प्रत्यक्षातलं इलेक्ट्रॉनिक्स शिकण्यासाठी काय करता येईल?

Submitted by केअशु on 19 January, 2021 - 10:32

मित्रहो!
मी इलेक्ट्रीक आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादने क्षेत्रात नॉनटेक्निकल विभागात आहे.बरे चालले आहे. शिक्षण इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी.पण हे बहुतांश भारतीयांचं जसं होतं तसं झालेलं.कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून घेतला प्रवेश नि टाकलं उरकून. Sad
पण हा इतिहास झाला.झालं ते झालं.

सध्या करोना कृपेने कंपनीत काम थोडे कमी असल्याने थोडा वेळ मिळतो आहे.तर या वेळेचा उपयोग प्रत्यक्षातलं इलेक्ट्रॉनिक्स शिकण्यासाठी करावा या विचारात आहे.कंडू म्हणा हवं तर Wink म्हणजे बेसिक इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनन्टस् कसे काम करतात? ते PCB वर जोडून वीजप्रवाह खेळवल्यावर सर्कीट कसे काम करते हे शिकायचे आहे.
या पूर्वीही वेळ मिळेल तेव्हा मी शिकायचा प्रयत्न केलाय.पण कदाचित दिशा चुकली असावी.पुस्तकांमधून शिकणे फारसे कामाला येत नाही इतके मात्र ज्ञान झाले आहे. Happy त्यामुळे आता प्रात्यक्षिक स्वरुपात प्रयत्न करु इच्छितो.
पण शेवटी हा विजेशी खेळ आहे. फट् म्हणताच ब्रह्महत्या व्हायची शक्यता.शिवाय माझ्या उचापत्यांमुळे घरातल्या सुरु असलेल्या विजेच्या वस्तुंवर विपरीत परिणाम व्हायला नको.
बाजारात वेगो किंवा अशाच अन्य काही ब्रँडसची सर्कीट जोडायची किटस् मिळतात.पण ती नावाप्रमाणेच फक्त जोडायला शिकवतात.कॉम्पोनन्ट किंवा एकंदर सर्कीट कसे काम करते याबद्दल फार काही नसते.कागदावरची सर्कीट डायग्राम आणि प्रत्यक्षातली जोडणी यांचा मेळ घालणे मला काहीसे कठीण जाते.
उदाहरणार्थ फोनच्या चार्जरमधे काही वेळा दोन कपॅसिटर्स शेजारी शेजारी का बसवलेले असतात? दोन इलेक्ट्रोलिटीक कपॅसिटर वापरण्याऐवजी एकच जास्त कपॅसिटीचा कपॅसिटर का वापरत नाहीत? किंवा एखाद्या पॉईंटवर अमुकच कपॅसिटर का वापरायचा हे डिझाईन करणारे कसे ठरवतात?अमुक ठिकाणी मॉस्फेटच का वापरला? नेहमीचा अर्धवर्तुळाकार ट्रान्झिस्टर का वापरला नाही? वीजप्रवाह सुरु झाल्यावर तो कसा कसा पसरतो या सर्कीटमधे? हा घटक इथेच का बसवायचा? हाच का बसवायचा? हे असले प्रश्न मला पडतात. या अशाच प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. यात अजून एक लोचा म्हणजे या सर्व घटकांच्या आत वीजप्रवाह शिरल्यावर नक्की काय बदल होतात हे बाहेरुन कळत नाही. Sad

यासाठी लागणारे मुलभूत कौशल्य म्हणजे सोल्डरींग ते चांगले करता येते.

या विषयातला आंजावरचा एक तज्ञ मित्र मला त्याच्या वेळेनुसार या विषयात शिकायला मदत करतोही.पण तो त्याचे व्याप सांभाळून हे करत असल्याने त्याच्या मागे सतत लागणे योग्य वाटत नाही.शिवाय सध्या या विषयातले माझे ज्ञान अगाध Sad असल्याने शिकवणार्‍याचा उत्साह कमी व्हायला नकोय.

