माझ्या कमावत्या काळात सगळ्यांत जास्त संबंध दोनच गोष्टींशी आला. एसटीची तांबडी बस आणि ग्लुकोजची बिस्किटे. नुसती ग्लुकोजची म्हटले तरी ती पारलेचीच हे सर्वांना माहित आहे. कारण ग्लुकोजची बिस्किटे म्हणजेच पारले व पारले म्हटलेकी ग्लुकोजची बिस्किटे ही समीकरणे लोकांच्या डोक्यांतच नव्हे तर मनांतही ठसली आहेत. ग्लुकोजची बिस्किटे जगात पारलेशिवाय कुणालाही करता येत नाहीत ह्यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. संपूर्ण देशात ह्या एकाच गोष्टीवर मतभेद नाहीत.
१९५६ सालची गोष्ट असेल. दादर किंवा चर्चगेटहून मालाडला यायला निघालो की पेंगुळलेल्या डोळ्यांना जाग यावी किंवा मुंबईचा वास नाहीसा होऊन खऱ्या अर्थाने मधुर चवीचा वास येऊ लागला की डब्यातली सर्व गर्दीही ताजीतवानी व्हायची. पारले स्टेशन आले ह्याची खात्री पटायची. विलेपारलेच्या पूर्वेला राहणारे प्रवासीही घरी जाताना पारलेच्या ग्लुकोज बिस्किटाच्या फॅक्टरी कडे आत्मीयतेने पाहात, दिवसभराचे श्रम विसरून,ताज्या ताज्या ग्लुकोज बिस्किटांचा मधुर चवीचा वास पोट भरून घरी न्यायचे.आम्ही पुढे जाणारेही तो चविष्ट सुगंध एकदोन स्टेशने जाईपर्यंत साठवत असू.पार्ले बिस्किटांची ही प्रत्यक्ष ओळख अशी झाली.
फिरतीची नोकरी. जिल्ह्याच्या गावी आणि,तालुक्या तालुक्यातूनच नव्हे तर लहान मोठ्या गावांनाही जावे लागे. एसटीतून उतरल्यावर लगेच लहान मोठ्या थांब्यावरच्या कॅंटीन उर्फ काहीही म्हणता येईल अशा हाॅटेलात जायचे. गरम वडे किंवा भजी तळून परातीत पडत असत. शेजारी पातेल्यात तेलात वाफवलेल्या अख्ख्या मिरच्या असत. मालक किंवा पोऱ्या वर्तमानपत्राच्या कागदात एक पासून चार चार वडे किंवा भजी आणि मिरच्यांचे तुळशीपत्र टाकून पटापट गिऱ्हाईकी करत असायचे. गरमागरम भज्या वड्यांचा मोह टाळता येत नसे. तो खाल्ला की गरम व मसालेदार वड्यांनी हुळहुळलेल्या जिभेचे आणखी लाड करण्यासाठी एक हाप किंवा कट किंवा तसले प्रकार नसलेल्या गाडीवर एक चहा आणि पारले जी चा दोन रुपयाचा पुडा घेऊन त्या केवळ पोटभरू नव्हे तर कुरकुरीत व खुसखुशीत गोड बिस्किटांची मजा लुटायला सुरवात करायची!
भले पारले जी पोटभरू असतील. पण त्याहीपेक्षा आणखी काहीतरी नक्कीच होती. चविष्ट गोड असायची. दोन खाऊन कुणालाच समाधान होत नसे. तो लहानसा पुडा चहाबरोबर कधी संपला ते ग्लुकोज बिस्किटांच्या तल्लीनतेत समजत नसे.
मला पारले-जीची ओळख व्हायला पंचावन्न -छपन्न साल का उजाडावे लागले? त्या आधी बिस्किटे खाणे हे सर्रास नव्हते. बरे मिळत होती ती हंट्ले पामरची मोठी चौकोनी तळहाताएव्हढी. पापुद्रे असायचे पण मुंबईच्या बेकरीतील खाऱ्या बिस्किटांसारखे अंगावर पडायचे नाहीत. फक्त जाणीव होत असे खातांना. पण साहेबी थाटाची, चहा बरोबर तुकडा तोंडात मोडून खायची. त्यामुळे ती उच्चभ्रू वर्गासाठीच असावीत असा गैरसमज होता. पण खरे कारण म्हणजे ‘पाव बटेर’ पुढे बिस्किटांची गरजही भासत नसे. बरे बेकरीत तयार होणारी नानकटाई लोकांच्या आवडीची होती.
