(हा चित्रपट पहिल्यांदा टीव्हीवर बघितला, तेव्हा वाक्यावाक्यांना धक्के बसले तरी विषय चांगला वाटला आणि प्रमुख कलाकारांचा अभिनय चांगला वाटला त्यामुळे शेवटपर्यंत बघितला. गेल्या आठवड्यात परत लागणार होता, तेव्हा फारएण्ड, मी_अनु, श्रद्धा, पायस वगैरे मायबोलीवरच्या महारथींचं स्मरण करून खास वेगळ्या प्रकारचं मनोरंजन करून घेण्यासाठी परत बघितला. त्यातून झालेली ही फलनिष्पत्ती!)
पाचगणीत राहणार्या दोन मैत्रिणी, शादीशुदा कावेरी (सई ताम्हणकर) आणि बॅचलर पूजा (प्रिया बापट) एका क्लबमधे डान्स करायला जातात, त्या टेबलावर चढून नाचताना टेबल मोडतं आणि त्या खाली पडतात. याचा कुणीतरी व्हिडिओ बनवून यूट्यूबवर टाकतं. तो व्हिडिओ बघून ’आपण जाड आहोत’ असं त्या दोघींना वाटायला लागतं ( म्हणजे आधीपासून वाटत असतंच, पण आता तीव्रतेने वाटतं) आणि त्या बारीक व्हायच्या मागे लागतात अशी या पिक्चरची थोडक्यात स्टोरी. शेवट गोड (खाण्यात) होतो.
कावेरी ’पुण्यात मोकळ्या वातावरणात’ वाढलेली, पण आता लग्न करून पाचगणीत स्ट्रॉबेरीच्या शेतीचा व्यवसाय असणार्या जुन्या वळणाच्या, गडगंज श्रीमंत असलेल्या, मोठ्ठ्या बंगल्यात राहणार्या जाधव कुटुंबाची सून बनलेली. या घरात सगळ्या बायकांनी साडीच नेसली पाहिजे असा नियम आहे. बाहेर जायला पुरुषमाणसांसाठी घोड्यांची व्यवस्था आहे. कदाचित स्ट्रॉबेरीच्या शेतातून फिरताना त्यांना स्ट्रॉबेरी खाव्याशा वाटत असतील आणि त्यांनीच बर्याचशा स्ट्रॉबेरी खाऊन टाकल्यामुळे उत्पन्न कमी होत असेल. घोड्यावरून फिरलं की वाकून स्ट्रॉबेरी काढणं अवघड. शिवाय घोड्यांना स्ट्रॉबेरी आवडत नसणार, त्यामुळे स्ट्रॉबेरीच्या शेतातून घोड्यावरून फिरणं सेफ असेल. मग घरातून शेतापर्यंत कारने जा, तिथे घोड्यावर बसा, असं करण्यापेक्षा ते सगळीकडे घोड्यावरूनच फिरतात. शिवाय इको-फ्रेंडली. साडी आणि डोक्यावरचा पदर सावरत घोड्यावर बसणं बायामाणसांना तसं कठीणच, त्यामुळे बायकांसाठी सायकल ठेवलेली आहे. एकंदरीत इको-फ्रेंडली वाहनं वापरण्याकडे जाधवांचा कल आहे असं दिसतं. कावेरीला लग्नाआधी साडीही नेसण्याची सवय नसली तरी आता साडी नेसून सायकल चालवण्याची मात्र चांगलीच सवय झालेली आहे. तर,अशा या घरात जिलेबी, श्रीखंड, समोसे, कचोर्या असे पदार्थ सर्रास केले जातात. शिवाय रोज दुपारचं जेवण झालं की घरातली सगळी माणसं पडदेबिडदे बंद करून, पांघरुणं घेऊन दोन तास झोपतात. नोकरचाकरही झोपत असावेत. घरात पाच-सहा वर्षांची दोन मुलं आहेत, तीही दुपारी दोन तास झोपतात. (अशी शहाणी मुलं आजकाल फारशी दिसत नाहीत.)
