सूर्य पश्चिमेकडे कलला होता. पावसाळा संपून थोडेच दिवस झाले असल्यामुळे सगळीकडे हिरवंगार गवत होतं. लहानलहान ओढे अजून खळाळत वाहत होते.
नदीजवळच्या उंच जांभळाच्या झाडावर कृष्णा, म्हणजे कृष्णकांत हेगडे डोळ्यांना दुर्बीण लावून बसला होता. गव्यांचा एक कळप नुकताच पाणी पिऊन गेला होता. त्यांच्या काही नोंदी त्याने केल्या. गवे लांब गेल्यावर आता चितळांचा एक कळप नदीच्या पलीकडच्या बाजूला दिसत होता. त्यांच्याकडे थोडा वेळ पाहून कृष्णाने आपली दृष्टी अलीकडच्या बाजूला, नदीच्या काठापासून मंद चढावर पसरत गेलेल्या गवताळ पट्ट्याकडे वळवली आणि त्याला वरच्या बाजूला असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली एक हत्ती झोपलेला दिसला. हत्ती कधीकधी अशी डुलकी काढतात हे त्याला माहिती होतं.
पण या हत्तीला - बूबाला अजून झोप लागली नव्हती. तो नुसताच लवंडला होता. सोंडेला गवत गुदगुल्या करत होतं. एकीकडे त्या गवताशी खेळत असताना तो केनाचा विचार करत होता. जंगलात आलेल्या एकट्यादुकट्या, नि:शस्त्र माणसांना त्रास द्यायचा नाही, हा नियम केनाच्या एका हत्तीने काल मोडला, असं बूबाला कळलं होतं. सकाळी बूबाने केनाला त्याबद्दल छेडल्यावर केना म्हणाला की त्यांच्या हालचालींचा जरा संशय आला, म्हणून सेलाने त्यांना थोडं घाबरवलं, एवढंच. केना पाचसहा लहान पिल्लांना भाषा शिकवत होता. त्यांच्यासमोर जास्त बोलायला नको म्हणून बूबाने त्याला इथे बोलावलं होतं. पडल्यापडल्याच बूबाने मान वर करून समोरच्या झाडाच्या सावलीकडे नजर टाकून वेळेचा अंदाज घेतला. अजून केनाला यायला थोडा वेळ होता. तेवढ्यात खाली नदीपर्यंत एक चक्कर टाकून येण्यासाठी तो उठला. वाटेत चार माद्या आणि त्यांची दोन पिल्लं चरत होती. बूबाला पाहताच त्यांनी डोक्याची विशिष्ट हालचाल करत सोंड उंचावून त्याला अभिवादन केलं. बूबानेही मान हलवून त्या अभिवादनाचा स्वीकार केला. त्यांचा बाकीचा कळप थोडा दूरवर चरत होता. या जंगलात येऊन त्यांना आता बरेच दिवस झाले होते. आता हळूहळू तो कळप बाहेर पडून उत्तरेकडे निघून जाईल. उत्तरेकडच्या जंगलातल्या गोकूकडे काय संदेश पाठवायचा, यावरही केनाशी बोलायला हवं, असा विचार बूबाच्या मनात येऊन गेला. गोकू बूबाची धाकटी बहीण. गेली वीसपंचवीस वर्षं या दोन जंगलांची जबाबदारी प्रामुख्याने या दोघांकडे होती. अर्थात मदतीला केनासारखे अजून चाळीसएक हत्तीही होते. सगळे त्याच्या रक्ताच्या नात्यातलेच. आपल्या रक्तातून मिळालेला विलक्षण बुद्धिमत्तेचा आणि जाणिवेचा वारसा या सर्वांनी पुढे चालवला होता. बूबाच्या आईच्या आधीही अनेक पिढ्या हा वारसा चालवत आल्या होत्या. प्रत्येक पिढीत अशा बुद्धिमान हत्तींची संख्या वाढत चालली होती. या जंगलांमधले हत्ती हळूहळू अधिकाधिक सुरक्षित होत होते.
