हरीवू
when the child is born, a father is also born
२०१४ सालचा कन्नड भाषेतील दिग्दर्शक मन्सूर यांचा भावनाप्रधान चित्रपट “हरीवू” ( प्रवाह ) ६२ व्या “ national award festival मध्ये या चित्रपटास “बेस्ट कन्नड फिल्म्स” , कर्नाटक राज्याचे “best movie” अशी अभिमानस्पद पारितोषके मिळाली होती . विशेष म्हणजे हा चित्रपट बेंगलोर मध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. डॉक्टर आशा बेनकापुरे यांनी लिहिलेला एक न्यूज कॉलम व दिग्दर्शकाच्या आयुष्यातील काही घटना यांच्या आधारे दिग्दर्शक मन्सूर यांनी स्वत: हि कथा लिहिली आहे.
वडील आणि मुलगा यांच्यातले भावसंबध हे मूळ कथानक. दोन भिन्न मार्गांनी हे कथासूत्र आपल्यासमोर उलगडत जाते आणि हि दोन्ही सूत्रे कालांतराने एकच होतात आणि चित्रपट अधिकच भावोत्कट होत जातो हे या पटकथेचे अपूर्व यश.( पटकथा लेखन : ह अ अनिलकुमार)
बेंगलोर शहर. रात्रीची वेळ. रात्रीची शांतता भंग करीत वेगाने गाड्या जात आहेत. आणि येणाऱ्या प्रत्येक गाडीला एक खेडूत- शरणाप्पा सातत्याने हात करीत आहे. पण कोणतीच गाडी थांबत नाही. शरणाप्पा दमतो आणि हताश होऊन एका फुटपाथ वर बसतो. थोड्याच वेळात पांढरा वेश घातलेला वार्ड बॉय त्याला बोलवायला येतो. शरणाप्पा त्याच्या पाठोपाठ डॉक्टरांच्या खोलीत जातो डॉक्टर आणि शरणाप्पा एकमेकाशी नजरेनेच बोलतात आणि शॉट कट होतो.
बेंगलोर शहरातील तेच हॉस्पिटल. तीच रात्रीची वेळ. कॉटवर एक वृद्ध इसम झोपला आहे. त्याच्या भोवती त्याची बायको आणि मुलगा सुरेश. बायको खोलीच्या बाहेर आणि मुलगा वडिलांच्या खोलीत पेंगुळलेल्या अवस्थेत.
सुरेश आपल्या वडिलांचा एकुलता एक मुलगा. वडिलांचा कमालीचा लाडका. पण त्याचे कामाचे वेळापत्रक मात्र कमालीचे व्यस्त आहे सुरेशचे वडील आजारी आहेत आणि त्यांना बेंगलोरच्या हॉस्पीटल मध्ये ठेवले आहे. कारण त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मध्यरात्र उलटून जाते आणि अचानक “ सुरेश, सुरेश “ असा अस्फुट आवाज येतो. सुरेश दचकून उठतो. त्याच्या वडिलांना “ टोयलेट” ला जायचे आहे. आजारी असल्याने ते उठू शकत नाहीत. सुरेश त्यांना युरीन पॉट देण्यासाठी उठतो. पण पॉटला हात लावतानाच त्याला किळस येते. म्हणून तो आपल्या आईला हाक मारून पॉट देण्यसाठी सांगतो.
सुरेशचे वडिलांचे प्रेम आहे पण तो स्वभावाने तुसडा आहे, हॉस्पीटल मध्ये राहणे , त्यांच्याशी बोलणे या सगळ्या गोष्टीपासून तो अलिप्त आहे. त्याचे कामाचे वेळापत्रक व्यस्त आहे हि गोष्ट जरी खरी असली तरीही काही वेळेला वडिलांच्यापासून अलिप्त राहणेसाठी तो कामाचे निमित पुढे करतोय असेही आपल्याला वाटत राहते. सुरेशची पत्नी रेखा म्हणते त्याप्रमाणे त्याचे घराच्या लोकांशी असलेले संबध फेसबुक किंवा व्हाटसप सारखे तांत्रिक झाले आहेत.
आपल्या वडिलांचा निरोप घेऊन सुरेश आता आपल्या मित्रांच्या बरोबर विजापूरला चालला आहे. एके ठिकाणी चहा साठी सर्व जण मित्र थांबलेले असतात. विजापूरला जाण्याचा रूट कसा असेल त्यांची चर्चा चालली आहे. आणि बोलता बोलता होस्पेट मार्गे त्यांचे जायचे ठरते. होस्पेट हा शब्द ऐकताच त्याच टपरी जवळ दमून बसलेला शरणाप्पा जो चित्रपटाच्या सुरवातीला आपण बघितलेला असतो अधीरपणे त्यांच्याकडे येतो. हातातातले सामान पडते पण डोक्यावरची ट्रंक मात्र जरी थोडी हेंदकाळली तरी ती तशीच असते. सुरेशला तो हॉस्पेटला घेऊन जाण्याबाबत गयावया करतो. आणि शेवटी सर्व मित्र विचारांती त्याला हॉस्पेटला घेऊन जाण्याबाबत निर्णय घेतात.
