अज्ञातवासी! - भाग १२ - संशयकल्लोळ!

Submitted by अज्ञातवासी on 17 November, 2020 - 12:18

भाग ११ - https://www.maayboli.com/node/77251

नाशिकमधील एक पब!
"आय एम अ डिस्को डान्सर!"
एक होतकरू व्यक्ती स्टेजवर गाऊन नाचत होती. बाकी कुणालाही त्याच्याशी घेणं देणं नव्हतं...
एक धिप्पाड आणि टकला माणूस सुटबुटात आत आला.
त्याने खिशातून बंदूक काढली, आणि त्या व्यक्तीवर गोळी झाडली...
क्षणार्धात पबमध्ये स्मशानशांतता पसरली.
"भें××× मिथुनची कॉपी मारायची असेल तर मरायला तयार राहायचं!"
त्यानंतर पबमध्ये एकच गदारोळ माजला
...आणि पब पूर्ण रिकामा झाला.
पबमध्ये एकच माणूस उरला... तोच या पबचा मालक होता.
लिओनेल डिसुझा!!!
●●●●●
अस्थी विसर्जित झाल्या, बाकीची विधी झाले.
गोदावरीच्या किनारी अफाट गर्दी जमली होती. गर्दीतून खानसाहेबांनी कसतरी मोक्षला बाहेर काढलं.
"मोक्षसाहेब. तुम्ही गाडीतून पुढे निघा. आम्ही मागून येतो."
मोक्ष गाडीत बसला, गाडी हळूहळू निघाली. रविवार कारंजाला वळसा घालून अशोक स्तंभाकडून गंगापूर रोडला लागल्यावर मात्र तिचा स्पीड वाढला, आणि सिग्नलला ती थांबली.
मोक्ष त्याच्याच विचारात गर्क होता...
....आजकाल ती स्वप्ने जास्तच वाढलीयेत...
'मोक्षा खाली वाक...'
दादासाहेबांचा आवाज त्याच्या कानात घुमला...
... त्याक्षणी गोळ्यांनी त्याच्या गाडीची अक्षरशः चाळण झाली.
इकडे खानाने हे दृश्य बघितल्यावर तो प्रचंड हादरला. गाडीतून उतरून त्याने समोरच्या मोटारसायकलवर गोळीबार सुरू केला.
दोघे जागीच ठार झाले...
खान गाडीकडे धावला. त्याने मोक्षचा दरवाजा उघडला.
काचांच्या थारोळ्यात मोक्ष पडला होता...
रक्ताचा एक थेंबही न सांडता!
ड्रायवरच्या शरीराची मात्र चाळण झाली होती.
"मोक्षसाहेब, बाहेर या..."
मोक्ष जागीच सुन्न होऊन बसला होता. त्याला काहीही सुचत नव्हतं!
खानाने त्याला अक्षरशः गाडीतून बाहेर ओढले व मागच्या गाडीत बसवले.
गाडी सुसाट निघाली.
◆◆◆◆◆
वाड्यात मोक्ष पोहोचला. वाड्यात पाहुण्यांची गर्दी जमली होती.
"काकूंना बोलव..." खानाने एका पोराला पिटाळले.
"बोला खानसाहेब," थोड्याच वेळात काकू घाईघाईने आतून येत म्हणाल्या.
"गोळीबार झालाय काकू." खान म्हणाला.
"काय?" काकूंचा चेहरा कावराबावरा झाला.
"हो. अजून बातमी कुठेही फुटलेली नसेल. पण..."
"बोलू नका खानसाहेब. मोक्षाला खोलीत घेऊन जा. मी येते."
"अप्पाना सांगावं का?"
काकू विचारात पडल्या.
"सांगा. बघा काय प्रतिक्रिया येते ते."
◆◆◆◆◆
मोक्ष खोलीत बसलेला होता. सुन्नपणे.
"देवाची कृपा!" सौदामिनीबाई म्हणाल्या.
"...आणि दादाची पुण्याईसुद्धा!" अप्पा मध्येच म्हणाला.
"खानसाहेब, त्या लोकांना जिवंत पकडता नसतं आलं?" संग्रामने मध्येच प्रश्न केला.
"म्हणजे?" खानसाहेब चमकले.
"म्हणजे त्यांना मारून टाकायची इटकी काय घाई होती?"
"त्यांना मारलं म्हणून गोळीबार थांबला संग्राम, नाहीतर..."
"बरं, आणि तुम्ही यावेळी नेमकी गाडी का बदलली? दुसऱ्या गाडीत का आलात?"
"संग्राम नेमकं म्हणायचं काय आहे तुम्हाला..." खानसाहेबांचा आवाज आता चढला होता.
"पुरे..." काकू ओरडल्याच. "प्रसंग काय, आणि चर्चा काय? बस झालं. मोक्षाला आराम करू द्या. चला खोली रिकामी करा."
सगळे निमूटपणे उठले.
●●●●●
"पिंकी आणि रुपाली, बाहेर जा जरा. आम्हाला तिघांना जरा महत्वाचं बोलायचंय."
"बाहेर काढायला आम्ही लहान राहिलो नाही." पिंकी फणकाऱ्यात म्हणाली, आणि रुपालीसोबत बाहेर निघून गेली.
"संग्राम बसा. सौदामिनीबाई, दार लावा."
"अहो सांगा तरी, काय बोलायचंय?"
"सौदामिनी, दार लाव." अप्पा ओरडले.
सौदामिनीबाईंनी निमूट दार बंद केलं.
खाड!!!!!!
आवाजाने सौदामिनीबाई हादरल्याच.
संग्राम तर वेदनेने प्रचंड कळवळला... त्याचा गाल लालेलाल झाला...
"मूर्ख... मूर्ख आहेस तू... अजून तीन दिवसात तो स्वतःहून गेला असता. तू हल्ला केला? आता कुणाला कुणकुण जरी लागली ना..."
"ओ अप्पा, हल्ला मी केला नाहीये..." संग्राम ओरडला.
"बापाला शिकवू नको. तू नाही तर कोण हल्ला करणार?"
"आई तुझी शपथ. मी हल्ला केला नाही." संग्राम आईकडे जात म्हणाला.
अप्पा थोडा शांत झाला.
"मग एवढी खानाची उलटतपासणी का चालू होती?"
"कारण खान वागलाच तसा अप्पा. बघा ना, गाडी बदलणं, मग नंतर लगेच मारेकऱ्यांना गोळ्या घालून मारणं, तुम्हाला संशयास्पद वाटत नाही?"
"नाही!!!!!"
"का अप्पा, एवढा भरोसा खानावर?"
"हो, कारण खानाला मोक्षला मारायचं असतं ना, तर खानाने आधी मारेकऱ्यांना मारलं असतं...
...आणि नंतर मोक्षला..."
◆◆◆◆◆
पबमध्ये थोड्यावेळाने अजून दोघेजण आले.
विजयसिंग शेखावत आणि गजानन पांडे!
"डिसुझा, पब शांत आज."
"मर्डर झालाय ना, म्हणून! बसा!"
"डिसुझा जिवंत आहे तो."
"पबमधल्या मर्डरची बात करतोय मी." डिसुझाने समोर बोट दाखवला.
शेखावतने कपाळावर हात मारला.
"जाधव, सायखेडकर आणि सिंग ऐकायला तयार नाहीत, म्हटलं तुम्हाला बोलवावं."
"डिसुझा एक सांग मला. यानंतर तुला जे हवं ते बोल." पांडे डिसुझाकडे रोखून बघत म्हणाला.
"बरं. विचार..."
"आजचा हल्ला तू केलाय का?"
"नाही रे, इतकी हिंमत कुठून माझ्यात?"
"मग कुणी केला हल्ला? संग्रामने?" पांडे वैतागून म्हणाला.
"नाही. त्याने हल्ला केला नाही." शेखावत शांतपणे म्हणाला.
"मग कुणी?"
"मी...."
डिसुझा आणि पांडे दोघेही चमकून शेखावतकडे बघतच राहिले...

