आय हेट अमुकतमुक खाद्यपदार्थ !

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 December, 2020 - 18:59

ईथे आपल्या नावडत्या खाद्यपदार्थांची लिस्ट बिलकुल लिहायची नाहीये. त्यासाठी तुम्ही आय हेट टिंब टिंब खाद्यपदार्थ म्हणून एक वेगळा धागा काढू शकता.

या धाग्यात मी माझ्या परीने लोकांना अमुकतमुक खाद्यपदार्थांचा तिटकारा का वाटतो हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही आपली मते मांडू शकता.

म्हणजे बघा एखादा पदार्थ नावडता असणे वेगळे. पण त्याचा तिटकारा असणे वेगळे. नावडते पदार्थ कैक असतात. पण तिटकारा असा एखाद्या पदार्थाचाच वाटतो. काय कारणे असावीत...

सर्वात महत्वाचे कारण म्हणजे आपले कडक संस्कार - खरे तर कडक शिस्त म्हणायला हवे. पण अन्नपदार्थांना आपल्या संस्कृतीत भावनिक स्थान असल्याने त्यासंबंधित शिस्त ही थेट संस्कारगटात मोडली जाते.
म्हणजे ताटातले सारे अन्नपदार्थ संपवावे, पानात काही टाकू नये, अन्न वाया घालवू नये... अगदी योग्य संस्कार.
पण पानात जे पडेल ते मुकाट्याने खावे हि त्याला अ‍ॅडीशनल जोड कश्याला?

आठदहा वर्षांचा एखादा कोवळा जीव. त्याच्या ताटात बुळबुळीत भेंड्याची भाजी टाकायची आणि किमान चमचाभर तरी खा अशी अपेक्षा करायची. सगळे खातात ना, मग तुला खायला काय झाले? तो बघ दादा खातो ना, मग तू सुद्धा खायला हवेच.,

अर्थात काही घरात अश्या नावडीच्या एक दोन भाज्यांना सूट मिळते. पण भेंडी, गवार, वांगी, तोंडली, शेपू, पडवळ, फ्लॉवर ईत्यादी अतरंगी पण पौष्टिक समजले जाणार्‍या भाज्यांपैकी तुम्हाला काही म्हणजे काहीच आवडत नसेल आणि तुम्ही कांदे-बटाटे, कडधान्ये आणि काही मोजक्या पालेभाज्यांवर जगत असाल तर मात्र तुमचे खाता पिता जिणे हराम होऊन जाते. तेच फळांबाबतही तुम्हाला केळे, चिक्कू, संत्री मोसंबी वगैरे आवडत नसेल आणि आंब्या फणसावरच तुटून पडत असाल तर तेच जिणे आणखी अवघड होऊन जाते.

आता फळे खात नाही म्हणून फक्त टोमणेच ऐकावे लागतात, पण भाज्या खात नाही म्हटले की त्या मारूनमुटकून भरवल्याच जातात.

जगात कित्येक ठिकाणी फारशी शेती होऊ शकत नाही तिथे लोकं प्रामुख्याने मांसाहारच करतात, तर याऊलट कित्येक लोकं धार्मिक वा भावनिक कारणांतर्गत मांसाहारच करत नाहीत. म्हणजे अशी लोकं खाद्यपदार्थांच्या एका मोठ्या गटाला थेट फुल्लीच मारतात. पण तरीही धडधाकट आयुष्य मजेत जगतात. कारण निसर्ग आपले काम करतोच. तो मनुष्याची वाढ करतोच.

पण आता कसे होणार आपल्या पोराच्या तब्येतीचे यापेक्षा जास्त टेंशन आपल्याकडे हे असते की आता लोकं काय बोलतील, किती ते चवीचे नखरे, ताटात पडेल ते पोटात गेलेच पाहिजे हे शिकवता आले नाही का याच्या आईबापांना? किती लाडाऊन ठेवलेय पोराला....

