सकाळपासून अभ्यास करून अश्विन अगदी कंटाळून गेला होता. बारावीचा फक्त उद्याचा एकच पेपर राहिला होता. पण त्या शेवटच्या गणिताच्या पेपरला बोर्डाने चार दिवस सुट्टी दिली होती. त्यापै़की पहिला दिवस आशूने पूर्णपणे टाईमपास करण्यात वाया घालवला होता. कधी पलंगावर लोळ, खादाडीच कर, इंटरनेट सर्फिंग, कधी गोष्टीचं पुस्तकच वाच असे सगळे उद्योग त्याने 'परीक्षेचा शिणवटा' ह्या नावाखाली केले होते. आई सारखी आठवण करून देत होती की तुझी परीक्षा अजून संपलेली नाही, तू वेळ फुकट घालवू नकोस मग शेवटच्या क्षणाला अभ्यास झाला नाही म्हणून दडपण येईल. पण छे!! आशू काही ऐकूच येत नाहीये असं दाखवत होता.
अश्विन तसा जात्याच तल्लख बुद्धीचा होता पण अभ्यासाचा प्रचंड कंटाळा करायचा. त्याउलट त्याचा दादा -- अजिंक्य, अतिशय कष्टाळू आणि अभ्यासाचं महत्व बाळगणारा होता. नुकतंच इंजिनीयरींग संपवून कँपस रीक्रूटमेंटवर एका मोठ्या उद्योगसमूहात नोकरीला लागला होता.
राकेश, अजूदाचा ऑफिसमधला खास मित्र. मूळचा चंद्रपूरचा, पण शिक्षणाच्या आणि मग नोकरीच्या निमित्ताने मुंबईचाच झाला होता. अजूदाबरोबर गणपतीला आला असताना आशूशी त्याच्याशी ओळख झाली होती. अतिशय हुशार, नम्र, स्कॉलरशिपवर शिकून पुढे आलेला म्हणून आशूच्या घरी सगळ्यांनाच तो भावला होता.
निमित्ताने घरी आलेला राकेश मग घरातलाच एक बनून गेला होता. राकेशची बारावीची मेरीट लिस्ट केवळ एका मार्काने हुकली होती. आशू बारावीला आहे हे ऐकल्यावर राकेशने स्वतःहून त्याला गायडन्स देण्याची तयारी दाखवली आणि आशू एकदम खूश झाला होता. वेळोवेळी आता अजूदाबरोबर राकेशचंही मार्गदर्शन त्याला मिळणार होतं.
अश्विनच्या इतर विषयातल्या प्रगतीबाबत अजिंक्य समाधानी होता. पण गणित, आणि त्यातल्या त्यात ट्रिग्नॉमेट्रीचा आशू अगदी कंटाळा करायचा. त्या विषयातले त्याचे मार्क कसे वाढवायचे ह्याबद्दल त्याने राकेशशी भरपूर चर्चा केली होती.
आशूमध्ये मेरीट लिस्टला येण्याचे गूण पूरेपूर आहेत, त्यादृष्टीने त्याची तयारी आहे. त्याचा ट्रिग्नॉमेट्रीचा अभ्यास मी घेईन असे जणू प्रॉमिस करून राकेशने अजिंक्यला निश्चिंत केले होते. वर असेही सांगितले होते की ट्रिग्नॉमेट्रिचे फॉर्म्यूले लक्षात ठेवायच्या ट्रिक्स त्याला शिकवेन पण आत्ता नाही, परीक्षेच्या आदल्या दिवशी. कारण आत्ताच त्याला ट्रिक्स शिकवल्या तर त्याचा पाया पक्का होणार नाही. अजिंक्यला हे पटले होते.
आणि तेव्हापासून राकेश आणि अजिंक्य दोघांनीही आशूला भरपूर ताबडवून घेत होते. त्याची मेरीट लिस्ट जाऊ द्यायची नाही हेच उद्दिष्ट त्यांच्या डोळ्यासमोर होते. ते दोघे घेत असलेली मेहनत बघून आशूचाही आत्मविश्वास वाढला होता.