कृष्णा बूबाकडेच पहात होता. मात्र तो बूबाला ’गणेश’ म्हणून ओळखत होता. जंगलात नेहमी दिसणार्या अनेक हत्तींना नावं दिलेली होती. त्यातलाच हा एक मोठा सुळेवाला हत्ती होता. त्या चार हत्तीणींनी गणेशकडे पाहून केलेलं अभिवादन आणि त्याला गणेशने दिलेली पोच या दोन्ही गोष्टी त्याच्या नजरेतून सुटल्या नव्हत्या. त्याला काहीसं आश्चर्य वाटलं. त्याने खिशाला लावलेलं पेन काढलं आणि आपल्या नोंदवहीत या निरीक्षणाची नोंद केली. खरं म्हणजे कृष्णा हेगडे या जंगलात आला होता ते आपल्या पीएचडी प्रबंधासाठी गव्यांचा अभ्यास करायला. पण जंगलात दिसणार्या सर्वच गोष्टींकडे आणि घटनांकडे कुतूहलाने पाहण्याची आणि बारीकसारीक गोष्टींचीही नोंद करून ठेवण्याची त्याला सवय होती. त्याला इथे येऊन आता जवळपास दोन वर्षं होत आली होती. वाटाडे म्हणून काम करणार्या आदिवासींशी त्याची चांगलीच ओळख झाली होती. त्यांच्याबरोबर तो जंगलाच्या अगदी आतल्या भागातही जाऊ लागला होता. जंगलाचा हा भाग तर त्याच्या अगदी पायाखालचाच झाला होता. गव्यांच्या कळपामागोमाग हिंडून त्यांचं निरीक्षण करणं, नोंदी करणं हे काम त्याला मनापासून आवडत होतं. दक्षिण भारतातलं हे एक विस्तीर्ण जंगल होतं. कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या तीन राज्यांमध्ये पसरलेलं. वृक्षसंपदा आणि प्राण्यांच्या विविधतेने नटलेलं. दुर्दैवाने कुठल्याही जंगलाला असतो तसा भरमसाट अवैध वृक्षतोडीचा आणि शिकारीचा शाप याही जंगलाला होताच. हस्तिदंतासाठी हत्तींची शिकार होण्याचं प्रमाण मात्र कमी झालं होतं खरं. आदिवासी मित्रांशी बोलताना त्याला अशी कुणकुण लागली होती की हत्तींची शिकार करणारे काही शिकारी अचानक गायब होण्याच्या घटनाही गेल्या काही वर्षांत घडल्या होत्या. अर्थात हा सगळाच प्रकार लपवाछपवीचा असल्यामुळे याबद्दल बोलायला फारसं कुणी तयार नव्हतं.
बूबा जवळ आला. येता येता त्याला झाडावर बसलेला कृष्णा दिसला. त्याची काहीच दखल न घेता नदीजवळ जाऊन पाणी पिऊन तो लगेच परत फिरला. तो कृष्णाला ओळखत होता. कृष्णाच्या नकळत अनेक वेळा बूबाने त्याला निरखलं होतं आणि त्याच्याबद्दल बूबाचं मत चांगलं होतं. अर्थात, माशूने आधीच त्याच्याबद्दलची थोडी माहिती बूबाला सांगितली होती. पर्यटकांना जंगल दाखवण्यासाठी आणि इतर कामांसाठी वापरल्या जाणार्या पाळीव हत्तींमध्ये माशू आणि तेया हे बूबाचे दोन ’हेर’ होते. माणसांच्या वस्तीवर कुणीही नवीन माणूस राहण्यासाठी आला, की काही दिवसांतच त्याच्याबद्दलची थोडी तरी माहिती या दोघांमार्फत बूबापर्यंत पोचायची. माशू आणि तेयाला ते लहान असतानाच माणसांनी पकडलं होतं. अर्थात, त्यासाठीच बूबाने त्यांना तयार केलं होतं. माणसांच्यात राहून राहून त्या दोघांना आणि माशूच्या तिकडेच जन्मलेल्या दोन पिल्लांनाही माणसांची भाषा बर्यापैकी कळायला लागली होती.
बूबा परत पिंपळाजवळ पोचतोय तितक्यात केनाही आलाच. कृष्णाचं तिकडे लक्ष होतंच. तो केनालाही ओळखत होता, मात्र ’चांद’ या नावाने. दोघे उजवीकडच्या उतारावर जाऊन तिथलं गवत चरता चरता गप्पा मारू लागले.
"कालची ती माणसं कोण होती?" बूबाने विचारलं.
" सांगता येणार नाही, पण ते आधीही दोनतीनवेळा दिसले होते जंगलात. पूर्वेकडच्या भागात. पंधरा दिवसांपूर्वी."
" लक्ष ठेवायला हवं."