तर हवंय हे की जास्तीतजास्त स्वयंप्रयत्नातून किंवा तुनळीच्या मदतीने आणि अगदीच अडले तर एखाद्या तज्ञाची मदत घेऊन हे शिकायचे आहे.त्यापैकी स्वयंप्रयत्न काय करावेत याबद्दल मार्गदर्शन हवंय.सुरुवात कशी करावी? स्वयंशिक्षणासाठी कोणती साधने, माध्यमे वापरावीत? नक्की कुठे नि काय चुकते आहे? हे सर्कीट डिझायनर्स नक्की कसा विचार करतात? कौनसी चक्की का आटा खाते हैं? Happy

अॉर्ड्युनो शिकण्यात , जोडण्यात स्वारस्य नाही.इलेक्ट्रॉनिक घटकांचे कार्य कसे चालते ते शिकायचे आहे.युट्यूबवर बरेचसे भारतीय व्हिडिओ हे सर्कीट कसे जोडायचे याबद्दल आहेत. कॉम्पोनन्ट कसे काम करतात हे शिकवणारे व्हिडिओ हे सर्कीट डायग्रामद्वारे शिकवणारे आहेत.प्रत्यक्षात कॉम्पोनन्ट परिपथात जोडून शिकवणारे व्हिडिओ जरुर सुचवा.

उपद्व्याप,धडपड वाचून हसू आले तरी चालेल Happy पण कृपया मार्गदर्शन करा. मार्गदर्शकांचे आधीच आभार _/\_

Group content visibility: 
Use group defaults

अप्पा बळवंत चौकात रद्दीत एलेक्ट्रॉनिक्स फॉर यु मासिकाचे जुने अंक मिळतील. कोम्पोनंट आणि छोटे पीसीबी पण तिथेच पायोनिअर एलेक्ट्रॉनिक्स मध्ये मिळतील.(मुंबईत असाल तर लॅमिन्ग्टन रोड वर) त्यातली छोटी छोटी प्रोजेक्ट करुन बघा. यात खूप वेगवेगळी आर्टीकल्स पण असतात.

यातली बरीच पुस्तकं आता इंटरनेट वर फ्री लायब्ररीज मध्ये मिळतील. किंवा इ बुक्स घेतली तर किंडल वर स्वस्तात.

इलेक्ट्रॉनिक्स ला व्ही के मेहता चे बेसिक पुस्तक सुरुवात म्हणून वापरता येईल.
Op-Amps and Linear Integrated Circuits -Ramakant A. Gayakwad
कोठारी- नागरथ बेसिक इलेक्ट्रॉनिक्स
कोणीतरी जैन आहे त्यांचे डिजीटल इलेक्ट्रॉनिक्स.
बक्षी गोडसे अ‍ॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स

बाकी बेसिक ज्ञानाला आता बरेच फ्री युट्युब चॅनल असतील.
हाऊस्टफवर्क्स साईट वर पण बरीच माहिती मिळते.
मराठीत हवं असेल तर ९ वी किंवा १० वी ची भौतिक ची पुस्तके. यात पण रोध,प्रवाह,विद्युतदाब,जनित्र,रोहित्र, अवरोहित्र वगैरे ची चांगली माहिती आहे.

Electronic Devices and Circuits - Jacob Millman.
थिअरी तर शिकावी लागेल आधी.
सोबत Electronics components कसे चेक करायचे याचे व्हिडिओ सर्च करून बघु शकता.

Diode वापरून rectifier, transistor as a switch, transistor as an amplifier वगैरे सर्किट बनविण्यासा पासून सुरू करून, 741 op amp वापरून comparator, integrator, differentiator, 555 टाईमर as on/off delay timer, oscillator/square wave generator इत्यादी बेसिक समजून घेत छोटे छोटे सर्किट बनवून, त्यात बदल करून वेगळे डिझाइन करणे, असे करत मग मोठे सर्किट्स समजून बनवणे असे करू शकता.

बेसिक क्लिअर हवे. सिंगल फेज / 3 फेज bridge rectifier सर्किट पाठ न करता डायोड कसा काम करतो, AC वेव्ह कशी असते हे समजून घेऊन हवे तेव्हा स्वतःला सर्किट काढता आले पाहिजे अशा प्रकारे बेसिक पक्के करून पुढे मग त्याला लागणाऱ्या फिल्टर्स चे कार्य आणि प्रकार असेच समजावून घेऊन पुढे जायचे.

