ती आणि तिचा प्रवास

Submitted by रूपाली विशे - पाटील on 21 January, 2021 - 09:45

ती आणि तिचा प्रवास!!
__________________________________________

ती स्टेशनवर आली. पती आणि आपल्या दोन लहान मुलांसोबत. सलग चार दिवसांची जोडून आलेली सुट्टी आणि आपल्या बायको-मुलांना पण घराबाहेरचं, आपल्या गावाबाहेरचं जग पाहता येईल म्हणून आपल्या खिश्याला परवडेल अशी दोन- तीन दिवसांची सहल तिच्या पतीने आखलेली. संपूर्ण प्लॅटफॉर्म गर्दीने फुललेला. ती बऱ्याच वर्षांनी शहरात निघालेली. एस.टी. आणि रिक्षाचा प्रवास तसा नेहमीच व्हायचा तिचा. पण ट्रेनचा प्रवास ती आज बऱ्याच वर्षांनी करत होती. स्टेशनवर त्या अफाट गर्दीत रंगीबेरंगी कपड्यात , वेगवेगळ्या रंगाच्या, आकाराच्या पर्स खांद्यावर मिरवणाऱ्या, कुणी उंच टाचांच्या चपला घातलेल्या तर कुणी साध्या चामड्याच्या सॅन्डल घातलेल्या, वेग-वेगळ्या चेहऱ्यांच्या मुली- स्त्रिया पाहून तिचे डोळे दिपले. तसं तर आजकाल खेड्या-पाड्यातही फॅशन ही काही नवलाईची गोष्ट राहिली नव्हती. टिव्ही सिरीयल, चित्रपट आणि मोबाईल क्रांती झाल्यामुळे सगळीकडे नवीन फॅशनचा बोलबाला झालेला. पण गेल्या दहा वर्षात किती बदललयं सगळं! ती मनात विचार करू लागली. त्या गर्दीत ती अक्षरशः अवघडली. स्टेशनवरच्या त्या अफाट गर्दीत हसरे, आनंदी, चिंताग्रस्त अनेक मानवी भाव-भावनांचे रंग असलेले चेहरे पसरलेले होते. ती बावरलेल्या नजरेने सारं काही टिपत होती. त्यादिवशीसुद्धा नेहमीप्रमाणे ट्रेन पंधरा मिनिटे उशिराने आली. नेहमीचीच असणारी धक्काबुक्की, रेटारेटी. त्या जीवघेण्या गर्दीत ती गुदमरली. तिच्या पतीने मुलांना व्यवस्थित डब्यात घुसवले. ती त्या गर्दीच्या लोंढ्यात आपसूक गाडीमध्ये चढली गेली. एवढया गर्दीतसुद्धा त्यांना खिडकीजवळ बसायला जागा मिळाली. दोन्ही मुलं आनंदली. मुलांना ट्रेनचा प्रवास तसा नवीनच होता. पती आणि मुलांसोबत ती सीटवर जरा अवघडूनच बसली. बसताक्षणी कपाळावर जमा झालेले घर्मबिंदु तिने हातातल्या रुमालाने अलगद पुसले. तिने आजूबाजूला बसलेल्या प्रवाशांवर एक नजर फिरवली. तिच्यासमोर एक वयस्कर स्त्री बसलेली. हातात पोथी घेतलेली आणि आजूबाजूला असलेल्या प्रवाश्यांची जराही दखल न घेता मोठ्या तन्मयतेने जपनाम करण्यात गुंतलेली. बाजूच्या कंपार्टमेंटमधून हौशी भजनी मंडळीचे टाळ कुटण्याचे आणि भजनाचे सुरेल आवाज कानावर येत होते. बाजूच्या सीटवर बसलेले आजोबा पेंगुळलेल्या डोळ्यांनी डुलक्या घेत होते. तिची नजर वरच्या बर्थवर गेली तर तिथे एक किशोरवयीन कॉलेज तरुण-तरुणी एकमेकांना चिटकून गप्पा मारण्यात मश्गुल झालेले..जणू आपल्या आजूबाजूला इतर प्रवासी आहेत ह्याचा विसर पडलेले ..... आपल्याच विश्वात रमलेले.....!! गाडीने वेग घेतला. एक गार हवेचा झोत तिच्या अंगावर आला. त्या थंडगार हवेच्या झोताने डब्यातल्या कोंदट वातावरणात गुदमरलेल्या तिच्या जीवाला हायसं वाटलं. बिल्डींग, दुकानं, घरं, रस्ते सारं मागे पडत चाललेले. थोड्याच वेळात पुढचं स्टेशन आलं. तिच्यासमोर बसलेली वयस्कर स्त्री आपली पर्स सांभाळत, कुणाकडेही नजर न टाकता त्या स्टेशनवर उतरली. त्या स्टेशनवर जेवढे प्रवासी उतरले त्यापेक्षा दुप्पटीने परत डब्यात चढले. तिच्या समोरच्या रिकामी झालेल्या जागेवर येऊन 'तो' बसला. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि सहा - सात वर्षाचा चिमुरडा होता. ते तिघेही दाटीवाटीने त्या जागेवर बसले. तिने त्याच्यावर एक नजर फिरवली. दिसायला रुबाबदार होता तो.!! निळ्या रंगाची जीन्स त्यावर साजेसा शर्ट. निमुळता, गोरा चेहरा. त्याने खिशातून गॉगल काढून डोळ्याला लावला. गॉगल लावल्यावर तर तो तिला अगदी हिरोसारखा भासला. ती डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्या कुटुंबाला निरखू लागली. त्याच्यासोबत असणाऱ्या स्त्रीकडे तिचं लक्ष वेधलं गेलं. ती स्त्रीसुद्धा कमी देखणी नव्हती. अगदी चित्रपटातल्या नटीसारखी दिसत होती. गोरा रंग, नितळ त्वचा, केस रेशमासारखे. नेहमी ब्युटी पार्लरला जात असेल का बरं ही? तिच्या मनात हा स्त्रीसुलभ प्रश्न उडी मारून गेला. ती एक साबणाची जाहिरात येते ना... टिव्हीवर ...त्यात जशी मम्मी दाखवली आहे अगदी तशीच मम्मी आहे ही... सुंदर , तरुण !! अगदी लक्ष्मी-नारायणाचा जोडा शोभतो जणू दोघांचा!! तिचे नजरेने निरीक्षण सुरु होते. त्या स्त्रीने पर्समधून एक इंग्रजी पुस्तक बाहेर काढले आणि पुस्तकाची पानं उलटत वाचायला सुरुवात केली. खूप शिकलेली असणार..! ती मनात त्या स्त्रीबद्दल आडाखे बांधू लागली. त्यांचा मुलगा पण गुबगुबीत गालांचा आणि गुटगुटीत बांध्याचा होता. खात्या-पित्या घराचं तेज तिघांच्या चेहर्‍यावर झळकत होतं. पण त्या स्त्रीचा चेहरा असा कोरडा , भावनाशून्य का दिसतोय बरं? असेल तशीच चेहर्‍याची ठेवण!!!... तिने एकवार पुन्हा त्याच्यावर नजर फिरवली. थोडासा ऋतिक रोशनसारखा दिसतोय का बरं ? आपल्याला पण ना जिथे-तिथे ऋतिक रोशनच दिसतो. तिच्या ओठावर हलकसं हसू फुटलं. पण ते हसू क्षणात मावळलं. आपण असं एखाद्या परपुरुषाचं निरीक्षण करणं योग्य नाही. तिला क्षणभर आपल्या विचारांची लाज वाटली. तिने हळूच आपल्या पतीकडे नजर फिरवली, तो मुलांशी गप्पागोष्टी करण्यात रमलेला. आजूबाजूला त्याचं लक्ष नव्हतं. तिची नजर पुन्हा त्याच्यावर गेली. थोडासा ऋतिक रोशन सारखाच दिसतो. हनुवटी तर हुबेहुब दिसतेयं.!! त्याला पाहिल्यावर तिला ऋतिक रोशन आठवला आणि मग तिच्या कॉलेजच्या आठवणी जाग्या झाल्या. कॉलेजला असताना आपल्याला ऋतिक रोशन कित्ती आवडायचा !!! त्याचा तो 'कहो ना प्यार है' चित्रपट आला होता, तेव्हा थेटरमध्ये पाहिला होता संपूर्ण ग्रुपने. त्यातलं ते 'चांद- सितारे, फूल और खुशबू' गाणं पाहून तर वाटायचं की , आपल्यासाठी असं गाणं कुणीतरी म्हणावं!! आपली जीवलग मैत्रीण तृषा... तिला शाहरुख खान खूप आवडायचा आणि आपल्याला ऋतिक रोशन. त्या दोघांत कोण श्रेष्ठ म्हणून दोघीजणी भांडत बसायचो. मग ती भांडणं आणि त्यानंतर दोन दिवसांचा अबोला आणि मग एकमेकींचे रुसवे-फुगवे. आज तिला त्या कॉलेजच्या आठवणींची, त्या राग- रुसव्याची भारी गंमत वाटली. " कहो ना प्यार है' मधल्या रोहितसारखाच जोडीदार मिळावा हे स्वप्नं पाहिलेलं आपण त्या अल्लड वयात. ते वयही अल्लड आणि भावनासुद्धा अल्लड!!!. पण कॉलेजला असताना अचानक बाबांचं निधन झालं आणि आपल्या घराचा जणू खांबच कोसळला. त्यांच्या जाण्याने आई आणि आपल्या जीवनात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली. आपल्याला शिक्षण अर्ध्यावर सोडायची वेळ आली. त्याच दरम्यान मावशीने आपल्यासाठी ह्यांचं स्थळ आणलं. आपल्याला एवढ्या लवकर खरंतरं लग्नच करायचं नव्हतं. पण आईलासुद्धा आपल्या स्वतःच्या खांद्यावरची जबाबदारी लवकर पार पाडायची घाई लागलेली. कित्ती रडलो आपण तेव्हा!. मुलगा एका कंपनीत फिटर होता. त्याला पगार पण यथातथाच. आपल्याला बघायला ज्यादिवशी आला तेव्हा त्याचा अवतार पाहून तर आपल्या नशिबी ऋतिकसारखा जोडीदार येऊ शकणार नाही हया सत्याची जाणीव आपल्याला झाली. हिरोसारखा दिसणारा पती मिळणार नाही म्हणून रडून-रडून डोळे सुजवून घेतले आपण. साधी पॅन्ट, त्यावर साधासा शर्ट, दिसायला पण साधारण. आपण त्यावेळी ह्यांना नकार देण्याचं पक्क केलं होतंच. पण मावशीने वडीलकीच्या नात्याने आपल्याला दम भरला.