आता आपल्या पोराला लाडाऊन ठेवायचे कि शिस्तीच्या गोडाऊनमध्ये ठेवायचे, हा जोपर्यंत ईतरांना त्रास होत नाही तोपर्यंत त्या पोराचा आणि आईबापांचा वैयक्तिक प्रश्न आहे.
पण हे सामाजिक दडपण आपले काम कसे करते बघा,

मुलगा आईबाबांसोबत नातेवाईकांकडे पंगतीला बसला आहे. वाढायला घरच्याच काकू आहेत. भेंडीच्या भाजीचे टोप घेऊन येतात आणि टोप आडवा करून चमच्यानेच ढकलायला सुरुवात करतात. मुलाला मात्र भेंडीची भाजी शून्य आवडीची. तो कसेबसे आईवडिलांना ऐकू जाणार नाही या आवाजात पुटपुटतो, थोडीच द्या काकू. . एखाद्या चांगल्या मनाच्या काकू थोडीच देतातही, पण ती सुद्धा नावडती असल्याने डोंगराएवढी भासते. मुलगा बाबांकडे बघतो. बाबा तिथूनच नजरेने दम भरतात, पुर्ण खायची हं. मुलगा आईकडे बघतो. तिचे काळीज थोडे विरघळते. अर्धा डोंगर ती आपल्या ताटात घेते. कारण पुर्ण घ्यायला बाबांची परवानगी नसते. पण मुलाला तेवढाच दिलासा मिळतो.

त्याच खुशीत मग तो चला संपवून टाकूया एकदाचा ताटातला नावडता पदार्थ, पुन्हा उगाच पुर्ण जेवणभर तो शेवटी खायचा आहे याचे टेंशन नको असा विचार करतो आणि एकाच घासात गटक मटक स्वाहा ! आणि ईथेच चुकतो. चुकीचा सिग्नल जातो. पुढच्यावेळी मामी येतात आणि ताटातली रिक्त जागा भरतात.
आता जो पामर पहिल्यांदा नकार देऊ शकला नाही तो दुसर्‍यांदा तरी काय देणार. चरफडतो आणि पुन्हा खातो. परीणामी एक नावडता पदार्थ मनाविरुद्ध खावा लागला म्हणून त्याचा तिटकाराही करू लागतो.

-----------------------

मुलांना आपण टिळकांच्या बाणेदारपणाच्या कथा सांगतो ज्यात ते शिक्षकांनाही बिनधास्तपणे सुनावतात. पण त्याच बाणेदारपणे त्यांना आपल्याच नातेवाईकांना "मला भेंडीची भाजी आवडत नाही, मी ती ताटात घेणार नाही!" हे सांगायला शिकवू शकत नाही का? कि टिळक जन्मावेत, पण ते शेजारच्याच घरात??

माझ्या सुदैवाने मी हा बाणेदारपणा वेळोवेळी दाखवला. ताटात नावडता पदार्थ घ्यायला थेट नकार दिला. त्यामुळे कधीच ते खावे लागले नाहीत. पण दुर्दैवाने आईला सल्लेरुपी टोमणे मात्र खावे लागले. जसे की,
"आमच्याकडे पाठवा याला महिनाभर, बघा सगळे कसे खायला लागतो..:
"पोरांना किनई नावडीच्या भाज्या पराठा बनवून त्यातून गपचूप खाऊ घालायच्या, काहीs कळत नाही त्यांना.."
"त्याला ती प्रोटीन विटामिनची पावडर चालू करा.. जरा महाग असते.. पण पोरगा काही खात नाही म्हटल्यावर काय करणार.."
"त्याला एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवा... "

ईथे मग स्फोट घडायचा!
एखादी भेंडीची, वांग्याची, गवारीची भाजी मी खात नाही म्हणून ईतके बोलून दाखवायचे. आता नाहीच खाणार मी कधी त्या म्हणून नावडीचे रुपांतर तिरस्कारात व्हायला वेळ लागायचा नाही.

-----------------------

आणखी एक कारण म्हणजे नावडत्या पदार्थांचा अतिआग्रह!
"नाही काकू मला वांग्याची भाजी खरेच आवडत नाही"

"अरे आमच्या पद्धतीची खाऊन तर बघ, पुन्हा मागशील..."
मी मनात - अहो पण मला मुळात वांगेच आवडत नाही तर तुमच्या हाताची आणि मसाल्यांची चव घ्यायला मी ते का पोटात ढकलू?

"तू खाऊन तर बघ, खाल्याशिवाय कशी चव कळणार"
मी मनात - अहो कधीतरी आयुष्यात वांगे खाल्ले आहे, चव समजली आहे, तो पदार्थ बघताच ती चव तोंडावर येते आणि नकोशी वाटते म्हणूनच तर नाही बोलत आहे ना..