अनु म्हणतेय ते डिजीटल इलेक्ट्रॉनिक्स आर पी जैन. किंवा माल्विनो-लीच पण चालेल.
बेसिक साठी फ्लॉइड. (डेविड बेल अजिबातच नाही. माझा त्या पुस्तकावर राग नाही, पण ते समजायला अवघड आहे सुरूवातीला.)

आणि युट्यूबवर animation for basic electronics components working अशा टाईपचं काही सर्च केलं की चांगले व्हिडीओ मिळतील. अगदी साईन वेव्ह सायनुसायडलच कशी हेपण सोप्या भाषेत आहे. (हे वाक्य जरा गंडलंय पण समजून घ्या)

कोर्सेरा किंवा तत्सम साइटस वरून इंट्रो टू इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स १०१ असे कोर्सेस शोधून ते व्हिडीओज पाहता येतील .

धन्यवाद अभिनव,मी-अनु,मानव,प्रज्ञा९ आणि मेधा.

आधीच पुस्तकांचा ढिग भरपूर झालाय. पुस्तकातून थेअरी समजते.पण सर्कीट समजून घेणे हा उद्देश आहे. त्यामुळे युट्यूब आणि स्वत: सर्कीट जोडून चुकत चुकत शिकणे हे करतो आहे.

Radio Electric Institute नावाची एक इन्स्टिट्युट डोंबिवलीत फार पूर्वी होती. आता आहे की नाही माहिती नाही. त्यांच्याकडे हे असे प्रॅक्टिकल कोर्सेस शिकवायचे. अशी एखादी संस्था मिळते का ते बघा.

केअशु इथे बघा :
https://www.coursera.org/learn/electronics
लिनिअर सर्कीट वगैरेचे पण भरपुर कोर्सेस आहेत. तुम्हाला आवड आहे त्यामुळ नक्की शिकून होईल तुमच्याकडून.
BTW, इलेक्ट्रॉनिक्स माझा अत्यंत नावडता विषय. मी इलेक्ट्रॉइक्स इंजिनिअरिंग केवळ मला मेडिकल ला अ‍ॅडमिशन हव्या त्या गव्हर्मेंट कॉलेजला मिळाली नाही म्हणुन घेतल. सर्किट , सोल्दर गन, एसी डिसी वेव्ह, एलेक्ट्रिकल मशिन वगैरे आठवल तरी मला अस्वस्थ होत. नंतर मायक्रोप्रोसेसर वगैरे विषय आल्यावर T.E/B.E. वर्ष जरा बरी गेली.

इलेक्ट्रॉनिक सर्किट्सचं वर्किंग शिकायला कोर्सेस आणि पुस्तकांचा नक्कीच उपयोग होईल.
तुम्ही जे म्हटलंय की एकाऐवजी दोन capacitors का लावलेत, किंवा हाच कॉम्पोनंट का, यासाठी एक सुचवते. एखाद्या सर्किट डिझायनिंग सॉफ्टवेअरचं फ्री/ ट्रायल व्हर्जन डाऊनलोड करायचं. त्यात आधीपासूनच तयार केलेली सर्किट्स असतील. त्यात आपले आपण थोडे थोडे बदल करून बघायचे आणि परफॉर्मन्समधे, एकेका नोडच्या/ ब्रँचच्या व्होल्टेज/करंटमध्ये काय फरक पडत जातो ते बघायचं.

असलेली सर्किट्स परत जोडणी करून बघायची. एखादे गॅजेट उघडून त्यातील सर्किट काढून बघायचे त्याचे चित्र काढून ते परत जोडून बघायचे. असे करा. पुस्तके किती वाचणार व नेट किती बघणार. गे ट युअर हँड्स डर्टी विथ रिअल प्रॉडक्ट्स.

पुस्तकांची माहिती वर आलेलीच आहे.
PCB, सोल्डरींग याऐवजी breadboard वापरला तर? वेळ आणि कॉम्पोनन्ट कमी लागतील (पुन्हा वापरता येतील). एखादे सर्किट जमले की मग त्याचे फिक्स व्हर्शन PCB वर करता येईल.
यात तुम्हाला डिझाईनचे प्रयोगही करता येतील. आधी मूळ सर्किट तसेच बनवून अभ्यासायचे. मग एकावेळी एक कॉम्पोनन्ट व्हॅल्यू बदलून / एखादा कॉम्पोनन्ट काढून साध्या वायरने ती जागा भरायची -- याने कुठे कुठे काय फरक पडतो पहायचे. मग ती कॉम्पोनन्ट व्हॅल्यू तशीच का / त्याचा सर्किटमध्ये उपयोग काय हे कळेल.