" पुरुषाचं रूप बघायचं नसतं... कर्तुत्व बघायचं असतं!"

"काय कर्तृत्व बघायचं ? मला नाही लग्न करायचं एवढ्यात. मला शिकायचं आहे अजून!" आपण मोठ्या फणकाऱ्यात उत्तर दिलेलं.
आईने डोळ्यात पाणी आणलं आणि आपला नकार, हट्ट त्या अश्रुंच्या मार्‍यात धारातीर्थी पडला. आपल्याला कसा हिरोसारखा, ऋतिक रोशन सारखा दिसणारा पती हवा होता आणि आता ह्या महाशयांशी लग्न करावं लागतयं ह्या विचाराने मन अगदी निराश झालं आपलं. आपण नाराजीनेच ह्यांच्या गळ्यात माळ टाकली. पण जोडीदार म्हणून त्यावेळी ह्यांची निवड करणं हा आपला निर्णय योग्यच होता हे आता कळतंय. तिने अतिशय प्रेमाने आपल्या पतीकडे कटाक्ष टाकला.

तिला अचानक आठवलं की, मागे पेपरात वाचलं होतं.. ऋतिक रोशनचा घटस्फोट झाला म्हणून. सुपरहिरो, तरुणाईच्या हृदयाची धडकन असलेला, मदनाचा पुतळा... एवढ्या उपाधी असणाऱ्या नवऱ्याला का बरं सोडलं असेल त्याच्या बायकोने? तिला बिनकामाचा प्रश्न सतावू लागला. काय माहीत बाई !! मोठ्या लोकांच्या गोष्टी पण मोठ्याच असणार!! तिने पुन्हा एकदा प्रेमाने आपल्या पतीवर नजर फिरवली. तो अजूनही आपल्या लहानग्यांतच रमलेला होता. गाडी आपल्या वेगाने धावत होती आणि तिचे विचार पण त्याच वेगाने सुसाट धावत सुटलेले. एखाद्या स्टेशनवर ट्रेन थांबली की , मग उतरणाऱ्या, चढणाऱ्या प्रवाश्यांचे निरीक्षण करण्यात ती रमू लागली. त्याचवेळी डब्यात स्त्रियांचे कानातले, गळ्यातले कृत्रिम आभुषणे विकणारा फेरीवाला आला.

"मॅडम, घ्या कानातले, गळ्यातले. नवीन माल आहे. स्वस्त आणि मस्त आहे..घ्या मॅडम!" तिने चमकून आजूबाजूला पहात आपल्या पतीकडे पाहीलं. तो मिश्किल हसत म्हणाला,
" अगं, तुलाचं म्हणतोयं तो .. घे तुला जे आवडेल ते!"
आपल्याला ' मॅडम' म्हणून संबोधल्याने ती थोडीशी लाजली. तिने तिच्यासाठी छान कानातले झुमके घेतले. विचारांच्या तंद्रीतच तिला थोडीशी डुलकी लागली.