बोर्डाची परीक्षा चालू होऊन आत्तापर्यंतचे सगळे पेपर्स आशूच्या अपेक्षेप्रमाणे एकदम मस्त झाले होते. आत्ता फक्त उद्याचा एकच पेपर की मग सुटलो बाबा या परीक्षेच्या जंजाळातून..... आशू मनाशी म्हणत होता तेव्हा ट्रिग्नॉमेट्रिचं भूत त्याला वेडावून दाखवत होतं.
पहिल्या दिवशीचे आशूचे चाळे बघून अजूदाने त्याला चांगलेच फैलावर घेतले होते. पेपर गणिताचा होता त्यामूळे बेफिकीर राहून चालणार नव्हते. अजिंक्यने स्वतः दोन पेपर सेट करून देऊन ते सोडवण्यासाठी त्याला लायब्ररीत पिटाळले होते. आपली किती रीवीजन बाकी आहे ते पेपर सोडवतानाच आशूच्या लक्षात आले होते. मग नंतरचे दोन दिवस त्याने मन लावून अभ्यास केला होता. अल्जिब्राचा त्याने फडशा पाडला होता पण ट्रिग्नॉमेट्री मात्र त्याला अजूनही चांगलीच छळत होती. फॉर्म्यूले लक्षात ठेवणे जरा जडच जात होते. आज दुपारी अजूदा राकेशला घेऊन येणार होता लायब्ररीत, आशूला ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्यूले शिकवायला.
त्या दोघांची वाट बघताना कंटाळा आला म्हणून अश्विन चहा प्यायला कँटीनला आला. दोन मित्र भेटले, त्यांच्याशी उद्याच्या पेपरबद्दल चर्चा करून परत लायब्ररीत जात असतानाच त्याला राकेश दिसला, एकटाच घाईघाईत चालत येताना. आशूने अजूदाची चौकशी केली असता त्याला ऑफिसमध्ये अर्जंट काम निघालंय असं उत्तर त्याने दिलं. आशूही 'असेल, असेल' असं म्हणून त्याच्याबरोबर लायब्ररीत जाऊन बसला.
मग पुढचे दोन तास राकेश आणि अश्विन ट्रिग्नॉमेट्रीमध्ये अगदी बुडून गेले. एक एक फॉर्म्यूला राकेशने असा काही सोपा करून दाखवला की आशूला आश्चर्यच वाटलं. त्याला एक वेगळाच आत्मविश्वास जाणवू लागला. उद्याच्या पेपरबद्दल त्याच्या मनात किंचीत सुद्धा शंका राहिली नाही. मग राकेशने पेपरासाठी आणखी काही महत्वाच्या टिप्स दिल्या. साडेचार वाजले तशी घड्याळाकडे बघत, शिकवलेल्या फॉर्म्यूलांची प्रॅक्टिस करण्याबाबत आशूला सांगत राकेश उठला आणि त्याच्या डोक्यावर थोपटत, त्याला बेस्ट लक करत गेला सुद्धा. ह्या दोन तासात भारावून गेल्याप्रमाणे आशू ट्रिग्नॉमेट्रिकडे बघत होता. मेरीटची गुरुकिल्ली जणू त्याला मिळाली होती. मग आठ वाजेपर्यंत आशूने ट्रिग्नॉमेट्रिचा अगदी फडशा पाडला. राकेशने शिकवलेल्या टिप्समुळे त्याला अगदी स्फुरण चढले होते.
लायब्ररीतून तो घरी आला तेव्हाही अजूदा घरी आलाच नव्हता. आई अगदी शांत शांत होती. अभ्यास झालाय ना नीट, पेपर लिहिशील ना व्यवस्थित असं त्याला विचारून जेवायला वाढलं. अजूदाबद्दल विचारलं तर तो ऑफिसमध्ये आहे काहीतरी काम आहे असं उडवाउडवीचं उत्तर देऊन आशूला तिने जबरदस्तीने झोपायला पाठवलं. तिचा आवाज नेहमीसारखा वाटत नव्हता. अजूदा घरी आला नाही म्हणून असेल कदाचित असा विचार करून अश्विनही शांतपणे झोपून गेला.
