शब्दशारदेचे चांदणे -...॥एकदाच यावे सखया तुझे गीत कानी

Submitted by रेव्यु on 26 August, 2021 - 09:35

भावगीत- अशोकजी परांजपे
संगीत- अशोक पत्की
शब्दशारदेचे चांदणे
माझ्या भावना
॥एकदाच यावे सखया
तुझे गीत कानी
धुंद हो‍उनी मी जावे
धुंद त्या सुरांनी ॥-2-

असा चंद्र कलता रात्री
रानगंध यावा
सर्वभान विसरुन नाती
स्पर्श तुझा व्हावा
पुन्हा गुज अंतरीचे
हे कथावे व्यथांनी
||धुंद हो‍उनी मी जावे
धुंद त्या सुरांनी ||

एकदाच वाटेवर या
तुला मी पहावा
भाव दग्ध मिटला हा रे
पुन्हा फुलुनि यावा -2-
असा शांत असता वारा
रानपक्ष गावा
शब्दरूप प्रतिमा बघुनी
जीव विरुनि जावा
स्वप्‍न हेच हे हृदयी धरिले
खुळ्या आठवांनी
धुंद हो‍उनी मी जावे
धुंद त्या सुरांनी ॥-
॥एकदाच यावे सखया
तुझे गीत कानी
धुंद हो‍उनी मी जावे
धुंद त्या सुरांनी ॥

काल सकाळपासून सुमनजींच्या आवाजातील हे अत्यंत सुरेल भावगीत मनात रुंजी घालत आहे. अशोकजी परांजपे यांचे अत्यंत भावूक शब्द अन तितकीच सुंदर अन आर्त चाल हृदयाच्या गाभार्‍यात कुठे तरी भिडते,चलबिचल करून जाते, अस्वस्थ करून जाते पण त्या बरोबरच एक अनामिक सुखद हुरहूर देखील लावून जाते. का कुणास ठाऊक मला हे विरहगीताएवढेच गतकालातील स्वत:च्या अनेक सुखद स्मृतींना आळवणी करणारे वाटते!

प्रत्येकाच्या जीवनात एक प्रेयसी येऊन मग मीलन न होता विरहच होतो असे नाही; किंबहुना माझ्या नव्हे आपल्या पीढीच्या अनेकांच्या जीवनात तसे घडलेही नसते परंतु तरीही आपल्या सर्वांच्या तरुण काळात अशा अनेक प्रणयरम्य, हळुवार क्षण आलेले असतात अन त्याचेच द्योतक हे भावगीत आहे असे मला वाटते. भावनाशील अशा त्या वयात अनेक क्षण मोहून टाकणारे असतात, अनहत स्मृती नादमय आठवणी सोडून जातात आणि म्हणूनच मग आज या मावळतीच्या वयात वाटते
“एकदाच वाटे सखया, तुझे गीत कानी, धुंद होऊनी मी जावे, धुंद त्या स्वरांनी”.... ते गीत, ते स्वर म्हणजे यौवनातील, भावमय तारुण्यातील सुरेल क्षण ज्यांची ओढ आता वेडावत आहे.

मग त्या न संपणार्‍या रात्री आठवतात, स्वप्ने पाहत काळाचे भान विसरत व्यतित केलेल्या, परिचितच स्पर्शाने धुंद झालेल्या, गंधित झालेल्या, स्वप्नवत भासणार्‍या, अन मग आज वाटू लागते
“पुन्हा गुज अंतरीचे
हे कथावे व्यथांनी”
अंतरीचे ते गुंजन स्मृतीच्या व्यथांतून ध्वनित व्हावे, व्यक्त व्हावे अन त्या गतकालविव्हल व्यथाच आल्हाददायक वाटाव्यात.

या परतीच्या वाटेवर, हे यौवना, हे गतकाल स्वप्नांनो, मी तुम्हाला पहावे.... त्या चांदण्यात पुन्हा न्हाऊन निघावे, आज केवळ व्यावहारिकतेत दग्ध झालेल्या भावना पुन्हा फुलून याव्या. अशाच एका शांत शांत मध्यरात्री स्तब्धतेत तुझी भेट व्हावी, अन आज आठवणींच्या शब्दरूपात जीव विरून जावा.

आता या वाटेवर हे स्वप्न हृदयात रुणझुण करत आहे. खुळ्या अन निरागस भावनांनी या गतकालातील स्वप्नाचा ध्यास घेतला आहे.अन म्हणूनच वाटते आहे, सत्यात शक्य नसेल तरीही
“धुंद होऊनी मी जावे
धुंद त्या आठवांनी”
डिस्क्लेमर: साठीच्या खालील वयाच्या तरुणांना कदाचित हे जरा असंबध्द वाटू शकते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्येकाच्या तारुण्यात, पुढे आयुष्यभरत हुरहूर लावणारे ,
त्यांच्या नुसत्या रोमांचकारी आठवणीनेही चेहऱ्यावर मंद स्मित उमटवणारे असे काही घडून गेलेलेच असते..

या आणि अशा गाण्यानी ते अलगद शब्दात टिपलेले असते.

खूप छान लिहिले आहेत..

खूप सुंदर लिहिले आहे.
ते गाणेच अतिशय हुरहुर लावणारे आहे. ..
" पुन्हा गुज अंतरीचे
हे कथावे व्यथांनी” हे तर सुमनजींनी ज्या पद्धतीने गायले आहे की डोळे पाणावतातच. .

माझी देखील आवडती गाणी; सुमनताई+अशोक पत्कि+अशोकजी परांजपे या त्रयीची. यांत अजुन तीन गाण्यांची भर -

नाविका रे...

केतकिच्या बनी...

पाखरा जा...

<<<माझी देखील आवडती गाणी; सुमनताई+अशोक पत्कि+अशोकजी परांजपे या त्रयीची. यांत अजुन तीन गाण्यांची भर -
नाविका रे...
केतकिच्या बनी...
पाखरा जा...
नवीन Submitted by राज on 29 August>>>

अगदीच ..उभ्या मराठी मनात रुजलेली गाणी आणि सुमनबाईंंचा निर्मळ स्वरही.