तो जो नाचताना पडण्याचा यूट्यूबवरचा व्हिडिओ आहे ना, तो पाचगणीतल्या भाजीवाल्यानेही पाहिलेला आहे, पण कावेरीच्या घरच्यांपर्यंत तो पोचत नाही. कारण कावेरीच्या दिराने काही कारणाने घरातलं वाय-फाय बंद केलेलं आहे. किती सोप्पं. फोर जी डेटा खर्च करून ते व्हिडिओ वगैरे बघत नसावेत. स्ट्रॉबेरीची शेतं, साग्रसंगीत चहा-जेवण-दुपारची झोप यात त्यांना एवढा वेळही मिळत नसणार म्हणा. त्यांचे सगळे मित्र आणि नातेवाईकही जुन्या वळणाचे आणि सालस असल्यामुळे सुनेचा व्हिडिओ त्यांना पाठवून चोंबडेपणा करत नाहीत.
कावेरी ’पुण्यात मोकळ्या वातावरणात’ वाढलेली असल्यामुळे ती लग्नाआधी डान्स करायची. डान्सचा प्रमुख फायदा म्हणजे वजन कंट्रोलमध्ये ठेवणं. लग्नानंतर या जुन्या वळणाच्या घरात आल्यामुळे तिचा डान्स बंद झाला आणि वजन वाढून सत्तर किलो झालं. आता ’सत्तर किलो’ हे ’सत्तर रुपये’ च्या चालीवर परत परत म्हटलं असतं तर हे वजन जास्त वाटलंही असतं कदाचित. सई ताम्हणकरच्या उंचीसाठी सत्तर किलो वजन आपल्याला अजिबातच प्रचंड जास्त वाटत नसलं तरी ते खूप जास्त आहे असं आपल्याला परत परत सांगितलं जातं. त्यामुळे तिला म्हणे आई होता येत नाहीये. आता या व्हिडिओ प्रकारामुळे ती (सुरुवातीला सगळे जसं करतात तसं) वेड्यासारखं डाएटिंग करायला लागते. म्हणजे एकतर काहीच खात नाही आणि मग एकदम समोसे वगैरे. जुन्या वळणाच्या प्रेमळ सासूबाईंना नातवंड बघायची फारच घाई आहे. त्यामुळे तिला एकदा चक्कर काय येते, सासूबाई लगेच ’गोड बातमी आहे’ असा निष्कर्ष काढून मिठाई मागवून मोकळ्या होतात. त्यांनी बहुतेक लहानपणी ’ मुबारक हो, ये मां बननेवाली है’ वाले भरपूर हिंदी चित्रपट पाहिलेले असावेत (आणि नंतरचे हिंदी चित्रपट अजिबातच पाहिलेले नसावेत, कारण मधल्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीत बरीच प्रगती होऊनही ती त्यांच्यापर्यंत पोचलेली नाही.) मिठाई मागवण्यापूर्वी कावेरीला एकही बेसिक प्रश्न विचारावासा त्यांना वाटत नाही. मग रीतसर डॉक्टरला बोलावलं जातं. डॉक्टर हुशार असल्यामुळे ’गोड बातमी नाही’ हे ते लगेच सांगून टाकतात. कावेरीचा तो जग (मायनस जाधव घराणं )प्रसिद्ध व्हिडिओ त्यांनीही बघितलेला आहे. मग ते तिला ’वजन योग्य प्रकारे कमी कसे करावे’ हे शिकवण्यासाठी आपल्या क्लिनिकमध्ये बोलावतात. डॉक्टर फावल्या वेळात कोचिंग क्लास चालवण्याचा आणि पिझ्झा विकण्याचा साईड बिझनेस करत असावेत. क्लिनिकमध्ये बसून पिझ्झा खात खात ते ’वजन कमी कसे करावे’ हे व्हाईटबोर्डवर मार्करने पॉइंट्स वगैरे लिहून शिकवतात. त्याबरहुकूम कावेरी घरच्यांपासून लपूनछपून जिम जॉईन करते. तिने यापूर्वी आयुष्यात कधीही जिम लावलेली नसूनसुद्धा जिमसाठी लागणारे अंतर्बाह्य कपडे, शूज वगैरे तिच्याकडे तयारच असतात. मग दुपारी घरातली जनता पांघरुणं घेऊन झोपल्यावर कावेरी सायकलवरून जिममध्ये जाते, तिथे जाऊन कपडे बदलते, व्यायाम करते, परत साडी नेसते (हातातल्या बांगड्यांपासून ते पायातल्या जोडव्यांपर्यंतच्या दागिन्यांचीही प्रत्येक वेळी काढघाल करते!) आणि सायकलवर बसून घरची जनता उठायच्या आत घरीही येते. हे सगळं बघून मी म्हटलं, " त्यापेक्षा ती साडीतच सरळ तासभर सायकल का चालवत नाही? त्यानेही वजन कमी होईलच की!" कपडे बदलण्याचा कंटाळा असला की असे उपाय सुचतात! पण कावेरी कंटाळत नाही आणि जिम चालू ठेवते.
