दिवाळी चार दिवसावर आली तशी आयाबायांची लगबग सुरु झाली. भांडी घासुन घासुन आरशागत चकचकीत केली जात होती, अडगळीतल्या वस्तु पुसुन पुन्हा त्याच जागी ठेवल्या जाऊ लागल्या, त्या आता पुढच्या दिवाळीलाच पुन्हा बाहेर येणार होत्या. मनाने कधीच माहेरला पोहचलेल्या सासुरवाशिनींचं सगळं लक्ष आता मुऱ्हाळी कधी येतो याकडेच लागुन होतं तर सासवांना सुनबाई माहेरला जाण्याआधी दिवाळीची सगळी कामं कशी होतील याची काळजी लागुन राहिली होती.. त्यांची लेक दिवाळीला येईल तेव्हा सगळं टापटीप नको का असायला? गडीमाणसंपण दिवाळी आहे म्हणुन आपल्यापरीने कामाला हातभार लावत होती. कोणी दरवाजे खिडक्या रंगवत होतं तर कोणी शहरातुन भाचरं घरी येतील, त्यांना खेळायला, भाचाबाईला रांगोळी काढायला म्हणुन अंगण तयार करत होते. माळ्यावरुन आकाशकंदील बाहेर काढले जात होते. कोणी आतापासुनच शहरातुन आणलेली चायना लायटींग चमकवत होतं..
चार दिवस बायको माहेरी जाईल म्हणुन कासावीस झालेले काही जीव 'यंदा आपल्या गावची दिवाळी बघच तु कशी जोरदार असते ते.' असं म्हणुन आपल्या बायकांची समजुत काढत होते.
सगळ्या गावात अशी लगबग सुरु असतांना संतोष मात्र पडवीत पायाच्या अंगठ्याने माती उकरत बसला होता. "दिवाळी तोंडावर आलीया आन तु कशापायी तोंड लटकवुन बसलाहेस बाबा. दारापुढे आकाशकंदील तरी लाव." संतोषचं दुखणं माहित असुनही त्याच्या आईनं विचारलं. आईच्या या प्रश्नाला संतोषने काहीच उत्तर दिलं नाही.
तीस वर्षाचा संतोष लग्नाचं वय उलटुन चाललं तरी कुठे सोयरीक जुळत नसल्याने खंतावला होता. बरोबरीच्या पोरांचे पोरं गल्लीत दुडुदुडु धावतांना पाहुन त्याला भलतीच लाज वाटायची. 'साल्ला काय नशिब आहे आपलं. एक बायको मिळत न्हाई.' एकटाच असायचा तेव्हा तो स्वत:लाच कोसत बसायचा.
आज दिवाळसणाला त्याच्या मनात तेच विचार घोळत होते. 'आज आपलं लग्न झालं असतं, तर आपणही बायकोला माहेरला जाऊ नको म्हणुन विनवलं असतं. लेकरांबरोबर फटाकडे फोडले असते. बायकोला आणायला सासुरवाडीला गेल्यावर 'या पावणे, बसा पावणे करत' आपला कसा पाहुणचार झाला असता' याबद्दल स्वप्न रंगवत असतांनाच आई त्याला आकाशकंदील टांगायला सांगत होती.
"आरं तेवढा आकाशकंदील तरी टांग. दिवाळीचा कशापायी राग धरतोस? तुला पण हळद लागेल. काई दम धीर हाये का न्हाई? तुझं बाशिंगबळ जड हाये त्याला कोण काय करणार" आईची सुरु झालेली बडबड आता सांगितलेलं काम केल्यावरच थांबेल हे माहित असल्याने त्याने मुकाट्याने आकाशकंदील लावायला घेतला.
"हाये का कुणी घरात" गावातल्या बाबुमामाने पायऱ्या चढतानाच हाक मारली. "या मामा, बऱ्याच दिवसांनी येणं केलं" संतोषने आकाशकंदील टांगतांनाच विचारलं.
"आरे वा वा! दिवाळीची तयारी चालली वाटतं. काय लगीनबीगीन ठरलं का काय तुझं?" बाबुमामाने खवचटपणे विचारलं. हा बाबुमामा म्हणजे सगळ्या गावाचाच मामा होता. दोन चार वर्षापुर्वी कुठल्यातरी सरकारी खात्यातुन हेडक्लार्क म्हणुन रिटायर झाला होता. सरकारी नोकरी म्हणुन ओळखीपाळखी दांडग्या, नोकरी निमित्ताने बारा गावचं पाणी पिल्याने भलताच बेरकी आणि खवचट स्वभाव. दर महिन्याला पेन्शन भेटायचे म्हणुन दुसरा उद्योग करायची गरज नव्हती. पोरंपोरी आपआपल्या संसारात रमल्यामुळे जास्त काही जबाबदाऱ्या नव्हत्या. मग गावच्या सगळ्या समस्यांचा भार आपल्या खांद्यावर असल्यासारखं वागणं, घडणारी गोष्ट बिघडवण्यात पटाईत त्यामुळे त्याच्या वाट्याला कोणी जायचे नाही.
