सुमो चौथ्यांदा बंद पडल्यावर कल्पेशने स्टियरींगवर बुक्की मारुन कानातुन आरपार जाईल अशी शिवी हासडली. आणि मागे वळत बाकी कंपुला आवाज दिला
" चला बे, बाहेर निघा परत गाडी बंद पडली. साSSला, पनवतीच लागलीय मागे." .
" कल्प्या, तरी सांगत होतो हा डब्बा नको म्हणुन! " तक्रारीच्या सुरात माणिक म्हणाला. माणिक म्हणजे कंपुचा तोफ़खाना फ़रक फ़क्त इतकाच की हा कंपुवरच भडीमार करायचा.
" माणक्या, क्वालिस घेत होतो तर महाग पडेल म्हणालास. तेंव्हा तुला जोर आला होता नाही का?" अनिकेतने आपल्या तर्हेने राग काढला.
" नायतर काय? तरी बरं पैसे काय आपल्या बापाचे नव्हते." प्रशांत स्पष्टीकरण देत म्हणाला.
" पश्या, असंच नाय हां यात आपल्यापण बापाचे थोडे थोडे पैसे आहेत यार" उदयचा नेहमीचा मिष्कील सिरीयसनेस.
पाचही जण गाडीतुन उतरून आपापल्या तर्हेने सुमोवर आणि एकमेकांवर टीका करायला सुरुवात केली.
कल्पेश, अनिकेत, माणिक, प्रशांत आणि उदय अश्या पाच जणांच हे टोळकं आणि पाचही जणांच्या नावाची अद्या़क्षरे एकत्र करुन बनलेला त्यांचा ‘कंपु’. एका गणेशोत्सव मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते, आणि सगळेच गणेशोत्सव समितीचे सभासद त्यात माणिक तर खजिनदार, गणेशोत्सव आटोपल्यावर उरलेल्या किंवा उरवलेल्या वर्गणितुन कुठेतरी उनाडून यायचा हा त्यांचा नित्यक्रम.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही एखाद्या हिलस्टेशनला जाण्याऐवजी खास माणिकच्या अग्रहावरुन त्याच्या कोकणातल्या गावी श्रमपरीहार करायला निघाले होते. मग? किती दगदग होते गणेशोत्सवात. थोडा श्रमपरीहार नको? दरवर्षीसारखीच गाडी भाड्याने घेतली होतीच. अनिकेत ज्या गाड्या भाड्याने देण्याया कंपनीत काम करत होता तिथुन विना ड्रायव्हर आत्तापर्यंत घेत होते तशी. आजही गाडी घेउन कंपु निघाला होता. पहीली वादावादी गाडीच्या मेक वरून झाली, अनिकेत म्हणत होता क्वालिस नेउ पण क्वालिस पर किलोमिटरच्या भावाने महाग पडत होती आगदी विना ड्रायव्हरही. म्हणुन सुमो घेतली आणि तिच आता सारखी दगा देत होती. बरं पाचही जणांचं गाडीच्या इंजीनबद्दलचं नॉलेज एकसमान म्हणाजे हा पार्ट चालु असल्याशिवाय गाडी चालत नाही इतपतच. हो, आगदी अनिकेत त्या कंपनीत काम करत असला तरी, कारण तो तिथे रिसेप्शनला होता ना ! कळत इतकेच होते की गाडी अचानक बंद पडते आणि थोडावेळ थांबल्यावर पुन्हा चालु होते ती ही धक्का मारल्यावर. बरं, गाडी कुठेही न आदळता चालवु शकणारा एकमेव कल्पेश त्यामुळे धक्का मारण्याचा उपद्व्याप बाकी चौघांना करावा लागत होता. मग चौघांचे शिव्याशाप एकट्या कल्प्याला बसत होते, अर्थात गाडीला देउन झाल्यावर.
कल्प्या म्हणजे एक आसामीच, पावणेपाच फ़ुट उंची आणि हाडांवर मांसविरहीत त्वचा इतकेच भांडवल आणि जेमतेम अठ्ठेचाळीस किलो वजन असलेला हा बहाद्दर. मात्र गाडी चालवणे बहूतेक मायकेल शुमेकरच्या हाताखाली शिकल्याप्रमाणे भन्नाट.
" निट ल़क्ष ठेवा रे याच्याकडे याचे पाय पुरत नसतील म्हणुन हा उभा रहात असेल अक्सीलेटरवर " अनीचा म्हणजे अनीकेतचा हा नेहमीचा संशय.
पण या इवल्याश्या मुर्तीने आजपर्यंत तरी गाडीला कींवा कुणालाच खरचटून सुध्दा दिले नव्हते. पण आज एकंदरीत स्वारी चांगलीच वैतागली होती.
" ए माणक्या लेका तुझ्या गावाला निघालो आणि पनवती लागलीय. आता मला वाटतय की तु साला कुठल्यातरी रानटी जमातीतला प्राणी असावास, कुठच्या कोनाड्यात गाव ठेवलाय रे तुझा? वाटेत एक पण गॅरेज नाही ?हाय वे असुन!"
यावर माणिक काही बोलणार इतक्यात "गाडी चालु करू !" असे म्हणत उदयने त्याला गप्प केले. हा एकटाच असा जीव ज्याच्या नावाचा अपभ्रंश झाला नव्हता अजुनही. मग पुन्हा एकदा ‘जोर लगा के हैशा’ करत एकदाची गाडी चालु झाली आणि कंपु मार्गस्थ झाला.
नशिब काही इतके वाईट नव्हते त्यांचे किंवा गाडीने तरी देवाचा धावा केला असावा. वाटेत एक गॅरेज लागले एकदाचे, नुसतेच गॅरेज सापडले नाही तर मॅकेनिकने गाडीही आर्ध्यातासात ठणठणीत करुन दिली. पुन्हा भन्नाट वेगाने माणक्याचा गाव जवळ यायला लागले. आणि गाडीत शांतता पसरत गेली.
एकदाचा माणक्याच्या गावात गाडीने प्रवेश केला. रस्ता कच्चाच पण आजुबाजुच्या कमानीसारख्या वाकुन धरलेल्या छपरासारख्या दाट झाडांनी रत्याकडे ल़क्ष जातच नव्हते. गाव जवळ येताच कल्प्याने वेगाचं समिकरण बदललं, आता गाव म्हंटल की पोरंटोरं गाडीच्या मागे धावणार असं साधं सरळ गणित त्याचं पण साफ़ खोटं ठरलं. ना कुणी पोरं गाडीमागे धावली, की ना कुणी गाडीकडे पहायला रस्त्यावर होतं. याचा अर्थ साधा सरळ असाच त्यांनी घेतला गावात आणखीही गाड्या असाव्यात. वाटेतल्या एका भल्यामोठ्या दाट झाडीला वळसा घातल्यावर एकदाचं माणक्याच्या काकाच्या घरासमोर गाडी थांबली.
