( वीक एंड लिखाण. )
मी गेल्या आठवड्यात वीक एंड लिखाणात असे म्हणालो होतो की कविता जर स्फुरली तर आकार घेताना ती खूप प्रभावी बनते, कवीला अशा रचनेतून खूप आत्मानंद मिळतो आणि वाचक रसिकांच्या पण मनालाही भिडते. असाच अनुभव मला माझ्या एका दुसर्या कवितेबाबतही आला. हा अनुभव मी आपल्यांशी आज शेअर करत आहे.
मी कविता रसिक मंडळी ( करम ) या व्हाट्सॅप समूहाचा सदस्य आहे. आता करोनामुळे कार्यक्रम थोडे कमी झाले आहेत. या समूहातर्फे काव्य संमेलने, गझल मुशायरे, मुलाखती, चर्चा असे उपक्रम राबवले जायचे. या समूहाचे वैशिष्ट्य म्हणजे सहसा कोणी धजावणार नाही असे सामाजिक विषय घेवून कार्यक्रम व्हायचे पुण्यात. अनेक कार्यक्रमापैकी विशेष उल्लेख करावा असे दोन कार्यक्रम झाले ज्यात तृतीय पंथी लोक आणि वेश्या व्यवसाय हे दोन विषय आभ्यासपूर्ण पध्दतीने हाताळले गेले. या सार्याचे श्रेय अॅडमिन श्री भूषण कटककर उर्फ "बेफिकीर" यांना जाते.
जो कार्यक्रम वेश्या जीवनावर झाला त्यात दोन वेश्यांना पण पाचारण करण्यात आले होते. त्यांना मंचावर बोलावून त्यांच्या मुलाखती घेतल्या ज्या खूपच रंगल्या. त्या दोघींनी जीवनातील अनुभव सांगितले ते काळजाला अक्षरशः चरे पाडणारे होते. अगदी मनमोकळेपणाने दोघींनीही आपली व्यथा/कथा सर्वांशी शेअर केली. पूर्ण सभागृह सुन्न झाले होते. एका वेश्येला शेवटी विचारले की तुझी या क्षणाला काय महत्वाकांक्षा आहे. तिने प्रेक्षकात बसलेल्या तिच्या १० वर्षाच्या चिमुरड्या मुलीला उभे केले आणि गहिवरून सांगितले की मी जे भोगले ते या निष्पाप मुलीच्या वाट्याला बिलकुल येवू नये. आणि धीरगंभीर वातावरणात कार्यक्रमाचा पहिला भाग संपला. नंतर कविसंमेलन होवून कार्यक्रमाची सांगता झाली.
हा कार्यक्रम झाल्यानंतर मी झपाटूनच गेलो. का असे जीवन कांहीच्या वाट्याला येते हा प्रश्न मला सतावत होता. त्या दोघींचे असाह्य चेहरे माझा पाठलाग करत होते. एक आठवडा असा तगमगीत गेला आणि ही कविता कलमेतून झरली न म्हणता ओघळली असेच म्हणेन. माझ्या सर्व गंभीर कवितांचा शेवट नेहमी सकारात्मकच असतो. पण या कवितेबाबत मी असे नाही करू शकलो! माझ्या दॄष्टीने ही कविता अपूर्ण आहे. माझा नाविलाज होता. वेश्यांच्या जीवनातील अंधार संपण्याची मला सुतरामही शक्यता दिसत नव्हती. म्हणून या अर्धवट कवितेला वाचक मायबापानी पदरात घ्यावे. कविता सादर करतोय.
व्यथेची गाथा
माझी ही अवस्था
कळेना त्रयस्था
अनाथाच्या नाथा
जीवघेण्या व्यथा
वाचली कधी का देवा
वेश्येची ही गाथा? ||१||
गवाक्षी बैसणे
सावज हेरणे
अंग हे देखणे
बाजारी विकणे
देवा हेच का रे
जीवन जगणे? ||२||
रिती झाली खाट
दुसऱ्याची वाट
मांडलाय पाट
मी उष्टावलेलं ताट
देवा मला देशील का रे
उगवती पहाट? ||३||
अंगाची चुरगळ
मनाची मरगळ
ऋतु पानगळ
अश्रूंची घळघळ
देवा कळते तुला का रे
मनाची भळभळ? ||४||
देहाचा देव्हारा
पावित्र्य पोबारा
ज्वानीचा पेटारा
अब्रूचा डोलारा
देवा दिला का रे मज
अग्नीचा फुलोरा? ||५||
गिधाडांची भीड
समाजाची कीड
अंतरीची पीड
संस्कृतीची चीड
नावेला दे दिशा देवा
भरकटणारे शीड ||६||
देह हा झिजला
श्वासही थिजला
अश्रूंनी भिजला
श्रावण भाजला
अंधारही माझा देवा
कसा रे विझला? ||७||
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. नं. ९८९०७ ९९०२३
मनाला भिडणारी कविता.. आणि लेख
मनाला भिडणारी कविता.. आणि लेख..!!
समाजातील असहाय्य घटक असलेल्या स्रियांच्या व्यथा कवितेतून अगदी हृदयस्पर्शी शब्दांत मांडल्या आहेत.
नि:शब्द!
नि:शब्द!