"नाही हो मामा. आणि जमलंच लग्न तर तुमाला समजेलच की." संतोष ओशाळल्यागत हसत म्हणाला.
"म्हणुनच तर आलो होतो मी. तुझ्यासाठी चांगल स्थळ आणलंय. सोन्यासारखी मुलगी आहे. त्यांना तुझ्यासारखा दुकानदार मुलगा चालणार आहे. फक्त देण्याघेण्याच्या अपेक्षा ठेवु नका." बाबुमामाने एका दमात माहिती दिली. झालं.. बाबुमामाच्या या एका वाक्यानंतर संतोषसाठी तो जगातला सगळ्यात प्रिय व्यक्ती ठरला. बाबुमामाने सांगितलेल्या त्या सोन्यासारख्या मुलीबरोबर आपण आपल्या छोट्याशा दुकानात वाणसामानाच्या पुड्या बांधतो आहोत, हळूच चोरून तिच्याकडे बघतो आहोत, ती आपल्या वेणीशी चाळा करत गालातल्या गालात हसत लाजून खाली बघते आणि आपल्या नाजूक हातांनी एखादी कलाकुसर केल्यागत पुडी बांधते आहे असे भास संतोषला व्हायला लागले.
"मंग कसला इचार करतोस तु? मनात काय आसंल ते लवकर सांग म्हणजे आपल्याला पुढची बोलणी करायला बरं. तुला मुलगी पसंत पडली तर यंदा तुळशीचे लग्न झाल्यावर बार उडवून टाकू." बाबूमामाने संतोषला स्वप्नातुन जमिनीवर आणलं.
"माझ्या पसंतीचं काय घेऊन बसले मामा, मी तयारच आहे तुम्ही पुढची बोलणी करा लवकर" संतोषला घाई झाली होती.
"काय करावं बया या पोराला. तुला काय रीतभात हाये का न्हाई. जेव्हा पहावं तेव्हा बाशिंग बांधुन बसतो. ते काई न्हाई मामा. पोरीच्या बापाला सांगा आदुगर आमंत्रण द्यायला. मंग पुढचं पुढं बगु. ती पोर सोन्यासारखी आसंल तर माझं लेकरुबी हिरा हाये म्हणावं"
सकाळ संध्याकाळ आपल्या नावाने ओरडणाऱ्या आईला आपण हिरा कधीपासुन वाटायला लागलो हे न समजुन संतोषच्या तोंडातुन फक्त "आये.." एव्हडाच शब्द बाहेर पडला.
"बघा बुवा, तुमची मर्जी. तुमचा निरोप पोचवतो मी." बाबुमामाने निघतांना सांगितलं.
"कायतरी मार्ग काढा मामा. तुमी ठरवलं तर समदं हुईल." हात जोडत कळकळीने संतोष म्हणाला.
दिवाळीचे चार दिवस संतोषच्या जीवाला थारा नव्हता. पावणे आमंत्रण द्यायला येतील म्हणुन त्याने घर लखलखीत करुन ठेवलं होतं. कोणाला तरी सांगुन शहरातुन लायटींगची माळ मागवुन ती खिडकीला टांगली होती. लायटींग चमकायला लागली की लुकलुकणाऱ्या प्रत्येक दिव्यात त्याला ती सोन्यासारखी मुलगी दिसायला लागायची..
दिवाळी संपली, भाऊबीज करुन बहिणी सासरी निघाल्या तरी कोणी आमंत्रण द्यायला आलंच नाही तेव्हा संतोष मनातुन कावराबावरा व्हायला लागला. गल्लीत कोणाची फटफटी वाजली तरी याचे कान टवकारायचे. गेले चार दिवस तो वडीलांनाच दुकानावर पाठवत होता. ना जाणो मुलीचे वडील आले आणि त्यांचा नीट पाहुणचार नाही झाला तर. इकडे बाबुमामाही त्याच्या मुलाकडे दिवाळीसाठी जाऊन बसला होता, त्यामुळे तिकडचा काही निरोप समजत नव्हता. संतोषच्या जीवाची सारखी घालमेल चालली होती.
एक दिवस असाच घरात बसलेला असतांना "संतोषशेठ इथेच राहतात का" असं गल्लीत कोणीतरी विचारत होतं.
'संतोषशेठ!' आपल्या नावापुढे शेठ लागलेलं वाहुन संतोष हुरळुन गेला. जणु कानावरुन कोणी मोरपीस फिरवत आहे असं वाटायला लागलं त्याला.
