पाककृतींचं पुस्तक कशासाठी वाचायचं?
अर्थात, स्वयंपाक करण्यासाठी!
हे वरवर अगदी सरळ उत्तर वाटत असलं, तरी पाककृतींची पुस्तकं वाचणारे अगदी दर्दी लोक तुम्हांला याव्यतिरिक्त अनेक कारणं सांगतील. असं एक खास पुस्तक नुकतंच पुनःप्रकाशित झालंय. पण हे नुसतं पुनःप्रकाशन नसून त्या पुस्तकाचं 'पुनरुज्जीवन' आहे असं या पुस्तकाला पुन्हा जन्माला घालणाऱ्या मंडळींचं म्हणणं आहे. हे पुस्तक म्हणजे 'सूपशास्त्र'.
'किताबकल्हई' या अतिशय समर्पक नावानं भूषण पानसे, आदित्य पानसे, चिन्मय दामले, मेघना भुस्कुटे, अमोल करंदीकर, आदूबाळ, प्रियांका पोफळीकर आणि सुनीत वडके यांनी हा पुस्तक पुनरुज्जीवनाचा सुंदर उपक्रम सुरू केला आहे. भूषण आणि आदित्य यांनी या उपक्रमाचा आर्थिक भार उचलला आहे. पुनरुज्जीवन म्हणजे नक्की काय? तर १८७५ साली झालेल्या लिखाणात काही महत्त्वाच्या टिपा आणि संदर्भांचं स्पष्टीकरण देऊन त्यात सर्जनात्मक बदल केलेले आहेत. पुस्तकातील मूळ मजकुराला धक्का न लावता हे बदल करण्यात आले आहेत आणि ते अतिशय यशस्वी झाले आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. 'मायमिरर पब्लिशिंग हाऊस'ने हे पुनरुज्जिवित 'सूपशास्त्र' प्रकाशित केले आहे.
रामचंद्र सखाराम गुप्त्यांनी लिहिलेलं आणि रावजी श्रीधर गोंधळेकरांनी प्रकाशित केलेलं 'सूपशात्र' हे मराठी भाषेतील पाककृतींचं पाहिलं छापील पुस्तक आहे. याची पहिली आवृत्ती १८७५मध्ये आणि सातवी, आणि शेवटची आवृत्ती १९२३मध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर वरील उत्साही आणि अभ्यासू लोकांमुळे आज हे पुस्तक पुनःप्रकाशित होते आहे. पुस्तक 'ॲमेझॉन'वर उपलब्ध आहे. मी ते 'ॲमेझॉन'वरूनच मागवले. मुखपृष्ठ आधुनिक असलं तरी त्याचं रूप वाचकाला अगदी पूर्वीच्या काळात घेऊन जाणारं आहे.
पुस्तकाच्या पाठपानावर हे पुस्तक ललित वाङ्मयासारखं वाचावं असं आवर्जून लिहिलं आहे. कारण या पुस्तकातून तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा अंदाज वाचकांना यावा हादेखील या पुस्तकाचा उद्देश आहे. यासाठी चिन्मयनं (चिन्मय दामले) लिहिलेली प्रस्तावना फार महत्त्वाची आहे. तुम्ही जर प्रस्तावना गाळून पुस्तक वाचणाऱ्यांपैकी असाल, तर या पुस्तकाच्या बाबतीत तुम्ही तो नियम मोडायलाच हवा. कारण गोंधळेकरांनी लिहिलेल्या मूळ प्रस्तावनेचं, चिन्मयनं अनेक संदर्भ देऊन विस्तृत स्पष्टीकरण दिलं आहे. हे इतकं मुद्देसूद आणि तरीही माहितीपूर्ण आहे, की ते पुन्हा-पुन्हा वाचावंसं वाटतं. गोंधळेकरांच्या मूळ प्रस्तावनेतल्या ज्या वाक्यांकडे आपण विशेष लक्षही देणार नाही, अशा वाक्यांमधील बारकावेदेखील चिन्मयनं उलगडून दाखवले आहेत. त्याच्या प्रस्तावनेत अगदी पुराणापासून ते अमेरिकन डोमेस्टिक मॅन्युअल्सपर्यंत अनेक संदर्भ सापडतात. यातून त्याची आणि या पुस्तकाशी निगडित इतरांची या विषयाबद्दलची तळमळ दिसून येते. चिन्मयशी मी अनेकदा गप्पा मारल्या असल्यामुळे मला ही प्रस्तावना त्याच्या खास आवाजात वाचण्याचीही संधी मिळाली. आणि त्यामुळे माझ्यासाठी या प्रस्तावनेला अजून थोडं वजन आलं.
