विदेशी कथा परिचयमालेतील याआधीचे लेख:
१ कोसळणारा पाउस : १०० वर्षांपूर्वी !
२. एका आईचा सूडाग्नी
३. कुणास सांगू ?
४. ‘भेट’ तिची त्याची
५. नकोसा पांढरा हत्ती
६. ती सुंदर? मीही सुंदर ! (https://www.maayboli.com/node/79585)
७. गावची लॉटरी जत्रा (https://www.maayboli.com/node/79684)
............................................................
आतापर्यंत या लेखमालेत आपण ७ विदेशी कथांचा परिचय करून घेतला. नियमित वाचकांच्या अभ्यासपूर्ण आणि उत्साहवर्धक प्रतिसादांमुळे संबंधित धाग्यावरील चर्चाही चांगल्या रंगल्या. त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि मालेच्या आठव्या भागात स्वागत !
ही लेखमाला तिच्या नावानुसार विदेशी ‘कथां’ची आहे. पण या भागात तिची व्याप्ती थोडी वाढवत आहे. त्याबद्दल सर्व वाचकांची संमती गृहीत धरतो. इथे कथेऐवजी एका विदेशी नाटकाचा परिचय करून देत आहे. सर्वसाधारण नाटकाच्या लांबीची आपल्याला कल्पना असते. एकांकिकेच्या लहान कालावधीशी पण आपण सरावलेले असतो. पण त्याहूनही अतिलहान नाटक असू शकते ? आता तुमच्या कल्पनाशक्तीला काहीसा धक्का बसणार आहे. या नाटकाचा सादरीकरण कालावधी फक्त ३ मिनिटे आहे !! म्हणूनच ते रूढ अर्थाने ‘नाटक’ नसून ‘नाटुकले’ आहे.
‘Come and go’ नावाची ही जगप्रसिद्ध कलाकृती लिहिली आहे Samuel B. Beckett यांनी. प्रथम या दिग्गजाचा अल्पपरिचय करून देतो.
सॅम्युअल हे जन्माने आयरीश. मोठेपणी यांचे अधिकतर वास्तव्य फ्रान्समध्ये होते. त्यांची साहित्यिक कारकीर्द थक्क करणारी आहे. कथा, कादंबरी, नाटक, कविता आणि अनुवाद या सर्व प्रांतात त्यांनी लेखन केलेले आहे. याखेरीज ते नाट्यदिग्दर्शकही होते. त्यांनी इंग्लिश व फ्रेंच अशा दोन्ही भाषांत लेखन केले. आपल्या लेखनातून त्यांनी मानवी अस्तित्वासंबंधीच्या मूलभूत प्रश्नांना हात घातला. सुखात्मिक व शोकात्मिक हे दोन्ही लेखनप्रकार त्यांनी हाताळले. जशी त्यांची साहित्यिक कारकीर्द बहरत गेली तसे त्यांचे लेखन अधिकाधिक अल्पाक्षरी होत गेले. भाषा सौंदर्याचे विविध प्रकार त्यांच्या लेखनात पहावयास मिळतात. अशा या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाच्या लेखकाला 1969 चे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले. 1989 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. लेखनातील अल्पाक्षरत्व या त्यांच्या गुणाचे एक टोकाचे उदाहरण म्हणजे ‘Come and go’ हे प्रस्तुत नाटुकले.
नाट्यपरिचय
हे नाटुकले 1965 मध्ये इंग्लिश भाषेत लिहिले गेले, मात्र त्याचा पहिला प्रयोग जर्मन भाषेत झाला. कालांतराने तो इंग्लिशमध्येही सादर झाला. त्यातील एकूण शब्दसंख्या 121 ते 127 च्या दरम्यान आहे. संख्येतील हा फरक भाषांतरानुसार पडला आहे. नाट्यप्रयोगात रंगमंचावरील मांडणी एकदम साधी असून ती अशी आहे :
एकूण पात्रे तीन. तिघीही सामान्य, कुठलेही वैशिष्ट्य नसलेल्या व हॅट घातलेल्या स्त्रिया. हॅट जवळपास पूर्ण कपाळ झाकून टाकणारी. त्यांचे कपडे विटके. त्यांची नावे फ्लो, व्हाय व रु अशी आहेत. तिघी एका बाकड्यावर शेजारी शेजारी बसलेल्या आहेत. त्या बालपणीच्या मैत्रिणी आहेत.