"अक्कल नावाची गोष्ट नाही का तुझ्याजवळ ? मूर्ख कुठली? कुठे लक्ष असतं तुझं?" जोर-जोरात ओरडण्याच्या आवाजाने तिने खाडकन डोळे उघडले. समोर बसलेला तो आपल्या पत्नीवर खेकसत होता. त्यांच्या लहान मुलाला तहान लागली म्हणून बॅगेतून पाण्याची बाटली काढताना थोडासा धक्का लागला आणि पाणी चुकून त्याच्या अंगावर सांडले. त्याचे कडक इस्त्रीचे कपडे ओले झाले आणि मग त्याच्या संतापाचा पारा शंभरच्या वर पोहचला आणि नंतर त्याच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला तो काही थांबण्याचं नावचं घेत नव्हता. हीच बॅग का घेतलीस, ती का नाही , तुझं मुलाकडे, घरात बिल्कुल लक्ष नाही. यांव न त्यांव!! तो गप्प बसायचं नाव घेतच नव्हता. पत्नी मात्र गपगार. तोंडातून एक चकार शब्द नाही. चेहऱ्यावर कुठलीही भावना नाही. चेहरा अगदी कागदासारखा कोरा. फक्त पाणी ते पण चुकून कपड्यांवर सांडले म्हणून चारचौघात, सार्वजनिक ठिकाणी आपल्या पत्नीला वाट्टेल तसं बोलतोय हा माणूस आणि एवढी शिकलेली म्हणजे तिच्या हातातले इंग्रजी पुस्तकावरून तरी तिने अंदाज बांधलेला, एकदाही उलटून प्रत्युत्तर देत नाही आपल्या पतीला? तिला खूपच आश्चर्य वाटलं. त्या स्त्रीबद्दल तिच्या मनात एक प्रकारची सहानुभूती दाटून आली. तिने त्याच्यात पाहीलेल्या हिरोच्या प्रतिमेला एक मोठी तडा गेली. त्याच्या वागण्याने चकीत झालेली ती आपलं त्यांच्याकडे लक्ष नाही असं दाखवत मुद्दाम खिडकीबाहेर पाहू लागली. त्याच्या वागण्याने आजूबाजूचे प्रवासी पण स्तंभित झाले. त्यांचा मुलगा तोसुद्धा आपल्या वडीलांचा कित्ता गिरवू लागला. "माझी मम्मी ना थोडी वेडीच आहे !" डोक्याला हात लावून अभिनय करत तिच्या मुलांना सांगू लागला. तिची मुलं गोंधळून आपल्या आईच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. तिने त्यांना खिडकीतून बाहेर दिसणार्‍या डोंगर,झाडं असं उगाच काहीतरी गमती-जमती दाखवत विषयाला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. तिने हळुवार, मायेने आपल्या मुलांच्या डोक्यावरून हात फिरवला. तिचे विचार परत आगगाडीसोबत धावू लागले. लग्न होऊन एवढी वर्षे झाली, पण नकळतपणेही आपल्या पतीने आपल्याला एका शब्दानेही दुखावले नाही. त्याचं शालीन वागणं, मृदू बोलणं, आपल्यावर तसचं मुलांवर असलेलं प्रेम ह्या सगळ्या गोष्टींनी त्याने आपल्याला जिंकून घेतलं आणि आपणसुद्धा मधाचा गोडवा पेरला आपल्या दोघांच्या संसारात. कधी-कधी आपण विनाकारण भांडतो त्याच्याशी. किती निरर्थक बडबड करतो, पण महाशय एकदाही आपल्याशी वाद घालत बसत नाहीत. सासूबाई म्हणतात , बैल आहे तुझा नवरा!! असा राग येतो त्यांचा. शांत, विचारी , समजुतदार स्वभाव आहे त्यांच्या मुलाचा. मी तर त्यांना कधीच कुणाशी भांडताना पाहिलेलं नाही. त्यांनी स्वतःच्या आईलाही एका शब्दाने दुखावलेलं पाहिलेलं नाही मी. काहीही म्हणा, पण सासुबाई आपल्या मुलाला ओळखण्यात कमीच पडतात. 'बायकोचा बैल' म्हणून निर्भत्सना करतात आपल्याच मुलाची. तेवढं सोडलं तर तशी आपली काही तक्रार नाही सासूबाईंबद्दल.!!. त्यासुद्धा खूप शालीन आणि समजुतदार आहेत. त्यांचे संस्कार, गुण पुरेपुर उतरलेत त्यांच्या मुलात. म्हणतात ना,' शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी ' अगदी तसचं!!. आता आपणसुद्धा थोडी समजदारी दाखवायला हवी. उगाच निरर्थक वाद टाळायला हवेत. पण बाबांच्या अकाली जाण्याने अपूर्ण राहिलेले शिक्षण, लग्न, मग मुलं. आपली एक - एक जबाबदारी मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढत गेलेली. सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना दमछाक होते आपली आणि मग सगळा राग निघतो आपल्या हक्काच्या, साध्याभोळ्या नवऱ्यावर!! तरीही आपण चुकत असताना प्रेमाने, शांततेने आपली समजूत घालतो आपला नवरा!!!..
" अगं, मुलांसमोर वाद घालायचं टाळत जा. त्याचे चांगले परिणाम नाही होणार त्यांच्यावर. एखादा चुकीचा शब्द त्यांच्या कानावर पडला तर तो कायमचा त्यांच्या मनावर कोरला जाईल. कोवळी मनं आहेत त्यांची. तुझा त्रागा समजू शकतो मी. लक्षात घे...आपली जमापुंजी म्हणजे आपली मुलं आहेत. त्यांचा विचार कर ..आणि तुला माहित आहे का? आपण आनंदी राहण्यासाठी, हसण्यासाठी जेवढी ऊर्जा आपलं शरीर वापरत नाही ना त्याच्या तिप्पट ऊर्जा जेव्हा आपण रागावतो ना, तेव्हा आपलं शरीर वापरतं. तर आता तू ठरव तुझ्यामधली शक्ती, ऊर्जा कुठे वाया घालवायची ते! जर मीसुद्धा तुझ्यासोबत निरर्थक भांडत बसलो ना ...तर आपल्या घराचे कुरुक्षेत्र होईल गं! समजून घे तु सुद्धा!!"

