व्हेज पनीर बिर्याणी रेसिपी

Submitted by निमिष_सोनार on 27 July, 2021 - 05:11

साहित्य:

गोडे तेल, हळद, जिरे, मिरची पावडर (तिखट), मीठ, धणे पावडर, जिरे पावडर, लसूण, आले (जिंजर/अद्रक), पुदिना, कढीपत्ता, कोथिंबीर, फ्लावर (फुल कोबी), शिमला मिरची (कॅप्सिकम), कांदे, टमाटे, वाटाणे (ग्रीन पीस), गाजर, बटाटे, दही, विकतचा बिर्याणी मसाला, पनीर, बिर्याणीचे लांब आकाराचे तांदूळ, कोळसा (चारकोल).

भाजी:

गॅस ऑन करून त्यावर कढई ठेवा. कढईत खायचे तेल टाका. तेल गरम झाले की त्यात जिरे टाका. जिरे तडकायला लागल्यावर मग त्यात हळद टाका. मग त्यात शिमला मिरची आणि कांदे यांचे कापलेले तुकडे टाकून त्यांना थोडा वेळ परतवा. कांदे थोडे लाल झाले की मग त्यात पुदिना, कढीपत्ता, लसूण, आले आणि कोथिंबीर यांची आधीच तयार केलेली पेस्ट टाका. मग त्यात फ्लॉवर, टमाटे, वाटाणे, गाजर, बटाटे यांचे थोडे मोठे कापलेले तुकडे टाका. नंतर एका बाऊलमध्ये थोडे दही घ्या आणि त्यात तयार बिर्याणी मसाला मिक्स करून ते मिश्रण त्या भाजीत टाका आणि सगळे व्यवस्थित चमच्याने हलवून मिक्स करा. मग त्यात तिखट, मीठ आणि धणे, जिरे पूड (पावडर) टाका. सगळ्यात शेवटी त्यात बारीक कापलेले, मलई पनीरचे मऊ (सॉफ्ट) तुकडे टाका. भाजीवर झाकण ठेऊन हे सर्व अर्धकच्चे शिजवावे.

भात:

जेवढे वाटी तांदूळ तेवढीच वाटी पाणी घेऊन भात नेहमीच्या पद्धतीने पण अर्धकच्चा शिजवावा.

बिर्याणी:

एका वेगळ्या पॅनमध्ये खायचे तेल टाकून त्यात बटाट्याच्या बारीक कापलेल्या गोल चकत्या हाताने ठेवून पसरवा. मग पॅन गॅसवर ठेवा आणि गॅस ऑन करून त्यांना थोडा वेळ परतवा. त्यानंतर त्या बटाट्याच्या चकत्यांवर, तयार झालेल्या भाजीची एक लेयर (थर) टाकून सराट्याने पसरवा. त्यावर एक भाताची लेयर टाका. मग परत भाजीची लेयर टाका. मग आणखी भाताची लेयर टाका. नंतर पॅनवर झाकण ठेवून दहा मिनिटे वाफ येऊ द्या. मग या तयार झालेल्या बिर्याणीवर छोटी वाटी ठेऊन त्यात छोटा जळता कोळसा टाका आणि त्यावर तूप टाका आणि संपूर्ण पॅनवर झाकण ठेवा. पाच मिनिटानंतर झाकण काढून टाका. जळत्या कोळश्याच्या वासामुळे बिर्याणी चुलीवर तयार केल्यासारखी चव लागते. तर मग आता ही चविष्ट (टेस्टी) बिर्याणी खाण्यासाठी तयार झाली आहे! पण थांबा!! आधी कोशिंबीर (रायता) तयार करा आणि मग त्यासोबत ही बिर्याणी खा!

कोशिंबीर (रायता):
पातळ दह्यामध्ये साखर आणि मीठ टाकावे. मग त्यात टमाटे, काकडी, कांदे, बारीक कापून टाका तसेच खारी बुंदी पण टाका. चांगले मिक्स करा. झाली कोशिंबीर तयार! आता या कोशिंबिरीसोबत बिर्याणी वर ताव मारा!

(माझ्या सौ ने मला काही दिवसांपूर्वी बिर्याणी बनवायला शिकवली त्यानुसार जसे आठवले तसे मी लिहिले आहे)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा, तुम्ही त्यासाठी खाली दिलेला माझा लेख वाचा: साहित्यिक रेसिपीचे शाब्दिक अपचन
https://www.maayboli.com/node/79626>> तिथे लोणच्याचा खार म्हणजे रायता असे म्हटले आहे. म्हणून तर इथे शंका विचारली.

पालखी परत नेते

Back to top