माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांस,
आदरपूर्वक नमस्कार!
यंदाच्या राजकीय मोसमात आम्ही पाच पत्रे लिहिण्याचे काम हाती घेतले आहे त्यातील हे तिसरे पत्र तुम्हाला उद्देशून लिहीत आहोत.
त्याचं काय आहे साहेब, की जगात एक राजकारण नावाचे क्षेत्र असते.
ह्या राजकारण नावाच्या क्षेत्रात कोणीही कोणाचाही नसतो. शिवाय, कोणीही केव्हाही तात्पुरता कोणाचाही असू शकतो. ह्या क्षेत्रात सतत विजयीच होऊ हा विचार त्यागून उतरावे लागते. विजयी झालेल्यांसाठी आपण अत्यंत महत्वाचे ठरू हे येथे प्रत्यक्ष विजय मिळवण्याइतकेच महत्वाचे असते. ह्या राजकारण नावाच्या क्षेत्रात अनेक थर असतात. सर्वात खालचा थर रस्त्यावरच्या सामान्य नागरिकाशी दररोज संपर्कात येतो. अधले मधले बरेच थर निष्ठावान कार्यकर्त्यांचे व अधल्यामधल्या नेत्यांचे असतात. सर्वात वरचा जो थर असतो तेथे जनतेसमोर आपली असलेली प्रतिमा आणि प्रत्यक्षातील आपण ह्यांच्यातील प्रचंड तफावत कौशल्याने मॅनेज करून प्रतिमा तर उत्तमच राहील पण मनासारखेही होईल हे पाहणे अत्यावश्यक असते.
त्याचं काय आहे साहेब, की जगात एक राजकारण नावाचे क्षेत्र असते.
ह्या राजकारण नावाच्या क्षेत्रात कोणालाही गृहीत धरता येत नाही. आपण खंग्री भाषाशैलीत कोणाचीही खिल्ली उडवू शकतो हे ऐकायला लाखोंचा जनसमुदाय समोर तर येतो, टाळ्या आणि शिट्ट्याही वाजवतो, पण मत नाही देत तो आपल्याला! त्याला गृहीत नाही धरता येत. आत्ता व्यासपीठावर असलेला आपला सहकारी उद्या सकाळी दुसर्याच व्यासपीठावरून आपल्या नावाने बोंब मारताना दिसू शकतो. ह्या क्षेत्रात आपला खरा शत्रू कोणीही असो, आपला खरा शत्रू कोण असावा ह्याबद्दल जनतेला काय वाटते हे महत्वाचे असते. भाषणे देताना धिंड काढू, खंजीर खुपसला, कोथळे काढू, प्रवेश करू देणार नाही, उलटे टांगू अशी आवेशपूर्ण आश्वासने उधळणे ही जिंकण्याची गुरूकिल्ली नाही साहेब!
राजकारण! राजकारण म्हणून एक असतं साहेब!
ते सारखं बदलत असतं. चेंज इज द ओन्ली कॉन्स्टन्ट! बघा ना, शिवाजी पार्कवर मोठ्या साहेबांच्या सभेला झालेली गर्दी पाहून अरबी समुद्रालाही ओहोटी लागत असे. तुमच्याही सभांना तशीच गर्दी होते. पण दरम्यान खूप काही घडलेले असते साहेब! माणूस हुषार झालेला असतो. जागृत झालेला असतो. माध्यमांद्वारे त्याला केव्हाच सगळ्या गोष्टींचा सुगावा लागलेला असतो. ठाकरी भाषा ऐकणे आणि मतदान करणे ह्या त्याच्यामते दोन भिन्न प्रक्रिया असतात. लोकसभेच्या निवडणूकीच्या निकालांचा अर्थ त्याला घरी टीव्हीसमोर बसून साधेवरण भात खातानाही लागलेला असतो. हा तोच सामान्य माणूस असतो ज्याला वार्याची दिशा समजलेली असते. जेथे जेथे निवडणूका होतील तेथे तेथे मतदारांना मोदींच्या पक्षाला मत द्यायची उर्मी होत आहे हे त्याला बसल्या जागी समजलेले असते. पंचवीस जागांवरून मतभेद, वीस जागांवरून मतभेद, दहा जागांवरून, आता फक्त पाच जागांवरून, आता तर फक्त दोन ते तीन जागांवरून, आता फक्त मुख्यमंत्रीपदावरून मतभेद, ह्या सगळ्या बातम्यांचा अर्थ त्याला समजत असतो. फेसबूक, ट्विटर आणि व्हॉट्स अॅपवरून फिरणारे खिल्लीसंदेश वाचून तो खो खो हासत असतो. आपोआप त्याचे एक मन आणि एक मत बनत असते. जुनाट भाषणांच्या माध्यमांवर आता त्याचे मत बनणे विसंबत नसते. राष्ट्रीय पक्ष आणि स्थानिक पक्ष ह्यातील नेमका फरक त्याला समजलेला असतो. तो युती तुटण्याचा जितका दोष भाजपला देतो तितकाच, किंबहुना अधिक दोष तुम्हाला देतो कारण तुमच्या पक्षाचा वकूब भाजपसमोर कमी आहे हे त्याला माहीत असते. आंधळे प्रेम नाही करत आता मतदार! अमित शहा मुंबईत येऊन मातोश्रीला गेले नाहीत हे तुम्हाला समजायच्या आधी त्याला समजलेले असते.