"हो. सेला म्हणत होता की घाबरवल्यानंतर ते पळून गेले, पण थोड्या वेळाने दुसर्या वाटेवर दिसले. सेलाने त्यांच्यावर लक्ष ठेवलं, पण ते थोड्या वेळाने मागे फिरले."
" सेला आणि बाकी सगळ्यांना गस्त वाढवायला सांग."
"सांगितलं आहे."
"माशू किंवा तेया भेटले तर त्यांनाही सांगा."
"हो."
" हा कळप आता गोकूच्या जंगलात जाईल थोड्या दिवसांनी. त्यांच्याबरोबर काही निरोप द्यायचा आहे का?" खाली चरणार्या हत्तींकडे सोंडेने निर्देश करत बूबा म्हणाला.
"हीच दोन माणसं काय करतात ते बघू. ती जर तिकडे जाणार असतील तर तिला कळवायला हवं. पण ते ह्यांना नाही जमणार. आपल्यापैकीच कुणालातरी पाठवू त्यांच्याबरोबर."
" माणसं लिहितात-वाचतात, तसं आपणही काही तरी शोधलं पाहिजे. म्हणजे ही कामं सोपी होतील."
केनाने आदराने बूबाकडे पाहिलं. अशा नवीन कल्पना त्यालाच सुचायच्या. तो सतत पुढचा विचार करायचा. माशू आणि तेयाला माणसांकडे पाठवण्याची कल्पनाही त्याचीच होती. या निर्णयाचा बराच फायदा त्यांना झाला होता.
गप्पा मारत मारत बूबा आणि केना बरेच लांब गेले.
दुर्बिणीतून त्यांच्याकडे पाहणारा कृष्णाही भानावर येऊन झाडावरून खाली उतरला. त्याचा हत्तींचा अभ्यास फार नव्हता, पण गणेश आणि चांदचं वागणं, त्या माद्यांनी गणेशला केलेलं अभिवादन, हे त्याला वेगळं वाटलं हे नक्की.
चारपाच दिवसांनंतर कृष्णा संतोषबरोबर जंगलाच्या आतल्या भागात जायला निघाला. संतोष या आदिवासी वाटाड्याबरोबर कृष्णाची विशेष मैत्री झाली होती. चालता चालता कृष्णाने विषय काढला.
"संतोष, मी त्या दिवशी गणेश आणि चांदला एकत्र चरताना पाहिलं."
संतोषने ’मग त्यात काय एवढं?’ अशा अर्थाने कृष्णाकडे बघितलं.
कृष्णा म्हणाला, " मला नेमकं का, ते सांगता येणार नाही, पण मला असं वाटलं की ते दोघे जणू गप्पा मारत असावेत. हत्ती असं करतात का? तू पाहिलं आहेस कधी?"
संतोषने चमकून आणि काहीशा कौतुकाने कृष्णाकडे पाहिलं आणि क्षणभर थांबून तो म्हणाला, "हो. मलाही कधी कधी असं वाटतं खरं. सगळेच नाही, पण काही काही हत्ती आहेत असे."
बोलता बोलता संतोष थांबला. त्याने कृष्णाला गप्प राहण्याची खूण केली आणि तो कानोसा घेऊ लागला. ते जंगलाच्या बर्याच आतल्या भागात येऊन पोचले होते. दबकी पावले टाकत संतोष पुढे गेला आणि एका झुडपाच्या आडून पलीकडे पाहू लागला. कृष्णाही त्याच्या पाठोपाठ तिथे गेला. ते उभे होते तिथून खाली उतार होता आणि खालून दोन माणसं वर चढून येत होती. त्यांच्याकडे निरखून पाहिल्यावर संतोषने कृष्णाला आपल्याबरोबर येण्याची खूण केली आणि तो वेगळ्याच दिशेने भराभर चालायला लागला.
थोड्या अंतरावर गेल्यानंतर तिथलं एक उंच झाड हेरून ते दोघे झाडावर चढले. कुजबुजत्या आवाजात संतोष म्हणाला, "ते दोघे शिकारी आहेत असा मला संशय आहे. मी त्यांना आधीही एकदोन वेळा बघितलंय. गेल्या आठदहा दिवसातच."
