानंतर स्वच्छता करणे शक्य होत नाही. महिलांमध्ये इन्फेक्शन्सचे प्रमाण वाढते. हे केवळ खेडेगावातच घडते असे नाही तर मोठ्या शहरात ही घडू शकते. जिथे अल्प उत्पन्न गट असतात (झोपडपट्टी) तिथे अनेकवेळा पाणी नसते किंवा असले तरी पाण्यासाठी फार पैसे द्यावे लागतात, अशावेळी स्त्रिया पाण्याचा वापर कमी करतात. इथे महिला मृत्यू चे प्रमाण अधिक आढळते. पाणी उपलब्ध असणे हे खूप गरजेचे आहे.
मंडळी, इथे नुसती समस्यांची यादी देण्याचा उद्देश नाही तर काही सुखावह बदल ही घडत आहेत ते ही बघू. The United Nations Framework Convention on Climate Change (UNFCCC), the United Nations International Strategy for Disaster Reduction (UNISDR), and the World Health Organization यासारख्या संस्था एकत्र येऊन काम करत आहेत. स्त्रिया जिथे सरपंच आहेत त्या गावात काही उपक्रम राबवले जात आहेत. पाणी आडवा-पाणी जिरवा यासारख्या मोहिमा करून घरोघरी वापरण्याचे पाणी उपलब्ध होईल हे बघितले जाते. (हिरवळ वाढून स्थानिक तापमानही कमी होऊ शकते. मात्र तसा थेट डेटा अजून उपलब्ध नाही). पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली तर हे पाणी अत्यल्प दरात मिळेल याकडे लक्ष दिले जाते. घरात शौचालये व न्हाणीघर बांधायला अनुदान मिळू शकते. महिलांना स्वतःच्याच घरात फळभाज्या इ उगवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. हे खेड्यातच नव्हे तर शहरात अगदी मध्यमवर्गीय समाजातही आवश्यक प्रशिक्षण आहे कारण पोषक तत्त्वांची कमतरता मध्यमवर्गात ही आढळते. भारतीय महिलांमध्ये सर्रास आढळणारा न्यूट्रीशनल ऍनिमिया दूर करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयोगी ठरत आहे.
खेड्यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे उष्णतेशी संपर्क कमी करण्यासाठी योग्य प्रकारच्या चूली (उदा: सौर चूल, गोबरगॅस चूल इ) उपलब्ध केल्या जातात. ह्यामुळे सरपणासाठी वणवण उन्हात भटकणे टळते व चुलीसमोर तासनतास बसणे ही टळते. प्लॅस्टिक किंवा अन्य धूर ओकणारी चुलीतील इंधने महिलांना फुफ्फुसाचा कॅन्सर, न्यूमोनिया इ व्याधींनी ग्रस्त करतात. सौर चूल किंवा अन्य प्रमाणित इंधनाची चूल वापरणे यामुळे कार्बन एमिशन ४०% कमी होते. खेड्यातील, शहरातील स्त्री आरोग्याचे सगळे प्रश्न एकदम सुटतील अशी आशा नाही. पण या गणेशत्सवाच्या निमित्ताने आपल्या भोवतालचा परिसर, हवामान, व आपले आरोग्य ह्याचे भान (अवेयरनेस) वाढले तर ते सुखी आयुष्याकडे टाकलेलं एक पाऊल ठरेल.
संदर्भ:
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC6038986/
https://www.who.int/globalchange/GenderClimateChangeHealthfinal.pdf
https://www.witpress.com/Secure/elibrary/papers/RAV06/RAV06061FU1.pdf
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC7084472/
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC8339224/
लेख माहितीपूर्ण आहे. वरवर
लेख माहितीपूर्ण आहे. वरवर चाळlay. फुरसतीने वाचांयला हवा.
छान लेख.
छान लेख.
माझ्या गावच्या नव्या घरी वायुविजनाची सोय नीट नसल्यामुळे चुलीतील धुराने बायांचे डोळे कायम सुजलेले असत. गॅस आल्यावर डोळे सुधारले.
वाचून चिंता वाटली.
वाचून चिंता वाटली.
पण यात आशादायक भागही आहे.तो वाचून जरा बरं वाटलं.