(चित्रसौजन्य : academia.edu)
आता व्हाय म्हणते, “आपण तिघी या आधी कधी भेटलो होतो ?” त्यावर रू म्हणते, “आपण ते बोलायला नको”.
मग व्हाय उठून निघून जाते.
आता ज्या दोघी उरल्यात त्यांचा संवाद असा :
फ्लो : व्हायबद्दल तुझं मत काय ?
रु : तिच्यात फारसा बदल वाटत नाही.
फ्लो रुच्या कानात पुटपुटते. त्यावर रू धक्का बसून उद्गारते, “ओह”. फ्लो ओठांवर बोट ठेवते.
रू : तिला कळत नाही का ?
फ्लो : देवदयेने नाही.
आता व्हाय परत येते. मग फ्लो निघून जाते.
इथून पुढे बाकावर ज्या दोघी राहतात, त्यांच्यात वरील संवादाची (गेलेलीबद्दल) तशीच पुनरावृत्ती होते. ती झाली, की निघून गेलेली स्त्री परत येते. पुढे तिसऱ्या फेरीत रू निघून जाते. पुन्हा एकदा उरलेल्या दोघींत तेच संवाद. पण तीन फेऱ्यांत एक महत्त्वाचा फरक. वरील संवादांमध्ये जेव्हा प्रत्येक स्त्री धक्का बसून ‘ओह’ हा उद्गार काढते, त्या तीन ‘ओह’मध्ये उच्चार व तीव्रता या दृष्टीने मुद्दाम फरक ठेवलेला आहे.
आता तिघी शेजारी बसतात. व्हाय म्हणते, “जुन्या दिवसांबद्दल आपण नको का बोलायला?... नंतरचे ते सगळं? पूर्वीसारखे हातात हात घेऊन बसूया का मग ?”
आता तिघी एकमेकांचे हात हाती धरतात. तीन मांड्यांवर हातांच्या तीन जोड्या विसावतात.
आता फ्लो दोघींचे हात चाचपून म्हणते, “अंगठ्या जाणवताहेत मला”. (प्रत्यक्षात कोणाच्याच हातात त्या दिसत नाहीत).
इथे नाटक संपते आणि पडदा पडतो.
…….
विवेचन
असे हे सव्वाशे शब्दांचे आणि तीन मिनिटात संपणारे नाटुकले. क्षणभर असे वाटेल, की यात नाटककार प्रेक्षकांची गंमत करतोय काय? याचे उत्तर देण्याआधी एक लक्षात घेऊ. एकेकाळी पाश्चात्त्य रंगभूमीवर या नाट्याचे रीतसर तिकीट लावून प्रयोग झालेत आणि ते यशस्वी ठरलेत. म्हणजे हे ‘नाटक’ काही प्रेक्षकांना तरी प्रभावित करत असणार.
मग वरवर निरर्थक वाटणाऱ्या त्यातल्या संवादांमागे काय दडलंय? ते शोधायचे काम लेखकाने वाचक, प्रेक्षक आणि समीक्षकांवर सोडून दिले आहे !
बघूया या नाट्याच्या अंतरंगात डोकावून. पाहू तरी काय हाती लागतंय ते.
प्रथम त्या तिघींचे दृश्यरूप बारकाईने पाहू. गणितात जसे आपण ‘क्ष’, ‘य’, असे म्हणतो तशीच त्यांची नावे – वरवर पाहता अर्थहीन. त्यांच्या हॅट्समुळे चेहरे धड दिसूच नयेत अशी रचना. कपडे जाणीवपूर्वक विटके. थोडक्यात, ही बिनचेहऱ्याची माणसं आहेत. त्यांचे बोलणेही अस्पष्ट, कोरडे आणि भावहीन आहे. आता त्यांच्या संवादांकडे वळू.
