लिफ्टमधून बाहेर येऊन अमृताने तिच्या आठव्या मजल्यावरील फ्लॅटचे दार लॅच कीने उघडले. भराभर सगळे लाइट्स लावून, बेडरूमचा एसी चालू करून ती रेस्टिंग चेअरवर रिलॅक्स होऊन रेलली. डोळे मिटून ती आशुतोष बद्दलच्या विचारांत हरवली. "काय करत असेल अाशु? एव्हाना पोहोचला असेल का बंगलोरला?? उद्या त्याला आपल्या फ्लॅटचा ताबा मिळेल. पुढच्या विकेंडला जाऊया बेंगलोरला फ्लॅट बघायला म्हणजे इंटेरिअर डिझाइनर सोबत बोलून, ठरवून, लग्नाआधीच फ्लॅट डेकोरेट करून घेता येईल."
दोन वर्षांपूर्वी आशुतोष जोशीचे shubhvivah.com वरील प्रोफाइल पाहून अमृताने त्याला ईमेल केले. दोघेही एकमेकांना भेटले. दोन तीन भेटींतच दोघे एकमेकांना अनुरूप वाटले आणि त्यांनी लग्न करायचे ठरवले. साधारणतः तिशीची अमृता साने, मुळची नाशिकची, कॉम्प्युटर सायन्समध्ये एमटेक झालेली, मोठ्या मल्टिनॅशनल आयटी कंपनीत सिस्टीम्स मॅनेजर, मुंबईतील पॉश एरियात भाड्याने वन बेडरूम फ्लॅट घेऊन राहत होती. तिचे वडील तिच्या लहानपणीच गेले. शिक्षिका असलेली आई अमृताच्या लहान भावाबरोबर नाशिकमध्ये राहात होती. बाळपणीच आईला पारखा झालेला, दिसायला अत्यंत देखणा आशुतोष त्याच्या वडिलांचा एकुलता मुलगा. बीटेक झाल्यावर लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन आयआरएस ऑफिसर म्हणून बेंगलोरला पोस्टेड होता. त्याच्या वडिलांचा इम्पोर्ट एक्स्पोर्ट चा मोठा बिझनेस होता. त्यानिमित्त सध्या बऱ्यांच दिवसांपासून ते कॅनडा मधे रहात होते. दोन तीनदा प्रयत्न करूनही अमृताचा आणि तिच्या आईचा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता. आशुतोष मध्ये नाही म्हणण्यासारखे काहीच नसल्याने, अमृताच्या आईची या लग्नाला हरकत असण्याचे काहीही कारण नव्हते. फक्त एकदा तिला त्याच्या वडिलांना भेटायची इच्छा होती. पण या ना त्या कारणाने अजूनही त्यांच्या भेटीचा योग आला नव्हता.
गेल्या दोन वर्षांत आशुतोष सोबत घालवलेले सुंदर क्षण अमृताच्या मिटल्या डोळ्यांपुढे साकारत होते. गोड, आर्जवी बोलणे असलेला, हसरा आशुतोष पहिल्या भेटीतच तिच्या मनात भरला होता. बर्याचदा वीकेंडला अमृताला भेटण्यासाठी तो फ्लाइटने बेंगलोरहून मुंबईला यायचा. त्याच्यासोबत हॉटेलिंग, शॉपिंग, सिनेमा यांत दोन दिवस कसे जायचे तिला कळायचेही नाही. त्याच्या सोबत जागवलेल्या बेभान, धुंद रात्री आठवून आत्ताही तिच्या अंगभर रोमांच फुलले.