माणूस अगदी साधा, राहणीमान सामान्य.. पण विचार, बोलणं मात्र एखाद्या तत्ववेत्त्यासारखं. तिने एकवार आपल्या पतीकडे कौतुकाने पाहीलं. आपण घरातली जबाबदारी पार पाडतो पण घराबाहेर पडून आपल्या संसारासाठी तो किती कष्ट करतो ह्याची जाणीव आपण ठेवायला हवी. त्याचं कंपनीतलं अतिशय कष्टाचं काम, ते काम करत असताना त्याला होणारा त्रास ...आपण त्याबद्दल कधीच विचार करत नाही. घरासाठी चार पैसे जास्त मिळावे म्हणून कंपनीत ओवरटाईम करून थकून-भागून घरी आल्यावर मुलांना, आपल्याला पाहिल्यावर किती खुलतो त्याचा चेहरा!! आता विनाकारण त्याच्याशी वाद घालायचा नाही. हे तिने मनोमन ठरविले. आपल्या विचार श्रुंखलेतून बाहेर येत तिने सभोवताली नजर फिरवली. समोरची स्त्री मान खाली घालून पुस्तक वाचण्यात गुंग झालेली. चेहरा तसाच कोरडा, भावनाशून्य. समोर बसलेल्या त्याने आता गुटख्याचे पाकीट काढलं आणि आपल्या तोंडात पूर्णपणे रिकामी केलं. गुटख्याचा वास आजूबाजूला पसरला. तिला त्या वासाने कसंतरीच झालं. त्याच्या त्या गुटखा खाण्याच्या व्यसनाने परत एकदा त्याच्यामध्ये पाहिलेल्या हिरोच्या प्रतिमेला तडा गेली. दिसायला फक्त हिरो.. मात्र वागणं एखाद्या व्हिलनसारखं!! आपल्या बायकोला चारचौघात हिणवतो, सार्वजनिक ठिकाणी व्यसन करतो.... तिला त्याचा भयंकर तिरस्कार वाटला. गुटख्याचा तोबरा तोंडात भरल्यानंतर दहावेळा तरी तो उठून ट्रेनच्या टॉयलेटमध्ये जाऊन थुंकून आला असावा. एकदा तर त्याने खिडकीतून थुंकण्याचा प्रयत्न केला , त्यावेळी त्याच्या पत्नीने त्याला अडवलं, तेव्हासुद्धा तो परत एकदा तिच्यावर डोळे वटारून डाफरला. मान पुस्तकात खाली घालून गप्प बसली बिचारी!!