१००% पूर्ण नव्याने सर्किट डिझाईन मीही केलेले नाही कधी आणि जी अभ्यासक्रमात होती ती शिकवणारे सगळेच उत्तम असल्याने समजले नाही हा अडसर नव्हता सुदैवाने.

बाकी कॉम्पोनन्ट कुठेही असला तरीही मूळ तत्वानुसारच वागणार. ढोबळमानाने लक्षात घ्यायचे तर,
डायोड / ट्रान्सिस्टर -- PN जंक्शन तत्वावर चालणार.

झीनर डायोड -- रिव्हर्स बायस्ड मोडमध्ये वापरून ref voltage / over-voltage protection देणे यासाठी.

रेसिस्टर -- V= IR सूत्राप्रमाणेच लागणार / वागणारही.
एखाद्या ठिकाणी V वाढवताना I किंवा R वाढवता येईल. पण I वाढवताना I^2R सूत्राने सूचित होणारी उष्णता सर्किटमधील ट्रान्सिस्टरला झेपली पाहिजे. मग I ताब्यात ठेवून R बदलावा लागेल. I जास्त लागणारच असेल तर ट्रान्सिस्टरचा प्रकार बदलावा किंवा हीट सिंक वापरावे लागेल. ट्रान्सिस्टर त्याच्या V-I कर्व्हच्या कुठल्या टप्प्यात वापरतोय यावर त्याचा सर्किटमधील परिणाम दिसेल. त्याचे कनेक्शन कसे केलेय त्यावर तो स्विच (ON-OFF mode) / अ‍ॅम्प्लिफायर ( Vout >> Vin) म्हणून वागेल.

MOSFET -- सर्किटचे डिझाईन फार न बदलता केवळ गेट व्होल्टेज बदलून साध्या ट्रान्सिस्टरपेक्षा जास्त क्षमतेने / उपयुक्ततेने वापरता येतो.

कॅपॅसिटर -- जिथे चार्ज होल्ड करणे गरजेचे आहे / पोलॅरिटीप्रमाणे I ची दिशा नियंत्रित करायची आहे तिथे येतो.
AC/DC सर्किटप्रमाणे त्याचा प्रतिसाद बदलणार. रेसिस्टर - कॅपॅसिटर जोडगोळी RC time constant for charging / discharging काय हवा यावरून ठरेल.

इंडक्टर -- हा मुख्यत्वे AC सर्किट मध्ये दिसेल. जिथे AC रोखून फक्त DC पुढे जाऊ द्यायचा असेल. इंडक्टर-कॅपॅसिटर जोडगोळी AC सर्किट मध्ये जिथे दोघे AC च्या कमी-जास्त frequency प्रमाणे रेसिस्टरचा परिणाम (परस्परविरूद्ध भूमिकेत) देतील. म्हणून फिल्टरसारखे वागतील. इथे LC time constant लक्षात घ्यावा लागेल.

करंट / व्होल्टेज --- हे कुठल्याही टप्प्यावर Kirchoff's law प्रमाणे विभागले जाणार / एकत्र येणार.

सर्किट्स बनवून अभ्यासायच्या आधी या सगळ्यांची वैशिष्ट्ये आणि वागण्याची पद्धत अभ्यासून घ्या वाटल्यास.
कॉम्पोनन्ट निवडताना त्याच्या डेटाशीट्स बघून आपली V I P ची गरज / रेंज काय यावरून निवडावा लागेल.
सर्किट सुटसुटीत राहील, कॉम्पोनन्ट पूर्ण क्षमतेने काम करेल पण त्याच्यावर अतिरिक्त ताण येऊन निकामी होणार नाही आणि हवा असलेला अंतिम परिणाम मिळेल याचा सुवर्णमध्य साधणारे डिझाईन हवे.