राजकारण म्हणून एक असतं साहेब!
मोठ्या साहेबांना आदरांजली म्हणून तुमच्याविरुद्ध एक शब्द बोलणार नाही असे भावनिक आवाहन करणारे मोदी तुमच्या महाराष्ट्रात येऊन तुमच्यापेक्षा जास्त भाव खाऊन जातात. तुम्ही मात्र पवार साहेब आणि चव्हाण साहेबांना सोडून मोदींनाच धोपटत बसता. पंचवीस वर्षांची युती न मोडू देणे ही बाळासाहेबांना श्रद्धांजली ठरली असती हे सामान्य माणसाला समजते, पण तुम्हाला आणि अमित शहांच्या इगोला नाही समजत साहेब! तुम्ही मग त्यांना अफजल खान म्हणू लागता. शिवाजी महाराज हे जणू आपल्या पक्षाला संजीवनी द्यायलाच निर्माण झालेले कोणी काल्पनिक पौराणिक व्यक्तीमत्व असावे अश्या थाटात त्यांच्या नावाचा वापर करता. पंकजा आणि प्रीतमला बहिण मानल्याचे सांगून टाळ्या मिळवता. संपूर्ण बहुमताचे आवाहन करता. येडा समजता का साहेब मतदाराला? अहो भावनिक भाषणांचा जमाना केव्हाच संपला! आज तर राणे हारल्याचा आनंद व्यक्त करण्याइतकासुद्धा वेळ नाही आहे मतदारांकडे! राणे हारले त्याक्षणी विस्मृतीतसुद्धा गेले ते!
तुम्हाला माहितीय का साहेब? राजकारण नावाची एक चीज असते चीज!
दोन चार जागा इकडे तिकडे झाल्या असत्या, पण आज तुम्ही किंग ठरला असतात. आता अवस्था अशी आहे की ना तुम्हाला स्वतःला पाठिंबा जाहीर करण्याची हिम्मत होत आहे ना भाजपाला तुमचा पाठिंबा मागण्याची गरज उरली आहे. पण तुमचा इगो आड आला. 'माझ्या शिवसैनिकांची ताकद दाखवून देईन' म्हणत तुम्ही केलेल्या आवाहनांचा परिणाम काय झाला? फक्त १९ जागा वाढल्या. साहेब तुम्हाला एकदा तरी असे वाटले होते का हो की तुम्हाला सुस्पष्ट बहुमत मिळेल? आम्हाला कोणालाही वाटलेले नव्हते. आणि कार्यकर्त्यांचे काय हो साहेब? ज्यांनी आजवर भाजपच्या खांद्याला खांदा लावला, त्यांनी निष्ठा कश्या बदलायच्या एका दिवसात? पंधरा दिवसात स्वबळावर प्रचर करून सहज खिशात घालता येईल इतके लहान राज्य आहे का महाराष्ट्र?
पण एवढे होऊनही एक सांगू का साहेब? की जगात राजकारण नावाची एक गेम असते.
ती गेम तुम्ही नाही खेळलात तरी मुरलेल्या भाजपेयींना खेळावीच लागेल. पुढेमागे ह्याच मतदार मायबापाकडे मत मागायचे आहे हे माहीत असल्यामुळे ते शरद पवार साहेबांचा पाठिंबा नाकारतील. तुम्ही दिलेले शिव्याशाप दुर्लक्षित करतील. तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी गळ घालतील. तेव्हा मात्र साहेब, शांतपणे राजकारणच करा हो? इगो इश्यू मध्ये आणू नका. दिल्ली आणि बारामती जोडी जमली तरी मतदार पाच वर्षे तरी काही बोलू शकणार नाहीत. पण तोवर...... सेनेचे काय झालेले असेल साहेब? आणि साहेब, युवराजांना इतक्यात मोठाल्या जबाबदार्या नका देऊ असे आपले सुचवावेसे वाटते. काय आहे साहेब, मोठ्या साहेबांनंतर तुमची स्वतःचीच ही पहिली निवडणूक आहे राज्यातील! अजून तुमच करिष्मा पुरेसा सिद्ध झालेला नाही. आणि साहेब, येताजाता शिवरायांना नका मधे आणू!
