मीना प्रभुंचं "ग्रीकांजली" पुस्तक!

Submitted by निमिष_सोनार on 23 December, 2020 - 08:19

मीना प्रभुंचं "ग्रीकांजली" हे प्रवासवर्णन पुस्तक आजच (६ डिसेंबर) वाचून संपलं. बरेच दिवस झाले वेळ मिळेल तसे वाचत होतो. त्यांच्या इतर पुस्तकांसारखंच हे पुस्तक सुद्धा छान आहे! साऊथ अमेरिकेतील बहुतेक देशांप्रमाणे ग्रीस मध्येही मीना प्रभु एकट्याने फिरल्या. तिथे त्यांना अनेक मित्र मैत्रिणी भेटल्या.

दोन वर्षांपूर्वी "इंद्रायणी सावकार" यांचं "असा होता सिकंदर" हे अलेक्झांडरच्या जीवनावरचं पुस्तक वाचलं होतं, तसेच पूर्वी सोनी टीव्हीवर "पोरस" सिरीयल बघितली होती त्यातही अलेक्झांडरच्या जीवनाबद्दल बऱ्यापैकी माहिती मिळाली, त्यामुळे ग्रीकांजली वाचायची उत्सुकता खूप होती आणि पुस्तक वाचायला शेवटी 2020 नोव्हेंबर डिसेंबरचा मुहूर्त लाभला.

लोकशाही, ऑलिम्पिक, मॅरेथॉन, लिपी, नाटक, शिल्पकला अशा कितीतरी गोष्टींची सुरुवात ग्रीकांनीच केली. आपले आणि ग्रीकांचे पुराणकथेतील देव यांच्यात खूप साम्य आहे. जग जिंकायला निघालेला सम्राट अलेक्झांडर, तसेच सॉक्रेटिस, प्लेटो आणि अरिस्टाँटल हे तत्वज्ञानी तसेच पायथागोरस हा भूमितीतज्ञ पण इथलाच! स्पार्टा आणि "ट्रोजन हॉर्स"ची कथा इथलीच! इसापनीतीचा जन्म इथलाच. स्पार्टाच्या अद्भुत स्पार्टन लोकांबद्दल वाचून खूपच आश्चर्य वाटले. इंग्रजीतील चाळीस टक्के अल्फाबेट आणि शब्द ग्रीक मधून आलेत. काही ग्रीक शब्द संस्कृतमधून आलेत. ग्रीसच्या थिब्जमधली स्त्रीचं तोंड, सिंहिणीचं अंग आणि पाठीवर पंख असलेली जगप्रसिद्ध स्फिंक्स पण इथलीच! पण स्फिंक्सचा मोठा पुतळा मात्र इजिप्तमध्ये आहे असं ऐकलं आहे.

(अजून "इजिप्तायन" हे मीना प्रभुंचे इजिप्तवरचे पुस्तक मी वाचलेले नाही. ग्रीस आणि इजिप्तमध्ये पण बऱ्याच सारख्या गोष्टी आहेत. जगप्रसिद्ध राणी क्लिओपात्रा बद्दल मला बरेचसे कुतूहल आहे आणि तिच्याबद्दल बरेचसे ऐकून आहे त्यामुळे वेळ मिळेल तसे इजिप्तायन आणि क्लिओपत्रा वरची "सुनील जावळे" यांची कादंबरी पण वाचायची आहे. त्यात ज्युलियस सीझरबद्दल पण माहिती आहे. इजिप्तमधले तूतानखामेन, मम्मीज हे सगळे गूढ असल्याने वाचायला मजा येईल!)

"अलेक्झांडरच्या पण आधीपासून आर्य लोक ग्रीसमध्ये गेले होते त्यामुळे त्यांच्या आपल्या पुराणकथांमध्ये खूप साम्य आहे", "ग्रीसमध्ये ऑलिव्ह खूप आढळतात, तसेच तिथले लोक वांग्याचे भरीत पण खातात" ही आणि अशा प्रकारची भरपूर माहिती यातून मिळते. ग्रीस देश हा अनेक छोट्या मोठ्या बेटांनी बनलेला असून त्याच्या डावीकडे इटली, उजवीकडे तुर्कस्तान, खाली इजिप्त आहे. ग्रीसचे पारंपरिक हाडवैरी देश म्हणजे तुर्कस्तान आणि पर्शिया (आताचा इराण)!

एकूणच प्रवासाची, भूगोलाची आणि इतिहासाची आवड असणाऱ्यांनी ग्रीकांजली वाचायलाच हवे.

- निमिष सोनार, पुणे
(6-Dec-2020)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या विषयांवर म्हणजे ग्रीस,इजिप्त history tv channel चे किंवा इतरांचे( dwtv, bbc) बरेच विडिओज आहेत.
>>ग्रीसमध्ये ऑलिव्ह खूप आढळतात>> ग्रीसमधले ओलीव त्यांनाच पुरत नाहीत किंवा परवडत नाहीत म्हणतात. ते येतात आफ्रिकेतून. हेसुद्धा एका dwtv episode मध्ये पाहिलं.
तत्त्वज्ञानात ग्रीक पुढे होते, गणित ,खगोलशास्त्र वगैरे. यातला बराच भाग असिरिअन ( आताचा इराक,सिरियाचा भाग) लोकांचा ग्रिकांनी घेतला व तो भारतात पोहोचवला.
पुस्तक परिचयासाठी धन्यवाद.