दुसर्या दिवशी पेपरला जाताना अजूदाचा फोन तेवढा आला, आशूला बेस्ट लक द्यायला. त्याचाही आवाज अगदी खोल गेलेला वाटत होता. एवढं कसलं रात्र रात्र काम करतात, विश्रांती नको का घ्यायला अशी आईजवळ चिवचिव करतच अश्विन पेपरला गेला.
बोर्डाचा शेवटचा पेपर होता, दुसर्या कशाचा विचार करणं सुद्धा टेन्शन देणारं होतं. पेपर मात्र आशूला अपेक्षेपेक्षाही अगदी सोप्पा गेला. काल राकेशने शिकवलेल्या ट्रिक्सचा त्याला अगदी पूरेपूर फायदा झाला. पेपरमध्ये अडलं असं काही नाहीच. झरझर पेपर सोडवून हलकं हलकं होऊन अश्विन आनंदात घरी आला तेव्हा अजूदा घरी आला होता. पण त्याचा चेहरा अगदी उतरला होता. अश्विनला पाहून अजूदाने पेपरची चौकशी केली.
"अरे, एकदम मस्त होता पेपर. ट्रिग्नॉमेट्रिचं काहीच टेन्शन नाही. पेपरचा मस्त फडशा पाडला मी. काल राकेशने अश्या काही सही ट्रिक्स शिकवल्या न अजूदा, की माझी त्याबद्दलची असणारी भिती एकदम नाहिशीच झाली." आशूने अगदी हसतच सांगितलं.
त्याचं हे बोलणं ऐकून अजिंक्य जवळजवळ किंचाळलाच," अरे काय बोलतोयस तू? राकेश येईलच कसा? त्याला तर काल...... काल मोठा अपघात झाला ऑफिसला येत असताना. ताबडतोब त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. भरपूर रक्त गेलं होतं. ऑक्सिजन द्यावा लागला. डॉक्टरांनी भरपूर प्रयत्न केले रे त्याला वाचवायचे पण राकेश.... आपला राकेश गेला रे सोडून आपल्याला..."
अजूदा काय बोलतोय ते अश्विनला कळेनासेच झाले. मटकन तो खुर्चीवर बसला. घराची खोली गरगर आपल्याभोवती फिरत्ये की काय त्याला वाटू लागले. त्याचा चेहरा पांढरा फटफटीत पडला होता......
अजूदा रडतरडतच बोलत होता, " दिवसभर मृत्यूशी झुंजत होता तो. मध्येच जराशी शुद्ध आली तेव्हा नुसतंच आशू, आशू केलं त्याने. मग तो कोमातच गेला. त्याच्या मेरीटच्या सगळ्या आशा त्याने तुझ्यावर केंद्रित केल्या होत्या. तुझी मेरीट लिस्ट चुकू द्यायची नाही असा चंगच त्याने बांधला होता. तो त्याला स्वतःला तुझ्यात बघत होता रे आशू...... गेला सोडून आपल्याला. काल मध्यरात्री शेवटचा श्वास घेतला त्याने आशू.... आशू sss आशू ssss , आई पाणि आण लवकर.... आशूला बघ काय झालंय... कसा पडलाय बघ तो .... आशू sss आशू ssss ...."
-----समाप्त-----
एकदम सहीये !!! मस्त.
कथा छान जमलीये ! मुख्य म्हणजे स्पीड आहे .
ताण
मंजू, कथा म्हणून छान, पण लहान मूले या परिक्षेचे जे टेंशन घेतात ते मला जास्त काळजी करण्याजोगे वाटते. आपण या सगळ्यातून गेलो आहोत, पण त्या काळापेक्षा आजकाल त्याचा खुपच विनाकारण बागुलबोवा करण्यात येतो.
या विषयावर एखादी कथा लिहिता येईल का ?
मंजु, मला
मंजु, मला तितकीशी नाही आवडली कथा. कदाचित, अशाच प्रकारच्या १-२ कथा इथेच आधी वाचल्यामुळे असेल!