अगSSगंSगंSगंSगं घर कसलं भलामोठा वाडाच तो. जुना असल्यामुळे आणि कदाचित दुर्ल़क्ष झाल्यामुळेही असेल पण थोडा आजुबाजुने जरा विटलेला,थोडाफार टवके उडालेल्या भींती, त्यामुळे असेल कदाचीत पण प्रथमदर्शनी जरा भयप्रदच दर्शन होते त्याचे ते.
" माणक्या तुझे काका आहेत ना वाड्यात? नाही हा भूतबंगला दिसतोय म्हणुन विचारले." माणक्याची खेचण्याचा मोह न आवरल्यामुळे उदय म्हणाला.
" काकाही आहेत आणि बाकी मंडळीही आहेत वाड्यावर आता आत चलायचं का?" जराश्या रागातच माणिक म्हणाला.
आपापल्या स.च्क सावरत कंपु वाड्याकडे निघाला. मुख्य दरवाजाच्या उंच उंभरठ्यातुन आत पाउल टाकताच वाड्याचा भव्यपणा जाणवत होता. भलाथोरला दिवाणखाना, समोरच दोन्हीबाजुने वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असलेले दोन भव्य जिने. कुठल्यातरी फ़िल्मच्या सेटवर आल्यासारखे वाटत होते. फ़रक फ़क्त इतकाच की तिथे दिव्यांचा चकचकाट असतो इथे अंधुक उजेडावर भागवुन घेतले होते. तरी नशीब गावात विज तरी होती.
" ये ये पप्या आलास? कीती उशीर लागला रे! पार तिन्ही सांजा होऊन गेल्या बघ" डाव्या हाताला असलेल्या एका दरवाजातुन भल्यामोठ्या मिशा असलेला आणि भल्याथोरल्या शरीराचा माणुस भारदस्त आवाजात म्हणाला. एक सेकंद माणिक सोडून सगळेच दचकले पण माणिकने " काका" अशी हाक मारताच बाकीच्यानी निश्वास टाकला. पण एकंदरीत त्यांचे प्रथम दर्शन कुणालाही घाबरवण्यासारखेच होते भल्या थोरल्या मिशा, गालापर्यंत आलेले कल्ले, आणि मुख्य म्हणजे दाट भुवया आणि त्याही एकमेकांना जुळलेल्या, वर त्यांचा रापलेला काळा रंग. ते ही अश्या अंधुक उजेडात चटकन समोर आले तर कुणीही दचकणारच ना !
यथावकाश सगळ्या कंपुची ओळख घरातल्या मंडळींशी माणिकने करुन दिली. दोन काका, काकी आणि आजोबा असे पाचच जणांचे कुटूंब बाकी सगळी गडी माणसं. रात्रीच्या जेवणाच्यावेळी आणखीही बरीच माहीती मिळाली माणिकचे दोन चुलत भाउ देशाबाहेर असतात आणि त्याची एकमेव चुलतबहीण लग्न होऊन सासरी गेलेली आहे. जेवणाचा साधाच बेत होता पण गप्पांच्या ओघात असेल म्हणा किंवा काकींच्या हातच्या चवीमुळे म्हणा सगळे भरगच्च जेवले. जेवणे होतात तोच पाहूण्यांच्या खोल्या तयार आहेत असे सांगायला गडी आला. वरच्या मजल्यावर दोन खोल्यांमधे दोघा-दोघांची सोय केली होती आणि माणिक एकटा त्यांच्याच बाजुच्या खोलीत झोपणार होता. कारण म्हणे ती त्याच्याचसाठी राखुन ठेवलेली खोली होती कधीही तो इथे आला तर तिथेच झोपत असे.
पहील्या रात्री प्रवासाच्या थकव्यामुळे कधी एकदा बिछान्यावर अंग टाकतो असे झालेल्या सगळ्यांनाच चटकन झोप लागली. मधेच केंव्हातरी अनिकेतला कशामुळेतरी जाग आली. आपल्याला नक्की कशाने जाग आली याचा विचार करत असतानाच अनिकेतला कोल्हेकुई ऐकु आली. त्या अभद्र आवाजाने त्याच्या अंगावर काटा उभा राहीला. त्याने हळूच कल्पेशला उठवायचा प्रयत्न केला. पण तोच दिवसभर ड्रायव्हींग करत असल्याने जरा जास्तच थकला असावा किहीही हलवले तरी त्याला जाग येईना. शेवटी डोक्यावरून पांघरूण घेउन आणि कानात बोटे घालुन अनिकेत पडून राहीला. मधेच केंव्हातरी तो आवाज थांबला आणि तो पुन्हा झोपेच्या आधिन झाला.
सकाळी उठल्यावर अनिकेतने पहील्यांदा कल्प्याला फ़ैलावर घेतले. "कल्प्या, साल्या, तु काय कुंभकर्णाचा वंशज आहेस का रे ? रात्री तुला उठवण्यासाठी इतकी धडपड केली तर तु ढीम्मच. झोपतो की मरतो रे रात्रीचा?"
" अबे, झालं काय नक्की तुला?" मधेच बोलत पश्या म्हणाला.
" बघ रे ! हा बधिर प्राणी काय म्हणतोय" कल्प्याला आता जोर चढला.
" कशाला उठवत होता रे कल्प्याला? तुझ्याकडून ही अपे़क्षा नव्हती." उदयने आपला खास खेचु सुर लावला. " कल्प्या सावध रहा रे ! याच्या बालमनावर काहीतरी विपरीत परीणाम झालाय".
" चुप बे, इथे माझी तंतरली होती आणि तुला कसले भंकस जोक सुचतायत!" अनिकेत कळवळला.
" पण हे विद्वान माणसा नक्की काय झालं?" आता पश्याने तोंड टाकले.
" रात्री कोल्हेकुई ऐकु येत होती तुम्ही नाही ऐकली?" अनिकेतचे स्पष्टीकरण.
" नाही रे आम्ही त्या जमातीतले नाही ना !" कुणाचीच खेचायची संधी उदय सोडणे शक्य नव्हते.
" नाय रे शप्पत कोल्हे ओरडत होते"
" हो का? मग?"
" या कल्प्याला उठवत होतो तर हा साला मेल्यात जमा होता ना !"
" काय कल्ला चाललाय रे ?" माणक्याने ऐनवेळी प्रवेश केला.