कृष्णाला साहजिकच भीती वाटली. पोचर्स कितीही धोकादायक असू शकतात हे त्यालाही माहिती होतं. शक्यतो त्यांच्या नजरेस न पडणंच चांगलं. संतोषच्याही चेहर्यावर ताण दिसत होता. ती दोन माणसं एव्हाना वर येऊन पोचली होती. सरळ वाटेने पुढे न जाता ते तिथेच आजूबाजूला फिरत होते, टेहळणी केल्यासारखे. जसजसा वेळ जाऊ लागला तसतसा संतोष आणि कृष्णाच्या मनावरचा ताण वाढत गेला. तेवढ्यात कृष्णाचं लक्ष खालच्या बाजूला गेलं. तिथे मोकळ्या जागेत दोन हत्ती चरत होते. उजवीकडे थोड्या अंतरावर अजून दोन हत्ती होते. थोड्या वेळाने ती दोन माणसं पुन्हा उतारावरून खाली जाऊ लागली. ही संधी साधून संतोष आणि कृष्णा भराभर खाली उतरले आणि उलट्या दिशेने परत फिरले. घाईघाईने चालत असताना अचानक डावीकडच्या एका उंचवट्यापलीकडे उभे असलेले चांद आणि गणेश त्यांना दिसले. चांदने मान वळवून या दोघांकडे पाहिलं. संतोष आणि कृष्णा जागीच उभे राहिले. चांद परत समोर पाहू लागला. काहीतरी इशारा मिळाल्यासारखा तो जंगलाच्या आतल्या दिशेला चालू लागला. त्याच्या पाठोपाठ गणेशही निघाला. संतोष आणि कृष्णा आपल्या वाटेने पुढे चालत राहिले. दहा मिनिटं गेली असतील, इतक्यात कुठूनतरी आधी बंदुकीचा आवाज, मग हत्तीचा चीत्कार ऐकू आला. दचकून त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. ते मागे वळणार, तितक्यात मानवी आवाजातली एक प्राणांतिक किंकाळी त्यांच्या कानांवर पडली आणि ते नखशिखान्त हादरले. कुठूनतरी वानरांचे भयभीत आवाजही येऊ लागले. भेकरं इशारा केल्यासारखी ओरडू लागली. मागे जाऊन काय झालं ते पाहण्याचं त्यांचं धाडस होत नव्हतं, पण त्याच वेळी प्रचंड उत्सुकताही वाटत होती. शेवटी उत्सुकतेने भीतीवर मात केली. ते सावधपणे मागे मागे गेले आणि पिंपळाच्या एका उंच झाडावर चढले. खूप प्रयत्न करूनही त्यांना काही दिसेना. संतोष अजून वर, पार शेंड्यावर चढला. त्याच्या चेहर्यावरचे आश्चर्याचे भाव पाहून कृष्णाने अधीरपणे त्याला विचारलं,
"काय दिसतंय तुला?"
"बरेच हत्ती उभे आहेत गोल करून. मगाशी आपण खाली दोन हत्ती पाहिले ना, तिथे."
"काय करतायत पण ते?"
"काही कळत नाही. दुर्बीण दे."
संतोष थोडा खाली उतरला. हात लांब करून त्याने कृष्णाने दिलेली दुर्बीण घेतली. परत शेंड्यावर जाऊन त्याने डोळ्याला दुर्बीण लावली.
"एका हत्तीच्या सोंडेत काही तरी आहे."
"काय आहे?"
दोन मिनिटांनी डोळ्यावरची दुर्बीण काढून भयचकित होऊन कृष्णाकडे पहात संतोष म्हणाला, " माणूस वाटतोय. दुसर्या हत्तीच्या सोंडेत अजून एक असावा. नीट कळत नाही."
कृष्णाच्या अंगावर काटा आला. " डेड?" त्याने विचारलं.
संतोषने होकारार्थी मान हलवली. "तसंच वाटतंय. ते कुठेतरी घेऊन चाललेत त्यांना."
दहा मिनिटांनी संतोष खाली उतरला. सगळे हत्ती तिथून दुसरीकडे निघून गेले होते. कृष्णाच्या अंगावर आलेला काटा अजून गेला नव्हता. छातीतली धडधड कमी होत नव्हती. संतोषचीही अवस्था फार काही वेगळी नव्हती. न बोलता ते भराभर चालत होते. संध्याकाळ होत आली होती. जंगलातून बाहेर पडून वस्तीवर पोचेपर्यंत ते एकमेकांशी काहीच बोलले नाहीत. दोघांच्याही डोक्यात वादळ उठलं होतं. आपण पाहिलेल्या दृश्याचा अर्थ काय? हत्तींनी शिकार्यांचीच शिकार केली होती? ठरवून, प्लॅन करून? रागारागाने हत्तींनी माणसांना पायदळी तुडवल्याच्या घटना त्यांना ठाऊक होत्या, संतोषने तर लहानपणापासून अशा अनेक घटना ऐकल्या होत्या. पण थंड डोक्याने, दहाबारा हत्तींनी मिळून दोन सशस्त्र माणसांना ठार केल्याची घटना अभूतपूर्व होती. याआधी जे सातआठ शिकारी गायब झाले होते, त्यांना हत्तींनीच मारलं असेल? हत्ती असं करू शकतात?
