बिन तांदळाच्या ईडली, डोसा, उत्तापा ई. प्रकार ( स्टील कट ओट्स वापरून)

Submitted by मीपुणेकर on 9 April, 2021 - 23:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

उडिद गोटा (साल काढलेले अख्खे उडिद) /जर हे नसतील तर उडिद डाळ - १ कप
पिवळी मूग डाळ - १ कप
स्टील कट ओट्स - १ कप

क्रमवार पाककृती: 

१. उडिद गोटा, मूग डाळ, स्टील कट्स ओट्स हे सर्व जिन्नस एकत्र घेऊन, स्वच्छ धुवायचे आणि रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचे.
२. दुसर्‍या दिवशी सकाळी (किंवा जिन्नस भिजवून ८ तासा नंतर) ग्राईंडर/ मिक्सर मधे वाटून घ्यायचे, व ते फर्मेंट करायला ऊबदार ठिकाणी ठेऊन द्यायचे. थंडी असताना फर्मेंट करण्यासाठी मी ते ईंस्टंट पॉट मध्ये योगर्ट मोड वर सहा /सात तास ठेवते.
३. बॅटर छान फुगून आले/ फर्मेंट झाले कि एका वेळी हवे तेवढे एका बोल मध्ये काढून राहिलेले फ्रीज मध्ये ठेवावे. हे बॅटर ईथे अमेरिकेत ४,५ दिवस फ्रिज चांगले राहते.
४. आता या बॅटर मध्ये मीठ घालून त्याच्या ईडल्या, अप्पे करायचे किंवा लागेल तसं जरासच पाणी घालून डोसे, उत्तापे हे प्रकार करायचे आणि सांबार, चटणी बरोबर हादडायचे Happy

वाढणी/प्रमाण: 
४ जणांना पोटभर
अधिक टिपा: 

जर सगळ बॅटर एका वेळी वापरणार नसाल तर मीठ न घालता फ्रीज मध्ये ठेवायचे, वापरायच्या वेळी मीठ घालायचे.

माहितीचा स्रोत: 
बहिण उडिद डाळ, मूग डाळ वापरून ईडल्या करते, मस्त चविष्ट लागतात त्या. मी बदल म्हणून त्यात स्टील कट ओट्स घालून एकदा केल्या, त्या आवडल्यामुळे आता या पद्धतीने डोसे, ईडली हे सगळे सा. ई. प्रकार जरा बदल म्हणून हेल्दी मोड मध्ये केले जातात :)
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसताएत डोसे.
रेसिपी पण सोपी आहे..करून बघेन.
पण मी आतापर्यंत इनस्टंट ओट्स च आणत होते..स्टिल कट कसे असतात?
कुणी इंस्टंट,स्टिल कट,रोल्ड ओट्स फरक आणि फायदे सांगेल का?

चांगली आयडिया आहे. डोसे छान दिसताहेत.
स्टील कट ओट्स हे जास्त हेल्दी असतात. आमच्या कडे रोल्ड आणि इन्स्टंट ओट्स असतात, स्टील कट ओट्स दिसले नाही कुठे.
-----
आताच पाहिले बिग बास्केटवर आहेत स्टील कट ओट्स.

स्टील कट ओट्स म्हणजे क्लासिक निळे कवेकर ओट चे पाकीट का?ते इन्स्टंट नाहीयेत आणि रोल्ड वाटत नाहीयेत.
डोसे जबरदस्त दिसतायत. आम्ही उडीद आणि ओट चे करतो पण ते थोडे जाड होतात.हे एकदम कुरकुरीत मस्त वाटतायत.

स्टील कट ओट्स हे कमीत कमी processed असतात, त्यामुळे आरोग्यपूर्ण मानले जातात. भारतात मिळतील का याची कल्पना नाही. याचे porridge खूप उत्तम लागते. खिचडी ही छान होते.

@anu त्या पाकिटावर काय लिहिलेय?

अनु स्टील कट ओट्सच्या पाकिटावर स्टील कट ओट्स असे ठळक लिहिले आहे, बिग बास्केटवर बघा.

छान रेसिपी मस्त दिसत आहेत
Big basket वरून मागवलेले स्टील कट ओट्स. चवीला बरे लागले पण शिजायला कठीण. खिचडी इ प्रेशर कुकर मध्ये केलेले बरे.

