सिनेमावाला
There is no end. There is no beginning. There is only the infinite passion of life … Fellini
सुप्रसिद्ध दिग्दर्शक कौशिक गांगुली यांचा २०१६ सालचा बंगाली भाषेतील चित्रपट “सिनेमावाला” या चित्रपटास फिल्म फेअर अवार्ड फोर बेस्ट फिल्म, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट अक्तर म्हणून परण बंधोपाध्याय, बेस्ट स्टोरी स्वत: कौशिक गांगुली, प्रोडक्शन डिझाईन म्हणून धनंजय मंडल अशी विविध पारीतोशके मिळाली होती. त्याचप्रमाणे विशेष उलेखनीय बाब , २०१५ साली इफ्फीचे विशेष पारितोषक या चित्रपटास प्राप्त झाले होते.
सिनेमावालाची कथा आहे बाप आणि लेक यांच्यात असणाऱ्या तणावपूर्ण संबधाची. वर्षानुवर्षे एका घरात राहून सुद्धा त्या दोघांच्यात ना कोणते प्रेम आहे ना कोणताही संवाद. वडिलांच्या बद्दल लहानपणापासून मुलाच्या मनात तेढ आहे आणि मुलाचे विचार, त्याची संस्कृती बापाला मान्य नाही. पण सकृतदर्शनी दिसणाऱ्या या कलहाच्या तळाशी, ना केवळ दोन पिढ्यांच्यातील अंतर वा वैचारिक तफावत इतकेच मुद्दे आहेत तर त्याच्या तळाशी आहे सर्वांच्या जिव्हाळ्याचा असलेला विषय “ सिनेमा”
प्राणबेंदू दास ( परण बंधोपाध्याय ) एके काळचा गावातील प्रतिष्ठीत नागरिक. वयाची पंचाहत्तरी ओलांडली तरी बंगाल मधील एका गावात त्याचा मासळी बाजार आहे. पण हा व्यवसाय पारंपारिक आहे. त्याचे वडील हा व्यवसाय करायचे म्हणून तो करतो आणि नाईलाज म्हणून सध्या त्याचा मुलगा प्रकाश ( परमब्रटा चटोपाध्याय ) करतो. पण प्राणबेंदूचा खरा आत्मा आहे “ सिनेमा”. त्या रंगीबेरंगी जगात, त्यातील आठवणीत तो सदासर्वकाळ रममाण झालेला असतो. म्हणूनच कि काय ऐन तारुण्याच्या भरात त्याने गावात थेटर काढले आणि आजही त्या साऱ्या आठवणी त्याला बेचैन करत असतात. काळ बदलला. थेटर ओस पडली पण तरीही प्राणबेंदू मात्र भूतकाळात अनेक वेळा जात असतो आणि त्याचा त्यावेळचा मित्र आणि सहकारी हरी ( अरुण गुह्ठाकुरट) त्याच्या आठवणी पुन्हा पुन्हा ऐकत असतो. हरीचाही आता वृद्धापकाळ आला आहे पण मित्राची साथ त्याला सोडायची नाही.
पूर्वी दिमाखात उभे असणारया थेटरची रया आता पूर्णपणे गेलेली आहे . कुठेतरी बाहेर अंधुकसा दिवा. थेटरच्या त्या ओसाड ऑफिसात प्राणबेंदू आणि हरी पूर्वीच्या आठवणीना उजाळा देत आहेत . त्यांच्या बोलण्याचा विषय आहे बंगालमधील तत्कालीन सुप्रसिद्ध अभिनेता उत्तमकुमार. प्राणबेंदू उत्तमकुमारला केवळ आवडता अभिनेता म्हणून मानत नाही तर जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळाले होते, जेव्हा फाळणी झाली होती, कमालीच्या नैराश्याने लोकांना घेरलेले होते तेव्हा यातून बाहेर पडण्यासाठी लोकांना हवी होती वेगळी दिशा , वेगळा आनंद. तो आनंद उत्तमकुमारने दिला. उत्तमकुमार !!!! त्या वेळचा त्याचा आवाज .. त्याची ऐट या साऱ्या आठवणी तो पुन्हापुन्हा काढत असतो. उत्तमकुमार त्याचे सर्वस्व आहे.