ते वस्तीच्या अगदी जवळ पोचले. माणसांची वर्दळ दिसू लागली. कृष्णाने याबद्दल कुणाशीच न बोलण्याचं ठरवलं. एक तर जे पाहिलं, ऐकलं, त्यावर त्याचाच धड विश्वास बसत नव्हता. दुसरं म्हणजे जरी खरोखरच हत्तींनी शिकार्यांना मारलं असेल, तरी त्यात हत्तींचं काय चुकलं? एखादा वाघ जेव्हा नरभक्षक होतो, तेव्हा आपण त्याला मारतोच, मग शिकारी हत्तींना मारत असतील, तर हत्तीही त्यांना शिक्षा देणारच. मगाशी आपण चांद आणि गणेशला पाहिलं, तेव्हा त्यांनी आपल्याला पाहिलं होतंच, पण ते आपल्याकडे दुर्लक्ष करून पुढे गेले. कारण त्यांचं आपल्याशी काही शत्रुत्व नाही. कृष्णाने आपल्या मनातले हे विचार संतोषला बोलून दाखवले. संतोषलाही ते लगेचच पटलं. तो तर लहानपणापासून जंगलाच्या सान्निध्यातच वाढला होता. हत्तींवर त्याचं मनापासून प्रेम होतं आणि शिकार्यांबद्दल संताप होता.
दुसर्या दिवशीपासून जंगलात जाताना कृष्णाला थोडी भीतीच वाटत होती. पण पुढच्या पंधरावीस दिवसात तीन-चार वेळा त्याला चांद दिसूनही चांदने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं, तेव्हा तो हळूहळू निर्धास्त झाला. कुठल्या हत्तीची शिकार झाल्याचीही बातमी त्याच्या कानावर आली नाही. याचा अर्थ त्या दिवशी आपण ज्या हत्तीचा चीत्कार ऐकला, त्याला गोळी वर्मी लागली नसावी. निसटती जखम असणार.
गव्यांवरचं काम पुढच्या तीन-चार महिन्यात कृष्णाने पूर्ण केलं. पण एकीकडे त्याच्या डोक्यात सतत हत्तींचे विचार येत होते. संतोषच्या म्हणण्यानुसार जंगलातल्या काही हत्तींचं वागणं इतर हत्तींहून वेगळं आहे. या हत्तींमध्ये काही जनुकीय वेगळेपणा असेल का? म्हणजे त्यांच्यात काही म्युटेशन झालेलं असेल का? तसं असेल तर मुळात ते अनेक पिढ्यांपूर्वी झालं असणार. हळूहळू असं म्युटेशन असलेले हत्ती एकमेकांशी अधिकाधिक संवाद साधू लागले असणार. कळपात रहात असल्यामुळे हत्तींमधले सामाजिक बंध मुळातच चांगले घट्ट असतात. ते बंध आणखी मजबूत होऊन आता शिकार्यांना ओळखून, फसवून, सापळ्यात अडकवून त्यांना मारून टाकण्याचं गुंतागुंतीचं काम ते करायला लागले आहेत. रागाच्या भरात समोरच्या माणसाला चिरडणं त्यांना कठीण नव्हतंच. पण लपूनछपून वावरणार्या, हत्तींची शिकार करायला आलेल्या सशस्त्र माणसांचा डाव त्यांच्यावरच उलटवणं हे सोपं नाही आणि जर याआधी गायब झालेल्या शिकार्यांनाही हत्तींनीच मारलं असेल, तर हे निश्चितच अगदी नियोजनबद्ध काम आहे. यात त्यांच्या भाषेचा महत्त्वाचा हात असणार. हजारो वर्षांपूर्वी, शेतीची सुरुवात होण्यापूर्वी माणूस जेव्हा जंगलात टोळ्या करून रहात होता, तेव्हा बुद्धिमत्तेत, जाणिवेत झालेल्या प्रगतीनंतर आपल्याहून कितीतरी बलिष्ठ असलेल्या, कितीतरी जास्त वेगाने पळणार्या, अणकुचीदार नखं-दात असलेल्या प्राण्यांचीही शिकार तो करू लागला. तेव्हा माणसांकडे बंदुका नव्हत्या. पण तरीही मॅमथ, डायप्रोटोडॉन आणि अशा कितीतरी मोठ्या मोठ्या प्राण्यांच्या शिकारी तेव्हाची माणसं करत होती, ती आपल्या भाषेच्या साहाय्याने शिकारीचं नियोजन करूनच. इतर प्राण्यांचीही स्वतःची अशी भाषा असतेच, मात्र असा गुंतागुंतीचा संवाद साधायला ती पुरेशी नसते. पण आता या हत्तींची भाषाही तशी प्रगत झालीय की काय? आपण त्या दिवशी चांद आणि गणेशला एकत्र चरताना पाहिलं, तेव्हा ते खरोखरच माणसांसारख्या गप्पा मारत होते? कदाचित या शिकार्यांबद्दल बोलत होते?