"नमस्कार, येऊ का आत. बाबुसरांनी आपला पत्ता दिला होता." एक पांढरेशुभ्र कपडे घातलेले पन्नाशीचे गृहस्थ दरवाज्याबाहेर उभे होते. मुलीचे वडील होते ते. व्यवसायाने शिक्षक अन् आता आपल्या सुशिक्षित मुलीसाठी सुयोग्य वर शोधत होते.
" संतु जरा तुझ्या आण्णांना पाठीव रे दुकानातुन, तु थांब तिथे" बोलणं पुढे सरकण्याआधीच आईने संतोषला टोकलं आणि पाहुण्यांकडे वळुन "गर्दी मावत नाही हो दुकानात, काय करणार" असं हसत म्हणाली.
आईचं बोलणं ऐकुण संतोष वैतागला 'दिवसभरात दहा गिऱ्हायकं आली तरी संध्याकाळी मारोतीला खडीसाखर ठेवतो मी. आणि ही म्हणते गर्दी मावत नाही. खोटं तरी किती बोलावं मानसानं.'
इतक्यात वडीलच दुकानाला टाळं लावुन घरी आले.
"मुलगी बीएस्सी झालीये. पुढे शिकायच म्हणते आहे. पण म्हटलं चांगलं स्थळ मिळालं तर बघु. लवकर एखादा चांगला दिवस पाहुन या मुलीला बघायला." हात जोडत मुलीचे वडील म्हणाले.
"बघतो. कसं जमतं ते. आमच्या मुलीला, जावायबापुंनापण सांगावं लागेल. त्यांची सवड पाहुन येतो आमी." संतोषची आई नवऱ्याकडे बघत शांतपणे म्हणाली आणि नवऱ्यानेही काही न बोलता मुंडी हलवली.
"ठीक आहे. कळवा मग कधी येता ते" असं म्हणत मुलीच्या वडीलांनी निरोप घेतला.
मी येतो पाहुण्यांना सोडून असं म्हणत संतोषने घाईघाईने पायात चप्पल घातली आणि तो पाहुण्यांना बस स्टँडवर सोडायला निघाला. इतक्यात समोरून गावातला रवी मोटरसायकलवरून वरून येताना दिसला. रवी संतोषपेक्षा दोन-तीन वर्षांनी लहान, शहरात एका कंपनीत नोकरी करत होता. संतोषने त्याला थांबवलं आणि पाहुण्यांना स्टँडवर सोडायला सांगितलं.
दिवसामागून दिवस चालले होते पण मुलगी बघायला जायला काही मुहूर्त लागत नव्हता. त्या मुलीचं दुसरीकडे जमलं तर नसेल या विचारानेच संतोषला भाकर गोड लागत नव्हती. रात्री झोपल्यावर, ती दुसऱ्याच्या अंगणात सडा घालते आहे, दुसऱ्या कोणाबरोबर तरी आपल्या दुकानात खरेदी करायला येते आहे अशी भलतीसलती स्वप्न त्याला पडायला लागली.
एक दिवस दुकानात बसला असताना त्या मुलीचे वडील पाहुन न पाहिल्यासारखं करुन लगबगीने जाताना दिसले. संतोषला आश्चर्य वाटलं पण असतील आपल्या कामाच्या गडबडीत म्हणून तो गप्प बसला. आजकाल रव्यादेखील सारखा फोनवरच असायचा. याबद्दल एकाला विचारलं तर "तुला कशाला पायजे रे पंचायती.जमलं आसल कुठं." असं म्हणत त्याने उलट संतोषलाच खडसावले. पुन्हा एका दिवशी मुलीच्या वडीलांना रवीच्या मागे मोटरसायकलवर जाताना पाहून संतोषला काही सुचेनासे झाले. त्याच दिवशी संध्याकाळी "हाये का कोणी घरात" असा आवाज देत बाबूमामा आला. "आरे काय चालवलय तुम्ही लोकांनी? चांगलं स्थळ सुचवलं तर तुम्हीच घोड्यावर जावुन बसले. आणि त्या रव्याची कशाला ओळख करुन दिली पोरीच्या बापाशी. चौकशी करुन तो घरी घेऊन गेला त्यांना. दोन दिवसात सगळी पसंती झाली. रव्याच्या बहिणींनी तर मोबाईलवर फोटो पाहुनच सांगुन टाकलं त्यांना वैनी पसंत आहे म्हणुन. बाकी देणंघेणं, मानपान काही नाही. पुढच्या हप्त्यात साधेपणाने साखरपुड्यातच लग्न लावणार आहेत. उलट मुलीची इच्छा हाये म्हणुन रव्या शिकवणार आहे तिला." बाबुमामाने पाणी पित सगळी वार्ता सांगितली आणि पेल्यात उरलेलं पाणी अंगणात टाकुन दिलं, त्या पाण्याबरोबरच आपली स्वप्ने विखुरली जात आहेत असा भास संतोषला झाला..
