मिस्टर अन्द मिसेस अय्यर अपर्णा सेन दिग्दर्शित चित्रपट भावानुवाद आणि रसास्वाद

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 5 August, 2021 - 03:51

मिस्टर and मिसेस अय्यर

कुठूनही तरंगत येत एक नात आपल्या मधल्या कस्तुरीचा पत्ता देऊन जात .. वैभव

प्रख्यात दिग्दर्शिका अपर्णा सेन यांचा २००२ सालचा इंग्लिश, तामिळी आणि बंगाली भाषेतील चित्रपट. या चित्रपटास राष्ट्रीय आणि आंतरराष्टीय स्तरावर अनेक बक्षिसे प्राप्त झाली होती. यात प्रामुख्याने गोल्डन लोटस अवार्ड फोर बेस्ट डायरेक्शन, सिल्वर लोटस अवार्ड फोर बेस्ट अक्टरेस, द बेस्ट स्क्रीन प्ले, अशा विविध परितोषकांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे राष्टीय चित्रपट पारितोषक समारंभा मध्ये या चित्रपटास “नर्गिस दत्त अवार्ड फॉर बेस्ट फिचर फिल्म ओंन नशनल इंटिग्रेशन” या विशेष पारीतोषकाने सन्मानित केले होते.

दूरवर निसर्गाच्या वनराईतून जाणारी बस. तरुणाईचा चालू असलेला जल्लोष. त्यांना दरडावत आपापसात गप्पा मारणारे पालक. कुठेतरी एका कोपर्यात बसलेले प्रेमी युगल. आणि वयाची पंचाहतरी ओलांडलेले वृद्ध मुल्स्लीम आजी आजोबा.या सर्व प्रवाशाच्यात मीनाक्षी अय्यर ( कोंकणा सेन) नावाची तरुणी आपल्या मुलाला संतनामनला घेऊन कलकत्याला जाण्यासाठी निघाली आहे. इतर प्रवासी आपल्या नादात प्रवास करत आहेत पण मीनाक्षी मात्र संतनामन मुळे त्रासलेली आहे. त्याचे सातत्याने रडणे तिलाच काय कुणलाच नकोसे झाले आहे. शेवटी प्रवास सुरु होण्याआधी जुजबी ओळख झालेल्या राजा चौधरी ( राहुल बोस) या व्यक्तीस ती बोलावते जेणेकरून वाटी चमच्यातून मुलाला दुध पाजून का होईना मुलगा शांत होईल. इतका वेळ दूर बसलेला राजा तिच्या शेजारच्या सीटवर बसतो आणि पुढील प्रवास सुरु होतो. दिवस हळूहळू ढळत चाललेला असतो. मघाशी जोशात गाणारया तरुण मुलांचा आवाज आता हळू होत जातो. “ कुछ ना कहो” चे हळुवार स्वर आपल्याला ऐकू येत राहतात. वाऱ्याचा मंद झोत गाडीच्या खिडकीतून येत असतो. सर्व प्रवासी आता हळूहळू झोपी जाऊ लागतात.

अचानक बस थांबते. पहाटेचे गार वारे. पाण्याचा झुळझुळ वाहणारा आवाज. हा नेहमीचा होल्ट नाही. बस का थांबली ते कुणालाच कळत नाही. कुतूहलापोटी एकेक जण खाली उतरत जातो.. राजाही खाली उतरतो . आणि मीनाक्षी “ फ्रेश” होण्यासाठी संतनामनला त्याच्या कडेवर देऊन जाते. सर्व प्रवासी जेव्हा काळजीपोटी चर्चा करत असतात त्याचवेळी पोलीस येतात आणि समजते बस थांबली आहे कारण त्या गावात हिंदू मुस्लीम जातीय दंगली झाल्याने कर्फ्यू घोषित केला आहे.. गावात तणाव आहे कारण हिंदू लोक मुस्लीम बांधवच्यात दहशत निर्माण करत आहेत. मीनाक्षी फ्रेश होऊन परत येते आणि राजा घाबरून संतनामनला तिच्याकडे देतो.. राजा तिला सांगतो “ तो मुसलमान आहे. त्याचे खरे नाव आहे जहांगीर. राजा हे त्याचे टोपण नाव आहे. “” या तणावपूर्ण वातावरणात मीनाक्षीला ओळख दाखवणे चूक आहे हे त्याने ओळखले होते. पण मीनाक्षी मात्र अस्वस्थ आहे. घाबरलेली, गोंधळलेली मीनाक्षी बसमध्ये जाऊन बसते. आणि राजा संथपणे तिच्या मागून जातो. आपण काय चूक केले हेच त्याला कळत नाही. आपण तर मीनाक्षीची मदत करत होतो. मग अचानक केवळ ...आपल्या जातीमुळे हा तिरस्कार ? तो विचार करत तिच्याजवळ जाऊन बसतो.

