सिडनेचे बुरूज!

Submitted by फेरफटका on 19 January, 2021 - 23:37

कमाल!!! अविश्वसनीय!!! काल रात्री जागून पाहिलेल्या मॅच ने अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटलं. अनेक वर्षांपूर्वी रात्रभर जागून पाहिलेल्या अशाच त्या इडन गार्डन च्या मॅच च्या आठवणी जिवंत झाल्या. भारतीय संघाला, त्यांच्या लढण्याच्या जिगरीला, त्यांच्या विजिगीषू वृत्तीला त्रिवार सलाम!!
सादर कुर्निसात!!

परवा ऑस्ट्रेलियाने भारताला ४०७ चं लक्ष्य देताना चार पूर्ण सेशन्स खेळायला दिले तेव्हाच मनातला आशावादी कोपरा सुखावला होता. भरपूर वेळ होता. थोडासा अहंकार पण दुखावला होता की ऑस्ट्रेलिया ने भारतीय जायबंदी फलंदाजीला आणी स्वतःच्या अभेद्य गोलंदाजीला गृहीत धरलं होतं. तेव्हाच कुठेतरी नियती मनात हसली असावी.

चौथ्या दिवस अखेर २ गडी बाद ९८ धावा. चौथ्या डावात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना एकदा सेट झाल्यावर बॅट्समन ने अर्धशतकात समाधान मानायचं नसतं आणी स्कोअरिंग च्या संधी शोधताना मोठ्या इनिंग ची संधी हुकवायची नसते हे शुभमन गिल ने लवकरात लवकर विराट कोहलीकडून शिकावं. रोहितकडून सुद्धा मुंबई ब्रँड च्या 'खडूस' क्रिकेट ची अपेक्षा होती पण तो दिवस संपता संपता षटकाराच्या मोहात फसला. जडेजा जायबंदी, पंत चं खेळणं अनिश्चित आणी २ सेट बॅट्समेन आऊट होऊन परतलेले. आता सगळं रहाणे-पुजारा जोडीवर अवलंबून होतं. हे किती तग धरतात कुणास ठाऊक!

पाचवा दिवस प्रथमग्रासे मक्षिकापातः म्हणावा तसा रहाणे च्या विकेट ने सुरू झाला आणी 'जाऊ दे, नको बघायला मॅच, फार त्रास होईल' असा विचार करत होतो. पण जित्याची खोड असल्यामुळे टीव्हीसमोरून हाललो नाही. आणी टीम मॅनेजमेंट ने पहिला मास्टर स्ट्रोक खेळला. पंत बॅटींग ला उतरला. भारतीय संघानं रणशिंगच फुंकलं. एक खणखणीत संदेश होता ऑसीज ना - 'आम्ही मॅच जिंकण्यासाठी खेळतोय. तुम्ही ठरवा काय करायचं ते, अडवू शकत असला, तर प्रयत्न करा' - लाऊड अँड क्लियर!!! पुढचे दोन-एक तास पंत ने अक्षरशः धुमाकूळ घातला. सिडने च्या मैदानावर चौथ्या डावात नॅथन लायन हे ऑस्ट्रेलियाचं सगळ्यात मोठं शस्त्र असणार होतं, पण पंत च्या बॅटने त्याला पार बोथट करून टाकलं. सकाळपासून 'ऑस्ट्रेलिया ला जिंकायला किती बळी हवे आहेत' हे दाखवणारे धावफलक, आता 'भारताला जिंकायला किती धावा हव्या आहेत' ते दाखवत होते. शतकाच्या उंबरठ्यावर असताना घात झाला. पंत च्या हातात बॅट फिरली आणी एक 'वेल-डिझर्व्ड' शतक थोडक्यात हुकलं. पण ऋषभ पंत च्या कारकिर्दीत तो ह्यापुढे जितकी शतकं मारेल, त्या सगळ्यांच्या बरोबरीनं, हे हुकलेलं शतक मानानं मिरवेल.

ऑसीज ने सुटकेचा नि:श्वास टाकत त्यांच्या बॉलिंगमधल्या हुकूमी एक्क्याला - पॅट कमिन्स ला बॉल सोपवला. आता समोर भक्कम बचाव करणारा पुजारा होता. तान्हाजी धारातिर्थी पडल्यावर ज्या त्वेषानं शेलारमामानं समशेर चालवली होती त्या त्वेषानं आता पुजारानं कमिन्स वर हल्ला चढवला आणी त्याला लागोपाठ तीन चौकार खेचले. हा प्रतिहल्ला ऑसीजसाठी अगदीच अनपेक्षित होता. पण इतकी सरळसोट पटकथा नियतीला नामंजूर होती. लायन च्या चेंडूवर एक चोरटी धाव घेत असताना हनुमा विहारी चा मांडीचा स्नायू दुखावला आणी काही कळायच्या आतच जॉश हेझलवूड चा एक चेंडू अगदी शेवटच्या क्षणी हलकासा स्विंग झाला आणी पुजारा च्या ऑफ-स्टंप चा वेध घेऊन गेला. अजून चहापानाला एक तास शिल्लक होता. अश्विन-विहारी जोडी मैदानात होती. त्यापैकी विहारी जायबंदी आणी अश्विन च्या नावावर जरी कसोटी शतकं असली तरी इतक्या कठीण परिस्थितीत त्याच्याकडून कसलेली फलंदाजी त्याच्या निस्सीम चाहत्यांनी सुद्धा अपेक्षिलेली नव्हती. अजून ४० हून अधिक षटकं शिल्लक होती. ऑस्ट्रेलिया ला विजय खुणावत होता, भारतीय चाहते चुटपुटत होते आणी नियती अजूनही हसत होती.

