मोगरा फुलला
________________________________________
"अवघे विश्वचि माझे घर" हा विचार मनुष्यास आपल्या जीवनाकडे पाहताना व्यापक विचार करण्यास उद्युक्त करतो. काम , क्रोध, माया, मोह हे सारे शब्द मनुष्य जीवनाला संसारात बंदिस्त करणारे आहेत. ते मनुष्याला मोक्षप्राप्त करण्याचे मार्ग दर्शविणार नाहीत. आपण त्या विश्वनिर्मित्या परमात्म्याचे अंश आहोत. मोक्षप्राप्ती हे मनुष्य जन्माचे ध्येय असायला हवे. मनुष्यनिर्मित प्रपंचापलीकडे एक विश्व आहे, त्या विश्वाची अनुभूती घेणं हे एक उदीष्टय मनी मनुष्याने बाळगले तर मोक्षप्राप्तीचा मार्ग निश्चितच सुकर होईल. आपल्या हया नश्वर देहातील वसलेल्या आत्म्याला विचारा....विचारा की .... त्याला ह्या बंदिस्त, भौतिक सुखाची खरंच कामना आहे का ? करुणामय परमात्म्याच्या अतीव कृपेने आपणां सर्वांस मनुष्यजीवन, हे मानवी शरीर प्राप्त झाले आहे. त्या आत्म्याला मोह, मायेतून मुक्त होऊ द्या... परमात्म्याच्या चिंतनात सर्व समस्यांचे उत्तर आहे. मुक्त व्हा...!! मुक्त व्हा...!! झुगारा ही मनुष्यनिर्मित बंधने. प्रपंचापलिकडल्या विश्वाची, त्या परमात्म्याची अनुभूती घ्या.... ओम शांती ....शांती ...शांती....!!
आध्यात्मिक गुरु शिवानंद महाराजांच्या अमोघ वाणीवर, त्यांच्या चिंतनावर जमलेल्या भक्तांनी मोठ्या भक्तिभावाने माना डोलावल्या. आध्यात्मिक गुरु शिवानंद महाराजांच्या आश्रमासमोरचे प्रांगण महाराजांच्या भक्तांनी गच्च भरलेले. दर सोमवार व गुरुवार शिवानंद महाराज आपल्या भक्तांसाठी आध्यात्मिक ज्ञानावर चिंतनसभा आयोजित करत असत.
रोजच्या ताण-तणावाच्या आयुष्यातून थोड्या वेळासाठी का होईना महाराजांच्या भक्तांना महाराजांच्या आध्यात्मिक बोलण्याने, मधुर वाणीने थकलेल्या मनाला दिलासा मिळे. रोजच्या संसारातील समस्यांनी त्रस्त ,थकल्या - भागल्या जीवाला एक वेगळी आध्यात्मिक अनुभूती महाराजांच्या विचारातून, वाणीतून मिळे. आज प्रतिक त्याच ओढीने महाराजांच्या आश्रमात आला होता. आज आश्रमातून निघताना त्याने मनाशी पक्के ठरवले होते की, आता निर्णय घ्यायलाच हवा. आपल्या जीवनात असलेल्या इतरांच्या व स्वतःच्या स्वतःकडून असणाऱ्या अपेक्षांचे ओझे आपल्या मनाला सोसणे कठीण जाणार आहे. त्यापेक्षा हा मार्ग निश्चितच योग्य आहे. शिवानंद महाराज म्हणतात तसे आता कुठल्याही प्रापंचिक मोह-मायेत अडकायचे नाही. आपला जन्म प्रपंचासाठी नाही. प्रपंचापलिकडल्या विश्वाची अनुभूती आपण अनुभवायला हवीच. शिवानंद महाराजांचे बोल त्याच्या कानात रुंजी घालत होते.
'शिवानंद महाराज'' !! किती तेजोमय आहेत. त्यांची ती मधुर वाणी, त्यांचे विचार, त्यांच्या मुखावर असणारे ते चैतन्यमय तेज...!! अहाहा! किती उल्हासित वातावरण असते त्यांच्या आश्रमातले. पाय निघत नाही तिथून.
आता पुरे झाली रक्ताच्या नात्यांची घट्ट वीण..ती वीण आता सोडवायलाच हवी. नको ती नाती.. नको ती सांसारीक बंधने.. !! मुक्त.. मुक्त व्हायचे आहे मला या साऱ्या बंधनातून..!! प्रतिक आपल्या मनाला खंबीरपणे, दृढनिश्चयाने समजावित होता. विचारांच्या तंद्रीत चालत असताना अचानक ठेच लागल्याने तो भानावर आला .
" आ ..आई !! " प्रतिकचे डोळे पाणावले. मन भरून आले. डोळ्यांनी अश्रूंचा आश्रय घेतला पण मन? ते एकटेच होते.... कधीच व्यक्त न झालेल्या भावनांचा कोंडमारा सोसत..... वर्षानुवर्षे...!!. त्याने मोठ्या निर्धाराने डोळ्यांतल्या अश्रूंना थोपवले.
--------------------------XXX-----------------------
संध्याकाळची ६.२० ची लोकल ... रोजची जीवघेणी रेटारेटी. त्या गर्दीत आज सरिताला बसायला खिडकीजवळची जागा मिळाली. रोजच्या गर्दीत खिडकीत बसायला जागा मिळणे म्हणजे थकल्या - भागल्या कष्टकर्यांसाठी सुखच ते! सामान्य लोकांच्या सुखाच्या कल्पनासुद्धा खूप सामान्य असतात. मानसिक तसेच शारीरिक थकव्याने सरिताला हवेच्या झुळकेने क्षणात बसल्याजागी डुलकी लागली. अचानक
मोगऱ्याच्या सुवासिक फुलांचा गंध पूर्ण डब्यात दरवळला.
" वीस रुपयाला तीन घ्या... मोगर्याचे गजरे घ्या..!!
ओ.. ताई! घ्या ना ... वीस रुपयाला तीन" !! मोगर्याच्या फुलांच्या सुवासाने आणि फेरीवालीच्या आवाजाने सरिताची झोप चाळवली. मोगऱ्याची पांढरीशुभ्र फुले...मनाला प्रसन्न करणारा , त्या फुलांचा स्वर्गीय अनुभूती देणारा गंध....!!
"हे घे वीस रुपये दे.. ते गजरे!" सरिताने मोगर्याचे गजरे घेतले. आपल्या दोन्ही हाताच्या ओंजळीत गजरे धरून, श्वास भरून, डोळे मिटून फुलांचा सुवास आपल्या उरात साठवला. त्या स्वर्गीय गंधाने तिचे मन तृप्त झाले. ती मोगऱ्याची फुले... त्यांचा सुवास.... तिला घेऊन गेला तिच्या भूतकाळात... माई- आबांच्या आठवणींच्या राज्यात.... त्यांच्या आठवणींनी सरिताचे डोळे पाणावले. माईला मोगऱ्याच्या फुलांची अतोनात आवड. घरामागच्या परसात माईने खूप फुलझाडे लावली होती. जाई-जुई , रातराणी , जास्वंद, सोनचाफा , प्राजक्त. पण या साऱ्या झाडांमध्ये मोगर्याचे झाड तिला खूपच प्रिय होते. मोगऱ्याच्या फुलांचा बहर असला म्हणजे तिच्या लांबसडक केसांच्या अंबाड्यात मोगऱ्याच्या फुलांची वेणी तिच्या केशसांभाराची शोभा वाढवी. प्रत्येक सणाला, शाळेतल्या कार्यक्रमांना माझ्या केसांतील मोगऱ्याचे भरगच्च गजरे पाहून मैत्रिणींना माझा कित्ती हेवा वाटे. 'तुझी तर बाई मज्जाच आहे '..आपल्या त्या शाळकरी मैत्रिणीच्या निरागस कौतुकाने , निष्पाप हेव्याने आपलं मन थुईथुई नाचत असे. त्या बालपणीच्या आठवणींनी तिच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित पसरले. एका पावसाळ्याआधी घरामागची पडवी वाढवताना मोगऱ्याच्या झाडावर गदा येणार असं लक्षात आल्यावर माईच्या भावना अनावर झाल्या.
