कर्नाटकी शास्त्रीय गायक टी. एम. कृष्णा यांनी कला, कलासाधना यासंदर्भातली सहसा चर्चा न होणारी एक मिती या पुस्तकात सुस्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. लोकानुनय, रसिकानुनय, आनंद, विरंगुळा - कलाविष्कारांवरचे असे जगमान्य पापुद्रे काढून टाकून जगण्याचा शोधक प्रवास म्हणून कलेला आपलंसं केलं पाहिजे; कलेला जातीभेद, वर्गभेद, धर्मभेद यांच्या चौकटीत अडकवून ठेवता कामा नये; कला ही त्यापलिकडचीही एक वेगळी जाणीव आहे; असं ते ठासून सांगतात. हे सांगत असताना त्यांनी आपल्या अनुभवांतून आलेली काही खणखणीत विधानं केली आहेत.
उदा. कर्नाटकी संगीत कार्यक्रम म्हणजे निव्वळ श्रवणभक्ती उरत नाही, तिथे ब्राह्मणी संस्कृतीचं पुरेपूर प्रतिनिधित्व दिसतं. (ते स्वतः कर्नाटक संगीत शिकत असतानाच्या काही गोष्टी, निरिक्षणं त्यांनी पुस्तकात थोडक्यात सांगितली आहेत.)
रसिकांना, श्रोत्यांना, डोळ्यांसमोर ठेवून कलानिर्मिती करण्यातच कलाकारांना जास्त रस असतो. कलारसिकांकडे सहप्रवासी म्हणून नव्हे, तर एक ग्राहक (कन्झुमर) म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे, कलाकार आनंदाचे पुरवठादार बनून राहतात.
कला जेव्हा धार्मिक अनुष्ठान बनून राहते तेव्हा आपली निर्मितीक्षमता गमावून बसते.
-----
भारतीय कलेवर जातिभेदाचे खूप परिणाम झाले आहेत, याची चर्चा करण्यावर त्यांनी पुस्तकात विशेष भर दिला आहे. त्यांत भरतनाट्यम आणि देवदासी नृत्य यांबद्दलचं तुलनात्मक विवेचन मला आवडलं. दक्षिण भारतात देवदासींना समाजात मानाचं स्थान असण्याच्या काळात त्यांच्या कलेचंही कौतुक होत असे. कर्नाटक संगीत, सादिर (भरतनाट्यमचं सुरुवातीचं रूप) यांत देवदासी त्यांच्या समाजातल्या पुरुषांच्या बरोबरीनं, अगदी ब्राह्मणांच्याही बरोबरीनं, सहभागी होत असत. मात्र देवदासी प्रथेतली छुपी पिळवणूक उघड झाल्यावर आणि देवदासी प्रथा बंद करण्याच्या मागणीनं जोर धरल्यावर देवदासींकडे वेश्या म्हणून पाहिलं जाऊ लागलं. आणि कर्नाटक संगीत आणि भरतनाट्यम कलेतून देवदासी कायमच्या दूर केल्या गेल्या. त्यांचं या कलांमधलं ज्ञान, अनुभव पूर्णपणे दुर्लक्षिलं गेलं. त्यांच्या समाजातले पुरूष पुढे नृत्यगुरू वगैरे म्हणवून घेत ब्राह्मण शिष्यांना शिकवू लागले. मात्र त्यांच्या समाजातली कला मुख्यत्वे ज्यांच्यामुळे टिकून होती त्या स्त्रिया दिसेनाशाच झाल्या. पुढच्या काही पिढ्यांमध्ये कित्येकजणी कंगाल अवस्थेत मरण पावल्या. सादिर हा वाईट शब्द मानला जाऊ लागला. भरतनाट्यमला उच्च दर्जा प्राप्त झाला. तामिळनाडूतल्या एका पारंपरिक नाट्यप्रकारावरही (तेरुक्कुट्टु) याचा परिणाम होत गेला. आणि आज असं चित्र आहे, की तेरुक्कुट्टुला खालच्या दर्जाची स्थानिक कला मानलं जातं आणि कर्नाटक संगीताला उच्चकलेचा दर्जा दिला जातो.