तिघींचा भूतकाळ हा नकोसा व अप्रिय असावा असे दिसते. बरं, प्रेक्षकांना दिसणारा त्यांचा वर्तमानकाळ तरी कसा आहे? रंगमंचावर त्या फक्त ये-जा करतात आणि त्याची रटाळ पुनरावृत्ती होते. म्हणजे वर्तमान सुद्धा अगदी बेचव, तीच तीच क्रिया घडवणारे आणि रुक्ष दिसते. त्या तिघींच्या तोंडून आळीपाळीने आलेला ‘ओह’ उदगार काय दर्शवतो ? त्या उद्गाराच्याच्या वेळी जी तिथे अनुपस्थित आहे, तिच्या भविष्यासंबंधी काहीतरी स्फोटक किंवा दुःखद बोलले गेले असावे. हा प्रकार प्रत्येकीच्या बाबतीत घडतो. म्हणजे तिघींच्याही आयुष्याबाबत, ‘आता पुढे काही खरं नाही बाई’, अशी निराशावादी अवस्था व्यक्त केलेली दिसते. ती कुजबुजीच्या स्वरुपात आपल्यापुढे सादर होते. आता या संवादांकडे बारकाईने पाहता आता आपल्याला त्यांच्या नावांचा काहीसा उलगडा होतो. रु आणि फ्लो ही नावे, rue व flow या इंग्लिश शब्दांमधून जे काही व्यक्त होतं त्याच्याशी निगडीत असावीत. तसेच तीन स्त्रिया एकत्र असणे आणि संवादातील १-२ ओळींचे, अनुक्रमे शेक्सपिअरच्या ‘मॅकबेथ’ मधील तीन चेटकिणी आणि ‘हॅम्लेट’मधील एका प्रसंगाशी साधर्म्य दाखवते.
अखेरीस, असे सर्व निराशाजनक असले तरीही तिघींना एकमेकींचे हात धरून आधार घ्यावासा वाटतोय. भविष्यात जे काही दुःखद आहे त्याला सर्वांनी मिळून सामोरे जाऊ, असे त्या कृतीतून सुचवलेले दिसते. इथे फ्लोच्या तोंडी, त्यांच्या हातातील अंगठ्या जाणवण्याचा जो उल्लेख येतो, त्याचा संदर्भ कदाचित त्यांच्या पूर्वायुष्यातील प्रेमभंग किंवा घटस्फोट यांच्याशी असावा. त्यानंतर आता त्यांची जी युती झाली आहे ती त्या पूर्वायुष्यातील दुःखावर मात करण्यास सक्षम आहे, असेही सूचित असावे. काही अभ्यासकांना तर या तिघींची घट्ट युती हे हिंदू संस्कृतीतील त्रिमूर्तीचे प्रतीक आहे असे वाटते.
नाटकाची प्रकाशयोजना वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिघी बसलेल्या असताना फक्त त्यांच्यावरच पडेल इतका प्रकाश असतो आणि आजूबाजूला सर्व अंधार. प्रत्येकीची जेव्हा रंगमंचावरून ये-जा होते त्यातून प्रकाशातून अंधःकारात आणि पुन्हा प्रकाशात, असा आयुष्यविषयक दृष्टीकोन सूचित होतो. तिघींचे थोडावेळ एकत्र बसणे आणि मधूनच त्यातल्या एकीचे निघून जाणे यातून माणसांमधील अल्पकालीन जवळीक आणि विरहभावना जाणवतात. तसेच रंगमंचावरील त्यांची कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे झालेली ये-जा आणि कृतीमधील तोचतोपणा यातून मानवी आयुष्यातील चिरंतन वेदना आणि मृत्यूची अटळता सूचित होते.
जितकी आपण कल्पनाशक्ती ताणू, तसे या नाट्याचे सामान्य ऐहिकतेपासून पार अनादि अनंतापर्यंतचे अनेक अर्थ काढता येतील !
आता जरा रंगमंच बाजूला ठेवून आपल्या अवतीभवती नजर टाकू. सामान्य माणसे जेव्हा एकमेकांना अवचित भेटतात तेव्हाचे ठराविक साचेबद्ध संवाद कसे असतात ?
ही एक झलक :
“काय मग, कसं काय चाललंय ?”
“ठीके, चाललंय आपलं कसंतरी !”
“तरीपण काय विशेष ?”
