ताक

Submitted by सदा_भाऊ on 24 June, 2021 - 00:19

अख्ख्या भारतात ताक आवडत नाही असा माणूस सापडणे कठिण! आणि त्यात मराठी माणसाला तर ते आवडतेच आवडते. आपल्या पूर्वजांनी ज्या काही पाककला विकसित केल्या आहेत, त्यात ताकाचा शोध हा महत्वपूर्ण म्हणायला हरकत नाही. बनवण्यास अतिशय सोपा, अत्यंत पुरवठी, आणि रोजच्या जेवणा पासून ते शाही भोजना पर्यंत आवर्जून एक महत्वपूर्ण घटक बनलेले असे हे ताक. पिणाऱ्या व्यक्तीला खुष करून टाकणारे हे ताक. प्रत्येकाच्या फ्रिजच्या अडगळीत हमखास सापडणारे असे हे ताक.

आपल्या पूर्वजांनी ताकाचा शोध लावून संपूर्ण मनुष्यजातीवर … किंवा किमान भारतीय खाद्य संस्कृती मधे तरी भरीव योगदान केले आहे, असे मला म्हणावेसे वाटते. या सांस्कृतिक यादीतून विदेशी लोकांना वगळण्याचे कारण म्हणजे त्याना ते बटर मिल्क, कर्ड वॉटर असलं काही बोलून ताकाची महती पटवून देता येत नाही. कदाचित याच आसूये पोटी त्यानी योगर्ट ड्रिंक नामक काहीतरी रसायन घशात ओतण्याचे प्रकार सुरू केले असावेत, पण त्याला ताकाची उंची गाठता येणे शक्य नाही. ताक ते ताकच!

रोजच्या जेवणातल्या तजेलदार ताकाला लग्न समारंभात खास सजवले जाते. त्याला कोथिंबीर, आले यांचा शृंगार चढवून मठ्ठ्याचे रूप दिले जाते. पंक्तीचा आकडा वाढला तर मसाले भात, पुऱ्या यांच्या पुरवठ्यामुळे यजमानाची दमछाक उडू शकते. पण मठ्ठा मात्र कधीच कमी पडत नाही. घाऊक पाणी पुरवठ्यावर मठ्ठा मोठ्या दिमाखाने प्रत्येकाच्या वाटीत ओसंडून वहात असतो. … प्या कितीपण! कितीही पोटभर जेवले तरी मठ्ठ्या विना भोजनपूर्तीचे समाधान मिळत नाही. लग्न कार्यात आग्रहाने मठ्ठा वाढतात आणि तृप्ततेची ढेकर ऐकून यजमान खुष होतात.

आयुर्वेदामधे ताकाचे स्थान अनन्य साधारण आहे. पचनाला पोषक आणि पित्तशामक अशा या पेयाला उष्माघात आदी त्रासांपासून सुटका करण्यासाठी रोज पिण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही त्यात चिमूटभर चाट मसाला आणि कणभर मीठ टाका.. आणि मग झकास पैकी पेला संपवून टाका. कशाला हवेत महागडे सॉफ्ट ड्रिंक आणि सरबतं? मला त्या ताकामधे कितीही पाणी घातले तर मुळीच तक्रार नाही पण जर कोणी दूध घालून पिले तर तो ताकाचा धडधडीत अपमान आहे असा माझा आरोप आहे. अहो! ताकालाही भावना असतात… ताकाला ताका सारखे जगू द्या!! असे मला ओरडून सांगावे वाटते.
साधारणत: प्रत्येक पेयपान करण्याची वेळ ठरलेली असते. उगाच कोणी रात्री झोपताना चहा पित नाहीत. ताक मात्र कधीही चालू शकते. जेवणा आधी, जेवणा नंतर, झोपेच्या आधी, अथवा सहजच. तुम्ही कधीही ताक प्या, तुम्हाला प्रसन्नच वाटेल. झोपणार असाल तर झोप छान येईल किंवा काम करणार असाल तजेलदार वाटेल.

taak.jpeg

ताकाला फक्त खाद्य पदार्थातच नव्हे तर मराठी भाषेमधे सुध्दा मानाचे स्थान आहे. मराठी माणसाला ताकाला जाऊन भांडे लपवण्याची सवय नसते. मराठी महिला वर्ग केवळ सुगरणच असतात असं नाही तर अगदी ताकास तूर लागू देत नाहीत. माझ्या समोर कितीही पक्वान्ने आणून ठेवली तरी दूध का दूध आणि ताक का ताक करायला फारसा वेळ लागणार नाही.

तक्रम शक्रस्य दुर्लभम्। इंद्र देवाला ताकाचे दुर्भिक्ष्य का याचे ज्ञान मला नाही. पण गरीबा पासून श्रीमंता पर्यंत सर्वाना परवडेल असे ताक घरो घरी सहज उपलब्ध असते. शिळे झाले, आंबट झाले तर वृक्षवल्ली ना आवडते. एका सर्वेक्षणा नुसार ९९.७९% गृहीणींची त्यांच्या शेजारणी बरोबरची मैत्री ही विरजण मागण्यापासून होते.

