धाग्याचे शीर्षक काहीच्या काही वाटले तरी विषय विवाहीत पुरुषांसाठी गंभीर आहे प्लीज !
काल संध्याकाळची वेळ होती. कानाला हेडफोन लाऊन गाणी ऐकत माझे वर्क फ्रॉम होम चालू होते. अचानक गाण्याचे बीट्स वेगळे वाटले म्हणून हेडफोन काढला तर ते खालून गार्डनमधून ऐकू येत होते. वॉssव नवीन सोसायटीतले पहिले भांडण म्हणून लगेच किचनच्या बाल्कनीच्या आडोश्याला ऊभा राहून मजा लुटू लागलो.
म्हटले तर सोसायटीच्या व्हॉटसप ग्रूपवर शाब्दिक मारामार्यांची काही कमी नव्हती. कोणाच्या घरात चालू असलेल्या ईंटेरीअर कामाचा शेजार्यांना त्रास, तर कोणाच्या एसीतून गळणार्या पाण्याचा खालच्यांना त्रास, कोणाला नॉनवेज आणि मच्छीच्या वासाचा त्रास, तर कोणाला वरच्या फ्लोअरवरील पोरांच्या दंग्याचा त्रास, कोणाची पोरे स्विमिंगपूलच्या पाण्याने पिशव्या भरून रंगपंचमी खेळतात, तर कोणाची लिफ्टची सारी बटणे दाबून पळून जातात. अजून अर्धी जनता अर्ध्या जनतेला ओळखत नाही तरी अमुक तमुक फ्लॅट नंबरचे संदर्भ देत सोसायटी व्हॉटसपग्रूप केवळ भांडणासाठीच वापरला जातो.
नाही म्हणायला कधी स्वातंत्रदिनादिवशी, कधी खर्याखुर्या होळी रंगपंचमी दिवशी, कधी मुलांचे एकत्र खेळतानाचे, नाच करतानाचे, स्विमिंगपूलमध्ये डुंबतानाचे ग्रूप फोटो पडले की सगळे एक होत वाह वाह सुद्धा करतात. पण ते हंगामी असते. मूळ उद्देश भांडणाचाच. जुन्या चाळीतील नळावरची भांडणे आता या व्हॉटसपग्रूपवर आलीत असे म्हणू शकतो. फक्त यथेच्छ शिवीगाळ न करता तुच्छतेने संसदीय आणि व्याकरणद्रुष्ट्या अतिशय चुकीच्या ईग्रजी भाषेत टोमणे मारले जातात. काय करणार, सोसायटी हायफंडू वाटायला हवी तर येत असो वा नसो, ग्रूपवर ईंग्लिश कंपलसरी असे बरेच जणांना वाटते.
तर ते एक असो, ईथे फक्त व्हॉटसप वाचाळवीरच भरले आहेत याला छेद देणारे एक खरेखुरे प्रत्यक्ष भांडण समोर आकार घेत होते. पण ज्या दोन आकारांच्या माणसात ते चालू होते त्यात काही ताळमेळ नव्हता. एकीकडे ९० वजनी गटातील पस्तिशीची महिला, तर दुसरीकडे तेरा-चौदा वर्षांची एक तडतडीत मिरची. आकारांवरून चिडवायचा हेतू नाही, पण पहिल्यांदा डोळ्यात भरले ते त्यांच्या वयासोबत साईजमधील फरक. आणि मिरचीही एवढ्यासाठीच की ती अंगाने अगदीच सडपातळ असूनही त्या दणकट बाईला तोडीस तोड अॅटीट्यूडने ऊत्तर देत होते. स्त्री-सक्षमीकरण म्हणतात ते हेच का म्हणत मी प्रभावित होत त्या मुलीकडे बघत होतो.
त्यांचा वाद कश्यावरून चालू होता हे मी ईथे सांगणार नाही. अपने सोसायटी की बात अपने सोसायटी मे रहे तो ही अच्छा है. पण ती बाई आपल्या लहान पोरासाठी तिच्याशी भांडायला आलेली एवढे समजले. आता त्यात कोण चूक आणि कोण बरोबर याचा मी प्रत्यक्षदर्शी नसल्याने उगाच जज करून सांगण्यात अर्थ नाही. पण एक मात्र नक्की, मुलगी भले अॅटीट्यूड दाखवत असली तरी "आंटी", "आप", "प्लीज" असे शब्द वापरून वयाचा आदर करूनच भांडत होती. (आता आंटी म्हटल्याने जर ती बाई आणखी चिडत असेल तर तो तिचा प्रॉब्लेम)
पण अचानक रंग पलटू लागले. एवढीशी मुलगी आपल्याला दाद देत नाही हे बघून मोठी बाई अचानक तडकली आय मीन भडकली. डोन्ट आर्ग्यू विथ मी, आई विल स्लॅप यू, एक चाटा मारूंगी तो गिर जायेगी यही, तेरी लीडरगिरी तेरे चमचों मे दिखा, मेरे नाद को मत लग..... अचानक हमरीतुमरीची भाषा हातापाईवर आली. आता मात्र ती मुलगी लहान असल्याने घाबरली. रडवेली झाली. ईथे मला कळेना की आता वरतून शुक शुक करत आवाज द्यावा की खरेच ती बाई पटकन काही मारणार नाही यावर थोडा वेळ विश्वास ठेऊन पुढे काय घडतेय ते बघत राहावे. पण नंतर मात्र मला स्वतःचीच लाज वाटली की त्या जागी आपली पोरगी असती तर आपण बाल्कनीतूनच थेट उडी घेतली असती त्या बाईच्या अंगावर, मग दुसर्याच्या मुलीबाबत असे क्षणभर का होईना विचार करत मुखदुर्बळासारखे थांबलो हे चूकच झाले. क्षणभर ईतक्यासाठीच की लगेच तिच्या बाबांनी विंगेतून एंट्री घेतली.