दोन मित्रांची गोष्ट असली की त्यातला एक आळशी आणि दुसरा कष्टाळू किंवा एक लबाड आणि दुसरा प्रामाणिक वगैरे असतो, तशी या गोष्टीतसुद्धा कावेरी सेन्सिबली व्यायाम वगैरे करत असल्यामुळे पूजा वजन कमी करण्यासाठी अघोरी आणि आक्रस्ताळे उपाय करणार हे ओघाने आलंच. पूजा (प्रिया बापट) कंप्युटर इंजिनिअर होऊन आता उच्च शिक्षणासाठी कुठल्यातरी अमेरिकन युनिव्हर्सिटीच्या फेलोशिपची (असिस्टंटशिप वगैरे नाही बरं का) वाट पहात असते. याचा अर्थ ती बुद्धिमान असावी. पण आपला व्हिडिओ कुणीतरी यूट्यूबवर अपलोड केलाय ही तक्रार सायबर सेलला केली पाहिजे हे मात्र तिला कळत नाही. उलट पोलिसाने इमानदारीत तसं सांगितल्यावर ती रागाने पोलिस स्टेशनमधल्या टेबलावर चढून नाचते !
आलोक (सिद्धार्थ चांदेकर) पूजाच्या प्रेमात पडण्याच्या आणि तिला आपल्या प्रेमात पाडण्याच्या जय्यत तयारीनेच आलेला आहे. माऊथ ऑर्गन वाजवत तो तिला कॉफी प्यायला येण्यासाठी विचारतो, त्याचा बिघडलेला (आणि दुरुस्त होण्याची शक्यता नसणारा) कंप्युटर दुरुस्त करायला तिला बोलवतो. त्याला ट्रेकिंग, इतिहास आणि सुदृढ फिगर असणार्या नट्या आवडतात अशी मौलिक माहिती आपल्याला मिळते. बाकी त्याचं शिक्षण, करिअरचे प्लॅन्स वगैरे बिनमहत्वाच्या गोष्टींवर बोलण्यात पूजा आणि आलोक वेळ वाया घालवत नाहीत.