"बघ छान काजू बदाम टाकलेत त्यात..'
मी मनात - सत्यानाश! अहो कश्याला वाया घालवले? Sad कबूतरांनाच टाकले असते..

-----------------------

पॉप्युलर खाद्यपदार्थ आपल्या आवडीचे नसणे हे कधी ना कधी आपल्याला कट्टरतेकडे झुकवतेच.
जसे की लहानपणी माझ्या आंबा फार आवडीचा.. कोणाचा नसतो.. त्यात मी कोकणी
पण वयात आलो तसे ती आवड कमी होऊ लागली. नावडता बिल्कुल झाला नव्हता पण कोणी आंबा ऑफर केला की मी हो बोलायच्या आधी विचार करू लागलो. समोरच्याला मात्र तितकेच पुरेसे ठरायचे. अगदी धक्का बसल्यासारख्या आविर्भावात मी याला आंबा विचारतोय आणि हा विचार करतोय. कोकणच्या किनारपट्टीला कलंक आहेस तू मेल्या.. बस्स, अशी प्रतिक्रिया आली की माझी विचारप्रक्रिया तिथेच यांबायची आणि मी निकाल द्यायचो. आई मीन सरळ नकार द्यायचो.
आता तर कोणी मला आंबा खातो का विचारले तर विचारही न करता माझ्या तोंडून अगदी चिडून बाहेर पडते, "नाही आवडत मला आंबा, ऐकलेस तू! बिलकुल नाही आवडत मला आंबा. आई हेट आंबा !!!

-----------------------

असाच एक पॉप्युलर पदार्थांचा त्रास म्हणजे ते सर्वांनाच आवडतात वा किमान खातात तरी हे गृहीतच धरले जाते.

उदाहरणार्थ पावभाजी.
एखाद्या घरगुती बर्थडे पार्टीत आपण जातो. जिथे मेनू म्हणून फक्त आणि फक्त पावभाजीच ठेवलेली असते. आणि मग आपली ती आवडती नसल्यास आपल्यालाच गिल्ट फील येईल अशी स्थिती आपसूक निर्माण होते. आपल्या एका नावडीमुळे आपण यजमानांना शरमिंदे केले असते. बाकीची जनता मग मुक्ताफळे उधळू लागते. खाऊन तर बघ थोडीशी, सुका पाव तरी खा, दुसरे काय मागवूया का, याला वेफर जरा जास्त दे रे, पावभाजी पण खाल्ली नाही याने, उपाशी असेल, वगैरे वगैरे.....
चूक ना आपली असते, ना यजमानांची असते, ना ईतर मित्रांची असते, कदाचित परीस्थितीचीही नसते.
पण मग राग कोणावर काढायचा... तर पावभाजीवर ! येस्स, आई हेट पावभाजी !!!!

-----------------------

काही मिश्कील म्हणवीत अशी miscellaneous कारणे सुद्धा असतात.

जसे की पाणीपुरी ...
पाणीपुरी हा माझ्या एका मित्राचा या एकाच कारणासाठी नावडता पदार्थ होता की त्याच्यामते तो मुलींच्या जास्त आवडीचा पदार्थ असतो.
असेलही.
पण तो खाल्याने त्याच्या पौरुषत्वाला काय धक्का पोहोचणार होता याची कल्पना नव्हती. यावरून आमच्या चिडवण्याने मात्र तो पाणीपुरीचा आणखी द्वेष करू लागला. (मुलींवर मात्र तो आजही प्रेमच करतो)

दुसरी ती एक दारू...
मी दोनचार वेळा ट्राय केली, मला कधीच आवडली नाही. कॉलेजातल्या मित्रांना कशी आवडायची हे कोडे कधीच उलगडले नाही. जेव्हा कुठल्याही पार्टीला ते दारूवर तुटून पडलेले असायचे, चेकाळलेले असायचे, तेव्हा ईतरवेळी सर्वात जास्त बडबड करणारा मी शांतपणे एक कोपरा पकडून पेसीच्या बाटलीत बुडबुडे काढत बसलेलो असायचो. बस्स! तिटकारा वाटू लागला त्या दारूचा तो आजतागायत तसाच आहे.

असो, एकूण मला सुचली ती कारणे लिहायला घेतली आणि जोशमध्ये जरा जास्तच लिहून लेख तयार झाला.
काही तुम्हाला पटतील, तर बरीच पटणारही नाहीत.

