शर्यतीचे अडथळे: ससा आणि कासव दोघंही वेगळे!

Submitted by मार्गी on 25 March, 2021 - 10:03

नमस्कार. सध्याचा काळ हा असा आहे की कोणाशीही बोलताना आधी एक वाक्य बोलावं लागतं. आपण सर्व ठीक आहात ना? सर्व जण ठीक असतील आणि राहतील अशी आशा करतो आणि काही गोष्टी बोलतो. नुकताच दोन जवळच्या लहान मुलांच्या मस्ती मजा आणि भांडणाचा प्रसंग घडला. अगदी छोट्या छोट्या गोष्टींना मुलं कशी प्रतिसाद देतात आणि कसे वागतात हे बघायला मिळालं. आणि त्या प्रसंगामुळे काही गोष्टींची जाणीवही झाली. त्यासंदर्भात काही गोष्टी आपल्यासोबत शेअर करतो.

माझी मुलगी अदू आणि तिच्या स्मिता आत्याचा मुलगा प्रसन्न. दोघंही खूप गोड बाळं. अदूला तर मी लहानपणापासून शुद्ध प्रसन्नता म्हणतो. अशी ही प्रसन्नता आणि तो प्रसन्न! दोघं ब-याच काळानंतर आणि लॉकडाउननंतर सोबत भेटले तेव्हा सुरुवातीला खूप उत्साहाने खेळले आणि मस्ती करत होते. नवीन भेटीला खूप एंजॉय करत होते. लॉकडाउनमध्ये मित्र- मैत्रिणींसोबत खेळणं हा प्रकार मुलांनी अतिशय जास्त मिस केला. आणि मुलांच्या अंगात इतकी ऊर्जा असते की आपल्याला त्यांना किती त्रास होत असेल ह्याची‌ कल्पनाही येत नाही. ज्यांच्या अंगात इतकी ऊर्जा सळसळत असते की ते दोन मिनिटही शांत बसू शकत नाही, त्यांना दिवस, महिने नाही तर वर्षभर शांत राहावं लागणं ही किती मोठी शिक्षा असेल!! पण मुलांची‌ क्रिएटिव्हिटी इतकी जबरदस्त असते की, ते त्यातूनही बरोबर मार्ग शोधतात! एकटी खेळत असतानाही इतरांच्या सोबत खेळत आहेत असा गोंगाट करतात आणि कल्पनेतून आनंद घेतात!

तर अदू आणि प्रसन्न सोबत खेळत असताना सुरुवातीचा आनंदाचा भर ओसरल्यावर त्यांच्यात एक वेगळीच गोष्ट सुरू झाली. प्रत्येक गोष्टीमध्ये ते एकमेकांसोबत तुलना आणि स्पर्धा करायला लागले. एकमेकांसोबत खेळणं व खेळ शेअरिंग करून खेळता खेळता एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनले. आणि हे बघ मी किती मोठं करतो, तुला येतं का असं त्यांचं बोलणं सुरू झालं. आणि नंतर तर ते पुढे वाढतच गेलं. त्यातच अनेकदा छोटी मुलं मोठ्या मुलांकडून ऐकू नयेत अशा गोष्टी ऐकतात आणि अबोध प्रकारे त्या बोलतात. त्याचाही दुस-यांना त्रास होतो. अशा वेळेस त्यांना शांतपणे सांगावं लागतं. आणि मुळात मुलांना शांत बसा हे ओरडून सांगायचंच नसतं. उलट त्यांचं जास्त ऐकून घ्यायचं‌ असतं. त्यामुळे मुलं शांत होतात.