" काय नाय रे ! या अन्याने रात्री म्हणे त्याच्या बिरादरीवाल्यांचा आवाज ऐकला. म्हणे कोल्हेकुई ऐकु आली त्याला"
" शक्य आहे पलिकडच्या झपाटीच्या रानातुन रात्री अपरात्री कोल्हेकुई ऐकु येतेच अधेमधे" माणक्याने उत्तर दिले. तो आणखी काही बोलणार ईतक्यात त्याच्या काकांनी तेथे प्रवेश केला आणि कंपु गप्प झाला पण डोक्यात आता झपाटीचे रान ठाण मांडून बसले.
" काय माणिकराव पाहूणे काय म्हणतायत? खुश आहेत ना? "
यावर मनातल्यामनात सगळ्यांनी कपाळावर हात मारला. काल संध्याकाळी ते ईथे आले आणि आज सकाळी ते खुश आहेत का? असे विचारणारे माणक्याचे काका म्हणजे धन्यच दिसत होते. मग आख्खा दिवस माणक्याच्या काकांचा वाडा बघण्यात त्या बद्दलच्या ऐतीहासीक गोष्टी ऐकण्यात गेला.
वाडा बाकी ऐसपैस होता त्याची अर्धगोलाकार इमारत पुर्वी प्रचलीत नव्हती म्हणजे तशी इमारत बांधणारा माणुस शौकीन असला पाहीजे. त्या तश्या रचनेमुळे सगळ्या खिडक्यांमधुन प्रकाश बाकी झक्क येत होता. ज्या वेळी तो वाडा त्याच्या ऐन वैभवात असेल त्यावेळी त्याचा रुबाब नक्कीच पहाण्यालायक असणार पण आता जवळपास निम्मा वाडा बंद होता. वापरातल्या अर्ध्याच भागात विजेचे कनेक्शन होते आणि उरलेल्या भागात मिट्ट काळोख. दिवसाढवळ्या त्यातल्या एकसंघ पॅसेज मधुन जायची भिती वाटावी असा. तिकडचा भाग दाखवण्यासाठी म्हणुन जेंव्हा माणक्याच्या काकांनी कंदील पेटवला तेंव्हा सगळेच एका सुरात ‘नको’ म्हणाले.
"हे आमचे पणजोबा बरं का, हा वाडा यांनी बांधला!" दिवाणखान्यात लावलेल्या मोजक्या चार तसबीरी, त्याही आगदी चित्रपटात दाखवतात तश्या. त्यातल्या डावीकडच्या तसबीरी कडे निर्देश करत काका म्हणाले.
" पेशव्यांच्या काळात फ़ार मोठं प्रस्थ होतं हां आमचे पणजोबा म्हणजे. ते वास्तुविषारद होते त्या काळचे प्रसिध्द" काका सांगत होते आणि अन्या उदयच्या कानात फ़ुसफ़ुसला.
" अन्या? हे वास्तुविषारद की काय ते म्हणजे कोण रे?"
"गप रे, वास्तुविषारद म्हणजे आर्कीटेक्ट" नशिबाने उदयला माहीत होते आणि त्याने धड उत्तर दिले. पण एव्हढ्या वेळात तिथली ओळखपरेड संपली आणि " आत्ता कुठे बाहेर जाउ नका ताटं घेतीलच इतक्यात" असं सांगुन क्षणभर बाहेर डोकावलेल्या मोठ्या काकी पुन्हा आत गडप झाल्या. आणि काकाही "आलोच इतक्यात" असं बोलुन तिथुन निघुन गेले. कंपु एकटा पडला.
" अबे माणक्या, तु आम्हाला गाव दाखवायला आणला की नुसताच वाडा?"
" लेका उठल्यापासुन तुझ्या वाड्यातच भटकतोय आपण आणि वर तुझ्या काकाने प्रत्येक खोली कश्याप्रकारच्या शौचालयाने युक्त आहे हे दाखवायलाच हवे होते का रे?" भडकलेल्या कल्प्याचा बांध फ़ुटू पहात होता.
" येड्यांनो, आपल्याला गाव दाखवायला नाही गावाला आपण दाखवायला आणलोय बहुतेक, मघापासुन कमीतकमी सात-आठ माणसं दरवाजातुन डोकावुन आपल्याकडे बघत माना हलवुन गेली" उदयचे निरी़अण चांगलेच होते.
" काय रे माणक्या? इथे काय आमचे प्रदर्शन भरवणार का रे ?" पश्याचा भाबडा सवाल.
कदाचीत हा भडीमार आणखी चालला असता पण काकींच्या "पानं घेतलीत" या हाकेमुळे सगळे माणक्याच्या मागोमाग तिकडे निघाले आणि तात्पुरती त्याची यातुन सुटका झाली.
जेवणानंतर दुपारी सगळ्यांनीच आग्रह केल्यामुळे माणिक त्यांना घेउन बाहेर पडला. आधीच माणक्याच्या वाड्याचे अजिर्ण झाल्यामुळे कंपु उधळत निघाला. वाड्या समोरचा रस्ता सोडून पलिकडे सगळी झाडीच झाडी दिसत होती. याच झाडीला वळसा घालुन ते आले होते नाही का गावात?
" आयला, इतकं मस्त रान तुझ्या घरा समोर आणि तु दिडदिवसाच्या गणपती सारखं कोंडून ठेवलंस आम्हाला घरात? तुला काही लाज शरम?" पश्या करवादला.
" मस्त स्पॉट रे हा, बाटल्या आणायला हव्या होत्या" भलत्या वेळी भलते सुचणे हा अन्याचा स्थायीभाव.
" चल बे, आता याचा काका परत बोलवायच्या आत आधी इकडे उनाडून येउ" उदयने माणक्याला बोलायचा प्रयत्न करत असताना पाहील्यामुळे गडबडीत म्हणाला.
आणि सगळे समोरच्या रानात शिरले. आत जाताना मस्त थंडगार वातावरण अंगावर घेताच कंपुला आणखी उत्साह आला.
आतमधे पायवाटांचे नुसते जंजाळ होते त्यातली एक निवडून ते चालायला लागले. जितक्या उत्साहात मंडळी आत शिरली तितक्याच वेगाने त्यांचा उत्साह ओसरला. आतमधे कसलाच आवाज ऐकु येत नव्हता. चारही बाजुने दाटलेली घट्ट शांतता काळीज कुडतडायला लागली पण बोलणार कोण? जो बोलेल त्याच्यावर डरपोकपणाचा शिक्का बसणार हे नक्की, मग एकमेकांच्या जिवावर वाटचाल सुरु राहीली. आता समोरच्या टेकडीपर्यंत जायचे आणि परत फ़िरायचे कमितकमी गावात तरी शिरायचे असे प्रत्येकालाच वाटायला लागले. आता त्या तसल्या हिरव्यागार वनात ती तसली अभद्र आकाराची काळी टेकडी दिसल्यावर तसे वाटायचेच.
" माणक्या, समोरची टेकडी नक्की याच ग्रहावरची आहे ना रे?" उदयला रहावले नाही.
" इथलीच आहे, काळी टेकडी म्हणतात तीला" माणक्याचा खुलासा.
" नाव शोभतय रे! पण तुझ्या काकापे़क्षा बरीच गोरी दिसतेय"
" ही काळी टेकडी आणि तुझ्या काकांच्या पिक-अप ला काय धन्नो नाव ठेवलय का रे ?" कल्प्याने केविलवाण्या आवाजात विनोद करण्याचा प्रयत्न केला. आजुबाजुच्या वातावरणाचा त्याच्यावर जास्तच परीणाम झाला होता. शहरातल्या कृत्रीम जंगलात जी एक आटोपशीर आणि टापटीप ठेवण असते तशी इथे गावातल्या रानात नव्हतीच एकतर शांतता त्यात समोरची काळी टेकडी आणि मधे मधे दिसणारी वटलेली झाडे सगळंच एकदम गुढ वाटायला लागलं होतं. त्यामुळे नाही म्हंटल तरी कल्प्याची नाडी इतरांपे़आ जास्तच जोरात धावत होती.
" चल बे माणक्या, आता तुझ्या गावात चक्कर मारुन येउ" उदयने कल्पना मांडली बहूतेक कल्प्याची अवस्था त्याच्या ल़क्षात आली.
" ठीक आहे, तुमची मर्जी पण टेकडीवर गेलो असतो तर तुम्हाला एक गंमत दाखवली असती" माणक्या म्हणाला खरा पण त्याच्या आवाजात एक गुढ निराशा जाणवत होती.
मग पुन्हा सगळेच माणक्याच्या मागोमाग डाव्या आजुने जाणार्या वाटेकडे वळले.
" माणक्या, हे काय तुझ्या काकांच राखीव देशमुख अभयारण्य आहे का रे? साधे प़क्षी पण नाहीत इथे ते" उदयने एक टोला हाणलाच.
" गध्ध्या सकाळी म्हणत होतो ते हेच, झपाटीचे रान म्हणतात याला" माणक्याने उत्तर दीले मात्र कंपुच्या चालण्याचा वेग वाढला.
माणिकने दाखवलेल्या रस्त्याने एकमेकांच्या जवळपास रहातच सगळा कंपु एकदाचा गावात पोहोचला. तसं त्यांनी येताना दुतर्फ़ा दिसणारं गाव बघितलच होतं पण आता विस्तार पहायला मिळत होता. एकजात सगळी बैठी एक मजली घरं, त्यातली काही आगदी प्लास्टर वगैरे केलेली. पण गावात बाकी जरा जास्तच शांतता वाटत होती. मघाची त्या रानातली शांतता आणि आत्ताची ही गावातली शांतता, आता मात्र सगळ्यांच्याच मनात चलबिचल सुरु झाली. गावाबद्दल तहेतहेचे तर्क-वितर्क त्यांच्या मनात सुरु झाले.
" माणक्या गावात वस्ती आहे की नाही रे?" उदयच्या आवाजात आतामात्र गंभिरपणाची झाक आली होती.
" माणक्या आता बाकी तुझ्या गावाबद्दल शंकाच यायला लागलीये " अन्याने उदयला अनुमोदन दिले.
" अरे, तसे काही नाहीये रे ! " माणक्याने स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केलीच होती आणि त्याच्या काकांची पिक-अप तिथे येउन थांबली. " मालकांनी वाड्यावर बोलावलय" त्यातुन आलेल्या ड्रायव्हरने माणिककडे बघुन म्हंटले. माणिक बरोबर बाकी कंपु सुध्दा नाईलाज झाल्यासारखा गाडीकडे वळला.
" पाव्हणे मंडळी सावकाश आली तरी चालतील" ड्रायव्हरने पुढे पुरवणी लावली. आणि ब्रेक लावल्या सारखा सर्वात पुढे चालणारा पश्या कचकन थांबला मग त्याच्या पाठोपाठ अन्या, कल्प्या, उदयही.
" इथुन वाड्यावर यायला हाच रस्ता ना रे? " पश्याने माणिकला विचारले, त्याचा चेहरा बघुनच त्याच्या डोक्यात काहीतरी चाललेय हे ल़क्षात येत होते. त्यामुळे कुणीच हरकत घेतली नाही. रस्त्याबद्दल सांगुन माणिक वाड्याकडे निघुन गेला आणि बाकी कंपु मागे रेंगाळला.
" काहीतरी गडबड वाटतेय रे पश्या" उदय इतका गंभिर पहील्यांदाच होत असावा.
" हां यार, सालं तो वाडा तसा रामसे बंधुच्या पुरानी हवेली सारखा आणि समोर हे असलं विचित्र नावाचं रान, आणि आता हा ओस पडलेला गाव, च्यायला ! आपण माणसातच आलोय ना?" पश्या वैतागला.
" ते बेणं पण काय सांगायला तयार नाही" अन्याने माणक्याची तक्रार केली.
" इतक्या वर्षात या माणक्याने पहील्यांदाच त्याला गाव असल्याचे सांगीतलेय आणि इकडे घेउन आलाय" पश्याच्या वाक्यातली कुशंका ताबडतोब सगळ्यांच्या मनात घर करुन बसली.
" ए, चला रे ! दिवस मावळायच्या आत वाड्यावर तरी जाउ" कल्प्याला आता रहावेना.
" तिकडेच तर निघालोय, अरे हो कल्प्या गाडीची चावी तुझ्याकडेच आहे ना? की ठेवलियेस वाड्यावर?"
" ही काय माझ्या खिशात !" चावी खिशातुन काढत कल्प्या म्हणाला " पण असे का विचारतोयस?" आता कल्प्याने भिती आजिबात दडवली नाही.
" काही नाही रे विचारुन ठेवलं, ती तुझ्या खिशातच राहू दे !" पश्या म्हणाला खरा पण त्यालाही माहीत नव्हतं की तिचा उपयोग फ़ार लवकरच करावा लागणार आहे म्हणुन.
एव्हाना उन्ह कलायला लागली होती, दिवसभर आपल्याच जाळत्या उन्हामुळे थकलेला सुर्य आता हळुवारपणे विसावा घ्यायला निघाला होता. आणि त्याचाच फ़ायदा घेत अंधार आपले पाश टाकायला सुरुवात करत होता. गडबडीने चौकडीने वाडा जवळ करायला सुरुवात केली. जरी कोणी आजुन बोललं नसलं तरी प्रत्येकाच्या चेहयावरचा भाव स्पष्ट वाचता येत होता ‘ झक मारली आणि या माणक्याचा गावाला आलो’.
वाड्यावर पोहोचल्यावर सर्वात आधी चौघांनी माणक्याची शोधाशोध सुरु केली, पण माणक्या कुठेतरी गायबला होताच पण त्याचे काकाही कुठेतरी दिसेनासे झाले होते. रात्रीची जेवणे लवकर घेण्याची तिथली पध्दत, नेमके त्याच वेळी ती काका पुतण्याची जोडगोळी कुठूनशी टपकली. माणक्यावर भडीमार करायची संधी चौघेही शोधत होतेच पण त्याचा तो भयंकर काका त्याच्या बरोबर असल्याने कुणी त्याला थेट विचारु शकले नाही. त्यातुन माणक्याच्या चेहयावरचे ते गुढ भाव ! बापरे, चौघेही कसे बसे जेवण करुन उठले. आणि बाहेरच्या दिवाणखान्यात येउन कुजबुजत राहीले. दहा पंधरा मिनीटे गेली असतील नसतील माणिक आणि त्याचा काका दोघेही तिथे उगवले.
" तुम्ही आराम करा रे, मी जरा काकांसोबत जातोय त्यामुळे आपण उद्याच भेटू" असे काहीश्या संदिग्ध आवाजात म्हणत माणिक काकांच्या मागोमाग वरच्या मजल्याकडे निघुन गेला.
चौघेही धुसफ़ुसत वरच्या मजल्यावरच्या खोल्यांमधे गेले, पण थोडावेळच कारण मनातल्या काळजीने त्यांना गप्प रहावले नाही पश्या आणि उदय कल्प्या आणि अन्याला दिलेल्या खोल्यांमधे प्रविष्ट झाले. ते दोघेही चांगल्याच दबावाखाली दिसत होते.
" च्यायला रे त्या माणक्याच्या तो त्याच्या खोलीत पण नाहीये" येता येता बहुधा दोघांनी माणक्याच्या खोलीत डोकावले असावे. एकुणच वातावरणाला आता भलताच भितीदायक रंग चढला होता.
" पश्या, आता कुठे शोधायचे रे या माणक्याला?" अन्या काहीतरी बोलायचे म्हणुन म्हणाला.
" कुणाला तरी विचारुन यायला हवे रे ! चला सगळे खाली जाउन विचारु" कल्प्याने सुचवले.
" आणि आपण खाली गेल्यावर माणक्या ईथे आला तर? त्यापे़क्षा तु आणि अन्या खाली जाउन जे कोणी भेटेल त्याला विचारुन या माणिक कुठे आहे म्हणुन, मी पश्यासोबत इथे थांबतो." उदयने मधला मार्ग सुचवला. दोघेही ताबडतोब खालच्या मजल्यावर जाण्यासाठी निघाले, नाहीतरी आतल्या पे़क्षा बाहेर पळायला जास्त जागा होती.
" आणि हो ! माणक्याबद्दल जास्त चौकश्या करु नका रे ! भेटलाच तर काही खास विचारायचेय म्हणुन इकडे बोलवा." उदयने आणखी सुचना लादल्या. यावर माना डोलावुन कल्प्या, अन्याची जोडी खाली जायला निघाली.
खाली जाण्यासाठी त्यांना वाड्याच्या मध्यभागाचा जीना वापरावा लागत होता. मध्यभागाचा म्हणजे त्याच्या ते असलेल्या भागात लाईट होते आणि पलिकडच्या भागात लाईटचे कनेक्शन नव्हते. त्यामुळे समोरच्या पॅसेजमधे इकडून पडणाया उजेडाच्या टप्प्यापलिकडे उजेडाच्या बाजुचे काही चुकार किरण पोहोचत होते तेवढाच भाग जरा अंधुक अंधुक का होईना दिसत होता. त्या पलिकडे सगळे काळोखाचे साम्राज्य पसरले होते. तिकडे प्रयत्न पुर्वक दुर्ल़क्ष करत कल्प्या आणि अन्या खाली जायला वळले. पण इतक्यात समोरच्या अंधाया भागातुन येणाया कुजबुजणार्या आवाजाने दोघांचेही ल़क्ष वेधुन घेतले. आता या आवाजाचा शोध लावायचा तर तिकडे जायलाच हवे होते. शेवटी एकमेकांच्या आधाराने ती जोडी काळोखाने काठोकाठ भरलेल्या पलिकडच्या पॅसेज मधे शिरली. त्यांना जास्त पुढे जायचे धारीष्ट्य करावे लागलेच नाही. पॅसेजच्या डाव्या हाताला असलेल्या खोल्यांपैकी दुसर्या खोलीतुन ते आवाज येत होते. मग जपुन पावलांचा आवाज न करता कल्प्या आणि अन्या त्या खोलीपर्यंत पोहोचलेच पण यासाठी सुध्दा त्यांना आठवतील तितक्या देवांचा धावा करावा लागला. कारण अर्ध्या भागात उजेड आणि अर्ध्या भागात दाट काळोख असे संमिश्र वातावरण जास्त भयप्रद वाटत होते. आतमधले आवाज स्पष्ट ऐकता येतील इतपतच दोघे पुढे सरकले आणि कानोसा घ्यायला सुरुवात केली. आतमधुन येणाया आवाजांची ओळख पटताच दोघांच्याही काळजात धस्सSS झाले, कारण आतमधे दुसरे तिसरे कुणी नसुन माणिक आणि त्याचे ते भयंकर दिसणारे काका एकमेकांशी कुजबुजत्या आवाजात बोलत होते. जरा नेट लाउन ऐकताच त्यांचे बोलणेही व्यवस्थित ऐकायला यायला लागले.
" पप्या, ऐन वेळी घोटाळा झाला असता रे तु आगदी वेळेवर आलास रे !" हा खर्जातला आवाज नक्की काकांचाच.
" तुम्ही फ़ोन केला मग यायलाच पाहीजे ना !" दुसरा माणक्याच होता.
" आता या गावच्या प्रथा म्हणजे काहीतरी करायलाच हवे ना ! ऐन वेळी सुचले तुला म्हणुन नशीब गावाचे "
" पण ते चारच आहेत तेवढे पुरतील ना?"
" हंSS आता तेवढेच आणलेस तर चालवुन घ्यायलाच हवेत, तुला इतकेच मित्र का रे पप्या?"
" आता इतकेच इकडे यायला तयार झाले त्याला मी काय करणार?"
" आणि त्यात पण एक तो बुटका त्याच्या अंगावर नाही मांस त्याचा काय उपयोग रे?"
" आता आणलेत ना त्यावर भागवुन घ्यायचे काका"
" पण उद्या नक्की ना ?"
" अरे नक्की म्हणजे काय यंदाची जत्रा ल़आत राहील गावाच्या , फ़क्त तुझ्या मित्रांकडे लक्ष ठेव, नाहीतर आयत्यावेळी घोळ होईल. जाउ देउ नको कुठेही सकाळी."
" नाही जायचे कुठे, त्यांना कुठे काय माहीती आहे? तुम्ही आपली बळीच्या उत्सवाची तयारी सुरु करा"
इतकावेळ काळोखात उभे राहुन ऐकणाया कल्प्या आणि अन्याची भितीने दातखीळ बसायची वेळ आली होती त्यात माणक्याचे शेवटचे वाक्य ऐकताच दोघांच्या भितीचा कडेलोट झाला आणि त्यांनी तडक आपल्या खोल्यांकडे धाव घेतली.
धापा टाकत खोलीत शिरल्या शिरल्या दोघांनीही पश्या आणि उदयला धरुनच बाहेर खेचायला सुरुवात केली.
" अबे, झालं काय ? काय वाघ लागला का मागे ?"
" तु.. तु निघ, चल पहील्यांदा.... पळा इथुन तो काका..... माणक्या" कल्प्याच्या तोंडातुन पुर्ण वाक्य बाहेर पडे ना.
" नंतर गाडीत सांगतो आधी पळा इथुन" अन्याने बाहेर बोट दाखवले.
सगळ्यांच्या मनातल्या भितीला आता पंख फ़ुटले, वेडे वाकडे धावत चौघेही खाली निघाले. जिन्याजवळ येतानाच त्यांना समोरच्या दरवाजांचा आवाज आला. पण आता त्यांना अडवणे शक्य नव्हते. वायाच्या वेगात चौघे सुमो जवळ आले. पश्याच्या सुचनेचा आत्ता उपयोग होत होता गाडीची चावी आत्ताही कल्प्याच्या खिशात होतीच चौघांनी गाडीत जवळजवळ उड्याच मारल्या. आता एकच ल़क्ष होतं लवकरात लवकर या जागेपासुन दुर जाणं. कल्प्याने चावी फ़िरवली इंजीन स्टार्ट झाले आणि जरा जिवात जीव आले त्यांच्या निदान गाडी तरी सुखरुप होती बाकी कल्प्याच्या कौशल्यावर सगळ्यांचाच विश्वास होता. सगळे स्किल पणाला लावत कल्प्याने गाडी रस्त्याला लावली. उरलेल्या तिघांच्या नजरा पाठीमागे लागल्या कारण ते पळाल्याचं वाड्यात नक्की कळलं होतं वाड्यावरची पिक-अप पाठलागावर निघु शकत होती. पण ते शक्य झालं नसावं कच्च्या रस्त्यावर आदळत आपटत गाडी गावाबाहेर निघत होती. बयापैकी लांब येताच सगळ्यांनी सुटकेचे निश्वास टाकले, मागे कुणीही येत नव्हते.
गावचा कच्चा रस्ता पार केल्यावर पश्याला वाचा फ़ुटली
" काय झालं रे?"
" तुझा अंदाज खरा निघाला यार, ही साली रानटी माणसे आहेत उद्या आपला बळी देणार होते गावच्या उत्सवात, आम्ही या कानांनी ऐकलाय त्यांचा प्लान" अन्या केकाटला.
" तरीच साला, हरामखोर माणक्या आपल्याला इतक्या लांब त्याच्या गावी घेउन आला" पश्या बोलुन गेला.
" त्याच्या काका कडे बघुनतरी आपण सावध व्हायला हवे होते, वर ते वाड्यात कोंडून ठेवणे" उदयने आपले विचार मांडले.
" तरी बरं गाडी आपल्या ताब्यात राहीली, कल्प्याने जर चावी वाड्यावर ठेवली असती तर?" पश्याच्या प्रश्नाने सगळेच भांबावले.
" आता काळजी नको आपण सटकलोय माणक्या जर चुकुन आलाच मुंबईत तर घेउ त्याचा समाचार" अन्या सुटकेच्या आनंदात.
" साSSले आपला बळीचा बकरा करतायत आता या म्हणावं, कल्प्याला हाय वे वर गाठायला सात जन्म घ्यायला लागतील" पश्याचे वाक्य पुर्ण होते ना होते तोच खच्चुन ब्रेक लावत गाडी थांबली.
" कल्प्या ........ " कल्प्याकडे पहात काही म्हणायच्या तयारीत असलेला उदय कल्प्याच्या नजरेच्या रोखाने बघत कच्चकन थांबला. बाकिच्यांची अवस्था वेगळी नव्हतीच. गाडी का थांबली ते हेडलाईटच्या उजेडात स्पष्ट दिसत होते. रस्त्यावर आडव्या टाकलेल्या झाडाच्या मागे माणक्या त्याचा काका आणि वाड्यावरचे नोकर उभे होते.
" आयला रे पळा...... " कसे बसे इतकेच शब्द कल्प्याने उच्चारले आणि बाहेर उडी मारली. बाकीच्यांना ते ही शक्य झाले नाही कारण पलिकडच्या मंडळीनी एव्हाना गाडीला गराडा घातला होता. काहीच झाले नसल्यासारखा हसत माणक्या समोरच उभा होता.
" माणक्या, हलकटा बाजुला हो, नालायका तुझा सगळा डाव कळलाय आम्हाला आता गप बाजुला हो नायतर......" गाडीतला टॉमी उचलुन गरागरा फ़िरवत पश्या ओरडला.
" अरे पण ऐकुन तर......... " माणक्या काय बोलत होता कुणास ठाउक
" काय बोलु नकोस दोस्तीला कलंक आहेस तु, इथे असा फ़सवुन आणुन आमचा बळी देणार होतास काय?" पश्या बेभान झालेला.
" अरे कुठल्या रानटी जमातीचे रे तुम्ही चक्क नरबळी देता? " अन्याला अवसान चढले मरण समोर दिसायला लागताच सगळे वाघ व्हायला लागले होते.
" आणि तुझा हा पाताळयंत्री काका.......... " पुढे काही बोलायच्या आत माणिकने वाजवलेल्या सणसणीत चपराकीने अन्याचा आवाज बंद केला. बाकीचेही थंडावले.
" गप रहा बे, काय समजुन उमजुन घेत नाय नी थोबाडं चालवतायत, रस्त्यावर तमाशा नको गप वाड्यावर चला" माणक्याच्या आवाजात आता जरब होती. सगळेच भिजलेल्या कोकरासारखे त्याच्या मागोमाग गाडीत बसले. गाडी वाड्यावर घ्यायला माणक्याने त्यांच्या ड्रायव्हरला सांगितले.
" का पळत होतात रे ?" माणक्याने विचारले. मघाच्या प्रसंगानंतर अर्ध्यापाउण तासाने सगळे वाड्याच्या दिवाणखान्यात बसले होते. काकींनी चहाचे कप पाठवून दिले होते ते समोर अजुनही तसेच होते.
" हे तु आम्हाला विचारतोयस? तुमचा सगळा डाव आम्हाला कळला होता" धिर करुन पश्या बोलला. मघाच्या थपडेच्या आवाजाने सगळेच सुन्न झालेले, अन्या तर तंद्रीत असल्यासारखा.
" कसला रे डाव? कुणी रचला होता?"
" तुम्ही लोकांनीच, आमचा बळी द्यायचा उद्याच्या उत्सवात " कल्प्या चिरकला.
" हे काय बडबडताय लेको?" माणक्या वैतागला
" मघाचे तुझे आणि काकांचे बोलणे ऐकलेय आम्ही" अन्याच्या झिणझीण्या कमी झाल्या असाव्यात.
अन्याच्या वाक्यावर माणक्याने जी हसायला सुरुवात केली तो थांबेच ना ! त्यात त्याला काकांच्या हसण्याची साथ मिळाली.
" मुर्खांनो अर्धवट ऐकुन भलताच समज करुन घेतलाय तुम्ही, काय म्हणालो मी ?"
मग जे मघाशी ऐकले होते ते सगळे कल्प्याने त्याला ऐकवले. त्यावर हसत हसत काका म्हणाले
" असा प्रकार झाला काय? पप्या तरी सांगत होतो तुला तुझ्या मित्रांना विश्वासात घे म्हणुन आता तुच सांग त्यांना"
" अरे यार तुम्ही ऐकलेत त्यावर विश्वास ठेवलात मला विचारायच तरी, खरा प्रकार काय झाला ते सांगतो." क्षणभर थांबत माणक्याने पुढे सांगायला सुरुवात केली.
" आमचा गाव म्हणजे सगळाच शेतीवर जगणारा, आणि गाव वसलाय मात्र एका खडकाळ पठारावर. त्यामुळे इथे शेती करता येत नाही फ़ारतर दोन चार फ़ुटावर खडक लागतो इथे त्यामुळे गावची सगळी शेती पलीकडच्या डोंगरावर आहे. आता पिकं भरलीयेत त्यामुळे शेतीची कामे जोरदार चालु आहेत आणि शेताला बाकी जनावरांपासुन पण सांभाळायला लागतं त्यामुळे गावातली माणसं तिकडेच वस्तीला जातात". आत्त चौघांना त्या ओस पडलेल्या गावाचे रहस्य कळले. "आणि तिथेच उत्सव असतो, म्हणजे तिथे देवस्थान आहे बळी महाराज म्हणुन ते गावच्या शेताची राखण करतात अशी गावकयांची श्रध्दा आहे त्यांचा उत्सव, म्हणुन त्याला बळीचा उत्सव म्हणतात. आणि हे ऐकुन तुम्ही पळालात ? " दात काढत माणक्या म्हणाला.
" इतकेच नाय तु म्हणालास ना मी आणलेत चार मित्र तेवढे पुरतील ना? त्याचं काय?" आता अन्याला अवसान आले.
" तेवढे बाकी माझे चुकले तुम्हाला कल्पना द्यायला हवी होती संध्याकाळीच. इथे बळीच्या उत्सवात आजकाल लोकांचे दारु पिउन भांडणे करायचे प्रमाण वाढलेय, आणि गावातल्या भांडणांचा शेवट कमीत कमी कुणाचे तरी डोके फ़ुटण्याने होतो. माझे काका गावचे सरपंच, एकदम निर्व्यसनी माणुस त्यांनी परोपरीने गावकयाना समजावले पण लोक ऐकण्याच्या तयारीत नसतात म्हणुन या वर्षी त्यांनी ‘दारुबंदी अधिकायांना’ खास अमंत्रण दिले होते जेणे करुन लोक त्यांच्या समोर तरी वेडेवाकडे वागणार नाहीत गावातली माणसे म्हणजे शासकीय अधिकायांना बिचकुनच असतात. पण त्यातही घोळ झालाच त्या अधिकायांच्या गाडीला अपघात झालाय, त्यांचा ड्रायव्हर पिउन गाडी चालवत होता असे कळले. त्यासाठीच काकांनी मला घाईघाईत बोलावले होते."
आता कंपुच्या डोळ्यासमोर माणक्याला न्यायला आलेली पिक-अप आली.
" आता असे झाले म्हणजे इभ्रत वाचवायला काहीतरी करायला हवेच होते ना ! मग काकांनी आणि मी तुम्हालाच ‘दारुबंदी अधिकारी’ म्हणुन समोर करायचे ठरवले सगळे ठरल्यावर तुम्हाला सांगणार होतोच तेवढ्यात तुमच्या पळापळीचा आवाज ऐकला" माणक्या आजुनही हसत होता.
" आणी तुझे काका माझ्याबद्दल त्या बुटक्याच्या अंगावर नाही मांस असे म्हणाले ते ?" कल्प्याने धुसफ़ुसत विचारले.
" साधी गोष्ट आहे यार तु अधिकारी म्हणुन शोभशील की नाही असाच प्रश्न होता रे तो"
" आणि एक मिनीटं, आम्ही गाडीने आख्खा गाव पार करुन हाय वे ला लागलो मग तुम्ही आमच्या मागुन निघुन आमच्या आधी हाय-वे वर कसे पोहोचलात? तुम्ही तर गाडी पण आणली नव्हती." पश्याचा संशयखोर आवाज.
" अरे तीच तर गंमत आहे, आम्ही ‘झपाटीच्या रानातुन’ आलो" माणक्या शांतपणे म्हणाला आणि कंपु पुन्हा शहारला.
" अरे, त्याच्या बद्दल पण गैरसमज करुन घेतलात की काय?" त्यांचे शहारणे बहुतेक माणक्याच्या ल़क्षात आले.