बेकरीची गोल, चौकोनी बिस्किटेही खपत होती. पण तीही रोज कोणी आणत नसे. शिवाय बिस्किटे हा मधल्या वेळच्या खाण्याचा किंवा येता जाता तोंडात टाकायचा रोजचा पदार्थ झाला नव्हता. बिस्किटे चहाबरोबरच खायची अशी पद्धत होती. खाण्याचे पदार्थ म्हणजे शेव,भजी, चिवडा, भाजलेले किंवा खारे दाणे, फुटाणे आणि डाळे चुरमुर. हे ब्लाॅक बस्टर होते.
डाळे चुरमुऱ्यांचीही गंमत आहे. आगरकरांनी रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला हे प्रसिद्ध झाल्यापासून त्यांच्या बरोबरीचे व नंतरची मोठी झालेली माणसेही रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करत होतो हे लिहू लागले. रस्त्यावरच्या दिव्याप्रमाणे माधुकरी मागून शिक्षण केले हा गरीबीतून कसे वर आलो सांगण्याचा प्रघात होऊ लागला. पण सर्वांना, गरीबांना तर होताच होता, गरीबी सांगण्यासाठी ‘“ कित्येक दिवस तर नुसत्या डाळंचुरमुऱ्यांवर काढले” असे म्हणणे प्रचलित होते. सांगायची गोष्ट अशी की डाळे चुरमुरेही सर्वप्रिय होते. येव्हढ्या गर्दीत बिस्किटांचा सहज प्रवेश होणे सोपे नव्हते.
खाल्लीच बिस्किटे तर लोक बेकरीत मिळणारी खात असत. त्यातही मध्यंतरी आणखी एक पद्धत प्रचलित झाली होती. आपण बेकरीला रवा पीठ तूप साखर द्यायची व बेकरी तुम्हाला बिस्किटे बनवून देत.त्यासाठी ते करणावळही अर्थातच घेत. तरीही ही बिस्किटे स्वस्त पडत. ह्याचे कारण ती भरपूर वाटत. गरम बिस्किटांचा आपलाच पत्र्याचा डबा घरी घेऊन जाताना फार उत्साह असे. आणि ‘ इऽऽऽतकीऽऽऽ बिस्किटे’ खायला मिळाणार ह्या आनंदाचा बोनसही मिळे!
त्या व नंतरचा काही काळ साठे बिस्किट कं.जोरात होती. त्यांची श्र्युजबेरी बिस्किटे प्रसिद्ध होती. पण पारले बिस्किट कंपनी आली आणि चित्र बदलले. स्वातंत्र्य मिळाले होते. त्या अगोदरच पारले कं.सुरु झाली होती. पण इंग्लिश कंपन्यांपुढे अजून तिचा जम बसत नव्हता. पण विक्रीची जोरदार मोहिम, विक्रेत्यांचे जाळे वाढवत नेणे आणि जाहिरातींचा मारा व स्वस्त किंमत ह्यामुळे नंतर नंतर पारलेने जम बसवला.
पारलेला प्रतिस्पर्धी पुष्कळ निर्माण झाले. त्यातला सर्वात मोठा म्हणजे ब्रिटानिया. त्यांनी पारले ग्लुकोजला तोड म्हणून टायगर ब्रॅन्ड आणला पण पारले जी पुढे त्या वाघाची शेळी झाली. स्पर्धेला तोंड देताना पारलेने व्यापारी क्लृप्त्याही वापरल्या. महागाईतही कमी किंमत कायम ठेवण्यासाठी पुड्यांतील बिस्किटांचे वजन कमी करणे,बिस्किटांचा आकार लहान करणे हे केलेच. त्यामुळे आजही दोन रुपये,पाच व दहा रुपयांची पाकीटे मिळतात. परवडतात. पूर्वी पारलेच्या बिस्किटांचा आयताकारी चौकोन मोठा होता. आता बराच लहान केला आहे.तरीही आजही ग्लुकोज म्हणजे पारले-जी च ! काही असो पारलेजी! तुम्ही लोकांसाठी आहात , लोकांचेच राहा.