वाटल्यास एखादे सर्किट इथे टाका. कोणीतरी एक्स्प्लेन केले तर ते कसे अभ्यासतात हे कळेल.
अभ्यासाला शुभेच्छा.

@रायगड मी दक्षिण महाराष्ट्रात राहतो. मनोहर जोशींच्या कोहिनूर संस्थेचे काही तांत्रिक कोर्सेस आहेत. त्यांच्याकडील काही कोर्सेसना कै. प्रमोद महाजन शिष्यवृत्ती मिळते.ज्या कोर्सना ही शिष्यवृत्ती मिळते तेवढेच कोर्स तिथे मनापासून शिकवतात आणि त्याच कोर्सेससाठी लागणारं अध्याोन साहित्य तिथे पुरेसं आहे.दुर्दैवाने इलेक्ट्रॉनिक्स विषयाला ही शिष्यवृत्ती नाही.अतिशय दळभद्री अवस्था आहे कोहीनुरमधे इलेक्ट्रॉनिक्स कोर्सची.ही शिष्यवृत्ती इलेक्ट्रीकल कोर्सला आहे.तो नीट शिकवतात.याची परीक्षा शासन घेतं.

@जिद्दु: शुभेच्छा !!

@सीमा: पाहतो कोर्स

@वावे : ही युक्ती भारी आहे.आभार! वापरतोच. _/\_

@अमा : घटक काढून परत त्या जागी बसवणे यात कॉम्पोनन्टचे वर्किंग कसे समजणार?

@कारवी विस्तृत प्रतिसादाबद्दल आभार! ब्रेडबोर्ड आहे माझ्याकडे.पण फारसा वापरला नाहीये. आता वापरेन. चांगली माहिती दिलीत.

>>> शिक्षण इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी.पण हे बहुतांश भारतीयांचं जसं होतं तसं झालेलं.कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून घेतला प्रवेश नि टाकलं उरकून. >>
आणि
>>> फोनच्या चार्जरमधे काही वेळा दोन कपॅसिटर्स शेजारी शेजारी का बसवलेले असतात? दोन इलेक्ट्रोलिटीक कपॅसिटर वापरण्याऐवजी एकच जास्त कपॅसिटीचा कपॅसिटर का वापरत नाहीत? >>

थोडक्यात तुम्हाला थिअरी माहिती आहे. पण प्रत्यक्ष इलेक्ट्रॉनिक/ इलेक्ट्रिक उपकरणात काय रचना असते हे जाणून घ्यायचे आहे.

उपकरणांंचा मुख्य भाग हा त्या उपकरणासाठी लागणारा योग्य वोल्टेज प्रवाह देणे. कारण मेन इलेक्ट्रिक सप्लाई भारतात २२० वोल्ट ५० साइकल एसी असतो. तर त्यातून वेगवेगळे वोल्टेज,एसी किंवा डीसी निर्माण ( बदल ) करून घेणे.

पंख्यासाठी - रिझिस्टन्स( जुनी पद्धत) आणि कन्डेन्सर
ट्युबलाईट - चोक (इंपिडन्स) जुनी पद्धत/ इलेक्ट्रॉनिक चोक उर्फ smps.
टीवी, डिटीएच - SMPS सर्किट

यांचे रिपेरिंगचे विडिओज पाहा युट्युबवर. किंवा how does smps work. यात दोनचार फारच छान आहेत. ( Harshad patel, Sevak, engineer, आणि बंगाली रिपेरवाले.) हातचे राखून न ठेवता सर्व दाखवतात.
Niket Shah plus channel विशेष. कल्याणला इन्स्टिट्यूट आहे.
प्रतिसादांत #मानव आणि #कारवी आवडले.

>>सर्कीट डिझायनर्स नक्की कसा विचार करतात? >>
आहे ते उपकरण आणि सर्किट जाणून घेतले की समजत जाईल. इलेक्ट्रॉनिक्स शिकायचे असले तरीही मेन सप्लाइचेही ज्ञान करून घ्यावे लागेलच. त्यासाठी पंखा/इस्त्री/ट्युबलाईट रिपेअर पाहून घेणे आवश्यक आहे.
कॉन्टीन्युइटी लँप, टेस्ट लँप आणि टेस्टर लागतात.