गाडी वेगाने धावत होती. पुढचं स्टेशन आलं. तिच्या बाजूची जागा रिकामी झाली. त्या जागेवर एक मुलगी येऊन बसली. अतिशय देखणी होती ती. तिने तिच्यावरून नजर फिरवली. प्रियांका चोप्राची बहीण शोभेल नाही का ही? तिने प्रियंका चोप्राशी त्या मुलीची तुलना करून टाकली. अजून तीचं स्टेशन यायला बराच अवधी शिल्लक होता. स्टेशनं मागे पडत होती. नवीन स्टेशनं येत होती. जुने प्रवासी उतरत होते. नवीन प्रवासी डब्यात चढत होते. समोर गॉगल घालून बसलेला तो एकटक त्या मुलीकडे बघत असावा असं तिला उगाचचं वाटलं. गॉगल घातलेला असल्यामुळे समजत नव्हतं की, तो नक्की कुठे पाहतोय पण तिला त्याचा संशय आला. मुलीचं मात्र बिल्कुल कुणाकडेच लक्ष नव्हतं. ती कानात इअरफोन घालून गाणी ऐकण्यात गुंग झालेली. समोरचा तो आता शीळ घालत गाणं गुणगुणू लागला. त्याच्या पत्नीने पुस्तकातून नजर उचलून त्याच्याकडे पाहिलं. तेव्हा अगदी तुसडेपणाने तिला म्हणाला, काय आहे? काय झालं ? तिची नजर पुन्हा पुस्तकात खाली. त्याच्या आवाजाने बाजूच्या मुलीने समोर पाहीलं. त्याने तिच्याकडे पाहत चेहर्‍यावर लोचट हसू आणलं. त्या मुलीने त्याला बिल्कुल प्रतिसाद दिला नाही. तो जागेवरून उठला. समोरून जाताना चुकून त्याचा पाय त्या मुलीच्या पायाला लागला. तिला सॉरी म्हणत, तोंडात गाणं गुणगुणत तो डब्यात फेरफटका मारून आला. त्या मुलीने रागाने त्याच्याकडे पाहिलं. समोर येऊन बसल्यावर बराच वेळ तो हातातल्या मोबाईलशी चाळा करत राहिला. तो मोबाईल समोर धरून बसला होता. तेवढ्यात अचानक ती मुलगी उठली. त्याच्या हातातला मोबाईल खेचून घेत जोरात ओरडू लागली. "इकडे द्या तो फोन !" तिच्या खडसावण्याने तो जरासा सटपटला. तिने त्याचा फोन हातात घेतला. फोनची गॅलरी उघडल्यावर त्यात आपले चोरून काढलेले फोटो पाहून तिने त्याच्या एक सणसणीत थोबाडीत लगावली. त्याच्या डोळ्यासमोर नक्कीच अंधार आला असावा. क्षणभर आजूबाजूच्या प्रवाशांना काही कळलंच नाही की, नक्की काय घडतयं ते? त्याची पत्नीही अचानक घडलेल्या घटनेने गांगरली. तिला पण काही समजेना.

" मघासपासून पाहतेयं मी ह्या माणसाची नाटकं. चोरून मोबाईलमध्ये फोटो काढलेत ह्या व्यक्तीने माझे. मला आधीच संशय वाटत होता ह्या व्यक्तीबद्दल ..तुम्ही सगळ्यांनी पण बघा माझे चोरून काढलेले फोटो.. मी खोटं बोलतेयं असं वाटत असेल तर..! लाज वाटत नाही का कुणाच्या परवानगीशिवाय असे फोटो काढायला?" ती भयंकर संतापलेली. तिने त्याचा मोबाईल आपल्याजवळ ठेवून घेतला. मी पुढच्या स्टेशनवर उतरून पोलीस तक्रार करणार असं ती म्हणू लागली. बाकीचे प्रवासी पण तिच्‍याबाजूने उभे राहिले. तो खाली मान घालून बसलेला. त्याची पत्नी अक्षरशः गयावया करु लागली. "मी माफी मागते त्यांच्यावतीने तुझी, प्लीज पोलिसांकडे तक्रार नको करूस. पाया पडते मी तुझ्या!" अश्रुभरल्या डोळ्यांनी त्याची पत्नी त्या मुलीची विनवणी करू लागली.

" तुम्ही का माफी मागतायेतं ? ज्याने गुन्हा केला आहे त्याला शिक्षा व्हायलाच हवी !" मुलीचा राग शांत होणं शक्यचं नव्हतं.
‌ डोळ्यांसमोर घडलेल्या ह्या घटनेने आता मात्र तिला प्रचंड धक्का बसला. त्या समोरच्या पुरूषांमध्ये पाहिलेल्या हिरोच्या प्रतिमेला आता पूर्णपणे तडा गेला आणि ती प्रतिमा छीन्न-विछिन्न झाली. त्याच्याबद्दल तिच्या मनात घृणा निर्माण झाली. त्याचा मुखवटा फक्त हिरोचा आहे पण वागणं मात्र व्हीलनसारखं... शक्ती कपूर कुठला!!... तिला त्याचा खूप राग आला. त्याचवेळी त्या मुलीचं, तिच्या धैर्याचं खूप कौतुक वाटलं तिला.. आणि भूतकाळात आपल्याला अशी हिंमत दाखवता आली नाही त्याचं वैषम्य.... !!तिला आठवलं ...कॉलेजमध्ये असताना पिंटू तिलवाणी आपल्याला किती सतवायचा. कॉलेजचा टपोरी म्हणूनच कुप्रसिद्ध होता तो. मोटरसायकलवरून आपला नेहमी पाठलाग करायचा. एकदा तर हद्दच केली त्याने. भररस्त्यात मोटरसायकलवरून येऊन आपली ओढणी खेचून नेली. भीती, संताप, शरम, हतबलता ह्या साऱ्या भावना अनावर होऊन रडत बसलो आपण त्यावेळी. त्यानंतर घाबरून दोन दिवस कॉलेजला गेलो नाही. मग आपली जिवलग मैत्रीण तृषाने आपल्याला हिंमत दिली. कॉलेजमध्ये पिंटूविरोधात प्राचार्यांकडे तक्रार केली. पिंटू आणि त्याच्या पालकांना ऑफीसमध्ये बोलावून प्राचार्यांनी पिंटूला सज्जड दम भरला. त्यानंतर मात्र त्याने आपल्याला कधीच त्रास दिला नाही. पण आपण मात्र त्यावेळी भित्री भागुबाई ठरलो एवढं मात्र खरं! तिने एक दीर्घ श्वास घेतला.