इतक्या वेळात शरणाप्पा बाबतचे आपले गूढ वाढत गेले असते. बेंगलोरच्या रस्त्यावरून हिंडणारा किंवा हॉस्पेटच्या गाडीची चौकशी करणारा शरणाप्पा त्याच्या आयुष्यात नेमके काय झाले आहे हे जाणून घेण्याचे कुतूहल वाढत जाते. सुरेशच्या गाडीत जेव्हा शरणाप्पा येतो तेव्हा मात्र त्याच्या आयुष्यातील घटना आपल्या डोळ्यासमोर येतात आणि कथा उलगडत जाते. शरणाप्पा आपल्या गावावरून मुलाची प्रकृती दाखवण्यासाठी आलेला असतो. त्याच्या मुलाला हार्टचा त्रास असतो आणि गावातले डॉक्टर त्याला उपचार घेण्यासाठी बेंगलोरला पाठवतात. स्वत:ची जमीन विकून तो पैसे उभे करतो आणि बेंगलोरला येतो.
सुसाट वेगाने गाडी होस्पेटला चालली आहे. आणि तेव्हा कारटेप वर गाणे लागलेले भाऊक गाणे .त्याचा मतितार्थ असतो “ वडीलच माझ्या जीवनाचे सर्वस्व आहे आणि ते माझा आत्मा आहेत” शुष्क नजरेने शरणाप्पा बसलेला असतो. मांडीवरची ट्रंक तशीच. वेगाने जाणारी गाडी. गाणे ऐकताना त्याला त्याच्या मुलाची आठवण येते . घराच्या खडकाळ अंगणावर त्याचा मुलगा गाडी चालवत असतो. आणि शरणाप्पा त्याला सांगत असतो गाडी चांगल्या रस्त्यावरून चालव म्हणजे बंद पडणार नाही. त्याचा मुलगा गवी ( मास्टर शोईब ) म्हणतो मी मोठा झाल्यावर अशी गाडी घेणार आहे जी कधीही बंद पडणार नाही. जेव्हा हायवे वरून हॉस्पेट कडे जात असणारी गाडी आणि त्याचवेळी खडकाळ रस्त्यावरून मुलगा चालवत असणारी खेळण्यातील गाडी.
शरणाप्पा आपल्या मुलाच्या आठवणीत आहे. मुलाची तब्बेत कशी आहे काय आहे हे गूढ आपल्याला तसेच असते. पण त्याच वेळेला वडिलांशी असणार्या सुरेश आणि त्याच्या मित्रांच्या संवादातून वडिलांबद्दलच्या त्यांच्या भावना आपल्या लक्षात येतात. प्रवासामध्ये सुरेशला वडिलांचा फोन येतो. पण त्यांचा फोन आल्यवर सुरेशची चिडचिड होते. वडिलांचा वेळी अवेळी आणि उगाचच फोन येणे त्याला आवडत नसते. पण त्याचा मित्र त्याला सांगतो असे वडील मिळाले म्हणून सुरेश नशीबवान आहे.. वडिलांवर त्याचे प्रेम नाही असे नाही पण त्याला प्रेमच व्यक्त करता येत नाही.
मित्रांच्या हास्य गप्पा चाललेल्या आहेत पण शरणाप्पाच्या डोळ्यासमोर मात्र त्याच्या गावाकडचे करुण चित्र दिसत असते. अचानक त्या दिवशी गवीचे बेशुद्ध होणे आणि सायकल वरून त्या तिघांनी डॉक्टरांच्या कडे त्याला घेऊन जाणे हे सर्व प्रसंग त्याला आठवत असतात. डॉक्टर त्याला बेंगलोरला घेऊन जा हा सल्ला देतात त्यावेळी शरणाप्पा उन्मळून पडतो. एक गरीब व्यक्ती त्याला बेंगलोरला जाणे कसे शक्य होणार होते ?
गवीच्या काळजीने शरणाप्पा सावकाराकडून कर्ज काढतो. कारण त्याला आशा आहे तो खूप वर्षे जगणार आहे. आणि त्याचमुळे गवी जेव्हा सायकलचे चाक फिरवत जेव्हा अंगणात बसलेला असतो तेव्हा दोघे आईवडील त्याच्या कडे आशेने बघतात. गवीचे आयुष्याचे चाक असेच फिरत राहणार आहे. दहा वर्षांनी गवी खऱ्या सायकल वरून फिरत असेल असा आशावाद दोघानाही आहे.
