खरा सेल्फी...!
आज सकाळी नेहमी येतात त्याप्रमाणे अनेक गुड मॉर्निंग चे मेसेजेस आले, पण त्यातला एक मेसेज खरंच विचार करायला लावणारा होता.
"खरा सेल्फी म्हणजे आपल्या अंतरंगाचा सेल्फी".
हल्ली प्रत्येकला कधीही, कुठेही, कसलेही, निमित्त शोधून किंवा निमित्त नसल्यास बरेचदा निमीत्त नसतानाही सेल्फी काढण्यात खुप रस असतो. केसाचा भांग असा पडला तर तो आपल्याला जास्त चांगला दिसतो, अमुक रंग आपल्यावर जास्त खुलून दिसतो, अमुक एका अँगलने फोटो काढला तर आपला फोटो जास्त छान येतो, हे आणि असे अनेक निष्कर्ष आपले सेल्फी पाहून आपण काढतो आणि मग त्यानुसार स्वतः मध्ये बदल ही करतो.
बाह्यरूपचा काढतो तसाच आपण आपल्या मनाचा सेल्फी काढला तर... "खरा सेल्फी म्हणजे आपल्या अंतरंगाचा सेल्फी" या वाक्यात खरचं कीती अर्थ दडलेला आहे. आपल्या मनाचा सेल्फी, आपल्याला स्वतः च्या अजून जवळ नेण्यासाठी नक्कीचं खूप मोलाची कामगिरी करू शकेल. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या अंतरंगाचा सेल्फी काढायचा कसा? आपल्या मनाची अवस्था टिपून घेण्याची क्षमता असलेला कॅमेरा अजून तरी माणूस निर्माण करू शकलेला नाही. आपल्या मनाची नेमकी अवस्था जाणून घेण्यासाठी आपण स्वतःच स्वतःला काही प्रश्न विचारू शकतो. उदाहरणार्थ,
१) दिवसभरात आपण कोणकोणत्या गोष्टींवर कशी आणि काय प्रतिक्रिया दिली?
२) आपण दिलेल्या प्रतिक्रीयेचा कोणावर कसा परिणाम झाला?
३) कोणत्या गोष्टींमुळे आपला तोल गेला आणि मग आपण स्वतःला कसं सावरलं?
४) कोणत्या गोष्टींमुळे आज आपल्या वाट्याला निखळ आनंद आला?
हे आणि असे अजून कितीतरी प्रश्न स्वतः ला विचारून आपण आपल्या अंतरंगाचा सेल्फी काढू शकतो. या प्रश्न उत्तरांतून आपल्याला आपल्या बद्दलच्याच कितीतरी माहीत नसलेल्या गोष्टी समजतील.
उदाहरणार्थ,
१) अमुक व्यक्ती मला विशेष आवडत नाही, म्हणून विचार न करताच त्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीला मी विरोध करतो/ करते, तसाच विरोध मी आजही केला.
२) अमुक गोष्टीमुळे आपला पारा खूप चढला होता, पण त्याचा राग आपण भलत्याच व्यक्तीवर काढला.
३) अमुक व्यक्तीला, अमुक कामासाठी, नकार न देता आल्यामुळे, ते काम आपलं नसतानाही आपल्याला कराव लागलं.
४) अमुक व्यक्तीशी बोलून मन खूप हलकं झालं.
इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सच्या अति वापरामुळे माणसा माणसातील संवाद हरवत चाललाय, तसंच आपलं अपल्याशी असलेलं नातंही कमकुवत होतं चाललंय. आपण खरंच आपल्या मनाचा सेल्फी काढू शकलो तर, एकाद्या फुलाकडे पाहून, त्याचं सौंदर्य आपण न्याहाळतो, तसंच स्वतः ला एका अंतरावरून पाहण्याची दृष्टी आपल्याला मिळेल. शेवटी आपल्या बरोबर चांगलं, वाईट जे काही घडतं असतं ते फक्त १०% असतं आणि बाकीचे ९०% म्हणजे राग, लोभ, मत्सर, आशा, निराशा, क्लेश, आनंद, दुःख हे सगळं आपल्या आत घडतं असतं आणि ते आपण घडलेल्या गोष्टीवर काय आणि कशी प्रतिक्रिया देतो त्यावर अवलंबून असतं.
आपल्या मनाच्या अवस्थेचे अवलोकन करण्याची सवय जर आपण स्वतःला लावून घेऊ शकलो तर, आपल्या मनाने दिलेल्या प्रत्येक प्रतिक्रिये कडे आणि प्रतिसादा कडे आपण अधिक सजगतेने पाहायला लागू आणि त्यामुळे आपल्या मनात निर्माण होणारे अनेक नकारात्मक विचार आणि भावना आपल्याला टाळता येऊ शकतील. फक्त बहिर्मुखते मध्ये अडकून न राहता अंतर्मुख होऊन आपण स्वतः मध्ये बदल करू शकलो तर नातेसंबंधातील गैरसमज, विसंवाद या गोष्टीही आपोआप कमी होतील.
शेवटी बाहेरच्या जगातल्या आपल्या प्रवसा इतकाच किंबहूना त्याहीपेक्षा जास्तं आपल्या आतला प्रवास महत्वाचा असतो. आपल्या अंतरंगाचे विश्लेषण करून, आपल्यावरचे अनावश्यक स्तर, पापुद्रे दुर सारत, आपलं मूळ रूप आपल्याला गावसणं आणि आपली आपल्याला खऱ्या अर्थाने ओळख पटणं, या सारखा दुसरा आनंद नाही.
बाहेरचं जग पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण एवढे प्रयत्नशील असतो, मग एकदा आपल्या अंतर्यामी असलेल्या अवकाशात भरारी घेऊन बघायला काय हरकत आहे. कुणी सांगावं, कदाचित भौतिक जग देऊ शकणार नाही एवढी नितांत, सुंदर अनुभूती आपल्या आतला प्रवास आपल्याला देऊन जाईल...!
- स्वाती.
छान लेख, आवडला, पटला
छान लेख, आवडला, पटला
Thanks ☺️
Thanks ☺️
सुंदर अंतरंगाचा आढावा घेणारा
सुंदर अंतरंगाचा आढावा घेणारा लेख.
छान. आपल्या अंतरंगात
छान. आपल्या अंतरंगात वेळोवेळी डोकवायला पाहिजे, स्वतःशी पूर्ण प्रामाणिक व्हायला पाहिजे स्वतः स्वतःचे रोज/ आठवड्याला ऍप्रेजल करायला पाहिजे
Dhanyawad ☺️
Dhanyawad ☺️
छान सकारात्मक लेख !
छान सकारात्मक लेख !
शेवटी बाहेरच्या जगातल्या
शेवटी बाहेरच्या जगातल्या आपल्या प्रवसा इतकाच किंबहूना त्याहीपेक्षा जास्तं आपल्या आतला प्रवास महत्वाचा असतो. आपल्या अंतरंगाचे विश्लेषण करून, आपल्यावरचे अनावश्यक स्तर, पापुद्रे दुर सारत, आपलं मूळ रूप आपल्याला गावसणं आणि आपली आपल्याला खऱ्या अर्थाने ओळख पटणं, या सारखा दुसरा आनंद नाही. >>> छान! इथूनच खरा आतला प्रवास सुरु होतो. जय आत्माराम !