लग्न दोन महिन्यांवर आले होते. दोघांनीही कोर्ट मॅरेज करून अगदी जवळच्या नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींना जंगी पार्टी द्यायचे ठरवले होते. भारी सॅलरी पॅकेज असलेल्या अमृताने आपल्या पगारातून स्वतःचे घर खरेदी करण्यासाठी पहिल्यापासूनच पैसे बाजूला ठेवले होते. तिचे स्वतःचे घर - संसाराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार होते. आशुतोषने बंगलोरला एका ब्रोकरच्या मार्फत दोन बेडरूम्स चा फ्लॅट बुक केला होता. नव्वद लाखांच्या फ्लॅटसाठी त्याने वीस लाख कर्ज काढून बाकीचे पस्तीस-पस्तीस लाख दोघांनी टाकायचे ठरवले होते. अमृताने परवाच बंगलोरमधील तन्मय गोस्वामी नावाच्या बिल्डरच्या अकाऊंटला पस्तीस लाख अॉनलाइन ट्रान्सफर केले होते.
भविष्याची सुंदर स्वप्ने रंगविणारी अमृता खूपच आनंदात होती. आकाशात उंच विहरणाऱ्या पक्षाप्रमाणे तिचे मन हलके झाले होते.
मोबाइलच्या रिंगने तिची तंद्री भंगली. बंगलोरहून के प्रसाद नावाच्या पोलिस इन्स्पेक्टरचा फोन होता. तिने तन्मय गोस्वामी नावाच्या माणसाला पैसे ट्रान्सफर केले त्याबद्दल ते चौकशी करत होते. त्यासंदर्भात उद्या ते तिला भेटायला येणार होते. अमृता काळजीत पडली. तिला शंका आली, की ज्या बिल्डर तन्मय गोस्वामीला तिने पैसे ट्रान्सफर केले आहेत, तो फ्रॉड तर नाही? असे असल्यास आपले चांगलेच आर्थिक नुकसान होणार. तिने काळजीतच आशुतोषला फोन लावला. त्याचा फोन स्विच अॉफ आला. त्यानंतर वारंवार फोन लावूनही त्याचा फोन बंद असल्याचा ऑपरेटरचा मेसेज आला. अमृताच्या मनात आले, "आशूला काय झाले? तो कधीही फोन स्विच अॉफ ठेवत नाही. तो कुठल्या अडचणीत तर नसेल ना?" रात्रभर आशुतोषच्या काळजीने तिच्या डोळ्याला डोळा लागला नाही.
सकाळी दहाच्या सुमारास इन्स्पेक्टर प्रसाद आपल्या दोन सहकार्यांसह तिच्या घरी आले.
"मॅडम तुम्ही तन्मय गोस्वामीला ओळखता का?" इन्स्पेक्टर प्रसादने तिला प्रश्न केला.
"नाही. त्यांना मी कधी भेटले नाही. पण ते बंगलोरचे मोठे बिल्डर आहेत. आमच्या फ्लॅटसाठी ची रक्कम मी त्यांच्या अकाऊंटला ऑनलाइन ट्रान्स्फर केली."
"तुम्हाला कोणी सांगितले ते बंगलोरचे बिल्डर आहेत म्हणून?"
"आशुतोष जोशी, म्हणजे माझ्या होणाऱ्या नवऱ्याने."
"मग एवढी मोठी रक्कम ट्रान्सफर करण्यासही त्यांनीच तुम्हाला सांगितले असणार. ."
"हो. आशुतोषच्या सांगण्यावरुनच मी पस्तीस लाख तन्मय गोस्वामीच्या अकाऊंटला ट्रान्सफर केले."
"हम्म. ." इन्स्पेक्टर प्रसाद विचारात पडले. पुढच्याच मिनिटाला त्यांनी खिशातून एक फोटो काढून तिच्यासमोर धरला आणि विचारले,
"हा तुमचा होणारा नवरा आहे का?"
"हो हा आशुतोषचा फोटो आहे. पण त्याचा फोटो तुमच्या जवळ कसा?"
"मॅडम, हा आशुतोष जोशी नसून तन्मय गोस्वामी आहे."