पण शरणाप्पा बेंगलोरला आल्यावरही डॉक्टर सांगतात गवी जगण शक्य नाही तेव्हा शरणाप्पा हतबल होतो. स्वत:जवळचे सारे पैसे तो त्यांना देऊ करतो पण मुलाला वाचवा हीच त्याची इच्छा आहे. वडील रडत आहेत म्हणून मुलगाही रडत आहे. “मी डॉक्टर आहे. परमेश्वर नाही” असे सांगून डॉक्टर तेथून जातात.
. गवीसाठी शरणाप्पाने सर्व काही केले आहे. फुटपाथवर जेवण करून स्वत:चे पोट भरणारा शरणाप्पा आणि खेड्यात आपल्या गवीची वाट बघणारी त्याची आई. रस्त्यवर जरी मिठाईचे दुकान दिसले तरी आपली भूक आवरायची आणि स्वत: बनवलेले जेवण जेवायचे असा शरणाप्पाचाचे दिवस चाललेले असतात. मुलाच्या काळजीने शरणाप्पा अधिक कृश झाला आहे.
अखेर शरणाप्पाचे घर जवळ येते. सुरेश आपली गाडी थांबवतो. इतका वेळ आपली सांभाळलेली ट्रंक घेऊन शरणाप्पा उठतो. सुरेश त्याला विचारतो त्याचा मुलगा कुठे आहे? तो अजुनी हॉस्पीटल मधेच आहे का? शरणाप्पा सांगतो “ज्या मुलाला बेंगलोर मध्ये जाताना त्याने खांद्यावर बसवून नेले होते त्या मुलाला तो डोक्यावर घेऊन चाललेला आहे”. सुरेश आणि त्याचे मित्र थक्क होऊन त्याच्या डोक्यावरच्या ट्रंक कडे बघत असतात. शरणाप्पाचा मुलगा गवी दुर्देवाने जग सोडून गेलेला असतो आणि त्या छोट्या मुलाचा मृत देह त्याने ट्रंक मध्ये ठेऊन तो घराकडे चाललेला असतो.
सुरेश आणि त्याचे मित्र पुढे जाऊ शकत नाहीत. ते शरणाप्पाला पुन्हा आपल्या गाडीत बसवतात. घरी शरणाप्पाची बायको ( श्वेता देसाई ) वाट बघत बसली आहे. नेहमी प्रमाणे ती आपल्या घरासमोरचा परिसर स्वच्छ करत आहे. आणि इतक्यात तिला गाडीची चाहूल लागते. गवीची, शरणाप्पाची ती इतके दिवस वाट बघत असते. पण गाडीतून शरणाप्पा एकटाच उतरलेला बघून तिला आश्चर्य वाटते. गवीचा ती आगतीकातेने शोध घेते. शरणाप्पाला ती वारंवार “ गवी कुठे आहे” विचारते. पण बायकोच्या प्रश्नाचे तो उत्त्तर देऊ शकत नाही. बायकोला बघितल्यावर शरणाप्पा अधिकच सुन्न झाला आहे. अखेर शरणाप्पाची बायको ट्रंक उघडते आणि गवीचा मूतदेह पाहून प्रथम धक्का आणि नन्तर दोघेही हंबरडा फोडतात. बराच वेळ त्यांचा आक्रोश चालू असतो. थोड्या वेळाने ज्या ठिकाणी तिने जागा स्वच्छ करून ठेवलेली असते त्या ठिकाणी सुरेश आणि त्याचे मित्र खड्डा काढतात आणि तिथे गवीचे दहन करतात.
सुरेश आणि त्याचे मित्र आता परत जात असतात. दमून ते एका हॉटेल मध्ये थांबलेले आहेत. झाल्या प्रकाराने सर्वच अस्वस्थ झालेले आहेत. सकाळी तुसडे पणाने वागणारा सुरेश आता बराच नरम झालेला आहे. त्यालाही त्याच्या वडिलांची आठवण येते. एका बाजूला जाऊन तो वडिलांना फोन करतो. पण आता वडील फोन उचलण्याच्या अवस्थेत नाहीत. त्यांच्या बोटाची अस्पष्ट हालचाल दिसते. बाकी मित्रही असेच फोन लावत असतात आणि त्याचवेळी चित्रपट संपतो.