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप रे..
एकदम थ्रिलर झाला आहे हा भाग...सहीच..

बाबो.... मोक्ष ला मोक्ष द्यायला लयच लोकं मागे लागले हायेत.... ☹️☹️।
लिखाण असेच चालू ठेवा। छान आहे कथेचा गाभा।

I think I've a big appetite... Lol

भारी चालूये कथा... दादा गोदावरी तून बाहेर आलेच नाही का?

धन्यवाद मृणाली. आता थ्रिलरच आहे पुढे. Happy
उनाडटप्पू धन्यवाद
रुपाली धन्यवाद
रोहिनी धन्यवाद. हो शेवटी खुर्चीचा खेळ, दुसरं काय?
शब्दसखी धन्यवाद. हो हा भाग जरासा मोठा लिहिला
पद्म धन्यवाद. आपली वाचनाची भूक भागवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आणि हो, दादासाहेब गोदावरीत बुडून वारले ज्याचा उल्लेख आधीच आलाय...

खतरनाक चालली आहे कथा. . खिळवून ठेवणारी. .
अज्ञातवासी, तुमचे सगळेच लिखाण फारच जबरदस्त आहे.
इथेच कोणीतरी म्हणाले तसे - या कथेच्या पुढच्या भागासाठी मिनिटा-मिनीटाने मायबोली पाहिली जाते.
एक (फुकटचा) सल्ला - तुम्ही सिरियलसाठी कथा- संवाद लेखन सुरू करा. सध्याच्या बावळट, बाळबोध मालिकांतून सगळ्यांची सुटका होईल हो..

@धनवंती - धन्यवाद! मलाही आवडेल लिखाण करायला. कुणी चान्स द्यायला हवा Happy
@मेघा - धन्यवाद
@च्यवनप्राश - धन्यवाद
@लावण्या - धन्यवाद
@आसा - धन्यवाद
@नौटंकी - धन्यवाद
@सुखी१४ - धन्यवाद

थोडी तब्येत बरी नसल्याने काही दिवस गॅप पडला. आज किंवा उद्या पुढचा भाग नक्की पोस्ट करेल!

Back to top