पारलेने,पाकीटबंद बिस्किटे ही उच्चवर्गीयांसाठीच असतात ही कल्पना लोकांच्या मनातून काढून टाकली! कोणीही बिस्किट खाऊ शकतो हे पारलेने दाखवले.. त्यामुळे कमी किंमतीची लहान पाकीटे पारलेनेच आणली. दोन रुपयाचे पारले-जीचे बिस्किटांचे पाकीट गरीबही घेऊ लागला. चहा बरोबर बिस्किट खाऊ लागला! ‘चहा साखर पोहे ’ या बरोबरच पारले-जी चा पुडाही किराण्याच्या यादीत येऊन बसला. तर ‘धेले की चायपत्ती धेले की शक्कर’बरोबरच गोरगरीब मजूरही पारले-जी का पाकेट’ मागू लागले. दुकान किराण्याचे,दूध पाव अंड्यांचे असो,की पानपट्टीचे, जनरल स्टोअर किंवा स्टेशनरीचे असो पारले ग्लुकोजची बिस्कीटे तिथे दिसतीलच.तसेच हाॅटेल उडप्याचे असो की कुणाचे, कॅन्टीन,हातगाडी,टपरी काहीही असो जिथे चहा तिथे पारले-जी असलेच पाहिजे.
पॅकींगवर कंपनीने ग्लुको लिहिले असले तरी सगळेजण बिस्किटाला ग्लुकोजच म्हणतात! सर्व देशात प्रचंड प्रमाणात आवडीने खाल्ला जाणारा एकच पदार्थ आहे पारले-जी. मग भले अमूल आपले’ दूध इंडिया पिता है’म्हणो की ‘इंडियाज टेस्ट’ असे स्वत:चे वर्णन करो; देशातल्या जनतेची एकमेव पसंती पारले- जी ची ग्लुकोज बिस्किटे! गरीबालाही श्रीमंती देणारी ही बिस्किटे आहेत.
चहाचा दोस्त आणि भुकेला आधार असे डबल डेकर पारले ग्लुकोज बिस्किट आहे. म्हणूनच मी तीस चौतीस वर्षाच्या नोकरीच्या काळात एसटीतून उतरलो की चहा आणि पारलेचा एक पुडा संपवायचो. एक पुडा कामाच्या बॅगेत टाकायचो. दिवस मस्त जायचा. अपवाद फक्त उन्हाळ्याचा. उन्हाळ्यात ,”लोकहो विचार करा चहापेक्षा रस बरा” ह्या सुभाषिताचे मी एकनिष्ठेने पालन करायचो. तरीही पारलेची ग्लुकोज सोडली नाहीत. ती नुसती खाण्यातही मजा आहे!
आजही मुले माझ्यासाठी, बाजारातून येताना आठवणीने पारले- जी ग्लुकोज बिस्किटे आणतात. ह्या पेक्षा दुसरा आनंद कोणता असेल!
You can read this blog and additional blogs at: https://sadashiv.kamatkar.com/blog/
चहा आणि बिस्कॉफ ये संगम नही
चहा आणि बिस्कॉफ ये संगम नही हो सकता ..
>> एक्साक्टली... बिस्कॉफ म्हणजे फक्त कॉफी ...
विकु, खरंच!
विकु, खरंच!
वर कोणीतरी पॉपिन्स चा उल्लेख
वर कोणीतरी पॉपिन्स चा उल्लेख केला तो वाचून एकदच टडोपा झाले - आधी पार्ले जी चा ट्रेनमधला वास नि मग पार्ले जी मग पॉपिन्स नि मग बिस्कॉफ. !!!
जाताजाता, माझ्या अमेरिकेतल्या बांधवांकरता एक रेकमंडेशन - डेल्टाच्या इन्फ्लाइट सर्विसमधे ते कुकिज सर्व करतात - बिस्कॉफ. जमल्यास ट्राय करा, कॉस्टकोत सापडतात कधीतरी. आय फाइंट देम वेरी अॅडिक्टिंग... >> +१ मला बिस्कॉफ भारी आवडतात.