हे आपलं माझं मत तुझ्या कथेबद्दल! nothing personal....
छान आहे !
छान आहे कथा ! जुना फॉरमॅट असला तरी वेगळ्या प्रकारे सादर केलायस !
आवडेश
मस्तय. स्टाईल छान आहे मंजूडी... मला आवडली. मला अशा कथा लिहायला जमत नाहीत...
छान!!!
फॉरमॅट जरी जुना असला तरी कथा छान सादर केलीय.
शेवट अनपेक्षित!!!
एकंदरीत प्रयत्न चांगला वाटला
धन्यवाद
संदिप, दिनेशदा, स्वाती, राज्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
चाफ्फा, नुसतंच छान छान म्हणू नकोस. कथांमध्ये सफाई येण्यासाठी तुझ्या मार्गदर्शनाची अतिआवश्यकता आहे.
दाद, कथा चांगली जमली नसली तरी तू आवर्जून पॉझिटिव्ह प्रतिसाद देतेस त्याबद्दल तुझे अनेक अनेक आभार. तुझी प्रतिक्रिया पाहिली की हुरूप वाढतो.
छानच कथा
छानच कथा आहे.आधी नाव वाचुन २-३ दिवस वाचत नव्हतो मग आज वाचलीच्.जमलिय कथा. आधी वेगळच वाटल होत पण निघाल वेगळच
अनपेक्षित
मंजू मस्तच लिहीलीय. रहस्यकथा आहे हे माहित असतं तर कदाचित अंदाज बांधता आला असता. पण त्याचा पत्ता लागला नसल्यानं शेवटी लेखकाला अपेक्षित आणि वाचकांना अनपेक्षित धक्का बसतो. आवडली मला.
तेवढे ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले लक्षात ठेवायची ट्रिक आम्हाला पण कळली असती तर बरं झालं असतं
वेगळी कथा
छान लिहिता तुम्ही... खरे तर नाव वाचुन कथेचा विषय वेगळाच वाटला होता. असे काही रहस्य असेल असे वाटले नाही. त्यामुळे शेवटी धक्का बसला.
Avadesh
Kharach Manju, mastach lihita tumhi.............shevat agadi anpekshit.......
छान
छान जमलिये कथा. ह्या दिवसात तर अगदी मनाला भिड्णारी आहे. परीक्शांचे दिवस आहेत ना.:)
फ्लो आवडला!
कथालेखनाचा फलो आवडला...मंजु चांगलि झालिय कथा..(मेरिट चा बाउ केवळ प्रचंड स्पर्धेमुळेच होतोय्..)
पुन्हा एकदा
सन्मी, चिन्या, रुपाली, सुहास्य, प्राची, प्राजक्ता प्रतिसादाबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार.
रहस्यकथा लिहिण्याची पहिलीच वेळ होती. त्यामुळे कितपत जमेल लिहायला माहित नव्हतं. जसं सुचलं तसं लिहित गेले.
राकेशचं अश्विन मध्ये गुंतणं अजून गडदपणे दाखवायला हवं होतं असं कथा पोस्ट करून झाल्यावर मला वाटायला लागलं. पुढच्या वेळी चूक सुधारायचा प्रयत्न करेन. खरंतर कथा डोक्यात तयार असते पण मी ऑफिसमधून इथे टाईप करते त्यामूळे कॉन्संट्रेशन कमी पडतं इथल्या कागदावर उतरवताना.........
सगळ्यांचेच मनापासून आभार.
मंजु, चक्क
मंजु, चक्क रहस्यकथा...
मस्तच जमलीये. एकदम आवडली. -प्रिन्सेस...
आवडली
आवडली गोष्ट ....हे हुशार दादा लोक असले कि लहानांकडुन उगाच अपेक्षा ठेवतात लोक ..
नुसता वैताग ...
मन्जु छान
मन्जु छान लिहिलेस. चटका लावणारिइ गोष्ट आहे.
कथा छान
कथा छान आहे. उगाच लांबण लावले नाही.