लेख माहितीपुर्ण आहे.
लेख माहितीपुर्ण आहे.
वाचून बरेच प्रश्नही पडले. म्हणजे असा डेटा कशा पद्धतीने गोळा करतात? त्यांचे लिंगनिहाय वर्गिकरण आणि अॅनालिसीस कसे करतात? शहर / खेडेगाव/ शिक्षित- अशिक्षित आणखीही असे बरेच घटक यात भुमिका बजावत असणार नक्की. त्याचा वेगळा अभ्यास होतो का? असा अभ्यास करण्यासाठी संख्याबळ्/आर्थिक बळ कोण पुरवतं? आणखीही असेच प्रश्न पडले बरेच.
हवामान बदलांचा परिणाम पुरुषांच्या आणि बालकांच्या आरोग्यावरही होतोच; पण त्याबद्दल चर्चा नंतर कधी करू.>> हे लिहील्यामुळे यासंदर्भातले प्रश्न तळाला टाकून दिले.
पण यात आशादायक भागही आहे.तो वाचून जरा बरं वाटलं.>>> +१
सी, उत्तम आढावा घेतला आहेस.
सी, उत्तम आढावा घेतला आहेस. या महत्त्वाच्या विषयावर लिहील्याबद्दल तुझे आभार! एकूणच वाढते अनारोग्य आणि पर्यावरणऱ्हास यांचा परस्परसंबंध हा बऱ्यापैकी दुर्लक्षित विषय आहे.
याच अनुषंगाने एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे wet bulb temperature म्हणजे थर्मामीटर ओल्या कापडात गुंडाळून मोजलेले तपमान. आपण नेहमी जे तपमान मोजतो ते dry bulb temperature असते.
आता हे wet bulb temperature मोजणे का महत्त्वाचे आहे? कारण जर हवेतली आर्द्रता १००% असेल आणि जर हवेचे तपमान ३५ अंश सेल्सिअस वा त्यापुढे असेल तर माणसाची अंगीभूत तपमान नियंत्रित करण्याची यंत्रणा बंद पडू लागते. कारण एरवी आपल्याला घाम येतो आणि त्याला वारा लागून त्याचे बाष्पीभवन होते आणि आपले शरीराचे तापमान नियंत्रणात राहते. मात्र जेव्हा आर्द्रता १००% असते तेव्हा घाम वाळू शकत नाही. जर अशा वातावरणात माणूस तीन तासांहून अधिक काळ राहीला तर त्याचा मृत्यू होऊ शकतो.
काळजीची गोष्ट ही की अशा प्रकारच्या वातावरणाची वारंवारीता वाढू लागली आहे. गेल्या वर्षी सायन्स या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या The emergence of heat and humidity too severe for human tolerance या लेखात या विषयी सविस्तर माहिती दिली आहे. जगात जिथे सर्वाधिक प्रमाणात अशी wet bulb temperatures आढळून आली आहेत त्यात भारताचा पूर्व किनारा (eastern coastal india) आणि वायव्य (northwestern India) भारताचा समावेश आहे.
आता wet bulb temperature हे कायम ३५/१००% असेच असते असे नाही. जर तपमान वाढले तर कमी आर्द्रतेत देखील माणसाला घातक अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. With no wind and sunny skies, an area with 50% humidity will hit an unlivable wet-bulb temperature at around 109 °F (42.8°C), while in mostly dry air, temperatures would have to top 130 °F to reach that limit (संदर्भ).
सी ने म्हटल्याप्रमाणे स्त्रियांची शरीराचे तपमान नियंत्रित करण्याची क्षमता पुरूषांपेक्षा कमी असेल तर अशा उष्माघाताचा धोका हा येत्या काळात वाढत जाणार आहे. विशेषतः भारतीय उपखंडातल्या स्त्रियांसाठी.
माहितीपूर्ण लेख!
माहितीपूर्ण लेख!
माहितीपूर्ण लेख!+१
माहितीपूर्ण लेख!+१
माहितीपूर्ण लेख! जिज्ञासाचाचा
माहितीपूर्ण लेख! जिज्ञासाचा प्रतिसादही महत्वाचा.