त्यानंतर जे घडलं ते केवळ अविस्मरणीय होतं. चहापानानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाज आखूड टप्प्याचा, शरीरवेधी मारा करत होते आणी ते वेगवान चेंडू जमतील तसे चुकवत, खेळत आणी अंगावर घाव झेलत अश्विन आणी विहारी खंबीरपणे उभे होते. रॉक-सॉलिड!! त्या उसळत्या चेंडूंच्या बरोबरीनं ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षकांचे वाग्बाण झेलत आणी परत टोलवत दमलेली, जायबंदी झालेली ही भारतीय फलंदाजांची जोडी भारतीय संघाची अब्रू राखत, पराभवाच्या आणी भारतीय संघाच्या मधे धीरोदात्तपणे उभी होती. धावांचा हिशोब आता कुणीच करत नव्हतं. आता हिशोब होता तो उरलेल्या चेंडूंचा आणी मिनिटांचा. आंध्र प्रदेश चा विहारी आणी तमिळनाडू चा अश्विन असे झुंजत असताना भारतीय वंशाची, पण जन्मानं आणी कर्मानं ब्रिटीश असणारी इशा गुहा कॉमेंट्री करताना म्हणाली की 'सगळा दक्षिण भारत ह्या दोघांना अशी फलंदाजी करताना पहायला टीव्हीसमोर एकवटला असेल.' भारतीय वंशाची असूनही तू भारतीयत्वाला ओळखलंच नाहीस इशा!! त्या दोघांना लढताना पहायला, त्यांच्यामागे शुभेच्छांचं आणी प्रार्थनेचं बळ उभं करायला 'सगळा भारत' उभा राहिला होता.

अखेर भारतानं सामना अनिर्णीत राखला. शेन वॉर्न म्हणाला तसं क्रिकेट न कळणार्या माणसाला पाच दिवस खेळूनही सामन्यात विजयी कोण हे ठरलंच नाही हे समजावून सांगणं अशक्य आहे. पण ती चुरस, त्या फारशा धावा न काढता खेळून काढलेल्या ओव्हर्स, तो पराभवाच्या जबड्यातून, पोटापर्यंत पोहोचलेला सामना अनिर्णीत राखण्यासाठी शेवटच्या कणापर्यंत पणाला लावलेली शारिरीक आणी मानसिक ताकद ह्याचं नातं मानवी जिवनाशी आहे. प्रत्येक वेळी कुणी जिंकत किंवा हारत नसतं. पण आयुष्यानं समोर उभी केलेली आव्हानं ताठ मानेनं झेलून, हार न मानता पुढे चालत रहायचं असतं. 'हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला'.

नशीब नावाची काही वस्तू अस्तित्वात असेल तर ते फक्त अथक प्रयत्नांनाच फळतं ह्याचं परत एकदा प्रत्यंतर आलं. ह्याच सिडने च्या मैदानावर २००३-०४ च्या दौर्यात विजयाच्या उंबरठ्यावर भारत उभा असताना, यष्टीरक्षक पार्थिव पटेल नं स्टीव्ह वॉ ला जीवदान दिलं आणी हारत आलेली मॅच अनिर्णीत राखण्यात ऑस्ट्रेलियाला यश आलं. काल शेवटच्या आठ ओव्हर्स शिल्लक असताना मिचेल स्टार्क चा एक चेंडू हनुमा विहारीच्या बॅट ची कड घेऊन ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक टीम पेन च्या दिशेनं गेला आणी एरव्ही असे झेल सहज घेणार्या पेन च्या हातातून तो झेल मात्र सुटला, एक वर्तुळ पूर्ण झालं आणी नियती भारतीय संघाकडे पाहून प्रसन्न हासली.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त लिहिलेत
तंतोतंत डोळ्यासमोर उभे राहिले सगळे चित्र

छान!
पार्थिव पटेलनं सोडलेला तो झेल विसरायला झालं होतं. इथे असं वाचल्यावर लख्खकन आठवला.

मस्त! क्रिकेट बाफ वर वाचला होताच. आता हे वाचताना आश्चर्य वाटते, की मेलबोर्न, सिडने आणि ब्रिस्बेन - यातली प्रत्येक गेम त्या त्या वेळेपर्यंत ही सिरीज संस्मरणीय करायला पुरेशी होती. पण प्रत्येक पुढच्या गेमने त्या वरताण मजा आणली.