पुढे मग ’सहा महिन्यात वीस किलो वजन कमी करा’ टाईपच्या स्लिमिंग सेंटरच्या जाळ्यात पूजा अडकते, त्यांच्या औषधं-गोळ्या घ्यायला लागते, अमेरिकेतली ती फेलोशिप तिला मिळाली, तरी आपला तो व्हिडिओ आलोकनेच यूट्यूबवर टाकला होता हे कळल्यावर ती अधिकच दु:खी होते आणि त्याच भरात ती लिपोसक्शन सर्जरी करून घ्यायला जाते. हॉस्पिटलमध्ये तिने डेबिट कार्डने पैसे भरल्यावर तिच्या आईच्या फोनवर एसेमेस ॲलर्ट येतो. मग आई आणि आलोक घाईघाईने पुण्याला हॉस्पिटलमध्ये पोचतात. आई तिला शोधायला गेल्यावर आलोक कॅंटीनला जातो तर तिथे एक वडापाव खाता खाता अजून एक वडापाव, बर्गर, मिल्कशेक आणि कोल्ड कॉफी अशी ऑर्डर देणारी पूजा त्याला दिसते. दोन मित्रांमधला आळशी, लबाड किंवा ढ मित्र जसा शेवटी सुधारतो, तशी पूजालाही आपली (स्लिमिंग सेंटरवाली) चूक समजलेली असते ( आणि ही भलीमोठी ऑर्डर देऊन ती त्या चुकीचं परिमार्जन करते !) पण अजूनही आलोकला तिने माफ केलेलं नसतंच. मग आता आलोक काय करणार म्हणता? सोप्पं आहे. तो तिथल्या टेबलावर चढून नाचत नाचत तिला सॉरी म्हणतो! आता पुण्यातल्या एका पंचतारांकित हॉस्पिटलच्या कॅफेमध्ये जर एखादा तरुण मुलगा अचानक टेबलावर चढून नाचायला लागला तर तिथे असलेल्या डॉक्टर्स आणि नर्सेसच्या काय प्रतिक्रिया येतील? अगदी सभ्यात सभ्य म्हणजे " ओ खाली उतरा!" पण नाही. ते सगळे कौतुकाने आपापले फोन काढून त्याचा व्हिडिओ शूट करतात. नंतर यूट्यूबवरही टाकला असेलच. पूजाही त्याला माफ करून टाकते. कित्ती छान ना!
हा सगळा फ्लॅशबॅक आहे. आता याला तीन वर्षं होऊन गेलेली आहेत. कावेरीला बाळ झालेलं आहे. पूजा आणि आलोकचं लग्न झालेलं आहे. एकंदरीत सगळा आनंदीआनंद आहे. एका पंच किंवा सप्ततारांकित हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये बसून साधारणपणे पाचजणांना पुरेल एवढा ब्रेकफास्ट दोघींमध्ये खात खात पूजा आणि कावेरी सक्सेसफुल वेट लॉस स्टोरी एका होतकरू, फॉरिन रिटर्न्ड दिग्दर्शकाला सांगत असतात.
पण म्हणजे आपण नक्की काय समजायचं? एकदा आपलं वजन कमी झालं की मग वाट्टेल ते वाट्टेल तेवढं खाल्लं तरी चालतं? अशी जादूची कांडी पाचगणीच्या पिझ्झा खाणार्या डॉक्टरांकडे मिळते का? की साडी नेसून सायकल चालवली तरच मिळते?
मजेदार आहे !
मजेदार आहे !
अबब
अबब
डेंजर लिहिलंय.
आणि इतके व्याप?साडी नेसून?त्यापेक्षा घरीच युट्युब लावून झुंबा केला असता नाच आवडतो तर.
धन्यवाद कुमार१ आणि अनु!
धन्यवाद कुमार१ आणि अनु!
@अनु घरचं वायफाय बंद आहे ना!!
छान लिहिलंय गमतीशीर. पण
छान लिहिलंय गमतीशीर. पण वायफाय कसंकाय बंद आहे? ती नंतर नवऱ्याला पण व्हिडिओ दाखवते ना.
आणि एवढे दिवसभरचे खाणे आणि पूजाच्या पण हाॅटेलमधल्या ऑर्डर्स पाहून या बाया बारीक होतील असं वाटतच नाही पण तरी होतात आणि कशाकाय होतात तेच दाखवलेलं नाही शेवटी
भन्नाट लिहिलं आहेस!
भन्नाट लिहिलं आहेस!
मस्त. मजेदार लिहीले आहे
मस्त. मजेदार लिहीले आहे
घोड्यांचा वापर हा प्रकार बघायलाच हवा. "त्यापेक्षा एक तास सायकलच का चालवत नाही" हे परफेक्ट आहे
बाकी शेकडो लोकांची वजने चढत किंवा उतरत असतात, एखाद्या दिग्दर्शकाला त्यात काय एवढा इण्टरेस्ट, त्या शेवटच्या सीन मधे?