मद्याच्या नशेत जुना काळ आठवत असताना, त्याच्या मनात आहे उत्तमकुमारच्या आठवणी बरोबरच अजुनी एक सलणारी वेदना. कधी काळी दिमाखात चालणारा हा थेटरचा व्यवसाय आता डबघाईला आला आहे. आणि त्याचे कारण आहे बाजारात नकली डी. व्ही. डी आणि सी. डी चा झालेला सुळसुळाट. सिनेमागृहाची हि होत असलेली उतरंड हे प्राणबेंदूचे दु:ख आहे पण त्याहीपेक्षा त्याच्याच घरात त्याचा मुलगा हा व्यवसाय करत असतो याच्या तीव्र वेदना त्याला होत असतात. त्या घरात आपण कधी जाऊ नये, मुलाचे तोंड सुद्धा पाहू नये इतके वैफल्य त्याला आलेले असते. मद्याची झालेली नशा आणि काळजातले दु:ख त्याला असह्य होते आणि प्राणबेंदू ओक्साबोक्शी रडू लागतो. हरी आणि तो घरी जाण्यसाठी उठतात. बाहेर असणारा मिणमिणता दिवा बंद होतो. जणू त्याच्या आयुष्यात आहे ती फक्त निराशा.
प्राणबेंदू निराश आहे पण प्रकाश आपल्याच धुंदीत आहे. सत्याची कास, तत्व याच्याशी त्याचा काहीच संबध नाही. एक दिवस तो वर्तमानपत्रात डी व्ही डी प्रोजेक्टरची जाहिरात बघतो आणि त्याच्या मनात येते गावाच्या जत्रेत लोकांना डी व्ही डी वर चित्रपट दाखवायचा. पाचशे लोक येतील भरपूर फायदा होईल या स्वप्नात तो रममाण झालेला आहे. वास्तविक, हे बेकायदेशीर कृत्य आहे पण प्रकाशला ते करायचे आहे. वडिलांच्या सारखा माशाचा व्यवसाय त्याला करायचा नाही.
थेटरच्या समोर भरलेली गावची जत्रा. प्रकाशला जत्रेत सिनेमा दाखवायचा आहे. जत्रेच्या सिनेमाच्या वेळी प्राणबेंदूचे एकटेपण त्याच्या मनाची घालमेल प्रभावीपणे आपल्या समोर येते. एकीकडे सिनेमाचा पडदा वर चढत आहे आणि दुसरीकडे प्राणबेंदू आपल्या आवडत्या नटाच्या वर देवादिकांच्यावर जसे पाणी शिंपडतात तसे पाणी शिंपडत आहे. जत्रेचा गोंगाट आणि त्याचे शांतपणे जेवण. पण हि शांतात सकृत दर्शनी आहे. मनात आहे घोंगावणारे वादळ. आजपर्यत माझा मुलगा सी डी चा चोर बाजार करायचा आता तो राजरोसपणे लुटमार करतोय. जत्रेत
बेकायदेशीररित्या सिनेमा दाखवून लोकांना लुबाड्तोय ? प्राणबेंदू अस्वस्थ आहे. बोलता बोलता लाईट जाते आणि प्राणबेंदूच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पसरते. मनात अंधुक आशा. लाईट नसल्याने जत्रेतला सिनेमा बंद पडणार. आधुनिक युगात जनरेटर असेल हे सुद्धा त्याला भावनेच्या भरात लक्षात येत नाही. हरी मेणबत्ती लावतो पण प्राणबेंदूला ती लावायची नाही कारण त्याला अंधारातच राहायचे आहे.