" सरुचे आबा , आजपर्यंत तुमच्याकडे कधी काही हट्टाने मागितले नाही. पण आज तुमच्याजवळ एक हट्ट करतेयं तेवढे हे मोगर्याचे झाड नका कापू हो! ...माझा जीव अडकलायं त्या झाडात ....त्या फुलांत... फुलांच्या गंधात..! " माई पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाली. कधीही एका शब्दाने न दुखविणाऱ्या, आपल्या सहचारिणीच्या भावना समजून घेणाऱ्या आबांनी माईचा हट्ट पुरवला नसता असे होणे शक्यचं नव्हते. माईसाठी , तिच्या मोगऱ्याच्या झाडासाठी त्यांनी पडवीची जागा बदलली आणि मोगऱ्याच्या झाडाला जीवदान दिले.
" सरु, मी आबांच्या आधी गेले ना तर तू मोगऱ्याच्या फुलांनी माझा शेवटचा साज - श्रृंगार कर बरं! तेवढी शेवटची इच्छा पूर्ण कर माझी. देवाकडे एकच मागणे मागते, मला सवाष्ण ने रे बाबा ...!" असं माई म्हणाली की , आबा थट्टेने म्हणत "तू कशी माझ्या आधी जाते बघतोच मी! पार्वती .. अगं... आपण जोडीने जाऊया ... जसे आपण देवाला भेटायला तीर्थक्षेत्री जातो ना अगदी तसेच! " आणि किती दुर्दैवी योगायोग ..!!. माई गेली आणि पुढच्या चार महिन्यात आबा तिला भेटण्यासाठी अज्ञात वाटेच्या दिशेने निघून गेले. आपल्या लाडक्या लेकीला पोरकं करून ...!! एक अश्रू सरिताच्या डोळ्यांतून ओघळला.
आपल्या लांबसडक केसांची वेणी घातल्यावर केसांत
मोगऱ्याची फुले माळायला माई आपल्याला खूप आग्रह करे. मग आपणही आवडीने मोगर्याची फुले केसांत माळत असू आणि मग त्या केसांवर.....मोगर्याच्या फुलांवर .... त्या फुलांच्या गंधावर ....आणि... आणि.... आपल्यावर भाळलेला 'रवी ' सुंदर कविता करे. तिच्या गालावर अस्फुट लाजेचा रक्तिमा चढला. ' रवी '!! सरिताचे डोळे पुन्हा भरून आले ... भूतकाळातील आठवणींनी. अचानक बाजूच्या रेल्वे मार्गावरून धडधडत जाणाऱ्या गाडीच्या आवाजाने ती भानावर आली. डोळ्यांच्या कोपऱ्यातून आजूबाजूला पहात हातातल्या रुमालाने तिने डोळ्यांतले अश्रू अलगद टिपले.
--------------------- XXX---------------------
" प्रतिक, कुठे चालला आहेस? कंपनीच्या कामासाठी बाहेर जातोयं का ? " बॅगेत कपडे भरणाऱ्या प्रतिकला पाहून सरिताने विचारले.
" आई! अगं बऱ्याच दिवसापासून तुला सांगायचे होते. मी शिवानंद महाराजांच्या आश्रमात कायमचं वास्तव्य करण्यास जातोय !" संथपणे प्रतिक उत्तरला.
"क्काय? काय म्हणालास तू ?"
" मी काय म्हणालो ते तुला समजलयं आई!"
" प्रतिक, तू काय बोलतोस ते समजते का तुला? कायमचा चालला आहेस म्हणजे काय ? काय म्हणायचे आहे तुला?"
" मी आता आश्रमातच राहणार .. शिवानंद महाराज सांगणार ते कार्य करणार!"
" तू काय बोलतोयसं प्रतिक..? मला काही समजत नाही रे! अरे , दोन दिवस जातोय ना तिथे आश्रमात. त्याने होत नाही का तुझे समाधान ? तू नोकरीचे काय करणार? तिथे कायमचा राहणार म्हणजे आम्हाला सोडून जाणार का?" सरिता भावनाविवशतेने म्हणाली.
" मी राजीनामा दिलायं नोकरीचा!" प्रतिक स्थितप्रज्ञपणे म्हणाला. सरिताच्या बोलण्याचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नव्हता.
" प्रतिक...डोकं ठिकाणावर आहे का रे तुझे?" हतबलपणे सरिता म्हणाली.
सरिता जागेवरून तरातरा उठली. प्रतिकच्या बॅगेमधून कपडे बाहेर काढून लागली.
" कुठेही जाणार नाहीयेसं तू! समजलं तुला ? त्या शिवानंद महाराजाच्या नादाला लागून आपल्या आईला, तिच्या प्रेमाला ठोकरून तिथे चाललायं ...कशाला? सेवा करायला ? परमार्थ करायचाचं असेल ना तर संसार आणि परमार्थाची दोघांची सांगड घाल. रक्ताची नाती तोडण्यात कसला आलायं परमार्थ? अरे, तुझं लग्न, सून, नातवंडं , तुझा बहरता सुखी संसार किती तरी स्वप्ने पाहिलीत मी!" सरिताला भावना अनावर झाल्या.
" अपेक्षा ...अपेक्षा... फक्त अपेक्षा !! हेच नकोय मला. आज तुझ्या अपेक्षा, उद्या बायकोच्या अपेक्षा, नंतर मुलांच्या अपेक्षा ... हे अपेक्षांचे ओझे मला नाही पेलवणारं आई ..!!.. सुखी संसार म्हणजे काय आई? तू सुखी, समाधानी आहेस का तुझ्या संसारात ? प्रिया सुखी आहे का तिच्या संसारात ? प्रेम केलं तिने...पळून गेली त्या मवाल्याबरोबर...! परत आणून सोडलं त्याने इथे दारात ...झाला घटस्फोट...सांग काय सुख मिळालं तुम्हांला तुमच्या संसारात ? लहानपणापासून पप्पांची आणि तुझी भांडणे पाहत मोठा झालो. शाळेतून घरी येताना त्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या बारमध्ये दारू पिऊन झिंगलेला माझा बाप पाहून सोबत असणारे मित्र थट्टा करायचे .. हसायचे माझ्यावर... आणि आता तरी आहे का इथे माझा जन्मदाता ? कुठे आहे? सोडून गेलायं ना आपल्याला? कुठे राहतोय, कोणासोबत राहतोय? लाज... लाज वाटते गं मला खूप..!"
" प्रतिक, मी दोषी आहे का ह्या सगळ्या परिस्थितीला?" अश्रू पुसत सरिता म्हणाली.
" नाही आई! दोष तुझा नाही. दोष निसर्गाचा आहे ज्याने मला चुकीच्या ठिकाणी जन्माला घातलं!"
" नाही प्रतिक, दोष निसर्गाचा नाही. दोष मानवनिर्मित परिस्थितीचा, वागणुकीचा आहे. ज्याला तू अपेक्षा समजतोयं ना , ते माझं निरपेक्ष प्रेम आहे तुझ्यावर. एका आईची आपल्या अपत्यावर असलेली नैसर्गिक माया आहे. निसर्गाने मनुष्याला दान केलेल्या निर्मळ भावना आहेत त्या... तू कमी पडलास एका आईच्या मनातल्या भावना ओळखायला आणि मीसुद्धा कमी पडले तुझ्या मनात चालेल्या द्वंदाला ओळखायला!! जा तू ... नाही अडवणार मी तुला. जी वाट तू धरली आहेस त्या वाटेवर सुखी राहा ..एक आई म्हणून माझा हा आशीर्वाद नेहमीच तुझ्यापाठी असेल!" सरिता मन घट्ट करत म्हणाली.