काही वेळापूर्वी बसमध्ये असणार्या जल्लोषाची जागा आता भीतीने घेतलेली असते. खिडकीच्या बाहेर असणार्या अग्नीच्या ज्वाळा अधिकच अस्वस्थ करत असतात. मोबाईलची रेंजहि मिळत नाही. तर मदतीसाठी कुणाला संपर्क करणार? तोच बसच्या दरवाजाबाहेर एकच गोंधळ.” दार बंद करा” म्हणून प्रवाशांचा आरडाओरडा. आणि तरीही जबरदस्तीने आत घुसलेले दहशतवादी. “ तुझे नाव? “ “ वडिलांचे नाव? “ “ pant खोल” दहशतवादी प्रत्येकाला दरडावत असतात आणि सर्वांचा भीतीने थरकाप उडालेला असतो. ज्या हिंदूंची हत्या झाली त्या मुस्लीम दहशतवाद्यांचा बदला घेणे हेच त्यांचे ध्येय असते. कुणीतरी सांगते “ आम्ही सर्व हिंदू आहोत” आणि अचानक कुणीतरी म्हणते “ ते म्हातारे जोडपे मुस्लीम आहे” ते वृद्ध जोडपे निरागस आहे. नेमके काय चालले आहे हेच त्यांच्या लक्षात येत नाही. दहशतवाद्यांचा दरडावणीचा प्रश्न “ आपका नाम? “ जेव्हा त्यांना कळते हे वृद्ध जोडपे मुस्लीम आहे तेव्हा दहशतवादी त्या वृद्ध व्यक्तीस बाहेर घेऊन बसच्या बाहेर जातात. बाहेर जाताना सुद्धा त्यांची बायको त्यांच्या बरोबर औषधाच्या गोळ्या घेऊन जायला सांगते. पण दहशतवादी तिला सांगातात “ जहा वो जा राहे है वहा उन चीजोंकी कोई जरुरत नही” समोर बसणाऱ्या मुलीच्या लक्षात येते आजोबानचे काय होणार आहे !! जोराची किंकाळी. एक करून दृश्य. आजोबांची विविध रूपे क्षणात आपल्या समोरून जाऊ लागतात मघाशी “कुछ ना कहो” हे गाण गुणगुणारे आजोबा, गजर लावून नमाजाच्या वेळेत उठणारे आजोबा, आणि आता दहशतवाद्यांच्या बरोबर बाहेर जाणारे आजोबा. ती वृद्ध आजी अशीच जाणार ....! आपण अधिकच बेचैन होतो.

दहशतवाद्यांचा शोध अजुनी संपलेला नाही. ते पुन्हा बसमध्ये आत येतात. राजा हि मुसलमानच आहे. मग आता त्याचा नंबर ? ... दहशतवादी जवळ येतात. ते नाव विचारतात. मीनाक्षी घाबरते. आणि आपल्या मुलाला संतनामनला ती राजाच्या मांडीवर ठेवते व घाबरलेल्या अवस्थेत नाव सांगते “ मिस्टर and मिसेस मणी अय्यर”. खर तर हे तिच्या नवर्याचे नाव. पण ती राजाचा जीव वाचवते. कारण राजाने तिची मदत केलेली असते. माणुसकी.!!

दहशतवादी निघून जातात. मघाशी घडलेल्या प्रसंगाने सर्वच प्रवासी भेदरलेले आहेत. भयानक स्वप्न पडावे आणि त्याचा अंमल दीर्घ काळ रहावा तशी अवस्था प्रत्येकाची झालेली असते. बाहेर असणार्या नदीच्या पाण्याचा आवाज आपल्याला ऐकू येतो. पण तोही भयानकच वाटू लागतो.
गावातील कर्फ्यू थोडा वेळ उठतो,या तंग वातावरणात सर्व प्रवासी आपली सकाळची दिनचर्या उरकण्यासाठी बसच्या बाहेर आलेले असतात. मीनाक्षी कडे लहान बाळ आहे.म्हणून ती राहण्यासाठी लॉजच्या शोधात असते. पण आजूबाजूला कोणतेच हॉटेल उपलब्ध नाही. इकडे तिकडे फिरण्यात बराच वेळही गेलेला असतो. थोड्या वेळात कर्फ्यू सुरु होणार असतो. आणि पुन्हा वेळेत बसकडे जाणे शक्य नसते. वाटेत भेटलेले पोलीस मीनाक्षीची व राजाची अडचण दूर करतात आणि त्यांना एका जुनाट घरात राहण्यासाठी जागा देतात.