हे पुस्तक महत्त्वाचं अशा अर्थी, की पाककृतींचं प्रमाणीकरण करून लिहिलेलं मराठीतलं हे पहिलं पुस्तक आहे. प्रमाणीकरण नसल्यामुळे स्त्रियांचा आणि सूपकारांचा स्वयंपाक कसा कधी खारट, कधी अळणी असा होतो याबद्दल प्रस्तावनेतच गोंधळेकरांनी लिहिले आहे. आणि हे असे होऊ नये म्हणून प्रत्येक पाककृतीमध्ये दिलेल्या प्रमाणात जिन्नस घालण्याचा सल्ला दिला आहे. पाककृतींचं असं प्रमाणीकरण आपल्या सवयीचं असलं, तरी ही त्यामानानं आधुनिक पद्धत आहे. आणि ही प्रमाणं मजेदार आहेत. पुस्तक आल्याआल्या मी उत्साहानं आधी पाककृतींच्या विभागाकडे वळले. तर तिथे ' ५ रुपये भार तूप' असं प्रमाण दिसलं. म्हणून मी चुपचाप पहिल्या पानाकडे वळती झाले. १ रुपया भार, गुंज, तोळा, मासा, शेर अशा प्रमाणांसह या पाककृती लिहिल्या आहेत. पण नव्या पुस्तकाच्या सुरुवातीलाच या सगळ्यांची मेट्रिक पद्धतीच्या आताच्या प्रमाणातली वजनं दिलेली आहेत. आणि एक-एक पाककृती वाचता वाचता माझी ती पाठही झाली.
स्त्री आणि स्वयंपाकघर हा आजही चर्चेचा अगदी लाडका विषय आहे. आजही, फेसबुकसारख्या माध्यमांवरही, या बाबतीत एखादी खळबळजनक पोस्ट पडली की प्रचंड ध्रुवीकरण पाहायला मिळतं. पण दीडशे वर्षांपूर्वी स्त्रिया नुकत्याच लिहायला-वाचायला शिकू लागल्या होत्या. त्या परिस्थितीत पाककृतींची पुस्तकं ही या 'शिकून डोईजड होऊ पाहणाऱ्या' स्त्रियांसाठी वाचायला उत्तम असं साहित्य म्हणून विकली जाऊ लागली. जेणेकरून स्त्रिया त्यांच्या शिक्षणाचा वापर त्यांचा संसार सुखाचा करण्यासाठी करू शकतील. या संदर्भातही नवीन प्रस्तावनेत दिलेली माहिती अतिशय रोचक आहे आणि तिचा घटनाक्रम चिन्मयनं एखाद्या गोष्टीसारखा ओघवता ठेवला आहे. टिळकांची आणि आगरकरांची स्त्री शिक्षणाबद्दलची मतं आणि त्यांचे वेगळे झालेले मार्ग यावरही थोडासा प्रकाश त्याच्या लेखणीतून पडतो. हे पुस्तक ललित वाङ्मयासारखे का वाचले पाहिजे ते या विषयावरच्या त्याच्या टिप्पणीतून लक्षात येते.