"आई, मला माफ कर...!" जड अंत:करणाने, जड पावलांनी मागे न पाहताच प्रतिक घरातून निघून गेला. कुणाचाही विचार न करता ...आपल्या आईच्या प्रेमाला ठोकरून..... तिच्या भावनांना पायदळी तुडवून....!!
------------------------- XXX---------------------
"तुला तुझा संसार कधीच सांभाळता आला नाही." गावावरून आलेल्या सासूने सरितावर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली.
" ह्या सगळ्यात माझा काय दोष?"
" ह्या सगळ्या परिस्थितीला तू सर्वस्वी जबाबदार आहेस. संसाराकडे नीट लक्ष दिले असतेस तर ही वेळ आलीच नसती!".
" तुमच्या मुलाच्या व्यसनालाही मीच जबाबदार आहे का? त्यांच्या व्यसनापायी ही परिस्थिती निर्माण झाली आहे."
" माझ्या लेकाला घरातून हाकलून काढलेस तू. तुझ्या नावावर घर असले म्हणून नवऱ्यावर एवढी हुकूमत गाजवायची? अशी वागलीस तर तो जाणार नाही का व्यसनांच्या आहारी?" सासू समजून घ्यायला तयारच नव्हती.
" आई, तुम्ही मलाच गुन्हेगार ठरवतायेतं? तुमच्या मुलाला लग्नाआधीपासूनच होती सारी व्यसने. आमच्यापासून लपवून लग्न केलतं तुम्ही!" सरिताच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला.
"हो.. हो .!!.तूच एक शहाणी आहेस जगात. माझा मुलगा बिघडलेला मग तू बाई एवढी हुशार तर तुझा मुलगा का बरं सोडून गेला तुला ? का पळाली तुझी मुलगी मवाल्याबरोबर? नाक कापलसं आमच्या घराण्याचे. वाटोळं केलसं माझ्या मुलाच्या संसाराचे!" भांडखोर सासूने सरिताच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले.
"हो! मीच जबाबदार आहे.. मीच आहे जबाबदार ह्या सगळ्या गोष्टींना. स्वतःचे खोटे नाणे माझ्या माथी मारून आयुष्य बरबाद केलतं माझं आणि पुन्हा मलाच दोष देतायेतं सगळे!" सरिता अतिशय संतापली.
" चल आई इथून! ' सुंभ जळला तरी पीळ गेला नाही अजून!" नणंदेने सरिताच्या जखमेवर मीठ चोळले.
सासू व नणंद आल्यापावली सरितावर टीकेचे वाग्बाण सोडून गेल्या. सरिता त्यांच्या बोलण्याने प्रचंड दुखावली. लग्न, मुलं, सुखी संसार खूप स्वप्ने पाहिली होती तिने. पण हाती काय आलं? एक चौकोनी कुटुंब, त्याचे चार कोन, प्रत्येक बिंदू चार रेघांनी जोडलेले.. आणि आता त्या चौकोनाच्या चारही रेघा पुसट बनत चाललेल्या ... !! मनात साचलेल्या असंख्य भाव-भावनांनी सरिताचे मस्तक गरगरू लागले. ती सोफ्यावर पडून राहिली. डोक्यातले विचार क्षणभर थांबले. सुन्न... विमनस्क मनस्थिती .. सरिताच्या डोक्यातील प्रश्नचक्र पूर्णपणे थांबले. डोक्यावर गरगर फिरणारा पंखा ...बाजूला सोफ्यावर पडलेली ओढणी.... उठावं का? संपवावे हे खाच-खळग्यांनी भरलेले आयुष्य? फिरणाऱ्या पंख्याकडे सरिता एकटक पाहू लागली. वर छताला फिरणारा पंखा... ती ओढणी... नजर वर लागलेली... आणि अचानक भरधाव गाडीला ब्रेक लागावा तशी सरिता भानावर आली.
" असले कसले दळभद्री विचार मनात आणतेयसं सरिता? तू एवढी पळपुटी कधीपासून झालीस?"अंतर्मनाने अचानक तिच्या अभद्र विचारांना जोरदार ठोकर लगावली. कुणासाठी आपले जीवन त्यागायला निघाली आहेस? ज्यांना तुझा, तुझ्या भावनांचा विसर पडला आहे त्यांच्यासाठी? तू एकटी समर्थ आहेस येणाऱ्या संकटांना, आनंदाच्या , दु:खाच्या कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी. भेकडासारखी बसून असले अभद्र विचार करू नकोस. !! सरिता सावरली. सोफ्यावर मागे मान टाकून डोळे मिटून पडून राहीली. अचानक दारावरची बेल वाजली. ती उठली.
"ताई ..! कधीपासून दरवाज्याची बेल वाजवतेयं मी.. मला वाटलं तुम्ही घरात नाहीत !" नेहमीची भाजीवाली दारात उभी होती.
" ताई, तुम्हांला मोगऱ्याची फुले खूप आवडतात ना म्हणून आज खास आणली आहेत तुमच्यासाठी !"
सरिताने मोगर्याची फुले ओंजळीत धरली. मन भरून त्यांचा सुगंध घेतला. तीच फुले... तोच मोहमयी सुगंध.... आणि त्या गंधासोबत येणाऱ्या सुगंधित, प्रेमळ आठवणी माई-आबांच्या..!! आणि.... आणि... रवीच्या सुद्धा...!!
---------------------------- XXX----------------------------
समुद्रकिनाऱ्यावरचे ते एक टुमदार, नयनरम्य गावं. गावातचं मध्यभागी सरिताचे सुंदर, कौलारू घर. घराला मागेपुढे मोठे अंगण. अंगणात विविध प्रकारची फुलझाडे , फळझाडे. माई - आबांनी मोठ्या प्रेमाने, आपुलकीने जोपासलेली. '
गावातच राहणारी ' मीनल ' !! सरिताची जिवलग सखी ... बालपणीची मैत्रीण.!!
" सरू, तुला एक गंमत सांगायची होती.!" मीनल खूप उत्साहाने म्हणाली.
"सांग ना !"
"अगं , माझा रवीदादा आहे ना त्याला तू खूप आवडतेस !" एका झटक्यात मीनलने सांगितले.
" मीनू, थट्टा करतेस ना माझी?" मोठाले डोळे करत सरिता म्हणाली. तिच्या गालावर स्त्रीसुलभ लज्जेचा रंग पसरला.
" तुला थट्टा वाटते ना? बरं बाई ...मी सांगते रवी दादाला तूच सांग सरिताला!"
' रवी' मीनल चा चुलतभाऊ. शहरात राहणारा. शहरात शिकणारा. रवी सुट्टीत आपल्या काकांकडे गावी राहायला यायचा. मीनलकडे येणाऱ्या सरिताला पाहून तो तिच्या लाघवी स्वभावावर भाळला. अल्लड वयात, कोवळ्या मनात प्रेमाच्या कोमल भावना रंग धरू लागल्या. सरिताचे काळेभोर लांबसडक केस आणि त्या केसात माळलेला मोगऱ्याच्या फुलांचा गजरा, त्या फुलांचा सुवास रवीला तिच्या प्रेमात पुन्हा- पुन्हा पाडत होता. रवीला कविता करण्याचा छंद होता. सरिताच्या प्रेमात पडल्यावर त्याच्या कवितांना अधिकच बहर आला. वह्यांची पाने भरभरून तो सरिता व प्रेमावर कविता करू लागला. अजाणत्या वयात सरिता रवीकडे आकर्षिली जाऊ लागली. कधी समुद्रकिनाऱ्यावर ... सुरुंच्या बागेत ... मीनल, रवी आणि सरिता भेटू लागले. तिघांच्या मैत्रीचे बंध घट्ट होऊ लागले. सरिता एका वेगळ्याच धुंदीत राहू लागली. एरव्ही अबोल असणारी सरिता आपले काळेभोर लांबसडक केस मोकळे सोडून आरश्यासमोर बसून राहू लागली. आपल्या अजाणत्या प्रेमात सरिता आणि रवीने प्रेमाच्या मर्यादा कधीच ओलांडल्या नाहीत. माई- आबांच्या नजरेतून सरिताचे बदलते वागणे सुटले नाही.