"दीदी , नको ना गं माझ्या पप्पांना पोलीसांकडे देऊ. प्लीज नको ना!" त्या चिमुकल्याच्या रडण्याने ती भूतकाळातून बाहेर आली. तो चिमुरडा रडू लागला. त्याच्या डोळ्यांतले अश्रू पाहून तिला गलबलून आलं. काय दोष आहे बायको- मुलाचा? त्याच्या घृणास्पद कृत्यासाठी दोघांना आपले अश्रु वाया घालवावे लागतायेतं!! त्या निष्पाप मुलाच्या रडण्याने ती मुलगीसुद्धा भावूक झाली. तिला काय वाटलं कुणास ठाऊक, पण तिने त्याच्या मोबाईलमधले तिचे सगळे फोटो डिलीट केले आणि मोबाईल त्याच्या पत्नीच्या हातात देत कठोरपणे त्याच्याकडे पाहत म्हणाली, " निदान आपल्या बायको आणि मुलाचा तरी विचार करावा. एवढा निर्लज्जपणा बायकोमुलं असताना करताना काहीच वाटलं नाही का ? या निष्पाप पोराकडे पाहून सोडतेयं पण ह्यातून आता धडा घ्या आणि पुन्हा असला गुन्हा करण्याची हिंमत करू नका. प्रत्येकवेळी बायको ,मुलं सोडवायला येतीलच असं नाही!" त्याची मान खाली गेलेली.. त्याला नजर वर करण्याची हिंमतच नव्हती. त्याची पत्नी शरमेने काळीठिक्कर पडलेली. तिने नजरेनेचं त्या मुलीचे आभार मानले. पुढचं स्टेशन आलं. मुलगी उतरून गेली. जुने प्रवासी उतरले... नवीन प्रवासी डब्यात चढले. तो आता खाली मान घालून शांत बसला होता. त्यांचा लहानगा आईच्या कुशीत डोके टाकून विसावलेला. त्याच्या पत्नीचा चेहरा पुन्हा पूर्वीसारखा कोरडा, भावनाशून्य!!!.

‌तिचं स्टेशन आता जवळ आलेलं. ती आणि तिचा पती आता उतरण्याच्या तयारीला लागले. ती उठली. तिच्या पतीने मुलांना हाताशी धरलं. ती उठून दरवाजाच्या दिशेने चालू लागली. स्टेशन जवळ येता - येता तिने एकवार मागे वळून पाहिलं. तो अजून खालमानेने बसलेला. त्याची पत्नी पुस्तकात डोकं खुपसून बसलेली. तेवढ्यात अचानक तिने पुस्तकातून नजर उचलली. दोघींची नजर एकमेकींवर पडली. कोरडा , भावनाशून्य असणाऱ्या तिच्या चेहऱ्यावर एक मोकळं हास्य पसरलं. त्या हास्यात तिला काहीतरी वेगळेपणा जाणवला. काय बरं वेगळेपणं असावं त्या स्मितहास्यात? कुणालातरी चांगलीच अद्दल घडली म्हणून चेहर्‍यावर आलेले मोकळे भाव असावे का बरं त्यात? जास्त विचार न करता तिनेसुद्धा चेहर्‍यावर स्मित लकेरी उमटवत तिच्या हास्याला प्रतिसाद दिला. दोघींनी एकमेकींना हात उंचावून निरोप दिला. ती स्टेशनवर उतरली. फ्लॅटफॉर्मवरच्या अफाट गर्दीत आपल्या मुलांचा, आपल्या पतीचा हात धरून त्यांच्या सोबतीने ती निघाली... त्या गर्दीचा एक भाग बनून ....पुढच्या प्रवासाला..... !!! माणसांच्या अजब दुनियेत अजून नवीन अनुभव घ्यायला ....आणि त्यासोबत आपलं अनुभवविश्व आणि विचार साम्राज्य अधिक समृद्ध बनवायला!!.....

समाप्त!

धन्यवाद!