पाककृतींची भाषा मजेदार आहे. आणि प्रत्येक पाककृतीखाली दिलेल्या टिपा अतिशय उपयुक्त, तशाच काही काही ठिकाणी पाककृतीइतक्याच खुसखुशीत आहेत. जुने शब्द आणि क्रियापदे वापरण्याचे लालित्यदेखील पुस्तकात गुंतवून ठेवणारे आहे. मला घिवराची पाककृती विशेष आवडली. ती अशा पद्धतीनं लिहिली आहे की वाचताना हे असं का लिहिलं आहे असा प्रश्न पडून तातडीनं घिवर करावेसे वाटतात. भरीत प्रकारातल्या पाककृती वाचताना, त्या काळी प्रेशर कुकर नसल्याने भाज्या अंगच्या पाण्यातच शिजवत असत (भोपळा, घोसावळे वगैरे), हे वाचून मला भरून आलं. कारण मी अनेक वर्षं या भाज्यांमध्ये शिजताना वरून पाणी घालू नये असा प्रचार करते आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पुस्तकात अगदी झुणक्यात किंवा कोल्हापुरी आमटीतसुद्धा लसूण वापरलेला दिसत नाही. या पुस्तकाची शेवटली आवृत्ती १९२३ साली आली असून यात आज आपण वापरतो तसा लसूण कुठेच वापरलेला दिसत नाही, तसाच टोमॅटोही वापरलेला दिसत नाही हे वाचून आश्चर्य वाटलं. कारण लसूण आणि टोमॅटो हे दोन्ही माझ्या स्वयंपाकघरातले अगदी नेहमीच्या वापरातले जिन्नस आहेत.
गोव्यातल्या किंवा पॉंडिचेरीच्या पाककृतींचं एखादं पुस्तक उघडलं, की अनेक फ्रेंच-पोर्तुगीझ शब्दांचे अपभ्रंश वाचायला मिळतात. 'मीन पुयाबेस' (माशाचे सूप) हे फ्रेंच 'bouillabaisse'वरून आल्याचे लक्षात येतं. किंवा गोव्यात माशांना लावण्यात येणारं लाल भडक वाटण 'रेशाद' हे पोर्तुगीझ 'Recheado' या शब्दावरून आलं आहे हे वाचून जशी गंमत वाटते आणि उगीचच खूप विद्वान झाल्यासारखं वाटतं, तसंच या 'पूर्वीच्या काळच्या' पुस्तकात शिरल्यावर वाटतं. आपण काय खातो याकडे बघण्याचे अनेक दृष्टिकोण असू शकतात. पूर्वीच्या काळी अन्न हे शरीर आणि मन चांगलं ठेवण्याचं एक साधन मानलं जायचं. पण भारतावर राज्य करून गेलेल्या लोकांनी त्यांच्या खाद्यसंस्कृतीची छाप आपल्यावर कशी पाडली ते बघण्यासाठी त्या-त्या काळातली पाककृतींची पुस्तकं हा उपयुक्त दस्तऐवज आहे. आपण त्यातल्या पाककृती करून बघण्यासाठी जरी ही पुस्तकं घेत असलो, तरी ती वाचताना आपण या सतत बदलणाऱ्या खाद्यसंस्कृतीचा अभ्यासही करतच असतो.
तुम्हांला तुमच्या खजिन्यात भर घालायची असेल, तर 'सूपशास्त्र' एक असंच संग्राह्य पुस्तक आहे. या बुद्धिमान टोळीला पुढील पुस्तकासाठी शुभेच्छा!
वाह सुरेख ओळख.
वाह सुरेख ओळख.
चिन्मय , मेघना व इतर सर्वांचेच विशेष आभार या उपक्रमाबद्दल.
ईंटरेस्टींग
ईंटरेस्टींग
शोधते हे पुस्तक अमेझॉन वर
सुरेख ओळख.
सुरेख ओळख.
मेघना, चिन्मय, भूषण, आदित्य, आदुबाळ, सुनीत , प्रियांका..
या बुद्धिमान टोळीचे अनेकानेक आभार व पुढील पुस्तकासाठी शुभेच्छा!
ईंटरेस्टींग , छान लिहिलंय
ईंटरेस्टींग , छान लिहिलंय
मस्त पुस्तक परिचय! मागवलं
मस्त पुस्तक परिचय! मागवलं पाहिजे पुस्तक.