" सरू, तुला एक विचारू का ?" आपल्या लांबसडक बोटांनी सरिताच्या केसांना तेलाने मालीश करत माईने विचारले.
" हे काय माई? असं काय विचारतेस? बोल ना !"
" कुणाच्या प्रेमात तर नाहीस ना ?" अचानक माईने विचारलेल्या प्रश्नाने सरिता गोंधळली.
" तुला असं का वाटतेयं माई?" सरिता सावरत म्हणाली.
" बऱ्याच दिवसांपासून पाहते सरू, तुझ्यात फरक जाणवतोयं !"
"माई! तुझ्याशी खोटं का बोलू? तू रवीला ओळखतेस ना? त्याला आवडते मी !" सरिताचा चेहरा लाजेने फुलला.
" आणि... तुला ? तुला रवी आवडतो का?".
"----------"
" सरू, तुझे मौन म्हणजे मी तुझा होकार समजून ना?"
सरिताच्या चेहर्यावर लाजेची लाली अजूनच पसरली.
" सरू, तू आमची एकुलती एक मुलगी आहेस. तुझ्या भावना मी आणि आबांनी नेहमीच समजून घेतल्यात. पण आज तुझी आई न होता एक मैत्रीण म्हणून सांगते, तुझ्या मनात रवीबद्दल उमलणाऱ्या भावना सहजसुंदर आहेत. ज्याला जग' प्रेम' म्हणून ओळखते. जेव्हा तू आणि रवी तुमच्या नात्याला लग्नाच्या गाठीत बांधू पाहाल तेव्हा ते सहजासहजी शक्य होईल असे मला वाटत नाही!" निश्वास सोडत माई म्हणाली.
" का माई? का नाही होऊ शकणार आमचं लग्न ?" सरिता भांबावली.
" सरू! अगं फार मोठी लोकं आहेत रवीच्या घरची. श्रीमंत, शहरात राहणारी. आपण लहान आहोत त्यांच्यापुढे. गरिबाघरची लेक म्हणून सून ह्या नात्याने तुला नाही स्वीकारणार ते! "
" असं कसं सांगू शकतेस तू त्यांच्याबद्दल माई?" सरिताच्या डोळ्यांत पाणी तरळले.
" सरु, एवढे पावसाळे पाहिलेत मी. माणसांची चांगली पारख आहे मला. तुला दुनियादारीची अजून ओळख व्हायची आहे. तुझा अपेक्षाभंग होईल बाळा ..!! अजून तुम्ही दोघे शिकत आहात. हे तुझे बारावीचे वर्ष. तुला मन लावून अभ्यास करायला हवा!" माई समजुतदारपणे म्हणाली.
माईच्या स्पष्ट बोलण्याने सरिताच्या डोळ्यांत चढलेली प्रेमाची धुंदी अश्रूवाटे वाहू लागली. माई माझी जन्मदात्री आहे. तिने सत्यपरिस्थितीची कल्पना दिली. तिचे म्हणणे काही चुकीचे नव्हते. सरिताने स्वतःला सावरले. तिने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. बारावीनंतर नर्सिंगला जायचे तिचे ठरले होते. योग्य निर्णयासाठी माई-आबांचा तिला नेहमी पाठिंबा असे. सुट्टी संपली. रवी शहरात गेला. सरिताने जरी रवीपासून लांब होण्याचे ठरवले होते तरीही तिचे मन त्याच्या आठवणीत जास्तच झुरत होते. पुढच्या सुट्टीत रवी गावी आला नाही. पुढचे शिक्षण घेण्यासाठी तो दुसऱ्या शहरात गेला. हे तिला मीनल कडून समजले. नंतर रवीचे गावाला येणे कमी होऊ लागले. सरिताला आता माईचे बोलणे पूर्ण पटले. तिचे प्रेम अळवावरचे पाणी ठरले. पण तिच्या मनात अजूनही रवी बद्दलच्या प्रेमभावना जिवंत होत्या. मीनलकडून तिला रवीची खबरबात समजायची. सरिता त्यावर समाधान मानू लागली. मीनल बरोबरची मैत्री मात्र जशी होती तशीच राहिली. तिला समजून घेणारी ...तिच्या भावना जाणणारी माई- आबानंतर दुसरी व्यक्ती कोण असेल तर ती होती 'मीनल'!
सरिताचा नर्सिंगचा कोर्स पूर्ण झाला आणि अचानक शहरातल्या विकासचे स्थळ तिला चालून आले. शहरात राहणारा व नोकरी करणारा विकास माई-आबांना जावई म्हणून आवडला.आयुष्यभर आपल्या लेकीच्या भावना समजून - उमजून घेणारे माई - आबा ह्या लग्नाबाबत मात्र सरिताच्या भावना ओळखण्यात कमी पडले. विवाह जुळवणाऱ्या मध्यस्थाने विकासबद्दल सारे चांगले सांगितले. त्याची खूप स्तुती केली.शहरात नोकरी करणारा, लग्नानंतर सरिताला नोकरी करायला हरकत न घेणारा जावई मिळाला तर लेकीचा संसार सुखा-समाधानाचा होईल. आपल्याला अजून काय हवं ? माई - आबा आपल्या एकुलत्या एक लेकीच्या सुखी संसाराची स्वप्ने पाहू लागले. पण नियतीच्या मनात दुसरेच काहीतरी होते. रवीची वाट पाहण्यात काही अर्थ नव्हता हे सरिताला समजून चुकले. जास्त आढेवेढे न घेता ती बोहल्यावर उभी राहिली. विकाससोबत सप्तपदी घेताना त्या धगधगणाऱ्या यज्ञकुंडात तिने रवीबद्दल मनात वाटणाऱ्या प्रेमभावनांची आहुती दिली. पण कितीही मनाला समजावलं तरी त्या भूतकाळातील कोमल, हळव्या भावनांना विसरणे सरिताला खरंच शक्य होते का?