"काही तरी काय बोलताय इन्स्पेक्टर?" अमृता रागाने म्हणाली.
"सॉरी मॅडम पण हे खरे आहे. मॅट्रीमोनी साइटवर स्वतःचे प्रोफाइल अपलोड करून, त्यावर खोटी माहिती टाकून, आयआरएस ऑफिसर असल्याचे भासवून, त्यासाठीचे बनावट आयडी कार्ड वापरून, उच्चशिक्षित, हाय प्रोफाइल मुलींना हेरून, आपल्या जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक फसवणूक करण्याचा त्याचा धंदा आहे. त्याच्याविरुद्ध चार मुलींच्या कम्प्लेन्ट्स आहेत. तो फरार आहे आणि पोलिस त्याच्या शोधात आहेत."
इन्स्पेक्टरचे बोलणे ऐकून अमृताच्या पायाखालची जमीन सरकली. तिला फार मोठा मानसिक धक्का बसला. त्या धक्क्याने तिला भोवळ आली आणि ती जमिनीवर कोसळली.
अमृता शुद्धीवर आली तेव्हा ती हॉस्पिटलच्या स्पेशल रुममध्ये होती. तिच्या उशाशी तिची आई बसली होती. सर्व प्रसंग आठवून ती ओक्साबोक्शी रडू लागली. एवढी उच्चशिक्षित, हायप्रोफाइल मुलगी मात्र एका बहुरूपी नराधमाने तिचे तन मन धन सर्वच लुटले होते.
*****
प्रिय वाचक,
ही कथा सत्यघटनेवर आधारित आहे. २०१४ ते २०१६ या दरम्यान तन्मय गोस्वामी नावाच्या व्यक्तीने आठ मुलींची या प्रकारे फसवणूक करून त्या सगळ्यांचे एकूण दीड कोटी रुपये लुबाडले. मॅट्रीमोनी साइटवर खोटे प्रोफाइल तयार करून, तिशीतल्या, अविवाहित, हाय प्रोफाइल, एकट्या राहणार्या मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक फसवणूक करणे ही त्याची मोडस ऑपरेंडी होती.
मॅट्रिमोनी साइटवरील दहापैकी सात प्रोफाइल बनावट असतात, असे मुंबईतील एका प्रसिद्ध सायबर कायदे तज्ज्ञाचे मत आहे. तेव्हा अशा साइटस् द्वारे लग्न ठरवताना शक्य तेवढी काळजी घेणे आवश्यक आहे.
*****
©कविता दातार
बापरे ! छान माहिती, धन्यवाद
बापरे !
छान माहिती, धन्यवाद
यूपीएसी पास झालेली पोरं
यूपीएसी पास झालेली पोरं मॅट्रिमोनीवर नसतात अनलेस फॉल्टी पीस किंवा पुनर्विवाह.
साहेब तुमचे अनुभव लिहा की इथे
.
बापरे! अशी एक केस वाचल्याचं
बापरे! अशी एक केस वाचल्याचं आठवतंय. पण त्यात तो माणूस कुठे तरी परदेशात होता आणि त्याने भारतात आल्यावर लगेच माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून त्या मुलीला पैसे ट्रान्सफर करायला सांगितले. उसने म्हणून. आणि मग बेपत्ता.
ही ताजी घटना आहे. आपल्याकडे
ही ताजी घटना आहे. आपल्याकडे वारंवार अश्या घटना मीडियात वाचायला मिळतात आणि सोशल मीडिया क्रांती होऊन बराच काळ लोटला आहे तरी ह्या व्हिक्टिम्स इतक्या कमी वेळेत मन ठीक आहे पण तन आणि धन अर्पून मोकळ्या होतात म्हणजे त्यांचा खरा बुध्यांक काय असेल याची कल्पना येते.
https://www.indiatoday.in/cities/ahmedabad/story/man-posing-as-google-em...
ध न्य वा द
ध न्य वा द