आपल्या लहान मुलीशी एक दांडगट बाई अश्या चाटा मारूंगी वगैरे भाषेत भांडतेय हे ऐकून त्यांचीही नक्कीच सटकली असेल. त्यामुळे ते सुद्धा नरमाईने न भांडता समोर एक महिला आहे हे विसरून आवाज चढवूनच भांडू लागले. ते बघून लगेच त्या बाईसोबत तिच्या घरच्या दोन बायका जे ईतका वेळ बाजूला बसून तमाशा बघत होत्या त्या पुढे सरसावल्या. एक तिच्याच वयाची बहुधा तिच्या नवर्याची बहिण आणि दुसरी तिची म्हातारी सासू असावी. आणि मग बघता बघता माझ्या डोळ्यासमोर त्या भांडणाला असे रूप दिले गेले की पोरांच्या भांडणात हा एक पुरुष बघा कसा बायकांशी दादागिरी करत चढ्या आवाजात भांडतोय. वाढते भांडण पाहून गार्डनमध्ये फेरफटका मारायला आलेल्या अजून दोनचार बायका तिथे जमल्या. त्यांनाही त्या आधीच्या बायकांनी हेच चित्र दाखवले. आणि ईथे मला वाटले की आता त्या बिचार्याच्या मदतीसाठी आपली खाली जायची वेळ आली आहे.
मी तडक बेडरूममध्ये आलो. पँट चढवली. बायकोने विचारले कुठे चाललास आता. तिला एका वाक्यात कोणाचे भांडण चालू आहे हे सांगितले. तसे बायको म्हणाली, "हो, ती पोरगी जरा आगाऊच आहे". सहसा ज्या बायकांची स्वतःची पोरं आगाऊ असतात त्यांना ईतरांचीही आगाऊच वाटतात म्हणून मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि म्हणालो, असेल! .. पण आता मी तिच्या बाबांसाठी चाललो आहे !
ईथे मी लिफ्ट चढवून पँटची वाट न बघता घाईघाईत जिन्याने खाली गेलो तर बघ्यांची गर्दी वाढलेली दिसली. बायांसोबत बाप्येही जमले होते. आणि ते अपेक्षेप्रमाणे त्या बाईचीच बाजू घेत होते. "भाई साहब आपको भाभीजी से ऐसी बात नही करनी चाहिये थी, बच्चों के तो झगडे होते हि रहते है" असे म्हणत त्या माणसालाच खरीखोटी सुनावत होते. पुन्हा माझा मुखदुर्बळपणा आड आला. त्या बाईने एका तेराचौदा वर्षे वयाच्या मुलीशी कशी अरेरावीची भाषा वापरली होती हे मी तिथे सर्वांसमोर सांगू शकलो असतो. पण आपली कोणाशी ओळख नाही, कोण कसा आहे याची कल्पना नाही, आपली पोरं या सर्वांच्या पोरांशी खेळतात. तर उगाच कोणाचीही एकाची बाजू घेत न्यायनिवाडा करण्याऐवजी त्यांच्यात मांडवली कशी होईल हेच मी बघितले. आणि थोड्यावेळाने ती झालीही.
रात्री पोरांना घेऊन मी खाली गार्डनमध्ये गेलो असताना, पुन्हा तो सदगृहस्थ भेटला. आता ओळखीचा झाला होता. संध्याकाळच्या भांडणात मी अगदी त्याची बाजू घेतली नसली तरी त्याच्या बाजूला उभा राहिलेलो हे त्याला जाणवले असावे. त्यानेच मग विषय काढला. त्याने वरून पाहिले होते की ती बाई कशी वचावचा आपल्या मुलीशी भांडत होती. मी सुद्धा त्याला दुजोरा दिला. आणि तेच पाहून मी देखील खाली आलो म्हणालो. तो पुढे म्हणाला की त्याला त्या बाईच्या कानाखाली मारावीशी वाटत होती. मी मनातल्या मनात म्हटले, तुझ्याजागी मी असतो तर मलाही तसेच वाटले असते. पण प्रत्यक्षात त्याने ती मारली नाही हेच चांगले झाले असे वाटले. अन्यथा एका बाईशी नुसते आवाज चढवून बोलले की ती ईतका कांगावा करत असेल तर कानाखाली मारल्यावर बिचार्याला पोलिसच पकडून घेऊन गेले असते आणि माझ्यासारखा एखादा मुखदुर्बळ तेव्हाही चारचौंघासमोर त्याची बाजू घ्यायला घाबरला असता.