ते घर खरेच ओसाड आहे. मीनाक्षी नाराज आहे आणि त्याचा राग राजावर निघत असतो. दोघे योगायोगाने नवरा बायको झाले आहेत तरीसुद्धा त्यांच्यात होणारे छोटेसे वाद नवरा बायको सारखेच होत असतात. मीनाक्षीला ती अडगळीची आणि अस्वच्छ जागा नको आहे. आणि राजाला तडजोड करण्याशिवाय गत्यंतर नाही असे वाटत असते. राजाला चिकन खायचे आहे तर मीनाक्षी शुद्ध शाकाहारी आहे. ज्या राजाने आपल्याला प्रवसात मदत केली त्या राजाशी आपले वागणे तुसडेपणाचे होते हे मीनाक्षीला कळते आणि हि लुटुपुटूची भांडणे सकाळी मिटतात. दोघेही नकळत मैत्रीच्या धाग्याने गुंफले जातात.

प्रत्येक प्रवाशाला आपल्या घरी जायची घाई आहे. पण कर्फ्यू उठण्याची चिन्हे नाहीत. पोलीस इन्स्पेक्टर राजेश आणि राजा यांच्यात फोटोग्राफी हा दुवा आहे. दोघांच्यात न कळत जवळीक होते आणि त्याचमुळे राजाला कलकत्याला जाण्यासाठी राजेश सहकार्य करायचे ठरवतो.
कलकत्याला दुसर्या दिवशी सकाळी जायचे आहे. त्यांच्या मुक्कामाचे ते ओसाड घर. संध्याकाळची वेळ आहे. वातावरण प्रसन्न. पण तरीही गप्पा मात्र दहशतवादाच्या. त्या वृद्ध आजी आजोबांची हत्या मीनाक्षीच्या डोळ्यासमोरून जात नाही. दोघेही ठरवतात दुसरे काहीतरी बोलू ज्याने हि रात्र अधिक आल्हाददायक होईल. पाण्याचा टपटप आवाज. पण हे पाणी पावसाचे नाही. पानावरून ओघळत जाणारे ते दवबिंदू आहेत. मीनाक्षी दूरवर पाहते. हरणांचे कळप तिला दिसतात. चेहऱ्यावर आनंद आणि तोच अंधारातून नाचत येणाऱ्या मशाली आणि आरडा ओरडा. काय झाले असेल म्हणून राजा कॅमेऱ्यातून बघत असतो. कुतूहलाने मीनाक्षी सुद्धा बघते. ज्या निसर्गरम्य वातावरणात हरणांचे कळप तिने बघितले असतात, जिथे दवबिंदूचा हळुवार आवाज ऐकल्याने मन प्रसन्न झालेले असते तिथेच एका माणसाची दहशतवाद्यानि हत्या केलेली असते. मीनाक्षी उन्मळून जाते. ती रात्र तशीच अस्वस्थ. आणि राजाचे तिला धीर देणे.

. दुसर्या दिवशी दोघेही कलकत्याच्या रेलेवेत जायला निघतात. एक दीड दिवसाच्या सहवासाने दोघांच्यात जवळीक निर्माण झाली आहे. दोघांची देहबोली, त्यांचे नेत्र कटाक्ष आपल्याला सातत्याने जाणवून देत असततात कि प्रेमाचा धागा त्यांच्यात कुठेतरी नकळत विणला गेला आहे. पण असे असतानाही मीनाक्षी हे सुद्धा विसरू शकत नसते कि ती संतानामनची आई सुद्धा आहे. रेल्वेच्या खिडकीतून बाहेर दिसणारा चंद्र आणि त्यांचे परस्परांशी चालणारे हितगुज यातून दोघांच्यातील जवळीक व्यक्त होत असते .

रेल्वे कलकता स्टेशनला थांबते. मीनाक्षीचा नवरा मणी अय्यर तिला नेण्यासाठी आलेला आहे. मीनाक्षी त्याला राजाची ओळख करून देते “ हे जहांगीर चौधरी” जी मीनाक्षी सुरवातीला राजा मुस्लीम आहे हे कळल्यावर रागावलेली असते ती राजाची खरी ओळख करून देते. कारण त्याच्याच मुळे तर ती सुखरूप आलेली होती.