जसजसा कृष्णा अधिकाधिक विचार करू लागला, तसतशी त्याच्या मनातली ही शंका अधिकाधिक बळकट होऊ लागली. पण हा नुसता हायपोथिसिस झाला, याचं थिअरीत रूपांतर करायचं असेल तर भक्कम पुरावे हवेत. त्यासाठी अनेक वर्षं हत्तींचा अभ्यास करायला हवा. कृष्णाची त्याला तयारी होती. पण हे एकट्यादुकट्या माणसाचं काम नव्हतं. कुणीतरी चांगला, कष्टाळू सहकारी हवा. त्याच्या डोळ्यासमोर लगेचच श्रीकांत अय्यरचं नाव आलं.
गव्यांवरचा आपला प्रबंध त्याने बंगळूरला जाऊन आपल्या संस्थेला- नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेसला सादर केला. पीएचडीची पदवी मिळाल्यावर पुढचं संशोधन हत्तींच्या संवादक्षमतेवर करायचं ठरवून, सोबत डॉ. श्रीकांत अय्यरला घेऊन तो परत आला. संतोष हा अधिकृतपणे त्यांचा मदतनीस बनला.
दोन वर्षं गेली. डॉ. कृष्णकांत हेगडे आणि डॉ. श्रीकांत अय्यर हत्तींच्या कळपांवर, त्यांच्या भाषेवर, संवादावर संशोधन करत राहिले. कृष्णकांतचा अंदाज बरोबर ठरला. हत्तींच्या एकमेकांशी असलेल्या संवादात बरंच वैविध्य होतं. सोंडेची, मानेची, शेपटीची, पायांची हालचाल, आवाज यांच्या मिश्रणातून गुंतागुंतीचा संवाद ते एकमेकांशी साधत होते. त्यांची भाषा अजून समजू लागली नसली, तरी ती गुंतागुंतीची आहे, एवढं नक्की होतं. हत्तींनी त्यांचं अस्तित्व स्वीकारलं होतं. अर्थात, ते किती काळ तसं स्वीकारत राहतील, याची खात्री कुणालाच नव्हती. त्यामुळे कृष्णकांत आणि श्रीकांतने स्वत:साठी एक लक्ष्मणरेषा आखून घेतली होती. पण हत्तींमधे आणि संशोधकांमध्ये एका मर्यादेपर्यंत तरी परस्परविश्वासाचं वातावरण निर्माण झालं होतं हेही खरं. हस्तिदंतासाठी होणारी हत्तींची शिकार आता या जंगलात तरी थांबल्यातच जमा होती. शिकारी जे समजायचं ते समजले होते, असा याचा अर्थ.