शरणाप्पाची भूमिका साकारली आहे संचारी विजय या अभिनेत्याने. या भूमिकेला कारुण्याची झालर आहे. गविच्या बालपणीच्या खेळात हरवून जाणारा ते डॉक्टरने गवी बाबतचा नाईलाज बोलून दाखवल्यावर त्याच्या जीवाची झालेली तगमग, आणि गवीचा मृतदेह पाहिल्यावर त्याने केलेला आक्रोश या साऱ्याच गोष्टी संचारीने संवेदनशील रित्या साकार केल्या आहेत.
सुरेशच्या व्यक्तिमत्व सुद्धा वरून कितीही तुसडे वाटले तरी आतून ते प्रेमळ आहे आणि ते बारकावे साकार केले आहेत अरविंद कुपलीकरने. सुरवातीला तुसडेपणाने वागणारा सुरेश शरणाप्पाला केवळ त्याच्या गावात सोडून जात नाही. त्याला जेव्हा कळते त्याचा मुलगा वारला आहे त्यावेळी तो त्याला शेवटपर्यत साथ देतो. शेवटी जेव्हा तो वडिलांना फोन करतो तेव्हाही त्याच्या मनातील भावना आपल्याला हेलावून टाकतात.
उत्तम पटकथा हे या चित्रपटाचे आणखी एक वैशिठ्य. सकृत दर्शनी सुरेश आणि शरणाप्पा दोन भिन पद्धतीने जाणारी कथा सूत्र आपण बघत असतो पण जेव्हा सुरेशच्या गाडीमध्ये जेव्हा शरणाप्पा बसतो तेव्हा कथा एकसंध होऊन जाते. शरणाप्पाचा खेड्यापासून ते बेंगलोर पर्यंतचा प्रवास आणि बेंगलोरपासूनचा हॉस्पेट पर्यंतचा प्रवास हा केवळ एक प्रवास नाही तर त्याच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटनाचा तो हृध्य प्रवास आहे. हा प्रवास प्रभावी पटकथेच्या माध्यमातून उलगडत जातो. प्रवासामध्ये सुरेश आणि त्याच्या मित्रांच्यातील गप्पा आणि त्यायोगे शरणाप्पाला त्याच्या घराच्या आठवणी दाखवल्यामुळे कथेत सुसूत्रता आलेली आहे.या चित्रपटातील प्रत्येक प्रसंग आपल्याला हेलावून टाकतो. मग शरणाप्पाला मुलाच्या आजाराबाबत कळणे असो किंवा ते कळल्यावर जेव्हा तो घरी येतो तेव्हाचे मन हेलावून टाकणारया त्या दृश्याचा प्रसंकिनक===किंवा अंधारलेल्या त्या घरात ते दोघे जण जेवत आहेत आणि कोपर्यात गवी झोपला आहे. सोबत आहे मिणमिणता दिवा हा प्रसंग असो.
मुलासाठी सर्वस्व देणारा शरणाप्पा आणि आपल्या वडिलांशी तुसडेपणाने वागून त्यांना वेळ न देणारा सुरेश हे दोन्ही भिन्न व्यक्तिमत्व. चित्रपटाच्या शेवटी सुरेशला आपल्या वडिलांच्या प्रेमाची किमत कळली पण शरणाप्पाच्या मुलाचा मृत्यू? त्याचे दु:ख कोण भरून काढणार? कोणत्या आशेवर तो आता उर्वरित जीवन जगेल ? मग मृत्यू हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे का ? त्याच वेळी मनात विचार येतो who says death is an end to everything? who says night will never yield the way to dawn?”
नेहमीप्रमाणेच उत्कंठा
नेहमीप्रमाणेच उत्कंठा वाढवणारे आणि चित्रपट पहायलाच लावणारे लिखाण..!!!
छान परिक्षण..युट्यूब वर आहे
छान परिक्षण..युट्यूब वर आहे सिनेमा पण सबटायटल नाहीत.प्राईमवर आहे का शोधते.
छान परिचय !!!
छान परिचय !!!
Harivu पाहिल्यानंतर आई वडिलांना एक फोन होतोच.....
सुन्न करणारा चित्रपट आहे....
दुर्दैवाने यात शरणाप्पाचे काम करणाऱ्या संचारी विजय यांचे अलीकडेच अपघाती निधन झाले...
धन्यवाद . यु ट्यूब वर सब
धन्यवाद . यु ट्यूब वर सब टायटल्स सह हा चित्रपट उपलब्ध आहे. खाली लिंक देत आहे
https://www.youtube.com/watch?v=f4D3aOsAgvo&t=3491s
@सतीशगजाननकुलकर्णी कृपया
@सतीशगजाननकुलकर्णी कृपया चित्रपटाचे परिक्षण चित्रपट ग्रूपमधे लिहिणार का? हा धागा चित्रपट ग्रूपमधे हलवतो आहे
लिंकसाठी धन्यवाद.
लिंकसाठी धन्यवाद.