माझ्या घरी संगीताचा सदैव राबता असतो. याचे श्रेय माझी पत्नी सौ. जयश्री हिलाच मी देतो. नेहमी घरात गाणी, कधी रेडियोवर, कधी सीडीज, कॅसेट्स चालूच असतात. यात भर म्हणून जयश्री चालवत असलेले संगीताचे वर्ग. शास्त्रीय आणि सुगम संगीताचा पण यज्ञ चालू असतो. या मुळे मला जरी संगीताचे अंग नसले तरीही मी बर्यापैकी कानसेन झालोय आणि मी पण संगीतात रमायला लागलोय बर्याच दिवसापासून.
जरी जमाना बदलला असला तरीही आम्ही उभयता रेडियो ऐकाण्यात खूप रमतो. जुन्या काळी विविध भारती आणि रेडियो सिलोन हे तर आमचे जीव की प्राण! माझा संगीताचा कान बर्याच अंशी या दोन्ही केंद्रांनी बनवला. आज तगायत आम्ही रेडियोचे नि:सीम चाहते आहोत.
हे सर्व सांगायचे प्रयोजन म्हणजे काल आम्ही विविध भारती केंद्र सकाळी सात वाजता ऑन केले आणि प्रथम हिंदी गाणे "दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तुम्हे कर दिया कमाल" आणि त्याच्या पाठोपाठ रफीने गायलेले "सुनो सुनो ए दुनियावालों बापूजी की अमर कहानी" ही दोन गाणी लागली आणि जुन्या काळात आम्ही हरवूनच गेलो.
मनात विचार घोळायला लागले की आता जमाना किती बदलला आहे! माणूस पदोपदी भोवतालच्या वातावरणाचा येनकेन प्रकारे स्वतःच्या फायद्या/स्वार्थासाठी उपयोग करत आहे. मग ते शेतकर्याचे चिघळलेले अंदोलन असो, की राजकीय वातावरण असो की भोवताली घडणार्या घटना असोत. प्रत्येक ठिकाणी स्वार्थास प्रधान्य दिले जाते.
अजून एक मनात विचार आला की इतिहासातील विभूतींचा पण आपण हवा तसा आणि हवा तेंव्हा वापर करतो. यातून आपण स्व. महात्मा गांधींना पण सोडलेले नाही. त्यांच्या तत्वानुसार वागणारे बोटावर मोजण्या इतकेच मिळतील पण स्वार्थासाठी त्यांचा वापर पण भरपूर केला जातो.
या विषयावर मी रचलेली कविता एक कविता काल झालेल्या गांधीजींच्या स्मृतीदिना निमित्त पेश करतोय. पहिल्या चार ओळींची पार्श्वभूमी अशी आहे की एक वृध्द शेतकरी आपल्या मुलाला विचरतो की बाळा आज तारीख काय आहे. मुलाने दोन ऑक्टोबर म्हणताच त्याची प्रतिक्रिया अशी "मग आज तर गांधीजी की जय म्हणायलाच पाहिजे." येथे संदर्भ जरी जयंतीचा असला तरी कविता आज पण समाजाचे प्रतिबिंब दाखवणारीच आहे. म्हणून हा सारा प्रपंच.
गांधीजी की जय
काय म्हणलास पोरा, आज
दोन ऑक्टोबरय व्हय?
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय
सगळ्या हापिसात फोटो तुझे
कैक गावी गांधी रोड
एवढ करून तुझ्या तत्वाशी
बसत नाही जोड
सगळं बघून उपोषणाला
बसशील वाटतय भय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय
खादी भंडरातुन घेतोत
झेंडे, पायजम्याच्या नाड्या
तू रहिलास आश्रमात
आम्ही बांधल्या माड्या
माया जमा करील त्यालाच
म्हनत्यात दिग्विजय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय
नेते लोक भाषण करतील
तुझे गुण गाऊन
झकास बोलता येतय त्यांना
येळ प्रसंग पाहून
सभा संपली भूक लागली
कोंबडीची नाही गय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय
सत्याग्रह शस्त्र शोधलस
स्वातंत्र्य त्याचं फलीत
आम्ही घेतलं हातात जसं
माकडा हती कोलीत
वेळी अवेळी सत्त्याग्रह
आम्हाला जडलीय सवय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय
आजच्या गांधीचं काय सांगू
दिल्लीत बसत्यात
क्वत्रोची कोन इचाराव तर
गालामंदी हसत्यात
तरण्या गांधीला मिळणारय म्हने
सिंहासनाचं वलय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय
दुष्ट वृत्ती हिंसा करताना
सगळीकडे दिसत्यात
शांतीप्रिय लोकांना
भ्याड म्हनून हसत्यात
तुझ्या अहिंसेला हिंसेच
वाटू लागलय भय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय
आभाळातला तारा तुटून
अंधारात हरपतोय
अंधाराच्या तिव्रतेनं
प्रकाश झोत करपतोय
होतोय बघा अंधाराचा
प्रकाशावर विजय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
कविता छान आहे
कविता छान आहे
उत्कृष्ट
उत्कृष्ट
सध्याची परिस्थिती अगदी
सध्याची परिस्थिती अगदी नेमक्या शब्दात मांडली आहे.