तरी चूक भूल देऊ घेऊ नये, कर्रेक्ट करावी.. येणारी पिढी आपली आभारी राहील.

धन्यवाद, Happy
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी श्रीखंड मेमरी वाईट आहे.>>>माझी पण मी_अनु. माझी आई खूप छान बनवते तिने बनवलेले खात होते.

एकदा एका नातेवाईंकाकडे हिरवा रंग घातलेला खाल्ला आणि मूड गेला.

लेखही छान आणि प्रतिक्रया सुद्धा ..

@ MeghaSK .. अगदी खरंय हे आमचं आणि आपलं या बाबतीत ...

माझा सासर तर कर्नाटक बॉर्डर .. सासूबाई पक्क्या कर्नाटकी .. त्यामुळे कोणताही सण असो पुरणपोळी ठरलेली तीही तेलात बुडावं बुडावं बुडवलेली . लग्नाच्या आधी कशीबशी एक पिठाची पोळी खाणारी मी , ती तेलपोळी घशाच्या खाली उतरायची नाही . शेवटी सांगूनच टाकले कि माझ्या पुरती एक पिठाची करेन . नंतर नंतर सासूबाई सोडून सर्वांनाच पिठाची पुरणपोळी आवडायला लागली आणि त्यानंतर त्यांनाही वयोमानाप्राने एवढे तेलकट खाणे बरे नाही हे समजावून सांगून तेलपोळीला घरातून हद्दपार केले .

सुरवातीला टेस्ट डेव्हलप व्हायला वेळ लागतो. त्यामुळे मुलांना आधी नाही आवडली तरी विविध भाज्या थोड्याशाच खायला देऊन पहाणे, हे मात्र बरोबर वाटते +१११
माझा हि हाच फंडा आहे फक्त मुलांच्याच नाहीच तर सर्वांच्या बाबतीत .. एखादी गोष्ट नसेल आवडत तर जबरदस्ती नको .. मलाही आणि दुसर्यांनाही

त्यामुळे अगदी छोट्या प्रमाणात का होईना, भाजी ची वेगवेगळ्या प्रकारे चव देत राहावी असे वाटते + 1
ही मेमरी पुसायला अतिशय कमी वारंवारितेने या भाजीचा वेगळा फॉर्म करुन चव घेऊन मनाचा आवाज परत एकदा ओळखावा इतकेच म्हणणे.
+1
>> मी स्वतःच्या बाबतीत मी हे करते. मुलीच्या बाबतीतही करावे असा विचार आहे. त्यासाठी पेशन्स वाढवावा लागेल.

आपल्याला एखादा पदार्थ आवडतं नाही, हे लाजिरवाणे नाही, हे आज काल मध्येच मला कळले आहे.
मला दूध, चहा, कॉफी यावरची साय आवडत नाही. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पंचाईत होते. इतकी वर्षे ही गोष्ट कोणाला सांगताना मला भयंकर लाज वाटायची. आता एवढी लाज बाळगणार नाही.

मला वांग्याची भाजी अजिबात आवडत नाही लहानपणापासून. भरीत आवडतं पण फोडी असलेली भाजी खाऊ शकत नाही. पण कायम खावी लागली. पानात वाढलेलं टाकायचं नाही म्हणून मी पाण्याबरोबर गिळायचो सगळ्यात शेवटी. तसं मला पडवळ पण आवडत नाही पण ते तडजोड म्हणून थोडं खाऊ शकतो कारण काहीतरी पोषण मिळतं . वांगं खाऊन कोणाचं काय भलं होतं देवास ठाऊक. ती भाजी चविष्ट लागत असेल हे मी मान्य करतो, कृष्णाकाठच्या वांग्यांना खास चव असते हे हि मान्य पण माझ्या नरडयाखाली जात नाही त्याला काय करु ? त्यामुळे आता एकटा राहत असताना वांगं आणत नाही त्यामुळे हा त्रास नाही.

मला पण वांग्याचे भरीत आवडते पण फोडी असलेली भाजी किंवा भरलं वांगं इ आवडत नाही. सिमला मिरची उग्र असते म्हणून आवडत नाही.