तो चर्चेचा धागा थोडा वाचला . पण मला काही वाईट सुचवायचं नाही. मी पुस्तक वाचलंही नाही.
ओलिवबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल लिहिले. जर का आपण तिकडे जाणारच नसलो तर एक साहित्यकृती आणि करमणूक म्हणून पाहतो आणि पुस्तक आवडतेच. जर पुढे जाण्याचा विचार असेल तर आपल्याला परदेश/युरोपीय देशांचा अनुभव असणे नसणे यावर फरक पडतो. सगळीकडून माहिती घ्यावी लागते. तुलनात्मक उपयोग होतो.
शिवाय हे पुस्तक अगदी अलिकडले आणि मराठीत हेसुद्धा महत्त्वाचे आहेच.

मला आवडतात मीना प्रभुंची प्रवासवर्णनं. मी बहुतेक सर्व वाचली आहेत. काही वेळा पाल्हाळ वाटलं तरी आपण प्रत्यक्ष फिरतोय त्यांच्याबरोबर असं वाटतं मला. वाट तिबेटचीपर्यंतची सर्व वाचली आहेत मी. न्युयॉर्क नाही वाचलं अजून.

मीना प्रभूंची जवळ जवळ सगळी प्रवासवर्णन मी वाचली आहेत.. छानच लिहितात त्या...
सध्या रोमराज्य १ आणि मेक्सिकोपर्व वाचत आहे. मला न्यूयॉर्क पुस्तक फार नाही आवडलं.. त्यांच्या आत्तापर्यंतच्या लेखनशैली पेक्षा एकदम वेगळं आहे.

मी एकच वाचलं होतं. आता नाव आठवत नाही. बरेच दिवस झाले. त्या प्रचंड खर्चिक अशा समुद्रसफरीला गेल्या होत्या. तिथून पुढे इच्छित स्थळी पोचल्यावर रात्री जागून काहीतरी आकाशातला प्रकाश पहिला होता. तिथल्या सगळ्या सुखसोई साठी किती खर्च आला होता तो तपशीलवार लिहिला होता अगदी विजखर्च , डिनर कसं होतं वगैरे. तो खूSSप होता. शिवाय तिथे रोज चर्चासत्र घडायचं ते त्या रेकॉर्ड करायच्या आणि नन्तर ज्याने घेतलं होतं त्याच्या नावासकट त्यांनी ते तपशिलात लिहिलेलं , अगदी प्रत्येक दिवसाच. ते मला बोरिंग झालेलं. आणि त्यामुळं ते पुस्तक 500 + पानी झालं असं मला वाटलेलं.

पुस्तक ओळख छान करून दिलीय.

वर्णिता, तुम्ही म्हणता ते पुस्तक "अपूर्वरंग 2" हे आहे का, ज्यात सिंगापूर, थायलंड, मलेशिया, अंदमान, कंबोडिया, व्हिएतनाम या देशांचे प्रवासवर्णन आहे? कारण माझ्याकडे त्यांची सगळी पुस्तके आहेत पण अपूर्वरंग 2 अजून वाचायचे राहिले आहे.

वर्णिता.. ते पुस्तक उत्तरोत्तर असावे. आधी एका क्रुझ चं वर्णन आहे आणि मग नॉर्वे- फिन्लंड मधील अरोरा - नॉर्दर्न लाईट्स!
खूपच मस्त लिहीतात त्या... मला तर फार आवडतात त्यांची पुस्तकं! सामान्य माणूस जिथे स्वप्नातही जाऊ शकणार नाही तिथल्या न्यार्‍या दुनियची माहिती करुन देतात.

उदा; मेक्सिको, पेट्रा, तुर्कस्तान, नॉर्वे, तिबेट.................

खूप वर्णन केलेली पुस्तकं वाचण्याचा काळ वेगळा होता. अगदी लाल माती निळे आकाश. साहित्यीक कल्पनारम्य वाक्य. फारच थोडे लोक सफरीला जाऊ शकत होते. आता विडिओ सर्व दाखवणार आहे, कसं कुठे केव्हा जायचं आणि गर्दी कशी टाळायची, प्लान किती दिवसांचा कसा आखता येईल याचे पर्याय वाचायला आवडतात.

अपूर्वरंग 2 अजून वाचायचे राहिले आहे. >>> हे मीही नाही वाचले. असं काही पुस्तक त्यांनी लिहीलंय हेच मला माहीती नाहीये.

वर्णिता.. ते पुस्तक उत्तरोत्तर असावे. >>> हेही नाही माहीती, मी वाचलं नाहीये.

वर्णिता अजून एखादं पुस्तक ट्राय कर मीना प्रभु यांचं तेही नाही आवडलं किंवा भावलं तर तुला नाही आवडत त्यांचं एकंदरीत असं म्हणता येईल. मी दक्षिणरंगपासून वाचायला सुरुवात केलेली, मग मेक्सिकोपर्व आणि त्यानंतर माझं लंडन वाचल्याचं आठवतंय किंवा लंडन पहीलंच वाचलं असेल कदाचित पण पहीलं जे कुठलं वाचलं त्यावरुन मी त्यांच्या लिखाणाच्या प्रेमात पडले म्हणायला हरकत नाही.

आंबटगोड , येस उत्तरोत्तर.
सामान्य माणूस जिथे स्वप्नातही जाऊ शकणार नाही तिथल्या न्यार्‍या दुनियची माहिती करुन देतात.>>> हे मात्र अगदी खरं.

अंजू , मीना प्रभूंची अजून पुस्तके वाचणारच गं. एका पुस्तकवरून नाहीच ठरवता येत . हे सुद्धा आवडलं नाही असं नाही पण लांबवलंय असं वाटलं.

Back to top