साधा ५० रुपयांचा कॉन्टीन्युइटी टेस्टर आणि १३० रुपयांचा डिजिटल मल्टिमीटर पुरेसे आहेत कामासाठी.

( मीही या क्षेत्रात नाही पण खटपट करतो.)
गुड लक.

धन्स srd
कृपया हरकत नसेल तर आपली एखादी यशस्वी ठरलेली इलेक्ट्रॉनिक खटपट सविस्तर लिहाल का?

एखादा USB स्वरुपाचा मोबाईल फोन चार्जर डिझाईन करायचा असेल तर सर्कीट डिझाईनर्स कसा विचार करतात कोणी सांगू शकेल का?

१)डिटिएच एसटीबी बंद पडल्यावर युट्युब विडिओ पाहून दुरुस्त केलं. २)टिवीला external speaker socket लावलं। हे खरं तर फार सोपं आहे पण रिपेरवाले करून देत नाहीत. ३)चार्जरची लांब वायर करणे - २+१ मिटर. तीन मिटरला शेवटी १०००mA करंट मिळतो. इंटरनेट डेटासाठी वायर असते ती दोन मिटर वापरा आणि त्यास युएसबी सॅाकेट प्लग जोडा. ही डेटा अधिक पॅावर केबलही होते. रेल्वे प्रवासात आणि हॅाटेल रुमवर उपयोगी.
४)इस्त्रीचं इलिमेंट बदलणे.

एखादा USB स्वरुपाचा मोबाईल फोन चार्जर डिझाईन करायचा असेल तर
यात smps circuit च असते 5.3 volt output with 1/2 /3 amps म्हणजे ५/१०/१५ watt. ,किंवा proprietory design. ( त्यांनी R&D केलेले असते. फोन आणि ब्याट्री सेफ राहावी. प्रयोग रिस्की होउ शकतात आपले.)

how to choose component in electronic circuits
असा गुगल सर्च देऊन पाहिला का? मी वरवरच पाहिले. पण ब्लॉग आहे, डेटाशीट मधून सिलेक्शनची माहिती आहे, V / I / P आवश्यकतेप्रमाणे करायची गणिते आहेत. बघा तुम्हाला नेमके काय अपेक्षित आहे यातील.

Srd नी केलेले बहुतेक अनुभवी प्रयोग आहेत. उपकरण उघडल्यावर आत काय कुठे ते नीट माहिती असणे आणि उद्योग करताना काय करायचे / करायचे नाही याचे प्राथमिक ज्ञान असणे -- या बेसिसवर नवीन जोडण्या. तुम्ही करताना सुरक्षितता लक्षात घ्यालच.

USB स्वरुपाचा मोबाईल फोन चार्जर डिझाईन >>>>
इथे एक सापडले. सद्ध्या ते बघून घ्या. का कसे कायकाय घेतलेय्/जोडलेय. मग फरक करता येईल. तोपर्यंत डिझाईन जाणकारही कुणी लिहीतील.
https://www.electroschematics.com/usb-mobile-charger/

ज्या गैष्टी गरजेच्या आहेत, त्या आपल्याला करता आल्या तर वेळ आणि पैसे वाचणे हे बघा. सोय वाढणेही गरजेचं परंतू तसे काही बाजारात मिळत नसेल तर तेही करा. पण जी उपकरणे बाजारात सहज स्वस्त उपलब्ध आहेत त्यात तोडमोडसुधारणा व्यर्थ आहे.
चार्जरचे सर्किट चांगल्या कंपन्यांचे टिकाऊ आणि सेफ असते. कांपोनंट्स चांगले वापरतात. त्यात आणखी सुधारणा काय करणार? बेसीक/मुळात इलेक्ट्रॉनिक्स एकच असते. शिवाय तुमचा महागडा फोन त्यास जोडायचा असतो. त्यामुळे सावधान.

धन्यवाद कारवी.लिंक पाहतो आहे.

srd नवीन चार्जर बनवायचा नाहीये.फक्त तो डिझाइन करणारे तो कसा कसा विचार करुन बनवतात तो विचार हवाय.कसं ठरवतात कोणते कॉम्पोनन्ट वापरायचे? हेच का वापरायचे? याच मुल्याचा का वापरायचा घटक? हे हवंय!

कसं ठरवतात कोणते कॉम्पोनन्ट वापरायचे?