भाग्यश्री, देवकीताई, फारएण्ड,
भाग्यश्री, देवकीताई, फारएण्ड, धन्यवाद
घोड्यांचा वापर बघण्यासारखाच आहे! म्हणजे कावेरी आणि तिचा नवरा बाहेर फिरायला जातात तेव्हा ती चालत आणि तो घोड्यावर!
तो दिग्दर्शक लहानपणी पूजाच्या शाळेत असतो आणि तिला चिडवण्यात आघाडीवर असतो! आता अशा मुलाला एखादी मुलगी सहजासहजी विसरेल का? पण नाही..पूजाला त्याचा चेहरा, नाव यावरून काहीही आठवत नाही.
मस्त लिहिलेय, हे बघून अ
मस्त लिहिलेय, हे बघून अॅक्चुअली हा पिक्चर बघावासा वाटतोय


तो लास्टला टेबलवर चढून नाचणारा आलोक जर सिद्धार्थ चांदेकर असेल तर तो सीन रणबीर कपूर स्टाईल ईमॅजिन करू शकतो आणि तो देखील बघायला आवडेल
बाकी आपली सई आहे आणि सोबत आपल्याच बिल्डींगमधली सर्वात गोड पोरगी वाटावी अशी प्रिया बापट आहे तर बोअर होणार नाही याची खात्री आहे
मजेशीर लिहिलंय. बघितलाय
मजेशीर लिहिलंय. बघितलाय त्यामुळं सीन पण आठवले.
मी दोन वेळा पाहिलाय,,
मी दोन वेळा पाहिलाय,,
सई सायकलवरून जिमला जाते तेव्हा मलाही असंच वाटलेले जिमला जाण्यापेक्षा सायकलच चालवली तरी चालेल..
मस्त लिहिलं आहे...
मस्त लिहिलं आहे...
हाहाहा! जमलंय! सिनेमा
हाहाहा! जमलंय! सिनेमा पाहिलेला नाहीये मी पण इतके लॉजिकल फ्लॉज (घरंचं वायफाय बंद वगैरे) असतील तर मला आवडेल असं वाटत नाही.
मस्त लिहले आहे. मी पण एकदा च
मस्त लिहले आहे. मी पण एकदा च पाहिला आहे हा सिनेमा .
कुठे पाहता येईल?
कुठे पाहता येईल?
मस्त लिहिले आहे.
मस्त लिहिले आहे.
छान लिहिलं आहे
छान लिहिलं आहे
धन्यवाद सर्वांना!
धन्यवाद सर्वांना!
पाचगणीतली ती म्हणे एकमेव जिम आहे. मग तिथे जाधवांच्या ओळखीचं कुणीच तिला कधीच भेटत नाही? की जाधवांच्या ओळखीची सगळीच माणसं त्या वेळात पांघरूण घेऊन झोपतात? आणि कावेरीला तो डान्स पार्टीवाला क्लब माहिती आहे, पण फॅमिली डॉक्टरचं क्लिनिक कुठे आहे ते माहिती नाही? त्यासाठी डॉक्टरना तिला कार्ड द्यायला लागतं?
@भाग्यश्री, बरोबर, ती नंतर नवऱ्याला व्हिडिओ दाखवते. तेव्हा कदाचित वायफाय परत सुरू केलं असेल!
@रेव्यु, झी फाईव्हवर आहे बहुतेक. झी टॉकीजवर लागतो अधूनमधून असं दिसतंय.
जिज्ञासा, लॉजिकबिजिक शोधण्याच्या पलीकडचा चित्रपट आहे!
मलाही असे सिनेमे बघायला आवडत नाहीत, पण वर लिहिलंय तसं 'वेगळ्या प्रकारचं' मनोरंजन करून घेण्यासाठी बघितला!
भन्नाट लिहिलं आहे वावे.
भन्नाट लिहिलं आहे वावे. मराठीत ठराविक कंपुगिरिचे सिनेमे असेच टुकार कॅटेगरीतले असतात त्यामुळे आता त्या सो कॉलड हिरवीणी एखाद्या टिव्ही चॅनेलवर पर डे बेसिस वर दात काढत बसलेल्या दिसतात.