"गर्व से कहो, हम हार्डकोर् मुंबईकर हैं" >> छे हिरा, हार्डकोर् मुंबईकर असण्याचे मुख्य व्यवछेदक लक्षण हेच कि तो हे असे कधीच म्हणणार नाही कोणी तरी विचारल्याशिवाय तुमच्या पोस्ट्स अतिशय माहितीपूर्ण नि वाचनीय असतात. (छोट्या पण)
+१०० असामी
+१०० असामी
डेल्टाच्या कुकीज मस्त मस्त असतात.
विलेपार्ले स्टेशनजवळची पारले
विलेपार्ले स्टेशनजवळची पारले-जी ची factory सुरु असतांना त्याच्या जवळपासच्या दुकानात किलोवर मिळणारी 'तुकडा पारले-जी' कोणीच खाल्ली नाहीत का? अप्रतिम चव असायची त्याची.
हो. आम्ही अनेक वेळा खाल्ली
हो. आम्ही अनेक वेळा खाल्ली आहेत. पण ती नेहमीच चांगली मिळतील असे नव्हते. कित्येकदा जराशी जास्त बेक झालेली बिस्किट्स सुध्दा सेकंडस् मध्ये असायची. अर्थात काही लोकांना ती अधिक खरपूस चव आवडायची.
आज अनेक वर्षांनी पार्ले-जीचा
आज अनेक वर्षांनी पार्ले-जीचा पुडा विकत घेतला
मीदेखील आज पार्लेजी घ्यायला
मीदेखील आज पार्लेजी घ्यायला गेलो पण संपले होते मग टायगर घेऊन आलो...
आज अनेक वर्षांनी पार्ले-जीचा
आज अनेक वर्षांनी पार्ले-जीचा पुडा विकत घेतला >> +१ एकंदर बिस्किट हाच प्रकार बर्याच दिवसांनी घेतला .
इथल्या काही पोस्ट्स उडाल्या का ?
होय. मलाही काही पोस्ट्स
होय. मलाही काही पोस्ट्स उडाल्यात असेच वाटतेय.
लेख छान च आहे. माझ्याकडे
लेख छान च आहे. माझ्याकडे नेहमीच असतात . एकेकदा मी एकटी राहत असताना - मुलगी कॉलेजात होती पुण्याला - तेव्हा आजारी पडल्यावर स्वयंपाक करायचे त्राण नसायचे तेव्हा अगदी अर्धा पुडा खाल्ला तरी एनर्जीची गरज भागायची. हा मी प्रयोग अगदी इमर्जन्सीतच करते कारण मधुमेह आहे. इतके गोड खाणे शक्य नाही एरवी.
माझे सासरे सांगली हून घरी भांडण झाल्यामुळे वेगळे झाले तेव्हा साठे बिस्किट मध्ये काम करत असत. माल घ्यायचा. म्हणजे त्याची मोठी मोठी खोकी स्वतः उचलत. तब्येत चांगली होती तेव्हा. साठे बिस्किट मधल्या नोकरीत त्यांच्याकडे पुढे छोटी काळी गाडी आली होती. नवरा बाल पणी त्या गाडीतून शाळेत जात असे व घरी आल्यावर साठे बिस्किटे!! पुढे हैद्राबाद अत्तर यु नो द हिस्टरी.
जास्त भाजलेली बिस्किटी मी तर शोधून शोधुन खाते. लैच मस्त लागतात.
पार्ले कंपनी ची प्रॉडक्षन फ्रँचाइस भारत भर आहेत. तिथून सप्ल्याय करणे सोपे जाते ना.
होय माझीही पोस्ट उडाली
होय माझीही पोस्ट उडाली
मग्लोकोज, म्हणजे १९९६-९७च्या
मध्यंतरी, म्हणजे १९९५-९६च्या सुमारास 'ग्लुकोज डी' नावाचं एक बिस्किट आलं होतं बाजारात. दिसायला एकदम पार्ले जी सारखं असलं, तरी चव आणखीन छान होती. पण काही महिन्यांतच ते बाजारातून गायब झालं आणि पुढे १-२ वर्षात त्याच्या जवळपास जाणारं टायगर बिस्किट आलं. टायगरची चव मात्र पुढे लगेचच बदलत गेली.