लग्न झालं. नवलाईचे दिवस संपले. लग्नानंतर महिन्याभरात तिला विकासच्या स्वभावाची, त्याच्या बेधुंद वागण्याची कल्पना आली. विकासला सगळी व्यसने होती. रात्री उशिरा दारू पिऊन येणारा विकास आणि त्याची ती शिवराळ भाषा ऐकून सरिता पूर्णपणे कोलमडून गेली. आपली फसवणूक झाली आहे हे तिला समजून चुकले. लग्नानंतर नोकरी कर म्हणणारा विकास आता त्या विषयावर बोलायला तयार नव्हता. शांत, विचारी, समजूतदार सरिता झालेल्या फसवणुकीने निराशेच्या गर्तेत जाऊ लागली. आपले फसलेले लग्न, विकाससोबतचे नाते तोडून टाकावे असे धाडसी विचार तिच्या मनात पिंगा घालू लागले. पण निसर्गाने मात्र तिला पूर्णपणे आपल्या कह्यात केले. सरिताला दिवस गेले. निसर्गाच्या विरोधात जाण्याची हिंमत तिला झाली नाही. प्रतिकचा जन्म झाला. त्यानंतर दोन वर्षांनी प्रिया. विकास मात्र होता तसाच राहिला. लेकीच्या संसारात कुरबुरी सुरु आहेत याची कुणकुण माई-आबांना लागली होती. त्यांनी सरिताला यासंदर्भात विचारणा केली पण त्यांना दुःख होऊ नये म्हणून तिने प्रत्येक वेळी वेळ मारून नेली.सासरच्या लोकांनी हात झटकले. विकासला समजावणे अशक्य होते. घरखर्च चालवणे, मुलांचे शिक्षण, त्यांचा खर्च ही जबाबदारी वाढत होती. विकासच्या व्यसनांमुळे घरात पैसा टिकत नव्हता. दारु पिऊन आल्यावर शिविगाळ करणारा विकास आता सरितावर हात उचलायलाही मागेपुढे पाहत नव्हता. सरिता समजूतदार जरी असली तरी अन्याय सहन करणारी नव्हती. तिने त्याला विरोध करायला सुरुवात केली. हे पाहून विकास जास्तच बिथरला. आई-वडिलांची भांडणे पाहून लहानगी मुले घाबरून जाऊ लागली. आपल्या व्यसनांचा आणि भांडणांचा त्यांच्या बालमनावर किती विपरीत परिणाम होतोयं हे विकासच्या गावी नव्हते.सरिताने आपल्यापरीने बाजू सावरण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग झाला. शेवटी तिने मुलांना पाळणाघरात ठेवून नोकरी करण्याचा निर्णय घेतला. सरकारी नोकरी मिळेल याची शाश्वती नव्हती. तिने एका खाजगी हॉस्पिटलमध्ये तुटपुंज्या पगारावर नोकरी स्वीकारली. रात्रपाळीमुळे मुलांना एकटे राहू लागू नये म्हणून तिने जनरल ड्युटीसाठी हॉस्पिटल प्रशासनाकडे विनंती केली. ती मात्र त्यांनी मान्य केली. मुलांना सोडून जाताना तिने आपल्या काळजावर दगड ठेवला. मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी हे तिला करणे भाग होते.सरिताने घराबाहेर पडू नये म्हणून विकासने तिला अजूनच त्रास द्यायला सुरुवात केली. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे सुरू केले. पण सरिता बधली नाही. शेवटी तिने त्याला पोलिसांची धमकी दिली तेव्हा मात्र त्याचा विरोध मवाळ झाला. पण रोजच्या कटकटी मात्र कमी झाल्या नाही. मुले मोठी होत होती आणि सरिताचा संसार रडत- रखडत सुरू होता.
----------------------- XXX-------------------
एके दिवशी माई - आबा सरिताला भेटायला तिच्या घरी आले. ते तसे आल्यापावली परत गावी जात. पण सरिताच्या आणि नातवंडांच्या आग्रहास्तव ते त्यारात्री मुक्कामाला थांबले. त्या रात्रीही विकास नेहमीसारखा दारू पिऊन घरी आला. घरात सासू-सासरे असतानासुद्धा त्याने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता सरिताला शिवीगाळ करायला सुरुवात केली. लेकीचा संसार योग्य मार्गावर नाही ह्याची जाणीव दोघांना होती. पण आज त्यांच्यासमोर विकासने तमाशा केला. जावयाचा हा नशेखोर अवतार आणि आपल्या लाडक्या लेकीच्या संसाराची दुर्दशा पाहून पापभीरु वृत्तीचे माई-आबा हबकले. काहीही न बोलता दोघे पहाटेची गाडी पकडून गावी परतले. सरिता मूकपणे अश्रू ढाळत राहिली.
साधारण दोन महिन्यानंतर माई आणि आबा सरिताला भेटायला पुन्हा शहरात आले. यावेळी मात्र दोघेही मनाशी ठामपणे काहीतरी ठरवूनच आले होते.
" सरु, तुझ्यासाठी आणि मुलांसाठी चांगले घर बघ बरं!" आबांनी आल्या-आल्या सरिताला म्हटले.
" पण आबा, हे घर आहे ना ?"
"ते विकासच्या नावाने आहे. तुझा जरी त्याच्यावर कायद्याने हक्क असला तरी त्याच्या एकंदरीत वागण्यावरून तो तुला घराबाहेर काढेल असं आम्हांला वाटतेयं .!" आबांच्या चेहऱ्यावर चिंता होती.
" हे बघ सरू, आम्ही आपली थोडीशी शेतजमीन विकली आहे. तिचे पैसे आम्ही बँकेत ठेवले आहेत. ते पैसे आणि तुझी जी काही जमा-पुंजी असेल ती आणि थोडेफार जमल्यास कर्ज घेऊन तू घर घ्यायचे बघ आधी. आणि ते घर फक्त तुझ्या एकटीच्या नावाने घ्यायचे. तुझ्या आणि मुलांच्या भविष्याची सोय म्हणून!". माई खंबीरपणे म्हणाली.
" पण माई, तुम्ही जमीन का विकलीत? तुमच्या उदरनिर्वाहाचा आधार होता ना गं तो?" सरिता रडवेली झाली.
"आम्ही सगळी जमीन नाही विकली सरू! आमच्या पोटापाण्याची सोय होईल तेवढी आहे जमीन. तू चिंता नको करू. आमचे जे काही आहे ते तुझेचं आहे. तू आधी तुझा, मुलांच्या भविष्याचा विचार कर!" आबा करारीपणे म्हणाले.
"पण आबा ...!"
"हे बघ ! आता पण - बिण काही म्हणू नकोस. आम्हांला उघड्या डोळ्यांनी दिसतयं विकासचं बेजबाबदार वागणं जे पूर्णपणे चुकीचे आहे. आम्हांला वाटते की तू हे सारं सहन करून त्याच्या सोबत राहू नये. भविष्यात तो सुधारेल या भाबड्या आशेवर राहण्यात काहीच अर्थ नाही... सरू! आम्ही तुला जबरदस्ती नाही करत पण अशा व्यसनी माणसासोबत आयुष्य कंठणे खूप कठीण होईल तुला. कुठल्याही माता-पित्यांना आपल्या मुलीचा संसार तुटावा असं नाही वाटत. पण एक- एक क्षण अशा माणसासोबत काढणे खूप वेदनादायी आहे . तू विचार कर! तू समजुतदार आहेस.तुला काय योग्य, काय अयोग्य ह्याची पूर्ण जाण आहे!" दोघांच्या डोळ्यांत पाणी तरळले.
" आबा, मलाही वाटते हे बेगडी नातं का जपून ठेवतेयं मी? पण प्रतिक आणि प्रियासाठी मला हे नातं तोडणे जड जातेयं. विकास आणि माझ्यात भलेही मतभेद असले तरीही मुलांवर त्याचे प्रेम आणि माया आहे . दोन्ही मुलं आपल्या पित्यावर तेवढीच माया करतात जेवढी माझ्यावर त्यांची आहे. फक्त मुलांसाठी मी हे नाते टिकवून ठेवले आहे!" सरिताला भावना अनावर झाल्या
" बघ.. विचार कर ...!! तुमच्या भांडणांचा मुलांवर किती विपरीत परिणाम होतोय ते दिसतयं. गरीब कोकरासारखी सारखी भासतात गं लेकरं!" माई डोळ्यांना पदर लावत म्हणाली.