पण हे बघताना कुठे तरी जाणवलं की, आपण मुलांना जे वातावरण देतोय त्यातून त्यांना अनेक गोष्टी मिळत आहेत. आणि "मोठ्यांच्या" जगामध्ये जे रोग पसरलेले आहेत त्याची लागण त्यांच्या भावविश्वालाही झालेली आहे. मोठ्यांचा एक खूप मोठा रोग म्हणजे स्पर्धा किंवा शर्यत! अगदी सदैव लहनापणापासून आपल्याला स्पर्धा किंवा शर्यतच शिकवलेली असते. मग ती गोष्ट परीक्षेतल्या मार्क्सची‌ असेल किंवा कोण लवकर जेवतो ही असेल. अनेक ठिकाणी सातत्याने हेच सांगितलं जातं. सगळ्यांनी लहानपणी ऐकलेली ती ससा आणि कासवाची गोष्ट! त्या गोष्टीतली गंमत व मजा नाकारता येणार नाही. आणि त्यामध्ये जो संदेश आहे तोही चांगला आहे की जो सातत्याने प्रयत्न करतो तो जिंकतो. त्याउलट जो एकदमच जोर लावतो आणि सातत्य ठेवत नाही तो हारतो. एका मर्यादित अर्थाने हा संदेश चांगला आहे. पण तरीही त्यामध्ये कुठे तरी शेवटी "हार" आणि "जीतच" सांगितली जाते. आणि मुळात ससा आणि कासव हे किती वेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत हेच सांगितलं जात नाही. ससा हा वनामधला तृणभक्षी प्राणी तर कासव हा मुख्यत: जलाशयाजवळ राहणारा उभयचर आणि सरीसृप प्राणी! दोघांच्या शरीर रचनेमध्ये आणि प्रकृती- प्रवृत्तीमध्ये किती मोठा फरक! आणि दोघांची शर्यत लावण्याची कल्पनाच मुळात किती निर्बुद्धपणाची असेल!

निसर्गामध्ये कोणाचीच कोणाची रेस नसते. प्रत्येक जण त्याच्या त्याच्या प्रकृती- प्रवृत्तीनुसार आणि स्वभावानुसार विहरत असतो. पण नकळत आपण मुलांना ह्या चुकीच्या गोष्टी सांगतो. त्यातून मग प्रत्येक गोष्टीमध्ये स्पर्धेची किंवा शर्यतीची भावना येते. आणि त्यातूनच मग मुलं ताण करून घेतात आणि पुढे पुढे ह्यातूनच मानसिक त्रासही मुलांना होतात. त्याउलट त्यांना प्रत्येक जण किती युनिक आहे, किती वेगळा आहे हे सांगायची‌ मोठी गरज जाणवते. दोघं सोबत खेळत असतील तर दोघांनी एकमेकांशी तुलना न करताही किती सुंदर खेळता येऊ शकतं हे त्यांना अनुभवण्याची संधी द्यायला पाहिजे. किंवा जर एकच खेळ असेल तर एकाने तो खेळावा व दुस-याने त्याला प्रोत्साहन द्यावं, मदत करावी व आलटून पालटून दोघांनी तो खेळावा असं त्यांना सांगायला पाहिजे. पण पालक म्हणून आपल्याला त्याची आधी सवय असायला पाहिजे. जर तुलना आणि स्पर्धेचं विष आपल्याच मनात असेल तर आपण मुलांना ते कसं सांगू शकणार? दोघं सोबत खेळताना अजिबात तुलना मध्ये येऊ न देता दोघंही वेगवेगळं आणि सुंदर खेळू शकतात किंवा अगदी वेगळी चित्र काढू शकतात किंवा खेळण्यांमधून वेगळीच काही गंमत करू शकतात, असं वातावरण त्यांना द्यायला पाहिजे. आणि ही गोष्ट इतकीच नाही. नकळत आपण स्त्री- पुरुष तुलना मुलांना सांगत असतो. हे बघ मला किती चांगलं जमतं, बाबाला जमतं का, असाही सूर अनेक ठिकाणी आढळतो. इथेही पालकांनी स्वत: आत्मपरीक्षण करायला पाहिजे आणि स्वत:मध्ये हे स्पर्धेचं किती विष भिनलंय हे समजून घ्यायला पाहिजे! आणि तुलना किंवा स्पर्धेऐवजी प्रत्येकाला जे आवडतं ते कसं सुंदर करता येईल असा विचार करायला पाहिजे. असं पालकांनी केलं तरच हे शर्यतीचे अडथळे हळु हळु दूर होऊ शकतील! पण पालक तर स्वत:च मुलांना खोटेपणा आणि पॉलिटिक्स शिकवत असतात!