आपल्याकडे थोर व्यक्तींच्या नावाचा जेवढा वापर होतो, तेव्हढा त्यांच्या विचारांचा झाला असता तर...
कविता सुरेख.
कविता सुरेख.
सर्वांचे मनापासून आभार
सर्वांचे मनापासून आभार प्रतिसादासाठी.
छान.
छान.
छान, कविता आवडली.
छान, कविता आवडली.
माझ्या सभोवती सर्व लोक गांधी यांना शिव्या देणारे आहेत. पण आवर्जुन दोन ऑक्टोबरला पांढरा सदरा, टोपी घालून पुतळ्याजवळ फोटो काढतात... मग पुन्हा वर्षभर शिव्या देतात.
गोर्या लोकांची पंगत असेल तर गांधीचा महिमा गातात. सत्य, अहिंसा आदी विचारांना उजळणी मिळते. truth, non-violence, मग गांधींचे काही जगप्रसिद्ध कोट्स eye- for an eye... चेंज यु विश... डोळ्यातून पाणी काढत आठवले जातात. एका कप्प्यात साठविलेले असतात. आठवायला वेळ लागतो.
गोरे लोक नसतील तर नथूरामच्या देशभक्तीचे आणि त्यागाचे आणि खूनाचे (ओ सॉरी वधाचे) ५५ फुसके कारणे एकायला मिळतात. दारुची नशा जशी चढते तस तसे गांधी, आणि जोडीला नेहरु खानदान यांना शिव्या देण्याचा सोहळा सुरु होतो... काही क्षणांत गांधी मागे पडतात, आणि नेहरुच मागे रहातात- शिव्या खाण्यासाठी... किती घोडचुका करुन ठेवल्यात.
माझा समाज दांभिक, टोकाचा दुटप्पी आहे आणि मी याच समाजाचा भाग आहे.
https://youtu.be/67vKb_1w-oo
https://youtu.be/67vKb_1w-oo
Mla च्या बाजूला जोरजोरात रडतोय तो मी आहे.
माझा समाज दांभिक, टोकाचा
माझा समाज दांभिक, टोकाचा दुटप्पी आहे आणि मी याच समाजाचा भाग आहे. >>>>
हे सोळा आणे खरे. ज्याचा त्याचा आपापला दृष्टीकोन असतो हे लक्षात घेऊन जेव्हा 'ते' आणि 'आपण' अशी विभागणी करायचे सोडले जाईल त्यावेळी खरी सुधारणा व्ह्यायला सुरुवात होईल. आपण सगळेच एकमेकांशी जोडलेले आहोत हे विसरता कामा नये.
गांधीजींचाच विषय सुरु आहे तर; ज्या समाजातून गोडसे आला त्याच समाजातून गोपाळ कृष्ण गोखले आणि विनोबा भावे देखील आले हे लक्षात न घेता, माझ्या समाजातल्या, दोन्ही बाजूच्या, फक्त गोडसे लक्षात ठेवणार्यांचा दांभिकपणा / दुटप्पीपणा दृगोचर होतोच आणि मान्य करावेच लागते माझा समाज दांभिक, टोकाचा दुटप्पी आहे आणि मी याच समाजाचा भाग आहे.
ज्यांनी कधिही इंग्रजांशी दोन
कविता छन लिहिली आहे..!!!
-----------
ज्यांनी कधिही इंग्रजांशी दोन हात केले नाहीत.. केवळ आपल्याच समाजसुधारकांना अतोनात त्रास देऊन त्यांना गोळ्या घातल्या.. स्वातम्त्र्य संग्रामाकडे पार्श्वभाग करुन बसण्यात धन्यता मानली... तरिही येनकेन प्रकारे म. गांधीजी, नेहरू आणि समस्त काँग्रेस जनांच्या प्रयत्नाने, आहुतींनी स्वातंत्र्य मिळाले तेव्हा हे बाजारबुणगे लाल किल्ल्यावरील तिरंग्याच्या रंगावरून राष्ट्रध्वजाला दुषणे देऊ लागले. तरिही १५ ऑगस्ट ला जेंव्हा नेहरुंच्या हस्ते तिरंगा फडकवण्याची वेळ आली तेव्हा हे कर्मदरिद्री काळ्या टोप्या घाल्लुन अपशकून करण्यास आले. अरे काय हे.. किती हा नतद्रष्टपणा..! याच नतद्रष्ट माणसांच्या कंपुने भारताचे स्वातंत्र्य न बघवल्याने म. गांधींची हत्त्या केली.. वर त्या माथेकर्याला दैवत्व बहाल करण्याचा करंटेपणा केला. वर आपल्या कंपुने आपल्याच कंपुतील लोकांसाठी शाळा काढल्या त्यात इतिहास हा विषय ऑप्शनला टाकून म. गांधींची अन समस्त काँग्रेसची यथेच्छ बदनामी केली.