तुला जेव्हा मदत लागेल तेव्हा आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी असू असं म्हणत, सरिताला सावरत ,आधार देत माई- आबा गावी परतले. थोड्याच दिवसांत सरिताने एक लहानसे घर स्वतःच्या नावाने घेतले. त्यावेळीही विकासने दारू पिऊन धिंगाणा घातला. जर नीट वागायचे असेल तरच घरात पाऊल टाकायचे अन्यथा दारात यायचे नाही असे सरिताने ठामपणे विकासला बजावले. सरिताच्या ह्या धाडसी पवित्र्यानंतर विकास थोड्या नरमाईने वागू लागला. पण त्याची व्यसने काही कमी झाली नाही . तो फक्त मुलांना भेटण्यासाठी, त्यांच्या ओढीने घरी येऊ लागला. फक्त आणि फक्त ह्या एकाच कारणासाठी सरिता विकाससोबतचे नाते सांभाळू लागली. पण तिच्या मनात मात्र त्याच्याबद्दल थोडी ही आपुलकी, माया उरली नव्हती जी एका पत्नीला आपल्या पतीबद्दल वाटते. आणि एके दिवशी विकासने त्याच्या नावे असलेले घर सरिताच्या नकळत विकून दुसऱ्या शहरात पोबारा केला. नव्या ठिकाणी त्याने काहीतरी नवीन व्यवसाय सुरु केला. कोण्या एका स्त्रीसोबत त्याने घरोबासुद्धा केला. हे सगळं सरिताच्या कानावर उडत- उडत आले. तिला त्याला विरोध करण्याची जराही इच्छा नव्हती. त्याच्यासोबत सुखी - समाधानी संसार करण्याची तिची भाबडी आशा कधीच मावळली होती. मुलांना मात्र भेटायला विकास नेहमी यायचा. त्यांच्यावर माया करायचा. त्यांच्या नावाने पैसे पाठवायचा. विकास आणि मुलांच्या मायेच्या आड यायचे नाही हे तिने ठरवले होते. तिचे आणि विकासचे नाते कधीच संपले होते. फक्त कायद्याने ते संपवणे एवढेच बाकी राहिले होते. ती वेळ सुद्धा कधीतरी येणारच होती.
-------------------------- XXX----------------------
खाजगी हॉस्पिटल असल्याने सरिताला पगार तसा कमीच होता. घरखर्चाला हातभार लागावा म्हणून ती एखाद्या अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांची सेवा करण्यास त्या रुग्णाच्या घरी जात असे. त्या कामाचे तिला वेगळे पैसे मिळत. त्यासाठी ती सकाळी लवकरची गाडी पकडत असे. आजही ती नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या कर्तव्यावर निघाली. पण आज तिला जरा बरं वाटत नव्हतं. प्रतिकचे घर सोडून जाणे, प्रियाचे चुकीच्या मार्गावर पडलेले पाऊल आणि अयशस्वी लग्न , सासू-नणंदेने तिला दिलेली दूषणे यामुळे ती मानसिकरीत्या खचली होती. तिला रात्री झोप लागत नव्हती. आज तिला त्या अंथरुणावर असलेल्या रुग्णाची सेवा करताना, त्याच्या शरीराच्या जखमा साफ करताना पोटात मळमळू लागले. रुग्णसेवा हे व्रत घेतलेल्या सरिताला आज भडभडून उलटी झाली.
"पैसा लेती वखते सारू लागे छे ...अने काम करती वखते गंदू लागे छे" ! खाटेवरच्या रुग्णाच्या सुनेचे अस्पष्ट बोल तिच्या कानावर पडले. सरिता जराशी वरमली.
किती संवेदनाहीन स्त्री आहे. आपल्या खाटेवर पडलेल्या, वेदनेत तळमळणार्या सासूकडे साधं ढुंकूनही पाहत नाही. मी रोज इथे येते... एक कप चहा तर दूर पण साधे पाणी विचारण्याची माणुसकी नाही बाईला. नर्स असली तरी एक माणूस नाही का मी? मला भावना नाहीत का? स्वतःच्या माणसाच्या वेदना समजत नाहीत हिला.. माझ्या मनातल्या भावना कश्या समजणार? ..सरिताला मनोमन त्या स्त्रीचा प्रचंड राग आला. आज कसंबसं त्या रुग्णाची सेवा करून तिने हॉस्पिटल गाठले. आज हॉस्पीटलमधले वातावरण जरा जास्तच धीरगंभीर जाणवत होते. वेदनेने तळमळणारे रुग्ण , त्यांच्यासोबत असणारे चिंताग्रस्त चेहर्याचे नातेवाईक, औषधांचा वास हे सारं तिच्या रोजचे अंगवळणी पडलेले. पण आजचे वातावरण जरा जास्तच उदासीन झालेले. तिने चौकशी केली तर पहाटे बाजूच्या झोपडपट्टीमधली एक बलात्कार झालेली केस तिथे आली होती. पोलीस केस असल्याने आणि पिडितेची प्रकृती गंभीर असल्याने तिला मोठ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये हलवण्याची तयारी चालली होती . सरिताने अधिक चौकशी केल्यावर पिडीता उमलत्या वयातली एक निष्पाप चिमुरडी होती. बाजूने स्ट्रेचरवरून नेत असताना बेशुद्ध अवस्थेत असणारी पिडिता, तिची हमसून हमसून रडणारी आई आणि अतिशय दुःख ,संताप , हतबलता या सार्या भावनांचे मिश्रण चेहर्यावर असणारा तिचा पिता ..हे दृश्य पाहून सरिताला गलबलून आले. ती हॉस्पिटलमध्ये कर्तव्यावर आहे हे विसरून गेली. तिच्या संवेदनशील मनाला ते दृश्य चटका लावून गेले. ती बाकावर बसली. तिच्या डोळ्यांना अश्रूधारा लागल्या.
" सरिता सिस्टर ,तुम्हाला बरं वाटत नाहीये का? औषध देऊ का तुम्हाला ? " तिच्या सहकारी नर्सने सरिताची अवस्था पाहून विचारपूस केली.
" नको!" सरिता उठली. आज तिने रजा टाकली. तिला त्या निष्पाप चिमुरडीवर गुदरलेल्या प्रसंगाने आणि तिच्या आई-वडिलांच्या दुःखासमोर आपले दुःख हलके वाटू लागले. दुनियेत किती प्रकारच्या विकृती असलेली माणसे आहेत ह्या विचाराने ती सुन्न झाली. सरिता शारीरिक आणि मानसिक थकव्याने पूर्णपणे थकली. मनातल्या भावना कुणाकडे तरी व्यक्त करायलाच हव्यात असं तिला प्रकर्षाने वाटू लागले. पण कुणाकडे व्यक्त व्हावं? दुसरं कोण असणार? माई आणि आबानंतर जर माझं दुःख , माझ्या भावना समजून घेणारे, मला योग्य मार्गदर्शन करणारे कोण असेल तर ती 'मीनल'. माझी सखी... माझी हितचिंतक ... !! सरिताने मीनलचा नंबर डायल केला.
----------------------- XXX---------------------
"तर मैत्रिणींनो, आपल्या महिला बचत गटाची अध्यक्ष आणि तुम्हां सर्वांची एक मैत्रीण ह्या नात्याने मला तुम्हां सगळ्यांना सांगण्यास अतिशय आनंद होतोय की, आपल्या महिला बचत गटाला शासनाने मंजूर केलेते अनुदान प्राप्त झाले आहे. तसेच आपल्या गावच्या ग्रामपंचायत कार्यालयातील एक गाळा महिला बचत गटाला ऑफिस थाटण्यासाठी म्हणून आपल्या ग्रामपंचायतीने मंजूर केला आहे !" अतिशय उत्साहाने मीनल महिला बचत गटाच्या सभेत बोलत होती. गावातील स्त्रियांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. तेवढ्यात मीनलचा फोन वाजला.