“कसलं विशेष अन कसलं काय. आला दिवस, गेला दिवस”
“हं, खरंय म्हणा !”
अशा सामान्य माणसांच्या प्रतिनिधी म्हणून त्या तिघी रंगमंचावर उभ्या केल्या आहेत. आता तीन पुरुष न घेता तीन स्त्रियाच का घेतल्या, हाही काथ्याकुटाचा विषय होऊ शकतो. एकंदरीत पाहता जवळीक, संवाद आणि आधाराची आत्यंतिक गरज हे ठळकपणे व्यक्त करण्यासाठी स्त्रियांची योजना केलेली असावी. बरं, हे सगळे अवघ्या तीन मिनिटात उरकायचा नाटककाराचा हेतू काय असावा ? त्याकाळी रूढ नाटके दणदणीत तीन अंकी, अगदी ४-५ तास चालणारी असत. असे लांबण लावणे काही लेखकांना अनावश्यक वाटले असावे. माणसांच्या आयुष्यात जे काही चाललंय, ते जर “काही बरं नाही अन काही खरं नाही” याच स्वरूपाचे असेल, तर मग ते कटू सत्य अगदी थोडक्यात आटोपून टाकलेले बरे, असा विचार लेखकाने केलेला दिसतो. प्रायोगिक रंगभूमीवरील हा एक आगळावेगळा आविष्कार म्हणता येईल.
त्या काळी युरोपीय रंगभूमीवर नाटके जास्तीत जास्त आटोपशीर व अधिकाधिक आशयघन करण्याची चढाओढ लागली होती. हे नाटुकले हा त्या चुरशीचा परिपाक असावा.
नाटक ही मुळात सादरीकरणाची कला आहे. या नाटुकल्यात रंगमंचावर जे प्रत्यक्ष संवाद घडतात ते त्रोटक आहेत. परंतु नाटककाराने संहितेत लिहीलेल्या रंगसूचना आणि अन्य टिपणे सविस्तर आहेत. वरील विवेचनातून मी माझ्या परीने नाटकाचा गर्भितार्थ लिहिला आहे. तरीपण हे नाटुकले निव्वळ वाचण्याऐवजी प्रत्यक्ष पाहिल्यावरच प्रेक्षकाला त्याचा भावार्थ समजेल आणि त्याचा आनंद लुटता येईल. इच्छुकांनी संबंधित चित्रफीत जरूर पहावी असे सुचवतो. त्यासाठीचा दुवा तळटीपेत देत आहे.
………………………………………………………………………………………………………
१. मूळ नाटुकले इथे वाचता येईल : http://advdpdrama.weebly.com/uploads/2/3/7/1/23711609/come_and_go_-_samu...
आणि
२. इथे पाहता येईल : https://www.youtube.com/watch?v=rNh3m2xp0k8&t=2s
हॉरर आणि अतिशय विचित्र वाटले
हॉरर आणि अतिशय विचित्र वाटले ते युट्युब नाटक...
सव्वाशे शब्दांचे + तीन
सव्वाशे शब्दांचे + तीन मिनिटात संपणारे नाटुकले ==>
हो पण अनेक अर्थ व दिशांनी विचार करायला सांगनारे आहे .
रोचक व उत्कंठा पुरक लेखमाला !!!
विवेचन नंतर .
परिचय आवडला.
परिचय आवडला.
नाटुकले हा शब्द पण छानच.
पुलेशु
परिचय आवडला.
ड पो
तुम्ही उकलून जे सांगता ते
तुम्ही उकलून जे सांगता ते आवडले.नाटक पाहिले.मनापासून सांगायचे तर ते कळले नाही,त्यामुळे आवडले नाही.हा माबुदो.कारण लिंकच्या खालच्या कॉमेंट्स नाटकाची भलामण करणार्या आहेत.
अभिप्राय व उत्साहवर्धक
अभिप्राय व उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल वरील सर्वांचे आभार !
प्रत्येकाची आवड वेगळी आहे हे अगदी बरोबर.
शेवटी हा प्रायोगिक रंगभूमी प्रकारातील प्रयोग आहे.
असे प्रकार ठराविक लोकांनाच आवडतात, किंवा निव्वळ काहीतरी वेगळे म्हणून त्याची दखल घेतली जाते.