समोरच्या जत्रेत लागणाऱ्या सिनेमाचा आवाज आणि हा अंधार! गाडीवरून डी व्ही डी प्रोजेक्टर घेऊन जाणारा प्रकाश, जत्रेचे आपल्या डोळ्यासमोरून जाणारे झगमगी रूप, थेटरची काळी पडलेली भिंत, प्रेक्ष्कांच्याशिवाय ओसाड पडलेले थेटर, प्रोजेक्टरचे गंजलेले मशीन ! हि सर्व दृशे आपल्यालाही अस्वस्थ करतात आणि प्राणबेंदूच्या मनात काय चालले असेल याचा आपण मनात विचार करू लागतो. मघाशी दु:खी असणारा प्राणबेंदू चेहरा काही क्षणात करारी होतो. जणू त्याने मनाशी काही ठरवले आहे. त्याचे थेटर जुने झाले आहे. प्रोजेक्टर सुद्धा जुनेच आहेत. ते प्रोजेक्टर तो विकायचे ठरवतो.. मनात असणारे विचार त्याला अधिकच बेचैन करतात. प्राणबेंदूला न कौटुंबिक सुख मिळालेले असते न सिनेमाचे. मनातल्या भावनांना तो वाट मोकळी करून देण्यासाठी “ सिनेमा ..” म्हणून जोरात ओरडतो.
रात्रीची वेळ. प्राणबेंदू आणि हरी त्यांच्या थेटर मधून बाहेर पडतात. जत्रेमध्ये प्रकाशने जिथे सिनेमा दाखवला त्या जागेला त्याला भेट द्यायची आहे. जत्रा आता संपुष्टात आलेली आहे. मघाशी गजबजलेला परिसर पूर्ण शांत झालेला आहे. जिथे प्रकाशने सिनेमा दाखवला होता ते तंबू वजा थेटर सुद्धा तसेच शांत. हाउसफुलचा लटकलेला बोर्ड, खाली चुरगाळून पडलेली तिकीटे, आणि समोर अंधारात अस्पष्ट दिसणारा सिनेमाचा पांढरा पडदा. हरीला प्राणबेंदू लाईट मारायला सांगतो . त्यांना तो पडदा बघायचा आहे. आता प्राणबेंदूच्या चेहऱ्यावर प्रकाश आहे आणि समोरच्या पडद्यावर काळी आकृती. प्राणबेंदू छद्मीपणे हसतो कारण माझा मुलगा सुद्धा सिनेमावालाच निघाला. फरक फक्त इतकाच कि तो चोरी करून चित्रपट दाखवतो आणि या व्यवसायासाठी प्राणबेंदूनि आपले आयुष्य खर्च केले. एक सत्याने प्रकाशलेली प्रतिमा आणि दुसरी पडद्यावर दिसणारी काळी आकृती आपल्याला दिसते.
प्राणबेंदू प्रोजेक्टर विकण्याचा निर्णय घेतलेला आहेच. त्या दिवशी सकाळी नवीन नावाचा माणूस प्रोजेक्टर नेण्यासाठी येणार आहे. हरी त्या तयारीत आहे. पण वरवर शांत वाटणारा हरी दु:खी आहे. प्रोजेक्टर ओपेरेट करण्यसाठी तो आला होता तेव्हा त्याचे वय होते तेवीस आणि आताचा हा वृद्ध हरी. एका दृष्टीने त्याने आपले आयुष्य त्यात काढले. अचानक खाली गाडी येते. खट्ट करून आवाज येतो आणि आकाशात पक्षी उडू लागतात. जणू सगळे काही संपले होत. थोड्याच वेळात प्रोजेक्टर नेण्यासाठी आलेली माणसे आणि पाठीमागून शांत संगीत. जणू त्या प्रोजेक्टरची अंत्ययात्रा सुरु आहे.