साहेब, आणखी एक, महाराष्ट्रात शरद पवार नावाची एक चीज असते!
त्यांनी राष्ट्रभर व्याप्ती वाढेल ह्या दृष्टीने काढलेला एक पक्ष आज ४०-४२ जागांवर खंगत पडलेला आहे. तरी अजून ते राजकारणच करत बसले आहेत. तुम्हाला सांगू का? निवडणूकीआधी ह्या साहेबांची काहीही विशेष वक्तव्ये नव्हती, पण मतमोजणीनंतर एकच वक्तव्य त्यांनी केले आणि राजकीय विश्लेषक डोक्याला हात लावून त्याचा अर्थ काढत बसले. ठाकरे साहेब, तुम्ही निवडणूकीपूर्वी बेभान वक्तव्ये केलीत आणि आता एकही वक्तव्य करत नाही आहात. पण तुम्हाला सांगू का? कितीही राजकारण राजकारण म्हंटलं ना साहेब, तरी पवार साहेबांपेक्षा मतदारांनी ह्यावेळी तुमच्यावरच जीव उधळलाय बघा! तुमचा भावनिक सच्चेपणा महाराष्ट्राच्या मातीने पुन्हा एकदा जमेल तितका गौरवला आहे साहेब. तेव्हा, नेहमीच राजकारण करण्यात अर्थ नसतो, एकदा एखादा तडाखा द्यावाच लागतो. नसली सत्ता तर नसली साहेब, पण राष्ट्रवादीचा पाठिंबा भाजपला घ्यावाच लागेल अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यात! तेवढे राजकारण कराच! फाटूदेत हरामखोरांचे बुरखे! वरून थोरले साहेब आशीर्वाद देतील तुम्हाला!
तेव्हा शेवटचे सांगतो साहेब, फक्त राजकारणच सगळं काही नसतं!
=================================================
-'बेफिकीर'!
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. दिल्लीमधील तीन व्यक्तींकडून ही याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तसंच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिका फेटाळताना सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना चांगलंच फटकारलं आहे.
सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी याचिका फेटाळताना तुम्ही राष्ट्रपतींकडे विचारणा करु शकता असं सांगितलं. “देशाचे एक नागरिक म्हणून तुम्हाला राष्ट्रपतींकडे अर्ज करण्याचं स्वातंत्र्य आहे,” असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. यावेळी त्यांनी “तुम्हाला माहित तरी आहे का, महाराष्ट्र किती मोठे राज्य आहे?,” अशा शब्दांत याचिकाकर्त्यांना फटकारलं.
वकील रिषभ जैन, गौतम शर्मा आणि सामाजिक कार्यकर्ते विक्रम गेहलोत यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आली होती. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला होता. याचिकाकर्त्यांकडून सुशांत सिंह राजपूत मृत्यू, कंगनाच्या ऑफिसवरील कारवाई आणि माजी नौदल अधिकारी मदनलाल शर्मा यांना झालेली मारहाण या घटनांचा उल्लेख करण्यात आला होता.
https://www.loksatta.com/maharashtra-news/supreme-court-dismisses-plea-s...
अरेरे.... कॉग्रेसजन इतक्या
अरेरे.... कॉग्रेसजन इतक्या खालच्या पातळीला उतरतील असे वाटले नव्हते. दिल्लीत राहुन महाराष्ट्राविरोधी याचिका तीपण आपबरोबर संगनमत करुन
< नसली सत्ता तर नसली साहेब,
< नसली सत्ता तर नसली साहेब, पण राष्ट्रवादीचा पाठिंबा भाजपला घ्यावाच लागेल अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यात! तेवढे राजकारण कराच! फाटूदेत हरामखोरांचे बुरखे! वरून थोरले साहेब आशीर्वाद देतील तुम्हाला!>
खरंच.. मान गये बेफीजी..! २०१४
खरंच.. मान गये बेफीजी..! २०१४ साली हे भाकीत तुम्ही कसे वर्तवलेत..!!