पण मग करायचे काय? मुलांच्या भांडणात समोरून त्या मुलाची आई भांडायला आली तर नेहमी आपल्याही मुलांच्या आईला म्हणजे आपल्या बायकोलाच पुढे करावे की पुरुषही भांडलेला चालतो एखाद्या बाईशी? आणि कसा? काय काळजी घ्यावी? कसे शब्द वापरावेत? काय हातवारे करावेत? कितपत आवाज चढवावा?.... आई मीन, नेमके कसे हॅण्डल करावे असे एखादे प्रकरण?
अजूनही त्या सर्वांना पुन्हा
अजूनही त्या सर्वांना पुन्हा बोलवा. व्हिडीओ घ्यायचाय असे सांगून परवासारखे भांडा असे सांगा.
>>>>>>>
सल्याबद्दल धन्यवाद. पण त्याची गरज नाही. एकदा सुरुवात झाली की आता लवकरच होतील चिक्कार भांडणे सुरू. बरी आठवण केलीत. मोबाईलची मेमरी आताच क्लीअर करून ठेवतो. तासभर भांडले तरी आपण कमी पडायला नको
आजकाल बहुतेक सोसायटीच्या
आजकाल बहुतेक सोसायटीच्या आवारात CCTV असतातच ना! जरी आवाज रेकॉर्ड नसेल
>>>>>>>>>
आवाजच रेकॉर्ड नसेल तर मजा काय मजा? जर त्या रामदास पाध्येंनी बोलक्या बाहुल्यांचा खेळ न करता मुक्या बाहुल्यांचा खेळ केला असता तर तो कोणी बघितला असता? प्रत्येक भांडणारे काही शाहरूख आणि काजोल नसतात , नजरेनजरेतच बोलायला.. आवाज तर पाहिजेच !
त्यांना भांडण मिटवायचे नाही
त्यांना भांडण मिटवायचे नाही आहे. भांडण कसे करावे हा प्रश्न आहे.
>>>>>
+७८६
किंवा कसे टाळावे हे समजले तरी चालेल.
त्यांना भांडण मिटवायचे नाही
आमच्या ऑफिसमध्ये जर चुकीचे बटन दाबले तर आम्ही भरभर सर्व बटणे दाबतो, असे केले की.........
>>>>>
असे केले की आमच्याईथे काही रिसेट वगैरे होत नाही. आमच्याईथली मुले बरेचदा सारीच्या सारी बटणे दाबतात.
एकदा मी मुलीसोबत घरी येताना लिफ्टमध्ये शिरलो. आधीच काही बटणे दाबून ठेवली गेली होती. मी डोक्याला हात मारला. पण लेकीने कुठलेतरी बटण दाबले त्यामुळे लिफ्ट त्या मधल्या मजल्यांवर थांबलीच नाही. तिने ती थेट आमच्या मजल्यावरच थांबवली. तिने काय दाबले ते मला कळले नाही. विचारले तर तिने सांगितले नाही.
एका कोणत्यातरी कंपनीच्या
एका कोणत्यातरी कंपनीच्या (बहुतेक Mitsubishi) लिफ्ट मध्ये जर आपण चुकीच्या मजल्याचे बटन दाबले तर तेच बटन पटकन दोनदा दाबून (mouse च्या double click प्रमाणे) चुकीचा call cancel करता येतो.
मोदी शहांना विचारा. अनुभवी
मोदी शहांना विचारा. अनुभवी आहेत.
छान धागा. सध्याच्या काळात असा
छान धागा. सध्याच्या काळात असा धागा गरजेचा होता. ऋ सरांना धन्यवाद.
यातूनच अधिकाअधिक लिहायची
यातूनच अधिकाअधिक लिहायची स्फुर्ती मिळते. शाहरूख मागे एकदा म्हणालेला की त्याचे सर्वात बेक्कार नाईटमेअर आहे की एके दिवशी तो सकाळी उठलाय आणि त्याच्या लक्षात आले की त्याचे स्टारडम सारे गेले आहे. बस्स, हेच दु:स्वप्न कधी खरे होऊ नये म्हणून तो ऊठतो आणि जोमाने कामाला लागतो.
अगदी तसेच मलाही बरेचदा वाटतेय की मी एकटाच धागे काढतोय, एकटाच प्रतिसाद देतोय, कोणाला काही पडले नाही, कोण ते वाचत नाही, पुढे मी काय लिहिणार, काय बोलणार कोणाला उत्सुकता नाही, कोणी विचारत नाही... बस्स, हे दु:स्वप्न खरे होऊ नये म्हणून मी अध्येमध्ये आत्मपरीक्षण करतो आणि नव्या जोमाने लेखणी सरसावत लिहायला घेतो.
- ऋन्मेष
हा प्रतिसाद चित्रपट कसा वाटला या धाग्यावर आहे. त्यावर होणारी चर्चा या धाग्यावर करावी.
Pages