" सरू, अगं किती दिवसांनी फोन केलास ? बरं ..मी तुला पंधरा मिनिटांनी फोन करते...ठीक आहे ...जरा कामात आहे ... हो ..आठवणीने करते मी फोन...!" मीनलने फोन ठेवला.
' मीनल' सरिताची जिवाभावाची मैत्रीण. तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गावातल्या उमेशचे स्थळ तिला चालून आले. उमेश गुणी मुलगा होता. त्याला नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. मीनल मुळातच हुशार, मेहनती मुलगी होती. तिला समाजसेवेची आवड होती. मुलेबाळे जरा मोठी झाल्यावर, संसारात स्थिरस्थावर झाल्यावर तिने घरी न बसता गावातील स्त्रिया यात विधवा, परितक्त्या यांचाही समावेश होता. त्यांना एकत्र करून तिने उन्नती महिला बचत गटाची स्थापना केली. सुरुवातीला उटणे, पापड, अगरबत्ती मेणबत्ती बनवणे अशा लहान पण गृहपयोगी वस्तू महिलांना एकत्र करत बनवण्यास सुरुवात केली. गावातील सुरुवातीला लाजणाऱ्या स्त्रिया हळूहळू बचत गटाच्या कामात रूची दाखवू लागल्या. पहिल्यांदा तिने सर्व महिलांना आपल्या कमाईची बचत कशी करावी याचे प्रशिक्षण दिले. तिने सर्व स्रियांना बँकेत खाते उघडायला लावले. मीनलने महिला बचत गटाची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. गाव समुद्रकिनाऱ्याजवळ असल्याने बचत गटामार्फत तिने पर्यटकांसाठी लहानशी खानावळ चालू केली. पर्यटकांच्या आवडीचे विविध पदार्थ महिला खानावळीत बनवू लागल्या. पापड, मसाले, लोणचे अशा अनेक गृहोपयोगी वस्तूंची निर्मिती बचत गटामार्फत होऊ लागली. दहा-दहा स्त्रियांचे गट त्यासाठी बनवण्यात आले. एकमेकींनी जबाबदारी वाटून घेतली. गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील लग्नकार्य, समारंभाचे जेवण बनवण्याचे काम ही महिला बचत गटामार्फत महिला घेऊ लागल्या. पुरणपोळ्या, विविध प्रकारची फरसाणे इत्यादी जवळच्या शहरातील हॉटेलमध्ये विक्रीस ठेवण्यात त्यांना यश आले. वस्तूंचा दर्जा आणि किंमत यामुळे मागणी वाढली. गावाच्याजवळच समुद्रकिनारा असल्याने मीनलने वर्षातून दोनदा समुद्रकिनारी खाद्यमहोत्सव आयोजित करण्यास सुरुवात केली. त्यातून आपल्या स्थानिक खाद्यसंस्कृतीची ओळख साऱ्यांना व्हावी , महिलांचा उत्साह वाढावा हे उद्दात हेतू होते. त्याला लोकांचा, पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. मीनल आणि बचत गटांच्या महिलांच्या प्रयत्नांना, मेहनतीला यश येऊ लागले. मीनल एक यशस्वी स्त्री म्हणून पंचक्रोशीत ओळखली जाऊ लागली. तिच्या ह्या यशात उमेशचा खारीचा वाटा होता. ह्या सगळ्या प्रयत्नात उमेश म्हणजे तिच्या नवऱ्याची अतूट साथ होती. एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो असे म्हणतात. पण येथे मीनलच्या बाबतीत अगदी विरुद्ध परिस्थिती होती. नवऱ्याची भक्कम साथ, सासू-सासऱ्यांचा पाठिंबा आणि स्वतःची जिद्द, मेहनत ह्या सगळ्या गोष्टींमुळे मीनलला कधीही मागे वळून पहावे लागले नाही.
फोनवर सरिताचा जड झालेला आवाज ऐकून मीनलला काळजी वाटली. सरिताने भावूक होत मीनलला घडलेलं सारं काही सांगितलं. पुढच्या आठवड्यात मीनलला कामानिमित्त शहरात जावे लागणार होते. तेव्हा तुझी भेट घेते असं सांगत एकमेकींनी फोन ठेवला.
----------------------- XXX-------------------
दरवाजाची बेल वाजली. दारात मीनलला पाहून सरिताला अतिशय आनंद झाला. एकमेकींची ख्यालीखुशाली विचारून झाली.
"सरू, तुला एक सुचवू का ? आमच्या महिला गटात एक काकू आहेत. त्यांचा एक भाचा आहे. गेल्यावर्षी त्याची पत्नी बाळंतपणातल्या गुंतागुंतीमुळे अचानक वारली. लहान मुलगी आहे त्याला. मला असं वाटते की , प्रियाच्या पुढच्या भविष्याचा विचार करून आपण दोघांची भेट घडवून आणली तर? मुलगा चांगला आहे. प्रियाची तो काळजी नक्कीच घेईन. मी ओळखते त्याला. विचार कर. निर्णय प्रियावर सोपव!"
"मी प्रियाशी बोलते या विषयावर... तिच्या पुढील आयुष्याचा विचार करायलाच हवा गं! " सरिता उत्तरली.
मीनलने सरिताला आपल्या महिला बचत गटाच्या कार्याची संपूर्ण माहिती दिली.
" रवी येतो का गं गावी ?" अचानक सरिताने मीनलला प्रश्न केला.
" हो ! येतो अधून मधून.आता मोठा सरकारी साहेब झालायं रवीदादा. त्याची खूप मदत झालीयं आमच्या बचत गटाला. खूप मार्गदर्शन करतो आम्हांला!" मीनल चुलत भावाचे कौतुक करत म्हणाली.
"माझ्याबद्दल काही विचारतो का गं कधी?" ओठावर आलेले शब्द सरिताने निग्रहाने पोटात गिळले. रवीच्या आठवणीने सरिता हळवी झाली.
" सरु, तुला अजून एक सुचवू का ?"
"हे काय विचारणं झालं मीनू? सांग ना!"
" मला असं वाटते सरु, तू ही धावपळीची नोकरी सोडून गावी परत यावे. तुझे घर मी व्यवस्थित करून घेते. ते जरी तुझे घर असले तरी मी माई - आबांना परकं कधी मानलचं नाही. ते दोघे गेल्यावर तू माहेरी यायचं पूर्णपणे बंद केलं. पण मी माईंच्या झाडांची, घराची काळजी घेतली आहे सरु!" मीनलच्या बोलण्यात मायेचा ओलावा ओथंबून वाहत होता.
"तू नर्स आहेस. आपल्या गावातल्या लोकांना रात्री-अपरात्री आजारी पडल्यावर जवळच्या शहरात धाव घ्यावी लागते. तुझ्या नर्सिंगचा अनुभव त्यांच्या कामी येईल. तुझी वडिलोपार्जित जमीन आहे त्या जमीनीकडेसुद्धा तुला लक्ष देता येईल. हे घर तुझ्या नावाने आहे ना? ते भाड्याने दे. तुला जे भाड्याचे पैसे मिळतील ते तुला कामी येतील. अजून एक महत्वाचे म्हणजे, तू जर आमच्या महिला बचत गटाच्या कार्यात सामील झालीस तर मला आनंदच होईल. आपण दोघी एकमेकींच्या सहाय्याने महिला गटाच्या यशात भर घालू. तुझे मन तिथे रमेल. तुला आनंद, समाधान सारं काही मिळेल. दुःखद भूतकाळ विसरायचा प्रयत्न कर सरू..!! आजचा वर्तमान आणि उद्याच्या भविष्यकाळात आपला आनंद शोधून बघ!! बघ... विचार कर!"
माई - आबानंतर सरिताला ' मीनल' हा एकमेव प्रेमाचा मायेचा आधार वाटत होता. मीनल नेहमीच आपल्या भल्याचा विचार करेल याची पूर्ण खात्री तिला होती.