माहितीपूर्ण लेख.
माहितीपूर्ण लेख.
लेख छान. या सगळ्या समस्या
लेख छान. या सगळ्या (बऱ्याचश्या) समस्या तापमान वाढी आधीही होत्या. तापमान वाढ आणि मोठ्या बदलांनी आणखी जास्त प्रमाणात जाणवू लागतील असं वाटलं. उद्या तापमान वाढ थांबली तरी त्या समस्या बदलणार नाहीत. याला उत्तर स्त्री शिक्षण आहे असं वाटलं. तापमान काय वाढायच आहे ते वाढू दे का कमी होऊ दे, त्यावर तापमान वाढ तज्ज्ञ काम करतील. तो एक स्त्री शिक्षणाचा भाग म्हणून शिकावावाच, पण ते साध्य/ उद्दिष्ट (एम) न ठेवता सर्वांगीण स्त्री शिक्षण हे उद्दिष्ट ठेवून काम केलं तरच फरक पडेल.
इकडे तापमान सांगताना नुसतं तापमान आणि ह्युमिडेक्स/ फिलस लाईक सांगतात. ते हे वेट बल्ब असावं. ते कसं मोजतात वगैरे बद्दल फार विचार केला न्हवता आता शोधतो. धन्यवाद जिज्ञासा.
बराच वेळ विचार केला की इतक्या
बराच वेळ विचार केला की इतक्या सुंदर आणि माहीतीने खच्चुन भरलेल्या लेखावरती काय प्रश्न विचारला की आपली हुषारी दिसून येईल
पण सुचलच नाही. तू इतका परिपूर्ण आढावा घेतलायस समस्यांचा. खरं तर खाली तू दिलेले दुवेही चाळायचे आहेत. या लेखाने थोडी का होइना, सजगता आली खरी. सजगता याची की आपण (मी) किती प्रिव्हिलेज्ड आणि तरी रडतराऊ आहोत.
असेच लेख तुझ्याकडुन अजुन येऊ देत.
वाचून चिंता वाटली.
वाचून चिंता वाटली.
पण यात आशादायक भागही आहे.तो वाचून जरा बरं वाटलं. +११११
लिखाण माहितीयुक्त नेहमीप्रमाणे
वाचून चिंता वाटली.
वाचून चिंता वाटली.
पण यात आशादायक भागही आहे.तो वाचून जरा बरं वाटलं. +११११
लिखाण माहितीयुक्त नेहमीप्रमाणे Happy>>>+1111
आणि परत मला हे वाक्य लिहावे वाटतय जे मी ममोच्या बकेट लिस्ट च्या लेखा खाली प्रतिसादात लिहीलं. " इतकी भारी भारी लोकं मायबोली मुळे आपल्या ओळखीची आहेत हे सॉलिड मस्त आहे फिलिंग.
माहितीपूर्ण लेख...!!
माहितीपूर्ण लेख...!!
लेख माहितीपूर्ण आणि उपयुक्त
लेख माहितीपूर्ण आणि उपयुक्त आहे.
अनेक वेळा पारंपरिक वस्त्रे अंगभर असतात >>>>>> हे पाहिलंय उष्ण प्रदेशातल्या गावी.
धन्यवाद माहीती करून दिल्याबद्दल !
नेहमीप्रमाणे सुरेख लेख! असं
नेहमीप्रमाणे सुरेख लेख! असं वाचून आपण किती सुरक्षित बबलमध्ये जगतोय याची आठवण होते.
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
पण ते साध्य/ उद्दिष्ट (एम) न ठेवता सर्वांगीण स्त्री शिक्षण हे उद्दिष्ट ठेवून काम केलं तरच फरक पडेल. >> +१०० आज ग्रॅज्युएट स्तरावर अनेक स्त्रिया आहेत पण त्यापुढे जायला आजही अडसरच अडसर आहेत. 'आपलं सगळं छान आहे तर काय करायचं तुला शिकून्/अर्थार्जन करून' ह्या मानसिकतेला काय वैचारिक पर्याय सुचवावे?