प्रोजेक्टर विकून प्राणबेंदू आपल्या घरी येतो आणि मुलाला त्याचे सर्व पैसे देऊ लागतो. मुलाच्या धंद्याबद्दल त्याला नाराजी आहेच. कारण केवळ तो धंदा बेकायदेशीर आहे म्हणून नव्हे तर सिनेमा उद्योगाला यामुळे ओहोटी लागली याचे वैषम्य त्याला आहे. या बेकायदेशीर कृत्यामुळे ज्या लोकांनी चित्रपट बनवण्यासाठी श्रम घेतले त्या लोकांच्या पोटावर पाय येत नाहीत का ? हि खंत त्याला आहे. मुलाला एक दिवस पोलीस पकडून नेतील हि आशंका सुद्धा त्याच्या मनात आहे. प्राणबेंदू मनातल सर्व काही प्रकाशला सांगत असतो, मुलगा ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. पण इतक्यात खरेच पोलीस येतात. मुलाला वडिलांच्यावर संशय आहे कि तो बेकायदेशी व्यापार करतो म्हणून त्यांनीच तक्रार केली असेल. पण पोलीस आले आहेत प्राणबेंदूकडे दु:खद बातमी द्यायला. त्यांच्या लाडक्या मित्राने हरीने आत्महत्या केली..
जडावलेल्या पायाने प्राणबेंदू थेटर मध्ये जातो. त्याच्या डोळ्यासमोर आहे तेवीस वर्षाचा सफाईदारपणे प्रोजेक्टर हाताळणारा हरी. पण आता काही राहिले नव्हते. खिडक्याच्या दारातून बघणारा प्राणबेंदू आणि समोर असणारे हरीचे प्रेत. थोड्याच वेळात जत्रेला दाखवणाऱ्या सिनेमाची लाउड स्पीकर वरून होणारी घोषणा आणि दुसरीकडे जाणारी हरीची प्रेतयात्रा आपल्याला दिसते.
हरीची जाण्याने संपूर्ण उद्वस्थ झालेला प्राणबेंदू ऑफिस मधील सर्व कागदे, कलाकारांच्या तसबिरी जाळून टाकतो. आगीचा डोंब उसळला आहे. थेटरच्या बाहेर त्याचा डबा घेऊन आलेली सून मदतीचा आक्रोश करत आहे. प्राणबेंदू धीरगंभीर पाउले टाकतो. सिनेमाच्या होल मध्ये प्रवेश करतो. दारावर असणारा “एक्झीट” चा बोर्ड. सिनेमाच्या त्या प्रेक्षकरहित हाल मधून तो पडद्याकडे चालत राहतो. पडद्यातून त्याला हरी बोलावत आहे. त्या जुन्या पडद्यात दोघे एकमेकाला भेटतात आणि दूरवर चालत असतना आपल्याला दिसातात. हरी म्हणतो” जो पर्यत आपल्याला चालता येते तो पर्यत चालायचे आहे.” चित्रपट संपतो
उत्तम दिग्दर्शानाने नटलेला हा चित्रपट आहे. सी डी आणि डी व्ही डी च्या आधुनिक काळात जुन्या थेटरची होणारी वाताहत यांचे भावस्पर्शी आणि वास्तववादी चित्रण या चित्रपटात घडले आहे. चित्रपटाचा शेवट विचार करायला लावतो. प्राणबेंदू जुन्या काळाचे प्रतिक. त्याने आता एक्झीट घेतली आहे आणि जो पर्यंत चालता येते तो पर्यत चालायचे असा संदेश जुना काळ देतो आहे. हरीची आत्महत्या आणि प्रोजेक्टरचे प्रेतासारखे घेऊन जाणे हे मन हेलावून टाकते. परणबंधोपाध्यायचा अभिनय ! वा क्या बात है ! स्वत:च्या अभिनयाच्या द्वारे एक काळ आपल्या समोर व्यक्त होणे .. मग तो चित्रपटाबद्दल असलेली निष्ठा या बाबतीतला असो किंवा त्याच्या आणि मुलाच्या संघर्षाचा असो. भूमिका संयत आणि तितकीच प्रभावी. हरीच्या भूमिकेत अरुण आणि प्रकाशच्या भूमिकेत परमब्रटा तितकेच उत्तम