कृष्णकांतच्या मनात मात्र एक भीती पहिल्यापासून होती. उत्क्रांतीचा विचार केला, तर लाखो वर्षं माणूस हा प्राणी सृष्टीच्या अन्नसाखळीत मधल्या स्थानावर होता. तो ससे, हरणांना मारून खात होता, पण मोठ्या प्राण्यांपासून घाबरून रहात होता. बुद्धिमत्तेत आणि जाणिवेत झालेल्या प्रगतीमुळे माणूस मोठ्या प्राण्यांचीही शिकार करू लागला. कितीतरी प्राणी पृथ्वीवरून नामशेष होण्यामध्ये माणसाचा हात आहे, हे उघड आहे. अगदी अलीकडच्या काळातलं उदाहरण जरी पाहिलं, तरी अपरिमित शिकारीमुळे भारतातून चित्त्यासारखा प्राणी नाहीसा झाला. वाघांना वेळीच संरक्षण मिळालं, म्हणून वाघ वाचले, इतकंच. माणसासारखा दुर्बळ प्राणी केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावर एवढा हाहाकार माजवू शकतो, तर उद्या हत्ती काय करतील?
एका सकाळी श्रीकांतच्या खोलीत नाश्ता करत असताना आपल्या मनातली ही भीती त्याने श्रीकांतला बोलून दाखवली.
श्रीकांत थोडा वेळ गप्प बसला. मग म्हणाला, " तुझी भीती अगदीच चुकीची नाही. उत्क्रांती कुठल्या दिशेने जाईल हे सांगता येत नाही. पण एक लक्षात घे. हत्तींना जंगलात निर्भयतेने वावरण्याची लाखो वर्षांची सवय आहे. हत्ती जरी शाकाहारी असले, तरी ते काही हरणांसारखे दुर्बळ नाहीत. हत्तीच्या एकट्यादुकट्या पिल्लाची शिकार वाघ-सिंह करतात, पण कळपात असलेल्या किंवा प्रौढ हत्तीची शिकार ते करू शकत नाहीत. म्हणजेच, हत्तींना जंगलातल्या व्यवस्थेत आधीपासूनच एक उच्च स्थान आहे. त्यांना या स्थानाची सवय आहे. इतर प्राण्यांनाही हत्तींच्या या स्थानाची सवय आहे, गेली लाखो वर्षं. त्यामुळे हत्ती बुद्धिमत्तेची, जाणिवेची ही नवीन शक्ती जबाबदारीने पेलतील, असं मला तरी वाटतं."
" बरोबर आहे तू म्हणतोयस ते. पण उद्या माणसाला हत्तींमधल्या या बदलाविषयी जाण आली, की माणूस काय करेल?"
श्रीकांत म्हणाला, " ती भीती मलाही आहे. तू आणि संतोषने तेव्हा जे काही पाहिलं, त्यावरून हे उघड आहे की हत्तींनी शिकार्यांना मारलं आणि त्यांचे मृतदेहही सापडणार नाहीत अशी व्यवस्था केली. तुम्हाला शिकार्यांविषयी राग आहे, म्हणून तुम्ही हे गुपित सांभाळून ठेवलंत. हे संरक्षित जंगल आहे खरं, पण माणसाच्या गरजांना अंत नाही. उद्या जंगलाच्या एखाद्या भागात एखाद्या खाणीला किंवा धरणाला मान्यता मिळाली तर हत्तींना त्याचा त्रास होईल आणि असंही घडू शकतं की ते माणसाविरुद्ध छुपं किंवा उघड युद्ध पुकारतील. मग माणूस काय करेल?"
" माणूस शहाणा असेल तर तो हत्तींबरोबर, किंवा असं म्हणू की एकूणच निसर्गाबरोबर ’सहजीवन’ जगायला, को-एक्झिस्ट करायला हळूहळू शिकेल. पण सध्याची मानसिकता पाहता ते होणं कठीण आहे. श्रीकांत, निदान आपण या संघर्षाचं निमित्त नको ठरायला! "
"म्हणजे?"
" म्हणजे आपण कुठलंतरी वेगळं क्षेत्र निवडू संशोधनासाठी. इथेच राहू. हत्तींचा अभ्यास चालूच ठेवू. पण तो आपल्या जिज्ञासेसाठी, आपल्यापुरता. हत्तींमधली ही उत्क्रांती लोकांना जेव्हा आणि जशी कळायची तशी कळू दे. आपण ती जाहीर नको करायला."
"पटतंय मला."
कॉफीचे घोट घेत ते दोघे गप्पांमध्ये बुडून गेले.
तिथून थोड्याच अंतरावर असलेल्या पाळीव हत्तींच्या गोठ्यात सकाळचा खुराक खाता खाता माशू आणि तेयाही असेच गप्पांमध्ये रमून गेले होते.
जबरदस्त. .
जबरदस्त. .
छानच !
छानच !