आणि जोशमध्ये जरा जास्तच लिहून लेख तयार झाला.>>>> चांगले झाले की Happy
श्रवु म्हणते तसं मुलं झाल्यापासून मी विसरून गेले आहे मला काय आवडायचे. पोषणासाठी खातो चवं उत्तम व्हावी याचे (बहुतेक वेळा )प्रयत्न असतात. नाही जमले तर चटणी/लोणचे/भुरके/ठेचे "तोंडिलावणे सेव्हज द डे " . कंटाळा आणि नावड समजू शकते. नैवद्या एवढं वाढते मुलांना, पहिले खाल्ले पाहिजे , नाही आवडले तर दुसरे नाही घ्यायचे. (अधुनमधून आफ्रिकेतील कुपोषित मुलं दिसतात टिव्हीवर , शेतकरी किती कष्ट करतात हेही जेवताना नाही पण इतर वेळी सांगितले आहे. ) मी टाकलं तर "फार्मर्स विल बी अनहैप्पी" म्हणतात व खातात. आग्रह धरत नाही. फारसा बाऊ करत नाही , जाणीव असावी व पोषणमूल्ये मिळावीत इतपतच प्रयत्न करते. आग्रह केला तर तिरस्कार वाटू शकतो , हे खरंय . (Reverse psychology)

मी तर लग्न झाल्यापासून विसरूनच गेले कि मला काय आवडते आणि काय नाही आवडत ते > हे वाचून आई कुठे काय करते मालिका आठवली

छान लेख. मला साय कोणत्याही प्रकारे तोंडात आली तर ‘वॉक्क वॉक्क‘ होते. आणि हे अगदी लहानपणापासुन आठवते आहे तेव्हापासुन होतं. त्यामुळे, बासुंदी रबडी बाद. पण ‘हेट’ नाही, नुसतंच आवडत नाही असे म्हणता येईल.

मी आधी भेंडीची भाजी आवडीने खायची.
पण मी अकरावीला असताना मला स्टोन प्रॉब्लेम झालेला, तेव्हा जवळच्या एका नातेवाईकाने माझ्या आईला फुकटचा सल्ला दिला की भेंडीचे पाणी द्या प्यायला.
म्हणजे भेंडी पाण्यात शिजवत ठेवायची आणि ते पाणी प्यायच.
आधीच गोळ्या चालू त्यात हा नको तो सल्ला..
पण मम्मीने शेवटी हा उपाय करून बघुया म्हणून जवळ जवळ ६-७ दिवस हे केलं.
ते गुळगुळीत पाणी पिऊन भेंडीच नावडती झाली :/
खायची इच्छाच होत नाही.

कुठल्याही पदार्थाचा हेट वगैरे असा कधीच वाटला नाही, ज्या गोष्टी नाही आवडत त्या खायच्या नाही, शक्यतो टाळते, पण अगदीच कुठे बाहेर दुसऱ्यांकडे जर ती भाजी असली, तर अगदी थोडी खायला माझी हरकत नसते उदा. वाल गवार या भाज्या मला कधीच आवडल्या नाहीत पण कधीतरी थोड्या प्रमाणात खाऊ शकते. माझं मलाच आश्चर्य वाटलं, लहानपणी जे पदार्थ अजिबात आवडत नव्हते , साबुदाण्याची खिचडी, कारल्याची भाजी, मेथी पालक, ते आता आवडते झालेत, आणि भगर आवडायची ती आता फारशी आवडत नाही, शाळेत असताना रोज आवडीने दूध प्यायले , आता अजिबात इच्छा होत नाही. वयानुसार आवडीनिवडी बदलू शकतात.

कविता आईग्ग्.. असं नको म्हणूस , माझी आवडती आहे भेंडी. आणि लिंबू पिळला भाजी झाल्यावर तर ती अजिबात गुळगुळीत होत नाही. जरा जास्त तेलात परतायची आणि दाण्याचा कूट घालायचा, छान होते.

कोणी आंबा ऑफर केला की मी हो बोलायच्या आधी विचार करू लागलो. समोरच्याला मात्र तितकेच पुरेसे ठरायचे. अगदी धक्का बसल्यासारख्या आविर्भावात मी याला आंबा विचारतोय आणि हा विचार करतोय. >>
मला पण मोठाच धक्का बसतो.

बाकी सर्व वस्तू आवडल्या नाही तरी चव घेऊ शकते.
पण ते वासाबी फ्लेवर चे वाटाणे आणि सॉस मात्र चव घेण्याइतका पण झेपला नाही.