हास्यजत्रा बद्दल बोलताय का
हास्यजत्रा बद्दल बोलताय का तुम्ही
सई बारीक झालीये मात्र सुई सारखी. त्या डॉक्टरच्या सल्ल्याने का काय माहिती नाही पण त्या डॉक्टरची खऱ्या आयुष्यातली बायको (श्रुती मराठे) पण बारीक झालीये.
कंपूगिरी वगैरेबद्दल कल्पना
कंपूगिरी वगैरेबद्दल कल्पना नाही Dj. कलाकारांबद्दल बोलायचं ना, तर खरं म्हणजे अभिनय चांगला केलाय या तिघांनी. प्रिया बापटला जाड दाखवण्याच्या प्रयत्नात ती काही वेळा बालिश दिसली आहे मात्र. सई ताम्हणकरने छान केलंय काम. पण मुळात कथा, संवाद आणि प्रसंग अतार्किक असल्यामुळे काही उपयोग होत नाही.
प्रेक्षकांना काहिही दाखवलं
प्रेक्षकांना काहिही दाखवलं तरी ते बघतात असा ग्रह झालाय काही निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांचा... त्यांच्या कंपूबद्दल म्हणायचं होतं मला वावे. ही कंपूगिरी अगदी भरत जाधव, मकरंद अनासपुरे, गेल्या १० वर्षांतले अशोक सराफ, प्रसाद ओक, सई ताम्हणकर, सुभाष माय-लेकी, सोनाली कुलकर्णी (ज्यु.), चेहर्याचा माठ झाला तरी चॉकलेट हिरो बनण्याचा प्रयत्न करणारा जोशी, माय गॉड सिद्धार्थ जाधव अन सिद्धार्थ चांदेकर.... यांना सिनेमाच्या पोस्टरवर बघितलं तरी यांच्या मराठी सिनेमाला चुकूनही जावसं वाटत नाही. बाकी सोनेरी वेष्टणाखाली खवट अन कुबट चॉकलेटं खाऊ घालणारे मृणाल कुल्कर्णी सारख्यांच्या चित्रपटांना दुरुनच साष्टांग नमस्कार घालावासा वाटतो.
असो... आता कोरोना मुळे कुठे चित्रपट बघायला जातो आपण.
शक्य आहे Dj. झालं आहे
शक्य आहे Dj.
झालं आहे माझंही असं. (ओळखीचे चांगले चेहरे बघून सिनेमा बघायला जावं आणि अपेक्षाभंग व्हावा!) खरं तर अभिनेते चांगले असतात. दिग्दर्शक, संवादलेखक वगैरे मंडळी तेवढं ताकदीचं काम करत नाहीत.
'न्यूड' हा चित्रपट बघून असंच झालं होतं. खरं तर विषय चांगला. प्रमुख अभिनेत्रींनी अतिशय उत्कृष्ट कामं केली आहेत. पण सिनेमा संपल्यावर त्याचा काही परिणामच घडत नाही. हाताला फारसं काही लागलंच नाही!
मला हल्ली मराठी पिक्चर फारसे
मला हल्ली मराठी पिक्चर फारसे क्लिक होत नाहीयेत (अर्थात अगदी ८ वगैरे रेटिंग असलेले हिंदी पण).
सध्याच्या पिक्चर्स मध्ये आवडलेला, निखळ आणि साधी गोष्ट असलेला म्हणजे प्रसाद ओक चा पिकासो.
त्यातला राणी बनलेला दशावतारी एकदम टॅलेंट वाला माणूस आहे.
प्रत्येकाने एकदा नक्की बघा.
सही पिक्चर आहे पिकासो..
सही पिक्चर आहे पिकासो.. शब्दबंबाळ, भावनाबंबाळ नाहीये. अगदी गौरी देशपांडेंच्या शब्दात सांगायचं तर "आहे हे असं आहे".
कारण कावेरीच्या दिराने काही
कारण कावेरीच्या दिराने काही कारणाने घरातलं वाय-फाय बंद केलेलं आहे.