रूपाली विशे- पाटील

__________________ XXX______________

(टिप- कथा काल्पनिक असून कथेद्वारे कुणाच्याही भावना दुखावणे हा कथालेखिकेचा उद्देश नाही.)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

तीच्या भावना अगदीच छान मांडल्या आहेत...... तुझ्या कथा म्हणजे प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे राहतात...... रूपाली

तीच्या भावना अगदीच छान मांडल्या आहेत...... तुझ्या कथा म्हणजे प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे राहतात...... रूपाली>>>> हो खरच. रुपाली तुमच्या कथेत एक छानसे आपल्या आजुबाजूचेच विश्व असते, ज्यात वाचकाला रमायला होते. ही कथा अगदी आम्ही प्रवासी बनुन अनूभवतोय असे वाटले.

सुंदर कथा. कथेतील ती चे स्वगत छान व्यक्त झाले आहे. समाजातील वाईट विकृतींचा संदर्भ कल्पकतेने मांडला आहे.

अप्रतिम कथा रुपाली...… संपूर्ण चित्र डोळ्यासमोर उभे राहिले..... फक्त एक शंका होती.... भजनी मंडळी ही लोकल ट्रेन मध्ये असतात.... आणि त्यात अप्पर बर्थ नसतो.....

@लावण्या - धन्यवाद...तुझ्या नेहमीच्या प्रतिसादाने माझा नेहमीच हुरूप वाढतो.
@ अज्ञातवासी - धन्यवाद तुमच्या नेहमीच्या प्रतिसादासाठी आणि प्रोत्साहनासाठी... आणि नेहमीच तुमच्या कथेच्या प्रतिक्षेत असते बरं मी..!
@ राणी - मनापासून धन्यवाद प्रतिसादासाठी!!
@ स्वाती लाड- मनापासून धन्यवाद प्रतिसादासाठी!!
@ रश्मीजी - खूप आभार तुमचे.. !! माझ्या कथेवरचा तुमचा प्रतिसाद वाचून खूप आनंद झाला मला.
@ किशोरजी - खूप धन्यवाद तुम्हांला.. तुम्ही कथा वाचून संवेदनशीलतेने विचार करता आणि त्यावर प्रतिसाद देता.. तुमच्या नेहमीच्या प्रोत्साहनासाठी मी नेहमीचं तुमची ऋणी राहीन!!
@ तुषार - खूप धन्यवाद तुला...! तुझी शंका बरोबर आहे. पण मी जरा लांबच्या पल्ल्याच्या ट्रेनचा संदर्भ घेतलाय कथेत.. मुंबई - वलसाड फास्ट पैसेंजरचा.. तुला माहीत असेलच ही ट्रेन .. आणि त्या ट्रेनमध्ये आमचे डहाणू- पालघरचे प्रवासी पण भजन म्हणतात बरं ( फक्त विरारपुढचेच नाही काही ..( गंमत करते ह.घे.)

रुपालीताई, कथानायिकेचं भावविश्व सुंदर पध्दतीने रेखाटले आहे तुम्ही.
आजुबाजुला घडणाऱ्या घटनांमधले नाट्य शोधुन कोणतीही अलंकारिक भाषा न वापरता तुम्ही कथा फुलवता. त्यामुळे वाचताना वाचकही कथेचा भाग होऊन जातो.

@ मृणाली - धन्यवाद.. तुझं नेहमीचं प्रोत्साहन खरचं कौतुकास्पद!!
@ भाग्यश्री - धन्यवाद तुला ..कथा आवडल्याबद्दल..!
@ वीरुजी - धन्यवाद ... खूप सुंदर प्रतिसाद दिला तुम्ही कथेवर ... फार छान वाटलं वाचून.. !!

छान आहे कथा. एकेकाची स्वभाव वैशिष्ट्य तर आहेतच पण रूपाने देखणा माणूस मनानेही तसाच असेल असे नाही हे फार छान अधोरेखित झालंय.

धन्यवाद चंपा... !! तुम्ही छान प्रतिसाद दिलात कथेवर...
धन्यवाद सीमंतिनी ... कथा आवडल्याबद्दल...!!

असं वाटलं की बाजुच्याच सीटवर बसलेलो असताना घडलेला प्रसंग पहातोय. > + १
छान रेखाटलय तीच भावविश्व आणि प्रसंग वर्णन.

जेम्स बॉन्ड , मानवजी..!!
खूप धन्यवाद तुम्हांला... तुमचे प्रतिसाद आवडले. खरं सांगायचं तर सात- आठ वर्षापूर्वी ट्रेनमध्ये बाजूच्या सीटवर बसून एका इसमाने मुलीचा मोबाइलमध्ये फोटो काढण्याचा आणि थप्पडवाला प्रसंग मी स्वतः डोळ्यांनी डब्यात घडताना पाहिलायं.. बाकी कथा काल्पनिक आहे पण फोटो काढण्याचा प्रसंग अगदी खरा..!!

Back to top