लेख छान लिहिला आहे.
लेख छान लिहिला आहे.
वेगळ्या प्रकारच्या नाटकाची माहिती.धन्यवाद!
(विडिओ खरोखर घाबरवणारा वाटला.)
मिनिमॅलिस्ट नाटक दिसते आहे.
मिनिमॅलिस्ट नाटक दिसते आहे.
छान
छान
अभिप्राय व उत्साहवर्धक
अभिप्राय व उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल वरील सर्वांचे आभार !
धन्यवाद निदान तुमच्यामुळे असे
धन्यवाद निदान तुमच्यामुळे असे प्रयोग कळतायत तरी.
चांगला परिचय
चांगला परिचय
सामो, जाई
सामो, जाई
धन्यवाद.
...
रच्याकने.....
या प्रयोगासारखाच रंगभूमीवर गाजलेला एक प्रयोग ROSAS DANST ROSAS हा आहे.
तो इथे https://www.youtube.com/watch?v=oQCTbCcSxis पाहता येईल
परिचय आवडला.
परिचय आवडला.
सॅम्यूएल बेकेट यांच्याच
सॅम्यूएल बेकेट यांच्याच ‘एण्ड गेम’ या अन्य एका नाटकाचा परिचय करून देणारा एक लेख इथे आहे:
https://www.aksharnama.com/client/kala_sanskruti_detail/5268
ह्या लेखाचा सारांश एका वाक्यात असा:
मानवी जीवन हा न संपणारा, दिशाहीन अभिनय आहे.
लेख छान लिहिला आहे.
लेख छान लिहिला आहे.
वेगळ्या प्रकारच्या नाटकाची माहिती.धन्यवाद!+ १
अफलातुन आहे हे!
अफलातुन आहे हे!
अभिप्राय व उत्साहवर्धक
अभिप्राय व उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल वरील सर्वांचे आभार !
धाग्यात वर्णन केलेले बेकेट
धाग्यात वर्णन केलेले बेकेट यांचे नाटक सर्वाधिक लहान असेल असे वाटले होते. परंतु त्यांनी या नाटकावरही कडी करून अवघ्या 35 सेकंदाचे अन्य नाटक "लिहिले" आहे. Breath हे त्याचे नाव.
यामध्ये कुठलेही जिवंत पात्र नाही. सुरुवातीला ध्वनीमुद्रित केलेला जन्मलेल्या मुलाच्या रडण्याचा आवाज, त्यानंतर एका व्यक्तीच्या श्वास आणि उच्छवासाचा आवाज आणि नंतर पुन्हा एक रडण्याचा आवाज. बस ! इथेच नाटक संपते.
नाटकाच्या संहितेनुसार रंगमंचावर सर्वत्र कचरा पसरून टाकणे अपेक्षित आहे.
या नाटकाचे दोन प्रयोग झाल्याची नोंद आहे. पुढचे माहित नाही.
यातून नाटककाराला काय सांगायचे असावे ?
( दुवा गंडतो आहे breath (play by ..) असे गुगल करावे.
हा हा. ह्याचे दोन प्रयोग होऊ
हा हा. ह्याचे दोन प्रयोग होऊ शकतात तर जगात काहीही होऊ शकतं यावर आता माझा विश्वास बसत चालला आहे. ते दोन प्रयोग जर तिकीट लावून झाले असतील तर मी सुडोमी.
होय !
होय !
इंग्लंडमधल्या प्रथम प्रयोगाला प्रीमियर वगैरे नाव आहे..
..
कम अँड गो या तीन मिनिटांच्या नाटकाचे मात्र बरेच प्रयोग युकेत तिकीट लावून झालेले आहेत असे विजय तेंडुलकरांनी पूर्वीच त्यांच्या एका लेखात लिहिले होते. या नाटकाचे महाराष्ट्रातील प्रायोगिक रंगभूमीवर सुद्धा काही प्रयोग होतात. ( तिकिटाबद्दल माहित नाही).