" मीनू, तुझ्या म्हणण्याचा मी नक्कीच विचार करेन!" सरिताच्या शब्दांत विश्वास भरलेला.
मीनलच्या मध्यस्थीने प्रियाचे लग्न झाले. सरिताच्या खांद्यावरची एक जबाबदारी कमी झाली. प्रतिक त्याच्या विश्वात रमला होता. प्रतिक जरी माझ्या हाडामासांचा अंश असला तरी त्याचे विचार, त्याचे अस्तित्व पूर्णपणे वेगळे आहे. त्याच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा त्याला पूर्ण हक्क आहे. अशी पक्की समजूत सरिताने तिच्यामधल्या आईची घातली. तिने नोकरीचा राजीनामा दिला. घर भाड्याने दिले आणि वकिलामार्फत विकासला घटस्फोटाची नोटीस पाठवली. जे नाजूक नाते कधी बहरलेचं नाही त्या नात्याला तिने उशिरा का होईना पण कायद्याने तिलांजली देण्याचे ठरविले. आपले सगळे सामान भरले आणि गावाकडची वाट धरली. गाडीने स्टेशन सोडले. खिडकीत बसलेली सरिता भविष्यातल्या पुढच्या वाटचालीविषयी सकारात्मकतेने विचार करण्यात गुंग झाली.
------------------------- XXX-----------------------
रिक्षा दारात थांबली. माई- आबांचे ' घरकुल' . सरिता आपल्या माई - आबांच्या मायेने, आपुलकीने वसवलेल्या घरकुलाजवळ आली. अंगणातली सगळी फुलझाडे, फळझाडे फुला - फळांनी बहरलेली होती. त्या झाडांच्या पानांमध्ये एक अनामिक चैतन्य सळसळत होते. ती झाडे जणू इतकी वर्षे वाट पाहत होती... सरिताची ..! माई - आबा गेल्यानंतर मीनलने सगळ्या झाडांची चांगलीच काळजी घेतली होती. सरिताने बॅग खाली ठेवली. ती धावत घरामागच्या अंगणात आली. तिची नजर वेध घेऊ लागली. आणि तिला जे हवं होते ते तिच्या दृष्टीस पडले. 'मोगर्याचे झाड '...तेच मोगर्याचे झाड ... माईने लावलेले झाड......कळ्यांनी.... पांढऱ्याशुभ्र फुलांनी बहरलेले... त्यांचा तो स्वर्गीय सुवास आसमंतात पसरलेला.... ती बराच वेळ मोगऱ्याच्या झाडाजवळ बसून राहिली. मोगऱ्याच्या पानावरुन , फुलांवरून मायेने हात फिरवू लागली. त्या फुलांचा सुवास श्वासभरून आपल्या उरात साठवू लागली. त्या फुलांच्या, पानांच्या स्पर्शाने ती माईला , तिच्या स्पर्शाला जाणवू पहात होती. त्या स्पर्शात माईचे प्रेम ओथंबतेयं ही भावना तिला सुखकारक वाटू लागली. तिच्या मनात आता आपल्या भूतकाळाबद्दल, विकासबद्दल, प्रतिकबद्दल कसलेही किल्मिष नव्हते. अश्रूवाटे ते सारं काही वाहून गेले होते. सरिताच्या डोळ्यांत अश्रू तरळले. पण ते अश्रू दुःखाचे नाहीतर आनंदाचे होते. आयुष्यातल्या एका टप्प्यावर , आपला संघर्षमय भूतकाळ विसरून पुढील भविष्यातल्या सोनेरी वाटचालीसाठी मनातल्या भावनांनी घेतलेला अश्रूंचा आश्रय होता तो...! आणि तिथे घरात फोटोमधल्या माई-आबांच्या चेहऱ्यावर एक चैतन्यमय स्मित पसरले होते ......समाधानाचे!!
समाप्त!!
धन्यवाद. !!
रुपाली विशे- पाटील
----------------------- XXX-----------------------
टिप - सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील नावे आणि घटना यांच्याशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजण्यात यावा. तसेच कथेत एका स्त्रीचे भावविश्व, तिच्या आयुष्यातील नातेसंबंध, त्यातील भावनिक चढ-उतार , तिचे संघर्षमय जीवन रेखाटण्याचा प्रयत्न असून कथेद्वारे कुणाच्याही भावना दुखावण्याचा कथालेखिकेचा उद्देश नाही.
------------------------- XXX-------------------------
छान कथा, वेगळी.
छान कथा, वेगळी.
सुखांत आवडला कथेचा. लिहीत रहा
सुखांत आवडला कथेचा. लिहीत रहा .
सुंदर!!
सुंदर!!
कथा आवडली.
कथा आवडली.
छान, आवडली. सकारात्मक शेवट पण
छान, आवडली. सकारात्मक शेवट पण फिल्मी नाही हे आवडलं.
छान!
छान!
छान लिहिली कथा. आवडली.
छान लिहिली कथा. आवडली.
मानवजी, जाई, अज्ञातवासी,
मानवजी, जाई, अज्ञातवासी, अस्मिता, वर्णिता, सांज, DJ...
तुम्हां सर्वांचे मनपूर्वक आभार ... कथा आवडल्याबद्दल!!
छान. सकारात्मक शेवट.
छान. सकारात्मक शेवट.
धन्यवाद वीरुजी...
धन्यवाद वीरुजी...
तुमच्या नेहमीच्या प्रोत्साहनपर प्रतिसादासाठी!!
छान कथा!
छान कथा!
छानच जमली आहे..आवडली.
छानच जमली आहे..आवडली.
कथा आवडल्याबद्दल मनापासून
कथा आवडल्याबद्दल मनापासून आभार मृणाली आणि सनव...
खूप छान झालीये कथा. आवडली.
खूप छान झालीये कथा. आवडली.
प्रतिकचे घर सोडून जाणे, प्रियाचे चुकीच्या मार्गावर पडलेले पाऊल आणि अयशस्वी लग्न , सासू-नणंदेने तिला दिलेली दूषणे यामुळे ती मानसिकरीत्या खचली होती. तिला रात्री झोप लागत नव्हती. आज तिला त्या अंथरुणावर असलेल्या रुग्णाची सेवा करताना, त्याच्या शरीराच्या जखमा साफ करताना पोटात मळमळू लागले. ,>>>>>>>>>
माझ्याबद्दल काही विचारतो का गं कधी?" ओठावर आलेले शब्द सरिताने निग्रहाने पोटात गिळले>>>>>>> या प्रसंगांना गलबलून आले अगदी. वाईट वाटले. लिहीत रहा. पुलेशु.
भाग्यश्री....!!
भाग्यश्री....!!
कथा आवडल्याबद्दल आणि शुभेच्छांसाठी मनपूर्वक आभार...
नेहमीप्रमाणे छान कथा....
नेहमीप्रमाणे छान कथा....
धन्यवाद लावण्या, तुझ्या
धन्यवाद लावण्या, तुझ्या नेहमीच्या प्रतिसादासाठी!!
छान, आवडली.
छान, आवडली.
अतीशय सुंदर लिहीलीय, आवडली.
अतीशय सुंदर लिहीलीय, आवडली.
@king_of_net
@king_of_net
@ रश्मीजी
कथा आवडल्याबद्दल खूप आभार तुमचे!!
खूप छान कथा...! आवडली...
खूप छान कथा...!
आवडली...
प्रचंड खाचखळगे आणि जीवघेण्या
प्रचंड खाचखळगे आणि जीवघेण्या धक्क्या-गचक्यातुन अखेर एक निष्पाप जीवन मार्गी लागले.
हिम्मत आणि जिद्द यांना सलाम !!