अदू व प्रसन्नच्या खेळामध्ये व गमतीमध्ये एक गोष्ट मात्र जाणवली की मुलं एकमेकांवर नाराज असली व भांडत असली तरी त्यांनाही काय चुकतंय ह्याची आतून जाणीव असते. गरज असते ती त्यांना ऐकून घेण्याची व शांत प्रकारे त्यांना जवळ धरून समजुत काढण्याची. आणि आपण असं थोडं जरी केलं तर मुलं आपल्याहून जास्त मॅच्युरिटी दाखवतात. आणि मुलं अगदीच साजुक तुपातली राहू नयेत म्हणून पालकांनीही मुलांसोबत गमती गमतीमध्ये भांडलं पाहिजे. मी तर अदू सायकल चालवताना तिच्या वाटेमध्ये येऊन तिला गमती गमतीमध्ये अडवतो! एकदम मध्येच येऊन अडथळा आणतो. म्हणजे उद्या तिला सायकल चालवताना कोणी मध्ये आला तर तिला ते अगदीच नवीन नसेल. प्रसन्नने एक प्रश्न खूपच मोठा विचारला. एकदा एका मुलीसोबत त्याचं भांडण झालं आणि त्याला खूप राग आला आणि त्याने तो लगेच बाहेर काढला आणि तिला मारलं. नंतर सगळं शांत झाल्यावर मला भेटला तेव्हा त्याने मला विचारलं निन्नू (म्हणजे निरंजन मामा), मला सांग मला राग आला तर मी काय करू रे? मी माझा राग कसा बाहेर काढू? पाच वर्षांच्या मुलाच्या ह्या प्रश्नाने मला अवाक् केलं. काय उत्तर सांगणार! आणि हा प्रश्न खरं तर इतका मोठा की त्याला उत्तर देऊन थोपवायचं का, हाही प्रश्न पडला. थोडा विचार करून मग हळुच सांगितलं की, तुला जर राग आला ना तर तू जरा मस्त पळून ये किंवा जोराने पाय आपट किंवा जोराने ओरड.

आज मुलांना आपण अगदी आदर्श वातावरण देऊच शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. आज सगळ्या गोष्टी इतक्या बदलत आहेत की परिपूर्ण असं आपण काहीच देऊ शकत नाही. आपण कितीही प्रयत्न केला तरी मुलं कार्टून बघणार आहेत आणि मोबाईलही धरणार आहेत. समाधान एका गोष्टीचं वाटतं की, मुलं सध्या इतकी मोबाईल बघत आहेत की, हळु हळु कदाचित ते स्वत:हूनच मोबाईलला कंटाळतील आणि मग त्यातून मुक्त होतील. पण मुलांसोबत एक गोष्ट नेहमी खरी असते की, आपण काय करतो किंवा काय सांगतो ह्यापेक्षा आपण काय आहोत, हे मुलं खूप नीट बघत असतात. आणि आपलं being त्यांच्यापर्यंत बरोबर पोहचत असतं. त्यामुळे मुलांना शब्दाने किंवा ओरडण्याने एखादी गोष्ट सांगून जितका फरक होत नाही तितका त्यांना ती गोष्ट आपल्या being मधून- आपल्या स्वत:च्या असण्यातून सांगण्यामधून पडू शकतो.