जि, सुरेख माहिती दिलीस. शक्य असल्यास अजून लिहू शकतेस इथेच. ह्या लेखाची/धाग्याची कल्पना तुझ्याच पर्यावरणातील अवांतरे वरून आली. मेघनाचेही धन्यवाद, तिने स्त्रीआरोग्यावर लिहीण्याची कल्पना सुचवली होती.
साधना, ऐकून खरचं बरं वाटलं. खेड्यात बायकांना सुविधा नाहीत हे एक त्यांचा आरोग्याला हानिकारक आहे. गॅस येणे चांगलेच झाले.
कविन, सामान्यपणे जागतिक स्तरावरच्या संघटना UNFCCC, UN, WHO अर्थबळ पुरवतात. स्थानिक पातळीवर काम करणारे कार्यकर्ते आणि जागतिक पातळीवर काम करणारे समाजशात्रज्ञ (आणि इतर अर्थकारण सांभाळणारे) असे टीमचे स्वरूप असते. डेटा सर्व्हे, डिरेक्ट ऑबझर्व्हेशन्स, ग्रूप डिस्कशन्स इ अनेक पद्धतीने गोळा होता. अनॅलिसीस अनेक वेळा टीमलीडच्या ऑफिसात जे बर्याचदा विकसित देशात असते तिथे होते. मी दिलेल्या दुव्यात त्यांनी कशा पद्धतीने डेटा गोळा केला याची प्रत्येक अभ्यासानुसार माहिती दिली आहे.
सामो, देवकी आणि सगळेच- आपण प्रीव्हीलेज्ड किंवा सुरक्षित आहोत हा आपला भ्रम आहे. 'गो बॅग' म्हणजे घरातून निघा असा इशारा आला तर काय काय घेऊन निघावे अशी बॅग भरणे प्रत्येकाला जरूरी आहे. माझी अजून हिंमत नाही झाली कारण कुठेतरी मी सुरक्षित आहे ह्या धारणेला चिकटून बसले आहे. पण धीर एकवटून ही बॅग येत्या काही महिन्यात भरेन. तोवर (आणि नंतरही) सुखरूप ठेव रे बाप्पा!!
धनुडी >>> काहीही! पण मायबोलीमुळे लेख लिहायला जागा आहे हे खरचं मोलाचे आहे. संधीबद्दल संयोजक मंडळाची आभारी आहे.
सीमंतिनी, धन्यवाद.
सीमंतिनी, धन्यवाद. माहितीपूर्ण लेख. समस्यांच्या यादी व गंभीररतेच्या तुलनेत सुखावह बदलांची यादी तुटपुंजी आहे त्यामुळे चिंता आहेच. पण त्याबद्दलची जाणीव वाढते आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे. पण आता जलद पावले उचलायला हवीत नायतर too late, too little
उत्तम लेख. अगदी माहितीपूर्ण.
उत्तम लेख. अगदी माहितीपूर्ण. छान लिहीलंयस, सी!
उत्तम माहितीपूर्ण लेख.
उत्तम माहितीपूर्ण लेख.
माहितीपुर्ण लेख सिमंतिनी.
माहितीपुर्ण लेख सिमंतिनी. मुलीला विषय हवा होता भाषण करायला. तिला वरच्या लिंक दिल्या. तयारी झाली तर करेल. खूप धन्यवाद.
https://youtu.be/vXlJEcrinwg
https://youtu.be/vXlJEcrinwg ही एक अजून लिंक उपयोगी पडली तर...
<< ही एक अजून लिंक उपयोगी
<< ही एक अजून लिंक उपयोगी पडली तर... >>
व्हिडिओ बघितला. Equity for women in agriculture, education and family planning हा मुद्दा मांडला आहे, पण त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग कसे कमी होणार हे बळंबळं सांगण्याचा प्रयत्न केला आहे, जो हास्यास्पद वाटतो. मला तर हे भाषण women empowerment वर आहे (अर्थात ते पण महत्त्वाचे आहे), असे वाटले, ज्याच्यात गरज नसताना ग्लोबल वॉर्मिंग घुसडले आहे. (थोडक्यात या लेखासारखे).