मागच्या वर्षी लोकसत्ताच्या
मागच्या वर्षी लोकसत्ताच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला आलो होतो, त्यावेळी मी पुढच्या वर्षी लोकसत्ताच्या कार्यक्रमाला येईल की, नाही असं अनेकांना वाटलं होतं. पण मी आलो. लोकसत्ताच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री म्हणूनच मी पुढची पाच वर्ष येईन,” असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
https://www.loksatta.com/mumbai-news/next-five-years-i-will-come-to-loks...
लय वर्षांनी जुने पत्र मिळाले
लय वर्षांनी जुने पत्र मिळाले
पोपट आणि लिफाफे घेऊन
पोपट आणि लिफाफे घेऊन मंत्रालयासमोर बसलात तर कुठल्या कुठे जाल !!
उद्धव संकटात असतील .
उद्धव संकटात असतील .
पण महाराष्ट्र मधील बहुजन समाज जागा आहे.
उद्योगपती चे गुलाम असलेला bjp पक्ष आणि हे बंडखोर ह्यांना त्यांची जागा जनता दाखवून देईल च.
माजी नौदल अधिकारी मदनलाल
माजी नौदल अधिकारी मदनलाल शर्मा
एक पण लढाई न लढलेला.देशाच्या संपत्तीवर जगलेला हा नाविक अधिकारी.
त्याला काय जास्त किंमत द्यायची.
जबरी चाललं आहे.
जबरी चाललं आहे.
कुंटे शिंदे चर्चा सुरु आहे
जय महाराष्ट्र, सर
जय महाराष्ट्र, सर
वाह!
वाह!
हे पोहोचवायला हवे होते पत्र त्यांना वेळीच.
आज अशी अवस्था नसती.
बाई दवे,
माझे यंदाचे मत यांच्या पक्षालाच होते. कारण आईवडील म्हणाले चांगला उमेदवार आहे. आणि जो यांच्या स्पर्धेत होता तो भ्रष्ट होता हे मला माहीत होते. माझे मत सत्कारणी सुद्धा लागले. आणि यांचा उमेदवार जिंकला सुद्धा.. पण पुढे काय या पक्षाचे भवितव्य काही समजत नाही. चिन्ह गेले तिथेच खेळ संपला आहे असे वाटते.
खूप छान पत्र आहे उद्धव
खूप छान पत्र आहे उद्धव ठाकरेंना खरच द्यायला हवे होते. शिवसेनेची खरच हलत बघवत नाही मला एक काळात नाही उठा आणि रागा या दोघांना स्वतःवर झालेले जोक, मिम्स काळात नाही का स्वतःच्या मर्यादा कळतनाही का ? का उगाचच स्वतःचे हसू करुन घेतात ?
आज एखादे शेंबडे पोर पण सांगेल उद्भव आणि राज एकत्र हवे होते आता ह्यानं सुचतय.
अरे राज ठाकरे चे वक्तृत्त्व ने शिवसेनेला आतापरांत एक हाती नाही तर निदान चांगले जागा मिळवून दिले असते, राज ह्यानी मोठेपणा दाखवून उद्भव बरोबर रहायचे होते थोडा ईगो बाजूला ठेवून दोगांचा फायदा झालं असता आता कितीही आपटली तरी कागी होणार नाही शिंदे गेले शिवसेना घेऊन .
पण मराठी माणसाला हेच जमात नाही कधीच. झुकायचे नाही , मॉडल पण वाकणार नाही अरे पण कुठे जर विचार करुन वाकु शकता की .जरा महाराजांच इतिहास वाचला असता तर कळल असतं वेळ आली की पडत घ्याचं अस्त मित्र ना सोडून दुश्मन नसतो जॉइन करायचा पण कोण समजावणार .
मे बी कळतही असेल पण वळत नसेल माझ्यासारख्या सामान्य बुध्दीच्या व्यकीला कळते तर उठा आणि राज ह्या कळत असावेच पण ईगो किवा अजूनही असेल काही.,,
असो
उद्धव आणि राज यांनी आता तरी
उद्धव आणि राज यांनी आता तरी एकत्र यावं, दोघांचे इगो आणि इतर सर्वच पक्ष या दोघांच्या एकत्र येण्याच्या आड आहेत त्यामुळे येतील असं वाटत नाही पण एकत्र आले तर मुंबई महानगरपालिका मिळेल असं वाटतंय. पुर्वी एकत्र आले असते तर चित्र वेगळं असतं महाराष्ट्रात पण आता किमान एक प्रयोग करून बघा. मी भाजपची मतदार असून असं लिहितेय.