समुद्र हा अथांग, नितळ,
समुद्र हा अथांग, नितळ, निळाशार असतो. पण कधी, तर जेव्हा तुम्ही खूप आतमध्ये, भर समुद्रात, deep in the ocean जाता तेव्हा. आपण किनाऱ्यावर उभे राहून आपल्या छोट्याशा ओंजळीत इतकेसे पाणी घेतो आणि म्हणतो, शी: किती गढूळ आहे समुद्राचा रंग.
महामानव हे समुद्रासारखे असतात.
हीरा - प्रतिसाद आवडला.
हीरा - प्रतिसाद आवडला.
अगदी बरोबर हीरा.
अगदी बरोबर हीरा.
हातात ओंजळ भर पाणी घेणाराही आपापली सीमारेखा, कुवत आणि समग्रतेचे नसलेले भानच दाखवून देत असतो. त्याला जे आणि जितके बघायला मिळते त्यावरच त्याचा दृष्टीकोन ठरतो.
अथांग, नितळ, निळ्याशार समुद्राला कोणी खारट म्हटले तर ते चूकही नसते पण गोड पाण्याचा पाऊस पाडणारे ढग निर्माण करायला कारणीभूत ठरणारी वाफ त्यांच्यातच सामावलेली असते हे ही तितकेच खरे.
समुद्राला कोण काय म्हणते आहे त्यामुळे काही फरक पडत नाही.
https://youtu.be/67vKb_1w-oo
https://youtu.be/67vKb_1w-oo
Mla च्या बाजूला जोरजोरात रडतोय तो मी आहे. >>>
बोकलत ओव्हरअँक्टींगचे किती पैसे कापले गेले
त्यावेळी मी खरोखरच दुःखी होतो
त्यावेळी मी खरोखरच दुःखी होतो. दिवसभर जेवलो नाही आणि रात्री फक्त शेवपुरी खाऊन झोपलो. सकाळी उठल्यावर खूपच भूक लागली होती मग फक्त एक ब्रेड खाऊन दिवसभर पुन्हा उपाशी राहिलो आणि रात्री बार्बेक्यूमध्ये गेलो.
हर्पेन, प्रतिसाद आवडला.
हर्पेन, प्रतिसाद आवडला.
आणि समुद्रामध्ये खार जरी असला तरी विखार नसतो.
रात्री बार्बेक्यूमध्ये गेलो >
रात्री बार्बेक्यूमध्ये गेलो >> बाप रे! फारच भाजले गेला असाल की मग!
छान आहे कविता.
छान आहे कविता.
हर्पेन आणी हिरा दोघांचे प्रतीसाद आवडले. अजून एक भर.
ज्या समाजातून गोडसे आला त्याच समाजातून गोपाळ कृष्ण गोखले आणि विनोबा भावे देखील आले हे लक्षात न घेता, माझ्या समाजातल्या, दोन्ही बाजूच्या, फक्त गोडसे लक्षात ठेवणार्यांचा दांभिकपणा / दुटप्पीपणा दृगोचर होतोच आणि मान्य करावेच लागते माझा समाज दांभिक, टोकाचा दुटप्पी आहे आणि मी याच समाजाचा भाग आहे.>>>>>> आणी ज्या समाजातुन आलेल्या कृष्णाजी पंत यांना लक्षात ठेऊन कायम आगपाखड केली जाते, त्याच समाजाच्या गोपीनाथराव बोकिलांना छत्रपती शिवराय आपला कारभारी म्हणून पाठवतात हे ही लक्षात ठेवले जात नाही. काही लोकांना कायम काळ्या अंधारलेल्या बाजूच दिसतात. त्या अंधारा पलीकडे लखलखता प्रकाश आहे हे दिसतच नाही. आपापला दृष्टीदोष.
कविता छानच आहे...
कविता छानच आहे...
कवितेच्या धाग्यावर अवांतर होत असल्यास क्षमस्व पण, प्रॉब्लेम हा आहे की आज ही गोडसेनी केलेल्या कृतीचे समर्थन करणारे लोक समाजात आहेत. काही छुपे आणि काही उघड उघड. गोडसे ज्या संघटनेतून आला आणि ज्या संघटनेवर स्वातंत्र्यानंतर बंदी घातली होती तीच संघटना आज उजळ माथ्याने so called देशकार्य करत आहे. बरे असेही नाही की त्या संघटनेने आपले विचार बदलले आहेत. ते तेवढेच विषारी आजही आहेत.
जाता जाता, गोडसेला एवढा प्रॉब्लेम होता तर त्याने मोहम्मद जिनाहचा खून का नाही केला? स्वतंत्र पाकिस्तानची मागणी त्यांनी केली होती ना? आणि "तिकडे" दुसऱ्या फळीत एकही नेता नव्हता. जिनाह हटले असते तर मागणितला जोर बराच कमी झाला असता. Why Gandhi? राम आणि अल्लाह एकाच कवितेत गुंफले म्हणून का???
रात्री बार्बेक्यूमध्ये गेलो >
रात्री बार्बेक्यूमध्ये गेलो >> बाप रे! फारच भाजले गेला असाल की मग! >
कविता छानच !
कविता छानच !
हीरा हर्पेन प्रतिसाद आवडले