<< यातून नाटककाराला काय
<< यातून नाटककाराला काय सांगायचे असावे ? >>
हाहाहा, कुठल्याही कलेच्या बाबतीत असला आचरटपणा सहज खपून जातो, मग ती कला म्हणजे नाटक असो, संगीत असो किंवा चित्रकला असो. एखाद्या कलेत नक्की काय सांगायचे आहे असा प्रश्न "सामान्य" व्यक्तीने विचारला की आमची कला ओळखण्याची तुमची लायकी नाही असे म्हणून मोकळे व्ह्यायचे सरळ. फक्त कलाकाराची प्रतिभा, टॅलेंट, व्यक्तीस्वातंत्र्य हेच महान, प्रेक्षकांची पसंती किंवा शंका दुय्यम.
+111 अगदी..
+111 अगदी..
काही चित्रकारांच्या बाबतीतही हे वाचलेले आहे.
पाश्चात्य जगात हेमिंगवे
पाश्चात्य जगात हेमिंगवे यांची सहा शब्दांची कथा काय किंवा बेकेट यांची अशी अत्यंत लघु नाटके काय, ही मुळात पाल्हाळ लावणाऱ्या लेखकांविरुद्धची बंडखोरी होती. असे पूर्वी वाचले होते.
बेकेट यांच्या काळातही तिकडे काही नाटके पाच तास चालत.
..
आपल्याकडचा पूर्वीचा एक नमुना : ( हे नुकतेच मी अन्य धाग्यावर लिहिलं आहे)
फैयाज यांनी अभिनित केलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ चा पहिला प्रयोग तब्बल साडेसहा तास चालला होता ! त्यनंतर दुसऱ्या दिवशी अत्र्यांनी मराठामध्ये त्याचे परीक्षण, “कट्यार घड्याळात घुसली” अशा शीर्षकाने लिहिले.
For sale: baby shoes, never
For sale: baby shoes, never worn ही ती गोष्ट. याला काहीतरी अर्थ आहे (असा माझा समज). पण Andy Warhol च्या आचरट चित्रांना काय म्हणाल? (निव्वळ १ उदाहरण, अशी अनेक उदाहरणे देता येतील).
बालगंधर्वांच्या काळात संगीत
बालगंधर्वांच्या काळात संगीत नाटकांचे प्रयोग रात्री सुरू होऊन पहाटेपर्यंत चालत. प्रेक्षक नाटकातल्या पदांसाठी वन्स मोअरची फर्माईश करत आणि तो वन्स मोअर एकच असे असं नाही. कट्यारच्या बाबत हेच झालं असण्याची शक्यता आहे. ते नाटक लांबण लावणारं होतं म्हणून साडेसहा तास प्रयोग चालला असं नसावं.
भरत
भरत
फैयाज यांची संबंधित मुलाखत इथे आहे : https://www.youtube.com/watch?v=vSCdT8fgBiY
माझ्या आठवणीनुसार त्यांनी असं म्हटलंय, की नाटकातील एकही प्रवेश न गाळता आम्ही ते नाटक केले होते.
For sale: baby shoes, never
For sale: baby shoes, never worn ही ती गोष्ट.
>>>
या विषयावर पूर्वी विजय पाडळकर यांनी 'कथेची लांबी' या आशयाचा एक सुंदर समतोल लेख लिहिला होता. त्या कथेचे अर्थ काढायचे झाल्यास कितीही निघू शकतात.
परंतु सर्वसामान्य कथावाचकांची भूक लक्षात घेता असे प्रयोग टिकणार नाहीत; ते अपवादात्मक असतील असे काहीतरी त्यांनी म्हटले होते.
फैयाज यांची मुलाखत पाहतो.
फैयाज यांची मुलाखत पाहतो.
' नाटकाची लांबी' या
' नाटकाची लांबी' या संदर्भात Eugène Ionesco या नाटककारांनी काही विचार व्यक्त केलेले आहेत.
त्यांची सुरुवातीची एक दोन नाटके तीन अंकी होती. परंतु नंतर ते स्वतःच तीन अंक-विरोधी झाले. संपूर्ण नाटकाच्या मध्येमध्ये पडदा पाडणे आणि पुन्हा उघडणे हे सगळं कृत्रिम आहे असे मत त्यांनी मांडले.
त्यानंतर त्यांनी बहुतेक सगळी नाटके एक अंकी लिहिली.
Pages