राजा मीनाक्षीचा निरोप घेऊन जाऊ लागतो. क्षणातच मागे वळतो. आणि ज्या कॅमेऱ्याने तिचे फोटो काढलेले असतात त्याचे रोल तिला परत देऊन टाकतो. मीनाक्षी साश्रू भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत आहे. राजाला नेण्यासाठी आलेल्या लोकांच्या हातात बोर्ड आपल्याला दिसतात ज्यावर नाव असते “ जहांगीर चोधरी” आणि त्याचवेळी मीनाक्षी म्हणत असते “ गुड बाय मिस्टर आयर” चित्रपट संपतो.

हा हॉरर चित्रपट नाही. पण तरीही यातील दृश्ये बघत असताना आपल्याला अंगावर काटा येतो. चित्रपटाच्या सुरवातीला जेव्हा दहशतवादी अचानक बसमध्ये येतात तेव्हा आनंदाने गाणी म्हणत जाणरी मुले, पत्यांचा डाव खेळत असणारे तरुण या दृशानी एकीकडे आपला मूड आनंदात असतो आणि त्याचवेळी जेव्हा दहशतवादी वृद्ध जोडप्याची हत्या करतात. हा प्रसंग भयप्रद वाटतो. हि हत्या आपल्याला अस्वस्थ करते , कुठेतरी हळहळ निश्चितच वाटते आणि त्याचवेळी मनात संतापाची लाट सुद्धा येते.

अपर्णा सेन यांनी संपूर्ण चित्रपटात समर्पक वातावरण निर्मिती केली आहे. त्या पडक्या घरात जेव्हा मीनाक्षी एकटी झोपलेली असते त्यावेळी येणारे पक्षांचे भीतीदायक आवाज तिच्या मनावरचे दडपण वाढवत असतात. हे दडपण स्त्री म्हणून तिचे एकटे झोपण्याचे आहे तसेच दहशतवाद्यांच्या वाटणारया भीतीचे आहे.

इन्स्पेक्टर राजेश जेव्हा दुसर्या दिवशी कलकत्याला जायचे म्हणून जेव्हां पुन्हा राजाला आणि मीनाक्षीला बंगल्यावर सोडायला जातो तेव्हा रस्त्यावरील ते भयानक वातावरण. संपूर्ण निर्मनुष्य रस्ता आणि चोहोबाजूला उठलेले आगीचे लोळ. रस्त्यावर एक पोरका पोर एकटाच रडत आहे. या पार्श्वभूमीवर असणारा शास्त्रीय संगीताचा जीवघेणा आलाप.

पण या उलट कर्फ्यू लवकर उठणार नसतो तेव्हा बस जवळील एका हॉटेल मध्ये तरुण मुलांच्या बरोबर दोघे चहा पीत बसलेले असतात तेव्हा न झालेल्या प्रेमविवाहाच्या गोष्टी ते सांगत असतात. या गोष्टी खोट्या आहेत आणि त्याचमुळे त्या दोघांचे बावरणे किंवा उत्त्तर न सुचले तर दुसर्याकडे बघणे या गोष्टी स्वाभाविकपणे त्यांच्यात होत असतात. जेव्हा राजा त्यांच्यातील हानिमूनच्या ठिकाणाचे वर्णन करत असतो तेव्हा मीनाक्षी त्यात तल्लीन होत असते. जणू त्या सर्व गोष्टी ती कल्पनेने जगत असते. कदाचित तिच्या मनात विचार आला असावा हा खरोखरीच आपला नवरा असला असता तर ?

कोंकणा व राहुलचा अभिनय या कलाकृतीत अधिक भर घालतात. या चित्रपटाचे संगीत दिले आहे उस्ताद झाकीर हुसेन यांनी. शास्तीय संगीताचे आलाप आणि त्या पार्श्वभूमीवर घडत जाणारे प्रसंग मनाचा थरकाप उडवत जातात.
हा चित्रपट हळुवार फुलत जाणारी एक प्रेमकथा आहे. पण त्याहीपेक्षा फुलत जाण्याच्याही आधी एखाद्या फुलाचा गंध यावा हे भाव विदित करणारा हा प्रेमानुभव आहे. जातीय दंगली म्हणून निर्माण झालेला ताण या पार्श्वभूमीवर जरी हि प्रेमकथा घडत असली तरीसुद्धा हा चित्रपट राजकारण किंवा विनाकारण जातपाती सारख्या विषयाला अकारण महत्व देत नाही. सुंदर अभिनय आणि त्याहीपेक्षा अपर्णा सेन यांचे दिग्दर्शन, आणि त्यांचीच पटकथा यामुळे हा चित्रपट आपल्या अधिक लक्षात राहतो.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults