घारु अण्णा

Submitted by फूल on 27 May, 2021 - 21:22

अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकरप्राणवल्लभे ।
ज्ञानवैराग्यसिद्ध्य भिक्षां देहि च पार्वति ।।
वरणभाताचा कुकर उघडला की त्या वासाबरोबर हा श्लोक आणि त्या पाठोपाठ घारू अण्णा ही आठवण आता सवयीची झालीये. घारू अण्णा... माझ्या आजोळी जवळ जवळ सगळ्या सणा-समारंभांना येणारे आचारी. आजीला मुळात आचार्यांकडून स्वयंपाक करवून घेणंच मान्य नव्हतं. रोजच्या पानाला नेहमीचे कमीत कमी म्हणजे वीसेक जण. हा आमच्या आजोळच्या घराचा राबता. आजोबा जगन्मित्र आणि घरी आलेला पाहुणा पाटावर न बसता कधीच जायचा नाही हा दंडकच. अश्या भरल्या घरात वावरलेली आज्जी. आमच्या घरी कधी शहरी आली की तीनच आणि चारच जणांचा स्वयंपाक करताना गांगरून जायची बिचारी. त्या माऊलीला शंभरेक माणसांची पंगत उठवणं अवघड नव्हतं. पण वय झालं. घरच्या लेकी-सुना चाकरमान्या झाल्या. मग सण-समारंभांपुरतं गावी एकत्र जमणं झालं की गावातल्या जुन्या पद्धतीच्या स्वयंपाकघरात स्वयंपाक करणं सगळ्याच पुढल्या पिढीला कठीण व्हायला लागलं. अशावेळी आज्जीच्या मनाविरुध्द शेवटी घारुअण्णा आमच्या घरात आले.

आज्जीच्या स्वयंपाकघरात वावरण्याची एक मोठ्ठी नियमावलीच होती. पण घारूअण्णा जे शिष्टाचार स्वयंपाकघरात पाळत असत ते बघून आज्जीनेही तोंडात बोटं घातलेली मी याची देही याची डोळा बघितली आहेत. मला कळायला लागल्यापासून घरातला एकही समारंभ घारू अण्णांशिवाय झालेला मला स्मरत नाही. पण अगदी सुस्पष्ट आठवण कुठली विचाराल तर गणपतीच्या दिवसांतली.

पहाटे पहाटे पाचेक वाजता आजोबा आणि मोठे काका देवघरात समयांच्या प्रकाशात गणपतीची पूजा करत बसलेले असायचे. घारू अण्णा मात्र त्याही आधी म्हणजे चारेक वाजता शुचिर्भूत होऊन देवाघराच्याच बाहेर एका कोपऱ्यात संध्या करत बसलेले असायचे. आम्हाला जाग यायची ती त्यांच्या रेकून, नाकात म्हटलेल्या संध्येतल्या नामावळीने... केशवाय नम, माधवाय नम:, गोविंदाsय नम:... पुढे मागे होत होत एकाग्र चित्ताने चाललेली ती संध्या मला आजही आठवते. माझे चुलत भाऊ दरवर्षी घारू आण्णांपासून प्रेरणा घेऊन गणपतीनंतर पुन्हा एकदा संध्या सुरू करायचे आणि जेमतेम दसऱ्यापर्यंत तो नेम चालवायचे. अण्णांना संध्या करताना पहाणं ही गंमतच होती... डोक्याचा तुकतुकीत गोटा, मधोमध एक शेंडी, त्या डोक्याइतकीच तुकतुकीत, गुळगुळीत केलेली दाढी, दाढी चांगली होणे म्हणजे “घारुअण्णा स्टाईल दाढी” अशी त्याकाळी आणि अजूनही घरातल्या समस्त पुरूष जमातीत ही दाढीविषयक संज्ञा रूढ आहे. कपाळावर दुबोटी गंध, एका कानात भिकबाळी, गोरे पान, ज्यामुळे नाव चिकटलं ते घारे डोळे, उघडे बंब, खांद्यावर पंचा, खांद्यावरून गेलेलं जानवं, गळ्यात रुद्राक्ष, पोट सुटलेले, पांढरं शुभ्र – टाईड च्या जाहिरातीत असतं त्याहूनही शुभ्र, डागविरहित, स्वहस्ते धुतलेलं, आणि सुरेख नेसलेलं धोतर... स्वयंपाक करताना मात्र काका अंगात एक पातळ सुती सदरा घालायचे. पण आचारी माणसाचं धोतर डागाशिवाय रहाणं हे माझ्यासाठी आजही मोठं आश्चर्य आहे.

अण्णांच्या हाताखाली आमच्याच घरातले जुने गडी शंकर आणि पार्वती जोडीने काम करायचे. माझ्या काही काकवा आणि अत्त्याही वावरायच्या त्यांच्याबरोबर स्वयंपाकघरात पण त्यांनाही मोठी नियमावली आखून दिलेली असायची. अंघोळ कंपल्सरी, बायकांनी केस घट्ट वर बांधून यायचे... एखादी बट जरी अण्णांना सुटलेली दिसली तरी, “हातातलं काम बाजूला ठेव आणि आधी त्या बटीला तिच्या जागी बसवून ये... नाहीतर तुम्ही बट मागे करायला जाणार आणि जेवणाऱ्याच्या तोंडात केस येणार” असा करडा स्वर ऐकू यायचा.

स्वत: अण्णा मात्र धुतलेल्या तांदूळासारखे शुद्ध, स्वच्छ, चकचकीत दिसायचे. संध्या झाली की पुढला तासभर ते फक्त स्वच्छता करायचे. आज्जीचं स्वयंपाकघर मुळातच स्वच्छ. त्यातहि अण्णांना कुठं जराशी धूळ, कुठं एखादा खडा, कागदाचा कपटा असलं काही ना काही तरी सापडायचंच. अश्या वेळी आज्जी त्यांना, “अरे घारू घर म्हटलं की तेवढी धूळ असायचीच... ही काही शरदाची प्रयोगशाळा नाहीये.” अशी फणकारायची. माझ्या मोठ्या काकाच्या प्रयोगशाळेत एकदा आज्जी जाऊन आली होती... पण अण्णा मात्र प्रयोगशाळेत वावरल्यासारखेच स्वयंपाकघरात वावरायचे. आज्जीच्या कुरबुरीकडे साफ दुर्लक्ष्य करून अण्णा एक चित्ताने त्यांचं काम करायचे, स्वयंपाकाची घासलेली मोठी पातेली पुन्हा ते आपल्या पद्धतीनं घासून घ्यायचे, सगळे डाव, पळ्या, वाट्या, पातेली, पराती, ताटं सगळं ओळीनं मांडून ठेवलेलं असायचं.. विळ्या स्वच्छ घासून पुसून चकचकीत केलेल्या असायच्या. अश्या नेटक्या मांडलेल्या स्वयंपाकघरावरून एकदा नजर फिरवली की अण्णांची दुसरी अंघोळ. तोवर इकडे पूजा सुरू झालेली असायची. स्वयंपाकघरात अण्णा आणि त्यांची टिम सज्ज असायची. आम्हा मुलांना भुका लागल्यावर खायला म्हणून चिवडा-लाडवाचे डबे आधीच स्वयंपाकघराबाहेर मांडून ठेवलेले असायचे. कारण बाकी कुणाला आत प्रवेशच नव्हता. आज्जी स्वयंपाकघराच्या दाराशी बसून निवडून दे, कुटून दे, सोलून दे असली बारीक सारीक कामं करायची. पण मुख्य हेतू बाहेरच्या कुणाला स्वयंपाकघरात जाऊ न देणे हा.

अण्णांची स्वयंपाकाला सुरुवात झाली हे सगळ्या घराला कळायचं कारण वरचा अन्नपूर्णेचा श्लोक आणि तिच्या नवऱ्याचा जयजयकार यांनी सगळं घर दुमदुमायचं. पार्वती पते हर हर महादेव... बाहेरच्याला नक्की युध्द सुरु आहे की स्वयंपाक हे कळणार नाही अश्या सुरात ते सगळंच चालायचं. स्वयंपाकघरात कामाव्यतिरिक्त बोलायला बंदी. “तोंड बंद होतंच नसेल अगदी तर देवाचं नाव घ्या.” तरीही लेकी सुना खूप दिवसांनी भेटलेल्या काहीतरी कुजबूज सुरु व्हायचीच... आज्जीही गप्प बसायची नाही. काहीवेळा अण्णा चालवूनही घायचे पण खूप आवाज वाढला तर मात्र... “शिव शिव शिव शिवाय नम:” असं करड्या आवाजात ऐकू यायचं.. खुसू खुसू हासत सगळ्या बायका काही काळ गप्प. मग आज्जीच काहीतरी नवा विषय सुरू करायची की पुन्हा सुरू...

चिरून, निवडून ठेवेलेलं काहीसं एखाद्या ताटात जमिनीवर ठेवलं असेल तर चालताना त्याच्या बाजूनी जायचं. ताट उलटून गेलं तर पायाची धूळ ताटात पडते. कुठल्याही पातेल्यावर झाकायची झाकणी कायम पालथी ठेवायची. ढवळण्याचे चमचे, डाव हे ठेवायला प्रत्येक वेळी लहान लहान नव्या ताटल्या ठेवेल्या असत. मुख्य म्हणजे कुठल्याही पदार्थाची चव बघायची नाही. अण्णा नुसत्या वासावरून सांगायचे की काय कमी आहे. मोजमाप सगळं हातावर. बोटाच्या पेरापासून ते ओंजळीपर्यंत अशी सगळी परिमाणं. चमच्यांची भाषा कधी कळलीच नाही त्यांना. कधी स्वयंपाकघरातून बाहेर जावंच लागलं तर अण्णा हात-पाय धुवून यायचे परत पण परसाकडे कधी जावं लागलं तर पुन्हा अंघोळ.

आमचा नाश्ता व्हायचा. स्वयंपाकघरातल्या एकेका बाईलाही अण्णा नाश्त्याला एक एक करून बाहेर पाठवायचे. पण स्वत: मात्र एकही घास तोंडात घेत नसत. “अरे घारू ठेव ते हातातलं आणि पहिले दोन घास खाऊन घे” हे आज्जीचं दहावेळा तरी सांगून व्हायचं पण आण्णा मात्र जिभेवर काही ठेवायचे नाहीत. तो दंडकच. “भरल्यापोटी स्वयंपाक चांगला होत नाही वहिनी” हे शास्त्र. त्यांचा स्वयंपाक म्हणजे निगुतीने केलेली अन्नपूर्णेची पूजाच. पूजा झाल्याशिवाय आपण जेवतो का? मग अण्णा तरी कसे जेवतील हे आत्ता उमगतंय.

गावातच ब्राह्मण आळीच्या शेवटाला अण्णांचं एक वडिलोपार्जित लहानसं घर होतं. आमच्या आणि आजूबाजूच्या चार-पाच गावात आण्णा भिक्षुकी आणि आचारी दोन्ही म्हणून जात असत.तीच पूजेची सवय स्वयंपाकात उतरली असावी. लग्नं झालं नव्हतं. त्यामुळे मूल-बाळ नाहीच. आजन्म ब्रह्मचारी राहिलेला हा माणूस. आईला मदत म्हणून स्वयंपाकघरात वावरायला लागला आणि तिथेच सर्वार्थाने रमला. त्याकाळी गावाकडे पुरुषांनी स्वयंपाकघरात वावरणं हे काही फारसं अभिमानास्पद समजलं जात नसे. चेष्टाहि खूप झाली. पण हा छंद जडला आणि कुणाचीही पर्वा न करता अण्णांनी तो जिवापाड जोपासला. आई कसल्याश्या आजारात लवकरच गेली. घरात वडील, धाकटा भाऊ आणि लग्नं न झालेला मोठा ब्रह्मचारी काका सगळ्यांच्या पोटा पाण्याची व्यवस्था अण्णाच करायला लागले. मग कौतुक व्हायला लागलं. आणि लग्ना-कार्याला मदतीला जाऊ लागले. पण या कामाचे कधी पैसे म्हणून घेतले नाहीत त्यांनी. त्यांना पावित्र्य जपायचं होतं. पण उदरनिर्वाह कसा करायचा? मग काका कडून भिक्षुकी शिकून घेतली. आणि त्यावर उदरनिर्वाह चालवू लागले.

आज्जी मात्र व्यवहार जपणारी. तिने दरवर्षी सत्यनारायण घालायला सुरुवात केली आणि अण्णांना भटजी म्हणून बोलवायला लागली. भरपूर दक्षिणा, धोतर जोडी, अन्नधान्य असं सगळं आज्जी त्यानिमित्ताने त्यांना देत असे. शिवाय वावरात उगवलेल्या सगळ्या सगळ्यांत अण्णांचा वाटा आज्जी काढून ठेवत असे. अण्णा प्रतिकार करत असत पण आज्जीच्या आग्रहापुढे त्यांचं काही चालत नसे. गावात बाकी घरांमध्ये अण्णांचे सगळे शिष्टाचार जसेच्या तसे पाळले जात नसत. मग अण्णांनी बाकी घरांत आचारी म्हणून जाणंच सोडून दिलं. शेवटी शेवटी फक्त आमच्याच घरी येत असत.

अश्या सगळ्या तामझामात बघता बघता पन्नास-एक माणसांचा स्वयंपाक तयार व्हायचा. शेवटी अण्णांची मसाले भाताला फोडणी जायची. तोवर वास सगळ्या घरभर पसरलेला असायचा. आमची पावलं अनेकदा स्वयंपाकघराकडे वळून जायची. इकडे मसाले भात उकळायला लागायचा आणि तिकडे देवघरात आरती सुरू व्हायची... वाफाळलेलं नैवेद्याचं ताट आज्जी देवघरात आणून ठेवायची. वरण भाताचा, मसाले भाताचा, मोदकाचा वास घरभर घुमत असायचा. अण्णा कधीच आरतीला येत नसत. त्यांचा परमेश्वर त्यांच्या भवताली तिथे स्वयंपाकघरात अनेक रूपात सजून नटून सर्वत्र पसरलेला असे. त्याला सोडून ते देवघरातल्या मूर्तीपाशी कसे येतील. राखणीवर ते स्वत: जातीनं थांबायचे. आणि स्वयंपाकघरातूनच मोठ मोठ्याने आरती म्हणायचे. घालीन लोटांगणला तिथेच स्वत:भोवती फिरायचे. आम्हाला ते ध्यान बघायचं असायचं म्हणून आरतीला आम्ही पोरं देवघराबाहेर उभी असायचो. तिथून ते स्वयंपाकघरातलं ध्यान दिसायचं. आम्ही फिदी फिदी हासत असायचो पण अण्णा मात्र तल्लीन होऊन आरती म्हणायचे. देवेला इकडे पुरुषांचे आवाज चढायला लागले की आज्जी म्हणायची, “लागल्या गं बाई भुका पोरांना.. आवाज अगदी पोटातून येतायत...”

प्रत्येक पदार्थाला वाढायला नेण्यासाठी म्हणून वेगळं भांडं आणि वाढायचा वेगळा चमचा. अण्णा कधी वाढायला जायचे नाहीत. मोठ्या पातेल्यांची राखण करत ते स्वयंपाकघरातच थांबायचे. पंगतीत चाललेली तारीफ वाढायला येणाऱ्या बायकांकडून अण्णांना समजायची... एखादी काकू म्हणायची, “अण्णा, चटणीला भरघोस खप आहे. कमी नाही नं हो पडायची...” “काळजी करू नका वहिनी अन्नपूर्णा प्रसन्न आहे.” आण्णांचं ठरलेलं उत्तर. मग आज्जी सांगत यायची, “घारू, मोदक अगदी फक्कड जमलेत हो....” अण्णा छातीवर हात ठेवून किंचित झुकायचे आणि प्रभो... एवढंच म्हणायचे. कौतुक केलं की प्रभो.. हे ठरलेलं.

पहिली पंगत उठली की बायकांची पंगत... त्याआधी अण्णांना जेवून घेण्याचा भरपूर आग्रह व्हायचा पण अण्णा सगळ्या बायकांना पुरून उरायचे. बायकांच्या पंगतीत अण्णा, आणि घरचे पूर्वापार गडी शंकर आणि पार्वती ही तिघं वाढायला मागं थांबायची. आज्जीचा आग्रह असायचा की सगळे एकत्र जेवायला बसू पण अण्णांना ते मान्य नसायचं. “गृहलक्ष्मी सगळ्यांना जेवायला वाढते तिला कुणी वाढायचं...?” अण्णा थांबायचे म्हणून शंकर पार्वतीही थांबायचे. आज्जीला अगदी नको नको व्हायचं पण अण्णा सगळ्यांना आग्रह करून वाढायचे. एवढं सुटलेलं पोट घेऊन हातात एखादं भांड धरून अण्णा उभे राहिले की ते भांड एवढंसं दिसायचं त्यांच्या हातात. तरी वाकून वाढायचे. क्वचित कधी थकून पाटावर बसायचे. “शंकर ऐकू नको वहिनीचं वाढ तू...” आणि वाढलं की, "हांगासं.. "बहुधा त्यांच्या घरी सगळ्या पुरुषांना वाढून नंतर एकटी जेवायला बसलेली त्यांची आई आठवत असावी त्यांना.

बायकांच्य पंगती झाल्या की मोठ्या पातेल्यातलं सगळं अन्नं वाढायच्या लहान पातेल्यात मावायचं... ती सगळी पातेली स्वच्छ निपटून, भांडी घासायला द्यायचं काम सुरू असायचं आणि एकीकडे शंकर पार्वती जेवायला बसायचे. आता आज्जीच्या तोंडचा पट्टा सुरू व्हायचा.. जेवून घे घारू पहिला भांड्यांच बघतील मुली आता. पण अण्णा एकीकडे शंकर पार्वतीलाही आग्रह करून वाढायचे आणि एकीकडे झाकपाक सुरू असायची. पुन्हा एकदा स्वयंपाकघरात पसरलेली अन्नपूर्णा नेटकी मांडून ठेवली जायची... सगळं जागच्या जागी जाऊ लागायचं. ओट्याला लागून असलेल्या एका लाकडी टेबलावर ही लहान पातेली झाकून ठेवलेली असायची. सगळं स्वयंपाकघर झाडून पुसून स्वच्छ केलेलं असायचं. घड्याळात साडे तीन चार वाजलेले असायचे आणि अण्णांचं खणखणीत आवाजातलं वदनी कवळ घेता ऐकू यायचं. एका कोपऱ्यात अण्णा पाट मांडून एकटे जेवत बसलेले असायचे. घरातली सगळी पंच पक्वान्नं डावलून ते फक्त दहीभात आणि लिंबाचं लोणचं एवढंच जेवायचे. आज्जी म्हणायची “एवढं करून अन्नावरची वासना मरते गं.” पण मला मात्र त्यांच्या चेहऱ्यावर निराळं समाधान दिसायचं. ते काय ते तेव्हा कळलं नाही. आज्जी आणि एखादी काकू तिथे थांबायची. बाकी सगळं घर त्याच भल्या माणसाच्या हातचं जेवून वामकुक्षीत घोरत पडलेलं असायचं.

इतक्या भक्तिभावाने रांधलेलं सगळ्या घराच्या अंगी लागलं. रोगराई, हेवे दावे, मतभेद या सगळ्या- सगळ्याला स्वयंपाकघरातली अन्नपूर्णा दूर ठेवते असा अण्णांचा, आज्जीचा विश्वास होता. तो विश्वास सार्थ होता. सगळं घर वर्षानुवर्ष फुलत फळत होतं.

अण्णा थकले तसे मग फक्त आम्हा लेकींना मार्गदर्शन करायला येऊन बसत असत. डोळ्यांना दिसणं बंद झालं होतं. पण वासावरून आमटीत काय कमी आहे आणि किती घाल हे अचूक सांगायचे. त्यांच्या हाताखाली थोडंफार शिकायची संधी मिळाली. भाग्यच लाभलं म्हणायचं. पण पूजेसारखा स्वयंपाक करावा हा संस्कार खूप मोठा होता. माझ्या स्वयंपाकघरात त्याच शिस्तीने, आत्मीयतेने, भक्तिभावाने वावरायचा प्रयत्न करते पण प्रयत्नच. एखादी बट कपाळावरून ओघळते आणि जेवणाऱ्याच्या तोंडात कधीतरी केस येतोच. अंगावर असंख्य डाग पडतात. भाजी स्वच्छ धुतली जात नाही. अश्या वेळी अण्णा आठवत राहतात. अण्णा जोडले गेले आमच्या सगळ्यांच्या आयुष्याला. एक संस्कार त्यांच्या रांधण्यातून आमच्या रक्तात उतरला. तो नुसता शरीराच्या स्तरावर नाही तर आत्म्यावर कोरला गेलेला संस्कार...कधीकधी घडूनही जातं हातातनं सहज... एखादी आमटी घरच्यांना स्वर्गसुख देऊनही जाते.. आणि प्रभो म्हणून छातीपाशी नकळत हात जातो. सगळ्यांना वाढून झाल्यावर तूही बस म्हणून आग्रह होतो आणि मला मात्र स्वच्छ आवरलेल्या स्वयंपाकघरात अपरिमित समाधानाने, तृप्त मनाने कोपऱ्यात बसून साधा दहीभात जेवत बसलेले अण्णा दिसत राहतात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्णन खूप छान...
प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे राहिले

मस्त.