ताकाची महती वर्णावी तेवढी कमीच! इतके असूनही कोणी आवडीचा पदार्थ काय असे विचारले तर चटकन ताकाचा उल्लेख करीत नाही. ताक प्रजातीच्या या अपमाना बद्दल मला अत्यंत वाईट वाटते.

पिझ्झा पास्त्याच्या जमान्यात एक दिवस ताक हरवून जाऊ नये एवढीच इश्वर चरणी प्रार्थना!

ता.क.: ताकाचे कौतुक वाचून कोणी नाक फुगवून बसू नये. उगाच विनोदावर विरजण पडायला नको.

https://thetdilse.blogspot.com/2021/06/blog-post.html

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

छान, लिखाण आणि फोटोही. घुसळून लोणी वर आलेय.
ताक तर माझे जगातले सर्वात फेव्हरेट पेय. पाण्यानंतर आयुष्यात तेच जास्त पिलो/प्यालो/प्यायलो आहे. किंबहुना ताक असेल तर मी जेवताना पाणी घेतच नाही. अध्येमध्ये आणि शेवटी ताकच पितो. हे असे करणे दुसर्‍या कुठल्याही पेयाबाबत शक्य नाही.
पावसाळा आणि अतिथंडी सोडून रोज पितो. आमच्याकडे ताक मीच बनवतो. आणि त्याचे सत्ते पे सत्ता स्टाईल वाटप करतो. म्हणजे एक मोठा तांब्या मला तर एकेक ग्लास-वाटी ईतरांना. त्यात सत्ते पे सत्ता मधील सचिन सारखेच पोरगी लाडकी असल्याने तिला थोडे एक्स्ट्रा Happy

ता.क. - एखाद्याचे दारूचे व्यसन वा सॉफ्ट ड्रिंकची सवय सोडवायची आहे तर त्याला रोज दुपारी जेवणात तांब्याभर ताक पाजा.

ताक मलाही अत्यंत प्रिय आहे!
त्यात थोडे सैंधव, थोडे काळे मिठ, जिरेपूड व चिमूट भर साधे मीठ घालून जी काहि अद्वितीय चव तयार होते........... अंतरात्मा अगदी थंड होत जातो घोटागणिक!

धन्यवाद _/\_
आंबट गोड ना आमचे ताक गोड वाटले यातच समाधान.
बोकोबाना दूधा बरोबर ताकही आवडले.
Happy

ताक आवडतेच लिखाणही आवडले. +१

एखाद्याचे दारूचे व्यसन वा सॉफ्ट ड्रिंकची सवय सोडवायची आहे तर त्याला रोज दुपारी जेवणात तांब्याभर ताक पाजा. >>
ऋन्मेषशेठ,
ज्यांचा 'प्रोग्रॅम' ऑलरेडी ठरलेलाच आहे, ते त्याआधी तांब्याभर ताक गपगुमान पितील ही शक्यता फारच धूसर वाटते... Happy
- (दारूची तहान ताकावर भागवण्याच्या प्रयत्नांत वारंवार अपयशी ठरलेला) पाचपाटील

एखाद्याचे दारूचे व्यसन वा सॉफ्ट ड्रिंकची सवय सोडवायची आहे तर त्याला रोज दुपारी जेवणात तांब्याभर ताक पाजा.
Submitted by ऋन्मेऽऽष on 24 June, 2021 - 11:40

दारूचे व्यसन करणारा 'सर्वसामान्य' ताक न पिता 'अण्णा नायकाचे ताक' पिईल!!!

स्टॉने ताक पिणे / चमच्याने लस्सी खाणे / हाताने मसाला डोसा खाणे
हे तिन्ही फाऊल आहेत
आमच्याकडे कोणी असे केले तर त्याला काटेचमचे देऊन कोंबडीवडे खायची शिक्षा देतात आणि सोलकढी बशीतून प्यायला लावतात.

एका संस्कृत-किम्चित कवीने अनेक वर्षापूर्वी ताकावर एक समस्यापूर्ती पद्धतीचा श्लोक लिहिला आहे. तो असा: भोजनांते च किं पेयं जयंत: कस्य वै सुत: I कथं विष्णुपदं प्रोक्तम तक्रम शक्रस्य दुर्लभम II ताक हे देवराज इंद्राला देखील दूर्लभ आहे ही ताकाची महती आहे. (चुभुद्याघ्या)

अख्ख्या भारतात ताक आवडत नाही असा माणूस सापडणे कठिण! आणि त्यात मराठी माणसाला तर ते आवडतेच आवडते.
>> मी Happy मला दही, ताक, लोणी अजिबात आवडत नाही.. उलटी येते...

बाकी लेख छान लिहिला आहे...

_/\_