पर्यावरणाचा समतोल ढासळला तशा स्त्रीच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या. >> पुरुषांच्या, लहान मुलांच्या, प्राण्यांच्या समस्यांचे काय? जगातील किती टक्के महिला पाणी भरण्यासाठी बाहेर जातात? किती टक्के पुरुष वाढत्या तापमानात काम करतात, हे प्रश्न अनुत्तरीतच राहतात. नुकतेच कुठेतरी वाचले की भारतात महिलांसाठी टॉयलेट्सची सोय नसल्याने पुरेसे पाणी प्यायले जात नाही, त्यामुळे त्यांना मूत्रविकार होतात. मग त्याच्यासाठी पण ग्लोबल वॉर्मिंगला दोष देणार का? त्यामुळे केवळ ग्लोबल वॉर्मिंगमुळे केवळ महिलांना जास्त त्रास होतो, असा निष्कर्ष काढायची घाई नको.
हवामानातील बदल ह्यासाठी अनेक
हवामानातील बदल ह्यासाठी अनेक उपाय आहेत त्यापैकी स्त्री आरोग्य सुधारणे किंवा स्त्री सक्षमीकरण हा एक आहे. भाषणात निष्कर्ष कशावरून काढले हा डेटा दिला नाही हे हा मुद्दा बरोबर आहे. डेटा ड्रॉडाऊनच्या पब्लिकेशन्स मध्ये उपलब्ध आहे - https://drawdown.org/publications
दररोज पाणी भरण्यासाठी महिलांचे दोनशे मिलीयन तास जातात अशी आकडेवारी उपलब्ध आहे. https://water.org/our-impact/water-crisis/womens-crisis/
आफ्रिकेत अशा पद्धतीचे अभ्यास अधिक झाले असल्याने तिथले आकडे सहजी उपलब्ध आहेत - https://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0155981 अन्य देशातील आकडेवारी शोधावी लागेल.
ग्लोबल वॉर्मिंग मुळे महिलांना अधिक त्रास होतो हा निष्कर्ष २०१० मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासात काढला गेला (संदर्भ क्र. २). त्यामुळे आता घाई नको म्हणून फायदा नाही. पुढील अभ्यासात हा निष्कर्ष बदलेला असेल अशी आशा करू.
Root causes are upstream and
Root causes are upstream and are same for everyone. However, the impacts are different. Those who are more vulnerable tend to suffer more. Children and women are more vulnerable due to a variety of different reasons. Of course, if we address the root causes everyone will benefit.
जबरदस्त लेख आहे सी, काही
जबरदस्त लेख आहे सी, काही गोष्टी अनुभवल्या आहेत. आपल्याकडे एकुणच स्त्री आरोग्याची जागरूकता कमी आहे. कधीकधी ऐपत असूनही उपासतापासाने कुपोषित असलेल्या स्त्रिया बघितल्यात. :कपाळाला हात:
व्यायाम हा तर अनावश्यक समजल्या जायचा, माझ्या लहानपणी मुलींच्या शाळेत खेळांना अजिबात प्रोत्साहन नसायचे शिवाय बाथरूम नसणे/स्वच्छ नसणे, प्रवासात पाणी कमी प्यावे लागणे , वारंवार होणारे UTI हे तर अगदी अगदी, काही वर्षांपूर्वी हॉर्मोनयुक्त आहार व क्लायमेट चेंजमुळे होणारी 'रजोदर्शनाची आगेकूच' हा लेख वाचला होता , ते आठवले. ....
याचा पूर्णपणे/कमीअधिक क्लायमेट चेंजशी संबंध असेलही पण जागरूकता नसल्याने फार मोठी किंमत मोजावी लागते.
जिज्ञासाच्या पोस्टीही उत्तम.
हा लेख मिसला होता. छान विचार
हा लेख मिसला होता. छान विचार मांडले आहेत सी ताई.
अभ्यास व तयारी करुन लिहीले
अभ्यास व तयारी करुन लिहीले आहे हे प्रतिक्रियांना दिलेल्या उत्तराने स्पष्ट होत आहे. आपलं उपनाव बार्सिलोना का असावं, हे विशेष असल्याने जाणुन घेण्यासाठी उत्सुक आहे, हृदयानजीकचा आणि जिव्हाळ्याचा विषयावर लिहायल्याबद्दल अनेक आभार आहेत.