मला नुसती नावड नाही तर चहाचा तिटकारा आहे. उकळणार्या चहाच्या वासाने चाहप्रेमींना आनंदाच्या उकळ्या फुटतात, तेव्हा मला मात्र मळमळतं. पावसाळ्यात आलं किंवा गवती चहा घातलेला चहा उकळायला लागला की लोक कामं सोडुन कॅन्टीनकडे धावायचे. पण मला मात्र माझी बिल्डिंग मेन कॅन्टीनपासुन दुर आहे म्हणुन हुश्श वाटायचं. वर अजय यांनी लिहिल्याप्रमाणे चहाच्या वासाचा माझ्या मेंदूतील olfactory cortexमध्ये काही तरी भलताच वास येत असणार Proud

लेख छान आणि मुद्दे पटले.

मऊ मुलायम मखमली काजू बदाम बेदाणे लावलेला तोंडात विरघळणारा बेसनाचा लाडू. पब्लिक बेसन भाजल्याच्या वासानंही खुळं होतं . तो मला आवडत नाही.

हजारो रु. घालवून आणलेला पिज्झा...घासागणीक चिळकांड्यांमधून चीज उफाळून बाहेर येतं तो.....आवडत नाही.

पब्लिक मरत मरत खातं त्या चायनीज नूडल्स आणि अजिनीमोटो फ्लेव्हर्ड फ्राईड राईस - आज्बात आवडत नाही.

एक्स्टाॅ चीजची चादर पांघरलेले पावभाजी, उत्तप्पे, डोसे, पोहे आणि इतर काहीही - आवडत नाही.

मऊ मुलायम मखमली काजू बदाम बेदाणे लावलेला तोंडात विरघळणारा बेसनाचा लाडू. पब्लिक बेसन भाजल्याच्या वासानंही खुळं होतं . तो मला आवडत नाही.

हजारो रु. घालवून आणलेला पिज्झा...घासागणीक चिळकांड्यांमधून चीज उफाळून बाहेर येतं तो.....आवडत नाही.

पब्लिक मरत मरत खातं त्या चायनीज नूडल्स आणि अजिनीमोटो फ्लेव्हर्ड फ्राईड राईस - आज्बात आवडत नाही.

एक्स्टाॅ चीजची चादर पांघरलेले पावभाजी, उत्तप्पे, डोसे, पोहे आणि इतर काहीही - आवडत नाही.

ते गुळगुळीत पाणी पिऊन भेंडीच नावडती झाली :/
>>>>
हो, तो खाद्यपदार्थ औषध म्हणून असा वारंवार आणि चुकीच्या पद्धतीने खावा लागला तर नावडता होणारच.
हे म्हणजे असे झाले. तुम्ही तुमचे आवडते गाणे सकाळी उठायचा अलार्म म्हणून ठेवले तर ते नावडते होणारच Happy

एक्स्टाॅ चीजची चादर पांघरलेले >>>>> एक्झॅक्टली. हे चीज पिझ्झाला शोभते. पण पावभाजी, डोसा, वडापाव अश्या पदार्थांतही चीजचा मारा असेल तर बिलकुल झेपत नाही. आणि केवळ चीज आवडते म्हणून ते कश्यातही घाऊन खाणार्‍या लोकांचाही मग राग येऊ लागतो. उदाहरणार्थ माझी बायको, कारण उगाच भरमसाठ एक्स्ट्रा पैसेही जातात Happy

ह.पा, पण हा चीज बर्स्ट पिझ्झा खूप आवडीनं खातात लोक. आमच्याकडेच इतर लोक मिटक्या मारत खात असतात तेव्हा डबल मिटक्या मारत मी वरणभात खाते.

चीज पिझ्झा मलाही फार आवडतो
किंबहुना चीज मला बिलकुल आवडत नाही. अपवाद पिझ्झा.
पण मला ते हॉटेलातले भाज्या टाकलेले ईंडियन पिझ्झे नाही आवडत.

आपल्याला आवडत नाही आपण खाऊ नये ठीक आहे, पण दुसऱ्यांनी खाल्ले तर राग का यावा? हे म्हणजे ते स्कॉच मध्ये पेप्सी घालून पिणारे लोक डोक्यात जातात म्हणण्या सारखे आहे. आपल्याला तसे खाण्यास, पिण्यास आग्रह करणारे डोक्यात जातात म्हटलं तर समजू शकतो.

Pages