" तुम्हाला आठवत असेल ना ? गावात शिरताना एका टेकाडाला वळसा घालायला लागतो ते ? गावात शिरायची तेवढीच गाडीवाट, पण हाय-वे गावापासुन अर्ध्या किलोमीटरवर आहे. फ़क्त तिथुन थेट रस्ता काढायचा तर वाटेत दोन तीन दगडी टेकड्या आडव्या येतात. तुम्हाला म्हणालो होतो ती काळी टेकडी? गावाकडून चालत येताना ती पार केली की हाय- वे दिसायलाच लागतो गावातली लोकं सर्रास त्याच रस्त्याने हाय- वे वर जाउन गाडी पकडतात. आणि मुख्य रस्त्यापे़आ तिकडून हाय वे वर झपाट्याने जाता येते म्हणुन त्या रानाला झपाट्याचे रान म्हणतात त्याचाच अपभ्रंश ‘झपाटीचे रान’ बाकी काही नाही " माणक्याचे स्पष्टीकरण म्हणजे कंपुवर चक्क तोफ़गोळाच होता. ज्या गोष्टींबद्दल जे समज करुन घेतले होते ते सगळे भ्रम निघाले. आणि त्याच भ्रमात चौघेही वहावलेले. आता एकेकाला आठवत होतं आपण मघाशी काय काय बोललो, कुणाकुणाचा अपमान केला आणि जसं जसं आठवत होतं तश्या तश्या एकेकाच्या माना खाली जात होत्या.
" सॉरी यार, आम्ही भलताच गैरसमज करुन घेतला, आणि नकोनको ते बोललो तुला आणि काकांना, सॉरी काका! " पश्याला सर्वात आधी उपरती झाली. आणि मग हळूहळू सगळ्यांनीच त्याच्या सुरात सुर मिसळले.
" जाउ दे ना यार, समज गैरसमज व्हायचेच दोस्तीत, काकांना पण राग नाही येणार हो ना काका !"
" पप्या राग कसला रे ! ठरावीक दृष्टीकोनातुन पहायची सवयच असते रे माणसाला. त्यात हे गाव, हा वाडा काहीतरी गैरसमज व्हायचाच." काकाही हसत म्हणाले.
" मग, उद्या येणार का बळीच्या उत्सवाचे खास पाहूणे म्हणुन?" माणक्याने दात विचकत विचारले.
" आता हे काय विचारणे झाले? येणार म्हणजे काय येणारच तुझा हा विचीत्र गाव बघायलाच हवा ना ! " उदयने हसत मन मोकळे केले.
" अरे पप्या सॉरी माणक्या तुमच्या गावात आणखी काही म्हणजे मुंजाचा पिंपळ, भुताचा दगड असले काही नाही का रे?" अन्या मुळ रंगात येत होता.
" आहे ना ! झपाटलेला वाडा, त्यातले पाहुणे म्हणे अपरात्री वाड्यातुन धुम ठोकतात" यावर सगळेच हसले अगदी मनापासुन गेल्या दोन दिवसांपासुन त्यांच्या मनावर बसलेली काळजीची पुटं आता साफ़ झाली होती. मध्यरात्रीचे अडीच वाजले होते आणि झपाटीच्या रानात कोल्हेकुई चालुच होती.
चाफ्फ्या
चाफ्फ्या यात शेवटी अजून एक ट्विस्ट ची अपेक्षा करत होते मी, त्या मित्रांना वाटलेल तेच खरं असतं पण त्यांना थांबवायला त्यां माणक्या अन काकाची ही नन्तर ची सारवा सारवी असते!!
मस्त! >>>चाफ्
मस्त!
>>>चाफ्फ्या यात शेवटी अजून एक ट्विस्ट ची अपेक्षा करत होते मी, त्या मित्रांना वाटलेल तेच खरं असतं पण त्यांना थांबवायला त्यां माणक्या अन काकाची ही नन्तर ची सारवा सारवी असते!!
एगझ्याक्टली!
आवडली कथा
आवडली कथा
अहाहा,
अहाहा, मस्त आहे रे चाफ्फ्या बिन भुतांची रहस्यकथा.
ह्म्म्म
ह्म्म्म छान आहे बिनभुतांची रहस्यकथा
पण मैत्रेयी म्हणतेय तसा ट्वीस्ट असता तर अजुन जबरी झाले असते
धन्यवाद,
धन्यवाद, प्रतिक्रीयां बद्दल तुम्ही सारे म्हणताय तसा ट्वीस्ट टाकला असताही ! पण इथे ना भयकथा काही लोकांच्या पचनी पडत ना विनोदी म्हणुन म्हंटले चला एखादी गैरसमजावर आधारीत कथा टाकावी
तरी मनातल्या मनात तसा ट्वीस्ट वाचायला हरकत नाही
.................................................................................................................................
** खरे मित्र असाल तर तुमच्या दुखा:तही सहभागी करुन घ्या ! **
मस्त रे..
मस्त रे.. वेगळा ट्रॅक धरलास ह्यावेळी. त्यामुळे मजा आली...
खास रे
खास रे चाफ्या
झकास राव !!!
झकास राव !!!
छान
छान रंगवलीय कथा....... आवडली......
मलाही
मलाही मैत्रेयीसारखेच वाटले...
म्हणजे असं काहीतरी शेवटी...
"इकडे झपाट्याच्या टेकडीवर तो नरबळी द्यायचा खांब आणि धार लावलेल्या तलवारी या चौघांची वाट पहात होत्या.. आणि काका अंथरुणावर पडल्यापडल्या पप्याच्या ऐन वेळी सुचलेल्या अफलातून कल्पनांना दाद देत आपलीच मिशी कुरवाळत होता.....!!!"
:))
आफताब,
आफताब,
सुंदर सुचवलेत, आता पुढे असाच शेवट वाचावा अशी विनंती करायला हरकत नाही
.................................................................................................................................
** खरे मित्र असाल तर तुमच्या दुखा:तही सहभागी करुन घ्या ! **
सगळ्या॑ना
सगळ्या॑ना मोदक
छान रन्गवली आहे गावची
छान रन्गवली आहे गावची गोष्ट.
मस्त फ्लो ओघवती आहे एकदम.
अप्रतिम.
अप्रतिम कथा. मज्जा आली
अप्रतिम कथा. मज्जा आली वाचताना.
धन्स मामि तुमच्यामुळे हि कथा
धन्स मामि तुमच्यामुळे हि कथा वाचायला मिळालि
.
.
छान कथा आहे
.
.
चाफाच्या ज्या दिसतिल
त्या कथा वाचत आहे
.
.
जबराट!
जबराट!
मस्त...! छान रंगवली आहे.खुप
मस्त...!
छान रंगवली आहे.खुप आवडली.
आवडली
आवडली
खुप मस्त
खुप मस्त
लै भारी!
लै भारी!