आज अनेक वर्षांनी पार्ले-जीचा
आज अनेक वर्षांनी पार्ले-जीचा पुडा विकत घेतला..........अरे,इथले वाचून आवडत नसतानाही पार्ले-जीचा पुडा anavasa वाटतेय.
पारले जी बिस्किट आता जास्त
पारले जी बिस्किट आता जास्त स्वतः बनवत नाहीत. वेंडर्सकडुन रेसेपी देवुन बनवुन घेतात. ट्रान्स्परन्ट पॅक असतो मग त्याला पारलेच्या प्रिंटेड पॅकमधे सील करतात.
तरीपण बरी लागतात.. एवढं काही
तरीपण बरी लागतात.. एवढं काही चवीत उन्नीस-बीस वाटत नाही. कुठल्या कुठल्या घाण्यात मीठ जरा जास्त वाटतं पण तेही भन्नाट लागतं.
पारले जी आणी कमी गोड कॉफी
पारले जी आणी कमी गोड कॉफी
कोम्बीनेशन मस्त लागते.
का उडाल्या म्हणे पोस्ट?
इथल्या काही पोस्ट्स उडाल्या का ?>>>>>>>का उडाल्या म्हणे पोस्ट?
का उडाल्या म्हणे पोस्ट?
का उडाल्या म्हणे पोस्ट?
बिस्कीटा करपली नां गो !!!
मला आठवतंय अगदी आधी प्लॅस्टिक
मला आठवतंय अगदी आधी प्लॅस्टिक पॅकिंग च्या आधी पार्ले जी पांढऱ्या पिवळ्या स्ट्राइप च्या मेणकागदात पॅक मिळायची.
मग तो पॅक लांबवर ट्रान्सपोर्ट मध्ये टिकत नसेल म्हणून प्लास्टिक आले.
मारी पण बहुतेक पांढऱ्या मेणकागद टाईप पॅक मध्ये मिळायची.
पार्ले जी पांढऱ्या पिवळ्या
पार्ले जी पांढऱ्या पिवळ्या स्ट्राइप च्या मेणकागदात पॅक मिळायची.>> मध्यंतरी ती कॅडबरी चोकोलेट मध्ये अळ्या सापडल्याची केस झाली त्यानंतर
बरेच फूड प्रकार सीलबंद झाले.
पारले जी लेखाच्या वाचकांना,
पारले जी लेखाच्या वाचकांना, तुम्ही माझा लेख वाचलाआणि तुम्हाला तो आवडला ह्याचा मला आनंद झाला. आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो.
छान लेख
छान लेख
आमच्या कॉलेजची industrial visit गेलेली पार्ले फॅक्टरीत. ही बिस्किटे बनवण्याची क्रिया त्यामुळे बघायला मिळाली. एकदम भारी वाटलेलं तेव्हा. खरपूस वास सुटलेला बिस्कीटचा. नंतर आम्ही तिथून काही बाही विकत घेतले. बिस्कीट , पॉपिन्स वगैरे . सवलतीच्या दरात मिळालं कॉलेज व्हिजिट असल्याने.
लेख छान.
लेख छान.
लेख उत्तम. एक जुनी जाहिरात.
लेख उत्तम.
एक जुनी जाहिरात.
तुम्हा सर्व वाचकांचा आभारी
तुम्हा सर्व वाचकांचा आभारी आहे. तुमच्यापैकी बरेच जण चांगले लेखकही आहात. त्यामुळे तुमचे अभिप्राय विशेष मोलाचे वाटले. लेखकाला वाचक मिळाल्याचा निराळाच आनंद असतो. असाच आनंद वेळोवेळी मला व तुम्हालाही लाभो.
आज परत लेख वाचला आणि पारले जी
आज परत लेख वाचला आणि पारले जी खायची इच्छा झाली.. मग लगेच आणली दुकानातून
इस रंग बदलती दुनिया में ….
इस रंग बदलती दुनिया में ….
काही गोष्टी बदलू नये असे वाटते.. पारले बिस्किटांचे हे रूप बघितले.
त्यांना ओरिओ आणि सनफिस्ट
त्यांना ओरिओ आणि सनफिस्ट बरोबर स्पर्धा करायला हे जास्तीचं कलेक्शन लॉन्च करावं लागलं असेल.ओरिजिनल फ्लेवर पार्ले चे फॅन आहे ते राहतीलच.
Pages