What is smps - search करा. कारण बेसिक सर्किट सर्किट तेच आहे. आता या विडिओजमध्ये पाचसहा खास आहेत.
Ac २२० - diodes -४५० volts capacitor -transformer - resister - primary - MOSFET - secondary - diodes - feedback- autocoupler photodiode - का लागतात दिलं आहे. मग आणखी काही कांपोनंट्स( फ्यूज, झीनर डाइओड, सेफ्टी रिझिस्टर) का ठेवतात सर्व सापडेल. मग त्याची value.

कपेसिटर,कॉईल आणि रिझिस्टर हे कॉम्पोनंटस नक्की काय करतात आणि त्यांच्या जोडण्या काय बदल करतात हे सुद्धा जाणणे जरुरी आहे. डायोडस आणि जोडडायोडस उर्फ ट्रान्झिस्टर्सचे प्रकारही जाणून घ्या. सर्व विडिओज आहेत युट्युबवर.

SMPS Switch Mode Power Supply समजलं तर सर्वच समजेल.

एकूण प्रकार फारच मजेदार आहे.

कसं ठरवतात कोणते कॉम्पोनन्ट वापरायचे? हेच का वापरायचे? याच मुल्याचा का वापरायचा घटक? हे हवंय!
Submitted by केअशु >>>>
हे तुम्ही पहिल्या दिवसापासून विचारताय आणि लोक बेसिक्स रिवाईज करायला सांगतायत तुम्हाला.

साधा कॅपॅसिटर vs electrolytic capacitor -- काय फरक, काय सिम्बॉल, काय वापर
साधा रेसिस्टर vs variable / Film Resistor इत्यादि --- काय फरक, काय सिम्बॉल, काय वापर
साधा ट्रान्सिस्टर vs पुढचे खास --- काय फरक, काय सिम्बॉल, काय वापर

ही उजळणी झाली की जेव्हा ते सर्कीट्मध्ये दिसतील तेव्हा वापरायची कारणे डोळ्यासमोर येतील. त्यांचा आकृतीबंध दिसेल. डायोड नुसते आहेत की rectifier bridge म्हणून जोडलेत; रेसिस्टर नुसता आहे की voltage divider मध्ये आहे, ट्रान्सफॉर्मर स्टेप-अप आहे की स्टेप डाऊन इत्यादि.

एकेक नाव टाकून use असा सर्च दिला तरी सगळी कहाणी देते नेट. पाहिलेत का तुम्ही?

USB स्वरुपाचा मोबाईल फोन चार्जरची वर दिलेली लिंक.
आकृती + थोडे स्पष्टीकरण आहे दिलेले.
आता तुम्ही स्वतःला विचारा, डावीकडचा पहिला कॅपॅसिटर -- कुठला टाईप; का का असू शकेल
ट्रान्सिस्टर --- कुठल्या कामासाठी आहे? स्विच / अ‍ॅम्प्लिफायर? C B E पैकी कुठली टोके कुठे जोडलीत त्याची. काय configuration मध्ये जोडलाय? त्याची gain equations काय आहेत?
झीनर का असेल?
अशी केलेल्या उजळणीशी सांगड घालत जा.

वरच्या लिंकच्या सर्कीटचा तुमचा प्राथमिक अंदाज मांडा म्हणजे पुढे सांगेल कोणीतरी. की काय चुकतेय, अजून काय विचारात घ्यावे. स्वयंप्रयत्न स्वयंशिक्षण तुम्ही म्हणताय ते हेच. लोक भर घालतीलच मग.

कारवी , srd सुंदर प्रतिसाद

सुरवातिला SMPS Switch Mode Power Supply बनवण्यापेक्षा linear power supply बनवणे.

त्यासाठी एक २४० ते 9 वोल्ट / 250mA चा transformer (12V चा पण चालेल ) घेउन कारवी यानी सागितलेले सर्किट जोडणे. मोबाईल चार्ज करायचा असेल तर सिरिज मध्ये प्रोटेक्शन साठी 100mA चा फ्युझ किंवा रिसेटबल फ्युझ लावणे

हे सगळे पार्ट्स लॅमिगटन रोड वर मिळतिल. अ‍ॅमेझोन वर पण आहेत पण महाग आहेत.

Pages