छान लेख !
छान लेख !
मस्त माहिती! नक्कीच घेणार आहे
मस्त माहिती! नक्कीच घेणार आहे पुस्तक.
मेघना, चिन्मय, भूषण, आदित्य, आदुबाळ, सुनीत , प्रियांका..
या बुद्धिमान टोळीचे अनेकानेक आभार व पुढील पुस्तकासाठी शुभेच्छा! >>> +१
फार जबरी केला आहे हा उद्योग.
सुरेख ओळख.
सुरेख ओळख.
मला ही प्रस्तावना त्याच्या खास आवाजात वाचण्याचीही संधी मिळाली. >>>>
वाचण्याची की ऐकण्याची
@हर्पेन
@हर्पेन
वाचण्याची.
माझ्या डोक्यातला चिन्मयचां आवाज वापरून वाचलं.
माझ्या डोक्यातला चिन्मयचां
माझ्या डोक्यातला चिन्मयचां आवाज वापरून वाचलं.
ओह ओके
वा! छान ओळख
वा! छान ओळख
बुद्धीमान टोळी - शब्दप्रयोग आवडला.
मस्त ओळख करून दिलीस सई.
मस्त ओळख करून दिलीस सई.
पुस्तकाच्या पाठपानावर हे पुस्तक ललित वाङ्मयासारखं वाचावं असं आवर्जून लिहिलं आहे. कारण या पुस्तकातून तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा अंदाज वाचकांना यावा हादेखील या पुस्तकाचा उद्देश आहे. यासाठी चिन्मयनं (चिन्मय दामले) लिहिलेली प्रस्तावना फार महत्त्वाची आहे. तुम्ही जर प्रस्तावना गाळून पुस्तक वाचणाऱ्यांपैकी असाल, तर या पुस्तकाच्या बाबतीत तुम्ही तो नियम मोडायलाच हवा. कारण गोंधळेकरांनी लिहिलेल्या मूळ प्रस्तावनेचं, चिन्मयनं अनेक संदर्भ देऊन विस्तृत स्पष्टीकरण दिलं आहे. हे इतकं मुद्देसूद आणि तरीही माहितीपूर्ण आहे, की ते पुन्हा-पुन्हा वाचावंसं वाटतं. गोंधळेकरांच्या मूळ प्रस्तावनेतल्या ज्या वाक्यांकडे आपण विशेष लक्षही देणार नाही, अशा वाक्यांमधील बारकावेदेखील चिन्मयनं उलगडून दाखवले आहेत. त्याच्या प्रस्तावनेत अगदी पुराणापासून ते अमेरिकन डोमेस्टिक मॅन्युअल्सपर्यंत अनेक संदर्भ सापडतात. यातून त्याची आणि या पुस्तकाशी निगडित इतरांची या विषयाबद्दलची तळमळ दिसून येते. चिन्मयशी मी अनेकदा गप्पा मारल्या असल्यामुळे मला ही प्रस्तावना त्याच्या खास आवाजात वाचण्याचीही संधी मिळाली. आणि त्यामुळे माझ्यासाठी या प्रस्तावनेला अजून थोडं वजन आलं. >> या माहितीसाठी विशेष धन्यवाद.
मी लगेच केलं ऑर्डर अॅमेझॉनवरून.
@ मामी
@ मामी
पुस्तक आलं की त्यातील कृती करून इथे चर्चा करुया. मी काही शोधून ठेवल्या आहेत. पण सध्या माझं IF जोरात चालू असल्यामुळे मी भरीत सेक्शन आधी घेतलय.
सई, माझं पुस्तक आलेय . वाचतेय
सई, माझं पुस्तक आलेय . वाचतेय. नंतर विस्तृतपणे पोस्ट करेन .
मीपण केलं ऑर्डर. मला
मीपण केलं ऑर्डर. मला पाककृतींंची पुस्तकं वाचायला तशीही आवडतातच. विशेषतः सुरुवातीला दिलेली माहिती वगैरे.