हा चित्रपट मी बघितला तेव्हा कोविड मुळे थेटर बंद पडलेली होती. बाहेर शुकशुकाट होता. समोर असणार्या सोडा वाटरच्या गाड्या, रिक्षा , भेलच्या गाड्या सर्व बंद होते. मनात विचार आला कि सिनेमा बंद आहे तर या गोरगरीब लोकांच्या पोटावर सुद्धा पाय नाही का ? निर्माते, वितरक यांनी यासाठी किती मेहनत केली असेल पण याचा फटका त्यानाही बसणार नाही का ? पण आज कोविड मुळे आम्ही/ थेटरला जाऊ शकत नाही पण एरवी सुद्धा घरीच चित्रपट बघण्याकडे आपला कल का असतो ? का हा खरा प्रश्न आहे. आधुनिकतेचा स्पर्श सर्व जगाला झाला. आणि त्यात बर्याच गोष्टी भरडल्या गेल्या हे खरच क्लेशकारक आहे. सी डी किंवा इंटरनेट च्या माध्यमातून थेटरवर न लागणारे चित्रपट बघण्याची सोय झाली पण नवीन चित्रपट थेटरवर बघून त्यात आनद घ्यायला पाहिजे असे वाटते.
हा चित्रपट बघत असताना प्राणबेंदू प्रामाणेच आपणही भूतकाळात जातो. ऑन लाईन तिकिटे बुक करणे सोयीचे असेलही पण गर्दीमध्ये जाऊन पहिल्या दिवशी पहिला शो बघण्याचा आनंद ...अडव्हांस बुकिंग करून सिनेमाची तिकिटे शाळेच्या वहीत लपवून ठेवण्याचा आनद...... तुडुंब भरलेल्या गर्दीत पडद्यावर आवडत्या हीरोचे दर्शन झाले कि जोरात शिट्टी मारून केलेला जल्लोष, हाउसफुलचा बोर्ड बघितल्यावर व्यक्त केलेली हळहळ , मित्राबरोबर चोरून बघितलेले सिनेमे, वडिलांचा खाल्लेला ओरडा हे सारे कुठेतरी लोप पावले. खऱ्या आनंदाची जागा सोयीने घेतली आणि चेहऱ्यावर नकली हसू आणत आम्ही त्याला आनद समजू लागलो. पण असे असले तरी सिनेमा मात्र शाश्वत आहे, शाश्वत राहणार आहे. कारण आम्ही “ सिनेमावाला” आहोत
नेहमीप्रमाणेच इत्यंभुत माहिती
नेहमीप्रमाणेच इत्यंभुत माहिती आणि रसग्रहण..!
ओ सतीश गजानन कुलकर्णी, तुम्ही
ओ सतीश गजानन कुलकर्णी, आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर साहिर लुधियानवी जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष रजनीगंधा कार्यक्रम सुरू आहे त्या कार्यक्रमाचं लेखन केलंय ते तुम्हीच आहात का हो...?
हो. तो मीच सतीश गजानन
हो. तो मीच सतीश गजानन कुलकर्णी कोल्हापूर
९९६०७९६०१९
अरे वा... मी परवा पासुन तुमचा
अरे वा... मी परवा पासुन तुमचा कार्यक्रम ऐकतोय. छान लिहिता तुम्ही. गाणी सुद्धा खूप अवीट गोडीची निवडलीत. आज देखील या कार्यक्रमाचा पुढील भाग आवर्जुन ऐकणार आहे. तुम्हाला फोन करेन मी.