स्पर्धेपेक्षा वेगळं दुसरंही काही असू शकतं. आणि ते म्हणजे स्पर्धेऐवजी प्रेम. संगीत किंवा गणितासंदर्भात चढाओढ नाही तर तल्लीनता, त्याचा आनंद व त्या गोष्टीचं प्रेम. आणि खरं शिकणं हे प्रेम असताना व आवड असतानाच शिकता येतं. पण तसं कुठेच होत नाही. एखादी गोष्ट मनातून येऊन ती स्वत:हून शिकणं होत नाही आणि सगळं बाहेरून लादलं जातं. विचारवंत इमर्सनने एका युवकाचं कौतुक करताना एक गोष्ट सांगितली. तो त्याच्या गावातला पहिला ग्रॅज्युएट होता. लोकांनी इमर्सनला म्हंटलं की, तो आमच्या गावातला पहिला ग्रॅज्युएट आहे, त्याबद्दल तुम्ही काही बोला. तेव्हा इमर्सन बोलला की, मी‌ आधी महिनाभर त्याला भेटेन, त्याची ओळख करून घेईन आणि मगच बोलेन. महिन्यानंतर इमर्सन परत लोकांना भेटला आणि त्या युवकाबद्दल त्याने मत दिलं. तो म्हणाला की, हा युवक खरोखर कौतुकास्पद आहे, तो अद्भुत आहे. आणि मी त्याचं कौतुक ह्यामुळे करतो की, युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेऊनही त्याने आपली प्रतिभा वाचवली आहे! त्याची प्रतिभा अद्याप टिकून आहे!

- निरंजन वेलणकर 09422108376 niranjanwelankar@gmail.com अदूला लिहिलेली ६ वाढदिवसांची पत्र व माझे बाकी लेख इथे उपलब्ध: www.niranjan-vichar.blogspot.com

Group content visibility: 
Use group defaults

लेख आवडला.

पण तरीही त्यामध्ये कुठे तरी शेवटी "हार" आणि "जीतच" सांगितली जाते. आणि मुळात ससा आणि कासव हे किती वेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत हेच सांगितलं जात नाही >>> हे सगळ्यात जास्त आवडलं.

पण निसर्गात रेसच नसते हे मात्र तितकंसं बरोबर वाटलं नाही.

सुंदर लेख! ससा आणि कासव वेगळे प्राणी आहेत हा दृष्टिकोन फारच पटला.
रमड, स्पर्धा ही मानवी भावना आहे. निसर्गात ही भावना नाही. Each ecosystem just maintains a dynamic equilibrium without any cognizance.

रमड, स्पर्धा ही मानवी भावना आहे. निसर्गात ही भावना नाही. >>> भावना नसली तरी स्पर्धा असतेच. उदा: रेनफॉरेस्ट मधे खाली पडलेल्या बियांमध्ये सर्वात आधी उगवून लवकरात लवकर वर जाऊन प्रथम सूर्यप्रकाश कोण मिळवेल ही स्पर्धाच झाली. पशुपक्ष्यांमध्ये पार्टनर मिळवण्यासाठी नुसती स्पर्धाच नव्हे तर अगदी हाणामारीही होते. ससा आणि कासव यांची स्पर्धा नसेल पण ससा आणि ससा यांची स्पर्धा असू शकते.

आपल्या समाजात जी "स्पर्धा" म्हणून ओळखली जाते ती तशी स्पर्धा निसर्गात नसते असं मला वाटतं. निसर्गात जे घडतं तो निसर्गनियम आहे. There is an element of competition but it is not a competition per say. It is part of the survival process. मला काय सांगायचं आहे ते नीट सांगता येत नाहीये बहुतेक. Basically, निसर्गातली स्पर्धा आणि आपल्या मानवी व्यवहारांमध्ये असलेली स्पर्धा या दोन्ही वेगळ्या आहेत.

लेख खूप छान आहे. प्रतिसादही आवडले.
निसर्गात प्राण्यांमध्ये स्पर्धा ही वंशसातत्य राखण्यासाठी आणि अन्न मिळवण्यासाठी आहे. मानवाच्या ह्या दोन्ही गरजा भागल्या तरी इर्षा असते. जोडीला समोरच्याशी तुलना ही.

