का दिसे अंधार सारा, तेज कोठे हरवले?
काळजाला काळजीने खूप आहे ग्रासले
वेध ग्रहणी लागण्या आधीच का अंधारले?
राहुकेतूंचा दरारा सर्व जग धास्तावले
बेगडी अश्वासनावर लोक सारे भाळले
का दिले निवडून त्यांना? आम जन पस्तावले
पेटुनी उठणे अताशा ना दिसे रस्त्यावरी
रोजचे अन्याय बघुनी लोकही निर्ढावले
वेग आता शब्द झाला परवलीचा जीवनी
कासवाची अन् सशाची गोष्ट सारे विसरले
फेसबुकवर रोज माझा टाकते फोटो नवा
"मस्त, सुंदर" वाचुनी प्रतिसाद वाटे चांगले
कायद्याला तोडणारे कायदे करती इथे
का गुन्हेगारास आम्ही संसदेवर धाडले?
का अचानक भळभळाया लागल्या जखमा जुन्या?
लागता डोळा जरासा कोण ते डोकावले?
आकडेवारी यशाची का दिली बिकिनी परी?
दावले दावावयाचे, जे हवे ते झाकले
आत्मघाती पाहिली "निशिकांत" दोस्ती काल मी
सूर्यकिरणांना धुक्याने मित्र जेंव्हा मानले
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
Very well written!
Very well written!