राज इतकी वर्षे बंपर गर्दीची
राज इतकी वर्षे बंपर गर्दीची भाषणं करतात. उपयोग शून्य. स्टँडअप आहेत बाकी यांच्या बोलण्याने त्यांना एकही सीट मिळवता आली नाही. पोराला सुद्धा आणता आलं नाही. ते सरवणकर एक पाऊल मागे यायला तयार होते तर त्यांना भेटायला इगो मधे आला. बसा आता धुळ खात. विचारलं नसताना पाठिंबा द्यायची वेळ आली आणि इतकं करुन पदरी धोंडाच पडला.
उद्धवची गरज शिवसेनेला उरलेली नाही. शिंद्यांना आणि इतरांना आणायचं सोडून हे आदित्य आणि अमित ठाकर्यांना आणणार. बसा म्हणावं घरीच.
राज आणि उद्धव एकत्र आले तरी बाकी सेना जाणार नाही आता. टू लेट. कालसुसंगत आणि संपर्कात राहिलं नाही, मनोर्यात राहिलं की असंच होणार. शिंदे म्हणे रात्री ३ -३ वाजे पर्यंत लोकांना भेटत होते.
माननीय श्री. बेफिकीर साहेब
माननीय श्री. बेफिकीर साहेब यांसि साष्टांग दंडवत - जाहीर पत्र
- उद्धव ठाकरे, शरद पवार , डोनाल्ड ट्रंप, किम जोंग और उनके बहोतसे साथी
अशा पोस्टी मायबोलीवर दिसू लागल्या तर आश्चर्य वाटणार नाही.
एक इग्नोरास्त्र निपुण मायबोलीकर या नात्याने आपणच अशा किरकोळ लोकांना पत्रं लिहून प्रसिद्धी देऊ नये हा मित्रत्वाचा सल्ला.
अमितव चांगली पोस्ट. आता
अमितव चांगली पोस्ट. आता एकत्र येण्यात अर्थ नसला तरी एकत्र आले तर मुंबई महानगरपालिका निवडणूक अगदीच एकतर्फी होणार नाही. भाजप,शिंदे, अ प आरामात येतील. अर्थात ते एक होणार नाहीत, राज जातील भाजपसोबत, उद्धव राहतील कॉँग्रेस, श प सोबत.
<अरे राज ठाकरे चे वक्तृत्त्व
<अरे राज ठाकरे चे वक्तृत्त्व ने शिवसेनेला आतापरांत एक हाती नाही तर निदान चांगले जागा मिळवून दिले असते,>
<झुकायचे नाही , मॉडल पण वाकणार नाही> राज ठाकरे झुकले की. लोटांगणच घातलं.
भरत+१. मागितला नसताना पाठिंबा
भरत+१. मागितला नसताना पाठिंबा दिला. आणि राज्यांत त्यांच्या साठी कोणी एक सीट सुद्धा सोडली नाही. मिमिक्री आर्टिस्ट आहे तो. लोक हसायला येतात.
अमितव चांगली पोस्ट. .... +१.
अमितव चांगली पोस्ट. .... +१.
शिंदेंची पत्रकार परिषद पाहिली.शांतपणे सर्वांना उत्तरे देत होते.उगीच आवाज चढवून समोरच्याचा पाणउतारा करत नव्हते.अर्थात कसलेला राजकारणी आहे.
+१
+१
उद्धव आणि राज यांनी आता तरी
उद्धव आणि राज यांनी आता तरी एकत्र यावं, दोघांचे इगो आणि इतर सर्वच पक्ष या दोघांच्या एकत्र येण्याच्या आड आहेत त्यामुळे येतील असं वाटत नाही पण एकत्र आले तर मुंबई महानगरपालिका मिळेल असं वाटतंय >>
मुंबई व ठाणे महानगरपालिका निवडणुकांत शिंदे + राज जोडी जमली तर छान होईल. कदाचित भाजपाने मागच्या वेळेस मुंबई मनपा उठांना आंदण दिली होती तशी पण मिळू शकते.
कदाचित मुमं पद सोडण्यामागे याही वाटाघाटी असू शकतात. या राजकारणी लोकांच्या डोक्यांत काय काय चालू असेल ते सांगता येत नाही.
मुंबई मनपा भाजप सोडेल? काहीही
मुंबई मनपा भाजप सोडेल? काहीही.
Pages