या लोकांच्या फोनमधे असणार्या सिमकार्ड मधुन यांना नेट मिळत नाही की काम नी झोपायचं म्हणुन ते पण घेत नाहीत ????
(No subject)
मस्त लिहिले आहे. सिनेमा
मस्त लिहिले आहे. सिनेमा "काहीही" होता
ह्या चित्रपटाचा दिग्दर्शक
ह्या चित्रपटाचा दिग्दर्शक सचिन कुंडलकर चा 'गंध 'सिनेमा फक्त आवडला.
त्याची कथा वेगळी असते पण दिग्दर्शक म्हणून नाही इतकी जमत. काहितरी कमी वाटत रहाते.
त्याच्या चित्रपटात नेहमी नावाजलेले स्टार कलाकार असतात. पण तितकासा कुठलाच चित्रपट मनात घर करत नाही.
सियोना, गंधची फक्त शेवटची कथा
सियोना, गंधची फक्त शेवटची कथा मला आवडली होती! पहिल्या दोन कथा खूप कंटाळवाण्या झाल्या. मी अक्षरशः फॉरवर्ड करत बघितल्या. शेवटची मात्र खरंच छान आहे. पण त्या कथेत 'गंध' ही थीम तशी ओढूनताणून आणलेली आहे.
'गुलाबजाम' आवडला मात्र.
राजवाडे अँड सन्स पण 'काहीही' कॅटेगरीतच!
छान लिहिलंय. तुम्ही इतके छान
छान लिहिलंय. तुम्ही इतके छान तपशील मांडलेत कि चित्रपट कसा असेल हि कल्पना आलीच वाचून. आणि शोधून zee5 वर पाहिला लगेच. म्हणजे म्हणजे सुरवातीला पाच दहा मिनिटे सलग आणि तिथून पुढे टिक टिक करून फास्ट फोरवर्ड करत करत फक्त ग्लिम्प्सेस पाहिल्या. धागा वाचून जशी कल्पना केली होती तसाच आहे काहीसा. फक्त सिनेमेटोग्राफी इतकी चकचकीत छान अपेक्षित केली नव्हती. ती मात्र आवडली. पाचगणी म्हंटल्यावर सिनेमात नेहमी इंग्लडला तोडीस तोड इन्फ्रास्ट्रक्चर दाखवतात. हा सिनेमा म्हणजे अशा छान चकचकीत वेस्टनात गुंडाळून आत अगदीच सामान्य प्रोडक्ट असावे असे काहीसे. म्हणजे या विषयावर दीड पावणेदोन तास खर्च करून सिनेमा बघायची निदान माझी तरी मानसिकता नाही. शिवाय दिग्दर्शकाचा गृहपाठ काही प्रसंगातून लगेच दिसून येतो. वास्तवापासून का फारकत घेतात हेच कळत नाही.
१. भाजीवाल्याने व्हिडीओ बघितलेला असतो. तो खुलेआम मोठ्या आवाजात तिला विचारतो "म्याडम, तुम्ही त्या व्हिडीओवाल्या ना?" खरोखर जेंव्हा अशी सिच्युएशन असते तेंव्हा भाजीवाला नक्की हे कसे जाणवून देईल? ओरडून विचारेल कि अजून वास्तववादी व परिणामकारक दाखवता आले असते?
२. कुटुंबातले सगळेजण एकत्र नाश्त्याला बसलेत आणि सासू सासरे सुनेला बाळ कधी देणार विचारतात आणि ती सुद्धा सगळ्यांसमोर खुलेआम स्पष्टीकरण सांगते "डॉक्टर म्हणाले ह्यांच्यात समस्या नाही, माझ्यातच....". सिरीयसली? असे घडत असते कोणत्या कुटुंबात?
बस्स त्यानंतर क्लोज करून इथे प्रतिसाद लिहायला घेतला
चकचकीत सिनेमेटोग्राफी हि एकच जमेची बाजू दिसते. आणि ती काय आजकाल तंत्रज्ञानच इतके पुढे गेलेय कि बहुतेक चित्रपटांत असतेच.
Pages