दोघांच्या शरीर रचनेमध्ये आणि प्रकृती- प्रवृत्तीमध्ये किती मोठा फरक! आणि दोघांची शर्यत लावण्याची कल्पनाच मुळात किती निर्बुद्धपणाची असेल!>>> हे पटलं पण आणि नाही पण असं काहीसं झालं. असं फक्त एकच गोष्टीत नाहीये. माकड आणि मगर यांची मैत्रीची गोष्ट, कोल्हा आणि करकोचा यांची मैत्री गोष्ट . बोधपर गोष्टीत असं विजोड असतच.

निसर्गामध्ये कोणाचीच कोणाची रेस नसते. >> हे तितकंसं खरं नाही, याच कारण निसर्गात असलेले घटक (रिसोर्सेस) उ.दा. पाणी आणि वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे काहीठिकाणी सूर्यप्रकाश सुद्धा मर्यादित आहेत. त्यामुळे रेस हि आलीच.

प्रत्येक जण त्याच्या त्याच्या प्रकृती- प्रवृत्तीनुसार आणि स्वभावानुसार विहरत असतो >> हे अगदी खरे आहे. खर तर अनेक प्रकारच्या रेस अस्तित्वात आहेत, अगदी मानवाच्या उत्पत्ती पासूनच. पण आपल्या प्रवृत्ती नुसार आवडी नुसार कोणत्या स्पर्धेत आपण उतरावं हे ठरवणं. जसे झाडे पळण्याच्या शर्यतीत भाग घेऊ शकत नाही. पण प्रत्येक किंवा चुकीच्या शर्यतीत मी उतरायचे आणि जिंकायचेच असा अट्टाहास बाळगणे हा मूर्खपणा आहे.

ससा आणि कासवाची गोष्ट हि फक्त प्रयत्नात सातत्य या गोष्टीचे महत्व बिंबवणे एवढाच आहे. तो बोध घेतला कि झालं, बाकी त्या वयात या टेक्निकल अनालिसिस करून काही फायदा नाही.

रमड +१. वंशसातत्य आणि अन्न ह्या गरजांनंतरही इर्षा असते तसेच प्रेम, माया इ सुद्धा असते. प्राणीजगात अपत्य जरा धावायला लागले की त्याचं ते सगळं करत, आजारी प्राण्याला सोडून कळप पुढे निघून जातात, मेलेल्याचा क्षणभर शोक करतात पण कबरी बांधत नाही की जयंत्या-मयंत्या होत नाहीत.

इर्षाविरहीत प्राण्यासारखं जगायचं असेल तर पूर्णच तसं जगावं. अन्यथा जसं मानवी आयुष्यात आनंदासाठी प्रेम, माया आहे तसेच स्पर्धाही आहे हे मनापासून स्वीकारावे. (अति करू नये हे मान्य.)

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद! अनेक प्रकारे चर्चेत इतकी भर घातल्याबद्दल धन्यवाद! Happy

मी एका अँगलने मुद्दे मांडले होते व बाकीचे अँगल्सही अर्थातच महत्त्वाचे आहेतच. नैसर्गिक स्पर्धा तर असतेच प्रत्येक ठिकाणी.

आणि हेही खरंय की माणूस कितीही अनैसर्गिक वागत असला तरी शेवटी तोही निसर्गाचाच भाग आहे. पण फरक इतकाच की ज्या गोष्टी सुंदर प्रकारे करता येतात त्या ताण घेऊन का कराव्यात. जिथे आनंद मिळू शकतो तिथे त्रास का करून घ्यावा. आणि ताण असेल तर डोळसपणाही असावा म्हणजे उद्या त्या ताणामधून शिकताही येत जाईल. खूप खूप धन्यवाद.

Back to top