उच्चस्थानावरून खाली पाझरणारा कलेचा प्रवाह म्हणजे दान, परोपकार, दया; मात्र प्रवाहाची दिशा उलटी असेल तर तो कमी दर्जाचा, म्हणून शुद्धीकरणाची नितांत गरज असलेला; ही कित्येक शतकांची सामाजिक धारणा बदलणे गरजेचं आहे. उच्च कलाजगतातलं कुणी जर म्हणत असेल, की आमची कला कशी कायम मुक्त देवाणघेवाण करत आलेली आहे, तर हा फुकाचा समतावाद तात्काळ खोडून काढला पाहिजे; हे लेखकाने कळकळीने सांगितलं आहे.
ते सांगताना त्यांनी भारताबद्दलचं एक इंटरेस्टिंग निरिक्षण मांडलं आहे, की भारताच्या राजकीय पटलावरची उच्चजातीयांची मक्तेदारी कधीच मोडीत निघाली आहे; मात्र सांस्कृतिक पटलावर अजूनही त्यांचीच मालकी आहे.
त्यांच्या परिचयातल्या उत्तम गायक असणार्या एका गृहस्थांचं त्यांनी उदाहरण दिलं आहे. आपल्या संगीताला बंदिस्त, वातानुकूलित प्रेक्षागृहातून बाहेर काढण्याची या गृहस्थांची इच्छा होती. म्हणून त्यांनी एकदा दक्षिण भारतातल्या एका समुद्रकिनार्यावर स्वतःच्या गायनाचा जाहीर कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रमाच्या जाहिरातीत त्यांनी लिहिलं, की हा कार्यक्रम निम्नवर्गीय, कष्टकरी श्रोत्यांसाठी मोफत खुला आहे. उच्चवर्गीय कलारसिकांनी कार्यक्रमास येऊ नये. अनेकांनी त्यांच्या या दृष्टीकोनाची वाहवा केली. पण तो देखील शुद्ध वर्गभेद होता, हे कुणाच्या ध्यानातही आलं नाही.
लेखक स्वतःच्या कर्नाटक संगीतकलाकार म्हणून झालेल्या प्रवासाबद्दलही या दृष्टीकोनातून प्रकाश टाकतात. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी प्रथम जाहीर गायन केलं. पुढच्या दशकभरात ते कर्नाटक संगीतातली तंत्रं, तालातले बारकावे, आवाजावरची-रागांवरची हुकुमत मिळवत गेले. कर्नाटक संगीतातले स्टार म्हणवले जाऊ लागले. हे सांगताना ते लिहितात- आज पुस्तकात उभ्या केलेल्या प्रश्नांपैकी एकही प्रश्न तेव्हा मला पडायचा नाही. कलेच्या अदृश्य सामाजिक-सांस्कृतिक पिंजर्यातही मोकळेपणाने विहरणार्या कलाकारांपैकी मी एक होतो. वास्तविक मी त्या पिंजर्यात अडकलो आहे, हे मला तेव्हा लक्षातच आलं नाही.
-----
हे झालं content बद्दल.
पुस्तकाची भाषा जड आहे. मला ते उपदेशपर जास्त वाटलं. लेखकाला जे म्हणायचं आहे त्याला पुष्टी देणारे अनेक अनुभव त्यांच्याकडे असणार; rather म्हणूनच त्यांना हे पुस्तक लिहावंसं वाटलं असणार. ते अनुभव पुस्तकात अधिक विस्तारानं यायला हवे होते, असं वाचताना सतत वाटलं.
तरीही, वेगळं काही वाचायचं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा.
(यांचंच Sebastian and Sons : A Brief History of Mrdangam Makers हे पुस्तकही विकत घेतलं आहे. अजून वाचलेलं नाही.)
चांगला परिचय. हिंदुस्थानी
चांगला परिचय. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातही हे चित्र दिसतं का?
चांगला परिचय
चांगला परिचय
हिंदुस्थानी शास्त्रीय
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातही हे चित्र दिसतं का? >>> त्या क्षेत्रातल्या कुणी त्याबद्दल काही लिहिलंय का बघायला हवं. या पुस्तकात दक्षिणी कलाक्षेत्राबद्दलच आहे.