मूगलेट

Submitted by मीपुणेकर on 23 October, 2020 - 02:53
मूगलेट
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पिवळी मूगडाळ - २ वाट्या
तांदूळ - २ चहाचे चमचे भरुन ( २ टीस्पून)
आल्याचा तुकडा - नेहेमी पेक्षा जरा जास्त
हिरव्या मिरच्या - २ लहान ( आवडीप्रमाणे कमी जास्त)
चिरलेल्या भाज्या - कोथिंबीर, कांदा, सिमला मिरची, किसलेले गाजर, मटार, मका ई. (आवडीनुसार हव्या त्या)
हिंग
हळद
मीठ
२ चमचे तेल
चिमूटभर ईनो
अर्धा चमचा बटर ( हवे असल्यास, बटर घातले नाही तरी मूगलेट्स चांगले लागतात )

क्रमवार पाककृती: 

पूर्वतयारी -
१. पिवळी मूग डाळ (२ वाट्या) + तांदूळ ( २ चमचे भरून) स्वच्छ धुवून साधारण ५ तास पाण्यात भिजवून ठेवावी.
मूगडाळ तास दिड तासात पण भिजते पण जरा जास्त वेळ भिजली कि जास्तीच पाणी फार न घालता मस्त स्मूथ वाटली जाते .

कृती -
२. वरील भिजवलेली मूग डाळ + तांदूळ निथळवून त्यात भरपूर आलं, मिरच्या घालून कमीत कमी पाणी घालून मिक्सर मधून बारीक वाटावी. हे मिश्रण फार पातळ नको.
३. त्या वाटलेल्या मिश्रणात मीठ, हिंग, हळद घालून हव्या त्या भाज्या चिरुन घालाव्यात ( कोथिंबीर, सिमला मिरची, कांदा, किसलेलं गाजर, मटार वगैरे)
४. मिश्रण डावाने नीट मिसळून, चांगले फेटून घ्यावे. चव बघून हवं असल्यास मीठ,तिखटाचे प्रमाण अ‍ॅडजस्ट करावे.
५. छोट्या ऑमलेट पॅनला ब्रशने तेल लावून घ्यावं आणि गॅसवर लहान आचेवर गरम करत ठेवावं.
६. पॅन गरम होई पर्यंत मूगलेटचं मिश्रण २ मोठे डाव एका भांड्यात काढून घ्यावं, व त्यात अगदी किंचीत पाव चिमटी ईतकाच ईनो घालून मिक्स करावं व लगेचच ते मिश्रण पॅन वर जाडसर पसरवावं. थिकनेस पिझ्झा बेस एवढा असावा.
७. बारीक गॅस वर ५,६ मिनीटे पॅन वर झाकण ठेवून शिजवावं.
८. मूगलेट खालून सोनेरी खमंग क्रिस्पी झालं कि कडेने व वरच्या बाजूला पण तेलाचा ब्रश फिरवून, आता ती बाजू नीट उलथवून ती पण छान सोनेरी क्रिस्पी होईपर्यंत भाजायची (४ मि) या वेळी गॅस मध्यम आचेवर ठेवला तरी चालेल.

दोन्ही बाजू छान सोनेरी रंगावर भाजून झाल्यावर प्लेट मध्ये मूगलेट काढून आवडीनुसार वरून बटर घालायचं, पिझ्झा कटरने चार भाग करुन ( असे केल्याने खायला सोपे पडते ) केचप बरोबर खायचं Happy

वाढणी/प्रमाण: 
. मी वापरलेली वाटी फार मोठी नाही. तर वर दिलेल्या प्रमाणात मध्यम आकाराची साधारण ४ मूगलेट्स होतील.
माहितीचा स्रोत: 
ऐकीव माहिती व आवडीनुसार केलेले बदल
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

छान पाकृ आणि फोटो!
तांदूळ मोजायला चमचा म्हणजे टेबलस्पून की आपला नेहमीचा चहाचा?

धन्यवाद सगळ्यांना Happy

मानसी, मूगलेट छान दिसत आहे.

स्वाती२, टीस्पून. अपडेट करते वर रेसिपी मध्ये Happy

सगळ्यांना धन्यवाद Happy

@सिम्स, चिला म्हणजे आपल्या बेसनाच्या धिरड्या सारखा प्रकार असतो ना.
हे मूगलेट नाव आणि पदार्थ दिल्ली साईडला फेमस आहे, तिथे हा रोड साईड स्नॅक प्रकार मिळतो.

@भरत, मूगलेट पॅनवर जाड सर घालतात आणि अगदी मंद गॅस वर शिजवल्याने आत पर्यंत छान शिजले जाते. मोठा गॅस करुन घाईने भाजली तर बाहेरुन लवकर खरपूस झाली तरी आतून कच्ची राहतील.
माझ्याकडे असलेले पॅन पण जाड बुडाचे आहेत. त्यात दोन्ही बाजूनी छान खरपूस खमंग होण्यासाठी एका मूगलेट साठी साधारण ८ -१० मि. टोटल लागली.
दोन पॅनवर विसेक मि. आत ४ मूगलेट तयार होतात. दोघांना पोटभरीचे होते.

मूग भिजवायचे राहून गेले म्हणून मागे ईंस्टंट असे मेथी, ओट्स, रवा वापरुन या पद्ध्तीने झटपट ओट्सलेट (?) करुन पाहिले. छान लागला तो पण प्रकार आणि पटकन झाला म्हणून मग बरेचदा केला जात आहे.
जर काही झटपट प्रकार हवा असेल तर करता येईल म्हणून ईथे लिहून ठेवत आहे. Happy
हा ओट्सलेटचा फोटो .

OatPancake.jpg