चित्रदर्शी वर्णन! खूप सुंदर!>>>+१

व्वा ! काय सुरेख लिहीलय.

वर्णन खूप छान...
प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे राहिले>>>> हो, अगदी अगदी !

पहिल्यांदा वाटले ते जुन्या माय बोलीवर घारु अण्णा आहेत, त्यांच्यावरच काही लेख आहे की काय. Proud कारण ववि ला त्यांचे फोटो बघीतले होते बर्‍याच वेळा.

छान लिहिलंय!
खूप दिवसांनी लिहिलंत का मायबोलीवर?
सुरुवातीला आजोळ म्हटलंय पण पुढे मामामावशांऐवजी काका-काकूंचे उल्लेख आल्यामुळे जरा गोंधळ झाला.

छानच आहे. मलाही गणपती आणि नवरात्रातलं आमचं गावाकडचं स्वयंपाकघर आठवलं. तिथे अर्थात घारू अण्णानसारख कोणी नसायचं. पण तसाच पवित्र भाव असायचा.

अशा समृद्ध बालपणाचे लेख वाचले की जाणवते किती गोष्टी आपण कधी अनुभवल्याच नाहीयेत, तरीही कुठेतरी त्या अनुभवल्याचे सुख मिळतेय आता.
लेख वाचताना अगदी भरून आले, कर्मयोगी अण्णा.

फूल खूप दिवसांनी तुमचे लेखन वाचले आवडले हे वेगळे सांगणे न लगे पूर्वीच्या अशा भरल्या पुरल्या घरात अशी माणसं म्हणजे आधारवड होती हे आता जाणवत मलाही या लेखाच्या निमित्ताने काहीजण आठवली

क्लासिक ! आमच्या घरी सणा सुदीला एक आचारी येत असत. त्यांची आठवण झाली. आणि रिलेट झाले.

छान! गणपतीचे व नवरात्रीचे दिवस आठवले. आजीची व आईची स्वंयपाकाची लगबग आठवली. नैवेद्य होउपर्यंत लागलेली भूक आणि चोरून खालेल माव्याचे मोदक, लाडू आठवल्रे.
आईचा राग सुद्धा यायचा की, मला का भुकेली ठेवलीय...
काय ती मेहनत, जागरणं आईची तरी डोक्यावर आठी नाही.
मला एकवेळचा चार ठाव स्वंयपाक पण जमत नाही .

छान चित्रण...
फक्त डोळ्यांच्या रंगामुळे असे नाव पडणे.. त्यांना वाईट वाटले असणार...

खूप खूप आभार सगळ्या सगळ्यांचे!
@वावे होय हो खूप दिवसांनी काही पोस्टलं माबो वर... आणि होय तो माझाही गोंधळ झाला खरा... आजोळ म्हणजे दोन्हीकडच्या आजी आजोबांच्या घराला आजोळच म्हणतात असं वाटायचं मला...

मराठीत वेगळा शब्द आहे का दोन्ही आजोळ साठी?
हिंदीत ददीहाल आणि ननिहाल.. दादा दादी आणि नाना नानी वरून..

छान लिहिलंय ...
घारू अण्णा डोळ्यांसमोर उभे केलेत...

अतिशय सुंदर लेख. खुप दिवसांनी एवढं छान व्यक्तिचित्र वाचायला मिळालं. अक्षरशः स्वयंपाक घरात उभं राहुन सगळं पाहिल्याचा फील आला.

खूपच सुंदर लिहिलंय !!! सगळे प्रसंग डोळ्यासमोर घडत आहेत असे वाटले . एवढंच कशाला , मसालेभाताचा वास पण दरवळला मनात . मी कधी एवढ्या लोकांचा स्वयंपाक केला नाही आणि तेवढे धैर्य ही नाही , त्यामुळे अशा लोकांबद्दल मला नेहमी आदरच वाटतो . हल्लीचे राजस्थानी महाराज लोक यांचाच वारसा चालवतात . पण घारू अण्णांचा घरगुती टच यांना असतो का माहीत नाही .

Pages