मस्तच
मस्तच
खुप दिवसांनी काही तरी छान
खुप दिवसांनी काही तरी छान उत्कंठावर्धक आणि नाविन्यपूर्ण विचार वाचायला मिळाले.
मतच.
मस्तच आणि नाविन्यपूर्ण.
आवडली कथा. मस्त आहे
आवडली कथा. मस्त आहे
जबरदस्तचं!!
जबरदस्तचं!!
खुप खुप आवडली कथा.
आवडली कथा. इंटरेस्टिंग
आवडली कथा. इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट!
मस्त आहे कथा! फारच आवडली!
मस्त आहे कथा! फारच आवडली! सुरुवातीला हत्तींची नावं आणि त्यांच्यातील नाती/ संबंध यात गडबडून जायला झालं. पण एकदा कन्सेप्ट समजला आणि मग झरझर वाचू लागलो.
इव्होल्युशन आणि त्याचे आयाम फार रंजकपणे उलगडले आहेत, आणि त्याच बरोबर ओपन एंडेड ठेवून शेवटी विचाराचे चक्र योग्य दिशेला डोक्यात फिरेल याची तजवीज करुन ठेवली आहे. परत कुठेही उपदेशाचे डोस न वाटता कथेचा फॉर्म सोडलेला नाही. ब्रिलियंट!
या कन्स्पेप्टवर फार भारी चित्रपट बनू शकेल! अॅनिमेशनपट तर डोळ्यासमोर चालू झाला माझ्या! कॉपिराईट का काय असतं ते नक्की करुन ठेव. इंग्रजीतही रुपांतर करुन ठेव.
रोचक कल्पना आहे.
रोचक कल्पना आहे.
एकदम वेगळीच कथा! फार आवडली.
एकदम वेगळीच कथा! फार आवडली.
खुपच छान कथा. वाचताना
खुपच छान कथा. वाचताना हत्तींचे हे रहस्य कोणाला समजु नये असेच वाटत होते.
धनवन्ती, सांज, लावण्या, आसा.,
धनवन्ती, सांज, लावण्या, आसा., मैत्रेयी, अमित, सामो, स्वाती, वीरू, मनापासून धन्यवाद! अमित, सविस्तर प्रतिसाद आवडला.
खूप छान
खूप छान
मस्त कल्पना आहे वावे आणि छान
मस्त कल्पना आहे वावे आणि छान फुलवली आहे. अमितव म्हणतो तसं डोळ्यासमोर कॅरेक्टर्स उभी राहिली.
लय भारी...
लय भारी...
खुप छान.. वेगळी कथा.. आवडली!
खुप छान.. वेगळी कथा.. आवडली!
मस्त लिहिलीए.
मस्त लिहिलीए.
एकदम झकास!
एकदम झकास!
ज ब री
ज ब री
एकदम हटके विचार आणि उत्सुकतावर्धक मांडणी
मस्त जमलीय
अमितवने सांगितलेय त्यावर विचार कर नक्की
मस्त आहे कथा खूप आवडली
मस्त आहे कथा खूप आवडली
मस्त कथा. मजा आली वाचताना.
मस्त कथा. मजा आली वाचताना.
खुप दिवसांनी काही तरी छान
खुप दिवसांनी काही तरी छान उत्कंठावर्धक आणि नाविन्यपूर्ण विचार वाचायला मिळाले.+१११
खूप आवडली
वावे, खूप छान आणि रोचक आहे.
वावे, खूप छान आणि रोचक आहे. पुढील भाग आहेत काय?
भारी आणि वेगळीच आहे कथा. साधी
भारी आणि वेगळीच आहे कथा. साधी सोपी तरीही विचार करायला लावणारी आणि खरंतर अशक्यकोटीतली नाही ही संकल्पना.
कथावस्तू, कथा विचार, मांडलेलं वैद्न्यानिक सूत्र आणि मांडणी खूप आवडली.
खूप छान कथा.
खूप छान कथा.
खूप छान कथा...
खूप छान कथा...
अमितवशी हज्जारदा सहमत खुपच
अमितवशी हज्जारदा सहमत खुपच छान लिहीलेय.
वावे एकदम वेगळीच कथा आवडली
वावे एकदम वेगळीच कथा आवडली आणि पटली हि. अमितव ने म्हटल्याप्रमाणे छान अॅनिमेशन फिल्म होईल याच्यावर.
जबरदस्त कथा. अमितव यांना १००%
जबरदस्त कथा. अमितव यांना १००% अनुमोदन.
Pages