लग्न
Submitted by वीरु on 21 November, 2020 - 04:20
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बिचारा संतोष...
बिचारा संतोष...
सोन्यासारख्या मुलीबरोबर लवकर लग्न ठरावे म्हणून संतोष ला खूप खूप शुभेच्छा
छान लिहिले आहे...
लग्नाळू तरुणाचं चित्र हुबेहुब
लग्नाळू तरुणाचं चित्र हुबेहुब उभं केलयं कथेत..
छान लिहलयं ...आवडली कथा!
ओह.पुढच्या वेळी बापाला स्वतःच
ओह.पुढच्या वेळी बापाला स्वतःच सोडायला जाईल तो.
जाम आवडली कथा. गावचं वातावरण,
जाम आवडली कथा. गावचं वातावरण, लोकांच्या त-हा, स्वभावाचे नमुने, तेथील अडचणी आणि यासर्वांत लग्नाळू मुलाचं भावविश्व! हे सर्व छोट्या कथेतही अचूक शब्दांत परिणामकारक मांडलंय.
अरेरे...बिचारा संतोष.
अरेरे...बिचारा संतोष.
छान कथा !
छान कथा !
अरेरे!
अरेरे!
आता बाबुमामाने स्थळ सुचवल्यावर त्या मुलीशी लग्नच करून घरी सांगावे संतोष ने.
अशी खूप उदाहरणे पाहिली आहेत.
अशी खूप उदाहरणे पाहिली आहेत. आधी खूप भाव खातात आणि नंतर वय जास्त झाले की कोणी भाव देत नाही. .
छान मांडले आहे कथेमध्ये.
छान गोष्ट. खरच घडत असेल असं
छान गोष्ट. खरच घडत असेल असं
वीरु पाजी नेहमी प्रमाणेच छोटी
वीरु पाजी नेहमी प्रमाणेच छोटी आणि मस्तच
मृणालीजी, रुपालीजी धन्यवाद.
मृणालीजी, रुपालीजी धन्यवाद. आपले प्रतिसाद नेहमी प्रोत्साहन देतात.
---
<<ओह.पुढच्या वेळी बापाला स्वतःच सोडायला जाईल तो.>> अनुजी तुमचा प्रतिसाद वाचुन अजुनही हसतो आहे.
---
<<हे सर्व छोट्या कथेतही अचूक शब्दांत परिणामकारक मांडलंय.
Submitted by Cuty>> सविस्तर प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद.
---
चिन्मयीजी, आबासाहेब धन्यवाद.
---
<<आता बाबुमामाने स्थळ सुचवल्यावर त्या मुलीशी लग्नच करून घरी सांगावे संतोष ने.
Submitted by मी_गार्गी >> चांगला उपाय सुचवला तुम्ही.
---
छान मांडले आहे कथेमध्ये.
Submitted by धनवन्ती >> धन्यवाद. खुप जण अवास्तव अपेक्षा बाळगुन असतात आणि नंतर पश्चाताप करतात.
---
<<छान गोष्ट. खरच घडत असेल असं
Submitted by Sparkle>> धन्यवाद.
अहो यापेक्षा भन्नाट किस्से घडतात लग्न जमतांना.
---
धन्यवाद श्रध्दाजी.
मस्त आहे गोष्ट आणि लेखनशैली
मस्त आहे गोष्ट आणि लेखनशैली सुरेख आहे.
बिचारा संतोष..आईच्या हेकेखोर वागण्याचा फटका बसतोय. अशी उदाहरणं पाहिली आहेत त्यामुळे कनेक्ट झालं.
छान लिहिलीय गोष्ट, वाचताना
छान लिहिलीय गोष्ट, वाचताना डोळ्यासमोर उभं राहिलं सगळं. शहरात नोकरी करणारा आणि छोट्या गावात दुकान चालवणारा व्यावसायिक. त्यात खेड्यात/ गावात मुलींना यायची इच्छाच नसते.
छोटीशी कथा छान साकारली आहे.
छोटीशी कथा छान साकारली आहे. ग्रिप आहे लिखाणाला.
मस्त लिहिली आहे गोष्ट! आवडली.
मस्त लिहिली आहे गोष्ट! आवडली. बिचारा संतोष!
सनवजी, वर्णिताजी, मानवजी,
सनवजी, वर्णिताजी, मानवजी, वावे धन्यवाद.
छान कथा!
छान कथा!
छान कथा!
छान कथा!
Submitted by स्वाती२ >> धन्यवाद.