मला वाचायचंय
मला वाचायचंय
याची सध्या हार्ड एडिशन आहे, किंडल आवृत्ती काढण्याचा विचार आहे का?
ईंटरेस्टींग
ईंटरेस्टींग
शोधते हे पुस्तक अमेझॉन वर>>>
मी ऑर्डर केल हे पुस्तक काल आणि आईला पाठविलं. अंगत पंगत वरचा लेख वाचल्यापासूनच ऑर्डर करायच ठरविलेलं. सई छान ओळख.
छान ओळख. पण टोळी मत कहो
छान ओळख. पण टोळी मत कहो ना ! त्या शब्दाला मला तरी डाकू / लुटारूंची टोळी असं निगेटिव्ह कनोटेशन वाटतं. चमू म्हणा , गट म्हणा, टीम म्हणा चालेल.
@मेधा
@मेधा
बरं!! बदलते. पण गट, टीम वगैरे खूपच साधं वाटतं.
ज्या पद्धतीने हे लोक एक एक पुरावा घेऊन त्यावर तुटून पडतात त्यावरून त्यांना टोळी म्हणावेसे वाटते.
छान ओळख !माणसं टोळीने राहायला
छान ओळख !माणसं टोळीने राहायला लागली म्हणतोच ना... तेव्हा तो खटकत नाही.
छान परिचय.
छान परिचय.
छान आहे हा पुस्तक परिचय!
छान आहे हा पुस्तक परिचय!
पुस्तक नो डाउट छान असणारच,
पुस्तक नो डाउट छान असणारच,
पण ओळखसुद्धा छान करून दिलीये.
जेव्हा पुस्तकाबद्दल ऐकले तेव्हा मनात रेलेवन्स चा प्रश्न पाहिले आला होता, तुझ्या लेखात त्याला उत्तर मिळाले असे वाटतंय
धन्यवाद.
बाकी अन्न: वै प्राण: मुळे चिनुक्स चा या विषयातील इंटरेस्ट आणि विषय मांडण्याची हातोटी माहिती आहेच, त्यामुळे पुस्तक आवडेल असे वाटतंय.
छान पुस्तक परीचय! देशातल्या
छान पुस्तक परीचय! देशातल्या अॅमेझॉनवर ऑर्डर करावे लागेल ना हे पुस्तक?
Ordered. लेखाबद्दल आभार.
Ordered.
लेखाबद्दल आभार.
@सिम्बा
@सिम्बा
वाट बघा थोडी. मी पीठ चेचायला दगडी खलबत्ता पण आणला आहे आईकडून. आता मी १८७५ मध्ये वास्तव्याला जाणार आहे. फक्त ट्रायपॉड २०२० चां असेल.
सगळ्यांचे अनेक आभार! पुस्तक जरूर घ्या आणि पाककृती सुद्धा करून पहा. पूर्वीच्या आणि आताच्या असं एकापाठोपाठ युट्यूबवर बघायलाही मजा येते.
माझं आताच आलं आहे संध्याकाळी.
माझं आताच आलं आहे संध्याकाळी. आता वाचेन अगदी सुरुवातीपासून. (मी त्या प्रस्तावना न वाचणार्या क्याटेगरीत आहे )
छान पुस्तक परिचय!
छान पुस्तक परिचय!
मेघना, चिन्मय, भूषण, आदित्य, आदुबाळ, सुनीत , प्रियांका..
या बुद्धिमान टोळीचे अनेकानेक आभार व पुढील पुस्तकासाठी शुभेच्छा!>>>+१
किंडल आवृत्ती काढण्याचा विचार आहे का?>>+१
मी देशातल्या अॅमेझॉनवर ऑर्डर करून आई बाबांकडे पुस्तक पाठवावे असा विचार करती आहे.
आजच्या पेपरमध्ये या
आजच्या पेपरमध्ये या पुस्तकाबद्दल सविस्तर वृत्त वाचलं.
kuthe milel he book ?
kuthe milel he book ?
Pages