मृणाली, मानव, अनु, मनमोहन, प्रणवंत, जाई, मेघा धन्यवाद Happy

मृणाली, अनु, वर सगळ्यांनी सांगितल तस स्टील कट ओट्स प्रोसेस्ड नसल्याने जास्त हेल्दी बाकी दोन्ही ओट्स पेक्षा. पण ते ईंस्टंट ओट्स सारखे लगेच भिजवून खाता येत नाहीत, तर प्रेशर देऊन शिजवून मग वापरावे लागतात. खिरी, मूगाची खिचडी , दलिया सारख्या शिजवून करायच्या प्रकारात हे ओट्स पण ढकलायचे Happy

अनु, हे स्टील कट ओट्स ,गव्हाचा बारीक दलिया असतो तसे साधारण दिसतात.
ईंस्टंट ओट्स असतील तर ते पण वापरुन बघु शकतेस. हि मागे मी ईंस्टंट ओट्स वापरून डोसे करायची कृती लिहीली होती -
https://www.maayboli.com/node/55279

पाककृती मध्ये एकच फोटो देता आला. बाकी प्रकाराचे फोटो खाली प्रतिसादात देते Happy

छान आहे. एकुलता एक फोटो ही मस्त आहे!! इडली करून बघेन.
(ते क्लॉकवाईज डोसा - अँटीक्लॉकवाईज डोसा इतकी चर्चा झाली ना त्या 'इंडियन किचन' धाग्यावर की मला आता डोसा करायचीच भिती बसली.... म्हणजे मी बहुतेक क्लॉकवाईजच करत असावे पण न जाणो अँटीक्लॉकवाईज पण जमत असेल तर फ* म्हणताच ब्रह्महत्या..... )

माझ्याकडे रोल्ड ओट्स आहेत आणि डबा ही नुकताच आणलाय. ह्या वर दिलेल्या प्रकारात ते वापरता येतील का? फुगीर ब्राउन राईस नाहीये माझ्याकडे. तर माझ्याकडचे ओट्स कसे वापरायचे हे सांगाल?

वर दिलेल्या पद्धतीने केलेल्या बॅटरचे हे बाकी प्रकार -

१> मसाला डोसा
Oats_Dosa2.jpg

२> कांदा उत्तापा, जवस चटणी स्प्रेड करून

Uttapa_Oats.jpg

३> ईडली सांबार. या ईडल्या पांढर्‍या शुभ्र दिसत नाहीत पण चव चांगली लागते. (गोरे रंगपे न ईतना गुमान कर / हम सावले हुवे तो क्या हुवा चववाले है Wink )

Idly_Oats2.jpg

४> अप्पे रस्सम चटणी

Oats_appe.jpg

सी, धन्यवाद! बाकी क्लॉकवाईज, अँटीक्लॉकवाईज दोन्ही प्रकारे डोसे करुन बघ आणि फोटो आण ईकडे Wink
हो तो सिनेमा बघितला आता त्या बीबी वरची चर्चा घेते वाचायला Happy

@peacelily202, हो! रोल्ड ओट्स फक्त स्टील कट ओट्स एवढे जास्त वेळ भिजवायला नाही लागणार.
उडिद, मूग डाळी वाटायला घ्यायच्या आधी १५, २० मि. रोल्ड ओटस पाण्यात भिजवा आणि मग डाळींबरोबर वाटून घ्या.

आम्ही पण ओटस चे डोसे करतो(निळ्या क्वेकर पाकिटात जे काही मिळतात त्याचे)
मला या धाग्याचं कौतुक यासाठी आहे की डोसे नीट ग्लेझ(चमक) आलेले, एकदम कुरकुरीत दिसत आहेत.आमचे थोडे 'उडीद ओटाची पातळ धिरडी' फ्रेज कडे जातात Happy
या रेसिपीने करून बघतेच.

छान दिसतायत डोसे!
पँडेमिक काळात इंग्रोतून आणलेला तांदूळ पुरवायचा म्हणून मी गेले वर्षभर इडली डोसे यासाठी गावातल्या दुकानातले ओट्स वापरतेय. काही वेळा ओट्स ऐवजी पर्ल बार्ली वापरते.

डोसे खूपच मस्त , चकचकीत आणि क्रिस्पी दिसत आहेत.
मी नेहमी करते स्टील कट ओट्स चे डोसे आणि उतप्पे .

हा मध्ये केलेला डोसा
117753068_3367584133262267_1387023470310144083_n_0.jpg

अनु, प्राजक्ता, स्वाती२, अमित, क्रिशा, राखी, अंजली, peacelily2025 धन्यवाद Happy

अजून एक म्हणजे, हे डाळी, ओट्स मिक्सर मधे पटकन वाटून बारीक होतं, तांदूळ बारीक वाटायला त्या मानाने जास्त वेळ लागतो.

@क्रिशा, डोसा मस्त कुरकुरीत दिसत आहे !

@स्वाती२, बार्ली मी अजून वापरली नाही. क्रिशा पण वापरते बहुतेक . आता बार्ली आणून करुन बघेन Happy

@peacelily2025, अरे वा , आवडलं ना, मग झालं तर Happy

Back to top